बोका - बिर्याणी मस्त होती हां???

Submitted by बेफ़िकीर on 24 December, 2010 - 05:24

"बोका पिसाळलाय"

या वाक्यावर मात्र मल्हाररावांनी हातातला ग्लास टीपॉयवर ठेवला आणि ते खदाखदा हसायला लागले.

शाळिग्राम डोळे जितके बटबटीतपणे विस्फारता येतील तेवढे विस्फारून मल्हाररावांकडे बघत होता. इतका वेळ शाळिग्रामला दम देणारे आणि त्याची बोलती बंद करणारे मल्हारराव अचानक हसायला लागल्यामुळे पवारही जोरजोरात हसायला लागला.

अहमदनगरच्या कोरड्या थंडीत मल्हारराव जमदाडेंच्या शहराबाहेरील फार्महाऊसवर आत्ता तिघेही बसलेले होते. अंगणात! रात्रीचे आठ वाजलेले! सुर्यास्तापासूनच तिघे बसलेले होते. शाळिग्राम कधी नव्हे ती रम घेत होता. आणि त्याला रमच चढलेली असणार याबाबत मल्हाररावांना आता कोणताही संदेह उरलेला नव्हता. त्यामुळे ते हसू लागले होते.

मल्हारराव जमदाडे! अहमदनगरमधील एक राजकारणी व्यक्तीमत्व असले तरीही त्यांची खरी ओळख होती बांधकाम व्यावसायिक म्हणून! राजकारणात ते फार पुर्वी एकदा उतरलेले होते. एकदा जिंकल्यानंतर पुढच्या निवडणुकीत हारले आणि तेव्हापासून रामराम ठोकला राजकारणाला! पण त्या कारकीर्दीत काही लायसेन्सेस मात्र स्वतःच्या कंपनीच्या नावावर करून घेतली. त्याच परवान्यांच्या जोरावर ते आता शासनाची विविध कॉन्ट्रॅक्ट्स मिळवत होते. एखादा कालवा काढा, कुठे लहानसा पूल बांधा, कुठे डागडुजी करा! सरळ सरळ 'पाच ते सात टक्के चारणे' या तत्वामुळे त्यांना गेल्या दहा वर्षात एकही प्रतिस्पर्धी निर्माण झालेला नव्हता नगरमध्ये! त्यामुळे त्यांची भलतीच चांदी झालेली होती. मुलगा अमेरिकेला, सून नुकतीच बाळंत झाल्यामुळे तिची आई आणि तिची सासूही, म्हणजे मल्हारवांची बायको, दोघी अमेरिकेलाच! आज मल्हारराव खास कारणासाठी फार्म हाऊसवर आलेले होते.

आजवर त्यांना शासकीय अधिकार्‍यांना पैसे चारणे इतकेच माहीत होते. पण गेल्या महिन्यात एक अशी संधी आलेली होती ज्यात त्यांनाच कुणीतरी पैसे चारणार होते. आणि थोडे थोडके नाहीत, बत्तीस लाख!

वास्तविक बत्तीस लाख ही रक्कम अशी नव्हती की मल्हाररावांनी फार काळजी घ्यावी! पण त्यांना आतल्या गोटातून समजले होते की हा भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी काही जण आसूसलेले होते. त्यामुळे तातडीने ही रक्कम त्यांना पुण्यातील ताम्हिणी घाटात असलेल्या त्यांच्या बंगल्यावर पोचवायची होती! उद्याच मिळणार होती अन उद्याच पोचवायची होती.

प्रकरण असे होते की चंगेडिया नावाचा एक पुण्यातील मोठा पण बदनाम बिल्डर त्यांना ही रक्कम उद्या देणार होता. त्या बदल्यात मल्हाररावांनी संगमनेर तालुक्यातील एक मोठे कंत्राट, जे त्यांना स्वतःला पेलणेच शक्य नव्हते, ते चंगेडियाला मिळवून द्यायचे होते. या बत्तीस लाखापैकी मल्हाररावांच्या हाती शेवटी फक्त पंधरा लाख येणार होते. सतरा लाख हे अधिकार्‍यांना वाटण्यात जाणार होते. आणि त्या सतरा लाखांपैकी सात लाख ज्या एकट्या वरिष्ठ अधिकार्‍याला मिळणार होते तो कडूभाऊ सुळे नावाचा अधिकारी ती कॅश सरळ मल्हाररावांच्या फार्महाऊसवर लंचटाईमला येऊनच घेऊन जाणार होता.

त्यामुळे मल्हारराव आजपासूनच इथे राहायला आलेले होते. पण नेमके दुपारी असे समजले की या गोष्टीची टीप कुठेतरी कुणालातरी मिळालेली आहे. त्यामुळे पहिल्याप्रथम कडूभाऊ सुळेचे उद्या फार्म हाऊसवर येणे ही गोष्ट मल्हाररावांनी रद्द केली. तसेच, एक गाडी ठरवली जी आत्ता फार्महाऊसवर उभी होती. ही गाडी उद्या कॅश मिळाल्या मिळाल्या इथून पुण्याला जाणार होती. मल्हाररावांवर भ्रष्टाचाराचा आरोप होऊच शकत नव्हता. चंगेडियाने कोणत्या कारणासाठी इतके पैसे मल्हाररावांना दिले हे शासन विचारू शकत नव्हते. कारण त्याला उत्तर म्हणून काहीही दाखवता किंवा सांगता आले असते. सहकार्याने काही कंत्राटे करायची आहेत, मागचे देणे होते, वाट्टेल ते! मल्हाररावांवर आरोप होणे अशक्य होते कारण ते काही शासकीय अधिकारी नव्हते. फार तर इन्कम टॅक्सवाले विचारू शकत होते प्रश्न! पण शासकीय अधिकार्‍यांपैकी कुणाला ते पैसे दिले गेले तर मात्र अ‍ॅन्टी करप्शन पिक्चरमध्ये येऊ शकत होते. आणि मग मात्र नुसते शासकीय अधिकारीच नाहीत, तर स्वतः मल्हारराव आणि चंगेडिया हेही पकडले जाऊ शकत होते.

आत्ता मल्हारराव रिलॅक्स्ड होते ते यामुळेच! एक तर त्यांना कुणी पकडू शकत नव्हते. कडूभाऊ सुळेचे येणेच रद्द झालेले होते. कॅश पुण्याहून नगरला पोचली की त्याच मिनिटाला नगरहून परत पुण्यालाच जाणार होती.

हा प्रकार इतका स्मूथ होणार आहे हे माहीत असल्यामुळे मल्हाररावांनी त्यांच्या कंपनीत नियुक्त केलेल्या पवारला टाईमपास म्हणून फार्महाऊसवर बोलावले होते. रम, कबाब, शेवभाजी आणि बिर्याणी असा बेत होता. थंडगार बोचरी हवा होती. पावणे सातलाच किशोर नावाच्या जुन्या नोकराने सगळा जामानिमा गार्डनमध्येच केलेला होता. आणि पावणे सात ते सव्वा सात मल्हारराव पवारची वाट पाहात रम सिप करत होते.

पण त्यांना धक्काच बसला. कंपनीत अकाउन्टन्टचे काम करणारा शाळिग्राम जेव्हा पवारबरोबर तिथे आला तेव्हा! हा कसा काय आला? याला कुणी बोलावले? आणि पवारने याला आणण्याआधी आपल्याला विचारायला नको का, असे अनेक प्रश्न मनात उठत असतानाच, खुर्चीवर बसण्याआधीच पवार म्हणाला..

"साहेब... याला काहीतरी महत्वाचं बोलायचंय... मागेच लागला.. आणि तेही मी अगदी निघताना.. म्हंटलं चल बरोबर... काय बोलायचे ते साहेबांशी बोल आणि जा घरी... म्हणून आणलंय.."

मल्हाररावांनी हाताने निर्देश करून दोघांना बसायला सांगीतले आणि शाळिग्रामला विचारले. अडीच पेग्ज आणि कबाबची अर्धी प्लेट पोटात ढकलल्यानंतर हा तुपट शाळिग्राम अचानक आल्यामुळे वैतागलेल्या मल्हाररावांनी विचारले...

मल्हार - काय रे?... काय काम तुझं?

शाळिग्राम हा चाळिशीचा एक गृहस्थ नगरवासीयच होता. शुद्ध ब्राह्मण असल्यामुळे बहुधा त्याला त्या कामावर मल्हाररावांनी पाच वर्षापुर्वी नेमलेले असावे. गबदुल शरीराचा शाळिग्राम बी कॉम होता. त्याला एक बर्‍याच मोठ्या नंबरचा जाड भिंगांचा चष्मा होता. त्याचे डोळे त्यामुळे कायमच बटबटीत दिसायचे. अत्यंत घाबरट, दहा वेळा हिशोब तपासणारा पण प्रामाणिक असा काहीसा त्याचा लौकीक होता.

शाळिग्राम - सर मला एक फोन आला होता...

मल्हार - कुणाचा??

शाळिग्राम - सर तो म्हणाला त्याला बोका म्हणतात...

मल्हार - बोका? ... बोका म्हणतात म्हणजे??

शाळिग्राम - माहीत नाही...

मल्हार - काय म्हणाला??

शाळिग्राम - जरा विचित्रच बोलला सर... तो म्हणाला... उद्याची कॅश....

आता मात्र मल्हाररावांचे डोळे विस्फारले. शाळिग्रामला पवारने इथे आणला तेच बरे झाले असे त्यांना वाटले.

मल्हार - काय??... उद्याची कॅश काय??

शाळिग्राम - मी पळवणार म्हणाला...

मल्हाररावांना हा प्रकार काहीसा नकोसा वाटला. एक तर शाळिग्रामला उगाचच उद्याच्या ट्रॅन्झॅक्शनबाबत समजलेले होते. त्याचा त्या गोष्टीशी काही संबंधही नसताना! आणि शाळिग्रामचा इतिहास बघता तो आपल्याशी अशी काही गंमत करेल हे मुळीच वाटत नव्हते मल्हाररावांना! आता ते शाळिग्रामला कटवता कसे येईल याचा विचार करू लागले.

मल्हार - बरं... ठीक आहे... एवढेच ना??

शाळिग्राम - हो सर.... आणि म्हणाला... नोटा आजच नगरला पोचल्या आहेत...

उडालेच मल्हारराव! आत्ता नेमका ते तोच विचार करत होते. चंगेडियाला सांगावे की उद्या गाडी पाठवूच नकोस. पुढे बघू! किंवा मी पुण्याला येईन एखाददिवस!

पण कॅश तर नगरमध्ये पोचली असे शाळिग्राम म्हणतोय!

तरीही सावरायला हवंच होतं. इतका वेळ पवार गप्प होता. आता त्याने तोंड उघडले.

पवार - अजून काय काय म्हणाला ते पटापटा सांग...

शाळिग्राम समोरच्या टीपॉयकडे पाहात होता. तो कधीतरी सठीसहामाशी दोन तीन पेग घ्यायचा. आज इथली हवा आणि तो सरंजाम पाहून त्यालाही मोह होत होता. पण आपण इथे कःपदार्थ आहोत हे त्याला माहीत होते. त्यामुळे पवारसाहेबांच्या सूचनेबरहुकूम तो पुढे बोलू लागला.

शाळिग्राम - सर... तो म्हंटला जमदाड्यांची पापे भरलेली आहेत.. संगमनेरचे कॉन्ट्रॅक्ट चंगेडियालाही नाही मिळणार अन जमदाड्यालाही..

आता मात्र मल्हारराव भडकले. हा समोरचा दिड दमडीचा माणूस त्या फोन करणार्‍याची भाषा ऐकवण्यासाठी आपल्याला 'जमदाड्या' म्हणाला हे त्यांना सहन होईना!

मल्हार - शाळिग्राम.. जीभ सांभाळ बोलताना...

शाळिग्राम - सर.. मी नाही.. तो बोलला असं...

मल्हार - पवार... हा कोण असावा??

पवार - काही समजत नाही...

शाळिग्रामला आता अक्कल दाखवायची संधी मिळाली.

शाळिग्राम - सर... मला... मला थोडी कल्पना आहे..

मल्हारराव हबकलेच! इतकी वर्षे या धंद्यात राहून अन वाट्टेल ते करून आपल्याला माहीत नाही की असा माणूस कोण असावा! आणि हा जानवेदार म्हणतोय याला कल्पना आहे??

मल्हार - बोल....

शाळिग्राम - सर ते कांबळे साहेब आहेत ना?? इर्रिगेशनचे?? ... त्यांच्या पी ए ने सांगीतले एकदा मला...

मल्हार - .... काय??

शाळिग्राम - हा बोका भयंकर आहे....

मल्हार - ... बोका बोका करू नको... नांव काय त्याचं??

शाळिग्राम - नावच बोका आहे सर...

मल्हार - भयंकर आहे म्हणजे काय करतो तो??

शाळिग्राम - तो काळा पैसा लुटतो... कुणाला काहीही समजत नाही.. काही बोलताही येत नाही.. आज तर तो म्हणाला जमदाड्याला पुढेही मी कफल्लक करणार आहे... सॉरी सॉरी... असं तो म्हणाला.. डिपार्टमेन्टला त्याच्याविरुद्ध एन्क्वायरीही ठोकता येत नाही.. तो कोण आहे हेच कुणाला समजत नाही..

मल्हार - बिनडोकपणा करू नकोस... असं काही नसतं...

शाळिग्राम - अहो सर कांबळेसाहेबांना लुटलंय त्याने.... अ‍ॅम्ब्युलन्समधून आला होता...

मल्हार - अ‍ॅम्ब्युलन्समधून? का??

शाळिग्राम - काय माहीत?? तो काहीही करतो म्हणे! कुठल्याही रुपात असतो. शेजारी उभा असला तरी समजत नाही.. कळतच नाही तो कधी येतो अन कुठे जातो..

मल्हार - पवार... या शाळिग्रामला उद्या पाच हजार सॅन्क्शन कर... वैद्यकीय तपासणीसाठी... शाळिग्राम.. तू जा आता..

शाळिग्रामला समोरचा थाटमाट सोडून जावेसे वाटेना! पण जायला तर सांगत होते. आता त्याने त्याचे शेवटचे अस्त्र काढले.

शाळिग्राम - सर... सर्वात महत्वाचं सांगू का??

मल्हार - ... काय??

शाळिग्राम - बोकाही नगरला पोचलाय....

आता मात्र मल्हारराव गंभीर झाले. हे समोरचं यडचाप शाळिग्राम इतकं छातीठोकपणे बोलतंय म्हणजे खरच काहीतरी गंभीर बाब असावी.

मल्हार - शाळ्या, बोक्याची काय काय माहिती आहे ती सगळी सांग...एका दमात... मधे मधे अडखळलास तर हजार रुपये कट करीन पगारातले..

शाळिग्रामने एकदा टीपॉयकडे पाहिले अन एकदा साहेबांकडे..

शाळिग्राम - साहेब.. फोन आल्यापासून मी भयंकर घाबरलो आहे... मी.. ज... जरा... घेऊ का??

मल्हाररावांनी त्याला घ्यायची परवानगी दिली. शाळिग्रामने जवळच्या ग्लासेस्पैकी एक उचलला आणि पहिलाच पेग चांगला मोठा तयार केला. न जाणो, नंतर हाकलून दिले तर निदान अगदीच स्मॉल घेतला असे नको वाटायला घरी जाताना! आज घरी गेल्यावर तो सुभद्राला, म्हणजे त्याच्या पत्नीला सगळी हकीगत सांगणार होता. कित्ती कौतुक वाटले असते तिला! आपल्या नवर्‍यामुळे साहेबांचे बत्तीस लाख वाचले. नक्कीच इन्क्रीमेन्ट! आणि... आनंद जरा जास्तच झाला असला तर प्रमोशनही!

शाळिग्रामने ग्लास अर्धा खाली केला आणि समोर पाहिले.

मल्हार - ... आता बोल...

शाळिग्राम आता जणू काही शाळेत विद्यार्थ्यांनाच शिकवतोय असा परिस्थितीचा ताबाबिबा घेतल्याच्या आविर्भावात आणि या दोघांच्याच बरोबरीचे आपणही आहोत अशा थाटात रेलून वगैरे बसत गंभीर चेहरा करत म्हणाला...

शाळिग्राम - बोका हा बेसिकली एक माणूस आहे..

मल्हार - .... म्हणजे काय??

शाळिग्राम - म्हणजे नाव जरी बोका असले...

मल्हार - शाळ्या... शहाळ्यासारखा तुला फोडून स्ट्रॉ घालून रक्त पीन मी... नीट बोल..

ही असली धमकी त्याच्या सोळा पिढ्यामध्ये कुणी ऐकलेली नव्हती. आपले नेमके चुकले काय हेच त्याला समजेना!

शाळिग्राम - बोका काळा पैसा लुटतो. कांबळे साहेबांनाच त्याने दोन वेळा लुटलेले आहे. तो डिपार्टमेन्टचा माणूस नाही. आणि तो डिपार्टमेन्टला हवा आहे की नको आहे तेच कळत नाही. त्याच्याबद्दल पेपरात काहीही छापून येऊ शकत नाही. कारण त्यासाठी 'काळा पैसा लुटला गेला' हे माणसाला स्वतःच सांगावे लागेल. तो वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे असू शकतो. समोर आपल्याशीच बोलत असला तरीही 'हाच बोका आहे' हे माणसाला समजत नाही. त्याला टीप्स कशा लागतात हे कुणालाही माहीत नाही. त्याने आत्तापर्यंत अनेकांना हातोहात गंडवलेले आहे. आणि आता तो उद्या तुम्हाला लुटणार आहे.

शाळिग्रामचा पहिला पेग एवढे बोलणे होईपर्यत संपलेला होता.

मल्हाररावांच्या चेहर्‍यावर मात्र विनोद ऐकल्यासारखे भाव होते.

मल्हार - पुढे??

शाळिग्राम - तो अ‍ॅम्ब्युलन्स, ट्रक, बैलगाडी असा कसाही येतो.. कसाही जातो.. यायच्या आधी कित्येकदा तो सांगतो येणार आहे म्हणून... गेल्यावर तर निश्चीतच कळवतो... की मी तुम्हाला लुटून गेलो म्हणून..

मल्हार - चल आता बकवास बास झाला... अजून एखादा पेग घे हवा तर्...आणि निघ..

शाळिग्राम - पवार साहेब.. सरांना मी सांगतोय ते सगळं खोटं वाटतंय... अहो बोका पिसाळलाय...

आणि आत्ता नेमके 'बोका पिसाळलाय' याच वाक्यावर मल्हारराव खदखदून हासत होते. डोळ्यात पाणी येईपर्यंत!

ते हासतात म्हणून पवारही हासत होता आणि शाळिग्राम डोळे बटबटीत करून दोघांकडे पाहात होता. मात्र तितक्यातच त्याने स्वतःचा दुसरा पेगही भरून घेतला. तेवढ्यात ते रद्द नको व्हायला! दोघांचेही लक्ष हासण्यात आहे हे पाहून पटकन एक छोटा कबाबही तोंडात टाकला. तो कबाब लगेच विरघळल्यामुळे निराशा आली त्याला! नुसतंच तोंड चाळवलं गेलं! त्यामुळे आता त्याचे लक्ष उरलेल्या मोठ्या कबाबांकडे लागले.

मल्हार - पवार... तो फोन दे इकडे...

पवारने सरकवलेल्या फोनवर मल्हाररावांनी इन्स्पेक्टर भोसलेचा नंबर लावला. एक नंबरचा भ्रष्ट पोलीस अधिकारी! अनेकदा मल्हाररावांचे हप्ते घेऊन सुखात होता. काही वेळा त्यांच्या यच फार्महाऊसवर जेवलेलाही होता.

आत्ताही तो घरी जेवायलाच बसला होता तेवढ्यात मुलाने मोबाईल आणून दिला. नंबर पाहून भोसले चमकलाच! आत्ता जमदाडेंचा फोन?? प्रकरण काय झालं असेल??

भोसले - ... हालो????

मल्हार - भोसले.. फार्म हाऊस वर ये... मुर्गी भाजलीय...

आहाहाहाहाहाहा!

अजून काय पाहिजे!

भोसले - हा!

मल्हाररावांनी फोन बंद केल्यावर मुद्दाम जोरात भोसले म्हणाला..

भोसले - आलो..जरा जेवायला बसतोय... जेवून येतो...

भोसलेची बायको नंदा घाबर्‍याघुबर्‍या चेहर्‍याने पुढे आली.

नंदा - काय हो?? केस आहे??

भोसले - नाSSSSय... चल वाढ जेवायला..

नंदाने चार पदार्थ वाढेपर्यंत भोसलेने भाजीचा एक घास खाल्लेला होता.

भोसले - तुझ्यायला तुझ्या... या भाजीला काय टेस आहे होय?? आ??

भोसलेने दिले ताट ढकलून! नंदा अन मुलगा थरथर कापू लागले. आठवड्यातून दोनदा तरी दोघेही मार खायचेच त्याचा!

नंदा - कांदा लसूण मसाला घातलावता...

भोसले - आन आलं?? आलं तुझा भाऊ येऊन घालणार का माहेरहून?? फटके पाहिजेत फटके तुला..

ताडकन भोसले उठला आणि शर्ट घालू लागला.

नंदा - अहो पुन्हा परतते भाजी.... जेवून जा..

भोसले तिच्यावर नुसताच हात उगारला..

भोसले - तुझ्या हातचं गुळमाट जेवान जात नाय... काय समजलीस?? शिकून ये आधी स्वैपाक्..आज मला भूक लागलीय म्हणून बाहेर जातोय जेवायला.. उद्यापासून धड भाजी नसली तर सोडून येईन म्हायेरी..

दोघे थरथर कापत असतानाच भोसले ताडताड बाहेर गेला आणि बुलेटला किक मारून निघूनही गेला. खिडकीतून नंदा बघतच बसली. आज तिने मन लावून भाजी केली होती. पण तीही नवर्‍याला पसंत पडली नाही याचे तिला वाईट वाटत होते.

भोसले फार्महाऊसवर पोचला तेव्हा थाटमाट पाहून रोमांचच आले त्याच्या तोंडावर! मस्त थंडी, गुबगुबीत कोंबडी आणि रम!

आला तो सरळ रामराम करून शाळिग्रामच्या शेजारीच बसला. जमदाडे का हसतायत त्याला समजेना! आधी त्याने ओशाळे हासत एक पेग तयार केला स्वत:साठी!

मल्हाररावांचे हासणे थांबल्यावर ते भोसलेकडे पाहू लागले. भोसले त्यांच्याकडे!

मल्हार - भोसले... हा बोका कोण???

खट्टकन पेग खाली ठेवला भोसलेने! चक्रावून जमदाडेंकडे पाहू लागला.

मल्हार - काय झालं तुला??

भोसले - साहेब... हे नाव तुमच्यापर्यंत कसं पोचलं??

मल्हार - हे बांडगुळ बसलंय ना इथे?? ते सांगतय...

शाळिग्रामला हे बारसे फारसे आवडले नाही. पण इलाज नव्हता. दोन पेग आधीच पोटात जाऊन 'जमदाडेंवर निष्ठा दाखव' अशी आज्ञा देत होते.

भोसले - काय रे शाळ्या?? .. तुला काय कळले?

शाळिग्रामची जीभ आता जड होऊ लागलेली होती. तो पट्टीचा पिणारा नव्हता.

शाळिग्राम - लुटणार आहे यांना बोका... उद्या...

भोसले हादरलाच! हबकून मल्हारराव आणि शाळिग्रामकडे पाहू लागला. मल्हाररावांना आता थोडीशी डिटेल्स तरी भोसलेला देणे आवश्यकच होते.

मल्हार - एक ट्रॅन्झ्क्शन आहे उद्या... कॅश आहे जरा... पुण्याला चाललीय...

भोसले - कसलं??

मल्हार - त्याचं काय करायचंय तुला?? तुला पाव परसेन्ट मिळणारच आहे...

भोसलेचा अडकलेला श्वास आता पुन्हा आनंदाने खेळू लागला.

भोसले - ... बर मग??

मल्हार - बर मग काय बर मग??... तो बोका कॅश पळवणार आहे...

भोसले - कधी???

मल्हार - ते मला माहीत असतं तर तुला इथे काय बोहल्यावर चढवायला बोलावलाय का??

भोसलेला मल्हारराव काहीही बोलू शकायचे. तोही फक्त त्यांचच ऐकून घ्यायचा! स्वतच्या साहेबापेक्षाही!

भोसले - शाळ्या.. तुला कसं कळलं हे...

शाळिग्राम - खास बोक्याने फोन केला मला...

भोसले - कधी???

शाळिग्राम - ... आज .. मगाशी .. संध्याकाळी...

भोसले - अरे तिच्यायला..

शाळिग्राम - तेच सांगतोय जमदाड्यांना तर ऐकत नाहीयेत.. हसतायत...

दारूमुळे आयुष्यात पहिल्यांदाच शाळिग्रामने मल्हाररावांचा उल्लेख 'जमदाडे' असा केला होता आणि मल्हाररावांच्या चेहर्‍यावरच सुक्ष्म बदल त्याला टिपताच आला नाही. आज त्याच्याकडे बोक्याबद्दलची माहिती असल्यामुळे त्याला तो स्वतः कुणीतरी महत्वाचा आहे असे वाटू लागले होते. त्याच जोरावर त्याने मल्हाररावांचा उल्लेख जमदाडे असा केला.

मल्हार - भोसले... बोका काय प्रकरण आहे??

भोसलेने मान खाली घातली. दोन कबाब तोंडात टाकले. प्रचंड विचार करत आहोत असे दाखवले. काही क्षणांनी म्हणाला...

भोसले - बोका या नावाने एक जण वावरतो.. नेमका कुठे असतो ते माहीत नाही..

शाळिग्राम - तेच ... तेच सांगतोय मी कधीपासून..

मल्हार - शाळ्या... आता गपचूप बसायचं.. मधे बोलायचं नाही... भोसले.. तो करतो काय पण बोका??

भोसले - बोका पैसे पळवतो...

मल्हार - अन डिपार्टमेन्ट बघत बसतं...

भोसले - छे छे... बघत कसलं बसतंय... डिपार्टमेन्ट त्याला हात्च लावू शकत नाही...

मल्हार - का??

भोसले - तो पळवलेले पैसेच पळवतो...

मल्हार - म्हणजे??

भोसले - ब्लॅक... ब्लॅकमनी पळवतो तो....

मल्हार - त्याची आपल्याला धमकी आलीय... काय करावे लागेल??

भोसले - ... एक शासकीय अधिकारी या नात्याने मी काहीही करू शकणार नाही...

मल्हार - तुझं शासन गाढवाच्या गांडीत गेलं... पाव परसेन्ट मिळणार म्हणून काय करशील तू???

भोसले - साहेब.. शासनाला एवढं पण कमकुवत नका समजत जाऊ...

मल्हार - ते नंतर ठरवू... आधी याच्यावर बोल...

भोसले - थांबा... शाळिग्राम.. तू फोन आल्यावर कंप्लेन का नाही केलीस??

शाळिग्राम - कसली कंप्लेन्ट??

भोसले - पैसे पळवण्याची धमकी आल्याची??

शाळिग्राम - यांचा कुठे कष्टाचा पैसा आहे तर कंप्लेन्ट करायची??

मल्हार - शाळ्या SSSSSS ... राजीनामा घेईन उद्या तुझा... आणि पिऊन झाली असली तर निघ आता...

शाळिग्राम - नाही नाही.. सॉरी... मी गप्प बसतो...

शाळिग्रामला अजून प्यायची होती. जमल्यास दोन चार कबाब आणखीन चघळायचे होते. राजीनाम्यापेक्षा या गोष्टींवर पाणी सोडणे त्याला आत्ता अवघड वाटत होते.

भोसले - साहेब पण हा म्हणतो त्यात पॉईंट आहे...

मल्हार - कसला पॉईंट?

भोसले - तुमचा पैसा व्हाईट नसेल तर तो राहिला काय अन पळवला गेला काय?? डिपार्टमेन्ट काय करणार??

भोसलेसमोर ओंजळीने दिवे ओवाळल्यासारखे करत मल्हारराव म्हणाले..

मल्हार - वा... वावावावावा! .. बघा.. इथे येऊन आम्हालाच कायदा शिकवतोय.. भोसले.. तुझं पर्सेन्टेज ठरल्यानंतर तू आता कायदा विसर... कॅश जाणार नाही यासाठी कायद्याच्या बाहेर काय करशील तेवढंच सांग...

भोसले - होय... एक मिनिट... शाळिग्राम.. तुझ्याशी काय बोलला तो??

शाळिग्राम गप्प बसला.

भोसले - ए शाळ्या... अरे तो काय काय म्हणाला तुला??

मल्हार - शाळ्या.. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे...

शाळ्या - तो म्हणाला मी उद्या जमदाडेला लुटणार, त्याला पुढेही कफल्लक बनवणार, कॅश नगरला पोचलीय, मीही नगरलाच पोचलोय आणि जमदाडे बेअक्कल आहे...

एका दमात हे सगळे सांगीतल्याने शाळिग्राम नुसताच दम खात बसला काही क्षण!

मल्हाररावांचा तिळपापड झाला होता. 'जमदाडे बेअक्कल आहे' हे विधान खरच बोक्याचे होते की शाळिग्रामचे हे त्यांना ठरवता येत नव्हते.

आता पवार मधे पडला.

पवार - भोसले.. तुम्ही आधी सांगा ... हे बोका काय प्रकरण आहे मधेच?? आजच कुठनं उपटला हा??

भोसले - आज नाय.. केव्हाचाच आहे तो...तीन वर्षे झाली धिंगाणा घालतोय.. कुठे असतो... का असतो.. कधी असतो... काही कळत नाही...

मल्हार - तू बघितलंयस का त्याला??

भोसले - छ्या! मी कसला बघतोय?? त्याने स्वतः तरी स्वतःला पाहिलंय का हाच प्रश्न आहे...

मल्हार - आज सगळे बिनडोकासारखे का बोलतायत रे पवार??

या वाक्यावर सन्नाटा पसरला. मिनिटभराने शाळिग्रामला ती भयाण शांतता असह्य झाल्याने त्याने एक चोरटा पेग बनवून तोंड उघडले..

शाळिग्राम - आपल्याला एकमेकांवर टीका करण्याऐवजी उपायांचा विचार करायला हवा...

मल्हार - तू आता निघालास तरी चालेल...

शाळिग्राम - हे काय?? चाललोच आहे मी... माझी काही मदत होऊ शकेल म्हणून थांबलोय..

भोसले - हे बघा जमदाडेसाहेब, तुम्ही आधी काही गोष्टी नक्की मनात ठसवाच! बोका अस्तित्वात आहे. हे पहिल बिंबवा स्वतवर! बोका काल्पनिक नाही. बोका खरच आहे. तो खरच लुटतो. आणि असं सांगूनच लुटतो. लुटल्यावर पुन्हा फोन करून कळवतो लुटलं म्हणून! बोका कधीही कुहेही असतो. कसाही येतो अन कसाही जातो. कुणालाही काहीही कळत नाही. तो राहतो कुठे हेच समजत नाही... दिसतो कसा असं आठजणांना विचारलं तर आठ वर्णनं मिळतात.. काही ठरवताच येत नाही.. हे प्रकरण साधंसुधं नाही.. कॅश कितीय??

अचानक भोसलेने हुषारीने 'कॅश कितीय' असे विचारल्यावर भावनेच्या भरातच मल्हारराव बोलून गेले आणि नंतर त्यांना त्यांची चूक जाणवली...

मल्हार - बत्तीस पेट्या..

भोसलेचे पिंगट डोळे आकडा ऐकून अंधारातही लकाकलेले त्यांना दिसले. पाव परसेन्ट म्हणजे सरळ सरळ आठ हजार मिळणार होते.

भोसले निराश झाल्याप्रमाणे कडवट तोंड करत नकारार्थी मान हालवत म्हणाला..

भोसले - अंहं... केस डिफिकल्ट आहे...

मल्हार - का??

भोसले - बोक्याचं काही सांगता येत नाही...

मल्हार - तुझं म्हणणं काय आहे??

भोसले - मला निदान सहा माणसं लावायला लागतील ...

मल्हार - भोसले... एक काम कर... पंधरा हजार उचल आणि ही कॅश पुण्याला पोचव...

भोसले - मी प्रत्यक्षपणे तर काहीच करू शकत नाही..

मल्हार - अरे माझ्या म्हसोबा.. ते मला माहितीय रे बाबा... तेच तेच का बडबडतोयस???

भोसले - एक काम करा साहेब.. बत्तीस हजार करून टाका.. तुमचं नाही माझं नाही..

मल्हार - हे बघा.. मला मिळणार एक लाख.. त्यातले या पवारला वीस हजार द्यायचे.. अन तुला बत्तीस... मग मी कशाला ती कॅश स्वीकारू???

शाळिग्राम - तेच ना! आणि परत मलाही द्यालच काहीतरी... नाय का??

मल्हार - शाळिग्राम .. घोडा या प्राण्याबाबत तुझं काय मत आहे??

शाळिग्राम - उमदं जनावर असतं...

मल्हार - ते उमदं जनावर मागून चढल्यावर माणसाचं काय होतं याची कल्पना आहे का??

शाळिग्राम - म्हणजे??

मल्हार - पुन्हा मधे बोललास तर घोडा लावीन तुला...

भोसले - साहेब... आपलं काय ठरतंय मग??

मल्हार - वीस हजार कर.. तोडून टाकू...

भोसले - पंचवीस...

मल्हार - चल बावीसवर संपवू...

भोसले - ठीक आहे चला तेवीस करून टाका...

मल्हार - ओके.. आता बोल..

भोसले - बोक्यापासून कॅश वाचवणे शक्य नाही...

मल्हार - मग तुला तेवीस हजार काय मानधन देऊ का मी इथे कबाब खायला आल्याचं??

भोसले - ऐकून घ्या.. कॅश इथे घ्यायच्या ऐवजी डायरेक्ट पुण्याच्या बंगल्यावरच घ्या.. बोक्याने आजवर एकही दरोडा मात्र टाकलेला नाही... तो ट्रान्झिट लॉस करतो फक्त..

मल्हार - ठीक आहे ना.. पण मग तुला कशाला तेवीस देऊ मी??

भोसले - तेही खरच आहे म्हणा..

हा संवादांचा सिक्वेन्स पवारला समजलाच नाही.. पवार म्हणाला..

पवार - साहेब... खरच पुण्यात का नाही कॅश घेत तुम्ही???

मल्हार - पुण्यात घेणं सगळ्यात जास्त रिस्की आहे.. तिथलं डिपार्टमेन्ट माझ्यावर नजर ठेवून आहे..

भोसले - हां! म्हणून तर मला तेवीस हजार देताय... नाय का??

मल्हार - भोसले.. बी सिरियस... कॅशचं काय करायचं??

भोसले - मी असं करतो... माणसं लावतो... आपण सरदवाडीलाच डिलीव्हरी घेऊ कॅशची...

मल्हार - कॅश इथे पोचलीय..

आत्ता शाळिग्रामला जरा बरं वाटलं! त्याने पुरवलेल्या माहितीमुळे प्लॅनमध्ये काहीतरी बदल घडत होता ही त्याच्यासाठी अभिमानास्पद बाब होती.

भोसले शाळिग्रामकडे पाहात होता.

भोसले - तुला त्याच्या मोबाईलवरून फोन आला का रे??

शाळिग्राम - ते मला कसं कळणार?? मी लॅन्डलाईनवर घेतला...

मल्हार - बोक्याकडे मोबाईल असला तर फारच सोपंय की?? तो कुठे आहे ते शोधणं...

भोसले - नाय हो.. एकेका कामगिरीला कार्ड बदलतंय ब्येणं... फार पुढचा आहे तो...

मल्हार - शाळिग्राम.. कॅश जर नगरला पोचली आहे म्हणाला तो... मग आपल्याला उद्याच का मिळावी?? आज का नाही??

शाळिग्रामला आता चेव चढला. आपलं महत्व अजूनही या मीटिंगमध्ये आहे हे त्याला जाणवलं! त्या अधिकारात त्याने काही खारे काजू तोंडात टाकत आधीच्याच चालू असलेल्या पेगमध्ये आणखीन दोन थेंब वाढवले आणि अत्यंत गंभीर चेहरा करत म्हणाला.. .

शाळिग्राम - ते त्या बोक्यालाच माहीत....

मल्हार - काय रे भोसले?? नगरला म्हणजे कुठे आली असेल कॅश??

भोसले - त्या पार्टीला का नाही विचारत??

मल्हाररावांनी तातडीने चंगेडियांना फोन लावला.

मल्हार - जमदाडे बोलतो साहेब...

चंगेडिया - जय जैन जय जैन... बोला सरकार... काय बदल???

मल्हार - बदल नाही साहेब.. पण... गाडी उद्या सकाळी किती वाजता येणार माझ्याकडे??

चंगेडिया - आठ वाजताचं ठरलंय ना??

मल्हार - हो हो.... नाही.. मी म्हणत होतो... ऐकणारे दहा कान असतात... 'गाडी' नगरला कुणाकडे असली तर आत्ताच उचलली असती आणि रातोरात पुण्याला पाठवली असती...

चंगेडिया - छे छे.. गाडी पहाटे पाचला निघणार इथून..

मल्हार - असंय ना?? .. ठीक आहे ठीक आहे.. मग येऊदेत उद्याच..

चंगेडिया - हा... जय जैन...

मल्हार - जय जैन...

फोन ठेवल्यावर शाळिग्रामवर मल्हारराव भडकले..

मल्हार - शाळ्या.. कॅश कुठे आलीय इथे??

भोसले मधे पडला.

भोसले - साहेब... बोका जर म्हणत असला की कॅश इथे आलीय... तर नक्कीच आलेली असणार..

मल्हार - मग काय पार्टी खोटं बोलणार आहे??

भोसले - सरळ आहे..

मल्हारराव अधिकच भडकून म्हणाले...

मल्हार - त्याला काय गरज खोटं बोलायची??

भोसले - कुणाचं काय सांगता येतंय?? पार्टीला माहीतही असेल कॅश पळवली जाणार आहे हे..

हादरून शांतच झाले मल्हारराव!

त्यातच शाळिग्रामने ब्राह्मणी डोकं वापरलं!

शाळिग्राम - किंवा कदाचित पार्टीच बोका असेल...

मल्हार - पार्टी कशी काय बोका असेल??

शाळिग्राम - प्लच... म्हणजे बोकाच पार्टी असेल..

मल्हार - पवार.. याला जास्त झालीय.. याला घरी सोडून ये...

शाळिग्राम - काय झालं काय??

मल्हार - अरे नरसाळ्या.. बोका जर पार्टी असेल तर तो त्याच्याचकडची कॅश इथे आणून मलाच देऊन पुन्हा तीच कॅश कशाला लुटेल??

शाळिग्राम - हं.. हाही एक मुद्दा आहे...

मल्हार - अक्कलशुन्य आहेस तू... आता मधे बोलू नकोस पुन्हा..

भोसले - साहेब.. मला तुमचा मोबाईल द्या...

भोसलेने स्वतःच्या घरी निरोप टाकला. उद्या दुपारपर्यंत येणार नाही. वाट पाहू नका.

मल्हार - पवार.. मला वाटतं तूही इथेच राहा.. सकाळीच आहे व्यवहार...

पवार - ओके...

मल्हार - भोसले.. आता बोल...

भोसले - बत्तीस लाखांची विभागणी करायची.. चार भागात... माझी आठ माणसं लावतो.. दोघं दोघं एकेक बॅग घेऊन पुण्याला जातील.. चक्क एसटीने... तेही वेगवेगळ्या... कसलाच डाऊट नाय...

मल्हार - मला रिस्क वाटते.. आठ गेले तरी काय कमी आहे होय??

भोसले - नाहीतर मग असं करू... हे पवार आणि हा शाळ्या.. सोळा सोळा घेऊन कारने निघतील पुण्याला.. वेगवेगळ्या कार्स...

मल्हार - छे छे.. आठ जाण्याचीही भीती आहे... तिथे सोळा कसले??

भोसले - नाहीतर हवाला करा ना??

मल्हार - कुणाशी??

भोसले - कुणाशीही करा... निंबाळकरांना नगरमध्ये कॅश द्या बत्तीस...पुण्यात त्यांच्या मुलाकडून एकतीस सत्तर परत घ्या.. तीस कमिशन...

मल्हार - निंबाळकराचा भरोसा नाही...

भोसले - मग दुसरं कुणीतरी... लोढाशेठ करतील का??

मल्हार - ह्या! तो कसला करतोय???

भोसले - कन्स्ट्रक्शनचा एखादा ट्रक जात असेल तर त्या सामानाबरोबर पाठवा.. रोज एक लाख पाठवायचे..

मल्हार - नाही रे?? बत्तीस दिवस लागतील.. तोपर्यंत ते बत्तीस लाख इर्रिगेशनमध्ये वाटायचे आहेत...

भोसले - अहो मग चार चार लाख पाठवा.. आठवड्यात काम होईल..

मल्हार - भोसले.. तुला बोलवण्याचं कारण मला उपाय सुचवणे असे नसून तू उपाय करावास असे आहे..

भोसले - मग तुमचं म्हणणं काय आहे?? मी जाऊ पुण्याला?? आणि नोकरी गेली तर ठेवाल इथे??

मल्हार - डोकं शांत कर... एका सेपरेट कारमधून तर तू जाऊ शकतोस ना पुण्याला...

आत्ता कुठे भोसलेला कामगिरी समजली. एका कारमधून कॅश पाठवायची. मागून दुसर्‍या कारमधून भोसले! तो लक्ष ठेवणार. पुढच्या कारने भोसलेच्या नजरेतून पुढे जायचंच नाही. मात्र दोन गाड्या एकमेकींच्या मागेपुढे आहेत असे वाटता मात्र कामा नये.

भोसले बराच वेळ विल्स ओढत बसला होता. शेवटी म्हणाला...

भोसले - ठीक आहे... हे मला सहज जमेल.. फक्त एक दिवस रजा इतकंच...

मल्हार - गुड... आणि त्याच कारमधून परत ये...

भोसले - अर्थातच... मी काय एसटीने येणार का मग??

मल्हार - तुझ्या कारमध्ये पवार बसेल...

भोसले - काय जमदाडेसाहेब... एवढा विश्वास नाही का??

मल्हार - नीट ऐकून घे... तू आणि पवार ज्या कारमध्ये आहात ती बोक्याला महत्वाची कार वाटेल. दुसर्‍या कारकडे त्याचे दुर्लक्ष होईल...

शाळिग्रामला बर्‍याच वेळाने कंठ फुटला..

शाळिग्राम - पण... बोकेच मुळात दोन असले तर?? मग काय करणार???

मल्हार - दोन कसले बोके??

शाळिग्राम - आपल्याला कुठे माहितीय किती बोके आहेत ते??

मल्हारराव उपरोधिकपणे म्हणाले...

मल्हार - खरच की... तर त्यावर उपाय म्हणून कॅशवाल्या कारमध्ये हा शाळिग्राम बसेल..

'बसेल' हा शब्द ऐकून शाळिग्राम उभा राहिला ताडकन! पण त्याला पुन्हा बसावे लागले. कारण उभे राहिल्यावर तोल जात होता.

मल्हार - पवार.. या शाळिग्रामच्या बायकोला फोन करून सांग... आज त्याला बंगल्यावरच थांबायला लावलंय म्हणाव मी... आणि उद्या संध्याकाळी येईल तो घरी...

शाळिग्राम - नाही नाही.. माझी संध्या असते स्नानानंतर...

मल्हार - संध्या, मुंज, तर्पण, श्राद्ध सगळं इथेच कर सकाळी... आणि गाडीत बसून निघ सांगीतल्यावर.. मसलतीत गप्पा हाणायला काही वाटत नाही होय?? आं?? जबाबदारी नको?? गेला नाहीस तर 'तुला बोक्याचा फोन आला होता' या गोष्टीवरून अटक करवेन मी...

'अटक' हा शब्द ऐकल्यावर मात्र शाळिग्रामला हिव भरल्यागत झालं!

तोवर पवारने शाळिग्रामच्या बायकोला आजवरचा सर्वात मोठा सांस्कृतिक, मानसिक व कौटुंबिक धक्का दिलेला होता. तिच्या दृष्टीने पहिल्यांदाच शाळिग्राम तिला सोडून इतरत्र रात्र काढणार होता.

आता मल्हाररावांचे खरे पिणे सुरू झाले आणि त्याबरोबरच मस्करी करणे! कारण आता प्लॅन चांगला ठरलेला होता. उद्या सकाळी एक कार आठ वाजता येणार होती. फक्त ड्रायव्हर! दुसरे कुणीही नाही. मागच्या बाजूला कॅश! ती कॅश उचलून आपल्या गाडीत टाकायची. सकाळीच मेहरबान ट्रॅव्हल्सची आणखीन एक कार भाड्याने मागवून ठेवायची. त्यात भोसले अन पवार बसणार. पहिल्या कारमध्ये शाळिग्राम आणि ड्रायव्हर! त्या कारमध्येच कॅश! तीही चार लाख ड्रायव्हरच्या खालच्या कप्यात, चार शाळिग्रामच्या पिशवीत, आठ लाख फुटमॅट्सच्या खाली आणि सोळा लाख डिकीत अशी विभागून! आणि मग पुण्यनगरीची यात्रा सुरू!

मल्हार - शाळ्या.. ल्येका पण तुला कपडे लागतील ना उद्याचे??

शाळिग्राम - तेच म्हणतोय सर मला जाऊदेत.. मी पहाटे येतो... चारला म्हणालात चारला.. काय आहे?? संध्या उरकल्याशिवाय मनःशांती मिळत नाही...

मल्हार - अरे पण संध्या करेपर्यंत हे चिकन पचलं असेल का??

शाळिग्राम - पूर्ण नसेल पचलेलं... खरच की?? मग संध्या कशी करणार???

मल्हार - तेच तर म्हणतोय... ल्येका त्यापेक्षा पुण्याला जाऊन ये...

शाळिग्राम - पण मला काय म्हणायचंय.. की हा माझा रोलच नाहीये...

मल्हार - तुझा रोल मी ठरवतो.. तू नाही.. भोसले.. याला बायको सोडत नाही बरं रात्री कुठे??

भोसले - मग आज कसा आला???

मल्हार - काय रे शाळ्या?? बोका तुझ्या घरी तर नाही ना थांबणार रात्रीचा??

शाळिग्रामला त्या अश्लील विनोदावर राग येऊनही कसनुसं हसावं लागलं! बाकीचे मात्र अगदी खो खो हासले.

पवार - बर का साहेब?? तो गोवर्धन नाय का?? सावेडी रोडवरचा...

मल्हार - हा...

पवार - त्याचं लफडं परवा त्याच्या बायकोनेच रेड हॅन्ड पकडलंन...

मल्हार - अरे तिच्या... अन मग??

पवार - झाला की तमाशा...

मल्हार - लय सामानं फिरवली त्याने... नाही का??

पवार - अहो लय केलीत..

गप्पा सुरू झाल्या आणि बिर्याणी आली. बिर्याणीचा दरवळ गार्डनमध्ये पसरला आणि सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली. शाळिग्राम मात्र जेवू शकला नाही. कारण दारू अन कबाबमुळेच त्याचे पोट भरलेले होते.

बिर्याणीवर ताव मारून एकेक जण उठू लागला. बंगला भला मोठा असल्यामुळे प्रत्येकाला झोपायाला स्वतंत्र आणि भरपूर जागा होती. शाळिग्रामला आत्ता प्रकर्षाने बायकोची आठवण येऊ लागली. तिला निदन एक फोन तरी करावा असे वाटू लागले. पण त्यावरून आणखीनच थट्टा झाली असती.

सगळ्यात शेवटी मल्हारराव उठून खोलीकडे निघाले. अत्यंत समाधानाने ते आज झोपणार होते.

फक्त त्यांना एक कळले नाही. की नेमके काय दिसल्यामुळे ते थोडेसे अस्वस्थ झाले होते. आपण मगाशी काहीतरी पाहिल्यामुळे अस्वस्थ झालो आहोत याची अत्यंत अस्पष्ट जाणीव त्यांच्या मनावर होती. त्यातच ते झोपून गेले.

=======================================

चंगेडियाची गाडी कॅश देऊन निघून जाताना गेटमध्येच तिला मेहरबान ट्रॅव्हल्सची गाडी क्रॉस झाली. कॅश त्या गाडीत व्यवस्थित विखरून ठेवून शाळिग्रामला त्यात बसवण्यात आले. मागे मल्हाररावांच्या गाडीत भोसले आणि पवार बसले. भोसले पुढे बसला, ड्रायव्हरच्या शेजारी!

समाधानाने मल्हारराव सगळ्यांना हात करत असतानाच दोन्ही गाड्या गेटमधून बाहेर पडल्या.

वळून मल्हारराव आपल्या खोलीत जायला निघाले असतानाच त्यांना ते सट्टकन जाणवले... लागलीच त्यांनी किशोरला हाक मारली..

मल्हार - किश्या???? .. ल्येका.. या इथे काय होतं रे काल??

किशोर - इथे?? कुठे काय???

काहीच स्पष्टपणे न आठवल्यामुळे मल्हारराव खोलीत निघून गेले. तेवढ्यात किशोर त्यांच्या खोलीत घाईघाईत आला.

किशोर - साहेब...

मल्हार - .. काय रे???

किशोर - गाडी आली ना??

मल्हार - परत आल्या गाड्या??

किशोर - नाय.. तिसरीच गाडी आलीय...

मल्हारराव गोंधळून गार्डनमध्ये आले.

मल्हार - .. काय रे???

ड्रायव्हर - मेहरबान ट्रॅव्हल्स... पुण्याची ट्रीप आहे ना????

नेमक्या त्याच वेळेस आणखीन दोन गोष्टी घडल्या...

... काल रात्रीपासून आपल्याला नेमकं कशाने अस्वस्थ होत आहे हे मल्हाररावांना अकस्मात जाणवले आणि त्यांनी खाडकन मान वळवून मागे पाहिले....

काल रात्री पार्टी चाललेली असताना मल्हारारावांच्या मागे.... दहा एक फुटांवर एक झाड होते... ते आत्ता तिथे नव्हतेच...

आणि त्यांचा मोबाईल वाजत होता... दिग्मुढ मनस्थितीत त्यांनी 'अ‍ॅन्सर' बटन प्रेस केले...

"बोका बोलतोय... शाळ्याला वाटेत फेकलाय... मागची गाडी बरीच मागे राहिली... पण ती आता पुण्याला चालली असेल... मी निघालोय औरंगाबादला... बत्तीस पेट्या मिळाल्या... थॅन्क्स... आणि हो.. बिर्याणी मस्त होती हां????"

गुलमोहर: 

वाह ..

शैली छानैय. उत्सुकता ताणणारी.
( सुशिंची आठवण झाली. )

बोक्याचे पुढील कारनामे वाचायला उत्सुक

- Maitreyee Bhagwat

गुड वन.......
मस्तच.....................

पहिल्या कथेतला बोक्याचा स्मार्टनेस आणि संवादातली खुमारी याभागात तेव्हढी खुलून आली नव्हती असे वाटते... कदाचित पहिल्या भागाने अपेक्षा खूप वाढवल्या होत्या...
पहिला भाग वाचून झाल्यावर मनात प्रतिक्रिया उमटली "झकास!" तसे यावेळी झाले नाही...
बोका ३ च्या प्रतीक्षेत.

बत्तीस पेट्या.. भोसलेचे पिंगट डोळे आकडा ऐकून अंधारातही लकाकलेले त्यांना दिसले. पाव परसेन्ट म्हणजे सरळ सरळ आठ हजार मिळणार होते. >> Uhoh >> हा आलं लक्षात!! हिशोबात खूपच कच्ची आहे Proud घाईघाईत समजलंच नाही % आहे आणि सरळ पाव भाग करून मोकळी झाले... Happy सॉरी हा बेफिकीर!

!

अहो खुपच चुकताय की. तुम्ही ८ लाख उत्तर कादलेत ते ३२ लाख चे २५% झाले आपल्याला ०.२५% हवेत Happy
पाव टक्का म्हणजे ०.२५%, ३२ लाख चा १ टका = ३२हजार. आता करा गणित पाव टक्का किती.

बेफिकीरजी,
जबरदस्त वर्णन !
अगदी शेवटपर्यंत एका दमात वाचण्यासारखं !
पण तो बोका नेमका कोण होता ?
:स्मितः

काल रात्री पार्टी चाललेली असताना मल्हारारावांच्या मागे.... दहा एक फुटांवर एक झाड होते... ते आत्ता तिथे नव्हतेच... >>

कारण ते झाड नव्हतेच, तो होता बोका! आता समजले का?

बेफिकीर, बोका मस्त आहे Happy
भारतात अश्या बोक्यांची खुप गरज आहे..
बादवे माझे नाव आपल्या कादंबरीत येईल असे कधी वाटले नव्हते

माझ्या डोक्यावरून गेले. दोन दोनदा वाचूनही बोक्या म्हणजे कोण हे कळलं नाही. बिर्याणी मस्त होती म्हणजे खाणारांपैकी असणार.

Pages