आपणच नालायक आहोत!!

Submitted by झुलेलाल on 20 November, 2010 - 02:09

आपणच नालायक आहोत!!

’होऊन जाईल तुमचं काम... साडेआठ हजारात. पण कॅश द्या. चेक नको. परवाची वेळ घेऊन टाकतो. तासाभरात काम होऊन तुम्ही मोकळे’...
त्या ’एजंटा’नं समोर बसलेल्या जोडप्याला सांगितलं, आणि त्यातल्या नवर्‍याचा चेहेरा खुलला.
’म्हणजे रजा घ्यायला नको’... तो आनंदानं पुटपुटला.
दोघंही उठले, आणि बाहेर पडले. एजंटानं ड्रावर उघडून फ़ाईल बाहेर काढली आणि कॅलक्युलेटर काढून भरभरा काहीतरी आकडेमोड केली. दोन मिनिटांनी फाईल पुन्हा ठेवताना त्याच्या डोळ्यात समाधान साचले होते...
दोन दिवसांनंतर ठरल्याप्रमाणे ते जोडपं सकाळीच त्या ऒफिसात येऊन हजर झालं. बाहेरच्या खुर्च्या-बाकड्यांवर दाटीवाटीनं आधीच येउन बसलेली माणसं बघून त्यांनी एकमेकांकडे बघितलं. आपलं काम खरंच तासाभरात आटोपेल का अशी शंका दोघांनाही एकमेकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसली. पण ती झटक्यात पुसून टाकून दोघं जागा शोधू लागली. आणि दोन कोपरे रिकामे दिसले. दोघं बसली. एकमेकांपासून लांब... काहीच बोलताही येत नव्हतं.
असाच बराच वेळ गेला. अजून तो एजंट आलाच नव्हता... लांबूनच अस्वस्थ नजरेनं बायकोकडे पाहात नवरा मनगटावरच्या घड्याळात नजर टाकत होता. एकदोनदा त्यानं एजंटाचा मोबाइल नंबर फिरवला. आऊट ऑफ कव्हरेज एरिया... टेप संपायच्या आधीच त्यानं नंबर डिसकनेक्ट केला...
तासभर उलटून गेला. आता गर्दी आणखी वाढली होती... प्रत्येकासोबत एकेक एजंट दिसत होता. त्या एजंटांची आतबाहेर धावपळ सुरू झाली होती. काळ्या कागदांनी झाकलेल्या काचेच्या बंद दरवाजाआडच्या केबिनमध्ये तिथला ’साहेब’ बसला होता... पांढर्‍याशुभ्र कपड्यातला, पांढर्‍या बुटातला, गॉगल लावलेला, सोन्यानं मढलेला कुणीतरी धाडकन आत गेला आणि बाहेरची धावपळ थंडावली...
पाचेक मिनिटांत कुठल्यातरी हॉटेलचा पोर्‍या वर्तमानपत्राच्या कागदानं झाकलेला ट्रे घेऊन आत गेला.
’आत साहेब नाश्ता करतायत... वेळ लागणार’.... कुणीतरी एजंट त्याच्या शेजारी बसलेल्या अशाच एका ’ताटकळलेल्या’च्या कानाशी बोलला, आणि याचा चेहेरा पडला.
अजून याचा एजंट आलाच नव्हता... आता ऒफिसात फोन करून रजा टाकावी असं त्यानं ठरवलं.
सगळ्यांचं लक्ष त्या काळ्या कागदानं झाकलेल्या काचेच्या दरवाज्याकडे लागलं होतं... सगळं कसं शांतशांत, ठप्प होतं...
गर्दीही वाढतच होती... आता घामाच्या धारा पुसत तो बसल्या जागी चुळबुळत होता. मधुनच बाहेरच्या दरवाज्याकडे बघत होता. बायको लांब, समोरच्या कोपर्‍यातल्या एका बाकड्याच्या कोपर्‍यावर अंग चोरुन कशीबशी बसली होती. तिचं त्याच्याकडे लक्षही नव्हतं...
अचानक तो एजंट त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. यानं काही न बोलता हातावरल्या घड्याळात बघितलं...
'सॊरी... ट्रॆफिकमधे अडकलो...’
यानं वर न बघताच मान हलवली. मुंबईत उशिरानं येणारा प्रत्येकजण हेच कारण सांगतो, हे त्याला माहित होतं.
मग एजंटानंही काळ्या कागदानं झाकलेल्या त्या काचेच्या दरवाजाकडे बघितलं... तेव्हढ्यात हॉटेलवाला पोर्‍या चहाची किटली घेऊन तिथून आत घुसला.
'आता साहेब नाश्ता करतायत... म्हणजे टाईम लागणार’... एजंट याच्या कानाशी पुटपुटला. त्याला हे मघाशीच माहीत झालं होतं. हा काहीच बोलला नाही.
... अर्ध्यापाऊण तासानंतर काळ्या कागदानं झाकलेल्या काचेचा दरवाजा उघडला, आणि तो पांढर्‍या कपड्यांतला, पांढरे बूट घातलेला, गॉगलवाला खिदळत बाहेर आला...
'संध्याकाळपर्यंत लाखभर तरी जमायला हवेत’...
- अर्धवट उघडलेल्या त्या दरवाजातून आलेले शब्द याच्या कानांनी टिपले, आणि तो चरफडला...
'सालं आपणच गांडू, नालायक आहोत...’ तो स्वत:शीच म्हणाला, आणि घाबरून त्यानं आजूबाजूला बघितलं... कुणी आपलं बोलणं ऐकलं नाही, हे लक्षात आल्यावर तो सावरला...
एजंटानं आपल्याकडून साडेआठ घेतलेत. त्यातले स्टॆम्पड्युटीचे शे-सवाशे गेले, एजंटाचं हजार दोन हजार कमिशन गेलं... बाकीचे पैसे?... कुठे जाणार?... पहिल्यांदाच त्याला हा प्रश्न पडला...
तो आणखीनच अस्वस्थ झाला.
'च्यायला, एवढे पैसे देऊनही आपल्याल्या ताटकळतच ठेवलंय... बाकीचे सगळेही पैसे मोजूनच ताटकळतायत. तरी सगळ्यांचे चेहरे लाचार... कसला स्वाभिमान.. कसली लोकशाही'... तो चरफडत होता..
ताडकन उठून तो येरझारा घालू लागला... मधेच एकदा काळ्या कागदानं झाकलेल्या काचेच्या दरवाजाजवळही गेला. एका लहानश्या फटीतून आत डोकावण्याचाही त्यानं प्रयत्न केला...
पण तेवढ्यात तिथल्या स्टुलावर बसलेल्या शिपायानं शुकशुक केलं, आणि ओशाळल्यासारखा हा मागे फिरला...
त्याचा एजंट कुठल्यातरी टेबलाशी जाऊन तिथल्या ’साहेबा’शी काहीतरी बोलत होता.
बायको बसली होती तिथल्या कोपर्‍यात जाऊन हा उभा राहिला.
एजंट त्याच्याजवळ गेला.
'बस, आता तासाभरात होऊनच जाईल आपलं काम... आता आपलाच नंबर.’ एजंट म्हणाला, आणि यानं उगीचच हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीतली कागदपत्रं चाचपली...
इतका वेळ खोळंबूनही साडेआठ हजार?’... पुन्हा हा प्रश्न याच्या डोक्यात सण्णकन शिरला, आणि त्यानं एजंटाला खुणेनंच बाहेर यायला सांगितलं.
दोघंही बाहेर आले.
'काय हो... एवढ्याशा कामासाठी तुम्ही साडेआठ हजार घेतलेत?’ त्यानं ताडकन विचारलं..
काय करणार, आतल्या साहेबाला, बाहेरच्या क्लार्कला, आणि त्या प्यूनला द्यायला लागतात...’ एजंटानं सहजपणे उत्तर दिलं...
'नाही द्यायचे त्यांना पैसे... त्यांचं कामच आहे ते...’ तो त्वेषानं म्हणाला.
'ठीक आहे... मग चला, निघुया’... एजंट शांतपणे म्हणाला.
'कुठे? आणि काम?’ ह्यानं विचारलं.
'आहो, पैसे द्यायचे नाहीत ना? मग काम कसं होणार? आज नाही आणि कधीच नाही'... एजंटानं ठामपणे सांगितलं...
'बघा... तुम्ही पैसे देणार नसाल, तर हे लोकं तुम्हाला उद्या यायला सांगतील... उद्या पुन्हा तुमचा वेळ जाणार. मग कागापत्रं तपासतील... काहीतरी कमी असेल. ते घेऊन पुन्हा दुस-या दिवशी बोलावतील... मग एखादी सही नसेल.. पुन्हा तुम्हाला परत पाठवतील... तिस-या दिवशी आणखी काहीतरी कमी काढतील.. पुन्हा खेपा... तुमच्याकडे किती रजा शिल्लक आहे?’ एजंटानं थेट याला विचारलं, आणि हा घाबरला...
अगतिकासारखा एजंटाकडे बघु लागला...
'त्यापेक्षा पैसे द्या... आजचा दिवसात काम होऊन जाईल... रजा वाया घालवून काम होईलच याची खात्री नाहीच... चला आत...’ हुकुम सोडल्यासारखा एजंट त्याला म्हणाला, आणि आत वळला.
ह्याची पावलंही त्याच्यापाठोपाठ आत वळली...
एखादा कोपरा बसण्यासाठी शोधू लागली.
आणि कोपरा मिळाला...
शेजारचा माणूस सरावल्यासारख्या शांतपणे पेपर वाचत होता...
यानं खुणेनंच त्याच्या मांडीवरचा दुसरा पेपर मागितला, आणि घडी उलगडली..
’स्वच्छ प्रशासनाची नव्या नेत्यांची ग्वाही...’
मोठ्या अक्षरांतला तो मथळा आपल्याकडे बघून खदाखदा हसतोय असा भास त्याला झाला.
त्यानं पेपर मिटला, आणि त्याची नजर वळली...
... काळ्या कागदांनी झाकलेल्या काचेच्या दरवाज्याकडे!!!
--------------------------------------------
http://zulelal.blogspot.com

गुलमोहर: 

कुठल्याही कार्यालयाचे नाव घेतले नसले तरी सगळीकडे हिच परिस्थिती आहे.
जिथे असे पैसे द्यावे लागत नाहीत, अशा कार्यलयाचा अनुभव असला तर तो त्या कार्यालयाच्या आणि अधिकार्‍याच्या नावासकट प्रसिद्ध करावा, हेच उत्तम.

Sad

माझा अनुभव अपवाद म्हणता येइल इतका वेगळा आहे. माझी मुंबईत रेशन कार्ड बनवणे , कुटुंबाचे पासपोर्ट काढ्णे, घराचे रजीस्ट्रेशन करणे , मुलाच जन्माचा दाखला मिळणे यासारखी सगळी सरकारी कामे एकही जादा पैसा न देता , विना एजंट, आणि तेही नॉर्मल वेळेत झाली आहेत. त्यामुळे मला असे वाट्ते की जर आपली कागद्पत्रे पुर्ण असतील आणि आपली त्या त्या कामासाठी कायदेशीर मार्गाने जायची तयारी असेल तर प्रत्येक वेळी निराशा नक्किच पदरात पडणार नाही.
कारण पुष्कळ्दा system च्या नावाने शंख करणारे आपणच shortcut शोधण्यात जास्त interested असतो.

ह्म्म्म्म्म!! ..पण लोकांनाही पैसे देऊन आपले काम आधी ,झटपट करवून घ्यायची घाई असते म्हणून तर एजंट्स्चा धंदा जोरात आहे Sad

लेखात्तील मुद्दा नविन नाही.. तरिही..
>>पण लोकांनाही पैसे देऊन आपले काम आधी ,झटपट करवून घ्यायची घाई असते म्हणून तर एजंट्स्चा धंदा जोरात आहे

वरकरणी तसं चित्र दिसेल पण खरी गोष्ट वेगळी आहे. मुळात मुद्दामून लोकांना खेटे घालायला लावायचं, काहीतरी चुकीची माहिती द्यायची, किंव्वा दर वेळी थोडी थोडी माहिती द्यायची अशा क्लुप्त्या वापरून हे सरकारी कर्मचारी लोकांना नामोहरम करतात. थोडक्यात आड मार्गाने पैसे ऊकळण्याचे धंदे. अशा वेळी ज्याला काम होणे महत्वाचे आहे त्याला पैसे मोजून काम करवून घ्यायला भाग पाडले जाते. एरवी जी कागदपत्रे एजंट्स ना बरोबर माहित असतात, तीच सामान्य माणसाला किंवा अगदी एखाद्या उच्चशिक्षीताला माहित नसतात यातच काय ते आलं.. स्वताहून अशी कागदपत्रे मागितलीत आणि भरून दिलीत तर मुद्दामून चुका काढल्या जातील.. कागदपत्रे बरोबर असतील तर फाईल मुद्दामून धूळ खात ठेवली जाईल...... निव्वळ आपल्या सहीचा (मग तो सही करणारा कारकून असो, असिस्स्टंट असो, मोठा अधिकारी असो वा ईतर कुणी) असा गैरवापर, abuse करण्याचे काम हे लोक करतात तेव्हा अशा वेळी सामान्य माणूस हतबल असतो.
कालांतराने मग असं समीकरण केलं जातं की काम "लवकर" करून हवाय ना मग द्या एजंट ला पैसे, म्हणजेच चारा सगळ्यांना वर पासून खालपर्यंत. एजंट हे काम बिनचोख, निर्लज्जपणे आणि रोज करू शकतात अन काही काळाने त्यांची खिडकी मागच्या माणसाशी आपसूक ओळख होते असे हे साधे समिकरण आहे. जो एजंट जास्त देईल त्याचे काम तितके अधिक लवकर.
ही कीड समूळ नष्ट करणारे फ्लिट अजून बाजारात यायचय.. अन वैयक्तीक अशा लोकांना शुध्ध करणारे मायबोलीफेम "गोटॉल" निष्प्रभ आहे.
थोडक्यात आपण सर्व जण वेळेची किम्मत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अदा करत आहो- जन्मापासून मरणापर्यंत आणि मरणा नंतरही आपण मेलो याचा दाखला घ्यायला- याला नालायकपणा म्हणायचा का कसे हे ज्याचे त्याने ठरवावे.
----------------------------------------------------------------------------------
एजंट ला पैसे देवून पासपोर्ट बनवून घेतला तेव्हा पोलिस चौकशी साठी पोलिस स्टेशनात गेलो होतो. दुनियादारी ची विशेष अक्कल न्व्हती तेव्हा- वय वर्षे २१. चौकशी झाली अशी सही करताना त्या पोलिसाने चक्क "तुम्ही परदेशी जाणार आमचं पण काही चहा पाण्याचं बघा" म्हणून मला थेट तोंडावर सांगितले.
मी खिशातून २० ची नोट काढली अन सांगितलं घरून पॉकेट मनी वगैरे काही मिळत नाही- एव्हडेच शिल्लक आहेत, पुरतात का बघा. यावर तो थोडा ओशाळला होता अन २० रूपये घेवून सही दिली होती. आज ईतक्या वर्षांनीही ती घटना आठवणीत ताजी आहे..... काळ बदललाय- २० वर दोन शून्य जास्त आली आहेत ईतकच!

जो पर्यंत भांडवलशाहीचा उदो उदो होईल तोवर भ्रष्टाचार चालूच राहील ..
भारत हा फक्त संविधानाच्या पहिल्या पानावरच (preamble) समाजवादी राहिलेला आहे ..
मतदान केले नाही तर हे सो कॉल्ड उद्धारकर्ते म्हणतात की तुमच्यामुळे नालायक नेतृत्व पुढे येते ....
अरे जर शंभर टक्के मतदान कोसळले तर खोटी मते तरी कशी टाकणार हे चोर ?
असो ... अजून भारताची हवी तेवढी (क्रांती होण्या इतपत) वाट लागेली नाहीये ...
फळ पिकतंय अजून .. Happy

प्लीज ... भ्रष्टाचार कुठे नाही असे परिस्थितीचे बाष्कळ समर्थन कुणी करू नका.

भ्रष्टाचार हे कारण आहे की परिणाम हा कोंबडी आधी कि अंड या प्रश्नासारखा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करुन फारस काही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा जमेल तेव्हा, जमेल तितका आणि जमेल तसा याला प्रामाणिक विरोध केला तरच काही उपयोग होण्याची शक्यता जास्त वाटते. माझा अनुभव आहे की अनेक वेळा आपण अनावश्यक घाई करतो त्याचा गेरफायदा घेतला जातो. थोडा पेशन्स दाखवला व नियमांची माहिती करुन घेण्याचा प्रयत्न केला तर आपला थोडा वचक निर्माण होऊ शकतो. अर्थात हे सर्व ठिकाणी लागू होत नाही.

एजंटांचेही पोट भरायला नको का ? दोन तीन आठवड्यांपूर्वी, लोकप्रभात, एका पत्रकाराने, दिल्लीतील एका परदेशी वकिलातीने, एजंटमार्फतच व्हिसासाठी अर्ज करावा, असे आडवळणाने कसे सूचवले होते, त्याबद्दल लिहिले होते.

मला आठवतय मी नवीन गॅस कनेक्शन घेतलं तेव्हा काहीतरी ऑड फिगर पैसे द्यायचे होते , ३४९२ का असे काहीतरी , मी पट्कन सुटे देउ का अस विचारून २ चं नाणं काढून दिलं , त्या माणसाचं तोंड बघून वाटलं की तो वर काहीतरी मिळण्याची अपेक्षा करत होता , मी कळलचं नाही असं दाखवून सटकले :ड

एजंट गिरी हा जर कोणाचा अधिकृत व्यवसाय असेल तर मला त्यात काही गैर वाटत नाही. Undercover agents (unofficial) are crooks! एखाद्या ऑफिस मधे काम करणारी व्यक्ती---साहेबांकडे फाईल पोचवण्याकरता ५०० रु टाका म्हणाली तर अश्या प्रकारची एजंटगिरी हा १००% टक्के भ्रष्टाचार आहे. पैसे देणारे पण तेवढेच लुच्चे आहेत. पण एखाद्या व्यवसायिक कंपनीने १० वा १५% टक्के फी आकारून तुमच काम तुम्हाला तसदी न देता वेळेत करून देणे यात काही चूक नाही.
चिरिमिरी आणि Official service fee यात खूप फरक आहे अस नाही का तुम्हाला वाटत.
रच्याकने: हे गोटॉल काय आहे?

लेख चांगला लिहिलाय. पण "आपण सगळेच नालायक आहोत" मधला 'सगळेच' हा शब्द जरा खटकला.

>>>पैसे देणारे पण तेवढेच लुच्चे आहेत.
इतकं सरसगट विधान बरोबर नाही. इतर कुठलाही आर्थिक पाठिंबा नसलेला, पैशाअभावी आजारी बायकोची वैद्यकीय सेवा पूर्ण न करू शकणारा, ७५ वर्षांचा म्हातारा गृहस्थ स्वता:च्याच कष्टाच्या पैशांसाठी, पेंशनची केस बघणार्‍या कारकुनाकडे, "अहो, मी जिवंत आहे याचा ** आणि ** सर्टिफेक्ट्सखेरीज आणखी काय पुरावा आणू?" म्हणून अगतिकतेने विचारतो. कारकून, एजंट किंवा आणि कुणी संबंधीत(!?) माणूस डोंबलावर पैसे घालायला सांगतो. म्हातारा गृहस्थ बाकी काहिही करू शकण्याच्या अवस्थेत नाही. अखेरीस कनवटीची चुरगळलेली पन्नासाची नोट काढून देतो. तेव्हा कुठे तो जिवंत असल्याची खात्री पटते. हे भावनेला हात घालण्यासाठी वगैरे लिहिलेलं नाही, ही सत्य परिस्थिती आहे. ही आणि अशी कैक उदाहरणं आहेत. तेव्हा काम करवून घ्यायला पैसे देणारा प्रत्येकच जण लुच्चा कसा ठरतो?

>>>पण लोकांनाही पैसे देऊन आपले काम आधी ,झटपट करवून घ्यायची घाई असते म्हणून तर एजंट्स्चा धंदा जोरात आहे
इथेही वरचंच उदारण लागू पडेल.

अप्रतीम लेखन! जबरदस्त!

या लोकांना उलटे टांगूनसुद्धा नाही, फक्त खलास करायला हवे असे वाटते आणि ते आपल्या लेखणीतून फारच सहीसलामत उतरले आहे. अभिनंदन!

खरच मस्त!

-'बेफिकीर'!

मृण्मयी,
नाही पटल तुमच argument. कितिही टोकाचे प्रसंग लिहलेत तरी लाच देण्याच समर्थन होत नाही. असो.

Govt. पेंशन कलेक्ट करण्यासाठी नियम आहे की दरवर्षी living cerificate द्यावं लागतं. ते डोक्युमेंटेशन परपजसाठी असतं. ते इथल्या नोटराईज्ड डोक्युमेंट्सारख असतं. गैरव्यक्तीने पेंशनचा फायदा घेऊ नये म्हणून. तसच जेंव्हा पेंशनर गेल्यावर त्याची बायको किंवा नवरा सरव्हायव्हल पेंशन कलेक्ट करतो तेंव्हा त्यालाही दरवर्षी आपण जीवंत आहोत असं सर्टिफिकेट द्यावं लागतं. हे सर्व डोक्युमेंटेड लागतं स्वतः पर्सनली जाऊन चालत नाही.

हे नीट समजावून सांगणं ही तिथल्या संबंधीत लोकांची जबाबदारी आहे. ते त्यांचं काम आहे. त्यासाठी केवळ पैसे घेऊन आणि डॉक्युमेंट नसताना पेंशन देणं म्हणजे डबल चूक.

मी इथेच आधी लिहिलं आहे. माझे सासरे गेल्यावर सगळे पेपर व्यवस्थीत असूनसुध्दा पुण्याच्या महानगर पालिकेत नवर्‍याला वडिलांच डेथ सर्टिफिकेट्साठी बर्‍याच फेर्‍या मारायला लावल्या होत्या खालील कारणे सांगून.

१. आज साहेब आलेले नाहीत
२. आज साहेब कामात आहेत
३. आज निवडणूका आहेत त्यात सगळे बीझी आहेत. (त्याचा काही संबंधनाही)
४. उद्या काम होईल. ( हा ४था उद्या होता.)

शेवटी नवर्‍याने विचारलं काय चाललय काय? तर म्हणे चला चहा पिऊन येऊ या. तेंव्हा नवर्‍याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने सांगितलं मला चहा प्यायचा नाही किती पैसे तर तर निर्लज्जपणे म्हणे २५० रुपये द्या आताच काम होऊन जाईल. म्हणजे डेथ सर्टिफिकेट तयार होतं पण पैसे खाल्याशिवाय द्यायच नव्हतं. जिथे डेथ सर्टिफिकेटमध्येपण पैसे खावेसे वाटतात त्या माणसांना इतर कशासाठी पैसे घ्यायला जनाची नाहितर मनाची तरी लाज वाटायची काही शक्यता आहे का?

अशावेळी आपल्याला नालायक म्हणण्यापेक्षा यंत्रणा किंवा इतर तेथे काम करणार नालायक म्हणणं बरोबर होईल. अडला हरी गाढवाचे पाय धरी जास्त बरोबर वाटतं.

पुणे महानगरपालिकेत मला एक जन्माचा दाखला कुठलेही वरचे पैसे न देता मिळाला. मला विचारले घाई आहे का. नाही म्हटल्यावर उद्या या म्हणाले. म्हटलं येतो. दुसर्‍या दिवशी दाखला तयार होता. १० रू भरावे लागले त्याची रितसर पावती मिळाली.
मला वाटते काही लाच खाणार्‍यांनाही वेळेची किंमत असते. त्यांना कमीतकमी वेळ कटकट करून जास्त पैसे मिळवायचे असावेत. त्यांच्याकडे जितका वेळ आहे त्यापेक्षाही जास्त रिकामा वेळ आपल्याकडे आहे असे आपण दाखवले तर त्यांचा नाईलाज होत असावा.
एक उपाय करून पहायला हवा. अशा ठिकाणी एक भिकार कवितांचे पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचायची तयारी ठेवली तर काय होते ते पहायला हवे. "सर्टिफिकेट रेडी नाही म्हणता. हरकत नाही. आता आलोच आहे तर ही कविता ऐकवतो तुम्हाला." कॉलेजात असताना एका शिपायाला कवितांची भिती घालून मी काम करवून घेतले होते.

लेख चांगला लिहिलाय. पण "आपण सगळेच नालायक आहोत" मधला 'सगळेच' हा शब्द जरा खटकला.

कुठे आहे सगळेच हा शब्द?

पुण्यात आम्हालाही मुलाचा जन्म् दाखला आणि सासूबाईंचा मृत्यू दाखला हे दोन्ही दाखले एकही पैसा लाच न देता आणि वेळेत मिळाले आहेत. २००९ साल. - सातारा रोडवरील म. न. पा. कार्यालय.

>>>>> अशा ठिकाणी एक भिकार कवितांचे पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचायची तयारी ठेवली तर काय होते ते पहायला हवे. Lol Lol Lol उपाय करायला हवा!
अन पुस्तक कशाला? माबोवर रोजच्या रोज रतिब अस्तोच की, घ्यायच्या छापुन!

असा "तळतळाटाचा खाल्लेल्ला पैसा" पचत नाही ही "प्रॅक्टिकल पापपुण्याची धार्मिक" भिती बर्‍याच ठिकाणी कामास येते, पण ज्यान्ना "कम्युनिस्ट क्रान्त्या" करायच्या आहेत, ते हीच सिस्टिम अजुन कशी भिकार बनुन लोकान्ची माथी कशीकधी सामुहिकरित्या भडकतील याची वाट बघत अस्तात! Happy