हा लेख मी आधी, ललित विभागात टाकला होता. तिथे काहि अनपेक्षित प्रतिक्रिया आल्याने, हा या विभागात हलवत आहे.
हा लेख म्हणजे एक वैयक्तिक, पण तरिही १०० टक्के वास्तव अनुभव आहे. वैद्यकिय क्षेत्राची, वा कुठल्याहि वैद्यकिय पदवीधराची अवहेलना करण्याचा माझा हेतू नाही. या क्षेत्राबद्दल, असावा तेवढा (च) आदर मला नक्कीच आहे.
या क्षेत्राबद्दलची काहि विधाने इथे आलीच असतील, तर ती केवळ, माझ्यासारख्या सामान्य माणसाची मते आहेत.
जिज्ञासूनी या लिंक्स बघाव्यात
http://en.wikipedia.org/wiki/Jaundice
http://en.wikipedia.org/wiki/Yellow_fever
जाणकाराना अशी विनंति आहे कि या वेबसाईट्स् वरची माहिती, चुकीची वा कालबाह्य असेल, तर तिथे अवश्य सुधारावी.
तसेच या लेखाचा मूळ हेतू हा वैद्यकिय क्षेत्र नसून, सरकारी कारभाराचा भोंगळपणा, हा आहे, हे लक्षात घ्यावे.
दिनेश
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
पिवळा ताप. नाव ऐकलय कधी ? बहुतेक नसावे. पिवळा ताप म्हणजे काविळ नव्हे. काविळीत ताप येत नाही आणि काविळीला तर अलोपथी, आजारच मानत नाही.
म्हणजे पिवळा ताप हे काहितरी वेगळेच प्रकरण आहे. होत नाही सहसा कुणाला, पण झालाच तर अगदी ८५ टक्के खात्री आहे म्हणायची. खात्री कसली म्हणून काय विचरता, अहो झालाच पिवळा ताप, तर उघडले स्वर्गाचे दार, असेच म्हणायचे. म्हणजे ८५ टक्के तरी नक्कि उघडले, बाकिचे १५ टक्के, हे तूमच्या पुण्याईवर अवलंबून.
तर माझ्यासाठी हा मार्ग बंद झाला आहे. म्हणजे तसा मी माझ्या हातानेच बंद करुन घेतलाय म्हणा. तर त्याची हि कथा.
आता तूम्ही ऐकलाच नाही हा ताप म्हणजे. इंपोर्टेड असणार. तसे आपण आता बरेच जागतिक आजार इंपोर्ट करतो ना. चिकन गुनिया, मॅड काऊ तर अलिकडची उदाहरणे, एड्स पण असाच इंपोर्टेड.
पण अजूनतरी उपलब्ध नाही हा आजार आपल्याकडे. कारण याच्या आयातीवर कडक निर्बंध आहेत. नुसते तुमच्या अंगात याचे जिवाणु का विषाणु आहेत अशी शंका जरी आली तरी, तूम्हाला तब्बल दहा दिवस एका ठिकाणी, म्हणजे एका क्वारंटाईनमधे डांबून ठेवतात. अगदी वाळीत टाकतात म्हणा ना.
आता हा रोग, आफ़्रिकेत आहे म्हणे. म्हणे अशासाठी लिहिलय, कि तिथे पाच वर्षे राहुनदेखील, मला तो आढळला नाही. तिथल्या डॉक्टरानी, पण आम्ही तो कधी पाहिलाच नाही, असे निक्षून सांगितले. पण भारतासकट अनेक सरकारांचे असे म्हणणे आहे कि तिथे तो आहे. आता सरकारच असे म्हणते, म्हणजे तो असणारच ना. सरकार म्हणते महागाई नाही, तर आपण ते मानतोच ना, म्हणजे मानावे लागतेच ना, तसेच हे.
आता आपले सरकार काळजीवाहू. म्हणजे तसे काळजीवाहू नाही तर असे काळजीवाहू. म्हणजे बघा, एक सॅनिटरी इंस्पेक्टर असतो, एखादा बॉयलर इंस्पेकटर असतो, तर एखादा ई एस आय सी इंस्पेक्टर असतो. कित्ती काळजी असते कि नाही त्याना, सगळ्यांची. मग आपण त्यांची थोडी काळजी घेतली तर काय बिघडले. तर काय सांगत होतो, आपले सरकार काळजीवाहू. आपल्या नागरिकांची त्याना काळजी असणारच ना ?
तर या आपल्या सरकारने, ऐत्याशिक काळात, देवीचे जसे समूळ उच्चाटन केले. ( म्हणजे किमान तसा दावा केलाय. अगदी हज्जार रुपयांची पैज लावलीय ) आणि जसे सांप्रत काळी, पोलियोचे उच्चाटन करण्याचा चंग बांधलाय. ( लक्षात आहेना पुढचा रविवार कधी आहे तो. हि पोलियोवाली मंडळी अगदी घरी आणि रेल्वे स्टेशनवरतीदेखील पिच्छा पुरवतात. स्टेशनवर एका ट्रेकवरून येताना, माझ्या पाठीवर सॅक होती, तर मला हटकलेच.पाठीच्या बॅगेल लहान बाळ आहे का असे विचारले. एकदा तर गिर्या बरोबर असतानापण हटकले होते. पण म्हंटलं, पुण्याचं काम करताहेत. उगाच का चिडा ) तर या सरकारने पुरेशी तजवीज केलीय, कि हा पिवळा ताप नामक महा भयंकर आजार, आपल्या देशात अजिबात येऊ द्यायचा नाही.
तर त्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून, सरकारने आफ्रिकेत जाऊ इच्छिणार्या पिवळ्या तापाची लस द्यायची सोय केली आहे. आता आफ़्रिकेत तूम्ही विमानाने जाऊ शकता किंवा बोटीनेदेखील. विमान पकडायला तूम्ही सहारला जाणार आणि बोट पकडायला जाणार, फ़ोर्टात, म्हणून दोन्ही ठिकाणी हि सोय आहे. सहारला एका फ़्लायओव्हरच्या खाली, पत्र्यानी बंद असलेल्या जागी, ( पत्र्याला तूमच्या सोयीसाठी एक भगदाड आहे पण पत्रे पडू नयेत म्हणून खाली आणि वर, आडवे दांडे आहेत, खालच्या आडव्या दांड्याला न अडखळता आणि वरच्या दांड्याला डोके आपऊन न घेता, ते ऑफ़िस शोधायची जबाबदारी तूमची ) अडगळीच्या दोन खोल्यांच्या मधे, हे एक छोटेसे क्लिनिक आहे. आजूबाजूला चौकस नजरेने बघितलेत तर दिशा दाखव्ली आहे, तरी पण प्रत्यक्ष जागा सापडवणे, हे तूमच्या बुद्धीला आव्हान आहे.
तर समजा ती जागा शोधण्यात यशस्वी झालात तर, काहि सरकारी पाट्या तूम्हाला दिसतील. मुंबई हि पुण्यनगरी नसल्याने, या पाट्या खवट किंवा खवचट नाहीत, तर पहिल्या चाळीस जणानाच लस टोचण्यात येईल, आणि पासपोर्ट आणि टिकीट अत्यावश्यक आहे, असे नारिंगी रंगात लिहून काचेच्या आतल्या बाजूने लावले आहे. पण ते न वाचण्याच्या वेंधळेपणा मी केला.
दुसरी सोय आहे ते बलार्ड पियरला, वजु कोटक मार्गावर, सीफ़ेअरर्स असोसिएशनच्या इमारतईत. त्या इमारतीत बॅंकेपासून विंजीनीयर लोकांच्या परिक्षाकेंद्रापर्यंत अनेक ऑफ़िसेस असल्याने, तिथला नेमका दरवाजा शोधणे हेच एक दिव्य आहे. बाहेर बोर्ड लावल्याप्रमाणे ते केंद्र तिसर्या मजल्यावर आहे, तिसर्या मजल्यावर गेलात, तर अलिबागहून आत्ताच उतरलात का असे भाव तोंडावर आणत. तिथली कन्यका, खाली जाण्याचे फर्मावते. खाली गेलात तर एका बारिकश्या खिडकिसमोर काहि टायबिय लावलेले विंजीनीयर लोक, कसले तरी फ़ॉर्म्स भरून शिस्तीत उभे असतात. त्या खिडकीला बाजुने जरा झरोखा आहे, पण त्या माणसाला नाक पुसायला फ़ुरसत नसल्याने, त्याने नाक उडवत, लायनीत या असे सुचवून बघितले. मुंबईत लाईन कशी तोडायची, याचे काही नियम आहेत. उदा. रेल्वे तिकिटाची लाईन तोडायची असेल, तर कुपन्स लेनेका है, असे म्हणत पन्नासची नोट, मिरवत पुढे जायचे असते. पण कुठल्याहि लायनीत पुढे घुसायचे असेल, तर जरा एन्क्वायरी करनेका था, असे बोलले कि, बाकिचे त्यांच्या स्वभावानुसार, हमको क्या पागल कुत्तेने काटा है, जो लाईनमे खडे है, किंवा बाकि काहि खास शब्दात काहितरी सुनावतात, पण सहसा कुणी अंगचटीला येत नाही. त्यामुळे, आपण त्या गावचेच नाही, ( म्हणजे अलिबागचे आहोत ) असे भाव तोंडावर आणत, थेट खिडकिशी घुसायचे.
तर मी तसे केल्यावर, त्याने मानेनेच डाव्या बाजूला दिशादर्शन केले. आता त्या दिशेला मला एक बॅंक दिसली. म्हंटलं असेल बॉ, आजकाल पोस्टातच ग्रीटिंग कार्ड्स मिळतात तशी बॅंकेने पण खास सोय केली असेल. ( तेवढीच वरकमाई हो ) गेलो तिथे चौकशीला, तर अजून बॅंकेवर ती वेळ आलेली नाही असे भाव उजव्या बाजूला जायला सांगितले. तिथे उजव्या बाजुला जाण्यासारखे काहिच नसल्याने, माझा अभिमन्यु झाला, तर त्याने महाभारतातील प्रथेचा अवमान करत, मला बाहेर जायचा रस्ता दाखवला. बाहेर येऊन बघतो तर काय ? चक्क तिथे लसीकरण केंद्र. पण हाय, ते तर बंद होते. दाराच्या वरती एक तुटकी पाटी, त्या दाराबद्दल माहिती देत होती. बंद दारावर धडका मारल्याहि असत्या, पण दाराला कुलुप.
बाहेर आलो तर, पायरीवर, काहि मंडळी, सुईणीची वाट बघत बसल्यागत अवघडून बसले होते. तिथे सहज चौकशी केली तर रात्री साडे अकराला येऊन, नंबर लावून बसले आहेत असे कळले. आता रात्री साडेसहा नंतर जिथे माझ्या अंगात, बलार्ड पियर भागात जायची हिम्मत नाही ( जाणकाराना कारणे वेगळी सांगायला नकोत ) तिथे रात्री अकरा बिकरा ला कुठे जाऊ ?
मग परत आलो सहारला. दुपारचे पावणेबारा झाले होते. लसीकरण केंद्र तीन वाजता उघडणार होते, आणि माझा नंबर होता ५६. म्हणजे दारावर तशी यादी होती, त्यात माझा नंबर मीच लिहिला होता. आता तीन तास काय करायचे ? भूकहि लागली होती, मग चायनीज फ़ूड, चायनीज किंमतीत देण्याचा दावा करणार्या यो चायनामधे गेलो. उभ्या उभ्या नूडल्स खाल्ल्या आणि अरायव्हल लाऊंजच्या व्हीजीटर्स एरियामधे जाऊन एक पुस्तक वाचून संपवले. तिथल्या तिकिट ( वट्ट ६० रुपयांचे ) विकणार्या मुलाने, कुठल्या फ़्लाईटमधे पाहुणे येणार अशीत, असे खवचटपणे विचारलेच, तर मी पण त्याला समोरच्या बोर्डावरच्या, एका नेमक्या प्रोव्हिजनल फ़्लाईटचे नाव त्याला सांगून टाकले.
अडीज वाजता त्या सेंटरवर गेलो, तर तिथे जत्रा लोटलेली. दरवाजा उघडला होता, पण सर्वात आधी सगळ्याना बाहेर काढण्यात आले. मग दोन माणसे बाहेर आली आणि नावानुसार ते प्रत्येकाला बिल्ले देऊ लागले. बिल्ले मिळालेले सिकंदराला जग जिंकल्यावर झाला नसेल तेवढा आनंद दाखवत होते. ( मला खात्री आहे त्याच्या सैनिकाना पिवळा तापच झाला असणार ) पण वासरात लंगडी गाय शहाणी, त्याप्रमाणे आफ़िकेतल्या तब्बल पाच देशाना भेट दिलेला मी एकमेव होतो, आणि आधीदेखील ही लस टोचून घेतलेला मी एकमेव. ( आता घ्या, आधी जाऊन नव्हतो का आलो मी आफ़्रिकेत, पण ते १९९३ सालची गोष्ट. आणि या लसीची मुदत, केवळ १० वर्षे, म्हणुन तर तडमडत होतो ना इथे. ) त्यामूळे, काय हो काय परिस्थिती आहे सध्या तिथे पासून इंजेक्शन कितपत दुखतं, अश्या अनेक प्रश्नाना मी उत्तरे देत होतो. तिथे उभे असलेले अनेक केनया सफ़ारीला पर्यटक म्हणुन जात होते, त्यापैकी बायकाना, केनयात शॉपिंग कसले करायचे, याच्या टिप्स हव्या होत्या. काहि तरूण मंडळीना, लेक न्याहारुरु मधे या दिवसात फ़्लेमिंगोज दिसतील का, याची काळजी होती. पण तरिही मला इंजेक्शन मिळणे शक्य नव्हते. त्याची कारणे अनेक.
१. मायबाप सरकारच्या मते, दिवसाला केवळ चाळीस लोक, भारतातून आफ़्रिकेत जातात. ( एकट्या मुंबईहून किमान अर्धा डझनभर फ़्लाईट्स, रोज आफ़्रिकेत जातात. हे अंतिम सत्य, पण सरकारी सत्य वर लिहिल्याप्रमाणे. हि दोन्ही सत्य वेगवेगळी असतात, याची आपल्याला पुर्ण कल्पना आहेच. )
२. तिकिटाशिवाय लस देत नाहीत. ( आता इथे शृंगापत्ती किंवा मराठीत डायलिमा का कायसे म्हणतात ते झालेय, म्हणजे पिवळ्या तापाची लस घेतल्याशिवाय व्हिसा दिला जात नाही. व्हिसा नसेल तर काहि कंपन्या तिकिट देत नाहीत, आणि तिकीट नसेल तर लस टोचत नाहीत. )
आता ५६ हे ४५ पेक्षा जास्त आहेत, एवढे समजण्या इतके माझे गणित बरे आहे. ( घ्या आता चाळीस चे पंचे चाळीस कसे झाले, म्हणुन विचारु नका. तेवढी माणसे गैरहजर असतातच. ) त्यामुळे मला लस मिळणे शक्यच नव्हते आणि कुठे जाण्याचा काहि प्लॅन अज़ुन नक्कि नसल्याने, माझ्याकडे तिकीट नव्हते. पण तेवढ्यात एक शहाणपणा मी केला. ( अधूनमधून मला शहाणपणा सुचतो बरं ) बाराव्या नंबरवाल्याकडे त्याने साधारण केव्हा येऊन नंबर लावला, त्याची चौकशी केली, तर त्याने पहाटे चार वाजता आल्याचे सांगितले.
कुठल्याही ठिकाणी वेळेच्या आधी किमान तासभर हजर राहण्याची मला खोड आहे. ( याचा माझ्या मित्राना खुपच त्रास होतो, म्हणजे खरे तर उशीरा आल्याबद्दल भरपूर टोमणे मारुन मीच त्रास देतो. ) आणखी एक मी लक्षात ठेवले होते कि ते केंद्र, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असते. गेल्या सोमवारी बुद्धपोर्णिमेची सुट्टी होती, म्हणुन ती टाळुन मी लस मिळवायची योजना आखली. रात्री दोन वाजता उठून मी एअरपोर्टला गेलो. ( जाताना सांगितले नाही म्हणुन वहिनीचा फ़ोन आलाच ) मुंबईत एवढ्या भल्या पहाटे चांगलीच जाग असते, रिक्षा वगैरे लगेच मिळते. तर तिथे पोहोचलो तर दारावर यादीच नाही. आता काय करायचे. तिथल्या काहि गणवेशधारी लोकांकडे चौकशी केली, पर पिवळा ताप म्हणजे काय आणि त्याची लस का घ्यायची असते, यापासून सुरवात. पण हार मानणार्यातला मी नाहीच. म्हंटले नसेना का यादी, आपण लावु या. आता यादी करायला कागद हवा ना, तो कुठुन आणायचा. एअरपोटवर कुठे मिळणार मला कागद ? मग त्या केंद्राच्या बाजूच्या अडगळीच्या खोलीत शिरलो. नशीबाने तिथे लाईट होती. जरा उचकापाचक केल्यावर मला तिथे कहि कागद मिळले. खरे तर ती महत्वाची कागदपत्रे होती, म्हणजे साधारण २००४ साली, कूणा एकाला, तिकिटाशिवाय, कुणालातरी सोबत म्हणून थेट विमानात जायची लेखी परवनगी वगैरे. पण एक बाजू कोरी होती ना, मग झाले.
माजा पैला नंबर असे म्हणत मी, त्या कागदावर माझे नाव वगैरे लिहिले. आता चिकटवु कशाने. मग तिथल्या पाटीच्या फ़टीत तो कागद सरकावला. पण खात्री वाटेना, म्हणून आणखी एक कागद घेऊन तिथल्या खिळ्याला टोचला. तरीपण खात्री वाटेना, वारा पाऊस आला तर काय घ्या, म्हणुन आणखी एक यादी करुन ती दरवाज्याची फ़टीतून आत सरकावली. घ्या म्हणजे तिहेरी खात्री झाली कि नाही. आता मी निर्धास्त होतो. पण तरी जरा धाकधूक होतीच, म्हंटले आणखी एखादे नाव यादीत असले तर बरे, म्हणुन कुणी येतेय का त्याची वाट बघत बसलो. अनिवार झोप येत होती, दर अर्ध्या तासाने कॉफ़ी पित होतो, तरी कुणिही तिथे फ़िरकले नाही. पण मी ते तिन्ही कागद जागेवर असल्याची खात्री करत, घरी जाऊन झोपलो.
दुपारी जेऊन खाऊन, इच्छित स्थळी पोहोचलो. आधी जाऊन यादी बघितले. माझे नाव पहिले होतेच शिवाय माझ्याखाली किमान ५५ नावे होती. मी निर्धास्त झालो. जाताना मी टिकेट घेऊन गेलो होतो. ( भलत्या शंका काढायच्या नाहीत, मायक्रोसॉफ़्ट वर्ड ज्याना येते, त्याना कुठलेही तिकिट पैदा करता येते. ) जरा इकडेतिकडे भटकून, विमानतळाच्या नेमक्या कुठल्या भागात दुष्काळी कामे काढली आहेत त्याची पहाणी करुन आलो. ( गेली १८ वर्षे सहारला नियमित भेटी देतोय, बांधकाम चालू नाही, असा दिवस आठवत नाही ) पावणेतीनपर्यंत जत्रा भरलीच होती. ( फ़क्त फ़ुगेवाले आणि पिपाण्याच काय त्या नव्हत्या ) आता माझा पैला नंबर म्हणत मी जरा बेफ़िकीरीत होतो. तीन वाजले तरी दरवाजा उघडेना, म्हंटले, अपना इंडिया है. थोडे मागेपुढे व्हायचेच. साडेतीन वाजले तसा सगळ्यांचाच संयम सूटला. पण चौकशी करायची कुठे. शेवटी तिथल्या बॅंकेतल्या माणसाने ( चौकशी केल्यावर ) सांगितले कि, आज केंद्र सरकारची रजा असल्याने, आज ते बंद राहील. घ्या म्हणजे, उत्तर भारतीयांच्या कॅलेंडरमधे महिन्यांचा घोळ असतो हे माहित होते, पण चक्क पोर्णिमा मागेपूढे होत असाव्यात ?
आता जमावाचा राग अनावर झाला होता. देखो कलभी यहि लिस्ट होगी, असे एकाने सांगितले. बाकिच्यानी दुजोरा दिला. पण ठरवणारे आम्ही कोण ? त्या सायबाना पटायला हवे ना ते. ( त्या यादीच्या उरलेल्या भागावर अनेक जणानी, शेरे लिहिले. शेरे म्हणजे शेरोशायरीतले शेरे नव्हेत तर, आज कुठल्या XXX ने सांगितले कि रजा आहे म्हणुन, असे शेरे )
झाले, माझे डोके जरा जास्तच वेगाने फ़िरु लागले. मी आणखी एक लिस्ट वर्डवर तयार केली. वरती चांगले वेळकाळ म्हणजे स्थळ आणि तारिख वगैरे टाईपले. माझे नावही टायपून घेतले. बाकिच्या लोकांच्या सोयीसाठी चाळीस अनुक्रमांक आणि रकाने तयार केले. तो कागद आणि गोंदाची बाटली घेऊन, रात्री साडेअकरालाच तिथे गेलो, आधीची लिस्ट, त्या शेर्यासकट तिथे होतीच, तिच्या बाजूला माझी नविन यादी चिकटवली. दोन्ही यादीत माझा नंबर पहिला.
परत दुपारी दोन वाजता तिथे पोहोचलो, जत्रा नेहमीप्रमाणेच. आधी जाऊन यादी बघितली, तर दोन्ही याद्या गायब. आता मात्र जबरदस्त सस्पेन्स.
मग तिथेच ठिय्या देऊन बसलो. शेवटी एकदाचा पावणेतीनला दरवाजा उघडला. एक बाई, एक बुवा आणि एक मुलगा याना आत घेऊन, बाकिच्याना बाहेर पिटाळले. आता हे तिघे, सरकारचे जावई, किमान लस देणार्याच्या सासरची मंडळी असणार हे नक्की. आपल्या भारतीय थोर संस्कृतीच्या परंपरेमधे, जावई आणि सासरच्या मंडळींचे पाय्देखील धुवायचे असतात, असा नियम आहे. त्यापुढे क्षुद्रशी लस, म्हणजे किस झाडकि पत्ती हो. तेवढ्यात मी त्याच्या हातातली यादी, मागून बघितली.
बाहेर तो माणुस ती यादी घेऊन आला, तर कुण्या पी स्रीनिवासा अय्यरने माझे प्रिंट केलेले नाव खोडून स्वतःचे नाव लिहिले होते. मग मात्र मी रुद्रावतार धारण केला. त्याक्षणी जर तो मद्राश्या, समोर आला असता, तर राज ठकरेला मधे पडावे लगले असते, असा काहितरी राडा झाला असता. मी आरडाओरडा सुरु केला, त्यामुळे घाबरून त्या प्राण्याने समोर यायचेच टाळले.
शेवटी मी पहिला नंबर आणि ती लस मिळवलीच.
आपले सरकार काळजीवाहू आहेच मुळी.
अरे व्वा..
अरे व्वा.. पिवळा ताप? तुला पण घ्यावा लागला का? काय करणार? आफ्रिकेला जायचंय ना? मग घे ताप..
मी पण घेतला होता.. आफ्रिकेत असतो की नाही ते माहीत नाही, पण येताना तुम्ही थोडा (लसीच्या रूपात) घेऊन यावा अशी जबरदस्ती असते तिथे.
विनय
पिवळा ताप
पिवळा ताप डोक्याला ताप

चांगल लिहिल आहात की.
BTW गिर्या सोबत असताना पोलिओचा डोस त्याला दिलात का अस तर नाही ना विचारले
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
'यलो' 'यलो'
'यलो' 'यलो' जी सनम हम आ गये
आज फिर लस लेके..
अजी इतना भी गुस्सा करो नही जानी
ये पीला पीला फिवर है बडी परेशानी..
कही न आये साथ तेरे....
अरे भाइ मेरे.........
... फॉरिनमधून नवे आजार आपल्या देशात येऊ नयेत म्हणून हा सगळा खटाटोप असतो. लेख मात्र छान आहे... अपूर्वाइ की पुर्वरन्ग कशात तरी याच विषयावर एक लेख आहे... साधारणपणे असाच अनुभव..
पु लं च्या काळापासून आज अखेरही सरकारची सेवा मात्र त्याच क्वालिटीची असेल तर हा मात्र चिन्तेचाच विषय मानावा लागेल..
विनय, एकदा
विनय, एकदा या दिव्यातून गेले, कि दहा वर्षे ताप नाही.
झकासा, बरोबर ओळखलस.
डॉक्टर, तूमच्या सकारात्मक प्रतिक्रियेने खुप आनंद झाला. कुठलिही गोष्ट सरकारी कारभारात अडकली, कि कसा बट्याबोळ होतो त्याचे उदाहरण आहे हे.
म्हणातात ना, सरकारी काम आणि दहा वर्षे थांब !!
सही
सही आहे...मज्जा आली वाचुन्...
.
दोन्ही यादीत माझा नंबर पहिला >>> लय भारी
.
एक भा प्र - तुम्हाला लस मिळाली पण "गिर्या" ला पोलिओचे दोन थेंब दिले कि नाही शेवटी ? कि गिर्याको देते देते पोलिओका दो थेंब निचुच गिर्या
सा.
सा. आफ्रिकेला पण हा "ताप" घ्यावा लागतो का रे.?
खतरी अनुभव अहे एकदम
योग, इथे
योग, इथे लिस्ट आहे, देशांची. पण माझ्या ट्रिका वापरा, नक्किच यशस्वी व्हाल. मुंबईत नाहिच मिळाले तर अहमदाबादला नाहितर थेट कांडला बंदरात जावे लागते.
http://www.who.int/ith/countries/2008_country_list.pdf
सिंड्रेला, गिर्या माझ्याबरोबर होता, त्यावेळी नियमित नेत असे मी त्याला, आता लग्न झाल्यावर बायकोने नेले पाहिजे.
अजुन दहा वर्षे तरी डोस द्यावे लागतील त्याला.
दिनेशदा,
दिनेशदा, छान लिहिलय... पिवळंधम्मक!
एक शंका - कुण्या पी स्रीनिवासा अय्यरने ..... ह्यात श्रीनिवासा हवय की रागारागाने केलेला 'स्त्री'निवासा असाच उल्लेख आहे? की हा वेगळाच शब्द आहे?
स्पेलिंग
स्पेलिंग तर तसेच होते. आता माझे ठळक नाव खोडून स्वतःचे लिहिताना, हात थरथरला असेलच ना ? तिथल्या आडव्या दांड्यावर चढून मी, कौन है ये अय्यर, सामने आओ, अशी आरोळी ठोकली.
घाबरला बहुतेक. हुडहुडी भरून ताप आला नसला, म्हणजे मिळवली.
दिनेशदा,
दिनेशदा, एकदम मस्त!!!! सही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पिपाण्या... स्त्रीनिवासा अय्यर.........
राज ठाकरे
राज ठाकरे !!! हाहाहा!!!
वाह मस्त
वाह मस्त लेख. अरे दिनेशदा अय्यर ना घबरवायच काम बाळ ठाकर्यांनी केल... ते पण एकदम चोख... राज भय्यांच्या मागे लागला आहे.
दिनेश ठाकरे आगे बढो...:)
विनोदी पण
विनोदी पण अतिशय वास्तवदर्शी!
)
आयला, कोणत्याही रान्गेत उभ राहुन तन्गडायला कस होत ते ज्याला रान्गेत उभ रहाव त्यालाच कळत!
(देव करो, मला आफ्रिकेत जायची वेळ न येवो!
दिनेश,
दिनेश, अनुभव विनोदी आहे पण विनोदी लेखन म्हणून पटत नाहीये
ललित वाटता वाटता राहून जातं आणि शेवटी फक्त "एक अनुभव" राहतो. विनोदी लेखनासाठी जे पाहीजे ते असूनसुद्धा.
असो. लगे रहो.
दिनेशदा........
दिनेशदा........... मला ही लस घ्यावी लागणार आहे................. आजही ही सिस्टिम अशीच आहे का ? सहारा सोपे आहे की फोर्ट सोपे आहे.. ?
दिनेशदा,
दिनेशदा, सहारावर जाऊन आलो... 'पीतक्षेत्रा'ला भेट दिली..... सरकार थोडे शहाणे झालेले दिसते.. ( एअरपोर्टवाले बहुधा मायबोली वाचत असावेत!) आता तिथे दररोज रात्री एक पुठ्ठा अडकवला जातो... त्या पुठ्ठ्यावर एक कागद डकवला जातो ( सरकारमार्फत ! आपल्याला न्यावा लागत नाही.. ) त्यावर आपापली नावे लिहायची... त्या कागदावर तीन ( की चार?) सिंहाची राजमुद्रा असते ! त्यामुळे ही यादीच ग्राह्य मानली जाते.... रात्रीपासून नंबर लावणं, जत्रा ( पिपाण्या-फुगे नसलेली) , क्यु साठी भांडणे, दुष्काळी कामांची बांधकामं... . हे सगळे मात्र तसेच आहे.....
२००३ साली
२००३ साली चेंडुफळीचे महायुद्ध (विश्वचषक सामना) बघावयास मी द. आफ्रिकेत गेलो होतो. (बक्षिस म्हणुन मिळालेले free ticket घेउन :D) पण तेव्हा असा काही अनुभव आला नाही. कदाचित तेव्हा सर्व जण क्रिकेट ज्वराने पछाडलेले होते.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा