बोका - कव्वा दाद देईल

Submitted by बेफ़िकीर on 22 December, 2010 - 09:01

"इन्डिका पाचजणांना कम्फर्टेबल नाही... नाही का??"

"ए रघ्या... हा भाडखाव टकळी चालवतोय... घालू का हॅन्डल...??"

"गप बे?? कव्वा दाद देईल"

'कव्वा दाद देईल' या वाक्यावर सुनसान शांतता पसरली.

कात्रजचा घाट ओलांडून ती इन्डिका रात्री बारा वाजता सातार्‍याच्या दिशेने चाललेली होती. पुढे ड्रायव्हिंग करणारा गोरा सुतार लालभडक डोळे हायवेवर रोखून आणि कुणाशीही काहीही संबंध नसल्याप्रमाणे ऐंशीच्या स्पीडने इन्डिका चालवत होता. त्या इन्डिकाची त्यापेक्षा वेगात जाण्याची क्षमताच नव्हती. त्यामुळे ऐंशी!

त्याच्या शेजारी बसलेला रघ्या एक संपली की त्यावर दुसरी सिगारेट शिलगावत गोरा सुतारकडे तुच्छ कटाक्ष टाकत इतरवेळी खिडकीतून बाहेर थुंकत होता.

मागे डेक्कन बसलेला होता. डेक्कन! याने म्हणे एकेकाळी डेक्कन क्वीनमधे दहशत पसरवलेली होती. बसायच्या जागा विकायचा तो! पकडल्या गेल्यापासून पळून सातार्‍यात आला होता. आत्ता तो एक स्वस्त दारूची बाटली हातात घेऊन खिडकीबाहेर पाहात होता. कारण आत पाहण्यासारखे काहीच नव्हते.

डेक्कनचा साथीदार सुलेमान हा एक अजस्त्र प्राणी होता. अफगाणिस्तानहून खास पठाण मागवावा तसा तो सातार्‍यात आलेला होता. त्याला इन्डिकाची उंचीच पुरत नव्हती. आणि रुंदीही! गोरा सुतार वाट्टेल तशी खड्यातून गाडी चालवतो हे पाहून सुलेमानने त्याला पद्मावतीपासूनच शिव्या द्यायला सुरुवात केली होती आणि सातार्‍यात पोचल्यावर तो गोरा सुतारचा भुगा करण्याची प्रतिज्ञा करू लागला होता. गोरा सुतार ढिम्म होता.

सुलेमानच्या एका हातात एका दरवाज्याची लोखंडी कडी होती. तीच तो त्याच्या आणि डेक्कनच्या मधे बसलेल्या बोक्याच्या डोक्यात घालू का असे रघ्याला विचारत होता.

बोका! किमान सहा वेगवेगळ्या गुंड संघटनांना एकाच क्षणी बोका हवा होता. बोधिमल काब्रा! नावावरून गल्यावर बसणारा गलेलठ्ठ अन तुपट मारवाडी डोळ्यासमोर येत असला तरी 'बोका' या नावाने मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, सातारा आणि कोल्हापूर या शहरांमध्ये पुण्याइतकीच दहशत बसवलेली होती. हार्डली साडे पाच फूट उंच असलेला बोका रंगाने सावळा होता. एखाद्या सेल्स एक्झिक्युटिव्हसारखे फॉर्मल कपडे कायम त्याच्या अंगावर असायचे. चेहर्‍यावरचे भाव 'मी इतका अगतिक आहे की तू मला वाचवले नाहीस तर मी मेलो' असे कायम!

आणि कर्तृत्व? 'तेरीभी चूप मेरीभी चूप' स्वरुपाचे कर्तृत्व होते त्याचे! एक्साईज, सेल्सटॅक्स, इन्कमटॅक्स, इर्रिगेशन, सबरजिस्ट्रार आणि अनेक सरकारी कचेर्‍या, शैक्षणिक संस्था अशा अनेक ठिकाणी नित्य जमत असलेला भ्रष्टाचाराचा पैसा सरकारी अधिकार्‍यांना मिळाला की त्यांच्या घरी पोचायच्या आधीच बोका पळवायचा.

साहेबराव विचारे नावाचे शांती विद्यापीठाचे सर्वेसर्वा त्यांच्या आलिशान ऑफीसमध्ये बसलेले! नुकतेच कुणीतरी आपल्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी त्यांच्या टेबलवर सहा लाख ठेवलेले! तो माणूस निघून गेल्यावर साहेबरावांनी ड्रॉवरमध्ये कॅश ढकलावी. दिवस संपताना पी ए ला सगळा हिशोब करायला सांगावा! तर रात्री दहा वाजता पी ए चा फोन साहेबरावांच्या घरी!

आपली फियाट लुटली गेली. तीन माणसे जायबंदी! कॅश खलास!

साहेबरावांचे फारसे बिघडलेले नसले तरीही बोंबलायची सोय नाही. सांगणार कुणाला! मग उगाचच स्वतःचीच माणसे कामाला लावायची. फियाटमध्ये जे तिघे होते त्यांची कसून चौकशी करायची. त्यांना दमबाजी करायची. पण त्या तिघांची हालत अशी असायची की ती हालत ते स्वतःच स्वतःची करून घेतील असे वाटणारच नाही. त्यामुळे शेवटी साहेबरावांनी नमते घ्यायचे. कॅशवर पाणी सोडायचे.

हे असेच प्रकार किरकोळ फरकाने अनेक ठिकाणी अनेकांच्या बाबतीत घडत होते. शेवटी एकदा तोंड फुटलेच! कारण याच पैशातून शेवटी डिपार्टमेन्टलाही हप्ते जायचे. मग डिपार्टमेन्टची जबाबदारी नाही का? चोरीच्या पैशाची चोरी करणार्‍याला पकडण्याची?

आता सहाही शहरातील पोसलेले गुंड आणि पोलिस बोक्याच्या मागावर होते. पोलिसांना इतकेच समजले होते की एक तिशीचा तरुण हे काम करतो. त्याच्यापुढे भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही. अर्थात, बोक्याला पकडायची कामगिरी जाहीररीत्या करणे शक्यच नसल्यामुळे यंत्रणेतील काही खास अधिकारीच डोळ्यात तेल घालून बोक्याला शोधत फिरायचे.

बोधिमल काब्रा हे नाव एकदा बोक्याने स्वतःच कुणाला तरी सांगीतल्यानंतरच त्याला 'बोका' असे संबोधण्यात येऊ लागले होते. जमवलेले, पळवलेले सर्व पैसे तो अतीहुषारीने व दीर्घ कालावधीने व्हाईट करत करत जपायचा!

आणि आत्ता, या क्षणी बोका किडनॅप होत होता. सातार्‍याच्या कव्याकडे! बोक्याला पूर्ण कल्पना होती की काय चाललेले आहे. पण तो शांत होता. दुसर्‍याला कन्फ्यूज करणे हे त्याच्याकडे असलेल्या अनेक शस्त्रांपैकी एक महत्वाचे शस्त्र होते. आपल्याला ठार मारून या लोकांना काहीच मिळणार नाही ही त्याची खात्री होती. तसेच, नुसतीच मारहाण झाली तर कसा विरोध करायचा हे त्याने कित्येकदा अनुभवलेले असल्यामुळे तो निवांत बसलेला होता. डेक्कन दारू पीत आहे आणि एक शब्दही बोलत नाही आहे हे बोक्याने पाहिलेले होते. पण सुलेमान जरा बोलका वाटत होता. त्यामुळे बोक्याने कात्रज घाट सुरू झाल्यापासूनच सुलेमानला प्रश्न विचारून भंडावून सोडायला सुरुवात केली होती. आणि त्या बडबडीचा वैताग येऊन सुलेमानने रघ्याला विचारले की याच्या डोक्यात ती लोखंडी कडी घालू का!

त्यावर रघ्याने दिलेले उत्तर फार मार्मिक असावे असे बोक्याला वाटले...

"गप बे?? कव्वा दाद देईल.."

बोक्याने काही क्षण विचार केला.

बोका - कव्वा दाद देईल म्हणजे काय??

सुलेमानने भुवया काटलेले बटबटीत डोळे संतापाने बोक्यावर विस्फारत घुसमटल्या आवाजात प्रतिक्रिया दिली.

सुलेमान - समझजाओगे बेटे.. वही जा रहे है हमलोग...

बोका - ओ... गाडी थांबवा...

अचानक बोका किंचाळला तसा गोरा सुतारने करकचून ब्रेक दाबला. कुणाला काही कळलेच नाही. इतका वेळ शांतपणे बसलेला हा बोका किंचाळला कशाला??

सगळे चक्रावून बोक्याकडे आणि बोका घाबरून सुलेमानकडे पाहात होता.

रघ्या - काय झालं बे मच्छर??

बोका - गळा आवळतोय हा पठाण.. मेलो असतो आत्ता मी..

रघ्या हिंस्त्र नजरेने सुलेमानकडे पाहू लागला.

सुलेमानला धक्काच बसला.

सुलेमान - तिच्यायला?? मी हात तरी लावला का याला?? ए डेक्कन... तूही बता...

डेक्कन नशेत होता. त्याने गाडी थांबलेली पाहून करंगळी वर केली आणि गाडीचे दार उघडले.

कुणाला काही समजायच्या आत बोका सरळ डेक्कनच्या मागोमाग गाडीतून उतरला आणि पुण्याच्या दिशेने चालू लागला. हडबडलेच सगळे!

धावाधाव झाली. रघ्या आणि गोरा सुतार उतरून धावले. सुलेमान तोवर जेमतेम गाडीतून बाहेर आला होता. मागे पावलांचे आवाज येताच बोका शांतपणे थांबला आणि मागे न बघताच तिथेच त्याने पँटची चेन खोलली. धावत त्याच्याजवळ पोचलेल्या रघ्या आणि गोरा सुतारला समजले. स्वारी मुतायला बाहेर पडली होती. वैतागून ते तिथेच थांबले.

काहीच झाले नाही अशा आविर्भावात बोका मागे वळला आणि गाडीत येऊन बसला. सगळे एकमेकांकडे पाहात गाडीत बसले. गाडी सुरू व्हायच्या आधी रघ्याने सुलेमानला दम भरला.

रघ्या - सुलेमान, कव्वा तुझ्या गोट्या काढून टेबल टेनिस खेळेल.. याला हात लावू नको..

सुलेमान - अरे हात नाय लावलान मी... उगाच खिंकाळतोय हरामी... काय बे??.. कव्वा काय हालत करेल तुझी... माहितीय का??

बोक्याने प्रचंड घाबरल्यासारखी मुद्रा केली आणि समोर पाहात बसला. गाडी सुरू झाली. पाच मिनिटांनी बोक्याने सरळ सुलेमानच्या पोटाला जीवघेणा चिमटा काढला. सुलेमानसारखा सुलेमानही कळवळला. पुन्हा गाडी थांबवावी लागली. आता डेक्कनही आश्चर्याने पाहात होता. काय प्रवास आहे का काय? एक पाप्याचं पितर पकडून गाडीत ठेवलंय, तर चार वेळा गाडी थांबवावी लागतीय!

रघ्या - काय झाल बे?? कोकलतोस कशाला??

सुलेमानच्या जीवात जीव आल्यावर त्याने पहिल्यांदा बोक्याची मानगुट धरली आणि त्याच्या डोक्यावर आपले डोके आपटले. दोन सेकंद अंधारीच पसरली बोक्याच्या डोळ्यांसमोर! पण पर्याय नव्हता. थोडे सहन करावेच लागणार होते. काहीसे भान आल्यावर बोक्याने जणू सुलेमानच्या धडकेमुळेच डोके मागे होत आहे अशा आविर्भावात डोके मागे नेऊन डेक्कनच्या तोंडावर आपटले. तोवर रघ्याने सुलेमानला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली होती. त्यात आता डेक्कनही शिव्या द्यायला लागला.

सुलेमान - अबे चूSSSSSप.. स्साला औरतसारखा चिमटा काढतोय... ते दिसत नाय तुम्हाला... माझी आईभन उद्धारताय... तुम्ही पोचाच सातार्‍याला... एकेकाची सोलूनच काढणार आहे मी...

हे ऐकून गोरा सुतार खदाखदा हसायला लागला. मात्र रघ्याने काडकन एक बोक्याच्या कानाखाली हेवून दिली. मग चौघांनी बोक्याला भयानक दम भरला आणि गाडी चालू झाली.

बोका तो बोकाच!

खंबाटकी यायच्या आधी त्याच्या खोड्या तो पुन्हा सुरू करणारच होता. पण जरा विश्वास वाटावा म्हणून काही काळ शांत बसला. त्याला स्वतःलाच सातार्‍याला जायचे होते. त्यामुळे पळवले जात आहोत याचे त्याला काहीच वाटत नव्हते. असले प्रसंग त्याने 'य' वेळा अनुभवलेले होते.

तेवढ्यात रघ्याचा मोबाईल वाजला.

रघा - हा दादा.. खंबाटकी लागंल आता... ब्येणं औलादी आहे.. काम झाल्यावर हलवा करणार आहे आम्ही त्याचा.. मग?? .. सुलेमानला चिमटे काढतंय.. हा मग?? साधा चिमटा नाही.. गुरागत वराडलाय सुलेमान... डेक्कनपन आहे.. हा ओक्के...

गाडीत शांतता पसरली तसे बोक्याचे मन पुढचा विचार करू लागले.

बोका - सॉरी हां??... तुम्हाला त्रास झाला...

सुलेमान - का?? आता फाटली का सातारा जवळ येणार म्हंटल्यावर?? आं??

बोका - मी चिमटा का काढला माहितीय का पण??

सुलेमान - तुला मी तुझं काय करणार आहे ते माहितीय का??

बोका - तुमचे वजन हे एवढे, इकडे हे अस्ताव्यस्त पसरतायत.. मी गुदमरायला लागलो.. म्हणून काढला..

सुलेमान - आता गुदमरायचंच आहे तिकडे...

बोका शांत झाला. गाडी खंबाटकी चढू लागली. वळणावर बोका डेक्कन आणि सुलेमानच्या अंगावर जरूरीपेक्षा जरा जास्तच रेलत होता. ते समजत असूनही काही करता येत नव्हते.

अचानक तो घुसमटल्यासारखा बोलला..

बोका - मळमळतंय.. थांबवा... गाडी थांबवा...

हा प्रॉब्लेम विचित्र होता. हे ओकलं अंगावर तर काय घ्या? गोरा सुतारने भर घाटात गाडी थांबवली.

डेक्कन पटकन खाली उतरला आणि सुलेमानने बोक्याला गाडीबाहेर ढकलले. बोका कसाबसा बाहेर आला आणि पळत लांबवर जाऊन उल्टी केल्याचा अभिनय करू लागला. डेक्कन त्याच्यापाशी जाऊन थांबला. त्याला उल्टी वगैरे काहीही होत नाही पाहून डेक्कनने मागूनच त्याला लाथ घातली. ते रघ्याने पाहिले. आता रघ्या डेक्कनला शिव्या देऊ लागला. तोवर घाबराघुबरा होऊन बोका गाडीत येऊन बसला.

गाडी सुरू झाली. एकंदर प्रकार पाहून आता गोरा सुतार नियंत्रण सुटल्यासारखा हसू लागला. त्यामुळे गाडी हळू झाली. रघ्याने त्यालाही झापले. पण त्याचे हसणे पाहून रघ्यालाही हसू आले. सुलेमान आणि डेक्कनला मात्र हसू येऊ शकत नव्हते. कारण महाघोळबाज बोका त्यांच्याच शेजारी बसलेला होता. तो कधी काय करेल सांगता येत नव्हते. याला पकडण्याचे महत्व आत्ता कुठे चौघांच्या टाळक्यात शिरत होते. पुण्यात बोक्याला पाहिल्यापासून त्यांना कव्व्याचेच हसू येऊ लागले होते. कुठला मच्छर पकडायला सांगतायत! पण आत्ता गाडीतले प्रकार पाहून त्यांना पटले होते. हा माणूस पाताळयंत्री असणार! त्या शिवाय कव्वा याला पकडायला सांगणार नाही.

बोका - हा कव्वा कोण??

सगळे शांत होते.

बोका - तुझा बाप का??

सुलेमानने हिंस्त्र नजरेने बोक्याकडे पाहिले. गोरा सुतार वेड्यासारखा हसू लागला. आता डेक्कनलाही हसू यायला लागले. रघ्याने मागे वळून बोक्याला सुनावले.

रघ्या - थोबाड बंद ठेव... नाहीतर सातार्‍याल्या जीभ हासडून हातात मिळेल..

बोका - हो पण कव्वा कोण?

रघ्या - तुझा बाप...

बोका - असं?? मग याची आई कधी आली त्याच्याकडे??

सुलेमानकडे पाहात बोक्याने विचारले. सुलेमान हिंस्त्र बनणार तेवढ्यात रघ्याने बोक्याची गचांडी धरली. बोक्याने घाबरल्यासारखा चेहरा केला. रघ्याने त्याला दम भरून सोडले.

काही क्षण बोक्याने विचार केला. हा जो कुणी कव्वा आहे त्याला त्याच्या नेत्याचे लाटलेले पैसे तरी हवे असणार किंवा आपल्याकडचे सगळे पैसे तरी! त्याला आपल्याबाबत माहिती कशी मिळाली हा प्रश्न गौण आहे कारण ती मिळाली आहे इतकेच महत्वाचे आणि सत्य आहे. सातारा! सातारा म्हणजे कोण असणार? गेल्या तीन महिन्यात तर आपण सातार्‍यात काही कामगिरी बजावलेली नाही. बघू! काय आहे ते गेल्यावर समजेलच! आत्ता मिळते तेवढी माहिती तर मिळवूयात! भंबेरी उडवण्यापेक्षा माहिती मिळवलेली बरी! हा कव्वा पुरुष असणार इतके नक्की! त्याची एखादी मैत्रीण, बायको, बहीण, मुलगी कुणीतरी असणारच! टाकून पाहू एक खडा!

बोका - हा खरे तर सगळा तिचाच दोष आहे... जगाचा नियमच आहे... स्त्रीला कायम क्षमा करायची...

गोरा सुतार सोडून उरलेले तीनही चेहरे बोक्याकडे वळले आणि नंतर एकमेकांकडे! बोक्याला रघ्याच्या डोळ्यात काहीसा गोंधळ दिसला. कुणी काही विचारायच्या आधी बोक्याने उगाचच डोळेबिळे पुसले. रडवेल्या स्वरात म्हणाला...

बोका - ती म्हणाली असती... तर मी हे कधीच होऊ दिले नसते...

रघ्या - कोण बे??

बोका - तू गप रे... संडासात पाय ठेवायचा दगड व्हायची लायकी नाही तुझी...

सुलेमान आणि गोरा सुतार खदाखदा हसायला लागले. यावेळेस सुलेमानही हसत होता. रघ्याला मात्र समजेना! हा बोका कुणाच्या आठवणीमुळे इतका बेभान झालाय की आपल्याला असे बोलतोय! कव्याची मुलगी उमा तर नाही?? तसे असले तर आपली खैर नाही. हा तिथे गेल्यावर सांगणार, मला यांनी गाडीत धुतले. आणि मग कव्वा दाद देईल.

रघ्या - हसू नका बे... आयशप्पथ काठी सारेन... ए बोका.. कुणाबद्दल बोलतोय तू??

बोका - हो का? रोज तिला पाहून, भेटून... तू जणू ओळखतच नाहीस तिला.. अं???

बोक्याचा तीक्ष्ण आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेला स्वर मात्र चौघांच्या पाठीतून विजेचा प्रवाह खेळवून गेला.

पहिल्यांदाच गोरा सुतारने समोर लक्ष देतच तोंड उघडले.

गोरा - उमाबद्दल बोलतो का रे हा??

रघ्याने खण्णकन आवाज काढला गोरा सुतारच्या कानाखाली! का काढला ते सगळ्यांना समजले. गोरा सुतारला त्याची चूक समजली. त्याने रागाने पाहिलेही नाही रघ्याकडे!

बोका मात्र खाली मान घालून बसून राहिला होता. गाडीत अत्यंत गंभीर शांतता होती. रघ्याने शेवटी असह्य होऊन कव्वालाच फोन लावला.

रघ्या - दादा.. हे ब्येनं ताईचं नाव घेतंय..

तिकडून तीव्र आश्चर्याचा स्वर गाडीत सगळ्यांनाच ऐकू आला. नंतर अनेक गेंगाणे आवाज आले आणि फोन बंद झाला.

मागे पाहात रघ्याने खाडकन बोक्याच्या कानसुलात भडकावली.

बोका गाल चोळत होता.

रघ्या - भडव्या.. तुझा अन उमाचा काय बे संबंध??

बोका - कोण उमा??

रघ्या - अच्छा... आता कोण उमा... आं??

बोका - म्हणजे?? उमा कोण??

रघ्या - मगाशी काय म्हणलास?? तिने सांगीतले असते तर होऊच दिले नसते...

बोका - अबे याची आई... या नालायक पठाणाची आई...

सुलेमानसकट सगळे हबकून बोक्याकडे पाहायला लागले..

बोका - ती माझ्या बापाकडे येणार हे माहीत असतं तर मी तिला येऊच दिलं नसतं...

गोरा सुताराने तिसर्‍यांदा गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. यावेळेस...... ... फक्त हसण्याकरता!

डेक्कनच्या लघ्वीची धार हसल्यामुळे कुठेही जात होती. रघ्याला हसावे का रडावे तेच समजत नव्हते. अत्यंत चक्रम पात्र पकडायला सांगीतल्यामुळे तो मनातच कव्याला शिव्या देत होता. आणि सुलेमान कसायाने बोकड पाहावा तसा बोक्याकडे पाहात होता.

यावेळेसचा ब्रेक मात्र तब्बल पंधरा मिनिटे चालला. गोरा सुतार रस्त्यातच गाडीसमोर बसून हासत होता. रघ्याच्या सिगारेटी संपल्यामुळे त्याने गोरा सुतारला उठवले आणि गाडी सुरू झाली.

तेवढ्यात कव्वाचा फोन आला.

रघ्या - नाय नाय.. कायतरी गोंधळ झालान... ताईचा काय संबंधच नाय.. सॉरी... नाय नाय सॉरी...

फोन ठेवल्यावर रघ्या आणि बोका सोडून सगळे जोरजोरात हासत होते.

'कायतरी गोंधळ झालान' म्हणणार्‍या रघ्याला आणि इतर तिघांनाही कल्पना नव्हती की गोंधळाचा सम्राट आपण सातार्‍याला घेऊन चाललेलो आहोत.

अर्ध्याच तासात सातार्‍याचे दिवे दिसू लागले.

बोका - आलं वाटतं कोल्हापूर...

आता बोक्याची काहीशी सवय झाली होती सगळ्यांना! खुसखुसतच सुलेमान म्हणाला..

सुलेमान - कोल्हापूर नाय बेट्या... बेळगावबी मागे पडलंय... धारवाड येईल आता...

बोका - मग मला उठवायचं नाहीत का?? मला कोल्हापूरला जायचं होतं...

सुलेमान - हो ना?? जाऊ हां! ...

सातारा बायपासलाही गाडी वळली नाही म्हंटल्यावर मात्र बोका नीट रस्त्याकडे लक्ष देऊ लागला. जवळपास सहा, सात किलोमीटर पार पडल्यावर एका डाव्या बाजूच्या जवळपास न दिसणार्‍या वाटेवर गाडी वळली.

बोका - ए डेक्कन.. सरकून बस.. नायतर कव्वा दाद देईल..

आता मात्र सगळेच हादरले. कव्वा दाद देईल हे विधान या हरामखोराने केलेले पाहून! पण आता काही बोलण्याची वेळ राहिलेली नव्हती. काही मीटर्सवरच रामोशीवाडीचे दिवे दिसू लागले होते. तरी रघ्याला काही भीती घालवता येईना!

रघ्या - ए **... कव्वा दाद देईल म्हणायचं नाही हा??

बोका - का??

रघ्या - सांगतो तेवढं ऐक नाहीतर दाभण घालीन..

बोका - नाही नाही.. म्हणणार नाही... पण का नाही म्हणायचं??

रघ्याला आता अधिकच भीती वाटू लागली.

रघ्या - तसं म्हणणार्‍याला कव्वा उलटा टांगून फटके लावतो.

बोका - .... का पण??

रघ्या - अबे गप ना?? सांगतो तेवढं ऐक..

चौघांनाही आता 'कव्वा दाद देईल' हे वाक्य याच्यासमोर बोलल्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता.

मागे एकदा तमाशाला गाव जमलेलं असताना कव्वा पैसे काढून नाचणारणीवर फेकायला उठला अन पैसे काढताना धोतराची गाठ सुटली. गाव हासलं होतं. इतकंच काय तमासगिरीणही! ते पाहून कव्वाने तीन जणांची हाडे मोडली होती. त्याचे भीषण रूप पाहून तमाशाच बंद पडला होता. तेव्हापासून कव्वा प्रचंड भडकला की 'कव्वा दाद देईल' म्हणण्याची पद्धत पडली होती, पण ती कव्वाच्या अपरोक्षच!

बोका - काय तुमची नावं रे एकेकाची? कव्वा काय, डेक्कन काय, उमा काय!

रघ्या - ए नरसाळ्या.. ताईचं नाव घेऊ नकोस...

बोका - खरच की... नाहीतर कव्वा....

रघ्या खुनशी नजरेने बोक्याकडे पाहू लागेपर्यंत गाडी वळून एका झोपडीसमोर थांबली. दिसायला झोपडीच, पण साधारण चार तरी खोल्या असतील आत!

नुसतेच धोतर नेसलेला एक गबाळा माणूस पुढे आला. त्याच्या हातात काठी होती. अंधारात फारसे दिसत नसले तरी तेवढे बोक्याला दिसले.

तो माणूस पाचही जणांना आत घेऊन गेला. आत मात्र भरपूर उजेड होता. पाच मिनिटांनी त्यांना बोलावणे आले. आणखीन दोन खोल्या ओलांडून सगळे पुढच्या खोलीत पोचले.

ती खोली मात्र व्यवस्थित होती. खोलीला फरशी होती. आत चक्क एक फ्रीज होता. टेबल होते. आणि दहा तरी खुर्च्या असतील.

आणि तो माणूस!

तोच कव्वा असणार हे बोक्याला समजले. बोका बिनदिक्कत एका खुर्चीवर बसला.

रघ्या - दादा, हे लय ब्येनंय.. लय परकार केलेत येताना.. ताईंचा काय संबंधच नाही.. काहीच्च्या काही बोलतंय.. मधेच मुततंय... ओकतंय... या सुलेमानला चिमकुटे काढतंय... वाट्टेल ते चाललंवतं ह्याचं...

बोका 'तिसर्‍याच कुणाबद्दल बोलतायत' असे हावभाव चेहर्‍यावर धारण करून शांतपणे बसला होता.

कव्वा तीक्ष्ण नजरेने बोक्याकडे पाहात होता. कव्वा हा एक काळाकभिन्न रामोशी होता. पण त्याच्या पोषाखावरून तरी तो शहरात राहिलेलाच वाटत होता. त्याची नजर भेदक होती. तांबडेजाळ डोळे रोखून तो बोक्याला सावजासारखा न्याहाळत होता. सगळे एकेका खुर्चीवर बसले.

कव्वाने तोंड उघडले.

कव्वा - जाधवराव कर्‍हाडकर... ढोलेरीचे सुर्वे... शिंग्राप्पा जगताप... काही आठवतंय का??

बोका शांतपणे भिंतीकडे पाहात बसला. डेक्कनने त्याला ढुशी दिली..

डेक्कन - तुला इच्यारत्यात भडव्या... तिकडे बघ...

बोक्याने कव्वाकडे पाहिले.

बोका - काय म्हणालास??

हा विनोदी माणूस आपल्या पुढार्‍याशी एकदम अरे तुरे वर येईल याची कल्पनाच नसलेले सगळेच उडले. इव्हन कव्वाही आश्चर्याने पाहू लागला.

कव्वा - नावं पुन्हा घेतोय... नीट ऐक... जाधवराव कर्‍हाडकर...

बोका - माहितीयत की..

कव्वा - सुर्वे...

बोका - आणि जगताप...

कव्वा - हं... लायनीवर आलास दिसतंय.. पैसे कुठायत??

बोका - कसले??

कव्वा - या तिघांचे मारलेस ते...

बोका - खिशात घेऊन फिरतो काय?? बिनडोक कुठला...

प्रकरण भलतंच गंभीर आहे हे सगळ्यांनाच समजलं! आत्तापर्यंत गाडीत भिऊन बसलेला बोका इथे एकदम बिनधास्त वागेल याची कल्पनाच नव्हती कुणाला! कव्वा रागारागाने बोक्याऐवजी इतरांकडेच पाहात होता.

रघ्याने तोंड उघडलेच.

रघ्या - तुम्ही हुकूम द्या दादा... चामडी सोलून विकायला ठेवतो याची कोल्हापुरात...

कव्वा - त्याला अर्ध्या तासाने माझ्यासमोर आणा...

एवढे म्हणून कव्वा उठला. बोक्याला समजले. हा अर्धा तास आपल्याला गुरासारखे मारण्यासाठी प्रदान केलेला असणार! लगेच त्याने वाक्य टाकले.

बोका - घरात आहेत माझ्या...

मागे वळून कव्वा पुन्हा जागेवर बसला. सुलेमानला मात्र वाईट वाटले. बोक्याला मारायची संधी लांबल्याने!

कव्वा - सोळाच्या सोळा पेट्या... पाच तासात इथे पाहिजेत... काय करतोस?? गाडीतून पाठवू या चौघांना?? की मी येऊ?? की आम्हाला पत्ता देतोस घराचा?? अन तू इथे थांबतोस आम्ही पैसे घेऊन येईपर्यंत?? कसं??

बोक्याने रघ्याकडे पाहिले.

बोका - ए... जरा मोबाईल दे...

रघ्या - नीट बोल *****... मोबाईल विसर... दादा काय विचारतायत त्याचं उत्तर दे आधी...

बोक्या - अरे मूर्खा त्याच्याचसाठी मोबाईल दे मला..

कव्वा - रघ्या.. त्याला मोबाईल दे... ए बोक्या... फोनवर एक शब्द इकडचा तिकडे बोललास तर मुडदा इथेच पडेल तुझा... अन आईच्या भाषेत बोलायचं.. इंग्रजी शब्द ऐकू आला तर उजव्या हाताची बोटं तुटतील..

रघ्याने 'मूर्ख' ही पदवी बहाल झाल्याच्या रागात मोबाईल फेकला. बोक्याने तो उचलला. एक नंबर फिरवला.

बोका - हॅलो... हा बोका बोलतोय... सोळा पेट्या पाहिजेत... आत्ता... म्हणजे??? ... ते काय मुहुर्त बघून करायचं काम आहे काय?? पत्ता लिहून घे... ए नरसाळ्या पत्ता सांग...

सुलेमानने 'नरसाळ्या' हा उल्लेख पचवून पत्ता सांगीतला.

बोका - हां... पाच तासाचा टाईम आहे.... नाहीतर कव्वा दाद देईल..

बोक्याने फोन ठेवला तेव्हा रागाने प्रचंड वटारलेले डोळे फिरवत कव्वा सगळ्यांकडे बघत होता.

कव्वा - याला कुणी सांगीतले रे ****?? आं?? कोण बोललं याला??

बोका - हा का भडकलाय रे??

बोक्याने हा प्रश्न डेक्कनला विचारला होता. पण उत्तर कव्वाने दिले. आत्तापर्यंतचा अपमान सहन न झाल्याने कव्वा उठून बोक्यापाशी आला आणि बोक्याच्या नाकावर फटका द्यायला हात उचलला. बोक्याने ती बुक्की चुकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाकाऐवजी खांद्यावर निभावले. पण कव्वा भडकलेलाच होता. त्याने बोक्याला धरले. अचानक बोका किंचाळू लागला.

बोका - का रे?? नालायकांनो... मगाशी तीन तीन लाख घेऊन मला चार लाख देऊन मुंबईला पळून जाणार होतात ना?? आता का याच्यासमोर नांगी टाकता?? आता मात्र मी एकट्याने मार खायचा होय??

कव्वाने ते शब्द ऐकले. बोक्याच्या चेहर्‍यावरचे प्रचंड संतापाचे आणि भडभडून आल्यासारखे भाव पाहून क्षणभर कव्वाला तो मुद्दा खराच वाटला. त्याने रघ्याकडे मान फिरवली.

रघ्या - दादा... अहो कळीचा नारदे त्यो... मुंडी पिरगाळा त्याची... आधी त्याने आत्ता फोन कुनाला क्येला तपासा...

सुलेमानने पटकन मोबाईल हातात घेतला. बोका रडू लागला होता. तोंडाने डेक्कन आणि रघ्याला शिव्या देत होता. बोका कव्वाच्या हातात असल्याने ते दोघे चरफडण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते.

सुलेमान - पुण्याचा नंबर आहे...

कव्वा - पुन्हा फोन लाव तिथे...

आता फक्त रिंगच वाजू लागली. तो एक डेड नंबर होता.

कव्वा - काय बे ***... फोन का लागत नाही??

बोका रडतच उद्गारला...

बोका - हे तिथे जाणार म्हणून भाऊ थांबला होता घरात.. आता पैसा इकडेच पाठवायचा आणि माझ्या जीवावर बेतलंय म्हंटल्यावर निघाला तो... आता कोण फोन उचलणार??

कव्वा - मोबाईल नंबर काय तुझ्या भावाचा??

बोका - नाहीये त्याच्याकडे...

मधेच रघ्याला तोंड फुटले.

रघ्या - अरे पण आम्ही कुठे जाणार होतो त्याच्याकडे?? दादा.. कुत्र्यागत मारतो थांबा त्याला.. आमच्या ताब्यात द्या दहा मिनिटे..

बोका - अरे चूSSSSSप... म्हणे तीन लाख अन उमा... अशी दाद देणार म्हणे कव्याला...

कव्वा भडकला. त्याने आधी जीव खाऊन बोक्याच्या कानफडात मारली. बोक्याने तो फटका सहन करून मागे वळून सुलेमानच्या कानाखाली वाजवली.

बोका - बोल बोल?? आता बोल?? आता बोल हा रघ्या काय म्हणत होता अन तू हासत होतास ते??

आता मात्र सगळेच भडकले. त्याच्यावर तुटून पडायला सरसावले. कव्वा मात्र बोक्याच्या अभिनयाकडे लक्षपुर्वक पाहात होता.

बोका अचानक पुढे आला आणि कव्याला ओरडून म्हणाला..

बोका - पंधरा मिनिटे... पंधरा मिनिटे गाडी खंबाटकीच्या आधी थांबवली होती... काय रे गोरा सुतार?? थांबली होती की नाही??

बोका कव्वाच्या जवळ असल्यामुळे चौघेही काही अंतरावरच धुमसत उभे होते.

गोरा सुतार - हा मग?? ... त्याचं काय??

बोका - त्याचं काय?? वा रे वा? त्याचं काय म्हणे! कव्वा... हे चौघे हरामखोर तिथूनच मागे वळत होते.. फक्त उमासाठी इथे आलेत... का तर या नालायक रघ्याला उमा पाहिजे आहे... नाहीतर तिथूनच पुण्याला जाणार होतो आम्ही..

कव्वाने पुन्हा बोक्याच्या कानफडात वाजवली. हा फटका मात्र जोरकस होता. बोका खालीच बसला. कव्वा बोलू लागला.

कव्वा - पंधरा वर्षे एकत्र काम करतोय आम्ही.. काय?? तुझा प्रताप इथं चालायचा नाय.. मुकाट चल पुण्याला..

बोका - आता पैसे हायवेला लागलेसुद्धा..

रघ्याला मात्र कव्वाच्या शब्दांनी धीर आला होता. त्याला केव्हाचा सूड घ्यायचा होता बोक्याचा! त्याने आता कव्वाचेही न ऐकता मागून येऊन बोक्याच्या पाठीत लाथ घातली. तसे सगळेच खवळले. बोका तिरीमिरीत उठला. कव्वाच्या मागे लपला. ओरडू लागला.

बोका - डेक्कन बघा.. डेक्कन बघा किती प्रामाणिक आहे... म्हणाला.. काही असो... कव्वाकडे जायचंच... पैसे कव्वालाच द्यायचे... तो आपल्याला देईल तितके आपले.. अरे दारू प्यायलावता.. पण शुद्धीत तो एकटाच होता...

कव्वा बोक्याला मागून पुढे खेचायचा प्रयत्न करत होता. मात्र बोक्याच्या या वाक्याने त्यालाही किंचित संशय आला. त्याने डेक्कनकडे पाहिले. तोवरच मागून बोका ओरडला.

बोका - गोरा सुतार तेच म्हणत होता... डेक्कनचं ऐका... डेक्कनचं ऐका... पण ऐकतंय कोण?? तीन वेळा गाडी थांबली कव्वा... तीन वेळा...

आता कव्वाने बोक्याला पुढे ओढून घेतले. सगळ्यांना थोपवले आणि बसवले. बोक्यालाही बसवले.

कव्वा - नक्की काय झाले ते सांग...

करडी नजर रोखून कव्वाने बोक्याला विचारले.

बोका - सगळं सांगतो... आधी मला एक सांग... तुझा अन माझा काहीही संबंध नसताना मला 'उमा' हे नाव कळेलच कसे???

पुन्हा उमाचे नाव आल्यामुळे कव्वा हिंस्त्र होऊ लागला होता.

बोका - सांग ना?? मी काय यांना विचारणार आहे?? की धारवाडला गेल्यावर कव्वाशी भांडता यावं म्हणून त्याच्या मुलीचं नाव मला सांगून ठेवा??

कव्वा - धारवाड?? कसलं धारवाड??

बोका - धारवाडला नेणार होते तिला.. विचार या पठाणाला...

सुलेमान मधे पडून बोक्याला शिव्या देऊ लागला. तसा कव्वाने हात केला आणि सुलेमान गप्प झाला.

कव्वा - आणि काय काय झालं??

कव्वाला इतकं निश्चीत माहीत होतं की उमाचे नाव बोक्याला माहीत असण्याचा प्रश्नच नाही.

बोका आता रडवेले तोंड करून रघ्याकडे पाहू लागला. अचानक म्हणाला..

बोका - सांगू का??

रघ्या - चामडी सोलणार आहे भडव्या तुझी मी... दादा तुझी मजा बघतायत...

बोका - कव्वा... हा म्हणाला तू काही केलंस की मी म्हणायचं.. कव्वा दाद देईल... कव्वा दाद देईल..

नाही म्हंटले तरी कव्वा काहीसा गोंधळलाच! कारण 'उमा' आणि 'कव्वा दाद देईल' या दोन्हीचे संदर्भच बोक्याला ठाऊक असणे शक्य नव्हते. आणि ती चौघे त्याची माणसे असली तरी परक्या माणसासमोर हे संदर्भ उच्चारतील हे कव्याची दहशत असताना अशक्य होते.

कव्वा - पण रघ्या जर इथे यायलाच तयार नव्हता तर मी दाद देईन हे तू कसा म्हणणार माझ्यासमोर??

बोका - तेच तर मी म्हणतोय ना?? मी तेच विचारलं याला.. तर म्हणे हा नालायक डेक्कन आपल्यात नसता तर कव्याचे थोबाड पाहावे लागले नसते आज..

आता मात्र हद्द झाली. स्वतः डेक्कनच मधे बोलू लागला.

डेक्कन - दादा.. हे कुत्तरडं बोलतंय आणि आपण ऐकतोय.. याला आत घेऊन बुकलुया.. अन पैसे घ्यायला पुण्याला जाऊ.. ह्याला इथे आणण्यापेक्षा तिकडेच दामटायला हवा होता...

कव्वा - पैसे आणायला पुण्याला जाऊ म्हणजे??

डेक्कन - या थापाड्याने थोडीच भावाला पैसे घेऊन इकडे निघायला सांगीतले असेल??

कव्वा - सुलेमान, तू आणि रघ्या याला आत घ्या.. अर्ध्या तासाने पुन्हा आणा..

उत्साहाने सुलेमान आणि रघ्या उठले. मृतवत थोबाड करून बोका त्यांच्याबरोबर आत गेला.

खोलीचे दार बंद झाले आणि सुलेमानने एक चाबूक हातात घेतला. त्याचा अवतार पाहूनच बोका गळाठला.

त्याही परिस्थितीत म्हणाला..

बोका - जोरात आवाज कर चाबकाचा... मीही जोरात ओरडतो... अर्ध्या तासाने सांगू त्या येड्याला..

आता सुलेमान हसायलच लागला. रघ्याने एक सणसणीत ठेवून दिली बोक्याला!

बोका - अक्कलशुन्य माणसा... सहा सहा लाख तुम्हाला दोघांना मिळतील हे समजत नाही का तुम्हाला??

रघ्या - नाय समजत ... नाय समजत... काय म्हणणं आहे??

बोका - ठीक आहे.. मग मारा मला.. पैसे कुठे आहेत ते कुणालाच माहीत नाही..

रघ्या - म्हणजे??

बोका - पैसे नाहीत पुण्याला, नाहीत इथे अन नाहीत धारवाडला...

रघ्या - पैसे कुठे आहेत ते आता चाबूक खाल्यावर सांगशीलच तू...

बोका - बिनडोका... तुला हे कसे कळत नाही की चाबूक न खाताच मी सांगायला तयार आहे??

रघ्या - नको ना पण.. खा ना जरा चाबूक.. आमच्याही चाबकाला काम नाही आहे...

एवढे वाक्य होईस्तोवर एक चाबकाचा फटकारा बसलाच पाठीवर! किंचाळला बोका! त्याचे किंचाळणे बाहेरही ऐकू आले. ते ओरडणे थांबेपर्यंत सुलेमानचा दुसरा फटका बसला आणि पाठोपाठ तिसरा! तिसर्‍या फटक्याला बोक्याचे किंचाळणे किंचित क्षीण झाले होते. त्यातही तो म्हणाला..

बोका - रघ्या.. बहाद्दरा मी तुझ्याच ताब्यात आहे ना?? अर्ध्या तासाने सांगू बाहेर जाऊन.. पैसे खरच निघालेत पुण्याहून म्हणून... ते इथे का पोचले नाहीत ते बघायला तू अन हा पठाण मला घेऊन चला... मी डायरेक्ट तुम्हाला पैशापाशीच नेतो..

आणखीन एक फटका! पुन्हा किंचाळला बोका! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मार खायचे त्याने ठरवलेले होते.

पाचव्या फटक्याला मात्र त्याने बोंब तर ठोकलीच... वर हे वाक्यही ओरडत म्हणाला...

"देईन... देईन... सगळी रोकड तुम्हालाच देईन.. नाही देणारा कव्वाला एक पैसा...आ SSSSSS"

झालं! बोंबललं! कव्वा धावत आत आला.

कव्वा - काय बे?? काय झालं??

रघ्या - अहो मार खाऊन उलटं बोलतंय हिजडं... !

आता खरी वेळ आली होती. बोक्याचा प्रसाद द्यायची!

लांब बाह्यांच्या शर्टची उजवी बाही मनगटापासून थोडी मागे सरकवत बोक्याने काहीतरी चाचपले. दोन्ही मनगटांना तो रिस्ट बॅन्ड लावायचा. फक्त त्या बॅन्डच्या बाहेरून दोन दोन सुया असायच्या! ऐनवेळी मदतीसाठी! दोन्ही रिस्ट बॅन्ड्सना आतून दोन कापडीच हुक्स होते. त्यात इलॅस्टिक बसवलेले होते. ते शिवणीतून वर काढलेले होते. दोन बोटांनी ते ताणले की सट्टकन एक सुई निघायची. फार जोर नसायचा! कित्येकवेळा नेम चुकायचाही! पण चारपैकी एखादी सुई जरी बसली तरी किमान पाच दहा मिनिटे बराच गोंधळ उडायचा! यापेक्षा जास्त सुया बसवल्या तर त्यांच्या इलॅस्टिक्सच्या पट्या बाहीतून बाहेर दिसू लागायच्या. एखाद्या समोर भीक मागतोय अशा आविर्भावात हात करून आणि त्याच्या जवळ जाऊन अचानक बोका एक सुई सोडायचा! कळवळत आणि आक्रोशत तो माणूस खाली पडायचा अन तडफडू लागायचा!

बोक्याच्या त्या 'फॉर्मल' पोषाखात काही विचित्र प्रकार होते. बेल्टमध्ये दाढीची सहा ब्लेड्स असायची! ऐन प्रसंगात एखाद्याची खोडी काढून गोंधळ उडवून पलायन करायला त्याची मदत व्हायची. खिशातील बॉलपेन दिसायला साधे होते. पण लिहिण्याच्या विरुद्ध बाजूचे लहानसे झाकण काढले की एक दाभणासारखे टोक दिसू लागायचे. अनेकांना त्याने या दाभणाने जीवघेण्या वेदना करून स्वतःला वाचवलेले होते. कंगवा मुद्दामच स्टीलच्या ब्रशचा ठेवायचा. सरळ एखाद्याच्या अंगावर खरवडायला बरा पडायचा! कित्येकदा कामगिरीवर असताना तो एकावर एक असे दोन शर्ट पँट घालून निघायचा. मधेच पब्लिक टॉयलेटमध्ये वगैरे जाऊन सरळ कपडे बदलल्यासारखा बाहेर यायचा.

अर्थात, कामगिरीवर असताना ही असली फुटकळ शस्त्रे काहीच उपयोगाची नसायची. तेव्हा त्याची तयारी जबरदस्त असायची. पण कोणतीही कामगिरी नसताना जर नुसतेच वावरायचे असेल तर तो फक्त इतक्याच किरकोळ शस्त्रांवर वावरायचा. पकडला जाण्याचा प्रश्नच नाही. आणि पकडले जातोय असे वाटले तर पटापट चार सुया आणि सहा ब्लेड्स फेकून द्यायची!

पण आज फेकली नव्हती त्याने! कारण आज पुण्यापासून बरेच लांब यावे लागले होते. कधी काय होईल ते माहीत नव्हते आणि गोंधळ उडवणे ही कला कितपत उपयोगी पडेल याचा अंदाजही नव्हता.

आणि आत्ता एक सुई वापरायची वेळ आलेली होती. अजून चाबकाचे दोन तीन फटके सहन करू शकला असता तो! पण कव्वा आत आला म्हंटल्यावर आता त्या गोष्टीची गरजच उरलेली नव्हती. आधी त्याला वाटले होते की लाथाबुक्यांनी मारणार आपल्याला! तसे असते तर अवघड किंवा नाजूक जागी लागू नये इतकेच पहायचे असते हे त्याला माहीत होते. बाकी मुक्या माराला तो भीक घालत नव्हता.

जणू कव्वाकडे दयेची याचनाच करतो आहोत अशा आविर्भावात रडत भेकत , दोन्ही हात भीक मागीतल्यासारखे करत कव्वाजवळ जाऊन बोका म्हणाला...

बोका - सोडवा मला दादा... माझी चूक नाही ...

आणि काय झाले ते कुणालाच समजले नाही. बोक्याला फक्त समजले. एक सुई वाया गेली होती उजव्या हाताची! पण डाव्या हाताची एक सुई कव्वाच्या पोटात उजवीकडे घुसली होती. अभद्र किंकाळ्या मारत कव्वा भिंतीचा आधार घेत पोट दाबून उभा होता.

त्याला झाले काय हेच कुणाला समजत नव्हते. बोकाही प्रचंड आश्चर्य व्यक्त करत उभा होता. तोही विषण्ण आणि अभद्र सुरात बडबडला.

बोका - मारलं... मारलं... शेवटी ठरवत होते तसं मारलंच नालायकांनी... डेक्कन... उचल...उचल यांना..

काहीच न समजल्यामुळे डेक्कन आणि गोरा सुतार पुढे झाले. उचलायचं काय हेच त्यांना समजेना! कव्वा तर चांगला उभा होता. पण तरी त्याला धरून ते बाहेर न्यायला लागले. कव्वाला वेदना सहन होत नव्हत्या. त्यातच त्याला हालवल्यावर तो आणखीनच भडकला. ओरडून म्हणाला..

कव्वा - रघ्या.. ***** ... भाऊ समजायचो तुला भाऊ..

रघ्या फ्रीझ होऊन तो प्रकार पाहात होता. सुलेमानला काय झाले ते कळले नसले तरी इतकेच कळले की रघ्याने ऐनवेळेस कव्वाला काहीतरी केले. म्हणजे आत्तापर्यंत हा बोका बरोबरच बोलत होता की काय? रघ्या गद्दारच असला पाहिजे. सुलेमानने रघ्याला चाबूक हाणायला सुरुवात केली. रघ्या ते फटके चुकवत सुलेमानला शिव्या देऊ लागला.

इकडे कव्वा टेबलवरच आडवा झाला. डेक्कनने पाणी शोधण्यात वेळ न घालवता दोन दारूचे थेंब त्याच्या घशात ओतले अन जखमेवरही! पुन्हा किंचाळत कव्वाने त्यालाही शिव्या दिल्या. पण त्या प्रेमातल्या शिव्या होत्य हे डेक्कन आणि गोरा सुतार जाणून होते.

कव्वा - खल्लास कर... खल्लास कर त्या रघ्याला... आत्ता मुडदा बघायचाय मला त्याचा...

तेवढ्यात बोका प्रकटला तिथे!

बोका - यांना आधी दवाखान्यात नेऊ! विषप्रयोग झालाय यांच्यावर!

विषप्रयोग झालाय कशावरून म्हणे? तर हा म्हणतोय म्हणून! प्रसंगाचे गांभीर्यच इतके होते की कव्वालाही वाटू लागले आपल्यावर विषप्रयोग झालाय!

मगाशी बाहेर धोतरवाला होता तो आत आलेला होता. त्याच्यासकट चौघांनी कव्वाला इन्डिकात मागे टाकले. गोरा सुतार ड्रायव्हिंगला बसला. त्याच्या शेजारी डेक्कन बसू लागला.

बोक्याने डेक्कनला रोखले.

बोका - तू कुठे चाललायस मूर्खा?? तिकडे एक खून होतोय आतमध्ये.. त्या रघ्याचा... तो रोख जाऊन... मी जातो यांच्याबरोबर..

डेक्कनला जवळपास बाहेर ओढून बोका आत बसला.

गाडी सुरू झाली. कळवळत कव्वा ओरडत होता मागून!

"अरे होऊदेत ना खून त्या ***चा...आयायाया..."

हायवेला लागून गाडी सातार्‍याकडे वळली आणि एकच किलोमीटर पुढे गेली असेल... बोका उद्गारला..

बोका - ए.. ए अरे थांबव गाडी...

गोरा सुतार - .. का??

बोका - विष चढलंय बहुतेक..

खरे तर कव्वा आता स्थिरावलेला होता! पण बोक्याच्या बोलण्याने तोही गोंधळला.

गाडी थांबली आणि बोक्याने स्वतःच्या बाजूचे दार उघडले.

पुढची करामत दाखवायची वेळ आली होती.

मागच्या सीटवर ओणवा होत कव्वाची तपासणी करण्याचा अभिनय करत करत बोक्याने एक सुई गोरा सुतारच्या खांद्यावर मारली.

गोरा सुतार का किंचाळतोय यावर विचार सुरू होईपर्यंत कव्वाच्या उजव्या फोरआर्मवर उरलेली शेवटची सुई अगदी नेम धरून बसली.

बोका गाडीबाहेर येऊन खदाखदा हासला.

"पुन्हा भेटायचा प्रयत्न करू नका बर का यड्यांनो... बोका चालला धारवाडला... तिकडे येता येणारच नाही तुम्हाला"

हिंस्त्र नजरेने दोघे त्याच्याकडे बघत किंचाळत होते...

"पण आलातच तर???........ आलातच तर बोका दाद देईल..."

गुलमोहर: 

एक तांत्रिक शंका.
रबर ने उडवलेली सुई कपडा पार करून टोचू शकेल का? ते कितपत वेदनादायक असेल? सुई विषारी असेल तर कदाचीत. अन्यथा अवघड वाटते आहे.

कथा खुप आवडली... खूप enjoy केली.
तो सुया आणि ब्लेड्स चा paragraph थोडासा पटला नाही.
पण खूप मजा आली वाचताना... बोका अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.

अधून मधून एखादी बोका (करामत) कथा वाचायला आवडेल.

कथा चांगली आहे. ऊत्कंठा पण ताणली गेली. पण नुसत्या सुयांनी एव्हढा धिप्पाड गडी आडवा होईल हे पटत नाही. शेवट पटला नाही.

बोक्यचे सुया वगैरे फेकायचे प्रसंग DareDevil नावाच्या चित्रपटातील Bull's Eye ह्या पात्राच्या करामती सारखे वाटतायेत..