ते दुर दुर जाताना.....

Submitted by पार्थ देसले on 16 October, 2010 - 10:13

" ते दूर दूर जातांना ........."
तरुण पुरवणीतला आशिष जोशी यांचा 'निरोप' लेख वाचला .लेख फारचं छान होता. त्याला कारण तसेच .'निरोप' हा शब्द वाचला अन जाणीव झाली .आपल्यालाही आता निरोप घ्यावा लागणार .....'निरोप'घ्यावा लागणार त्या डी.एड .कॉलेजचा . ज्या कॉलेजची दोन वर्ष म्हणजे आयुष्याचा श्रावणच . दोन वर्ष कुठे निघून गेलीत कळलंच नाही. झाडावरचं फुल अलगदपणे गळून पाडाव अगदीच अशी गेलीत ही दोन वर्ष .आज मात्र या सगळ्याचा निरोप घ्यावा लागणार आहे .
१२वि उतीर्ण झाल्या झाल्या पळापळ सुरु झाली ती मिशन admission .निर्णय ठरला होताच डी. एड. करायचं .पण इतका सोपा नव्हताच हा प्रवास.सहज कोणी विचारलं काय करायचंय पुढे ? मी लगेचंच डी.एड. करायचं .प्रतिप्रश्न काय डी. एड .करायचंय ? या प्रश्नात एक कनिष्टतेचा भाव असायचा तर एक समाज मन अरे वा !डी. एड. करतोय म्हणजे शिक्षक होणार तर . आशा भिन्न प्रतिक्रिया आणि मतं घेत मी डी.एड. ला प्रवेश घेतला.
मनात फार उत्सुकता होती कसं असेल कॉलेज? नवीन मित्र मैत्रिणी शिक्षक, शहर? सारं सारं नवीन......... कॉलेजचा पहिला दिवस आजही आठवतो. नवीन मित्रांची, शिक्षकांची ओळख झाली. आमचे सिनिअर्स देखील उत्सुक होते आपल्या जुनिअर्सला भेटायला. अगदी पांढऱ्याशुभ्र गणवेशात त्यांना बघितले आणि जरा वेगळे वाटले. पण या दिवशी एक मात्र कळले, की हे एक वेगळाचं कॉलेज आहे. खऱ्या अर्थाने शिक्षणाचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न येथे होतो. अभ्यासक्रमाचा पहिला भाग म्हणजे सूक्ष्मपाठ यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्यातील सुक्त गुणांना, कौशल्यांला वाव मिळत होता. यानिमित्ताने काही नवीन मित्र मैत्रिणींशी भेट झाली त्यातून प्रत्येकाचे स्कील,आवड-निवड ,स्वभावहि कळले आणि खऱ्या अर्थाने काही जिवलग मित्र मैत्रिणींची भेट येथे झाली. बघता बघता दिवस जात होती या नंतर सरावपाठ मग सहलीचे नियोजन झाले इथे तर धमाल होती. नव्या मित्र मैत्रिणींबरोबर गड किल्ले, समुद्र किनारे,देवस्थान सगळं सगळं फिरून आलो. सरावपाठांना मात्र फार गमती व्हायच्यात. प्रत्यक्ष शाळेतील मुलांना शिकवताना फार फजिती व्हायची हो; पण पाठ चांगला झाला तर ती चिमुरडी अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायची अन डी.एड. करतोय याचे सार्थक वाटायचे. वादविवाद,वकृत्व,परिपाठ अशा अनेक स्पर्धांमध्ये फार मज्या यायची. कधी बोर व्हायची सगळी. पण लगेच 'फार छान बोललास' अशी शाबासकीही मिळायची. इतर कॉलेजचा रागिंग हा प्रकाराचा इथे स्पर्शही नव्हता.
संपूर्ण महाराष्ट्राचे दर्शन घ्यायचे तर आमच्या कॉलेजला यावं. मराठवाडा,विदर्भ,खानदेश,बागलाण,सर्व ठिकाणाचे मित्र मिळाले. यासगळ्यात आमच्याकडून जबाबदारीने सर्व गोष्टी करून घेणारे आमच्रे शिक्षक फार महत्वाचे. देसले सर म्हणजे चालत बोलत विद्यापीठ, तर ठाकरे सर म्हणजे एक माणूसपण जपणारा शिक्षक, तर देवरे madam शिस्तीला प्रेमाची जोड, तर हिरे madam एक प्रसन्न व्यक्तीमत्व. या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य बी. टी. पवार असा हा एक परिवाराच कॉलेजने मला दिला. या दोन वर्षांनी काय दिले असे विचारले तर मी चटकन उत्तर देयील ते मित्र! जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवले त्या मित्रांनी. प्रसंगी एकमेकाशी वाद घालणं पण त्याच वेळी एकमेकाला समजून घेणं, मिसळलो इतके एकामेकात की तो अन मी वेगळाच नाहीच इतकी हि मैत्री घट्ट होती आहे. याच कॉलेजमध्ये भेटला आत्मविश्वासू धनंजय,रसिक प्रशांत-भगवान,अल्लड दीपक , किरण,तुषार,सतीश,नाईक अन भेटल्यात अनेक मैत्रिणी ज्यांच्या येण्याने आयुष्य सुंदर असल्याची जाणीव झाली अशा गीता,सुनिता,स्नेहल,रूपा,किती अन कोणाची नावं घ्यावीत यातल्या प्रत्येकाने मला दिला आहे मैत्रीचा असा एक ठेवा जो मी कायम जपून ठेवीन.
याच कॉलेजने दिली आहे एक प्रेरणा ध्येयाकडे वाटचाल करण्याची,लागलीच कधी ठेच आयुष्याच्या वाटेवर तर दिला आहे आस्तेने विचारपूस करणारा एक आवाज, प्रेमाची अन मैत्रीची उब-गारवा, कॉलेजच्या प्रत्येक दिवसात दडल्या आहेत आठवणी काही अगदी खळखळून हसवणाऱ्या तर काही चटकन डोळ्यात पाणी आणणाऱ्या, त्याचवेळी करून दिलं आहे एका जबाबदारीचं भान, सामाजिक अपेक्षांची जाणीव. आठवणी गोड.........कडू.! यासाऱ्या आठवणींची शिदोरी घेऊन आयुष्याचा पुढचा प्रवास करायचा आहे. इतरांसाठी ही दोन वर्ष साधी असतील कदाचित पण; माझ्यासाठी आयुष्याचा अनमोल ठेवा आहेत ही दोन वर्ष. आज या सगळ्यांना निरोप देतांना मनातली विरहाची जाणीव प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. अन संदीप खरे यांच्या गाण्यातील त्या ओळी मनाच्या या अवस्थेला आपल्या शब्दात बांधून माझचं मन मांडतात
" हे भलते अवघड असते
कुणी प्रचंड आवडणारे
ते दूर दूर जाताना
डोळ्यांच्या देखत आणि
नाहीसे लांब होतांना
डोळ्यातील अडवून पाणी
हुंदका रोखुनी कंठी
तुम्ही केविलवाणे हसता
अन तुम्हास नियती हसते
हे भलते अवघड असते .........

गुलमोहर: 
शब्दखुणा: