ज्याची त्याची बांधीलकी

Submitted by मंदार-जोशी on 15 October, 2010 - 05:36

स्थळः एका मोठ्या कंपनीची मोठी कॉन्फरन्स रूम.

विषयः व्यक्तिमत्व विकास आणि मनःशांती (किंवा तत्सम काहीतरी).

वक्ता: एक नावाजलेला समुपदेशक. बाकी चर्चा झाल्यावर तो एक प्रश्न विचारतो, "काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो?"

आलेल्या उत्तरांपैकी बहुतेक उत्तरे मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा तत्सम स्पर्धांमध्ये त्या ललना देतात त्यासारखीच उत्तरे. काही खरी, काही खोटी. म्हणजे "मला गरीबांची सेवा केल्यावर आनंद मिळतो", "मला रुग्णसेवा करण्यात आनंद मिळतो", "मला कुठल्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर आनंद होतो", वगैरे.

"मला दु:खी-पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही", एक कर्मचारी उत्तरतो.
झटक्यात सगळ्यांच्या नजरा 'हा आहे तरी कोण प्राणी' हे बघायला त्याच्याकडे वळतात.

"मला समाजसेवेत आनंद मिळत नाही", तो पुन्हा बोलतो.

"तुम्ही तुमचं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगाल का?" आता समुपदेशकाची उत्सुकताही चाळवली गेली असते.

"मला आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, माझ्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, वगैरे.
मी समाजसेवा हे एक प्रकारची बांधीलकी किंवा कर्तव्य म्हणून करतो, कारण माझा आनंद हा 'इतरांना दु:ख असणे' यावर अवलंबून नसतो. My happiness does not depend on others being unhappy."

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

ही गोष्ट ऐकल्यावर मी विचारात पडलो. खरंच समाजकार्यात आनंद मिळतो असं सांगणारे फसवा आनंद तर मिळवत नाहीत? हे नक्की कसलं लक्षण आहे? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आनंद शोधणे ही एक प्रकारची विकृती आहे का? एकटेपणा घालवायला, काही कारणाने दु:खी झालेले मन रमवायला, वेळ आहे हाताशी म्हणून तो घालवायला (किंवा सत्कारणी लावायला) किंवा अशाच काही कारणांमुळे जेव्हा समाजसेवा केली जाते तेव्हा त्यात त्यात स्वार्थ गुंतल्याने हेतू शुद्ध राहत नाही, मग पुण्य मिळणं वगैरे तर दूरच. तुम्हाला काय वाटतं?

गुलमोहर: 

विषय चांगला आहे.
ज्ञानेश अनुमोदन!!

<<अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता आंदोलन, एडसविरुद्ध जनजागृती इ. ह्या त्या दुसर्‍या प्रकारच्या समाजसेवा झाल्या..<<>> अनुमोदन !! यात 'कुटुम्ब नियोजन' पण अ‍ॅड करुया.
आणि अशी समाजसेवा कराणार्‍यांचे मला जास्त कौतुक वाटते. कारण ते ज्यांच्यासाठी काम करतात ते लोकच त्यांना विरोध करतात.

अशाप्रकारचे समाजकार्य करणार्‍यांचा नेहमीच गौरव होतो असे नाही. जसे की र. धो. कर्वे यांनी सुरु केलेले कुटुम्ब नियोजनाच्या प्रसाराचे कार्य. त्यांना समाजाकडुन कौतुक किंवा साथ तर सोडाच पण प्रचंड टीका , विरोध सहन करावा लागला.
आजकाल चे माहिती अधिकाराचा वापर करुन भ्रष्टाचार उघड करु पहाणारे कार्यकर्ते. त्यांच्यावर तर शारीरिक हल्ल्याची सुद्धा भीती असते.
हे सर्व लोक 'ध्यास' घेऊन काम करत असावेत असे वाटते. लोक कौतुक करतायेत का टीका याचा त्यांच्यावर फारसा परीणाम होत नसावा.

<<'कुटुम्ब नियोजन' ? ते कसं काय<<>> 'कुटुम्ब नियोजन' प्रचार आणि प्रसार करन्यासाठी कष्ट घेणारे सामाजिक कार्य्कर्ते

वीरा, मनस्मी, डेलिया...धन्स!!! Happy
डेलिया खरंच 'कुटुंब नियोजन' यात अ‍ॅड करायला हवंच... अजूनही या क्षेत्रात जनजागृतीची गरज आहे... १९२१ साली र.धो. कर्वेंनी कुटुंब नियोजनाचं केंद्र भारतात सुरु केलं...पण त्याच्याही आधीपासून ते आणि त्यांच्या पत्नीने किती प्रचंड हाल सोसून या विषयावरची माहिती लोकांना कळकळीने सांगायचा प्रयत्न केला होता, हे अमोल पालेकरांचा "ध्यास पर्व" चित्रपट पहात असतांना जाणवले... सिंडरेला, शक्य झाल्यास हा चित्रपट पहाच... खुपच छान मांडलाय हा विषय त्यातून...
डेलिया, सामाजिक कार्य अथवा सेवा याची व्याप्ती विचार करायला गेलं तर प्रचंड आहे... बर्‍याच साध्यासाध्या गोष्टी आपल्या देशातल्या निरक्षर लोकांना माहितच नसल्याने ते खास गरिबांसाठी असणार्‍या सोयींना मुकतात... साधीच गोष्ट, आता दारिद्र्यरेषेखालील लोकांना रेशन कार्डावर स्वस्तदरात धान्य मिळते हेच अनेक लोकांना माहिती नसते. आणि समजले तरी बर्‍याच लोकांच्या जन्माची कागदोपत्री नोंद नसते, हे अजूनही भारतात दिसते...
माझे वडिल मला म्हणाले होते, आपण ह्या लोकांसाठी काम करु या. त्यांना रेशनकार्ड मिळेल अशी काही सोय करता येईल का, ते पाहू या... आम्ही त्या कामाला आमच्या घराजवळील झोपडपट्टीत सुरुवातही करणार होतो, पण काही कारणाने ते आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो नाही... कालांतराने तो विषयही विस्मरणात गेला...

असो, विचार केला, तर अशा बर्‍याच करण्यासारख्या आणि आपल्याला करायला सहज जमण्यासारख्या गोष्टी आहेत... फक्त करायची इच्छा मात्र हवी... Happy

समाजसेवा हा शब्द सोशल सर्व्हिसचे भाषांतर असेल का? सर्व्हिस या शब्दापेक्षा सेवा या शब्दात एक वेगळी छटा आहे. आपल्याकडे माता पित्यांची, गुरूची , देवाची देवा केली जाते, तो सेवा करून घेणार्‍याचा अधिकार असतो. तेच रुग्णसेवा....इ...तत्सम सेवांमध्ये एक करुणेचा आणि सेवा करणार्‍याने आपल्या विहित कर्तव्यापलीकडे जाऊन काहीतरी केल्याचा भाव जाणवतो. तेव्हा मला समाजकार्य हा शब्द वापरायला आवडेल.
बाबा आमटे, डॉ. अभय बंग , मदर तेरेसा, महात्मा फुले इत्यादींनी समाजकार्य हाती घेतले कारण ते समोर दिसलेली परिस्थिती पाहून आपण काही न करता राहणे त्यांना अशक्य झाले. आणि जे काही करावेसे वाटले ते करण्याइतके मनोधैर्य त्यांच्याजवळ होते.
सामान्य माणसाला ही उदाहरणे फक्त वाचायला, बघायलाच बरी; नाही का?
आपल्या कृत्याने दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडा का होईना पण (चांगला) बदल घडून येत असेल तर त्यात आनंद मानण्यात गैर नसावे. पण हे कृत्य नाव, प्रसिद्धी, पुरस्कार, पापक्षालन, पुण्यसंग्रह या उद्देशाने केले असेल तर ते निरपेक्ष म्हणता येईल का?(हो, पुण्य कमवण्यासाठी दान करणे हे निरपेक्ष आहे असे मला वाटत नाही).
बहुधा महात्मा गांधींनी विश्वस्त ही संकल्पना मांडली होती, की ज्यांच्याकडे अधिक धन, बळ इ. आहे त्यांना ते संपूर्ण समाजाचे विश्वस्त म्हणून मिळाले आहे आणि त्यांनी ते समाजच्या हितासाठी वापरले पाहिजे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा भरपूर नफा पचवायला लागणारा मुखवास नसावा.

मंदारने उघडलेला बाफ विचार करायला लावणारा आहे. सर्वांचे पतिसाद काहीना काही विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत.

मला या पेक्षा थोडा वेगळा विचार सांगावासा वाटतो. जे संसारी आहेत आणि ज्यांनी समाजसेवा यासाठी घर सोडलेल नाही अश्या व्यक्तीने आधी घरचे लोक सुखी व समाधानी आहेत का याचा विचार करणे अपेक्षीत आहे.

जर घर समाधानी आहे तर पुढे हा उपक्रम एकट्याचा न रहाता संपुर्ण कुटुंबाचा झाला तर आणखीनच आनंद होईल.

फक्त मुळ लेखनावर विचार केला तर, एक सरळ अर्थ असा निघतो कि, ज्या लोकांनी ''मला समाजसेवे तून आनंद वा समाधान मिळ्ते'' तत्सम उत्तर दिले आहे. ती लोकं पोलीटीकली करेक्ट राहून काहिसं डिप्लोमँटीक उत्तर देत आहेत व फक्त तोच एक पूर्ण प्रामाणिक पणे उत्तर देतो जो म्हणतो आहे कि त्याला '' आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, माझ्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, वगैरे.''
जशी आनंद आणी समाधान याची गल्लत झाली आहे, तशी सवय आणि आवड याची ही थोडीशी गल्लत झाली आहे.... जर कोणी विचारले की तुम्ही हे जिन्स टी-शर्ट का घालता? तर बरेच जण उत्तर देतील कि मला आवडतं..... कोण्या आजोबांना विचाराल की तुम्ही सदरा का घालता त्यांच म्हणणं असेल की त्यांना आवड्तं पप खरचं आवड्तं कि ती एक सवय असते? (स्वःतला प्रश्न विचारुन बघा),
तसच आहे जर आज गप्पा नि गाणी समाधान देत असतील तर ती सवय असू शकते किंवा ज्या लोकांन सोबत राहता त्या परिस्थिची देण ....... जर कोणी वेगळ्या विचारांच्या प्रभावाखाली आला (डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे) तर त्याने दिलेले उत्तर हे डिप्लोमॅटीक नसेल तेही पूर्ण प्रामाणिक असेल.

चांगली चर्चा.
मयेकर,
तुम्ही घेतलेली नावं जी आहेत ते लोक ग्रेटच पण ते ग्रेट का तर त्यांच्या करण्यामधे दुसर्‍यासाठी काही करण्यापेक्षा स्वतःची आंतरिक गरज म्हणून काम करण्याची वृत्ती आहे म्हणून.

>>आपल्या कृत्याने दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडा का होईना पण (चांगला) बदल घडून येत असेल तर त्यात आनंद मानण्यात गैर नसावे.<<
माझ्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यात चांगला बदल घडून आला या जाणिवेने होणारा आनंद भला नाही. नाही का? माझ्यामुळे हा शब्द गळाल्यास उपकारकर्त्याची भूमिका बाजूला जाते.

>>पण हे कृत्य नाव, प्रसिद्धी, पुरस्कार, पापक्षालन, पुण्यसंग्रह या उद्देशाने केले असेल तर ते निरपेक्ष म्हणता येईल का?(हो, पुण्य कमवण्यासाठी दान करणे हे निरपेक्ष आहे असे मला वाटत नाही).<<
निरपेक्ष काहीच नसतं हो. माझा समाज चांगला झाला तर माझ्या किंवा माझ्या पुढच्या पिढ्यांचं जीवनमान सुधारेल ही पण अपेक्षाच झाली ना?
पुण्य कमावण्यासाठी दान हे मला पण फारसं पटत नाही. जेवढा मोठा चेक तेवढं पुण्य अधिक आणि तेवढा मी ग्रेट अशी भूमिका त्यात असते.
>>बहुधा महात्मा गांधींनी विश्वस्त ही संकल्पना मांडली होती, की ज्यांच्याकडे अधिक धन, बळ इ. आहे त्यांना ते संपूर्ण समाजाचे विश्वस्त म्हणून मिळाले आहे आणि त्यांनी ते समाजच्या हितासाठी वापरले पाहिजे. <<
संदर्भ चपखल आणि योग्य. विश्वस्त. बरोब्बर.

>>कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा भरपूर नफा पचवायला लागणारा मुखवास नसावा.<<
हे आदर्श जगात बरोबर आहेच फक्त अश्या 'मुखवासातून' अनेक महत्वाच्या कामांना गती आलेली आहे हे नाकारता येणार नाही.

पण हे कृत्य नाव, प्रसिद्धी, पुरस्कार, पापक्षालन, पुण्यसंग्रह या उद्देशाने केले असेल तर ते निरपेक्ष म्हणता येईल का?(हो, पुण्य कमवण्यासाठी दान करणे हे निरपेक्ष आहे असे मला वाटत नाही).
----------------------------------------------------------------------
काय फरक पडतो निरपेक्ष नसेल तर?

काय फरक पडतो निरपेक्ष नसेल तर?>>> एक्झॅक्टली... माझाही डिट्टो हाच प्रश्न... लोकांचं भलं व्हावं म्हणून केलेली कृती निरपेक्षच कशाला हवी??? विशेषतः नाव, प्रसिद्धी, पुरस्कार, पापक्षालन, पुण्यसंग्रह ह्या गोष्टी लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करणार्‍या प्रेरणास्त्रोत असतील, तर आपली त्याला का हरकत असावी?

मंदार,

छान लेख्...
माझ्यामते कोणतीही सेवा ही निरपेक्षपणे व्हायला हवी...कसलीही अभिलाषा न बाळगता.....ती खरी समाजसेवा....आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो....ही भावना प्रत्येकात असली किन्बहुना त्याची जाणीव असली तरी खुप आहे....ती आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे अस मला वाटत....

जर मनापासून वाटत असेल तर, समाजाच्या गरजा काय आहेत हे जाणून आपल्याला जमेल ते, झेपेल ते काम आपण करावे. त्यात आनंद, दु:ख वगैरे शोधण्याचा प्रयत्न करु नये.....सानी १००% पटतय....

सावरी

काय फरक पडतो निरपेक्ष नसेल तर?

अनुमोदन.......

कारण स्वार्थातूनही जर परमार्थ घडणार असेल तर कळत असो वा नकळत कोणा ना कोणाचे भलेच होत असेल तर मग ही कृती "स्वार्थी" आहे की "नि:स्वार्थी" याने खरे तर काहीच फरक पडता कामा नये....!

ज्या कृती मध्ये स्वार्थ आहे ती निश्चितच मदत नाही, निरपेक्ष नाही, निरपेक्ष नसेल तर फरक हाच पडेल की मदतीच्या बद्दल काही तरी अपेक्षा राहतील, आणी त्या जर पुर्ण नाही झाल्या तर गरजुंना मदत मिळणे थांबेल.

<<<ज्या कृती मध्ये स्वार्थ आहे ती निश्चितच मदत नाही, निरपेक्ष नाही, निरपेक्ष नसेल तर फरक हाच पडेल की मदतीच्या बद्दल काही तरी अपेक्षा राहतील, आणी त्या जर पुर्ण नाही झाल्या तर गरजुंना मदत मिळणे थांबेल.>>>>

एकांगी वाटतेय.
समाजकार्य करून "मला" समाधान मिळते यातला "मला" अत्यंत महत्वाचा शब्द आहे, आणि जिथे मी, मला, माझे आहे तिथे सहाजिकच "स्वार्थ" आहे...... त्यामुळे अश्या समाधानापोटी केलेले कार्य हेदेखिल "निरपेक्ष नाही" परंतू एंड रिझल्ट चांगला असल्याकारणाने ते तसे असले तरी काही हरकत नसावी.......... !

तुमच्या म्हणण्यानुसार जर हे समाधानच (अपेक्षित) नाही मिळाले तर कार्य थांबेल आणि गरजुंना मदत मिळणार नाही. पण हे तेंव्हाच शक्य आहे जर या ना त्या प्रकारे केलेल्या कार्याचा (मदतीचा) "विनियोग" योग्य नाही झाला. पण मग कार्य करणार्‍याची हीच तर एक अलिखित जबाबदारी असायला हवी की केलेल्या कार्याचा "विनियोग" योग्य पध्दतीने होतो की नाही त्याचा पाठपुरावा करणे. जोवर ते करत राहू, मला नाही वाटत मिळणारे समाधान कमी होईल.......

याव्यतिरिक्तच्या इतर छुप्या स्वार्थांबद्दल आपण बोलत असाल तर तिथेही केलेल्या मदतीचा (भिन्न स्वरुपाच्या) विनियोग होतो कसा हे पहाणे ही जबाबदारी ज्याने त्याने स्विकारली पाहिजे.....!

एकांगी वाटतेय.
समाजकार्य करून "मला" समाधान मिळते यातला "मला" अत्यंत महत्वाचा शब्द आहे, आणि जिथे मी, मला, माझे आहे तिथे सहाजिकच "स्वार्थ" आहे...... त्यामुळे अश्या समाधानापोटी केलेले कार्य हेदेखिल "निरपेक्ष नाही" परंतू एंड रिझल्ट चांगला असल्याकारणाने ते तसे असले तरी काही हरकत नसावी.......... !<<<
एक्झॅक्टली!

मंदार,
एक वेगळा आणि चांगला विषयावरचा लेख
धन्यवाद !
मला तर वाटतं शेवटी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार,स्वभावानुसार ज्या गोष्टीत रस असतो ,जे छंद जोपासल्यावर ,जे काम केल्यानंतर मनापासुन आनंद ,समाधान नक्कीच मिळेल,त्याला जीवनात त्यासाठी दुसरं काही करायची गरज पडेल असं वाटत नाही ..
पण ज्यांना हे सर्व पुर्णपणे मिळत नाही त्यांना मात्र बाकीच्या गोष्टीतुन ते मिळवण्याचा प्रयत्न करतात ..
Happy

उत्तम चर्चा. देणा-याने देताना निरपेक्षपणे द्यावे (... मा फलेशु कदाचन) आणि घेणा-याने देणा-याचा "हेतू" पाहू नये (पुण्य, प्रसिध्दी, इ). गरजवन्ताची गरज भागणे हे सर्वात महत्वाच. देणा-याला पुण्य, प्रसिध्दी, समाधान, आनन्द, इ. मधल काय मिळत ते दुय्यम. देणा-याची "नीती" जर वाईट असेल तर मात्र ते दान स्वीकारु नये. त्यातून पुढे अनर्थ घडण्याची शक्यता जास्त असते.

छान चर्चा.
दक्षिणा, आशुचॅम्प, भुंगा,सानी, डेलिया, भरत, नीरजा, राजेश्वर, अनिल, मुकुंद सगळ्यांचे विचार पटले. सगळ्यांनीच फार मनापासून आणि विचार करून लिहिलय. अशी चर्चा वाचायला किती छान वाटतं नाही.
मला वाटतं , की खरे समाजकार्य करणार्‍याला तुम्ही काय म्हणता याच्याशी फारसे काही देणे घेणे नसतेच Happy त्याला महत्व वाटत असतं ते " तो, ज्याच्यासाठी काम करतोय; त्याला काय वाटतं " याचं !
अर्थात त्याच्या कार्याला पसंती मिळाली कोणाची तर त्याना ( किमान काही जणाना ) प्रोत्साहन नक्की मिळत असेल , नाही का ?
आनंद मिळवायचा म्हणून जरी समाजकार्य केलं तरी; समाजासाठी काही कार्य केलं ना ! ते महत्वाचे Happy

प्रत्येकाला स्वतःच्या मर्यादित परिघाबाहेर जाऊन जर काही करता आलं, किंवा असं म्हणूयात की, स्वतःचा परिघ रुंदावता आला तर आजूबाजूला वेगळे चित्र दिसेल, नै?

तसे पाहिले तर प्रत्येक घरातील गृहिणी ''सेवा'' करतच असते. मर्यादित स्वार्थ, आनंद, समाधान.... जे काय म्हणाल ते असतेच त्यात... पण तरीही ती न कुरकुरता वर्षानुवर्षे ही सेवा करतच असते. त्यात कर्तेपणाचा आव नसतो की बडेजाव नसतो. मुलांचे लालनपालन, घरातील इतर सदस्यांची काळजी, घर चालविणे ह्या गोष्टींमध्ये तिचे योगदान अनमोल असते. हाच रोल ती जेव्हा व्यापक प्रमाणात करू लागते, म्हणजे फक्त आपल्याच मुलांची, गृहसदस्यांची काळजी घेण्याऐवजी आपल्या आजूबाजूच्या माणसांचीही काळजी घेणे, त्यांच्यासाठी काही करणे इ. तेव्हा त्याला कोणी समाजसेवा असे म्हणतात.

घरातील पुरुष-स्त्री जेव्हा फक्त आपल्या कुटुंबापुरता विचार न करता मोठा विचार करतात, व हळूहळू ''वसुधैव कुटुंबकम् |'' मनोवस्थेत येतात तेव्हा ते जे काही करतात ती ''सेवा'' उरतच नाही.... त्यांच्या दिनचर्येचा भाग बनते जणू!

आयुष्यात अशी सेवा करणार्‍या अनेक माणसांचा व माझा जवळून परिचय झाला, त्यांच्या अथक कामाला पाहून मला स्वतःला घातलेल्या परिघांना ओलांडून बाहेर जावेसे वाटू लागले आणि त्यातून काही चांगली कामे हातून घडली. माझ्या शाळेने अशा अनेक स्त्रियांशी/ व्यक्तींशी माझा परिचय करवून दिला.... अगदी कोथिंबिरीची जुडी निवडावी तितक्या सहजतेने लोकांचे प्रश्न सोडविणार्‍या ह्या समर्थ महिला पाहून कोणालाही स्फूर्ती न मिळाली तरच नवल! त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही कमतरता होती, दु:ख होते वा गरज होती म्हणून किंवा उपकाराच्या भावनेतून समाजाची सेवा केली नाही. उलट अत्यंत समाधानाने, आपल्याला ज्या उत्तम संधी - सुविधा मिळाल्या त्या इतरांनाही मिळाव्यात म्हणून त्या झटल्या.

आंतरिक आनंदापोटी समाजसेवा करणारेही अनेकजण माझ्या निकट परिचयात आहेत. घरी-दारी कोणतेही प्रश्न नाहीत, व्यथा नाहीत.... पण ह्या लोकांना आपल्यापाशी जे जे उत्तम आहे ते इतरांबरोबर शेअर करावेसे वाटते... ते कधी रिसोर्सेस च्या स्वरूपात असते, कधी आर्थिक मदतीच्या स्वरूपात, कधी स्वतःच्या कष्टांच्या रूपात! त्यांचा सेवाभाव हा आनंदापोटी येतो. आणि इतरांबरोबर असे काही वाटल्याने हा आनंद अजून द्विगुणित होतो.
उदा: आपल्या घरातील व्यक्तींच्या वाढदिवसाला वृक्षारोपण करणे, अनाथाश्रमात खाऊ वाटणे.... ह्या कृतींमध्ये इतरांनाही आपल्या आनंदात सामील करून घेण्याची वृत्ती दिसते, जी स्तुत्य आहे. त्यात उपकाराची किंवा गरजेची भावना नसते तर मनाला झालेल्या आनंदाची एक प्रकारची अभिव्यक्ती असते! Happy

नीधप , >>आपल्या कृत्याने दुसर्‍या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात थोडा का होईना पण (चांगला) बदल घडून येत असेल तर त्यात आनंद मानण्यात गैर नसावे.<<
माझ्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यात चांगला बदल घडून आला या जाणिवेने होणारा आनंद भला नाही. नाही का? माझ्यामुळे हा शब्द गळाल्यास उपकारकर्त्याची भूमिका बाजूला जाते.
मी आपल्या माझ्यामुळेच्या नाही तर आपल्या कृत्यामुळे असा शब्दप्रयोग केलाय. इथे 'मी' निमित्तमात्र असेच कर्त्याला वाटते. तरीही भावना पोचल्या.

काय फरक पडतो निरपेक्ष नसेल तर?
याची corollary अशी की जिथे नाव, पुरस्कार, प्रसिद्धी, इ.इ. गोष्टी मिळणार नसतील, पण तरीही समाजकार्याची गरज असेल, तिथे ते केले जाणार नाही.
पितृपक्षात करायच्या विधींबद्दलच्या मायबोलीवरील चर्चेत कुणी दान'धर्म' केले आणि धार्मिक विधी नाही केले तर चालेल का? असे विचारले आहे आणि त्याला तसे समाजोपयोगी दान कराच पण त्याच्या जोडीला धार्मिक विधीही करा असे उत्तर मिळाले आहे. पुण्य पाप हे स्वतःचे स्वतः ठरवण्याची बुद्धी आणि स्वातंत्र्यही जिथे नाही, तिथे समाजकार्य कळकळ म्हणून होईल का?(संत एकनाथांची गोष्ट आठवते..त्यांनी गंगाजल तहानेल्या गाढवाला पाजले, ही त्यांची भूतदया . पण प्रचलित धार्मिक संकल्पनांनुसार त्या कृतीने पुण्य प्राप्त झाले नसावे.)
(अ) आता मी पुण्य/नाव/समाधान कमवण्यासाठी थोडे (मला झेपेल /फार त्रास होणार नाही) असे समाजकार्य करीन आणि (ब)या क्षणी, या जागी मी काहीतरी करायची गरज आहे, ते मी करीन, भले ते कुणाला कळो वा न कळो. अगदी आयडियली सांगायचे तर केल्यावर माझ्या लक्षातही राहणार नाही.
या दोन्हीत काहीच फरक नाही का?
साराभाई वि साराभाई(टीव्ही मालिका) मधे माया साराभाई गरीब मुलांच्या अन्न प्रकल्पासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमधे लंच आयोजित करतात, किंवा रस्त्यावर राहणार्‍या मुलांच्या व्यसनमुक्ततेसाठी कॉकटेल पार्टी आणि पैसे जमवतात. यातून पण समाजकार्य होतंच. पन तरीही त्याला समाजकार्य म्हणता येईल का?(आजकाल म्हटलं जात असेलही?)

ह्म्म.. चांगली चर्चा!
'माझा आनंद दुसर्‍याच्या दु:खी असण्यावर अवलंबून नाही'
>> समाजसेवा करणारा माणूस दुसर्‍याच्या दु:खामुळे आनंदी होतो का? का ते दु:ख दूर करायला काही अंशी मदत केल्यानं? म्हणजे उद्या कुणीच दु:खी माणूस सापडलं नाही, तर हा समाजसेवा करणारा माणूस दु:खी होणारे की काय! काहीच्या काही!

(अ) आता मी पुण्य/नाव/समाधान कमवण्यासाठी थोडे (मला झेपेल /फार त्रास होणार नाही) असे समाजकार्य करीन आणि (ब)या क्षणी, या जागी मी काहीतरी करायची गरज आहे, ते मी करीन, भले ते कुणाला कळो वा न कळो. अगदी आयडियली सांगायचे तर केल्यावर माझ्या लक्षातही राहणार नाही.
या दोन्हीत काहीच फरक नाही का?
----------------------------------------------------
फरक कोणासाठी? जो मनुष्य ते करतोय त्याच्यासाठी असेलही पण ज्याच्यासाठी केले जातेय त्यांच्यासाठी फरक कसा पडतो?
उदा. मायबोलीचा टी शर्ट उपक्रम एक अगदी स्तुत्य उपक्रम. यात शर्ट घेणारे लोक तुमच्या वर्गवारीप्रमाणे (अ) गटात मोडतात का? समजा त्यानी आपल्या मित्र/मैत्रिणीना सांगितले की "अरे हा टी शर्ट घ्या छान आहे आणि वर काही रक्कम ते चांगल्या समाजकार्याला देतात सो एका चांगल्या कार्यासाठीही आहे, आम्हीही घेतला आहे". मग या मंडळीना तुम्ही कुठल्या गटात टाकणार?
मायबोलीने समजा या उपक्रमाची प्रसिद्धी केली तर मायबोलीलाही तुम्ही प्रसिद्धीची भुकेली म्हणाल का? मी तर म्हणेन की हे उपक्रम पाहुन इतर मराठी संकेतस्थळानीही असे उपक्रम राबविले तर ते अत्यंत चांगले होईल आणि अशा उपक्रमांची प्रसिद्धी व्हायलाच हवी.

समाजकार्याची सापेक्ष्/निरपेक्ष अशी वर्गवारी करण्यात सगळ्यात मोठा धोका हा आहे की जे मदतीचा विचार करत आहेत तेही जर त्यांच्या हेतुबद्दल शंका घेतली गेली तर पुढे येणार नाहीत..म्हणतील "जर काही करुनही आम्ही हे कशाला केले त्यात स्वार्थ आहे का इ प्रश्न उठणार असतील तर कशाला करावे आम्ही दुसर्‍या कुणासाठी काही?"

दुसर्‍याला मदत करावीच ,निरपेक्ष असेल तर अति उत्तम! पण नसेल तरीही जरुर करावी.

मंदार राव लै भारी लिहलय... खरोखर अंतर्मुख होउन विचार करण्यासारखी गोष्ट आहे.... मस्त....

मी समाजसेवा हे एक प्रकारची बांधिलकी किंवा कर्तव्य म्हणून करतो, >> लॉजिक चुकते आहे. माझ्या मते समाजसेवा ही कर्तव्य म्हणून करायची गोष्ट नसून आंतरिक अस्वस्थता व तळमळीतून येणारी ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. अशी तळमळ नसेलच तर त्या समाजसेवेचा फार काही परिणाम होणार नाही. अशा सेवेतून मला काय मिळते आहे हा विचार सर्वात महत्वाचा आहे आणि तो प्रत्येकाने आधीच करावा, उगीच 'जगाच्या कल्याणा संताच्या विभूती' हा आव काही कामाचा नाही.
माझा आनंद हा 'इतरांना दु:ख असणे' यावर अवलंबून नसतो. My happiness does not depend on others being unhappy.">>> हे जरा अतीच होते आहे 'सेल्फ राईटीअस' सदरातले.
आशुचँप आणी नानबाला अनुमोदन.

दुसरा कशासाठी समाजसेवा करतो हे शोधत बसण्यापेक्ष्या, जर त्याने / तीने केलेली समाजसेवा हि समाजातल्या कुठल्याही घटकाला उपयोगी ठरत असेल तर समाजसेवा करणार्‍या व्यक्तीचे हेतू शोधत बसणं हा निव्वळ छिद्रान्वेषी दृष्टीकोन झाला.

ह्यावर निव्वळ चर्चा करत बसण्यापेक्षा मला काय करता येईल त्याचा विचार करुन, तसे करणे हा जास्त चांगला मार्ग आहे.

मोहिनी चर्चा केली तर नवे नवे मार्ग सापडतील नै का?
मला सुद्धा बर्‍याच पोस्टस वाचून, माहित नसलेल्या गोष्टी माहित झाल्या.. Happy

Pages