लेक नैवाशा भाग २

Submitted by दिनेश. on 28 December, 2010 - 11:59

http://www.maayboli.com/node/22217#new पहिला भाग इथे आहे.

पनीर भूर्जी बरोबर चपात्या करायचा बेत होता. सगळ्यांना गरमागरम चपात्या मिळाल्या, तेवढ्यात तव्यावर चुर्र चुर्र असा आवाज ऐकू यायला लागला. पहिल्यांदा आम्हाला काही कळलेच नाही. सूर्यप्रकाश तर होताच त्यामूळे पावसाची शक्यता कुणाच्याच लक्षात आली नाही. बघता बघता सोसट्याचा वारा सुटला. वारा अडवायला खाली झाडे नसल्याने तो अंगाला बोचायला लागला.
आणि थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरु झाला. आमचे टेंट वार्‍याने फडफडू लागले.

बहुतेक वेळा आपण ज्यावेळी सरोवराच्या काठाशी असतो, त्यावेळी सरोवराचे काठ जरा उंचावलेले असतात. त्यामूळे पाणी आपल्या नजरेच्या पातळीखाली असते, पण इथे मात्र ते नजरेच्या पातळीवरच होते.
सहज लक्ष गेले तर आता पर्यंत शांत असलेल्या पाण्यावर प्रचंड खळबळ होत होती. अगदी लाटा उठत नव्हत्या पण पाणी जागच्या जागी डुचमळत होते.
आम्हाला पटापट सगळे आवरुन टेंट्चा आसरा घ्यावा लागला. तास दिड तास हे थैमान चालले होते. तंबू गळायला लागतील असे वाटायला लागले. नैवाशा या शब्दाचा अर्थ आता चांगलाच लक्षात आला होता.
दोन तासाभरातच सर्व शांत झाले. तिथे सरोवरात जाण्यासाठी होड्या होत्या, पण थोड्याच वेळापुर्वी बघितलेले वादळ लक्षात घेता, कुणाचीच तयारी नव्हती.
मग थोडा वेळ इकडेतिकडे केल्यावर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करु लागलो. संध्याकाळी चक्क पावभाजीचा बेत होता. तो पण असातसा नाही, तव्यावर प्रत्येकवेळी कांदा, टोमॅटो परतून, पाव शेकून वगैरे. (खरे तर तिथे खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. पण हौसेला काय करायचे.. )

मग अर्थातच उबेसाठी शेकोटी करणे आलेच. तिथे झाडांच्या दाटींमूळे पावलापावलावर किडूकमीडूक फांद्या मिळत होत्याच पण उबेसाठी हवे असणारे मोठे ओंडकेही तिथे विकत मिळत होते.

शेकोटीभोवती गप्पांचा फड रंगला. आधी लिहिल्याप्रमाणे त्या सरोवरात हिप्पोंची वस्ती आहे. ते बाहेर पडू नयेत म्हणून तारांचे कुंपण घालून त्यात सौम्यसा विद्यूतप्रवाह सोडतात. त्याने प्राण्यांना ईजा होत नाही. पण ते जवळ आल्यास अलार्म वाजू लागतो.
चतुर्थीची रात्र असल्याने चंद्र उशीराच उगवणार होता. आम्ही आपापल्या टेंटमधे जाऊन झोपलो. रात्री
हिप्पोंचा आवाज बर्‍याच जणांनी ऐकला, दूरवर अलार्म वाजलेला पण ऐकला.

नेहमीप्रमाणेच मला पहाटे ५ वाजताच जाग आली. दिवसभर मला ७ लहान मूलांचा गराडा होता, त्यामूळे मला हवे तसे भटकता येत नव्हते.
तिथली रम्य पहाट मला स्वस्थ बसू देत नव्हती

तिथे प्रसाधनगृह आणि अंघोळीसाठी गरम पाणी सहज उपलब्ध होते. जरासे दिसू लागल्यावर मी फेरफटका मारायला निघालो. रिसॉर्टच्या समोरच एक टेकडी होती, तिच्यावर गेलो. वाटेत कालचेच पक्षी नाचत होते. त्यांना पर्यटकांची सवय असावी.
टेकडीवर खास केनयाची नवसंपदा होती. इथे बाभळीचा एक वेगळा प्रकार दिसला. झाडावरच्या गाठी
साध्यासुध्या नाहीत. पण त्याबद्दल मग लिहिन (मग लिहिनची यादी वाढायलाच लागलीय आता,)

जरा चढून गेल्यावर मात्र सूर्योदयाचे अप्रतिम दृष्य दिसले.

कालचा ज्वालामुखीचा पर्वत मात्र अजून दुलई सोडायला तयार नव्हता.

तिथूनच लेक चा बराच विस्तार दिसायला लागला.

पण तो एका फ्रेममधे मावणे शक्यच नव्हते..

सूर्य हळूहळू वर यायला लागला होता..

पण तरिही डोंगरोबा, दुलई सोडायला तयार नव्हते,,

त्याच परिसरात निवडुंगाची वेगळी फूले दिसत होती.

माझा फेरफटका आटपून मी परत मुक्कामी आलो तर, लेक मधले पाणी बरेच शांत झाले होते.

मग मी सगळ्यांची मिनतवारी करुन, सरोवरात बोटींगसाठी तयार केले. हिप्पो दाखवलेस तरच पैसे देईन या वायद्यावर आम्ही एका होडीत बसलो.
हिप्पोंपेक्षा तिथले पक्षी जास्त प्रेक्षणीय होते, आणि त्या पक्षांनादेखील आमची भिती वाटत नव्हती.

तिथल्या दगडादगडावर त्यांची शाळाच भरली होती.

दूरवर आम्हाला हिप्पो दिसलेही. पण ते काही पाण्याच्या वर यायला तयार नव्हतो. फोटोमधे फक्त त्यांचे फक्त कानच दिसत होते. त्याच्या फार जवळ जाण्यात धोका होता. एका धक्क्याने त्याने आमची होडी उलटवली असती.

मग आम्ही परत पक्षांकडे वळलो.

एक वेगळा पेलिकन

नेहमीचे पेलिकन्स

काहि बदकं

काल हेच लेक इतके अशांत होते, यावर आता विश्वास ठेवणे कठीण होते.

वायदा केलेल्या वेळेपेक्षा दुप्पट वेळ बोटिंग करुन आम्ही किनार्‍यावर आलो. समोरच हा पक्षीराज दिसला.

तिथे खरेच सगळे अनोखे होते.
हे एक डिझायनर माकड (फोटोत दिसत नसली तरी याची शेपटी पण मस्त झुपकेदार होती)

माझ्या अपेक्षेप्रमाणे हा फोटो आलेला नाही, पण तळे आता परत अशांत व्हायलालागले होते. (लेकच्या काठाशी, हिप्पोंच्या कवट्या वगैरे ठेवलेल्या आहेत )

शेवटी परत फिरायची वेळ आलीच. सगळ्या बाळांचा मला खूपच लळा लागला होता. खरे तर ती कायम माझ्याभोवती असल्याने मला फार उंडारता आले नव्हते. पण बाळांना सोडून जाणेही मला शक्य नव्हते. अशाच एका बाळाने दिलेला गोड पापा.

येताना आम्ही दुसर्‍या वाटेने आलो. व्हॅलीतूनच या डोंगराला पूर्ण वळसा घालून अगदी शेवटी तीव्र चढ लागतो. अर्थात तो आपल्या घाटांच्या मानाने मामुलीच आहे. हा भाग मला वाटते पर्जन्यछायेत येत असावा. डोंगर काहि फार हिरवे नव्हते.

पण हा पुर्णपणे दुसरा रस्ता आहे. इथेच वाटेवर आणखी एक व्हॅलीसाठीचा व्ह्यू पॉइंट लागतो. इथे मसाई लोकांच्या शाली वगैरे विकायला असतात (त्या नैरोबीमधेही मिळतात) तिथेच प्राण्यांच्या फर पण विकायला असतात. उत्तम असल्या तरी मला त्या विकत घ्याव्याश्या वाटत नाहीत कारण क्रूरपणा आहेच शिवाय माझ्या माहितीप्रमाणे, विमानातून त्या नेता येत नाहीत.

जायच्या आधी मला या लेकबद्दल नेटवर बघायला वेळ मिळाला नव्हता. हे लेक पूर्णपणे पावसाच्या पाण्यानेच भरते. पावसाच्या प्रमाणानुसार या एकचा विस्तार आणि खोली ठरते. गेला १०० वर्षात दोनदा हे लेक पूर्णपणे कोरडे झाले होते. या लेकला लागूनच दोन छोटे लेक्स पण आहेत.
याच परिसरात गरम पाण्याचे झरे पण आहेत. त्याला हेल्स गेट म्हणतात. ती पाटी आम्हाला दिसली होती, पण तेव्हा त्याची माहिती नव्हती.
माझा ग्रुप खूप मस्त आणि मनमोकळा होता. त्यातील अनेकांना मी पहिल्यांदाच भेटत होतो. पण खरे सांगू, त्या टेकडीवर मला मायबोलीकर दोस्तांची खुप आठवण आली.
योगेश, चंदन, अभिजीत, सावली सारखे कलाकार असते तर याहून सुंदर फोटो बघता आले असते.
(नैरोबीपासून हे लेक साधारण १०० किलोमीटर्स वर आहे. रस्ता उत्तम आहे, राहण्याची, जेवणाची उत्तम सोय आहे. या परिसरातही फ्लेमिंगो दिसतात.)

गुलमोहर: 

बाकी फोटो आणि डिझायनर माकड मधलं 'डिझायनर' हे विशेषण आवडलं, परंतू डिस्प्ले या वर्णनाखाली टाकलेला माकडाचा फोटो इथे अयोग्य वाटतो.

मृण्मयी, अंजली, इथल्या वाचकांच्या बालमनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून तो फोटो डिलीट केला. हॅप्पी नाऊ ?

दिनेश,
तुमच्या 'वाचकांच्या बालमनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून' आणि 'हॅप्पी नाऊ ?' या दोन कॉमेंटसचं प्रयोजन कळलं नाही. मायबोलीवर नजरेला, विचारांना खुपतील असलं 'material' येउ नये असं प्रामाणिकपणे वाटतं म्हणून माझं मत व्यक्त केलं होतं. असो.

वर्णन, फोटो अतिशय सुंदर. अवर्णनीय!! पेलिकन पक्षी भाव खाऊन जातो. डिझायनर मंकीचा मेक-अप मन ला मानले.

<<<<<<मग लिहीनचि यादी वाढायला लागली >>>>>>> यादी कितीही वाढली तरी चालेल. तुमचं लिखाण वाचायला आम्ही उत्सुक असतोच.

इतका सुंदर लेक. मस्तच दिनेशदा पेलिकन्सचे फोटो सहीच आले आहेत. Happy निवडूंगाची फुले सुद्धा मस्तच पहिल्यांदाच पाहीली.

मित्रानो, अगदी खरे सांगायचे झाले तर मी जे प्रत्यक्ष बघितले त्यातला फारच थोडा अंश फोटोत उतरला आहे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी या भागाला अवश्य भेट द्या.

अंजली,
लेखाच्या ओघात केवळ तोच एक फोटो, तसा काही ऑड नव्हता. प्राणी काही निसर्गतः कपडे घालत नाहीत. तूम्हाला केवळ अनूमोदन देण्याशिवाय बाकी कुठल्याच घटकावर बरी वाईट, प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही, याचे वाईट वाटले.

छान माहिती. अजुन वाचायला आवडेल.
आता भारतातुन आफ्रिकन सफारीला टुर्स जातात, तशा लेक व्हिक्टोरिआ वगैरे जागीपण जातात काय? स्वतः जायचं असेल तर कितपत सोप्प / स्वस्त आहे?

सॅम,
बाहेरुन येणार्‍या सफारी, शक्यतो मसाई मारा लाच जातात. (कालच गेलो होतो, त्याबद्दल लिहितो) किंवा मोंबासा, मालिंदी या किनार्‍यावरच्या भागात जातात.
स्वतः जाण्यात काहिच कठिण नाही (लेक नाकुरु किंवा लेक नैवाशा ला जायला ) रहायची वगैरे सोय आयत्यावेळी अवश्य होते. फारसे असुरक्षितही नाही.
स्थानिक लोकांना विचारले तर लेक व्हिक्टोरिया मधे बघण्यासारखे काय आहे असेच विचारतील ? तसे आपल्याला त्याचे क्षेत्रफळ वगैरे माहित असते म्हणून नवल वाटते. बाकि स्थानिक लोकांना त्याचे कौतूक नाही. आणि त्याच्या किनार्‍यावर उभे राहून काहि वेगळे जाणवतही नाही.
त्या आजूबाजूची ठिकाणे जसे एल्डोरेट (मश्रुम्स साठी प्रसिद्ध) केरिचो (चहासाठी प्रसिद्ध) माचाकोस ( गुरुत्वाकर्षण प्रभावहिन ठरणारी जागा ) बघण्यासारखी आहेत.

बरं. विचार करायला हवा. आणि खर्च कितपत होतो? गोर्‍यांच्या प्रमाणे आपल्याला डॉलरमधे दर लावले तर परवडणार नाही Sad
>> माचाकोस ( गुरुत्वाकर्षण प्रभावहिन ठरणारी जागा )
ही भानगड काही कळली नाही. गुगलवर बघितलं तर Machakos - AntiGravity -Water flowing uphill? हा व्हिडिओ सापडला.

सॅम, तिथे तरी निदान गोरे काळे भेद नाही. (सॅम नाव मात्र नाही लावायचं) भारतातूनही बूकिंग करता येईल. एअरलाईन्सही तशी व्यवस्था करतात.
युरप मधले पर्यटक, इथे फिरतात त्यावेळी त्यांच्या गरजा कमीतकमी ठेवतात. यूथ हॉस्टेल सारख्या ठिकाणी राहतात. स्वस्तातल्या स्वस्त सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. पण भरपूर फिरतात.

माचाकोस सारखी एक जागा ओमानमधल्या सलालाह जवळ आहे. तिथे गाड्याही चढावावर चढून जातात.

धन्यवाद दा! जरुर विचार करीन.
>> युरप मधले पर्यटक, इथे फिरतात त्यावेळी त्यांच्या गरजा कमीतकमी ठेवतात.
हे आपल्या लोकांना जमत नाही... A/c 5* हॉटेल, मराठी जेवण यावर यात्रा कंपन्यांच मार्केटिंग चालत Angry
... जाउदे, यावर आख्खा लेख लिहिता येइल! पण नकोच... कशाला उगाचच डोकं पकवायचंय!!

वर्णन आणि फोटो दोन्ही मस्त. डिझायनर माकड ही संज्ञा खूप आवडली.
माचाकोस ( गुरुत्वाकर्षण प्रभावहिन ठरणारी जागा ) बघण्यासारखी आहेत. >>>
याबद्दल थोडी माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं.