२६/०६/२००१
आज सकाळी उठतानाच आठवलं होतं, '२६ तारीख आहे. बापू पुण्याहून येतील आज.'
क्लिनिकवरून आल्यावर बाकीच्या सख्या टी.व्ही.रूममध्ये घुसल्या. मी बापूंना फोन करायला कॉईन बॉक्स गाठला.
फोन लावला. " हॅलो" ऐकूनच खरंतर मी बापूंचा आवाज ओळखला होता. तरीपण विचारलं,
" हॅलो, वपु आहेत का?"
"बोलतोय."
( मला उगीचच हा संवाद फार आवडतो.)
मी म्हटलं, " बापू, मी मनू बोलतेय. जे.जे. हॉस्पिटलमधून. सई आणि मनू मधली मनू.
ओळखलंत का आता ?"
बापू एकदम खळखळून हसले.
"नाही बुवा.अजूनही नाही ओळखलं मी." पूर्णपणे चेष्टेचा सूर.
" काय हो बापू, मला दरवेळी एवढं सगळं सांगायचा कंटाळा आलाय आता. आपण माझी आयडेन्टिटी म्हणून एक वेगळं नाव फिक्स करूया."
बापू- "अगं, मनू माझ्या नातीचं पण नाव आहे ना. नावाचा गोंधळ होतो.आवाजावरून नाही ओळखता येत आता. म्हातारा झालो ना."
बापूंच्या मगाच्या हसण्यावर मी खूष होते.
मग भरपूर गप्पा नेहमीसारख्याच. परवाच्या पेपरमध्ये प्रवीण दवणेंच्या लेखात त्यांचं नाव वाचलं तेव्हा खूप आठवण आली होती त्यांची. ते सांगितलं त्यांना.
मध्येच मी म्हटलं, " बापू, खूप कंटाळा आलाय हो. टेन्शन पण आलंय अभ्यासाचं."
"ये इकडे."
"कधी?"
"आत्ता. नीघ लगेच."
त्यांच्या असल्या एका शब्दाच्या आग्रहाची आम्हाला नेहमी गंमत वाटते.
"बापू, आत्ता कशी येणार ? उशीर होईल. "
"मग उद्या ये."
"किती वाजता येऊ उद्या?"
"संध्याकाळी ये. ५-५:३० ला."
सईची टर्म एक्झाम चालू होती.
"मी एकटीच येईन बापू. सईची परीक्षा सुरू आहे."
"कसली?"
"टर्म एक्झाम."
आज बापूंनी 'कसली एक्झाम' म्हणून कसं काय विचारलं?
असली चौकशी ते कधीच करत नाहीत.
खूप मस्त गप्पा चालल्या होत्या आज.
"बरं बापू, ठेवते आता."
"बरं ये उद्या नक्की.गुडनाईट. "
रात्री सईला सांगितलं. तिलाही यायची इच्छा होतीच, पण परीक्षा चालू असल्याने तिने मोठ्ठ्या ' उदार अंतःकरणाने ' मला एकटीला जायची परवानगी दिली !
'मीरा सूर कबीरा'ची कॅसेट आणली आहे बापूंसाठी. आवडेल त्यांना फार. मीरेची भजनं...लताच्या आवाजात. म्हणजे मेजवानीच.
खूप गप्पा मारायच्या उद्या. लेन्स-केस सोबत घेऊन जायला हवं. गप्पांमध्ये उशीर झाला तर बापू आणि डॉक्टर रात्रीचे मला एकटीला पाठवणार नाहीत.
जर राहिलेच तिकडे तर बापूंना मी 'कळत-नकळत' ची सीडी लावायला सांगणार आहे. आणि उरलेले फोटो पण बघायचे.
सईला टुकटुक !
********************************************************************************************
२८/०६/२००१
' कणभर चुकीलाही आभाळाएवढी सजा असते
चूक आणि शिक्षा ह्यांची ताळेबंदी मांडायची नसते.'
...........ताळेबंदी मांडायची नाही ? ठीक आहे. पण हातातून जे निसटलंय.....तेही अगदी कायमसाठी, त्याच्या वेदना कशा कमी होणार ?
बापू, आपलं ठरलं होतं ना हो परवा फोन वर? तुम्ही मला म्हणाला होता, " तू ये उद्या नक्की. "
मी शब्द पाळला. मी आले होते. तुम्ही का असं केलंत पण? शब्द देऊन, भेटायचं ठरवून असे न सांगता-सवरता कुठे निघून गेलात? तेही इतकं अचानक?
तुम्हाला तुमच्या वसुंधरेला भेटायचं असेल, ज्यांचं 'जाणं' तुम्ही सोसलंत अशा १७८ माणसांच्या भेटीची ओढ लागली असेल ना !
"जाणार कवातरी पटदिशी."
बोललात आणि गेलात. 'पार्टनर' प्रमाणे तुम्ही खरंच अगदी शेवटपर्यंत 'पल्स' पेक्षा 'इम्पल्स' वर जगलात आणि गेलातही तसेच. आजारी पडणं नाही, अंथरूणावर खिळणं नाही.
इम्पल्सप्रमाणे जगण्याची हिंमत तुमचीच. आम्ही अजूनही 'लोक काय म्हणतील?' च्या चक्रव्यूहात अडकणारे. परवा फोनवर तुम्ही " आत्ता ये. निघ लगेच." म्हटल्यावर यायला हवं होतं मी. उशीर झाला तरी मी तिकडे राहू शकते, हे माहीत होतं ना मला. का विचार केला मी ? का नाही आले तिकडे लगेच?
.........बापू, तुमच्या दोन चिमण्या आता कुणापुढे चिवचिवतील ?
*******************************************************************************************
३०/०६/२००१
कुठल्या क्षणाचा भरवसा धरायचा माणसाने ? कशाची शाश्वती धरायची ?
मृत्यू खरंच इतका मोठा खेळिया आहे का ? पाऊलही न वाजवता आला आणि " ११,झपूर्झा " चे चैतन्य घेऊन गेला.
..........मागे उरलाय फक्त रिकामा देव्हारा !
१५ दिवसांपूर्वीच तर त्या मंदिरात राहून आलो होतो आम्ही. आयुष्यभर उमेद देतील असे असंख्य हळवे क्षण ओंजळीत भरून घेऊन आलो होतो. एका माणूसवेड्या पार्टनरच्या 'रंगपंचमी' तले थोडेफार रंग आमच्याही आयुष्यावर उडवून घेतले होते.
........आणि परवा मी पुन्हा तिथेच. तोच रस्ता, तोच जिना, तेच दार, सगळ्या वस्तूही त्याच.
पण सगळंच कसं सुनं-सुनं वाटत होतं.
१५ दिवसांपूर्वी गेलो तेव्हा आम्ही ५ च माणसं होतो. परवा खूप गर्दी. खूप माणसं.पण सगळीच कावरीबावरी. कुणालातरी शोधून शोधून दमलेली.
तुम्ही कुठेच नव्हता !
' ११,झपूर्झा ' त बापू नाहीत, ही गोष्टच किती टोचणारी आहे !
दरवेळी बेल वाजवल्यावर दार उघडेपर्यंतची जी उत्सुकता असते, ती ह्यावेळेस अनुभवायलाच नाही मिळाली.....दार पूर्ण उघडं होतं.
आत पाऊल टाकलं. नेहमीसारखे हळूहळू पावलं टाकत आतून बाहेरच्या खोलीत येत " या " म्हणणारे बापू दिसलेच नाहीत.........त्याऐवजी समोर बापूंचा फोटो. हार घातलेला.
मागच्याच भेटीत बोललेलं ' भिंतीवर फोटो बघण्याचं ' वाक्य एवढ्या लवकर खरं करून दाखवायची काय गरज होती ?
बापूंच्या लाडक्या टीपॉयचे ३ पार्टस गायब होते. एकाच पार्टवर फोटो.
तुमच्या आवडत्या सेटीवर मी बसले. काय चालू आहे हे सगळं ?
ज्या हॉलमध्ये बापूंशी गप्पा मारल्या त्याच हॉलमध्ये त्यांच्याऐवजी त्यांचा फोटो ?
ज्या जागेवर डोळे मिटून ध्यान करणार्या बापूंना पाहिलं, तीच जागा रिकामी ?
" Author's chair....you are not authorised !"
बापूंची खुर्ची खरंच खूप पोरकी दिसत होती !
त्या हॉलमध्ये ऐकलेली बापूंची वाक्यं आठवत होती.
" आदर्श फसवे असतात. ते तुम्हाला फरफटत नेतात."
" मैत्रिणी व्हा चांगल्या."
' वाट पहाणारे दार ' वाचायला सांगितल्यावर- " नको मला त्रास होतो."
" अरे हे काय? मला वाटलं तुम्ही सगळं बनवून ठेवलं असेल."
" काल माझ्या शुगरने थैमान घातलं होतं. मग? मग काय, एक आंबा खाल्ला. खाली जाऊन दुकानातून चॉकलेटस् आणली. बस्स !"
सगळं सगळं आठवत होतं.
मध्येच टी.व्ही.वर बातम्यांमध्ये तुमचं नाव ऐकलं. करंट लागल्याप्रमाणे सगळे आत धावलो.
बापूंची माहिती सांगत होते. मध्येच कॅमेरा बापूंवर.
डॉक्टरांनी कचर्याचा डब्बा ( अंहं...'के ची टो' !) द्यायला दार उघडलं तर दचकून जागे होणारे बापू इतक्या गर्दीतही एवढे गाढ झोपलेले कसे ? ते हार, ती फुलं... नकळत एक हुंदका फुटला. खोलीतले सगळेच डोळे भरलेले...माझा हुंदका ऐकून सगळ्यांचेच हात डोळ्यांकडे !
ह्याच खोलीत बापूंसोबत बसून 'झनक झनक पायल बाजे' बघितला होता. लता-किशोर-मुकेशची गाणी ऐकली होती. " रामदासी हो " हा सल्लाही मुकाट्याने ऐकून घेतला होता. बापूंच्या बालिश हट्टामुळे ऑम्लेटही इथेच खाल्लं होतं.
आणि " थांब थांब जरा. नुसती खटाखट बटणं दाबत सुटलीयेस." असं म्हणत सगळी बटणं बंद करून पुन्हा रिमोटने लाईट-फॅन चालू करणार्या बापूंशी गप्पाही मारल्या होत्या.
स्वातीने रिमोट कुठे दिसेना म्हणून डायरेक्ट बटण दाबून टी.व्ही. बंद केला, तेव्हा मला खरंच तिला थांबवावंसं वाटलं,
" अगं थांब स्वाती, आपल्या बापूंना आवडत नाही ना बटणांना हात लावलेला."
जेमतेम ३-४ वेळा बापूंना भेटलेय तर ही अवस्था माझी. स्वाती-सुहासचं काय होत असेल ?
" तुमच्या हातची चटणी नसती तर मी जेवलोच नसतो."
ह्या एका वाक्याच्या चिठ्ठीतून बापूंवरचं प्रेम व्यक्त करणारा सुहास.....काय झालं असेल त्याचं ? कसा पेलवेल त्याला हा धक्का ? की तेवढी ताकद देऊन गेले असतील बापू त्याला ?
बापूंनी गेल्यावेळी हार्मोनियमवर वाजवलेलं गाणं.खूप छळत होते ते रेंगाळणारे सूर. हार्मोनियम वाजवतानाची कापरी बोटं, डोळे मिटून गाणं म्हणतानाचा व्याकूळ भाव....
बापूंचं हार्मोनियम दुरुस्त करायला जाणार होतो आम्ही सगळे. खूप गोष्टी राहून गेल्या. जीवाला चुटपुट लाऊन गेल्या !
आजवर बर्याचदा ऐकलं होतं, " कालच भेटले मला आणि आज हे असं."
" चुकूनही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. जायच्या आधी सगळ्यांना भेटून आले ते."
मला नेहमी वाटायचं, असं कसं होईल? एवढे योगायोग घडतात का ? की अतिदु:खाने हळवं झाल्याने माणसं असं बोलत असतील ? .......आज अनुभव आला मला. नाहीतर बापू पुण्याहून आलेल्या दिवशीच फोन करायची काय बुद्धी सुचावी मला? बापूसुद्धा खास मुला-नातवंडांना भेटून येण्यासाठीच पुण्याला जाऊन आले असतील का?
"११,झपूर्झातून वसुंधरा गेली. मीही तिथूनच जाणार." Strong willpower!
एक दिवस आधी जर मृत्यूने घाला घातला असता तर बापूंची मनापासूनची इच्छा अपुरी राहिली असती.
गेल्यावेळी बापूंना भेटून आले तेव्हा आल्यावर कागदावर एक कविता उतरली होती.....पण अर्धीच राहिली होती.
" कशासाठी कुणासाठी
मन आज हुरहुरे ?
आर्त पापण्यांच्या काठी
घन आसवांचा झरे !
लाही लाही जीव झाला
सावलीला आसावते,
हात पसरून दोन्ही
एक घर बोलावते !
'घर' कशी म्हणू त्याला
'देवघर' विसाव्याचे,
भोळ्या भक्तांसाठी कान्हा
सूर घुमवी पाव्याचे !
जगावेगळा कन्हैय्या
जगावेगळी बासरी,
त्याला वेड माणसांचे
गाणे प्रेमाचे अंतरी !"
लिहून झाल्यावर मी जेव्हा कविता पुन्हा वाचली, तेव्हा मलाच कळलं नव्हतं की पहिलं कडवं मी असं का लिहिलंय.
बापूंना भेटून आल्यावर आम्ही कित्ती खूष असतो. मग असं का लिहिलं गेलं असेल?
पुढे काहीतरी हातातून निसटणार आहे ही कल्पना तेव्हा नव्हती. त्यामुळे मला फारच विचित्र वाटलं होतं.
......आता वाटतंय....intuition हयालाच म्हणतात का ?
********************************************************************************************
०४/०७/२००१
'बापु गेलेत' हे अजूनही खरंच वाटत नाही.
अजूनही कोणाजवळ त्यांच्याबद्दल बोलताना वर्तमानकाळातच उल्लेख केला जातो.
"अरे, वपु ना ? एकदम सही आहेत ते. जसे त्यांच्या पुस्तकांतून दिसतात तस्सेच !"
....बोलून गेल्यावर जाणवतं, मी काय बोलले ते. माझंच बोलणं मग मनात चरचरत रहातं. आणि डोळ्यांत पाणी साठतं !
असं वाटतं बापूंनी आपली मजा केली असेल. आज-उद्या त्यांचं पत्र मिळेल---
" प्रियेस्ट सई आणि मनू, कशी गंमत केली ? हॉ हॉ हॉ ! रडलात का खूप ?
काही बिघडत नाही. रडणं हा एक चांगला व्यायाम आहे. चला तर, खूप दिवसांत आला नाहीत इकडे. निघा लगेच."
.....आणि मग मी गेल्यावर उगीचच त्यांच्याशी भांडेल.
"बापू,ही कसली चेष्टा ? नाही आवडली आम्हाला."
......हम्म्म. खरंच असं झालं असतं तर ?
खरंच खुप छान आणि मनापासुन
खरंच खुप छान आणि मनापासुन लिहिलंयस.
खरंच खुप छान आणि मनापासुन
खरंच खुप छान आणि मनापासुन लिहिलंयस.
तिन्ही भाग वाचले आणि आवडले.
तिन्ही भाग वाचले आणि आवडले. हा तर मनाला भिडला.
>>कुठल्या क्षणाचा भरवसा धरायचा माणसाने ? कशाची शाश्वती धरायची ?
परवाच लोकसत्तात एक शेर आला होता त्याची आठवण झाली.
क्या भरोसा है जिन्दगीका
आदमी बुलबुला है पानीका
आशु, योडी, स्वप्ना,
आशु, योडी, स्वप्ना, नूतन....सर्वांना धन्यवाद.
आशु, किती चिडलास !!. मुक्त व्यासपीठ .....वापरू दे ना लोकांना मुक्तपणे.
तिन्ही भागातला सर्वात उत्तम
तिन्ही भागातला सर्वात उत्तम भाग. आवडला.
बर्याचवेळा माणूस फॅन झाला की त्याचे रुपांतर आंधळ्या भक्तीभावात होते, तू ते टाळले आहेस.
रुणुझुणू, खूप आवडले तिन्ही
रुणुझुणू, खूप आवडले तिन्ही लेख.
मी वपू फॅन नाही... कारण फारसे वाचलेच नाहीत.... आता तुझा लेख वाचून वाचावे म्हणतेय.
आशु, अनुमोदन. >>आशु, किती
आशु, अनुमोदन.
>>आशु, किती चिडलास !!. मुक्त व्यासपीठ .....वापरू दे ना लोकांना मुक्तपणे
रुणू, नुसतं मुक्त नाही. मुक्त आणि फुकट
आगाऊ, दाद धन्स. दाद, जमलं तर
आगाऊ, दाद धन्स.

दाद, जमलं तर वाचच वपु. पण कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता वाच.(चांगले/वाईट दोन्हीही)
मंदार
क्या बात है..... तिन्ही लेख
क्या बात है..... तिन्ही लेख आजच वाचले....
फारच मस्तं....
अवांतर : मयुरीला धन्स या लेखाची लिंक दिल्याबद्दल... फार छान लेख राहुन गेले होते वाचायचे...
रुणू हा भाग ही सुर्रेख ..
रुणू हा भाग ही सुर्रेख .. इतकं आतपासून लिहिलंयस ना कि ते आतपर्यंत पोचलंच..
जियो!!!
खूप छान लिहिलय, अर्थात मनाची
खूप छान लिहिलय, अर्थात मनाची अवस्था कागदावर उतरवणं सोपं नाही त्यामुळे मनातली तिव्रता अधीकही असू शकेल. मी गेल्या काही वर्षात फारसं वाचलेलं नाही पण पुर्वी वपुंची पुस्तकं वाचली होती.
वपु गेले तेव्हा ही कविता लिहिली होती.
एक फँटसी
आज पर्यंत हसवत होती
प्रत्तेकाला ज्याची वाणी
मना मनास भिडत होती
त्याची अगदी प्रत्त्येक कहाणी
कथांतून तो सर्वाना
दिवा स्वप्न दाखवत होता
त्याच त्या रुटीन मधे
ताजेपणा आणत होता
हसवता हसवता कधी जो
आदर्शवाद मांडत होता
फॅंटसीचा तो राजा
या जगात नाही आता
नीट बघा कदाचीत
अजूनही तो इथेच असेल
फॅंटसी सारखाच या जगात
अतनू होऊन रहात असेल
कधी अचानक एखाद्या
चित्रामधून बाहेर येईल
आणि कुणाचा पार्टनर होऊन
माया बाजारात घेऊन जाईल
कुणास ठाऊक कधीही
कुणाच्या मनात शिरेल
तेव्हा त्याला फॅंटॅस्टिक
कल्पनांचा खजीना मिळेल
तुम्हाला कोणी भेटला असा
तर आठवण काढा वपुंची
एवढे लिहून वाहतो ही
वपुंचरणी फॅंटसी
सुधीर
तिन्ही भाग एकदम वाचून काढले..
तिन्ही भाग एकदम वाचून काढले.. मस्त लिहिलं आहे एका झकास व्यक्तीमत्त्वाबाबत
Pages