परवा पहाटे आमच्या चाळीतले नाना पेंडसे अचानक गेले... हार्टफेलनं ! नाना म्हणजे इरसाल, महाखाष्ट. त्यांचं चाळीतल्यांशीच काय पण घरच्यांशीही कधी पटलं नाही. त्यामुळे सकाळी 'नाना गेले...' असं ऐकल्यावर 'काय सांगता ?' या प्रश्नाच्या चेहेर्यावरील भाव मात्र 'क्या बात है !' असेच बहुतेकांचे होते. तरी शेजारधर्म म्हणून चाळकरी नानांच्या घरी जमले होते. गॅलरीत, जिन्यात, अंगणात मंडळी घोळक्यांनी उभी होती. मधूनच रडण्याची एखादी दुसरी लकेर कानावर पडत होती. या पार्श्वभूमीवर... हाताची घडी घालून, लांब चेहेरा करून 'आजकाल माणसाचा काही भरवसा राहिला नाही....' या विषयावर कुजबुजत सुरु झालेले संभाषण, नंतर हात पुढे करुन टाळी घेत कधी ऑफिसच्या व इतर विषयांवर घसरले हे कुणाच्याच लक्षात आले नव्हते. यात 'नाना' मात्र कुठेच नव्हते.
एवढ्यात चाळीसमोर एक रिक्षा येऊन थांबली. त्यातून नानांची पुतणी उतरली. पैशाच्या देण्याघेण्यावरुन तिचं रिक्षावाल्याशी काहीतरी बिनसलं असावं. त्यांचा मोठ्यानं वादविवाद सुरु झाला. बाहेर थांबलेल्या मंडळींचं त्याकडे लक्ष गेलं. कुणीतरी पटकन पुढे झालं आणि मध्यस्ती करुन वाद मिटवला. त्यानंतर त्या पुतणीने वर नानांच्या घराकडे एकवार नजर टाकली आणि कुणाला काही लक्षात येण्यापूर्वी मोठ्यानं हंबरडा फोडून तीरासारखी जिन्याकडे धावली. मोठ्याने आकांत करीत स्वतःला घरात झोकून दिले. समस्त पब्लिक चाट...!
'नाना नेमके कधी गेले ?' नाईटशिफ्ट करून नुकत्याच आलेल्या वसंतानं कुलकर्ण्यांना विचारले.
'म्हणजे बघ, काल संध्याकाळी आमचा राहुल पुण्याहून आला. पुण्याला बीई करतोय ना तो ! तेव्हा --'
'ते माहीत आहे हो, मी विचारतोय नाना कधी गेले ?' वसंता वैतागला.
'तेच सांगतोय. राहुल आणि आम्ही रात्री टीव्ही पहात होतो. तुला सांगतो, आमचा राहुल म्हणजे--'
'का हो, नाना कधी गेले ?' वसंत वैतागून दुसरीकडे वळला.
'त्याचं काय आहे, काल रात्री माझं पोट बिघडलं होतं. त्यामुळे रात्री दोनदा बाहेर जावं लागलं. आता--'
'अहो पण, नाना--' वसंताला ट्रॅकचा अंदाज आला 'चला जाऊ द्या.' असं म्हणत आपले कुतुहल दडपून तो एका घोळक्यात शिरला.
गप्पा रंगात आलेल्या असतांनाच-
'चला, आता पुढे काय ?' हा प्रश्न आदळला. पुन्हा सगळे भानावर आले.
'सामानाच्या तयारीला लागू या' गजाभाऊंनी पुढाकार घेतला. याबाबतीत गजाभाऊंचा अनुभव दांडगा.
'कुणीतरी चला माझ्याबरोबर' गजाभाऊंच्या या ऑफरमुळे गर्दी एकदम शांत.
'मी आलो असतो, पण काय आहे की ....' (कारणं आठवण्यासाठी स्तब्धता)
'आज नेमकं ऑफिसला लवकर जायचं होतं.....' इथपासून ते '.......अजून परसाकडंला जायचंय !'
इथपर्यंत अनेकांची अनेक कारणं पुढे आली.
शेवटी गजाभाऊंबरोबर जाण्यास सर्वानुमते तरुण प्रोफेसरांची निवड (बळेच) झाली.
प्रोफेसर तसे उत्साही, पण याबाबतीत अनुभव नाही.
'असं शॉपिंग करायला मी अजून कधीच गेलेलो नाहीये, मला यातली काहीच माहीती नाही' प्रोफेसर जरा बिचकले.
'अहो, तुम्ही गेल्याशिवाय अनुभव येणार आहे का?' आता प्रोत्साहनासाठी सारेच पुढे सरसावले.
'गेल्यावर अनुभव येऊन काय फायदा!' कोणीतरी वाक्य टाकलंच.
'गप्प बसा हो, नाहीतर तुम्ही जा.' आता जमवून आणलेला खेळ कोणालाच मोडायचा नव्हता.
'चला, ठिक आहे मी जातो' नव्या अनुभवाला सामोरे जायला प्रोफेसर सज्ज झाले.
'द्या, सामानाची यादी द्या' प्रोफेसरांनी मागणी केली.
'यादी कसली मागताय ? ते काय किराणा सामान आहे का ?' गजाभाऊ पुढे झाले. 'चला मी आहे ना तुमच्याबरोबर.'
शेवटी गजाभाऊ आणि प्रोफेसर अंत्यविधिच्या सामानाचे शॉपिंग करायला निघाले.
प्रथम एका कापडाच्या दुकानात शिरले. गिर्हाईकाची नेमकी गरज ओळखून दुकानदाराने धोतर, उपरणे वगैरे कापडं काउंटरवर ठेवली. इथे प्रोफेसरांचा चिकित्सकपणा जागा झाला.
'अहो हे तर फारच विरळ आहे, याची एका धुण्यात वाट लागेल.' धोतराचे पोत चिमटीत पकडून प्रोफेसरांनी म्हंटले.
'एकदा धुवून तुम्ही पुन्हा वापरणार आहात का?' दुकानदार बहुतेक पुणेरी असावा.
प्रोफेसरांची बत्ती गुल....!
गजाभाऊंनी दुकानदाराच्या हातावर पैसे टिकवले आणि इतर सामान घेण्यासाठी ते पुढच्या दुकानात शिरले.
'कोण गेलंय ?' दुकानदाराने प्रश्न केला.
'आमच्या चाळीतले नाना' प्रोफेसरांनी पुन्हा स्टिअरिंग सांभाळले.
'नाव काय त्यांचं ?' दुकानदाराने पुन्हा प्रश्न केला.
'च्यायला, तुम्हाला काय करायच्यात नस्त्या चौकश्या?' प्रोफेसर भडकले.
'अवो सायेब, त्याशिवाय सामान कसे काढणार ?'
'का? हे काय रेशनचे दुकान आहे का? नावगाव कशाला विचारताय?'
अखेर गजाभाऊंनी समजावलं की, प्रत्येक जातीधर्मात अंत्यविधिच्या पध्दती थोड्याफार वेगवेगळ्या असतात. नावावरनं हे कळतं म्हणजे मग तसं सामान काढून देता येतं.
'बाजूला बांबू ठिवले हायेत. कोन्चे बी घ्या.' असं बोलून दुकानदार गजाभाऊंना सामान काढून देऊ लागला.
प्रोफेसर बांबू निवडू लागले.
'हे घ्या. कसे मस्त बांबू निवडलेत पहा' प्रोफेसरांनी जरा बाजूला ठेवलेल्यातले दोन चांगले जाड बांबू निवडले होते.
ते पाहून गजाभाऊ व दुकानदार दोघेही चाट झाले. गजाभाऊंना काय बोलावे ते कळेना.
'प्रोफेसर, आपल्याला तिरडीसाठी बांबू निवडायचे आहेत, मांडवासाठी नाही. 'वजन' खांद्यावर घ्यायचे आहे याचा विचार करा जरा' हे ऐकल्यावर मास्तरांची ट्यूब पेटली.
तरीपण प्रोफेसरांचा खरेदीचा उत्साह अजिबात मावळला नव्हता.
मडके घेतांनासुध्दा त्यांनी आधी ते सवयीनुसार वाजवून पाहीले.
'अवो सायेब, ते फ्वडाच्येच आस्ते, ही मडकी वाजवित न्हाय कुनी !' असं मुक्ताफळ ऐकल्यावरही
'मोठ्यावर छोटं फ्री देता का?' असं विचारायचं धाडस प्रोफेसरांनी केलंच.
'दोन मयतीचं सामान येक्दम घ्येता का? मंग भाव करुन द्येतो' दुकानदारही बेरकी होता.
'पाच गोवर्या एकदम घेतल्या तरी तुम्हाला त्यासाठी साधी कॅरीबॅग देता येत नाही ?' प्रोफेसरांना आता दुकानदाराचा राग आला होता. दुकानदाराची जिरवण्यासाठी त्यांनी जाताजाता गुगली टाकलाच.
'च्यायला हिथं श्येकड्यानं होळीसाठी गवर्या न्हेनारेबी घरुन पोतं आनत्यात, तुमी पाचाचं काय घिवून बसला?'
दुकानदारानंही सिक्सर ठोकला.
अशा तर्हेनं एकदाचं सगळं शॉपिंग पार पडलं. यातून प्रोफेसरांना किती अनुभव मिळाला ते माहित नाही. पण अनुभवी गजाभाऊंच्या गाठीशी मात्र एका नव्या अनुभवाची भर पडली.
.........क्रमश: ......... भाग १ पूर्ण
मन्या, लिखत
मन्या,
लिखते रहो.
- अनिलभाई
मन्या,
मन्या, चान्गल लिहिल हेस रे भो!
मजा आली
मजा आली

मस्त लिहीलय
'अवो सायेब,
'अवो सायेब, ते फ्वडाच्येच आस्ते, ही मडकी वाजवित न्हाय कुनी !' असं मुक्ताफळ ऐकल्यावरही
>>> लय भारी रे...
>>'हे घ्या.
>>'हे घ्या. कसे मस्त बांबू निवडलेत पहा
मन्या, सही
मन्या, सही रे !!!!!!!!!!!

मन्या, सही
मन्या, सही रे !!!!!!!!!!!
:))
अजुन येऊ दे
मस्त चालु
मस्त चालु आहे, जरा पटापट पुढचं पण पोस्ट.
हे कसं
हे कसं मिसलं इतके दिवस ? मस्त आहे !
भाग २ कधी ?
महान
महान :हाहा::D:हाहा:
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
मन्या
मन्या
ऑफिसात बसून वाचताना हसणं अशक्य होतंय.......
सही रे
सही रे सही..
लढ बापू लढ!
विषयपण काय
विषयपण काय भारी मिळालाय!!
आता पुढचा भाग केव्हा?जरा लवकर पोस्टा प्लीज..
..प्रज्ञा
धन्यवाद
धन्यवाद मित्रांनो !!! आता पुढचा भाग लगेच वाचायला घ्या.........
>>>> .........क्रमश:
>>>> .........क्रमश: ......... भाग १ पूर्ण
बर, ह्याचा भाग २ कुठ आहे? लिन्क देता का लिन्क?
>>> http://www.maayboli.com/node/2273 मिळाली लिन्क
सॉलिड आहे हे
सॉलिड आहे हे