रद्दी

Submitted by चिन्नु on 19 May, 2008 - 21:31

खूप दिवसांपासून म्हणत होते...
रद्दी काढलीच शेवटी काल.

गिचमीड अक्षरे,
दूरवर अडखळत चालणार्‍या वाटा,
रांगोळीचे रंग,
गंधहीन पाकळ्या
-बरंच काही होतं साठून..

मनात कोरलेली अक्षरे पुरे झालीत
आता वह्यातली मोरपिसे काढलीत तरी चालतील बहुतेक.
रांगोळीचा पोत बदललाय कधीच
तुझे आवडते रंग कळत नाहीत आता
धुसर दिसतात फारच.

वाटा मोठ्या मनाने बुजून गेल्यात खर्‍या
पण तरी खुरट्या गवतात उगवून येते कधी कधी आठवण!

एक बोडकी फांदी होती शिल्लक
देवून टाकली ती पण भाड्याने
आता चिऊ विचारत्ये
तू कधी येशील म्हणून?

-चिन्नु

वाटा मोठ्या मनाने बुजून गेल्यात खर्‍या
पण तरी खुरट्या गवतात उगवून येते कधी कधी आठवण!
.
.
.
वा!! वा!! इतकेच म्हणतो.

चिनुबेन,
खुप खुप वेळा वाचावी लागली कविता.... अर्थपुर्ण आहे.... पण अर्थ प्रत्येक वेळी वेगळा लागला....
गंधहीन पाकळ्या... धुसर दिसणारे रंग... चिऊचा प्रश्न....सगळ सगळ सही!
(पेश्शल रिक्वेश्टः पुढची कविता जरा हलकी फुलकी कर... जल्ला डोस्क्यात जायला वेळ लागतो!)
Happy

गंमत म्हणून असंही एकदा लिहून पाहिलं Happy
धन्यवाद मयुरा.

गोबु, (मोठा झालास ना की कळेल हो तुला :)) धन्यवाद.

चिन्नू, गोबूदाला अनुमोदक (वेगवेगळ्या अर्थांबद्दल म्हणतेय... त्या जल्ला डोस्क्यात... बद्दल नाही :)).

वाटा मोठ्या मनाने बुजून गेल्यात खर्‍या
पण तरी खुरट्या गवतात उगवून येते कधी कधी आठवण!
.
.
असं तरल लिहिणं सोप्पं नाही... छानच!

होतं असं चिन्नू, होतं कधीकधी...
असं धीर सोडून कसं चालेल...

शेवटची फांदी पण देऊन टाकलीस भाड्याने म्हणून काय झालं?
ते वाळलेलं खुरटं गवत अजून उरलंय ना..
ते हिरवं होईल कधी चार पावसाचे थेंब पडल्यावर.. वाट बघ!!

शलाकाताई खूप खूप धन्सं..

वाट पाहणे नेहमीच जीवघेणे असते, ते ज..रा लांबले तरी धीर सुटत जातो. त्यावर खरडलेले शब्द.
चिऊला घरटे बांधायला तुझी माझी फांदी दिली, पण त्याने आठवणींचा पिच्छा काही सुटला नाही! रोज कुणी विचारायला सांगितल्यासारखं चिऊ तुझ्याबद्दल विचारायला लागली! Happy

गोबु, परत एकदा धन्सं.

साजिरा, तुमच्या गोजिर्‍या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद.

गवत हिरवं होईल पावसात पण पाउस संपल्यावर..? Happy

पाऊस संपायला कशाला हवा?
तो मनात असला, की मन 'उधाण वार्‍याचे' अन 'गुज पावसाचे' व्हायला वेळ लागत नाही....

Happy छान आहेत तुमचे विचार.
पुन्हा एकदा धन्यवाद.

चिन्नु ,
जबरदस्त ताकद. !!
.....................अज्ञात

ताकद!
तुमच्या प्रतिसादाने एकदम बाळगुटी दिल्यासारखे वाटले कवितेला Happy
धन्यवाद.

भारी...
Happy
चिन्नू... मस्त..!!

पण अशी रद्दी प्रत्येकाने जपावी मनाच्या खोल कप्प्यात...
कोवळ्या आठवणी जमलेल्या नकळत्या वयाच्या टप्प्यात...!!

काहीच्या काही यमक ना.. Wink

>>पण अशी रद्दी प्रत्येकाने जपावी मनाच्या खोल कप्प्यात...
कोवळ्या आठवणी जमलेल्या नकळत्या वयाच्या टप्प्यात...!!
अगदी अगदी आशु!
छान जमलय यमक Happy
धन्यवाद.