रिक्षा की शिक्षा?

Submitted by मिल्या on 27 May, 2008 - 00:57

पुण्यातल्या रिक्षा आणि त्यांचे ’थोर’ चालक ह्याविषयी खूप बोलून किंवा लिहून झाले आहे. अगदी माझ्या लहानपणापासून पुणेकर जनता ज्या भक्तीभावाने पालख्यांचे स्वागत करते अगदी तेवढ्याच भक्तीभावाने रिक्षावाल्यांना जोडे आणि ’जोडीने’ ( कोटी अपेक्षित Happy ) शालजोडीतले मारत आली आहे. राजकारण, क्रिकेट आणि खड्डे ह्यांच्याएवढा रिक्षावाला हा आवडीचा विषय नसला तरी पण तो बऱ्यापेकी टीआरपी कायमच बाळगून आहे.

आईनस्टाईनने म्हणले आहे की "When you are courting a nice girl an hour seems like a second. but when you sit on a red-hot cinder a second seems like an hour. That's relativity." (काहीजण असेही म्हणू शकतात - "When you are courting a nice girl an hour seems like a second. but when you are with your wife, a second seems like an hour) मुद्दा असा की प्रत्येक गोष्ट ही सापेक्ष आहे. त्यामुळे गेले दोन-तीन वेळा बंगलोर मधल्या रिक्षावाल्यांचा अनुभव घेतल्यावर जे पुण्यातले रिक्षावाले पूर्वी यमदूत भासायचे ते आता मला देवदूत भासू लागले आहेत.

आ हा हा!!! काय त्यांचा तो बंगलोरी रुबाब! (लखनौवी नबाब च्या चालीवर ) विचारु नका! मळका खाकी ड्रेस, खांद्यावर एखादा तेवढाच कळकट्ट फडका, तोंडात रजनीकांत स्टाईल सिगारेट, कुठल्यातरी अती किळसवाण्या, जाड्या, ढोल्या साऊथ इंडियन हिरो सारखी केसांची झुलपे, जोडीला कर्णकर्कश्श गाणी आणि जणू मर्सिडीजच चालवत आहोत असा चेहयावरती माज. आपण गिऱ्हाईकाला रिक्षात बसवतो म्हणजे त्याने (म्हणजे गिऱ्हाईकाने) गेल्या जन्मी काही पुण्य केले असावे अश्या भावनेनेच ते गिऱ्हाईकाला रिक्षात बसवतात. गिऱ्हाईक बिचारे... बसमध्ये घुसवत नाही आणि रीक मध्ये बसवत नाही अशी त्याची अवस्था असते.

मिटर टाकणे तर बंगलोरमध्ये कायद्याने गुन्हाऽऽ च आहे. आणि मिटर टाक असे सांगण्याऱ्या गिऱ्हाईकाला फाशी दिले जात असावे असा माझा समज आहे. ’मीटर टाको भैया’ (हे माझे हिंदी बरं कां) असे म्हणले की गांगुलीला जर तो कप्तान असताना कुणी सांगितले असते की रनर म्हणून जा जरा... तर त्याने कसे त्या माणसाकडे बघितले असते तसा चेहरा करुन ते आपल्याकडे बघतात... मग आपलाच मिटर डाउन होतो आणि आपण चुपचाप विचारतो कितना लेगा?
ह्यावर रोज तुम्ही जाणारे ठिकाण अगदी तेच असले तरी रोज ह्याचे उत्तर वेगळे असते. मटक्याचा आकडा कसा बदलत असतो तसा हा आकडा रिक्षावाल्यांच्या मर्जीनुसार बदलत असतो. (मला तर ते एखादे random number generator program वापरतात की काय अशी शंका आहे. म्हणजे मिटर ने किती होतील ह्याचा आकडा काढायचा आणि त्याला त्या random no. ने गुणायचे. नक्कीच एकाद्या सॉफ्टवेअर वाल्या गिऱ्हाईकाला मीटर प्रमाणे भाडे घेउन त्या बदल्यात असा प्रोग्रॅम लिहून घेतला असावा.)

पुण्यात रात्री अकरानंतर दिडपट भाडे घेतात. बंगलोरच्या रिक्षावाल्यांना हा भेदभाव मान्यच नाही मुळी. रात्री प्रवास करणाया गिऱ्हाईकावर का उगाच अन्याय म्हणून ते अगदी सकाळी आठ वाजल्यापासूनच दिडपट ते दुप्पट भाडे आकारायला लागतात. दोनच महिन्यात हे त्यांनी माझ्या इतके अंगवळणी पाडले की एकदा एका रिक्षावाल्याने भाड्यापेक्षा फक्त दहा रुपये जास्त घेतले तर त्याच्या रिक्षातून उतरावेसे वाटेना मला. त्याला बहुतेक 'चढली' असावी.

माझ्या गेल्या काही बंगलोर भेटीत मला किती नमुने भेटले म्हणून सांगू? गेल्या दहा वर्षात मायबोलीवरही एवढे नमुने पाहिले नसतील.

दोन बसच्या मधून रिक्षा घालणारा, कितीही नाकदुऱ्या काढल्या तरी कुठेही न येणारा रिक्षावाला, ऐकून न ऐकल्यासारखे करणारा, गिऱ्हाईकाला कन्नड समजत नाही हे समजत असूनही मुद्दाम कन्नड बोलणारा, जोरात दामटणारा, कर्णकर्कश्श गाणी लावून बिड्या फुकत रिक्षा चालवणारा, रिक्षा मध्येच थांबवून पाणीपुरी खाणारा... असे अनेक नमुनेदार रिक्षावाले मी आतापर्यंत पाहिलेत.

ह्यात सगळ्यात कहर म्हणजे दोन बसमधून रिक्षा घालणारा. कोरमंगला ते एंबसी गोल्फ़ लिंक असा 'स्वर्गीय' प्रवास (स्वर्गीय म्हणायचे कारण घडोघडी स्वर्ग अगदी शब्दश: दोन बोटांवर आल्याचा भास होतो आपल्याला), दोन बस अगदी एकमेकांना खेटून उभ्या म्हणजे किती खेटून उभ्या असाव्यात त्या तर पुण्यातल्या गाडगीळ पुलावर बाईकच्या आडोश्याला प्रेमीवीर जितके खेटून बसतात ना अगदी तितक्या खेटून आणि त्या दोन्हीमधून ह्या पठ्याने रिक्षा अशी काढली ना की बाऽस! रजनीकांतच्या सिनेमात सुद्धा असला स्टंट मी कधी पाहिला नव्हता (Truth is stranger than fiction असे म्हणतात ते अगदी ह्याची देही ह्याची डोळा अनुभवले). रजनीकांत जसा आधी बंगलोरमध्ये बस कंडक्टर होता आणि मग सुपरस्टार बनला तसाच हा रिक्षावाला सुद्धा कुणी चंद्रकांत वगैरे होऊन त्याचा वारसा चालवणार असे मला चाटून (आपले वाटून) गेले... बघा वाटून चे चुकुन चाटून झाले हा बंगलोरच्या रिक्षाप्रवासाचाच परीणाम.. दुसरे काय?
एक क्षण माझ्या डोळ्यासमोर दृष्य तरळले की बंगलोरची बस नेहमीप्रमाणेच खचाखच भरली आहे. बसमध्ये रजनीकांत आपली झुलपे मागे उडवत, तिकिट ठेवायच्या पेटीतूनच सिगारेट उडवून तोंडात झेलत आहे आणि पंच करायच्या त्या स्टेपलरनेच ती पेटवत आहे आणि पब्लिकला ’मुंद बनि, मुंद बनि’ (पुढे सरका) असे ओरडत सांगत आहे. पुढची तिकिटे काढून झाली की बस मध्ये जागा नसल्याने तो सरळ चालत्या बसच्या टपावरुन मागे जाऊन मागची तिकिटे फाडत आहे वगैरे वगैरे वगैरे....

एकदा असेच सकाळी ८ वाजता रिक्षात बसलो. ( हो हो बंगलोरला असलो की माझे लवकर आवरते. का ते सूज्ञास सांगणे न लगे!) रोजचा जायचा मार्ग तोच त्यामुळे रस्ता माहित होता. रिक्षावालाही चक्क फक्त दीडपट भाड्यात तयार झाला म्हणून मी खुशीतच होतो. एवढ्यात महाशयांनी घातली की रिक्षा कुठल्यातरी बोळात. मी ओरडून सांगतोय अहो इकडून नाही तिकडून जायचेय तर हा आपला काहीतरी कन्नड मधून झाला सुरु. त्याला हिंदी येत नव्हते (म्हणे) आणि मला कन्नड येत नाही (खरेच) ह्या गोंधळात बिनधास्त रिंग रोड च्या दुसऱ्या बाजूने घेउन गेला आणि ज्या अंतराला ३० रुपये लागले असते त्याला चक्क ९० रुपये की हो लागले आणि मला कन्नड मिश्रित हिंदी बोलून वेड लागायची पाळी आली. त्याच्याशी भांडायचा खूप प्रयत्न केला (आता इथे बायको नक्की म्हणेल तुम्ही? ... आणि भांडणार? ) तर जेवढे भांडायला येते तेवढा प्रयत्न केला पण त्या रिक्षावाल्याने असा आवाज चढवला की माझ्या जीवाचे पार पाणी पाणी झाले आणि शेवटी ९० रुपयांवर पाणी सोडावेच लागले.

प्रसंग दुसरा, मार्ग तोच(तोच), वेळ तीच गर्दीची (बंगलोरमध्ये कुठलीही वेळ गर्दीचीच असते) रिक्षावाला तोच नाही पण तसलाच... हाही फक्त दिडपट भाड्यात तयार झाला. मागचा अनुभव गाठीशी असल्याने मी एकदम तयारीत बसलो. आणि साहेब चुकीच्या दिशेने गाडी वळविणार एवढ्यात त्यांना थांबवून कसेतरी योग्य दिशेने घ्यायला सांगितले... झाले साहेबांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि त्याने जे काही कन्नड मधून बडबड सुरु केली. येण माडती! हाण झाडती! कान काढती!’ काय काय बोलत होता कुणास ठाउक? कन्नड येत नसले तरी मला एवढे नक्कीच कळत होते की ते व्यंकटेश्वर स्तोत्र वगैरे नक्कीच नसणार.. ती कन्नड मधली ’भ’ ची बाराखडीच असावी... ऐकून ऐकून कान किटले. हा 'हिमेश' चा कन्नड अवतार असावा असा समज करुन मी बिचारा गप्प बसलो. ’रेशमियाच्या गाण्यांनी’ हे विडंबन सुचायची प्रेरणा हा त्या रिक्षावाल्याचा आवाजच होता

अजून एक असाच नमुना... दुसऱ्या ऑफिसमध्ये ५ वाजता मिटींग होती म्हणून नेहमीच्या ऑफिसमधून चार वाजताच निघालो... म्हणले महत्वाच्या मिटींगला (तरी) वेळेवर जावे. नेहमीप्रमाणेच देवाचा धावा करतच रिक्षात बसलो. बंगलोर च्या रिक्षात बसताना नित्यनेमाने देवाचा धावा करावाच लागतो. अजून थोड्या चकरा जर मी बंगलोरला मारल्या तर देव नक्की प्रसन्न ह्यायचा मला... बर ते असो...
थोडे अंतर सगळे सुरळीत पार पडले आणि मध्येच रिक्षावाल्याला काय हुक्की आली कुणास ठाऊक रिक्षा जरा बाजूला थांबवली, मला कन्नड मध्ये काहीतरी सांगितल्यासारखे केले आणि बाजूच्या बोळात गायब प्राणी. पाच एक मिनिटे झाली तरी स्वारी गायबच... बर रिक्षा थांबवली अश्या जागी होती की दुसरी रिक्षा करायची म्हणली तर रिकामी रिक्षाच काय तिचे चाक सुद्धा दॄष्टीस पडेना. शेवटी चडफडत आणि जंटलमनला साजेश्या अश्या साजूक तुपातल्या शिव्या घालत मी त्याला शोधायला म्हणून बोळात घुसलो आणि समोरचे दॄश्य बघुन ’चाट’च पडलो. एवढा आश्चर्यचकित मी माझा 'M3' (एकदाचा) सुटला तेव्हा सुद्धा झालो नव्हतो. साहेब काय करत असतील?... तर चक्क ठेल्यावर उभे राहून मजेत चाट आणि पाणी पुरी खात होते.
मी जाऊन त्याला झापला तर म्हणतो कसा (अर्थात त्याच्या तोडक्या मोडक्या हिंदीत) "साहेब इथली पाणीपुरी लै खास असते बघा. तुम्ही पण खाणार का? फक्त पाच रुपये." तुम्हालाही परवडेल असे म्हणायचे असावे त्याला. (मी कुठल्या कंपनीत काम करतो हे त्याला कळले असणारच ना). इथली पाणीपुरी आठवली आणि तोंडाला पाणी सुटले बघा. ह्याच्या तोंडाला पाणी सुटले ठीक आहे पण माझ्या तोंडचे पाणी पळाले त्याचे काय?

तर हे असले एक एक इरसाल नमुने. बंगलोरमध्ये रस्तोरस्ती असे रिक्षावाले भेटतच असतात आणि मला पार सळो की पळो करुन सोडतात त्यामुळे जेव्हा केव्हा मी बंगलोरहून पुण्याला पळतो (म्हणजे शब्दश: नाही), पुण्याच्या एअरपोर्ट वरुन घराकडे जायला रिक्षा करतो आणि जेव्हा तो रिक्षावाला मिटर टाकतो तेव्हा अगदी ’अगा म्या ब्रम्ह पाहिले’ अशी माझी अवस्था होते. ’मैं हू ना’ मध्ये नाही का सुश्मिता दिसली कि शाहरुखच्या कानात व्हायोलिन्स आणि सॅक्सोफोन वगैरे वाजू लागतात तसे माझ्या कानात टाळ, मॄदुंगां किंवा बासरी वाजायला लागते आणि तोंडातून शब्द बाहेर पडतात....

रिक्षा ही चांगली
शहरात शहर हे पुणे शहर, पाहण्या नजर भिरभिरते
देते न टांग, लावून रांग, ही वाट कुणाची बघते
ह्या गिऱ्हाईकाची साद ऐकुनी लगेच थांबत जाई
रिक्षा ही चांगली, पुण्याची रिक्षा ही चांगली

पी.एम.टी च्या रांगेतून, लाखो लोके सडताना
चिंब चिंब देहामधुनी घामट धारा गळताना
ही शेअर रिक्षा म्हणून आपुल्या मनास आवडून जाई
स्वस्तामध्ये साऱ्यांना ही घरी घेउनी जाई

ह्या गिऱ्हाईकाची साद ऐकुनी लगेच थांबत जाई
रिक्षा ही चांगली, पुण्याची रिक्षा ही चांगली

---------

गुलमोहर: 

छान वर्णन केलेत. मलाही पूर्वीचे अनुभव आठवले बंगलोरी रिक्षावाल्यांचे. एकदा मला तुमच्यासारखेच एका प्राण्याने सरळ रस्ता सोडून अकारण लांबच्या रस्त्याने स्टेशनला नेले होते. गाडी चुकायची वेळ आली होती. मी त्याला उपरोधाने हमे पुरा बंगलोर नही देखना सिर्फ स्टेशन जाना है वगैरे डायलॉग ऐकवले पण ढिम्म.

एकदा एक सारथी अगम्य भाषेत बराच वेळ बोलत होता. त्याला नम्रपणे सांगितले की कन्नड गोतिल्ला. तर मोडक्या इंग्रजीत म्हणाला मी हिंदी बोलत होतो! नंतर नंतर ही "हिंदी" थोडीफार कळू लागली.

पुण्याचा अनुभव नाही घेतलाय.... पण बंगलोरचा म्हणजे अगदी अगदी .... माझ्याच भावनांना वाचा फोडलीस Lol
आता बंगलोर एवढे माहिती आहे तुला म्हणुन सांगतेय, मी बाणेरघट्टाला (हो हो तेच ऑफिस - तुझे नि माझे सेम असते ) टिप्पसंद्रा मधुन रोज रिक्षाने जायचे अन यायचे. दीड वर्ष... माझे काय हाल झाले असतील विचार कर. :((
सकाळी आठ वाजले की अजुनही ठोके वाढतात माझे, बंगलोरच्या रिक्षावाल्यांच्या आठ्वणीने खिखिखि...
-प्रिन्सेस...

अजुन एक मज्जा म्हणजे, एका पठ्ठ्याने "गॅस ईल्ला मॅडम" हे मला पंपात शिरतांना सांगितले. समोर भली मोठी रांग. साडे नऊला क्लायंट कॉल.... ऑफिसात पोहचले साडेदहाला Sad अडला हरी ... दुसरे काय :(( आणि ऑफिसात कारण तरी काय सांगणार अशावेळी Sad
-प्रिन्सेस...

छान लेख ! अगदी खरं आहे. त्याचमुळे माझ्या मुलीची रिक्शाची हौस मी पुण्यात आल्यावरच भागवते. (:) शिवाय खड्ड्यातून रिक्शा गेली की ती खूपच खूश होते हे पण पुण्यात जास्त मजा येण्याचं एक कारण.) इथे बंगलोरमधे एकदा माझी मुलगी ६ महीन्याची असताना तिला डॉक्टरकडे नेण्यासाठी तिला कडेवर घेऊन मी जवळजवळ अर्धा तास वाट पहात होते तरी कोणिच रिक्शावाला यायला तयार होईना, ते एका पोलीसाने पाहीले आणि एकाला झापून मला सोडायला लावले (हे ही आश्चर्यच !), तर त्याने रस्ताभर अगम्य भाषेत कर्कश्य बडबड आणि हातवारे करत मला सोडले. मुलगी बिचारी घाबरुन गेली होती. वर त्याने दिड पट पैसे उकळले. आणि हा तर एक अगदीच किरकोळ अनुभव. त्यांचा वेष, दिसणे, अरेरावी, लिहावे तितके कमीच आहे.

बंगलोरच्या रिक्षाचा अनुभव नाही मला. पण हैद्राबादचे रिक्षावालेसुद्धा लै भारी! मी एका शेअर रिक्षात बसलो होतो. रिक्षा तशी बर्‍यापैकी भरली होती. एका थांब्याजवळ थांबली. तिथे एक बुरखाधारी बाई उभी होती. तिने गर्दी बघून चढण्यास नकार दिला. तर हे साहेब म्हणतात कसे "अब्बा! टांगा को टांगा लगे तो बच्चा पैदा नही होतुम|". आता बोला. असाच अजून एक प्रसंग. गच्च भरलेली रिक्षा. दोन टाळक्यानी हात दाखवल्याबरोबर त्याने थांबवली. लोकाना बसायला जागा नाही आणि रिक्षावाला ऐकायला तयार नाही. शेवटी आतला एक माणूस वैतागून बोलला "अब क्या गोदी मैं बिठाता क्या मियां|" एका रिक्षात बसलो. एक अतीशय काटकुळा, काळाकभिन्न, लांब केस वाढलेला आणि चेहेर्‍याने खाणकामगारासारखा दिसणारा रिक्षावाला होता. त्याने समोरच्या आरसा adjust करताना फोकस माझाकडे केला आणि माझ्याकडे बघून मंद स्मित केले. लई भेसूर वाटला तो. रिक्षा चालु केल्यावर मात्र तो गडी जोर जोरात गाणी लाऊन दोन्ही हात सोडून "ओकटी जननम् ओकटी मरणम्" असल्या गाण्यावर चक्क नाचत होता. मागे लेडिज सीट आल्यामुळे मी मध्येच पुढे येऊन बसलो होतो. मधूनच त्याने अंग वेडेवाकडे करत अंगडाई दिली. मला ब्रह्म आठवले. हैद्राबादच्या सिक्स सिटरमध्ये बसणे हा ही एक झ्याक अनुभव आहे.

अय्या, ते 'रेशमियांच्या गाण्यानी...' तुझे आहे??? मला आत्तापर्यंत १० वेळा तरी मेल केले असेल वेगवेगळ्या लोकांनी..:)
बाकी नेहमीसारखेच खुमासदार आणि मस्त लिहिले आहेस...
शेवटचे विडंबन तर खासच..:)

    ..........
    चला दोस्तहो, आयुष्यावर बोलु काही....

    मस्त लिहिलं आहे.... खरं आहे अगदी.....
    इथे रिक्षावाले कधिही मिटर प्रमाणे यायला तयार होत नाहीत...... आणि त्यासाठि कारणही एकदम तयार असतात त्यांच्याकडे. मॅडम, सुबेहका टाइम है, वाहासे passengers नहीं मिलते.... सगळ्यात हाइट म्हणजे माझ्या एका मैत्रिणिला एका रिक्षेवाल्याने दिडपट पैसे मागितले आणि कारण विचारलं तर तिला उत्तर मिळालं कि, "आज बहोत थंड है" Uhoh

    अस्से आहेत काय बंगळुरुमधले रिक्षावाले ? अजून कधी योग नाही आला.
    या बाबतीत आम्ही मुंबईकर खरेच सुदैवी. मीटरनेच पैसे घेतात. आणि हा हिशोबही पटकन कळेल असाच आहे.
    मोठ्या स्टेशनच्या बाहेर रांगा असतात आणि रांगेतल्या रिक्षावाल्याला भाडे नाकारता येत नाही.
    शिवाय मुख्य शहरात, म्हणजे पश्चिमेला वांद्र्याच्या पुढे आणि पुर्वेला सायनच्या पुढे, रिक्षाना प्रवेश नसल्याने, वाहतूकीला त्यांचा अडथळा नसतो.

    एकदम मजा आ गया हेहेह्हेहेह्ह्ह्ह. मस्त लिहिल आहे.

    मिल्या, मुला, पाय दाखव रे बाबा तुझे! महान आहेस!!! काय लिहिलंय!!!!!! वाचताना हसु आवरत नाही (आणि प्रत्यक्ष रिक्शात बसलं की रडु !!) Proud
    बंगलोरला असताना एकदा रिक्षाने घरी आले. उतरताच पैसे पुढे केले. तर वात्रट माणुस म्हणतो कसा "सिस्टर (आता मी ह्या मेल्याची बहीण हं!) मनी लेस! २५ रुपीज मोर!"
    "भैय्या जितना कबूल किया उससेभी जादा दिया आपको!" इती मी.
    "हिंदी बरल्ला" असलं काहीतरी बरळला!
    "लाज नाही कारे वाटंत बेश्रमासारखं लुबाडताना? अन हळु चालव म्हंटलं तर मेक्री सर्कलला ऍक्सिडेंट होता होता वाचला! मुस्काडून काढावसं वाटतंय तुला." मी मराठीत धोबीपछाड सुरु केला! एवितेवी हिंदी येत नाही, मराठी तर तसंही येत नसणारच! काय फरक पडतो? कमीतकमी आपली भडास तरी निघते! तर चक्क (बहुतेक मला शिव्या घालत) चालता झाला!

    मस्त रे भो Happy
    विडंबन सुद्धा as usual झकास Happy
    माझा ही बंगलोरच्या रिक्षावाल्यांचा अनुभवही असाच. आमच्या बरोबर बंगलोरला राहिलेला आमचा कलीग होता. त्याने व्यवस्थित रिक्षावाल्याशी बोलून भाडे ठरवले. आमच्या मागून येणार्‍या महिला मंडळाने दुसरा रिक्षा ठरवला. तो आमच्या मागून येत होता. आम्ही ३५ रु दिले. मागच्या रिक्षावाल्याने "तुमच्या पुढच्या लोकांनी ६० रू. ठरवलेत" असं सांगून त्यांच्या कडून ६० रु घेतले अन् मागच्या मागूनच सूं बाल्या केला होता. Happy

    पुण्यात आल्यावर इथले रिक्षावाले "देव" आहेत असं वाटायला लागलं होतं Proud
    ________________________________________
    || स्तव्य: स्तवप्रिय: स्तोत्रं स्तुति: स्तोतारणप्रिय: || पूर्ण: पूरयिता पुण्य: पुण्यकीर्तिर्नामय: ||

    खी खी खी!!
    भारी आहे रे... भविष्यात पुणेकर झालो(च) तर ही Theory of Relativity नक्की लक्षात ठेवीन.. Happy

    मिल्याभाऊ,
    एकदम सही लिहीलेस! Happy
    random numer generator .......
    Lol

    धमाल लिहीले आहे Happy

    मिल्या दादा छान लिहीलय रे Happy
    आवडेश Happy

    छान लिहिलं आहेस रे मिल्या ........... Happy
    M. G. Road वरून airport Road ला संध्याकाळी ७ नंतर यायचं असेल, तरी असेच काहीसे अनुभव येतात ........ Happy
    --
    अरूण

    सर्वांनाच खूप खूप धन्यवाद..

    पण एकंदरीतच बंगलोरस्थित लोकांच्या दुखर्या जखमेवर बोट ठेवल्याने लेख विनोदी न होता 'करुण' झालाय असे वाटतेय मला Happy

    करुण कशाने? सगळ्यांच्या काळजाला तु हात घातलास्....... Proud
    'रीक्षा ही चांगली' हे विडंबन खासच झालंय..... बेंगलोरपुढे पुण्यातले रीक्षावाले तुला देवदुत वाटले तर ठाण्यातले रीक्षावाले भय्ये तुला स्वर्गातल्या पर्‍याच वाटतील..

    मिल्या Rofl
    वरच्या सगळ्यांना अनुमोदक.
    मस्तच झालय विडंबन.
    म्रिन्मयी Biggrin

    मिल्या विडंबन झकासच रे...
    .
    मंडळी..
    मला आत्ता पर्यंत.. पुणे, मुंबई, बंगळूरु आणि हैदराबाद्च्या रिक्षावाल्यांचा अनुभव आहे...
    पुण्यातले रिक्षावाले मिल्या म्हणतो त्याप्रमाणे देव जरी वाटत असले तरी एक नंबरचे माजलेले आहेत.. बर्‍याच वेळेस ह्यांच्या रिक्षातल मीटर हे चुकीचेच रीडींग दाखवत असते.. आणि पैसे घेताना तर मनाला वाट्टेल ते सांगतात.. नशिब एकच की टेरिफ कार्ड असल्यामुळे कार्ड वर होतील तेव्हढेच पैसे घ्यावे लागतात.. आणि एखाद्या ठिकाणी जाण्याच्या बाबतीत तर नमुने आहेत.. त्याला जायचे असेल त्याच्या दुसरीकडे येणारच नाही.. आणि संध्याकाळी ८ वाजता त्यांच्या जेवायची वेळ झाली की मग तर विचारुच नका...
    मुंबईतले रिक्षावाले एकदम बेस्ट... स्टेशनच्या बाहेर ठराविक ठिकाणी जायचे असेल तर तशा रांगा लावून थांबलेले असतात.. पाहिजे त्या रांगेत बसायचे आणि ठिकाण सांगायचे.. झाले काम.. पैसे घेताना पण कट कट नाही.. आणि कुठूनही कुठेही जायला तयार असतात...
    बंगळूरू मधल्यांचा फार असा अनुभव नाही कारण दोन चार वेळाच गेलो आहे.. पण इतर जण म्हणत आहे तसा अजुन तरी अनुभव नाही...
    आणि हैदराबाद तर विचारूच नका.. तिथे एक तर दोन प्रकारच्या रिक्षा आहेत.. मीटरवर आणि शेअरींगवर.. मीटरचे रेट ठरलेले असतात त्यामुळे फारसा काही प्रॉब्लेम नाही.. शेअर रिक्षावाले एकदम भारी .. एकतर सगळ्या रिक्षा डिझेल वर चालणार्‍या.. त्यात त्यांचा क्लच कार सारखा पायात.. आणि त्यामुळे प्रत्येक रिक्षात किमान ६ जण तर बसतातच.. आणि गाडी पळवण्यात तर त्यांचा हात कोणीच धरणार नाही.. जीव मुठीत धरुनच बसायला लागते.... आणि त्यातून तुम्ही त्याचा शेजारी असाल तर विचारायची सोय नाही....

    ==================
    ढिंग चँग ढिचँग... ढिंग चँग ढिचँग...

    आई ग! बंगळूरू(असेच ना ते नवीन नाव .. ) असे हाल आहेत रिक्षाने जाण्याचे????
    तसेच हाल ते मद्रास मध्ये. हलकट रिक्षावाले हिंदी कळत नाही म्हणत अगदी असेच लुबाडतात. अगदी अगदी.
    मुंबई लाख लाख पटीने चांगली. मस्त दरवाजे वगैरे असतात रिक्षाना. पावसाळ्यात आत भिजायला होत नाही. शाळेत असताना खूप मजा वाटायची. खास शाळेची बस चुकवून रिक्षाने यायची.आत छान मस्त couch सारखी गादी. नी पाहीजे ती आवडीची गाणी पण लावतात अगदी सर्व नवीन पासून जुनी. मी तर खास अशी रिक्षा बघून बसायची नी विचारायची ये गाना है क्या? वोह है क्या? नी गानी बदलायला सांगीतली तर ते बदलत. हे सर्व मीटर टाकून ते सुद्धा. हे दहा-बारा वर्षापुर्वी होते. आता माहीती नाही. पण नक्कीच चांगले असणार.

    मिल्या, चांगले लिहिलेस. Happy

    मिल्या, हाणलयस... नक्कीच.... बंगलोरी रिकशेचा अणभव नाही.... मुंबई-पुणं... आहे!

    गिरायकाला टांगून ठेऊन पाणी-पुरी खाणारा रिक्षावाला!..... त्याला उल्टा टांगून...

    लै भारी ....
    पण तु सारखं सारखं रजनिकांत म्हणुन आमच्या डॉ. राजकुमारांचा अपमान केला आहेस हे लक्षात ठेव आणि रजनिकांतनी आम्हाला आमच्या कावेरीच्या पाण्याचा वाटा आम्हाला न देण्याच्या भुमिकेला पाठिंबा दिला आहे तरीही ???
    तु येच आता परत .. कन्नड रक्षा वेदिके झिंदाबाद !!!

    पुणेकर जनता रिक्षाने (का?)जाते ???? Happy घरटी १/२ गाडी ( स्कुटी म्हणायचय मला!!) असुनही ही अवस्था?? Happy

    आईनस्टाईनने>> When you are courting a nice girl an hour seems like a second. but when you sit on a red-hot cinder a second seems like an hour. That's relativity." (काहीजण असेही म्हणू शकतात >>> हे मात्र पटल (आवडल..) Happy
    मात्र रिक्षा आणि त्यांचे ’थोर’ चालक / मालक ह्यान्चा उधार आपल्याच हाती नाही का?? त्यान्च्या मुला/ मुलीचे १ च अपेक्शित आहे.. शिश्कनचा थोडासा भार आपण उचलला तर पुण्यच लाभेल Happy ९०/१०० रुपडे जर जास्त दिले तर काय ते टॉवर का बान्धणारेत??? असे उत्तर मला उत्तर भारतीय (अन् सध्या लोकप्रिय असलेल्या ) चालकाकडुन कालच मिळाले!! आता बोला?? Happy

    नम्र आवाहन : स्टोरी लिवा पीक्चर चान्गल चालेल !

    टायटल (पिक्चरच):
    रिक्षा की शिक्षा? = रिक्षा (त) १ शिक्षा!! (१प्यारी लव) स्टोरी!! स्टोरी लिवा पीक्चर चान्गल चालेल (हो जिथ दे धका़आ चालतो तिथ अजुन १!!

    पात्र : (म्ह्न्जे कलकार!) Happy

    शिक्षा: १ उ. भा. तरुणी (पुण्यनगरीत आल्ये हीरोइन/ महागायिका इ. इ. बनायला)
    रिक्षा वाला: हीरो १ साउथचा!

    बाकीची कास्ट बादमे!

    मेन स्टोरी : भुमीपुत्र वि. इतर सर्व ह्यान्चा लढा !

    आयेटम सोन्ग: आयेटम गर्ल / बॉय : म्हनतोय : - ' नुसतच लढ म्ह ना!'

    बघा कशी वाटली स्टोरी?? कळवा!

    दीपक
    "Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

    मिल्या Lol
    जबरा लिहिल आहेस.
    आता अखिल भारतीय (?) पुणे रिक्षा संघटने कडुन तुझा सत्कार होणार बघ हारतुरे नारळ देवुन. Happy
    ह्या लेखाची प्रिन्ट आता रिक्षात बसल्यावर दर्शनी भागात सगळे रिक्षावाले लावणार आता. Happy
    .............................................................
    **Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
    expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
    Think about it.**

    मिल्या (काका/ दादा/काका/.... ह्य्च्या पुढची उपाधी लावण्याआधीच सांगा स्टोरी लिवताय का?? Biggrin

    दीपक
    "Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

    मस्तच लिहिल आहेस.
    मदुराईतल्या(तामिळनाडू) एका रिक्षावाल्याला मी भाड्याच्या शिवाय दहा रुपये टिप दिली. रिक्षाप्रवासाचा चित्तथरारक
    अनुभव देऊन जिवंत परत आणल्याबद्दल.

    मिल्या, झकास रे भाउ. प्रवाशाला थांबवुन पाणी पुरी वगैरे मिटरेफिक! वेटींग चार्ज लावला का रे तुला त्याने? पुण्यातल्या रिक्षावाल्यांवरही लेख होउ दे ना...माझ्याकडे खजिना आहे पुण्यातल्या रिक्षावाल्यांच्या अनुभवाचा Sad

    Pages