चाफा खंत करी काही केल्या फुलेना.... भाग २

Submitted by निंबुडा on 12 October, 2010 - 04:06

भाग पहिला इथे वाचता येईलः http://www.maayboli.com/node/20354

गोंधळलेली शामा काकांच्या पाठोपाठ दिवाणखान्यात आली.

.........................................................................................

आमोद! अण्णा आणि माईंचा नातू. राजेश आणि मंजिरीचा मुलगा. शामापेक्षा २ वर्षांनी मोठा. मराठे कुटुंबाचं नाव आणि बडं प्रस्थ यामुळे शाळेत जाम फेमस होता तो. पण अर्थात घराण्याचा हुशारीचा वारसाही पुढे चालवला होता त्याने. त्यामुळे त्याच्या बॅचमध्ये स्कॉलर आणि नेहेमी पहिल्या तीनांत येणारा म्हणूनही प्रसिद्ध होता तो. शिवाय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संस्कृत कथाकथन, वाद-विवाद स्पर्धा अशा कुठल्या ना कुठल्या अ‍ॅक्टिव्हिटीज मध्ये असायचाच तो. दिसायला गोरा, चांगला उंच आणि लोभस होताच तो. त्यामुळे जरा जास्तच समज असलेल्या शाळेतल्या पोरी त्याच्यावर जीव ओवाळायच्या. आमोदला ते कळायचं पण त्याच्याशी त्याला कसलं देणेघेणं नसायचं. माई, अण्णा, आई, बाबा, रामेश्वर काका, घरातली गडी माणसं आणि शाळा याशिवाय दुसरं विश्वच नव्हतं त्याचं. नाही म्हणायला शामा तिच्या आठवीपासून संस्कृतच्या शिकवणीसाठी माई आजीकडे यायला लागल्यावर आमोदची तिच्याशी गट्टी झाली होती.
.........................................................................................

शामाशी नजरानजर झाली आणि आमोद थोडासा गडबडला. शामा बंगल्याच्या आवारात आल्यापासूनच त्याचं तिच्याकडे लक्ष होतं. तिचं इतक्या दिवसांनंतरचं येणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. मध्यंतरी तिला मुलगा झाला म्हणून माई आजीकडून समजलं तेव्हाही बालपणीच्या आठवणींनी मनात अशीच गर्दी केली होती. आणि आज तिच्या लहानग्याला कडेवर घेऊन आलेल्या तिला पाहून पुन्हा असाच विचारांत हरवला होता तो. त्या नादात आपण तिच्याकडे एकटक पाहत आहोत याचंही भान उरलं नव्हतं त्याला. आणि आलं तो पर्यंत शामाचं त्याच्याकडे लक्ष गेलंही होतं. तिला आपल्या अशा एकटक पाहण्यामुळे ऑड वाटले असेल असं वाटून खूप ओशाळायला झालं त्याला. त्याने स्टडीटेबल वर ठेवलेल्या घड्याळात पाहिलं. सकाळचे दहा वाजले होते. क्लिनिकला जायलाच निघाला होता तो. आवरताना खिडकीशी उभा असताना सहज त्याचं लक्ष फाटकाकडे गेलं आणि शामा दिसली होती त्याला. तिचं ते नेहेमीचं फाटकाला हात घालतानाचं दोन क्षण थांबणं चांगलंच परिचयाचं होतं त्याच्या! खरं तर त्या हालचालींवरूनच 'ही शामाच! अजून दुसरं तिसरं कुणी नाही!' हे जाणवून तिच्या हालचाली निरखीत खिडकीशीच उभा रहिला होता तो.

तिला निरखत असतानाच एकिकडे मनात विचारांचे तरंगही उठत होते. अजूनही हिच्या त्या टिपीकल सवयी बदलल्या नाहीत तर! फाटक उघडताना जरासा पॉज घेणं, ड्रेसच्या ओढणीशी चाळा करणं, बोलताना मानेला हलकेसे झटके देणं आणि सिग्नेचर ओळख म्हणजे पाणीदार काळ्याभोर डोळ्यांत उत्सुकतेची चमक असणं! सगळं सगळं अजूनही तसंच! शामा..... नावाप्रमाणेच सावळा वर्ण. पण कांती सतेज. चेहर्यावर कायम बुद्धिमत्तेची झलक. पण वागणं कसं नम्र, विनयशील. हसतानाही खळखळाट नाही. शांत मंद हसायची. पांढर्याशुभ्र दंतपंक्ती दिसतील न दिसतील असं मंद स्मित करायची. कुठलाही नखरा नाही, मेकअप नाही. साधी रहायची, छान दिसायची. जोरजोरात, तावातावाने बोलणं नाही, सगळ्यांशी हसून खेळून मिळून मिसळून वागायची. कदाचित ...कदाचित म्हणूनच आपली हिच्याशी गट्टी झाली का? माई आजीलाही ही याच कारणाने आवडते. माईच्या संस्कृतच्या बॅच मध्ये दर वर्षी कितीतरी मुली असायच्या. पण माई आजीनेही कधी शामा इतका जीव दुसर्या कुणावर लावलेला आपण पाहिला नाही. का नाही आपली शाळेतल्या इतर कुठल्या मुलींशी कधी मैत्री झाली?

कारण.... कारण ही त्या सर्वांत वेगळी होती. इतर जणी जेव्हा आपल्यावर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न करायच्या तेव्हा हिचं साधं राहणं, अभ्यासू वृत्ती आवडली होती आपल्याला. म्हणूनच माई आजीच्या "हिला तुझी संस्कृतची सुभाषितांची वही दे. निबंध वही दे..." वगैरे सूचनांचं अगदी आनंदाने पालन केलं आपण. आपल्या वह्या आपणहून तिला दिल्यानंतर तिचा हरखलेला चेहरा अजूनही लक्षात आहे आपल्या. आनंद झाला की डोळ्यांत एक विशिष्ट प्रकारची चमक येते तिच्या! तिचा आनंद व्यक्त करणारी चमक. ती अजूनही तशीच आहे. मघाशी तिच्या बाळाची पापी घेताना तीच चमक परत जाणवली. फक्त थोडीशी सुटली आहे अंगाने. अर्थात बाळंतपणामुळे असणार. आधी कशी सडसडीत होती. काळेभोर चांगले लांब केस होते. आज मात्र पाहिली तेव्हा केस कमी केलेले दिसले. आपण एकदा तिला म्हणालो होतो, 'तुझे हे लांब केस असेच मस्त दिसतात. कधीच कमी करू नकोस.' तर मानेला तिचा नेहेमीचा हळूवार झटका देऊन म्हणाली होती 'छ्या! मी कशाला कमी करेन??? मी तर असेच ठेवणार लांब केस!' आपण खुश झालो होतो तिच्या या उत्तराने समाधान होऊन. मग का बरं आता कमी केले असतील तिने केस? ..... बरोबरच आहे. तिच्या नवर्‍याला छोटे केसच आवडत असतील. तो म्हणाला असेल की 'काप केस. छोटेच छान दिसतात तुला!', तर ती का म्हणून अट्टाहासाने ठेवेल लांब केस? आणि कधी काळी लहानपणी आपल्याला सांगितलेलं तिने तरी का लक्षात ठेवावं? आपण तरी का लक्षात ठेवलंय?

विचारांचा मनात गोंधळ माजला असतानाच तो पहिल्या मजल्यावरून खाली दिवाणखान्यात आला. शामा सोफ्यावर बसली होती. तिचा मुलगा रामेश्वर काकांच्या कडेवर होता. ते त्याला टँकमधले रंगीत मासे दाखवण्यात गुंगले होते आणि शामा त्या दोघांकडे कौतुकाने पाहत होती. डोळ्यांत परत तीच आनंदी चमक! छे! आपण हिच्या देहबोलीकडे इतकं का लक्ष देतो?....

शामाला आपण आल्याची चाहूल लागावी म्हणून आमोद अकारण खाकरला. त्याबरोबर शामानं मागे वळून पाहिलं.
"अरे आमोद, कसा आहेस??"

"मी मस्त मजेत! तू बोल. तुझं कसं चाल्लंय?? आज इतक्या दिवसांनी दर्शन दिलंस!!"

शामा हसली. हसणंही अजून तसंच! मंद स्मित!
"ए, दर्शन वगैरे काय रे! मी काय देवी आहे का? आणि तू अजून क्लिनिकला गेला नाहीस? पेशंट वाट बघत खोळंबले असतील."

"अगं, निघालोच होतो. पण तू आलीस म्हणून जरा रेंगाळलो. जरा लवकर नाही का यायचंस?"

"अरे, माईंना फोन केला की पिल्लूला घेऊन येतेय, तर त्यांनीच सांगितलं की तू सकाळी दहाच्या दरम्यान निघतोस क्लिनिकला जायला. म्हणून त्याआधीच येण्याचा प्लॅन होता. पण चिन्मय झोपला होता आंघोळीनंतर. म्हणून तो जागा झाल्यावर त्याला खाऊ वगैरे भरवून मग निघाले घरून. मला तर वाटलं होतं की घरी नसशीलच. बाय द वे, रश्मी कुठेय?"

"अं?? रश्मी ना?? ती तिच्या माहेरी गेलीये!" आमोदने नजर दुसरीकडे वळवली. खरं म्हणजे 'ती तिच्या माहेरी निघून गेलीये' असं सांगायचं जीभेवर आलं होतं त्याच्या. पण 'निघून' हा शब्द वगळला त्याने ऐन वेळी.

"सॉरी रे आमोद, तुमच्या लग्नाला नाही येऊ शकले मी. सातव्या महिन्यानंतर डॉक्टरांनी प्रवासाला मनाई केली होती."

"अगं ठिके. मला माहितीये सगळं. माई आजी म्हणाली होती."

"ए, रश्मीचं फॅशन बुटीक आहे ना? फॅशन डीझायनर आहे ना ती?"

"हो! ती तिची आवड आहे. फॅशन डीझायनिंगचा अ‍ॅडव्हान्स कोर्स केलाय तिने!"

"काका-काकू काय म्हणतायत? आज दिसत नाहीत घरात ते?" राजेश आणि मंजिरीच्या बेडरूमच्या दिशेला भुवया उडवीत शामा म्हणाली.

"अगं, बाबा अ‍ॅज युजुअल फॉरेन ट्रीप वर! आणि आईला गेल्याच वर्षी इथल्या मनस्विनी महिला मंडळाचं अध्यक्षपद मिळालंय. त्यांचे सतत काही ना काही उपक्रम चालू असतात. त्यातच बिझी असते ती. तू सांग. तुझे आई-बाबा काय म्हणतायत? बाबांचा दमा बरा आहे का?"

"अरे, बाबांचं आता पुष्कळ बरं आहे. तुला तर माहितीच आहे की बाबांनी कधीच व्हीआरएस घेतली दम्यामुळे. माझ्या बाळंतपणाच्या थोडसं आधी आईनेही व्हीआरएस घेऊन टाकली. आता दोघं निवांत बसतील घरी."

आमोदची नजर बोलता बोलता तिच्या केसांकडे गेलेली बघून शामा हसली.
"अरे, केसांकडे का बघतोयस? मी केस का कमी केले असा प्रश्न पडला असेल ना तुला? अरे, प्रेग्नंसीत आणि बाळंतपणात खूप बदल होतात रे. हार्मोनल चेंजेस! तू तर डॉक्टर आहेस. तुला माहितच असेल. खूप गळायला लागले माझे केस बाळंतपणानंतर. म्हणून मग कमीच करून टाकले. तुला तर माहितीये मला माझे लांब केस किती आवडायचे. मग असे बरे कापले असते मी सुखासुखी? तुलाही आवडायचे ना?"

आमोद गडबडला.
"अं? हो. म्हणजे ते आपलं.... छान दिसायचे तुला!" अचानक विषय बदलण्यासाठी आमोद म्हणाला "अरे, चिन्मय शी ओळख करून दे ना! आपण आपल्याच गप्पा मारत बसलो."

रामेश्वर काकांकडून शामा चिन्मय ला घेऊन आली.
"मनु, हा कोण माहितीये का? का...का.... तू म्हण.... का..का........... आमोद काका! हं. हेलो म्हण."

चिन्मय कुठला बोलायला! आताशी नुसता समोरच्याला रीस्पॉन्स करायला शिकला होता तो. हात हलवून तोंडाने काहीतरी अगम्य आवाज काढून तो खिदळत होता.

"ए, मी घेऊ याला जरा?"

"इश्श! यात काय विचारायचंय! मला माहितीये तुला लहान मुलं खूप आवडतात. घे त्याला! सोनु, जा काका बोलावतो बघ!" असं म्हणून शामाने चिन्मय ला आमोदच्या कडेवर दिलं.

"चिन्मय, कुठे आलायश तू? कशं गं ते गोड बाळ. इथेच लहायचं का तुला? आईला शांग मला हे घल आवललंय मी इथेच लाहतो. हे बघ इकले काये?? पाहिलंश का? मत्त मत्त बाग आहे. फुलं पाहिलीश का बागेतली? इकले झोपाल्यात बशायचं का तुला? मांडीत बशतो माझ्या?"

आमोद चिन्मय शी बोलण्यात एकदम गुंगून गेला होता. शामा दोघांकडे मुग्ध होऊन पाहत राहिली. तितक्यात वरच्या मजल्यावरून माईंची हाक आली.
"आला का आमचा सोनू राजा? शामा, अगं केव्हा आलीस? आणि आल्या आल्या मला सांगितलं नाहीस होय? चल ये आता सोनुला घेऊन वरती."

शामाने जीभ चावली. आमोदशी इतक्या दिवसांनी भेट झाल्यामुळे ती ही हरखली होतीच. माईंकडे निरोप पाठवायला सांगायला हवे होते आपण रामेश्वर काकांना, तिला वाटून गेलं.

"चल शामा, मी निघतो आता. तू जा वरती माई आजीकडे!"

शामाने चिन्मय ला आमोदकडून घेतलं.
"आणि काय रे? नवीन आय टेन घेतली आणि बोललाही नाहीये अजून!"

"अगं हो! आताच रीसेंटली घेतलीये. अगदी गेल्याच महिन्यात!"

"सोनु, काकाला बाय बाय करा. म्हणावं, तुम्ही पण आमच्याकडे येऊन जा काकू ला घेऊन! लवकर बाय करा नाहीतर टुच कलतील हं ते येऊन. डॉक्टल आहेत ते!"

आमोदला हसायला आलं. शामा अजूनही तशीच होती. अखंड बडबड. चिन्मय ला घेऊन शामा पायर्‍या चढायला लागली. आमोदही आपल्या खोलीत आला. ही मुलगी किती जेन्यूअनली बोलते अजूनही आपल्याशी! आपल्याला का नाही असं करता येत? लहानपणीच्या हिच्याबरोबरच्या आठवणी अजूनही येतात आपल्याला. तिला येत नसतील का? माझं तिच्याबद्दलचं आकर्षण आणि प्रेम मी कधीच तिच्यासमोर व्यक्त नाही केलं. पण बायकांना सगळं नजरेतून समजतं म्हणतात. मग तिला ते कळलं असेल का कधी? तरीही ही माझ्याशी इतक्या निखळपणे कशी बोलते?

तिच्याबरोबर असलली अल्लड मैत्री आपल्याला खूप आवडायची लहानपणी. आधी शिकवणीला आठवड्यातून तीनदा येणारी शामा नंतर नंतर या घरातलीच एक असल्यासारखी होऊन गेली होती. अगदी शनिवारी आणि रविवारी सुद्धा ती यायची. कधी तिचा अभ्यास करून घे, कधी तिला एखादा टॉपिक समजावून सांग, कधी तिला बागेत नेऊन रामेश्वर काकांकडून तिला बागेतल्या रोपट्यांची माहितीच करवून दे, कधी आपल्या स्टडीरूम मधला अभ्यासाचा खण तिच्याबरोबर आवर असं काय काय करायचो आपण. तिच्या सोबत असणं आपल्यासाठी खूप आनंददायी होतं. तेव्हा प्रेम, आकर्षण वगैरे काही कळत नव्हतं. पण ती सोबत असणं हवं होतं.

आपल्या आईला आपली ही जवळीक रुचायची नाही. तिच्या मते आपण खूप श्रीमंत आणि शामा खूपच सर्व साधारण मुलगी होती. शिवाय रुपानेही सावळी. आपली आई मराठेंसारख्याच तोलामोलाच्या श्रीमंत कर्वे कुटुंबातून आली आहे. त्यामुळे आपल्या मुलाची अशाच बरोबरीच्या कुटुंबातल्याच मुलामुलींशी मैत्री असावी असं तिचं ठाम मत होतं. पण शाळेत सर्व मुलांना माझ्या हुशारीपेक्षा मी श्रीमंत आई-बाबांचा मुलगा आहे म्हणूनच मैत्री करण्यात इंटरेस्ट होता, असं लक्षात आल्यावर आपण मित्र वगैरे जमवण्याच्या फंदातच पडलो नाही. तसं पण सवंगडी म्हणून एकटी शामाच पुरेशी होती. आपण बारावीला आणि शामा दहावीला एकाच वर्षी होतो. दोघांचीची महत्त्वाची वर्षं! पण अभ्यासाच्या वेळी कसून अभ्यासच केला. एक निखळ सुंदर मैत्री होती. कुठेही स्वार्थ नाही. वाईट हेतू नाही. शामाशिवाय दुसरं कुणी नव्हतंच जणु आपल्याला. त्यामुळे आपल्याही नकळत आपण कधी तिच्या प्रेमात पडलो आपल्यालाही कळलं नाही. शामा म्हणजे जणु दुसरा मीच इतकी ती अभिन्न झाली आपल्यासाठी!

मग आपण का नाही हे सांगू शकलो कधी तिला? का कुणास ठाऊक? पण आईला घाबरून गप्प राहिलो. आईलाही बहुतेक अंदाज आला होता, पण तिच्या दृष्टीने या नात्यात काहीच तथ्य नव्हतं. तिला तिची सून तिच्यासारख्या श्रीमंत घरातून आलेली, स्मार्ट, गोरीपान हवी होती. आणि म्हणूनच तिच्या पसंतीने तिने रश्मीचं स्थळ आपल्यासाठी निवडलं. बाबा कायम त्यांच्या बिझनेस टूर्स मध्ये गुंतलेले असायचे. त्यामुळे या गोष्टी आपण त्यांच्याशी बोलणं शक्यच नव्हतं. माईलाही आपल्यासाठी म्हणून शामा आवडायची का? तिचा तर अजूनही लोभ आहे शामावर. शामा किती योग्य होती या घरासाठी. माझ्या सगळ्या सवयी, आवड निवड माहीत होतं तिला. अजूनही माहीत आहेसं वाटतंय! मला लहान मुलं आवडतात, लांब केस आवडतात हे लक्षात ठेवलंय अजून तिनं! घरातल्यांचे स्वभाव माहीत आहेत तिला. काळजीने, आपुलकीने सगळ्यांची चौकशी करते. अगदी रामेश्वर काकांशीही अगत्याने बोलते.

आणि रश्मी??? ..... तिचं रोखठोक मत आहे, की रामेश्वर काका हे आपल्या घरातले आश्रित आहेत, त्यांना कशाला मान द्यायचा? रामेश्वर काका आणि आश्रित? छे कल्पनाच सहन होत नाही. लहानपणी आपल्याला त्यांनीच तर खेळवलं. अगदी घोडा घोडा सुद्धा करायचो आपण त्यांच्या पाठीवर बसून. बागेतल्या झाडांविषयी नाना प्रश्न विचारून आपण आणि शामा त्यांना नुसते भंडावून सोडायचो. आपल्या माई आजीसाठी त्यांना वाटत असलेल्या कृतज्ञतेपोटी अजूनही ते "माईंची कृपा" असं म्हणतात. ते रामेश्वर काका आश्रित? तिचं तरी काय चुकतं म्हणा? आज आपल्याला, बाबांना आणि माई-अण्णांना रामेश्वर काकांविषयी जितकं वाटतं तितकं आपल्या आईलाही वाटत नाही. तर रश्मीला ते का वाटेल? पण मग शामाला कसं जमतं हे? छे! घुमून फिरून शामावरच येते गाडी आपली. इतकं आपलं मन व्यापलंय तिनं. सावळ्या ढगांनी आभाळ व्यापावं तसं. कधीच विसरू शकणार नाही का आपण तिला?

रश्मीशी आपला तसा भावबंध का नाही निर्माण होत आहे? आईने रश्मीचं स्थळ आणलं तेव्हा खरं म्हणजे आपल्यालाही ती प्रथमदर्शनी आवडली होती. रुपाने उजवी आहेच. शिवाय पेहराव, बोलणं खानदानी आणि स्मार्ट आहे. कॉन्व्हेंटचं शिक्षण आणि आपल्या स्टेटस ची जाण यामुळे स्वत:ला प्रेझेंटेबल कसं ठेवायचं हे तिला चांगलं ठाऊक आहे. आजही आपण एखाद्या सोशल किंवा प्रोफेशनल पार्टीला गेलो की लोकांच्या नजरेत आपल्या पेअरविषयी कौतुक दिसतं. पण आपल्याला तिचं हे दिसणं, हसणं आणि वागणं कृत्रिम आहे हे साखरपुड्यानंतरच लक्षात आलं. तिलाही शाळेत असताना म्हणे बॅडमिंटनमध्ये रस होता. या एका बेसिस वर आपल्या आईने आपलं लग्न तिच्याबरोबर जुळवलं. खरं सांगायचं तर तिच्या महिला मंडळातल्या तिच्या फेवर मध्ये असणार्‍यांत आणि तिला अध्यक्ष म्हणून निवडून देणार्यांत रश्मीची आई म्हणजे प्रधान काकू मेन होत्या. म्हणून ही सोयरीक जुळवण्यात आलीये हे आपल्याला उशीराने कळलं. माई-अण्णांनीही मध्ये हस्तक्षेप केला नाही.

तसं पण आईने कधी माई-अण्णांचा हस्तक्षेप खपवून घेतला नाही. जुना वाडा पाडून त्या जागी आधुनिक बांधकाम असलेला हा बंगला उभा करण्याची आयडीया आईचीच. माई-अण्णांचा जीव होता वाड्यावर. वाडा इतका काही जुना नव्हता की पाडायची गरज पडावी. पण आईने हट्टाने नवा बंगला बांधून घेतला. आपण सातवीत होतो तेव्हा. माई आजीची पूर्ण हयात वाड्यात गेली होती. या वाड्याची सून म्हणून इतकी वर्षे कारभार पाहिला होता. वाड्याची भिंतन् भिंत तिच्या परिचयाची होती. ज्या दिवशी वाड्यावर पहिला घाव पडला त्या दिवशी माई आजी खूप रडली होती. आपल्यालाही वाडा आवडायचा. पण माईची वाड्यात असलेली गुंतवण समजण्याचं आपलं वय नव्हतं. वाडा जाऊन त्या जागी नवीन दिमाखदार बंगला होणार इतकंच आपल्याला कळलं होतं. पण माईला फार वाईट वाटलं होतं हे मात्र आपल्याला जाणवलं होतं. आईचा असा हेकेखोरपण पाहून हळूहळू माई-अण्णांनीही घरातल्या कारभारातून संन्यास घेतला. फक्त आपल्यावर मात्र खूप जीव आहे दोघांचाही. आपण त्यांना सांगायला हवं होतं का शामाबद्दल आपल्याला वाटत असणार्‍या भावनांविषयी? त्यांनी सपोर्ट केला असता का आपल्याला? पण मग शामाच्या मनात असं काही नसतं तर? उगीच एक सुंदर मैत्रीला गालबोट लागलं असतं.

किती छान दिसत होती शामा आईच्या रुपात. आपल्याला लहान मुलं आवडतात हे अजून लक्षात ठेवलंय तिनं. आपण रश्मीला एकदा असं म्हणालो सहज, तर तिला वाटलं की मी आडवळणाने तिला आपल्याला मूल होऊ देण्याविषयी सूचवतोय. कसली फणकारली होती तेव्हा. 'मला अजून फॅशन डीझायनिंग मध्ये खूप काही करायचंय. आता इतक्या लगेच मूल वगैरे नाही होऊ देणार आहोत आपण. मूल झालं की स्त्री घरात अडकून जाते. तिला बाहेरचं विश्वच उरत नाही. बांधा बेडौल होतो ते वेगळंच!' तिचा रागाचा पारा बघून आपण पुढे काही बोलायचंच टाळलं. काल पण एका क्षुल्लक कारणावरून भांडून माहेरी निघून गेली. का तर मी तिला सहज म्हणालो की आज माझं स्टडी टेबल दोघं मिळून आवरूया. किती तरी दिवस झाले होते, त्या खणात पुस्तकांचा बोजवारा उडालाय. लहानपणी शामा स्वतःहून यायची माझ्याबरोबर माझा खण आवरायला. दोघं मिळून हसत खेळत करायचो कुठलीही अ‍ॅक्टीव्हीटी. तर रश्मीने आपल्या अपरोक्ष सरळ रामेश्वर काकांना 'आमच्या बेडरूम ची सफाई करून ठेवा आम्ही दोघंही रात्री घरी येईपर्यंत!" अशी ऑर्डर सोडलेली होती. काका कधीही कुठल्याही कामाला नाही म्हणत नाहीत. त्यांनी आपली इमाने इतबारी गुपचूप खोली आवरून ठेवली. आपल्याला तर कळलंही नसतं काही, पण आपली एमबीबीएसच्या वेळची काही पुस्तकं होती. त्यांचं नक्की काय करायचं ते न कळल्यामुळे त्यांनी ती बाजूला काढून ठेवली होती आणि तेच विचारायला ते आपल्याकडे आले तेव्हा आपल्याला हा प्रकार कळला. आपण रश्मीला याबबात विचारलं तर विनाकारण केव्हढी पेटली. 'मला या घरात काही अधिकार नाहीत का? मला मोलकरीण म्हणून राबायला आणलंय का? काय झालं एक खोली साफ केली तर? नाहीतरी गड्याचीच लायकी आहे त्यांची!' असं काहीबाही संतापाने बोलत राहिली. रामेश्वर काकांनी तिच्याविषयी आपल्याकडे चुगली केली असाही आरोप केला तिने त्यांच्यावर! मग मात्र आपण ही संतापलो. तिला जरा चार शब्द सुनावले तर फणकार्‍याने माहेरी निघून गेलीये. तिने हे लग्न केवळ सासूनंतर मिळणारं या घराच्या 'मालकिणीचं पद' याच आमिषाने केल्यासारखं वाटायला लागलं आहे आपल्याला. आपल्याला मालकिण नाही बायको हवी होती. शामासारखी! पण आपण आईपुढे निमूट राहिलो.

शामाच्या मनात नक्की असं काही होतं का? काहीच अंदाज येत नाही. तिचं इतर मुलांशी कधी बोलणं होतं का? असलं तर आपल्याशी बोलायची-वागायची तसंच होतं की अजून वेगळं होतं? मूळात आपल्याला जशी तीच एकमेव मैत्रीण होती तसा मी तिचा एकमेव मित्र होतो का? आपण हे कधी जाणूनच घेतलं नाही. प्रेम कायम अव्यक्तच ठेवलं आपण! प्रेमाच्या चाफ्याला उमलूच नाही दिलं. ज्या दिवशी शामाला एकाने मागणी घातलीये आणि तिच्या लग्नाचं ठरलं असं कळलं तेव्हा आतल्या आत कुठेतरी काहीतरी तुटल्याचं जे फीलिंग आलं होतं ते कधीच कुणालाच सांगता नाही आलं. अगदी ढसाढसा रडावंसं वाटलं होतं, पण जे काही अश्रु ढाळले ते आतल्या आतच! रश्मीला तर हे कधी सांगायचं धाडसच नाही केलं. जिथे सख्ख्या आईनेच नाही समजून घेतलं तिथे तिला हे नातं समजावं अशी अपेक्षा तरी कशी करू मी? आणि कुठली स्त्री आपल्या नवर्‍याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेमाचा मोकळेपणाने स्वीकार करेल? भलेही ते एकतर्फी का असेना! फक्त रामेश्वर काकांनी ती वेदना ओळखली होती. शामाच्या लग्नात अक्षता टाकताना आपण जाणून बुजून प्रयत्नपूर्वक चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण डोळे पुसून माझ्या खांद्यावर मायेने ओथंबलेला हात ठेवणार्‍या काकांचा स्पर्श खूप काही सांगून गेला. आतल्या आत दडवलेलं पाणी डोळ्यातून वाहिलंच तेव्हा! तेव्हा मूकपणे आपल्याला समजून घेणार्‍या रामेश्वर काकांचा किती आधार वाटला होता.

विचारांच्या नादात क्लिनिकसाठी म्हणून आवरून आमोद खाली आला. पोर्चकडे जाताना डावीकडच्या बागेतल्या चाफ्यावर सरावाने नजर गेली. हृदयात एक कळ उठली. शामाला चाफा आवडतो म्हणून गेल्याच वर्षी रामेश्वर काकांना सांगून ही चाफ्याची रोपटी मागवली. निदान ती नाही तर हा चाफा तरी या घराला सुगंध देत राहील. आमोदने कार पोर्चच्या बाहेर काढली. दिलीपने उघडून दिलेल्या फाटकातून गाडी बाहेर काढून क्लिनिकच्या दिशेने वळवली. एक उसासा टाकून मनातल्या मनात रश्मीच्या माहेरी तिला मनवायला जायचं नक्की केलं. सबंध आयुष्यात त्याला हक्काने बोलणं, हक्क गाजवणं माहीत नव्हतं. कुणासमोर भावना व्यक्त करणं, उत्फुल्लं होणं जमलंच नव्हतं. लहानपणी तो मराठ्यांचा नातू आणि बिझनेसमन राजेशचा मुलगा होता. ही मोठेपणाची ओझी बाळगता बाळगता एकटाच पडत गेला होता. शाळेत श्रीमंत मुलगा म्हणून ओळख असल्याने खरेखुरे मित्र कधी जमले नाहीत. मिळालेच नाहीत असं नाही पण स्वभावातच नसल्याने जमवताही आले नाहीत. अवचित येणार्‍या पावसासारखी शामा मात्र आयुष्यात आली होती आणि तिच्या येण्याने जीवनात आलेल्या मृद्गंधाला तो अजूनही कवटाळून बसला होता. ती आता त्याची कधीच होणार नव्हती. कारण वेळ कधीच निघून गेली होती. सरावाने डावा हात पुढे करून त्याने सीडी प्लेयर ऑन केला. लता गात होती...
'चाफा बोलेना, चाफा चालेना,
चाफा खंत करी काही केल्या फुलेना........................."

समाप्त

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बहुतेकांच्या बाबतीत असच होतं... मैत्री तुटू नये म्हणुन व्यक्तच होत नाहीत.......

छान लिहीलय ...... Happy

निंबुडे मस्त गं.....
आवडली कथा. पहील प्रेम कधीच सक्सेस होत नाही यावर माझा पुर्ण विश्वास आहे....
मस्तचं..

निम्बूडा... कथापण लिहितेस ते माहीत नव्हतं... पहिला प्रयत्न वगैरे वाटत नाहीये हं... म्हणजे असं म्हण की माबो वर पहीला प्रयत्न...

कथा... सुंदर.. सहज... चाफ्यासारखी दरवळत... अवेळी अस्वस्थ करणारी...! Happy पुलेशु

पहील प्रेम कधीच सक्सेस होत नाही यावर माझा पुर्ण विश्वास आहे....>>>
माझा मात्र नाही... >> मोदक!
माझं पहीलं प्रेम सस्केसफूल झालं... अगदी खर्‍या अर्थाने... ओळख, मग मैत्री आणि मग लग्न झालं आणि खर्‍या अर्थाने एक नवरा नव्हे तर जोडीदार मिळाला... अर्थात मी कदाचित अधिक लकी असेन.. पण ज्यांची प्रेमं सक्सेसफूल नाही होत त्या सर्वांचं आमोदसारखच होतं असं नाही... नाहीतरी माणसाला मिळालेल्यापेक्षा न मिळालेलं, पूर्णत्वापेक्षा अपूर्णाचं अप्रूप अधिक असतं...

****************************************************
.... स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा......

प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार Happy

पहिला प्रयत्न वगैरे वाटत नाहीये हं... म्हणजे असं म्हण की माबो वर पहीला प्रयत्न... >>> नाही गं. खरंच पहिली वहिली कथा आहे माझी. Happy

ड्रीमगर्ल, तुझा संपूर्ण प्रतिसाद आवडला. Happy

खुपच सुंदर कथा.
खरंच वाटत नाही की ही तुमची पहीली कथा आहे ते.

पहील प्रेम कधीच सक्सेस होत नाही यावर माझा पुर्ण विश्वास आहे....>>>
माझा मात्र नाही... >> मोदक!

बाकी ड्रीमगर्ल तुमच्या प्रमाणे मी ही लकी आहे हं Happy
माझं ही पहीलं प्रेम सस्केसफूल झालं....:)

छान कथा. आवडली.

सहज मिळे त्यात जीव त्रुप्तता न पावे,
जे सुदूर, जे असाध्य, तेथे मन धावे ....

Pages