द ग्रेट रिफ्ट व्हॅली - भाग २ (आणखी फोटोंसकट)

Submitted by दिनेश. on 4 January, 2011 - 04:57

तर हे आहे नारोकचे सनातन हिंदु मंदिर. बाहेरून जरी फार भपका नसला, तरी आत देऊळ, सुसज्ज खोल्या वगैरे सर्व काही आहे. एक छोटा हॉलही आहे.

त्या वाटेने जरा पुढे गेल्यावर हे एक सुंदर फूल दिसले.

कसले आहे माहिती आहे ? फड्या निवडुंगाचे..

तिथे आणखीही काही अनोखी फूले दिसली.

हे आणखी,

तशी ती जागा जरा उंचवट्यावर असल्याने, वार्‍याच्या सुखद झुळुकी येत होत्या. तिथले व्यवस्थापक रहायचा आग्रह करत होते, पण आम्हाला थांबता येण्यासारखे नव्हते, दुपारनंतर या व्हॅलीत वादळे होऊ शकतात आणि धुवांधार पाऊसही पडतो. दुपारच्या चहाचा आग्रह मोडून आम्ही परत फिरलो.
वाटेत वादळाची चाहूल लागलीच.

तिथल्या सर्व बाभळी एकाच प्रकारच्या आहेत असे नाही, काही पांढर्‍या तर काहि पिवळ्याही आहेत, पण बहुतेक झाडांचा शेप हा असाच.

रस्त्याच्या कडेने जे दिसतेय ते तिथल्या मातीखालचे थर. एकेक थर निर्माण व्हायला सहज हजारो वर्षे लागली असतील. त्यातली बिळे हि काही छोट्या जनावरांची कारागिरी आहे. खाली जे बांधकाम दिसतेय, ते अचानक होणार्‍या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केले आहे. पुराची शक्यता वर्तवणार्‍या पाट्या जागोजागी होत्या.

जिथे जमिनीत पाणी आहे, तिथे थोडीफार शेती पण होते. (या रस्त्यावर झेब्रा, जिराफ, हरणे दिसतच राहतात, पण त्यांना कॅमेरात मी पकडू शकलो नाही. दु:खाची गोष्ट म्हणजे रस्त्यावर गाडीचा धक्का लागून मेलेलीही अनेक जनावरे दिसतात. माझ्या काही फोटोत ते अजाणतेपणी आलेय. पण ते फोटो मी इथे दिलेले नाहीत.)

हा एक बाळज्वालामुखी बहुतेक. (फोटोत वाटतोय तेवढा लहान नाही हा ) याच्या विवरात उतरता येते.

आणि हा थोरला ज्वालामुखी. या फोटोत त्या विवराची लांबी लक्षात येईल..

या ज्वालामुखीच्या मागे लेक नैवाशा आहे. आम्ही परत तिथेच चाललो होतो.

जसजसे नैवाशा गाव जवळ यायला लागते, तसतसे आपल्याला रेल्वेचे रुळ दिसायला लागतात. या संपूर्ण व्हॅलीमधून रेल्वे जाते. ब्रिटीशांनी ती बांधून घेतली होती, आणि त्यासाठी भारतातून अनेक मजूर नेले होते.
हे मजूर मग तिथेच स्थायिक झाले. आज त्यांची तिसरी चौथी पिढी इथे नांदतेय. अनेकांनी आयूष्यात कधी भारताला भेटच दिलेली नाही. भारतात त्यांचे कुणी नातेवाईकही उरलेले नाहीत.
पण त्यांनी आपला देवधर्म, संस्कृती, आहार मात्र आवर्जून जपलाय.
नैवाशा मधल्या एका हनुमानाच्या देवळात आम्ही विसावलो. हे देऊळ एका घरासारखेच होते. तिथला एक पुजारी तर चक्क काळा (केनयन ) होता. (आफ्रिकन लोकांना काळे म्हणणेच योग्य आहे. निग्रो हा शब्द आता अपशब्द आहे. ) अगदी मंत्र म्हणत त्याने आम्हाला तीर्थ प्रसाद दिला.
पुजारीण बाईंनी चक्क चहाच समोर आणला, चहाच्या वेळेला आलाय, असे कसे सोडीन, म्हणत सर्वांना चहा प्यायला लावला. खर्‍या अर्थाने देवाचे घर होते ते. देवळात फोटो काढणे मला प्रशस्त वाटले नाही, पण तिथल्या बागेतले हे गुलाब.

त्या देवळातला चहा पिऊन आम्ही परत नैरोबीच्या वाटेला लागलो. आता मात्र हायवे पकडला होता. त्यामुळे चढ काही तीव्र नव्हता. तिथूनही एका ठिकाणाहून व्हॅलीचे मस्त दर्शन होते. (तो प्रचंड डोंगर आता आपल्या नजरेच्या पातळीवर असतो.)

तिथला सूर्यास्त बघायचा होता, पण सूर्य अजून बराच वर होता.

पण तेवढ्या उन्हातही तिथे कडाक्याची थंडी होती. बोचरा वाराही होता. तरी तिथली काहि फूले मी टिपलीच. हे तर अगदी जमिनीलगत होते.

तिथेच काही प्राण्यांच्या फर्स विकायला होत्या. त्यांना हात लावायचाही मला धीर होत नाही.

मी आपला फूलातच रमलो होतो

हा भाग अत्यंत सुपीक आहे. चहाचे मळे आहेतच, शिवाय कोबी आणि बटाट्याचेही अमाप पिक येते इथे.
हि आहेत बटाट्याची फूले

हि पण बटाट्याचीच

तिथे मसाई लोकांच्या काहि कलाकृतीच्या वस्तूही विकायला होत्या. (काही मायबोलीकरांसाठी घेतल्यात रे ) या अशा शाली, हि त्यांची खासियत.
आपल्याला जरी हे रंग भडक वाटत असले, तरी त्या भागात भरकटलेला माणूस शोधायला याच रंगाचे कपडे हवेत. हि माणसे ताडमाड उंच आणि काटक असतात. स्वतःचे शरीर ते अनेक प्रकारच्या मण्यांनी सजवतात. त्यांची नजर पण फार तीक्ष्ण असते. दृरवरचे कुठलेही जनावर ते ओळखू शकतात. वादळाची पण त्यांना आधीच चाहूल लागते.

त्या व्हॅलीत जरी नसले तर खुद्द नैरोबीत घनदाट जंगल आहे. असेच रम्य जंगल पार करत आम्ही, इथल्या व्हीलेज मार्केट मधे शिरलो. तिथे दिसलेला ट्रॅव्हलर्स पामचा फूलोरा

व्हीलेज मार्केट या नावावर जाऊ नका. हा अत्यंत विस्तिर्ण असा मॉलच आहे म्हणा. पण आपल्याकडचे मॉल्स बंदीस्त असतात, तर हा खुला आहे.

परत मी आपला फूलांच्या मागेच.

हे पण तिथलेच

हे ही,

आणि हो, खाऊशिवाय हा लेख कसा पुर्ण होणार ? नैरोबीच्या पश्चिमेचा हा भाग, पिवळ्या प्लम्स (आलू बूखार) साठी प्रसिद्ध आहे. अत्यंत मधूर असे हे प्लम्स असतात. आम्ही नेहमी ज्या भावात घेतो त्याच्या पावपट भावात ते मिळलए मला. इथल्या रस्त्याच्या कडेने, आकर्षक सजावट करुन हे विकायला असतात.

आणि हि आहेत वेगळ्या प्रकारची पॅशन फ्रुट्स. इथे वेगवेगळ्या प्रकारची पॅशनफ्रूट्स मिळतात, काही नुसती खाता येतात तर काहिचे सरबत करतात. कुठलेही असले तरी त्याचा वास मात्र धुंद करणाराच असतो.

या लेखाचे शीर्षक जरी द ग्रेट रिफ्ट व्हॅली असले तरी, मी बघितला तो या व्हॅलीचा केवळ एक कोपरा होता.

गुलमोहर: 

त्या थोरल्या ज्वालामुखीचे नाव सुसवा. त्याचा गुगलवरुन घेतलेला फोटो इथे देतोय.
गूगल अर्थ वरील त्याची माहिती अवश्य वाचा.

mt suswa.JPG

सुरेख. मला ते फड्या निवडुंगाचे फुल खुपच आवडले. फोटोशॉप मध्ये त्याला ऑईलपेंट इफेक्ट दिला तर सुरेख पेंटिंग दिसेल. रंग तर काय मोहक आहे. हा गुगल अर्थचा फोटो टाकलाय ते बेस्ट केलत्...त्यामुळे त्या ज्वालामुखीच्या विस्ताराची पूर्ण कल्पना येतेय.

आपल्या पुण्याच्या सिंबीच्या टेकडीवरच्या फ़डया निवडुंगाला बटाट्याच्या फ़ुलाच्या फ़ोटोवरच्या फ़ोटोतली अनोखी फ़ुलं आलेली पाहिलीयेत मी. त्या फुलांच्या गुलाबी लांबट पाकळ्या उकलल्या की अशाच दिसतात.
तसंच फ़रच्या खालचा जो फ़ुलाचा फ़ोटो आहे ते फ़ूल मी डेफ़िनेटली राजगडच्या वाटेवर बघितलंय.
बाकी आफ़्रिकेत आणि महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या कपारयांमधले भाग यांत खूप साम्यस्थळं दिसली मला.काही फ़ुलं आणि पक्षी परके वाटले पण बाकी बरयाच फ़ोटोंमध्ये ’अरे, आपल्याकडे असतं बरं हे, कुठे बघितलंय?" अशी भावना झाली. Happy