मार्ग

Submitted by पूनम on 27 May, 2008 - 05:13

आरश्यासमोर उभ राहून अनया गुणगुणत होती.. दहा मिनिटांत तयार होऊन तिला निघायलाच हवं होतं, नाहीतर तिकडे शोभा वाट पहात बसली असती.. आज बरेच दिवसांनी अचानक खरेदीचा प्लॅन बनला होता. शनिवार आणि रविवारला जोडून शुक्रवारीही सुट्टी मिळाल्यानंतर 'काय करायचं?' असा अनयाला प्रश्नच पडला होता खरंतर. त्यातली आजची संध्याकाळ तरी मनासारख्या खरेदीत जाईल या विचारानी तिचा मूड एकदम मस्त झाला होता.. आपल्याला काय काय घ्यायचं आहे याची यादी तिने मनातल्यामनात केली, तर भली मोठी झाली होती. ’अरेच्च्या! बर्‍याच गोष्टी ’नंतर आणू’ म्हणत राहिल्याच आहेत की..’ अश्या विचारात ती होती, एवढ्यात बेल वाजली!
’आता कोण’? कोणीही असेल तरी पटकन कटवायचं आणि बाहेरच पडायचं आता या विचारानी ती पर्स घेऊनच बाहेर आली आणि तिने जराश्या त्रासिक चेहर्‍यानीच दार उघडले..

दारात मनिष!
पायाशी ठेवलेल्या दोन बॅग्ज, प्रवासानी जरासे चुरगाळलेले कपडे पण चेहर्‍यावर तेच ते आत्मविश्वासानी ओतप्रोत भरलेलं हास्य!
अनया पूर्ण चकित झाली! दारातच त्याला म्हणाली,
"अरे तू? आत्ता? काही कळवलंही नाहीस.."
"अगं, मला घरात तरी घेशील की नाही? का इथेच मिठी मारू तुला?"
ती लाजली.." ए, काय हे! जपून हं, मधे मला ब्रम्हे काकू विचारत होत्या, तुमचे मिस्टर सारखेच बाहेरगावी असतात, नाही?"
"हो? आयला! असतात म्हणावं, आणि म्हणूनच आले की मला सोडत नाहीत अजिबात..हे असे.." धसमुसळेपणानी तिला ओढत तो म्हणाला. "हाक मारू का काकूंना दाखवायला?" मिस्किलपणे हे वर!
"मनिष!" अनयानी स्वत:ची सुटका करून घेतली आणि ते आत आले.

तिच्याकडे पहात तो म्हणाला, "कुठे बाहेर निघाली होतीस?"
पटकन अनया म्हणाली, "अरे हो, बघ ५ मिनिटं उशीरा आला असतास तर चुकामुक झाली असती आपली.. शॉपिंगला चालले होते रे ऑफिसमधल्या मैत्रिणीबरोबर. 'येणार' असा फोन का नाही केलास?"
"फोन काय करायचाय? तू कुठे जाणार? घरीच असशील असं वाटलं मला. बर, सांग आता तुझ्या मैत्रिणीला 'प्लॅन कॅन्सल' म्हणून.." सोफ्यावर बसत तो सहजपणे म्हणाला..
"हो, करते ना.." मनातून अनया जरा हिरमुसलीच.. शॉपिंगला जायचा मस्त मूड झाला होता, शॉपिंग करायच्या वस्तूही होत्या.. आणि नेमका...!
शोभाला काहीबाही थापा मारून तिने मनिषकडे लक्ष वळवले..

मनिष सोफ्यावर मान ठेवून निवांतपणे डोळे मिटून बसला होता.. त्याच्या शेजारी जाऊन तीही बसली. त्याच्याकडे नुसतं पाहूनच गेल्या तीन आठवड्यातले मनातले सर्व विचार भुर्रकन उडून गेले, मनाशी घेतलेला निर्णय डळमळीत व्हायला लागला. प्रेमानी त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवत तिने विचारलं,
"दमलास?"
"अं? हो गं.. काय टूरींग केलंय गेले दहा दिवस.. उदयपूर, जयपूर, आग्रा.. कंटाळा आला.. आज एक दिवस लवकर संपवलं आणि चक्क पळून आलोय तुझ्याकडे.." हसत हसत तो म्हणाला.. तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला, "खूप खूप दमलोय अनु.. हे दोन दिवस खूप रीलॅक्स करायचंय मला.. आणि तूही उगाच तुझी काही कामं काढायची नाहीस आणि उगाच किचनमधेही वेळ घालवायचा नाहीस, ओके? अंऽऽऽऽ फक्त तुझ्या हातचे दडपे पोहे, सोड्याची आमटी, फिश फ्राय आणि सोलकढी आणि भजी कर.. झालंच तर, म्हणजे बघ हं, वेळ मिळाला तर त्या सायीच्या वड्या पण कर ना.. कसल्या विरघळतात त्या जीभेवर.."
अनयाला ऐकता ऐकता हसूच आलं, "हंऽऽ चालेल.. कालच द्रौपदीची थाळी घेऊन आले आहे. त्यावर पदार्थाचं नाव लिहिलं की पदार्थ समोर हजर.. अजिबात स्वयंपाकघरात वेळ जात नाही, कसलं मस्त ना?"
"अं?" आपल्या बोलण्यातला विरोधाभास आणि तिचा शेरा समजून मनिषही हसला..

पुष्कळश्या साचलेल्या गप्पा ती स्वयंपाक करताना आणि जेवताना झाल्या, तरी पण अनयाचं मन शांत नव्हतं. मनिष नसताना सर्व बाजूंचा विचार करून घेतलेला निर्णय तो समोर आला की चुकीचा वाटत होता.. किती अवलंबून होते ते एकमेकांवर.. मनाची जी तडफड चालू असायची ती त्याला भेटलं की कुठल्याकुठे पळून जायची.. पण त्यासाठी तो निवांतपणे भेटायला हवा असायचा आणि तेच तर अवघड होतं.. तिला पहिजे तेव्हा तो नसायचाच.. त्याला वेळ होईल तेव्हाच ते एकत्र.. या नात्यात तिला कितीसा ’से’ होता? वर्षापूर्वी अपेंडीक्सचं ऑपेरेशन अचानक उद्भवलं.. वेदनांनी कासावीस झाली होती ती.. तेव्हा तो मुंबईत असूनही येऊ शकला नव्हता.. नंतर कितीही मनापासून शुश्रुशा त्याने केली असली, तरी ’त्या’ वेळी ती एकटीच होती ना? हे आणि असे अनेक प्रसंग.. विसरणं अवघड व्हायचं..

आणि मनिष जणू एका दुसर्‍या बेटावरच होता. अनयाच्या मनातल्या उलथापालथीची कल्पनाही त्याला नव्हती. तीन आठवड्यानंतर अनया भेटत होती आणि तो त्यातच खुश होता. अधीरपणे त्याने तिला जवळ ओढलं.. अनयाला खरंतर त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, पण मनिष त्या मूडमधे नव्हता.. "अनया! आय हॅव मिस्ड यू अ लॉट.. आत्ता काही बोलू नकोस प्लीज.."
त्याच्याबरोबर तीही सुखात नाहून गेली, पण मनातले प्रश्न तसेच मनात घिरट्या घालत होते..
नंतर अनयाला झोपच आली नाही..

तिला तिचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवला.. अनुसूया पाटीलची अनया कामथे.. कुमारिका ते सौभाग्यवती ते विधवा.. सारा काही सहा महिन्याचा खेळ! आठ माणसांच्या कुटुंबातली होती ती एकेकाळी, अविनाशच्या अपघाती मृत्यूनंतर एका क्षणात अगदी एकटी पडली.. माहेर आणि सासर- सगळ्यांनीच जबाबदारी झटकली- आईवडीलांनी गरिबी म्हणून आणि सासू-सासर्‍यांनी ’पांढर्‍या पायाची म्हणून’! साध्या टॅली ओपेरेटर पासून एका चांगल्या फायनॅन्शीयल कंपनीच्या ओरॅकल सपोर्टची प्रमुख झाली होती ती केवळ सहा वर्षात- तिच्या जिद्दी स्वभावामुळे, नशीबाच्या साथीमुळे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शक भेटल्यामुळे! अनयाला अचानक तिचं ते गावाकडचं, मुंबईला घाबरलेलं बुजलेलं रूप आठवलं.. आत्ता स्वत:च्याच आधुनिक रूपाकडे बघताना तिला दोन्हीतली तफावत जाणवली आणि एकदम हसूच आलं! काय काय अनुभव आले नाहीत या सहा-सात वर्षात.. नाती अशी हा हा म्हणता बदलताना पाहिली.. पुरुषांचे तर एकएक अनुभव आठवले तरी किळस वाटे.. ’खरंच, मनिष आयुष्यात आला नसता तर किती रखरखीत आयुष्यं झालं असतं आपलं!’ तिने प्रेमभरानी मनिषकडे पाहिलं- तो अजूनही गाढ झोपेतच होता..

मनिषचं व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक होतं. एच.आर मधे अगदी शोभायचा तो. उंच, गोरा मनीष आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वानी आणि वक्तृत्वानी समोरच्याला जिंकून घ्यायचा. ती आणि तो प्रथम त्यांच्या कंपनीच्या पगाराचं पॅकेज आणि ओरॅकल सिस्टीम या संदर्भात चर्चा करायला भेटले.. आणि मग एकमेकांची कशी भुरळ पडली, समजलंच नाही! ती आणि मनिष आता जवळपास साडेतीन-चार वर्ष तरी रहात होते की एकत्र..

’एकत्र?’ अनयाच्याच मनानी प्रश्न विचारला..
’हो, एकत्रच की.. त्याला वेळच नसतो, त्याला काय करणार? वेळ मिळाला की येतोच तो इकडे..’ मनाची समजूत घालणं पुन्हा सुरू झालं आणि पुन्हा अनयासमोर एकामागोमाग एक प्रश्न उभे रहायला लागले.. त्याला एकच उत्तर दिसत होतं तिला, कुठेतरी ते पटतही होतं, पण ते मनिषसमोर ते सगळंच कसं मांडायचं हे समजत नव्हतं..

तिने एक सुस्कारा टाकला आणि मनिषच्या अंगावर हात टाकून पुन्हा झोपी गेली.

"आज उठायचा बेत आहे की नाही?"
मनिषचा आवाज येत होता.. अनया ताडकन उठून बसली.. साडेआठ वाजले तरी तिला जाग आली नव्हती.. हे असं कधीच व्हायचं नाही खरंतर.. ती लगबगीनी उठायला लागली,
"बापरे, काय उशीर.. काल बराच वेळ जागी होते.. आणि नंतर जी झोप लागली.."
मनिष प्रेमानी म्हणाला, "असूदे गं, चालतं एखाददिवस.. ये, मी मस्तपैकी चहा केलाय.."
चहा बरोबर सँडविचही तयार होतं! अनया एकदम खुश झाली, मनिष खूपच फ्रेश दिसत होता.
"ह्म्म.. आज काय प्लॅन? ए, सिनेमा बघूया?"
"सिनेमा?" मनिषचा सावध प्रश्न आला, आणि अनया गप्प झाली.
ते पाहून मनिष म्हणाला, "चेहरा ठीक कर अनु.. तुला माहित आहेत ना आपले constraints... सिनेमा अवघड पडतो गं, हॉटेलिंग म्हणलीस तर चालेल, .."
"हो ना? मग जाऊया चौपाटीवर भेळ खायला? आणि बग्गीत बसायला?" अनयानी उपहासानी विचारलं.
मनिषच्या चेहर्‍यावर हताश भाव आले..
"why are you being so difficult? मागच्यावेळी चौधरीनी काय तमाशा केला तुला माहित आहे.. ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले माझ्या.. आणि चौपाटी म्हणजे हॉटेलिंग का? मस्त फाईव्ह स्टार मधे जाऊ, किंवा नवीन नवीन चकाचक पब्ज आहेत.. ते सोडून चौपाटी कसली?"
गंभीर होत अनया म्हणाली, "त्यातही एक सुख असतं रे.. पण जाऊदे, ते सुख तुझ्या आणि माझ्यासाठी नाही.. सॉरी, मी उगाच बोलले.." पटकन सावरून घेत ती म्हणाली, "सीडी आण ना कोणतीतरी, नाटकाच्या पण मिळतात हल्ली..जेवायला काय करू? उद्या मासे करीन, आज काहीतरी साधंच करते, चालेल ना?" तिने गाडी मूळ पदावर आणायचा प्रयत्न केला, पण मूड थोडा बिघडलाच.. काल मनात गाडलेल्या असंख्य गोष्टी पुन्हा मान वर करायला लागल्या.

त्यांची आवराआवर, थोड्या गप्पा चालूच होतं, इतक्यात मनिषचा मोबाईल वाजला.. तसा तो नेहेमीच वाजत असे म्हणून अनयानी विषेश लक्ष दिले नाही. पण नंबर पाहिल्यावर मनिष एकदम सावध झाला..
"हां बोल.. काय? कधी?" अनयाला एकच बाजू ऐकायला येत होती, त्यामुळे तिला कळलं नाही, नक्की कोण बोलतंय, पण मनिष गंभीर झाला, थोडा घाबरल्यासारखाही वाटला. ती हातातलं काम सोडून त्याच्याजवळ आली.
"हो, मी येतोय, निघतोय लगेच.." म्हणत त्याने कॉल संपवला.. तो प्रचंड अस्वस्थ दिसत होता.
"काय रे? कोणाचा फोन?"
"ज्योतीचा फोन होता.. सोनियाला हॉस्पिटलमधे ऍडमिट केलंय.. काल पडलीये बागेत खेळताना, पायाला फ्रॅक्चर आहे, मुका मारही बराच आहे.. श्या! इतकी धडपडी आहे ना.. अजून कुठे कुठे लागलं असेल.. ज्योती नीट सांगत एक नाही.. आता तिला बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही.. काय करू? मी जाऊ का लगेच? जातोच.. तासात पोचीन मी.." मनिषची तगमग होत होती..
अनयाला पटकन म्हणून गेली, "नाही, मनिष, तुला लगेच नाही निघता येणार.. तू अजून जयपूरमधेच आहेस लौकिक अर्थी.. "
मनिषनी तिच्याकडे नुसतं बघितलं आणि एक सुस्कारा टाकला.. त्याने हातामधे डोकं खुपसलं आणि खुर्चीत धप्पकन बसला. अनया त्याच्या शेजारी बसली, "काळजी करू नकोस जास्त. वाटेल तिला बरं.."
"अगं, पण साधं फ्रॅक्चर असेल तर ऍडमिट नाही करून घेत, नक्कीच काहीतरी जास्त असणार.. काल संध्याकाळी झालंय हे आणि हिने मला आत्ता कळवलं.. काल हे सगळं झाल्या झाल्याच कळवलं असतं तर मी सरळ घरीच गेलो असतो ना? इथे कशाला आलो असतो? जस्ट इमॅजिन.. काल मी इथे तुझ्या मिठीत होतो तेव्हा तिकडे माझी लेक बिचारी कळवळत होती.." काळजी, अस्वस्थता, चिडचिड, राग.. सगळं काही मनिषच्या बोलण्यातून जाणवत होतं..

अनयाला ऐकून धक्का बसला! बाकी सगळं ती समजू शकत होती.. पण गिल्ट? इथे आल्याचा पश्चात्ताप तर होत नव्हता मनिषला? अनवधानानी मनातलं तर बोलून गेला नव्हता ना तो? आता तिच्या मनाचा निश्चय झाला.. अनायसे विषयाला वाचा फुटली होती..
"मग तू पुन्हा फोन कर ना ज्योतीला.. नीट विचारून घे सगळं, म्हणजे तुला थोडं बरं वाटेल.." स्वत:वर ताबा मिळवत शांतपणे ती त्याला म्हणाली.
"ह्या! ती व्यवस्थित काही सांगत नाही गं, स्वत:च जाम गोंधळलेली असते.."
"अरे, मग अश्यावेळी तूच तिला समजावयला नको का? धीर द्यायला नको का? बोल तिच्याशी, बरं वाटेल तिलाही आणि तुलाही.." त्याला समजावत ती आत गेली.. तिच्या स्वत:च्या मनाला समजावायला..

बाहेरून मनिषच्या बोलण्याचे आवाज येत होते, आणि अनया स्वत:च्याच विचारात गढली होती.. इतक्यात मनिषही आत आला.. त्याच्या चेहर्‍यावरचा ताण बराच हलका झाला होता..

"you were right! काल संध्याकाळी सोनियाला घेऊन डॉक्टरकडे ज्योती गेली तेव्हा मुख्य डॉक्टर नव्हते, त्यांच्या ज्युनिअरनी प्लास्टर घातलं.. म्हणून ते बघेपर्यंत ठेवून घेतलंय.. nothing serious, thank God! आज संध्याकाळी सोडणारेत.. मी गेलो की.." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवले, "thanks! अनया. नेहेमीप्रमाणे घरचा इश्यू झाला की मी पॅनिक होतो आणि तू मला बरोब्बर सावरतेस. आता मनावरचं ओझं थोडं कमी झालं. thanks so much!" तिला जवळ ओढत तो म्हणाला.

स्वत:ला त्याच्या मिठीतून सोडवून घेत ती म्हणाली, "जरा आपण बसून बोलूया.. तुला मला काहीतरी सांगायचंय.."

तिचा गंभीर आवाज ऐकून तो थबकला. पण काही न बोलता तिच्या मागोमाग बाहेर गेला..
"मनिष, गेले अनेक दिवस मी विचार करत आहे याबद्दल. तुझ्याशी कसं बोलावं हेच समजत नव्हतं, पण आत्ता जे काही झालं, त्यानंतर म्हणलं बोलूनच टाकावं.."
"काय, कशाबद्दल म्हणत्येस?" मनिष गोंधळला, त्याला काहीच समजेना.
मोठ्ठा श्वास भरून घेत अनया म्हणाली, "मला असं वाटतं की आपण या आपल्या नात्याला पूर्णविराम द्यावा आता."
मनिषवर बाँम्बच पडला. त्याने अनयाचा हात घट्ट पकडला, "काय? का?"
मनाचा हिय्या करून अनया म्हणाली, "हो. पूर्ण विचाराअंती बोलतीये मी हे. आपण थांबूया आता. "
"अगं पण का? आणि ही अशी अचानक सगळं संपवण्याचीच भाषा? काय झालंय तरी काय?"
"हे मला सांगायला फार काही आनंद होत नाहीये मनिष. तुला माहीत नाही, या निर्णयापर्यंत यायला मला कशाकशातून जावं लागलंय ते. मी पूर्णपणे एकटी होते जेव्हा आपण भेटलो.. नुकती कुठे स्थिरावत होते. अवि गेल्यानंतर मला अक्षरश: वार्‍यावर टाकलं सगळ्यांनी. तेव्हा सतत तेच डोक्यात असायचं- स्वत:च्या पायावर उभं रहायचंय, स्वतंत्र व्हायचंय, कोणावरही कशासाठीही आपण अवलंबून असता कामा नये.. आणि मी तशी होतही होते.. त्या भरात एककल्ली, माणूसघाणीही.. मीही एक स्त्री आहे, मलाही प्रेमाची, आधाराची गरज आहे हे तर विसरलेच होते. आजूबाजूच्या पुरुषांच्या नजरा, त्यांचे किळसवाणे हेतूच दिसायचे फक्त.. आणि देवानी अक्षरश: तुला पाठवले माझ्याकडे.. मनिष, माझ्यातल्या स्त्रीला तू जागृत केलंस, प्रेम करणं, करवून घेणं यातलं सुख तू मला दाखवलंस.. तू माझं आयुष्य किती समृद्ध केलंयेस, याची तुला कल्पनाच नाहीये.." बोलता बोलता अनयाला भरून आलं.

मनिषनी तिला जवळ घेतलं, "हे मला माहीत नाहीये का? तूही माझा आधार आहेस अनु. ज्योती, सोनिया असल्या तरी मला तुझी त्यांच्यापेक्षाही जास्त गरज आहे.. तुला माहीत्ये ना? मग का हे सगळं आत्ताच बोलत आहेस?"

ज्योतीचा उल्लेख आल्यानंतर अनया भानावर आली. नाही, असं भावनावश होऊन चालणार नव्हतं. तिने डोळे पुसले.

"पण हे किती दिवस चालणार आहे? तुला एक संसार आहे, तुझ्यावर, तुझ्या वेळेवर त्यांचा हक्क आहे मनिष. आणि त्याचवेळी मलाही तुझी गरज आहे, हे ही तितकंच सत्य आहे. पण माझा तुझ्यावर काय हक्क आहे? काहीच नाही! मी तुला मोकळेपणी कधीही फोन नाही करू शकत, आपण उघडपणे हिंडू-फिरू शकत नाही कुठेही.. फाईव्ह स्टार होटेल्स आपल्यासाठी आहेत, कारण तिथे कोणी बघितलंच तर तू सांगू शकतोस की क्लायंट बरोबर होतो.. पण रस्त्यावरचं शॉपिंग, चौपाटीवरचे गोलगप्पे आपल्यासाठी नाहीत- कारण तू एक्स्प्लेन कसं करू शकशील? कोण होती ही बाई? तेच सिनेमाबद्दल.. माझा वाढदिवस आपण पहिल्यांदा कसा साजरा केला आठवतंय? माझ्या वाढदिवसाचं कौतुक कोणीच कधीच केलं नाही, पण त्या वर्षी तू मला जवळजवळ स्वर्ग दोन बोटं उरतील असं कोडकौतुक केलंस.. मनाला आशा लागून रहाते रे! त्यानंतर सलग तीन वर्ष पुन्हा अंधारच! तू उघडपणे नाही येऊ शकलास. बरं, माझा सोड.. पण तुझा वाढदिवस तरी मी माझ्या मनाप्रमाणे एकदाही साजरा नाही करू शकले.. कारण तो दिवस तुझ्या कुटुंबाचा!! या फार क्षुल्लक गोष्टी आहेत, पण मनाला लागून राहतात रे.. बाईचं मन फार विचित्र असतं.. मला तू मिळाला आहेस, पण मला तुला मिरवायचंही आहे.. मला जगाला दाखवायचं आहे की हा मनिष आहे, याच्यावर मी प्रेम करते, हाही माझ्यावर करतो निस्सीम प्रेम. पण! आपल्या नात्यात हे कधीच शक्य होणार नाही. या अश्या लुटूपुटूच्या थोडक्या भेटी, सावध वागणं हे नाही मला सहन होत.. आणि तुझीही फार ओढाताण होते हे दिसतंय मला.. तू पूर्णपणे माझा कधी नव्हतासच, पण तू त्यांनाही त्यांच्या हक्काचा वेळ देऊ शकत नाहीयेस माझ्यामुळे.. " अनयाला पुन्हा रडू यायला लागलं.

मनिष काहीच बोलू शकला नाही यावर. ती बोलत होती ती प्रत्येक गोष्ट खरी होती. तो हे नातं उघड करू शकत नव्हता. त्याच्यात इतके गट्स नव्हते की ज्योतीसमोर अनयाला तो ऍक्सेप्ट करू शकेल. फक्त ज्योतीच नाही, तर सोनिया होती, त्याचे-तिचे आईवडील, नातेवाईक होते, आज त्याची कॉर्पोरेट जगातही एक छाप होती.. अनयाबरोबरचं नातं उघड करणं म्हणजे या सगळ्यालाच सुरुंग लावणं, आणि ते करण्याचं धैर्य त्याच्याकडे नव्हतं. पण अनयामधे तो इतका गुंतला होता की हे सगळं माहीत असूनही तिच्यापसून लांब रहाणं शक्य होत नव्हतं. अनयाच्या बुद्धिमत्तेचं त्याला कौतुक होतं, तिच्या जिद्दीपुढे तो नतमस्तक होता.. ती अक्षरश: ’सेल्फ-मेड’ होती.. कोणावरही अवलंबून नसलेली, स्वत:ची जागा केवळ स्वत:च्या हिंमतीवर मिळवलेली, आणि त्याचबरोबर प्रचंड हळवी, त्याचा भक्कम आधार असलेली, त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारी! तिच्यासाठी काय करू आणि काय नको असं व्हायचं त्याला..

पण!

शेवटी सत्य हेच होतं की त्यांचं नातं चोरटं होतं. ते उघड करायची गरज त्याला वाटत नव्हती, हिंमत आणि इच्छा तर मुळीच नव्हती. पण जे चालू होतं ते व्यवस्थित होतं की! कशाला अनया यावर बोलत होती आत्ता? तो पुन्हा चुळबुळायला लागला.

"म्हणूनच म्हणते की ही ओढाताण संपवूया आता." अनया पुढे म्हणाली.

"म्हणजे? म्हणजे काय? मी तुझ्याकडे आता येऊ नको का? कधीच नको? का गं? कसलं माझं ओझं होतंय तुला? कधीतरी एक वीकेंड मी मागतो तुझा.."

"हा एखादाच वीकेंड तर नकोय ना मला मनिष! तुला समजत नाहीये का? मला तुला रोज भेटायचंय, मला तुझ्याबरोबर रहायचंय, मला तुझ्याबरोबर एकत्र रहायचंय. बोल? जमेल आपल्याला?"

मनिष गप्प झाला.

"नाही ना जमणार? घरून एक फोन आला की तू अस्वस्थ होतोस, सारासार विचार करायची ताकद गमावतोस.. इतका टची आहेस तू त्यांच्याबाबतीत. मग काय अर्थ आहे आपल्या या भेटण्याला? या नात्याला? इतके वर्ष मला हे समजत नव्हतं असं नाही, पण मला ते सुख हवं होतं रे तेव्हा. पण आता नाही. मला माझ्या वाट्याचं सुख मिळालं आहे, खूप खूप दिलं आहेस तू मला. आता पुरे. मला तुला हेच सांगायचं होतं. ना धड तू माझा आहेस ना ज्योतीचा आणि सोनियाचा. तुला कोणा एकाची निवड करावी लागेल. but I don't want to make things difficult for you either. तुला धर्मसंकटात नाही घालत मी. मी माझ्या मनाला समजावीन. मी रहायला शिकेन पुन्हा एकटी.. अरे सवयीचा भाग असतो, होईल मला पुन्हा सवय." ती खेदानी त्याला आणि पुष्कळसं स्वत:लाच समजावत म्हणाली. तिने एक मोठ्ठा श्वास घेतला. "ही आपली शेवटची भेट आहे. दोन आठवड्यांनी मी बंगलोरला जात आहे, खरंतर मीच मागून घेतलीये ही ट्रान्स्फर. नवीन सेट अप आहे तिकडे. सिस्टीम्स सेट होतील आणि मीही. कुमार आहे तिकडे इन-चार्ज.. मागच्या वर्षी तो इकडे होता काही महिने तेव्हा माझा चांगला मित्र झालाय तो. He will take good care of me. काही मैत्रिणीही आहेत, त्यांच्याकडे रहाण्याची सोय होईल.. खरंतर मी तिकडचा फार विचार नाही केलेला. होईल सगळं आपोआप. केलं की होतं सगळं, माहित आहे मला. मी आता इथून जाणारे हे मात्र नक्की."

"म्हणजे सगळं संपलंच अनया?" हरलेल्या आवाजात मनीषनी विचारलं.

"हो,आपल्याकडे मार्गच नाहीये दुसरा. हा ताण नाही होत आता सहन. मी फार अपुरी आहे मनिष तुझ्याशिवाय. पण हे अर्धंमुर्धं अपुरेपण तरी पूर्णपणे अनुभवू दे मला. मी इथे नसेनच तर आपल्या भेटीही संपतील. हे नातंही अर्धवट रहाणार नाही, संपेलच. संपवूच आपण." अनया डोळे पुसत निर्णायक स्वरात म्हणाली.

या वेळी नशीबानी नाही, तर तिनी स्वत:साठी एक नवीन मार्ग निवडला होता. त्याच्यावर चालायची तिला तयारी करायची होती..

गुलमोहर: 

मास्तुरे, तुमच्या टिकेला नक्कीच वैयक्तिक आकसाचा वास येतोय. तुम्हाला काय आवडावं आणि काय नाही , तुम्ही कुणाला प्रतिसाद द्यावा आणि कुणाला नाही हा तुमचा प्रश्न. पण तुम्ही कसा प्रतिसाद देताय हा नक्कीच आमचा पण प्रश्न होतोय बरं.
मला इथे लक्ष घालावं लागतंय इतकं सांगणं तुम्हाला पुरे ठरावं.

पूनम, हि अशी नाती असतात. ती अशीच निभावलीही जातात. मला आवडली कथा.

कथा छान जमलीये. आवडली मला. शारिरीक सम्बन्धा व्यतिरिक्त एक खुप छान नात डेव्हलप होवु शकते. बायको सन्साराच्या जबाबदारया मध्ये इतकी गुरफटते आणि मुले झाली की ती नवर्याचि पन आई होते. अशावेळी मानसिक पातळीवर गुन्तवनुक होवुन मैत्रिचे एक अनोखे नाते फुलते. सखी म्हनतात ती हिच. खुप गोश्टी तिच्याबरोबर शेअर करता येतात.

पण कथा लेखिकेने असे कुठे म्हणट्लय की there is no factor of physical attraction at all ,rather मनिषचं व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक होतं,एच.आर मधे अगदी शोभायचा तो. उंच, गोरा मनीष आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वानी इ.इ. वाक्यानी अधोरेखित होत आहे की कुठेतरी शारिरीक आकर्षणाचा भागही आहेच.
अर्थात लेखिकाच काय ते स्पष्ट करु शकेल.

दाद ला मोदक्...कथेची मांडणि छान जमलिय, (इतकि कि कथेतल्या पात्राला खर समजुन त्यातल्या सहज संवादावर मतभेद व्हावेत..smiley2.gif (दिवे घ्या..)

प्रतिक्रीया आधी वाचून घेतल्या. नीरजाच्या प्रतिक्रीयेला दाद द्यावीशी वाटते. यात सगळं आलं

पूनम कथा आवडली. कुमारच्या उल्लेखात मला तरी काही इश्यू दिसत नाहीये. तो तिथे इनचार्ज आहे आणि माझा मित्र आहे हा अगदीच स्वाभाविक उल्लेख आहे. अनोळख्या ठीकाणी जाताना comfort factor आपण लिस्ट करतो स्वत:साठी तसा.

माझं ट्युलिपला अनुमोदन Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

कथा छान आहे.
केवळ वेगळा विषय ही कथेच्या चांगल्या किंवा वाइट असण्याची कसोटी असू शकत नाही.

निसर्गातील सातत्य टिकावे म्हणून निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यात आकर्षण निर्माण केले. हे आकर्षण इतके प्रभावी आहे की याने मानवी मनाचा व व्यवहाराचा अधिकांश भाग व्यापून टाकला आहे. त्यामुळेच शृंगाररस हा ललित वा़ङमयाचा प्रमुख रस आहे. बॉय मीटस गर्ल हा विषय शतकानुशतके वाङमयाला पुरला आहे. तरीही त्यात वेगळेपण असतं. अधिकउण असतं. आकर्षण हे नैसर्गिक तर बाकीचे भेद हे मानवनिर्मित आहेत. ते भेद कथेला वेगळेपण देतात.
तर शब्द, मांडणी हे लेखकाचं कसब कलाकृतीची गुणवत्ता ठरविते्

वैवाहिक व विवाहबाह्य हाही असाच मानवनिर्मित भेद आहे. चारुदत्त वसंतसेनेच्या मृच्छकटिकापासून वैवाहिक संबंध हे
दीर्घकाल कायम राहतात अशीच मांडणी केली जाते. ते बहुतांश वेळेस सत्यही असते. याला कारण समाजजीवन असते.

दुसर्‍याच्या शारिरीक व मानसिक आधाराची, सोबतीची गरज वाटणे याला खंबीर असणं किंवा नसणं हा निकष नाही. नाहीतर खंबीर स्त्री पुरुषांनी लग्नच केली नसती. किंवा विवाहित स्त्री पुरुष खंबीर नसतात असे विधान करावे लागेल. एखाद नवीन नातं जोडणं किंवा तोडणं हा निर्णय घेताना त्या व्यक्तीची मानसिकता कशी आहे यावर ती व्यक्ती त्या वेळी खंबीर आहे किंवा नाही यावर मत व्यक्त होतं.

आधीच्या सहचरीच्या वियोगानंतर पुरुषांनी अन्य स्त्रीशी नात जोडणं हे जितकं नैसर्गिक तितकेच स्त्रीने दुसरे नाते जोडणे हे ही नैसर्गिक आहे. ते न जोडता तिने तसेच राहणे म्हणजे खंबीरपणा, हे पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेतून आलेले विधान आहे.

पूनम, कथा वाचली.

    आधीच्या सहचरीच्या वियोगानंतर पुरुषांनी अन्य स्त्रीशी नात जोडणं हे जितकं नैसर्गिक तितकेच स्त्रीने दुसरे नाते जोडणे हे ही नैसर्गिक आहे. ते न जोडता तिने तसेच राहणे म्हणजे खंबीरपणा, हे पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेतून आलेले विधान आहे. <<<

      हे मीनाजींचं वाक्य तंतोतंत पटतं.

        पण कथा वाचल्यावर काही प्रश्न पडले. वैवाहिक आणि विवाहबाह्य हा भेद मानवनिर्मित का असेना, त्याला काहीच अर्थ नाही का? पहिल्या जोडीदाराच्या वियोगानंतर दुसरे नाते जुळताना (नैसर्गिकरित्या जुळताना किंवा प्रयत्नपूर्वक जुळवताना) वैवाहिक / विवाहबाह्य याचे भान स्त्री आणि पुरुष दोघांनी ठेवणे चूक आहे का? या कथेच्या संदर्भात बोलायचे झाले, तर मनीषची पत्नी, मुलगी आणि कुटुंबीय यांच्या दृष्टीने अनया आणि मनीष यांचे संबंध हा (अनयाला मग कितीही आधाराची गरज असली तरी) व्यभिचारच नाही का? की या दुसर्‍या नैसर्गिक नात्यापुढे विवाहबंधनातून निर्माण झालेल्या नात्याला काहीच महत्त्व नाही?

          अनयातील खंबीरतेबरोबरच तिच्यातील विचारशीलतेला, मनीषशी हे नातं जुळत असतानाच 'हे चूक आहे किंवा हा आपला मार्ग नाही' याची जाणीव झाली असती - जी व्हायला साडेतीन-चार वर्षे लागली - तर बरे झाले असते असे वाटत राहते. यात मनीषचा सहभाग हा तितकाच चुकीचा वाटतो.

            बेडेकर म. प्रतिक्रिया अगदीच आवडली.

            मला वाटतं इथे आपण खूपच तार्किकदृष्ट्या योग्य अयोग्य याचा विचार करतो आहोत. प्रत्यक्षात या परीस्थितीतून जाणारी व्यक्ती खूप हळवी झाली असते व भावनिकदृष्ट्या विचार करते. तसेच इतरही काही मुद्दे विचार करण्यासारखे असू शकतात. कुणाशी आपली वेव्हलेंथ जुळावी हे त्या व्यक्तीचं लग्न झालं आहे की नाही यावरुन ठरत नाही. कुणाबद्दल आकर्षण वाटावं त्याचंही असंच आहे. असं वाटल्यावर काही लोक जे खंबीर असतात ते हे आकर्षण रोखू शकतील काही लोकांना ते शक्य होणार नाही. रोखता न येणं म्हणजे अयोग्य असं ठाम पणे म्हणता येईल असं मला वाटत नाही. अशा गोष्टी घडतात घडत राहणार. यावर जर का असा काही तोडगा असता जेणेकरुन जे सामाजिक दृष्ट्या व्यभिचार ठरवलं जाईल तसं वाटणारंच नाही. तर मग ते कधीच आपण आपल्या समाजात वापरुन हा व्यभिचारी विचारांचा रस्ता बंद नसता का केला? तर तसं करणं कोणालाही शक्य होत नाही हे मान्य करायला हवं. मग प्रत्येक जण ज्याच्यात्याच्या कुवतीप्रमाणे परीस्थितीप्रमाणे त्यावेळी वागेल.

            मला एक कळत नाहीये कथेमधल्या निर्णयांना इतकं घासून बघायची काय गरज आहे? व्यक्तिरेखा मानवीच आहेत. कुठे बरोबर असणार तर कुठे चुका करणारच ना. तर एक अमुक व्यक्ती होती तिचं असं असं झालं असं सरळसोट आपण का नाही वाचू शकत. आता ज्याला ते बरोबर वाटेल त्याने तसं वागावं ज्याला नाही वाटणार त्याने वागू नये. संपलं. पण गोष्टीत ते सगळं असणारंच ना. नुसत्या उदात्त उदात्त व्यक्तिरेखा असून कसं चालेल?
            -नी
            http://saaneedhapa.googlepages.com/home

            अनयातील खंबीरतेबरोबरच तिच्यातील विचारशीलतेला, मनीषशी हे नातं जुळत असतानाच 'हे चूक आहे किंवा हा आपला मार्ग नाही' याची जाणीव झाली असती - जी व्हायला साडेतीन-चार वर्षे लागली - तर बरे झाले असते असे वाटत राहते. यात मनीषचा सहभाग हा तितकाच चुकीचा वाटतो.

            >>>>
            गजानन, या अशा नात्याचा दोन तर्हेने विचार करता येतो. अनयाने कदाचित नातं जुळत असल्यापासून "आता हे शेवटचं" हा विचार केलेला असू शकतो. किंवा, मला आता हवे असलेला सुख किंवा आधार मिळतोय मग नंतरचं नंतर बघू हा विचार केलेला असू शकतो.
            मनीष हा शेवटी एक पुरुष आहे. समाजाला तो धुडकावून लावत नाहिये. घर किंवा संसार सोडण्याचा विचार पण तो करू शकत नाही. तरीही त्याला बाहेर कुठेतरी असलेले हे Love Nest हवे आहे. अनया त्याला मानसिक आधाराची किंवा भावनिक आधारासाठी नकोच आहे. आणि जे स्वतःहून मिळतेय त्यात त्याला बरोबर काय आणि चूक काय???

            अनया खंबीर आहे की नाही हा वेगळा मुद्दा. मात्र ती स्वतंत्र जरूर आहे. ती मनिषला आपल्या जीवनात येऊ देते आणि तशीच विचार करून घालवून पण देते.
            "इतके वर्ष मला हे समजत नव्हतं असं नाही, पण मला ते सुख हवं होतं रे तेव्हा. पण आता नाही. मला माझ्या वाट्याचं सुख मिळालं आहे,"

            म्हणजे स्वतःला काय पाहिजे आणि काय नाही ते तिला बरोबर ठाऊक आहे. व्यभिचार वगैरे चा ती विचारपण करत नाही. किंबहुना मनिषच्या बायकोचा विचार दोघेही करताना दिसत नाही.

            विवाह बंधन नितिमत्ता वगैरे गोष्टीचा विचार तिसर्‍या व्यक्ती जास्त करतात. नात्यामधल्या त्या दोन व्यक्ती मात्र आपापले स्वार्थ जास्त बघत असतात, हे माझे निरिक्षण आहे. (जे चुकीचे पण असू शकते)... शेवटी समाजामुळे व्यक्ती घडते की व्यक्तीमुळे समाज... हा प्रश्न परत येऊन ठाकतोच.

            तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे..
            प्रतिसादातून एका नव्या संवादाचा उदय होतोय, हे ही नसे थोडके Happy
            मीनाताई, you said it! फार आवडलं तुमचं विश्लेषण.
            .
            जीडी, मीनु म्हणते तसं, हा खूप तार्किक विचार आहे, सामाजिकदृष्ट्या बरोबरही. पण काही काही वेळा सर्वच जागी तर्क घासून पाहता येत नाहीत.. प्रत्येक व्यक्तिची मानसिकता वेगळी, त्यामुळे परिस्थिती जशी आहे त्याप्रमाणे वागायची पद्धतही हरेक व्यक्तिगणिक बदलते.
            फक्त कथेबद्दल विचार केला, तर अनया मनिष भेटण्यापूर्वी पूर्ण एकाकी झाली आहे, आणि मनिषमधे तिला सर्वच प्रकारचा- शारिरीक, मानसिक आणि भावनिक आधार मिळतो. आणि तो त्या क्षणी, त्या परिस्थितीमधे तिला हवा असतो. ती गुंतते, तोही. आणि म्हणूनच त्यांचं नातं डेव्हलप होतं. पण कालांतरानी अनया त्यातलं चूक-बरोबर शोधू शकते आणि त्यातून मार्गही शोधून काढते. कदाचित ती पळवाटही असेल, कदाचित योग्यही असेल.. ते प्रत्येकाला वेगवेगळं वाटू शकेल. यात परिस्थितीप्रमाणे ती बरोबरच होती असं मी म्हणेन.. कोणाला असं वाटेल की 'तो विवाहित असतांना त्याच्यामधे ती गुंतलीच कशी?' हेही बरोबर आहे.. पण शेवटी गुंतणं आहेच Happy त्यातून मार्ग काढणं महत्त्वाचं! Happy
            .
            आणि अज्जुकालाही अनुमोदन. ही एक साधी कथा आहे. एक प्रसंग आहे, जो मी माझ्या कुवती आणि कल्पनाशक्तिप्रमाणे लिहिला आहे. तुम्ही त्याच्याशी कुठेतरी रीलेट करू शकलात, पाच मिनिटं ती पात्र, तो प्रसंग तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात यात मी भरून पावले. 'याचसाठी केला होता अट्टाहास..' Happy
            लोभ ठेवा..

            अरे रिलेट करता येणं म्हणजे खरोखरीच्या नसलेल्या व्यक्तिरेखा खर्‍या भासणं. आपल्या आजूबाजूच्याच आहेत किंवा असू शकतात अश्या भासणं त्यांच्या चुकांसकट. त्या तश्या भासाव्या यासाठी कुठल्याही लेखकाचा अट्टाहास असतो हो. आणि तसं घडलं तरच वाचकाला आवडते कथा. नाहीतर 'असं कधी असतंय होय!' म्हणायची वेळ येणारे केवढे चित्रपट आपण 'अभ्यासले' आहेत अ आणि अ वर. Happy

            अर्थाचा अनर्थ होतो तो असा...

            -नी
            http://saaneedhapa.googlepages.com/home

            <<<<प्रेम होण, असण या गोष्टी व्याभिचाराच समर्थन नाही करु शकत. >>>>>
            दिव्या, पुर्ण अनुमोदन!
            Happy

            अगदी साध्या सरळ पद्धतिने वर्नन करतेस. मस्तच!
            पण काही गोष्टी,जसे त्या दोघांमधले नेमके नाते,वर्नन करताना सहजता हरवलिये असे वातले... ते जर हळूहळू आणि आपोआप उलगडले असते तर अजून मस्त वाटले असते.

            बापरे! दिव्या, तुला एका मायबोलीकराने अशी काही मेल केली आहे हे वाचून थक्क झाले खरोखर! खरंतर यावर काही पुन्हा लिहून विषय वाढवावा का असा विचार करून गप्प बसले होते, पण एक गोष्ट अगदीच स्पष्ट करायची होती म्हणून लिहिते- माझ्या आत्तापर्यंतच्या सर्वच कथा पूर्णपणे काल्पनिक आहेत. मला मायबोलिवरच काय, तर प्रत्यक्ष जीवनातही असे कोणीच माहित नाहीयेत जे अश्या प्रकारानी रहातात. आणि जरी माहित असले तरी त्यांचा 'वापर' मी माझ्या कथेची पात्र म्हणून नक्कीच करणार नाही. ही बाब खूपच पर्सनल आहे. इतकी पातळी नाही हो गाठलेली की कल्पनाशक्ति साथ देत नाही म्हणून प्रत्यक्ष जीवनातली पात्र वापरा!
            मी दुसरी एक कथा लिहिली होती, जी लिहिताना असा विचार मनात आला होता की असं एखादं नातं निर्माण झालं तर त्यातून त्या स्त्रीला काहीच मार्ग नाही का पुढे? ती स्वतःच्या हिंमतीवर नाही का जगू शकणार? आणि या विचारातूनच ही कथा लिहिली गेली.
            मुद्दाम ओढूनताणून कोणी असा बादरायण संबंध जोडत असेल आणि स्वतःच्या आयुष्याची सांगड या कथेशी घालत असेल तर खरोखर तो आ.बु.दो.स! मी काय बोलणार यावर? Uhoh
            मी जे काही लिहीन ते वाचा, आवडलं तर सांगा, योग्य शब्दात सुधारणा सुचवा, आणि लेखनाचा आनंद घ्या, बस इतकीच अपेक्षा आहे माझी. कित्येक जण तर अनुल्लेखही करतात, तेही चालेल, पण असलं काहीतरी नका करू.. माझ्या कथेचा रेफरन्स देऊन कोणालाही त्रास देऊ नका.

            पुनम,
            कथा आवडली. मांडणी छान आहे.

            बरीच करमणुक पण झाली. Happy

            मला एक कळत नाहीये कथेमधल्या निर्णयांना इतकं घासून बघायची काय गरज आहे? व्यक्तिरेखा मानवीच आहेत. कुठे बरोबर असणार तर कुठे चुका करणारच ना. तर एक अमुक व्यक्ती होती तिचं असं असं झालं असं सरळसोट आपण का नाही वाचू शकत. आता ज्याला ते बरोबर वाटेल त्याने तसं वागावं ज्याला नाही वाटणार त्याने वागू नये. संपलं. पण गोष्टीत ते सगळं असणारंच ना. नुसत्या उदात्त उदात्त व्यक्तिरेखा असून कसं चालेल?
            -नी

            >>> अज्जुका, तुझं हे वाचून मला मी लिहिलेल्या या पोस्टची आठवण झाली! Happy

            कथा आवडली .. थोडासा अवघड विषय खूप सोप्या शब्दात उलगडलायस. घरी सर्व मंगल असताना समीर सारखी लोकं जेव्हा असे करतात तेव्हा ते 'स्वार्थी' ह्या सदरात येते. म्हणून अनया चा मार्ग पटतो. आणि बापरे बाप केवढी ती चर्चा झालीये आधी !!

            मीनु, अज्जुका, नंदिनी, पूनम, चाफा तुमच्या पोस्ट्स वाचल्या. (नातिचरामि वरील चर्चाही मी सुरुवातीपासून वाचली होती.) तुम्ही म्हणता तशी कथेतली सगळी पात्रं ही उदात्त, इतरांनी कसं वागावं यासाठी आदर्श वगैरे असायलाच हवीत असं मला मुळीच म्हणायचं नाही. किंवा ती तशी नाहीत म्हणून पूनमची कथा रद्दड आहे, असंही म्हणायचं नाही. कथा वाचल्यावर माझ्या मनात काय प्रतिक्रिया आली, ती मी नोंदवली. काहींना कथेतल्या पात्रांचे निर्णय पटले, मला पटले नाहीत, इतकंच.

            हं खरंय जी डी. वरती व्यभिचार असा शब्द वापरला आहे जे काही घडलं त्याला. मी मात्र त्याला व्यभिचार नाही म्हणणार. चुक तरी कसं म्हणावं. इथे नुसती शारिरीक गुंतवणुक नसुन भावनिकही आहे. असं आपलं माझं मत, एक घटना म्हणूनंच बघेन मी या सगळ्याकडे, असो.

            पूनम, कथा खूप आवडली.
            .
            बाकी कथेतील प्रसंग / पात्रांची वागणूक यावर 'judgement' देण्याबाबत अज्जुका, चाफा आणि मीनूशी सहमत.
            'चांगलं'/'वाईट' किंवा 'चूक'/'बरोबर' यापेक्षा सत्यासत्य मला जास्त ग्राह्य वाटतं. कथेतल्या मनीषला अनयाबद्दल वाटणारी ओढ, आणि त्याच्या कुटुंबाबाबतची जबाबदारीची जाणीव, हे दोन्ही खरंच आहे. त्याची आणि त्याच्यात झालेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे होणारी अनयाची ओढाताण खरी आहे. ती तशीच्या तशी व्यक्त झाली हे कथेचं यश.
            अनयाचा निर्णयही 'हे चूक आहे, तुझ्या कुटुंबावर अन्याय आहे' अश्या काही तथाकथित 'उदात्त' कारणांतून घेतला गेला असं दाखवलं असतं तर या stageला उलट ते कृत्रिम झालं असतं. ती तुम्हीआम्ही असतो तितकी स्वार्थी जरूर आहे. At the same time ती जाताना कडवट झालेली नाही. 'तू मला मिळत नाहीस तर मी तुझा संसारही सुखाचा होवू देणार नाही' असला काहीही अचाट stand ती घेत नाही. तिचा तो स्वभावच नाही. (पूनमच्या सगळ्याच नायिकांप्रमाणे) इतक्या हळव्या मनःस्थितीतही हा balance ती ठेवू शकते.
            .
            दुसर्‍या बाजूने मनीषच्या 'गट्स्'बद्दल कथेत आणि अभिप्रायांतही comment केलं गेलं आहे. अनया एकटी आहे म्हणून हे भाष्य होवू शकलं का? तिला तिचा संसार, मुलंबाळं असती आणि हे असं नातं त्यांच्यात निर्माण झालं असतं तर हे 'गट्स' ती तरी दाखवू शकली असती का?
            .
            कुमारच्या संदर्भात 'He will take good care of me' इतकं एक वाक्य मलाही नको वाटलं तिथे.
            .
            मला स्वतःला नाट्यमय घटनांपेक्षा ज्या कथांमधली व्यक्तीचित्रणं चांगली जमलेली असतात त्या कथा सहसा आवडतात. प्रत्येक पात्र त्याचा स्वभाव, त्याचे गुणावगुण घेऊन वाचकाला 'भेटणं' महत्त्वाचं. बाकी घटनाक्रम हा (आयुष्यासारखाच) on it's own unfold व्हायला हवा - असं माझं मत. त्या दृष्टीने, पूनम, तुझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कथांमधे ही कथा मला सर्वात जास्त आवडली.
            .
            मीनाताई, तुमचा अभिप्राय आवडला.
            .
            आणखी एक : "शुश्रुषा" असा शब्द आहे माझ्या माहितीनुसार.

            अरे वाह आजतर कथांची मेजवानीच आहे... सुरेख

            व्यभिचार, प्रेम, पाप, पुण्य ह्या पलिकडे जाउन मानवी भावनां विश्वावर आधारलेली कथा वाटली, एका एकट्या स्त्रीच्या संर्घषाची कथा वाटली. मस्त!

            लेखिका म्हणुन कुठेही मत प्रदर्शन नाही. निव्वळ कथा, वाचकाला विचार स्वातंत्र्य देणारी कथा, आवडाली.
            आणि असा विषय मांडला ह्या बद्दल तुझे विषेश अभिनंदन..

            Pages