जुन्या मायबोलीवर ही (सत्य)कथा
मी प्रकाशित केली होती. ज्यांनी वाचली नसेल त्यांच्याकरता पुन्हा एकदा.. 
साधारण दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. एक interview देण्याकरता मस्जिदबंदरला गेलो होतो. संध्याकाळी साधारण सव्वाचारपर्यंत सर्व आटोपून घरी यायला निघालो. हार्बरने वांद्र्यापर्यंत आलो. तिथून अंधेरी लोकल पकडायची असल्याने ट्रॅक क्रॉस करून Western ला येत होतो. ट्रॅकवरून platform वर उडी मारणार तोच platform वरच्या एका 'सभ्य' दिसणार्या माणसाने हात पुढे केला. तोच हात पकडून आम्ही platform वर उडी मारली. त्या माणसाला हसून thanx म्हटले आणि निघालो तोच त्याने थांबवलं..
"ओ.. तिकिट दाखवा."
अरेच्चा! म्हणजे हा तिकिट चेकर आहे होय! मी तिकिट दाखवलं. त्याने ते हातात घेतलं आणि मागच्या दिशेकडे बोट दाखवलं.
"जा तिथे जावून हुबे र्हावा."
तिथे पाहीलं तर दहा बारा माणसांची रांग. विशेष म्हणजे त्या रांगेत सूटाबूटापासून ते अगदी डोक्यावर ट्रंक इथपर्यंत सगळी माणसं होती. फरक इतकाच की सूटाबूटवाले प्रचंड embarrass झालेले तर बाकी सगळे एकदम बेफिकीर होते.
"कसली लाईन आहे ही?"
"सगळी ट्रॅक क्रॉस केलेली लोकं हायेत."
"म्हणजे!!" मी आश्चर्याने.. "असा ट्रॅक आम्ही नेहमी क्रॉस करतो!! तेंव्हा कुठे असता तुम्ही?"
"आज धाड हाये."
"अहो पण....."
"जास्त बोलायचं नाय, सरळ जावून लायनीत हुब र्हायचं."
सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. आम्ही चुपचाप त्या लायनीतल्या शेवटच्या माणसामागे जाऊन 'हुबे' राहीलो.
आता विचार करा. एक तर संध्याकाळची वेळ. त्यात Bandra station. रंगीबेरंगी गर्दीची वेळ. सगळे रंग आम्हाला आश्चर्याने न्याहाळत हसून पुढे जात होते. थोड्या वेळाने तो 'सभ्य' माणूस आमच्याजवळ आला. हातात दोन दोर्या. त्याच्याबरोबर आणखी चार माणसं होती. रांगेतल्या सगळ्यात पहिल्या माणसाच्या दोन्ही बाजूला दोघे जण दोर्यांच एक एक टोक घेऊन तर शेवटच्या माणसाच्या आजुबाजूला दोघेजण दोर्यांच दुसरं टोक घेऊन.. अशी व्युहरचना केली गेली.
"हं.. पवार निघा.."
त्या हुकुमासरशी दोन दोर्यांच्या मधून आमची वरात चालू झाली. रंगीबेरंगी गर्दीचं हसणं आता जास्तच वाढलं होतं. 'धरणी माते मला पोटात घे' हे सीतामायेचं वाक्य रामायणानंतरही इतकी वर्ष का वापरलं जातं हे त्यावेळेस मला समजलं.
Bandra east ला स्टेशनला लागूनच एक जुनाट पुराणी बिल्डिंग होती. त्या गढीवजा दिसणार्या बिल्डिंगमध्ये आमची वरात शिरली आणि पहिल्या मजल्यावरच्या एका अंधार्या कोठडीशी येऊन पोहोचली. आम्हा सर्वांना आंत जाण्यास सांगण्यात आले. मी हळूच आंत डोकावलो तर अगोदरच दहा बारा माणसं अगदी रिलॅक्स मूडमध्ये आंत बसली होती.
आमचे चेहरे बघून त्यातला एक म्हणतो "अरे आओ भाई. डरो मत. कुछ नही होगा. हम लोग तो एक देड घंटेसे यहां बैठे है."
सूटबूटवाल्यांची फारच पंचाईत झाली होती. आम्ही सर्वजण 'आता काय होणार' हे एक मोठ्ठ प्रश्नचिन्ह घेऊनच आत जाऊन स्थानापन्न झालो.
पंधरा एक मिनिटांनंतर मंडळी थोडी सावरली. गप्पा चालू झाल्या. दारावर एक ऊग्र चेहर्याचा पोलीस पहार्यावर होता. प्रत्येकजण 'आता इथुन सुटायचं कसं' याबद्दल एकमेकांना tips देत होता. गप्पा ठोकण्यात एक वयस्कर गृहस्थ सगळ्यात पुढे होते. अशा प्रसंगांचा बराच अनुभव असावा तसे ते बोलत होते. लवकरच त्यांनी आम्हा सर्वांचा कब्जा घेतला. मोठ्या तावातावाने बोलत होते.
"तुम्हाला सांगतो, एक नंबरची लुच्ची माणसं आहेत ही."
हे वाक्य बोलताना त्यांच्या डोळ्यांची झालेली चमत्कारिक हालचाल माझ्या डोळ्यांनी सोडली नाही. नंतर लक्षात आलं की हे वाक्य बोलताना त्यांचा उजवा डोळा माझ्याकडे आणि डावा त्या पहारा देणार्या पोलीसाकडे होता. काही असो पण अशा कठीण प्रसंगी त्यांचा आम्हाला आधारच होता. आम्ही त्यांना 'मामा' अशी हाक मारायला सुरूवात केली.
"तर तुम्हाला सांगून ठेवतो. आता हे आपल्याकडे पैसे मागतील. अज्जिबात द्यायचे नाहीत सांगून ठेवतो. काय?" इति मामा..
आम्ही सगळ्यांनी भजनाला बसल्यासारख्या माना डोलावल्या.
ही चर्चा चालू असतानाच आणखी एक बॅच आली. सगळे एकजात भेदरलेले. पण एव्हाना आतली मंडळी बरीच सावरलेली होती. मामांचा उत्साह तर उतू जायला लागला. एवढ्या लोकांच नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती त्यांना. घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करावं तसं त्यांनी सर्वांना प्रेमाने आत घेतलं.
"या या.. बसा. आजिबात काळजी करू नका."
नवीन बॅच येऊन आत बसली. आता ती खोली तीस पस्तीस जणांच्या जमावाने अगदीच अपूरी वाटत होती. मामांना आता चेव आला होता. पैसे द्यायचे नाहीत हे पुन्हा पुन्हा सर्वांच्या मनावर ठसवण्याचा ते प्रयत्न करत होते. दारावरचा पोलीस मात्र स्थितप्रज्ञासारखा बसला होता. त्याला कसलही सोयरसूतक नव्हतं.
तेवढ्यात एक माणूस आत आला. त्याने सांगायला सुरूवात केली. "तुम लोगोंके पास पैसा है तो पैसा देके निकल जाव. नही तो ये लोग नही छोडेंगे. कल तुम सब लोगोंको अनाडी कोर्ट लेके जायेंगे. उधर तो पैसा भरना पडेगाही. उससे अच्छा अभी भर दो."
सूटबूटवाल्यांनी या सल्ल्याचा seriously विचार करायला सुरूवात केली. मामा मात्र हटायला तयार नव्हते. एखाद्या कामगार नेत्याच्या आवेशात म्हणाले "पैसा तो हम देंगेही नही. क्यों?" हे सर्वांकडे पहात.
यावेळेस मात्र भजनीमंडळ सदस्यांची संख्या कमी झाली होती.
नवीन बॅचमध्ये टीपटॉप कपड्यातला file, paper folder वगैरे असलेला एक मुलगा होता. बिचारा एकदम घाबरला होता. मला हळूच म्हणतो "यार.. प्रॉब्लेम झाला यार.. कुठून ट्रॅक क्रॉस करायची बुद्धी झाली माहीत नाही. आधीच interview ला जायला उशीर झाला होता. आता काय करू रे?
"त्याला विचार." दारावरच्या त्या ऊग्र स्थितप्रज्ञाकडे बोट दाखवत मी म्हणालो.
"खरच विचारू?"
"अरे विचार ना. Interview ला जातोयस ना? तो सोडेल तुला."
हा घाबरत घाबरत उठला. पोलीसाकडे गेला.
"साहेब"
"काय आहे?" अतिशय बेदरकार आणि खुनशी आवाज.
"साहेब, मला inteview ला जायचय."
"मग मी काय करू?"
"साहेब, मला आता सोडा. हवतर inteview झाल्यावर मी परत येतो इथे."
मला हसावं की रडावं तेच कळेना. पुढे काय होणार या विचाराने मी माझे डोळे गच्च मिटून घेतले.
माझ्या कानावर आवाज कडाडला.
"कान के निचे खिंचू क्या एक. ये क्या बनियेका दुकान है? चल.. बैठ जगे पे. चलss."
पोरगं गेलं होतं त्याच्या दुप्पट वेगाने, ससा बनून माझ्या शेजारी विसावलं.
"काय बेक्कार हवालदार आहे!"
"तु चांगला हवालदार कधी बघीतलास?" त्याही परिस्थितीत माझ्या विनोदावर तो फिस्स्सकन हसला.
तोपर्यंत तिथे आणखी एक पोलीस आला. आमच्यातल्या एका टापटीप दिसणार्या माणसाकडे बघून म्हणाला.. "चला. साहेबांनी बोलावलय"
तो माणूस कपडे झटकत पटकन उठला. जमिनीवर बसण्याची त्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. बाकीचे लोक त्याच्याकडे, शिक्षा संपवून चाललेल्या कैद्याकडे बाकीचे कैदी जसे बघतील तसे बघत होते.
तेवढ्यात मामांनी त्या माणसाचा हात पकडला. "ते पैशाचं लक्षात ठेवा. अजिबात द्यायचे नाहीत. लुच्चे लेकाचे." वाक्य संपता संपता पुन्हा एकदा मामांच्या डोळ्याची ती चमत्कारिक हालचाल मला जाणवली.
एव्हाना सगळेच नाही तरी काही लोक मामांच्या शब्दाखातर पैसे न भरता परत आले होते.
दहा मिनिटांनी आणखी एकजण.. असं होता होता माझी वेळ आली. मी साहेबासमोर जाऊन उभा राहीलो.
साहेब एकंदरीत पाणवठ्यावर बसलेल्या गबदूल बेडकासारखाच दिसत होता. फरक असला तर इतकाच की साहेबाने युनिफॉर्म घातला होता.
"काय.. ट्रॅक क्रॉस करत होता म्हणे." (आणखी एक फरक आता कळला. बेडकाचा आवाज या आवाजापेक्षा नक्कीच मंजूळ असतो.)
"नेहमी करतो"
"असं कां? राहता कुठे?"
"पार्ल्याला"
"कुठे जात होता?"
"घरी येत होतो"
"कुठे गेला होता?" (आवाज चढवून)
"Interview देऊन घरी चाललो होतो"
"काय करता?
"नोकरी"
"नोकरी करता तरी interview देता?" (मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला)
"साहेब, पगार मिळत नाही आताच्या नोकरीत म्हणून दुसरी शोधतोय"
"किती पैसे आहेत?"
"फक्त १० रुपये"
"१०० रुपये आहेत का?"
"फक्त १० रुपये आहेत आणि ते सुद्धा मला घरी जायला लागतील."
"घरी फोन करून मागवा"
"घरी फोन नाही"
"शेजारी फोन करा"
"शेजारी फोन देत नाहीत. पुण्याचे आहेत"
"मग ऑफिसमधून मागवा"
"ऑफिसमधून मलाच पगार मिळत नाही तुम्हाला काय देणार.."
"मग चला.. निघा.."
माझा विश्वासच बसेना. इतक्या लवकर सुटका!!! मला एकदम गाणंबिणं म्हणत नाचावस वाटलं 'आज मै उपर, आसमां निचे'
मी आनंदाच्या भरात बाहेर जायला निघालो आणि शेजारच्याच पोलीसाने माझं बखोट पकडलं..
"ओ.. बाहेर नाय.. आत चला."
आसमांमधून आम्ही पुन्हा जमिनीवर..
कोठडीत आलो. मामा खुश. आणखी एकजण पैसे न भरता आला म्हणून.
आता खुद्द मामाना बोलावणं आलं. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मामा निघाले. बराच वेळ झाला.. मामा परतले नाहीत. म्हणून चौकशी केली तर कळलं की पैसे देऊन मामा बाहेरच्या बाहेर पशार झाले होते. मामांच्या शब्दाखातर परत आलेल्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. मला दुसर्यांदा बोलावणं आलं. पण पैसे नसल्याने पुन्हा कोठडीत आलो. होता होता कोठडीत आम्ही फक्त चारजणं राहीलो. मी, दोन भंगारवाले आणि दारावरचा स्थितप्रज्ञ. आता मात्र मला काळजी वाटायला लागली. डोळ्यासमोर अनाडी कोर्ट दिसायला लागलं.
तेवढ्यात मला तिसर्यांदा बोलावणं आलं. गेलो. साहेबाने करारी आवाजात final विचारलं.
"किती पैसे भरताय?"
"साहेब, खरच पैसे नाहीत. कसे भरू?"
शेजारी तोच माणूस उभा होता जो सकाळी मला घेऊन आला होता. त्याच्याकडे साहेबाने, 'कुठून कुठून माणसं पकडून येता हो' या अर्थाचा कटाक्ष टाकला. "चला, निघा.." असं म्हणून जाण्याची खूण केली. मी सवयीने पुन्हा कोठडीकडे वळलो. पुन्हा शेजारच्या पोलीसाने माझं बखोट धरलं.
"अहो आत कुठे चाललाय..! आत नाय.. बाहेर निघा. कुठून कुठून येतात एकेकजण."
अ फ ला तू न आहे किस्सा !! <<
अ फ ला तू न आहे किस्सा !!
<< साहेब एकंदरीत पाणवठ्यावर बसलेल्या गबदूल बेडकासारखाच दिसत होता >>
(No subject)
अफाट हसले.
अफाट हसले.
हाहा भारीच
हाहा
भारीच
(No subject)
(No subject)
Pages