चाफा खंत करी काही केल्या फुलेना.... भाग १

Submitted by निंबुडा on 11 October, 2010 - 04:44

माझा हा कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटला याच्या अभिप्रायाच्या अपेक्षेत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सात महिन्यांच्या चिन्मयला कडेवर सांभाळत शामाने मानस बंगल्याचं फाटक उघडलं. नेहेमीप्रमाणेच थोडंसं धडधडलं तिला! ह्या बंगल्यात येण्याची ही काही तिची पहिलीच वेळ नव्हती. तरीही का कुणास ठाऊक ह्या बंगल्यात येताना फाटकापाशी कायम असा धडधडण्याचा अनुभव यायचा तिला. अगदी सूक्ष्म! पण यायचाच! तशी ह्या बंगल्याची आणि त्यात राहणार्‍या माणसांची तिला लहानपणापासूनच सवय होती. अगदी आठव्या इयत्तेपासून. शाळेत आठवीपासून संस्कृत विषय सुरु झाला होता. मानस बंगल्यात राहणार्‍या मराठे आजी उर्फ माई (हो! सर्व त्यांना माई याच नावाने ओळखायचे!) यांचा संस्कृत शिकविण्यात हात धरणारं अजून कुणी नव्हतं आख्ख्या पंचक्रोशीत. माध्यमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यावर शिकविण्याची अजूनही आवड असल्याने हौसेने संस्कृतची घरगुती शिकवणी घ्यायच्या. शिकवणीच्या पहिल्या दिवशी ह्याच बंगल्याचं हेच फाटक शामाने उघडलं तेव्हाही पार दडपून गेली होती ती! ती राहत असलेल्या सहाशे-सातशे स्क्वेअर फूटच्या वन बेडरूम हॉल किचनच्या फ्लॅटपेक्षा हा बंगला फारच अवाढव्य वाटला होता तिला. आणि तोच अनुभव त्यानंतरही कायम सोबत करत राहिला तिच्या!

फाटक उघडून आत येताच तिचं लक्ष पाठमोर्‍या रामेश्वर काकांकडे गेलं. उजव्या बाजुला असलेल्या बागेत गुलाबाच्या रोपट्याच्या मुळाशी वाकून ते काहीतरी करत होते. आत आल्यावर फाटक मागून परत लावून घेताना झालेल्या आवाजाने त्यांनी मागं वळून पाहिलं. शामाला पाहताच त्यांच्या चेहर्‍यावर क्षणात आनंद विलसला. लगबगीनं पुढं होत त्यांनी विचारलं
"अरे शामा बेटा, किती दिवसांनी आलीस!"

"काय म्हणता काका? कसे आहात?"

"आम्ही काय?? छानच की! माईंची कृपा!"

शामाला हसायला आलं. रामेश्वर काकांची ही "माईंची कृपा" म्हणण्याची सवय अजूनही आहे तशीच आहे. मानस बंगला ही वास्तू १४ वर्षांपूर्वी बांधली होती. पण त्यापूर्वी त्याच जागेवर मराठेंचा माईंच्या सासर्‍यांनी (म्हणजे अण्णांच्या वडिलांनी) बांधलेला जुन्या पद्धतीचा चौसोपी वाडा होता. या वाड्यातच रामेश्वर लहानाचा मोठा झालेला होता. माई लग्न करून सासरी आल्या तेव्हा वाड्यात लक्ष्मीबाई म्हणून गरीब ब्राह्मणाघरची एक स्त्री स्वयंपाकीण म्हणूण कामाला होती. तिचा नवरा वारल्यानंतर एकाकी पडलेल्या त्या स्त्रीला तिच्या तान्ह्या बाळासकट माईंनी याच घरात आश्रय दिला होता. तोच हा रामेश्वर! वाड्याच्या मागे दोन खोल्या बांधून घेऊन माईंनी त्यांच्या राहण्याची सोय करून दिली होती. इतकेच नाही तर पुढे जाऊन रामेश्वरच्या बीए पर्यंतच्या शिक्षणासाठी लक्ष्मीला लागेल तशी आर्थिक आणि इतर मदतही केली होती. या उपकारांची रामेश्वरला जाण होती. त्यामुळे त्यानेही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बागकामाचा कोर्स करून याच वाड्यात स्वेच्छेने माळी म्हणून नोकरी स्वीकारली होती. शिवाय ड्रायव्हिंगही शिकून घेतलं होतं. त्यामुळे माई आणि अण्णांना गाडीने कुठे घेऊन जायचं असल्यास रामेश्वर कायम तत्पर असायचा. घरात घरकामासाठी १ गडी , स्वयंपाक, सफाई वगैरेसाठी २ नोकर बायका असूनही रामेश्वर घरातल्या कुठल्याही कामाला कधी नाही म्हणायचा नाही. पुढे माईंना स्वतःचा मुलगा म्हणजे राजेश झाल्यावर हा मोठ्या भावाप्रमाणे त्याला खेळवणे, शाळेत सोडणे, त्याचा अभ्यास घेणे, बाहेर फिरवून आणणे वगैरे कामे आवडीने करायचा. त्यामुळे ह्या बंगल्यात रामेश्वर काकांचं व्यवस्थित प्रस्थ आहे हे शामाला सततच्या येण्या-जाण्यामुळे माहीत झालं होतं. अगदी जणु या घरातलेच ते एक असल्यागत होते.

"का गं चिंगे, आज सवड मिळाली का तुला आम्हाला भेटायचा यायची?" रामेश्वर काकांची प्रेमळ दटावणी आली आणि शामा तिच्या विचारांतून बाहेर आली.

"तसं नाही हो काका, पण..."

शामाला बोलणंही पुरं करू न देता चिन्मयकडे पाहत काका म्हणाले,
"आणि हा छबुकडा कोण?? मुलगा का तुझा? वा वा छान छान! काय नाव ठेवलंय?"

"चिन्मय!"

"वा वा छान नाव आहे. तू अशी याला घेऊन ये आत. मी गड्याला सांगून चहापाण्याचं बघतो आणि मुख्य म्हणजे हे मातीचे हात आधी धुवून येतो. म्हणजे मग ह्या बंडोपंतांना घेता येईल मला." चिन्मय च्या दिशेने भुवया उडवीत काका म्हणाले आणि लगबगीने आत पळाले.

शामा मात्र अजूनही तिथेच रेंगाळली होती. किती काळ लोटला बरं आपल्याला शेवटचं इथे येऊन?? चिन्मयच्या जन्मानंतर आज पहिल्यांदाच ती इथे येत होती. त्याआधी कधी आलो होतो आपण? ती आठवत होती. हां! आठवलं. प्रेग्नन्सीची न्यूज कंफर्म झाली होती तेव्हा माईंना ती आनंदाची बातमी द्यायला इथे आलो होतो. त्यांनतर आलोच नाही का आपण? अं हं. डायरेक्ट आजच! चिन्मयच आता सात महिन्याचा झाला. म्हणजे वर्षाच्या वर होऊन गेलं. शामाची नजर बंगल्यावर आणि बागेत फिरत होती. गेल्या वर्षभरात झालेले बदल टिपण्याचा वेडा चाळा चालला होता तिचा. डावीकडे पोर्च मध्ये आधी एक कार असायची. मारुती एस्टीम! राजेश काकांनी कुठल्यातरी महत्त्वाच्या बिझनेसच्या यशाप्रीत्यर्थ घेतली होती. गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा त्या जागी चकचकीत मारुती एसएक्स दिसली. आणि आता बाजुला ह्युंदाई आय टेन पण दिसतेय! बागेत पण बरीच नवी रोपटी दिसताहेत. विशेषतः फुलझाडंच जास्त आहेत. चाफ्याची तर किती रोपं दिसताहेत. हा इकडे सोनचाफा. हा इथे पांढरा चाफा. कमाल आहे! या आधी इतकी चाफ्याची रोपं दिसली नव्हती! आपल्याला चाफा फार आवडतो. किती धुंद करतो त्याचा सुगंध!

कडेवरच्या चिन्मयला ही जागा सर्वस्वी नवी असल्याने तो टकमका इकडे तिकडे बघत होता. बागेतली झाडं, त्यांची वार्‍याबरोबर सळसळणारी पानं, रंगीबेरंगी फुलं बघून फारच हरखला होता तो. हात हलवून आनंद व्यक्त करणं चाललं होतं त्याचं! त्याचा लोभस चेहरा पाहून शामाने त्याची पटकन एक पापी घेतली. मघाशी रामेश्वर काका ज्या गुलाबाच्या रोपट्याशी वाकून काहीतरी करीत होते त्यावर आलेलं टपोरं गुलाबाचं फूल चिन्मयला दाखवत शामा त्याच्याशी बोलायला लागली.
"शोना, ते पाहिलंश का काये??? गुलाब. काय म्हणायचं त्याला? गुलाब! हं. कित्ती छान छान आहे नै?? लाल लाल रंगाचं फूल."

चिन्मय तिच्या कडेवरून गुलाबाकडे झेप घेऊ पाहत होता. "आ... आअ...अश्श्श.... आ हा.."

"आं आं........ जवळ नाही जायचं काही! काटे अशतात त्याला. टोचतील ते माझ्या शोनुल्याला. चिक्कू माझा! अरे अरे, किती ही मस्ती! किती ही मस्ती! अशं नाही करायचं! ते आजोबा पलत आले ना तर 'वा' कलतील आपल्याला! त्यांच्या गुलाबाला हात लावला म्हणून..... गोडुला गं तो माझा!"

तितक्यात पंचाला हात पुसत रामेश्वर काका परत बाहेर आले.
"हे काय? तुम्ही दोघं अजूनही बाहेरच? तिकडे हॉलमध्ये दिलीपने चहा-बिस्किटं आणून ठेवली सुद्धा! आणि ह्या बंडोपंतांना द्या आमच्या कडेवर. ये रे बब्बु!"

काकांनी कडेवर घेण्यासाठी म्हणून दोन्ही हात पुढे करताच चिन्मय अगदी आधीपासून ओळख असल्यासारखा त्यांच्याकडे झेपावला. शामाला आपल्यामागे येण्याची खूण करून काका पुढे चालू लागले. चालता चालता चिन्मयशी बोबड्या गप्पा चालूच होत्या.

बंगल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात करणार तोच शामाच्याही नकळत तिचं लक्ष उजवीकडे पहिल्या मजल्यावरच्या खिडकीकडे गेलं...... आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला! याही वेळेस आमोद त्याच्या खिडकीत उभा राहून एकटक तिच्याकडे पाहत होता. हॅट ट्रीक झाली होती. यापूर्वीही दोन वेळा इथे आलो तेव्हा बरोब्बर बंगल्यात पाऊल ठेवण्यापूर्वीच आपली नजर त्याच खिडकीकडे गेली आणि दोन्ही वेळेस आमोद असाच आपल्याकडे पाहत असल्यासारखा दिसला. पहिल्यांदा अगदी सहजपणे नजर गेली होती आपली. दुसर्‍यांदा उत्सुकता म्हणून पाहिलं त्या दिशेला. आणि आज....?? आज तर जवळपास वर्षभराने आलो आपण! ती घटना लक्षातही नव्हती आपल्याला. मग बरोब्बर त्याच खिडकीकडे बरोब्बर त्याच क्षणाला कसं काय पाहिलं आपण? आपल्या सुप्त मनाला आमोदच्या तिथे असण्याची खात्री होती की काय किंवा मग तशी अपेक्षा होती की काय......???

गोंधळलेली शामा काकांच्या पाठोपाठ दिवाणखान्यात आली.

क्रमशः

भाग दुसरा इथे वाचता येईलः http://www.maayboli.com/node/20378

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पटकन दुसरा भाग टाक.मस्त लिहिलेय पण <<क्रमशः>> हे काही बरोबर नाही.(ह.घ्या.)पुढच्या भागाची वाट पाहातेय.

पुढच्या भागाची जुळवाजुळव करतेय. Happy

प्रसिक, तुमच्या प्रतिसादाचा अर्थ नाही कळला Uhoh

आमोदनंतर प्रश्नचिन्ह काय म्हणून?? Uhoh

खूप सुंदर सुरवात..तुमच्या लेखनशैलीमुळे आणि मुख्य:त्वे शीर्षकामुळे उत्सुकता वाढली आहे.
पुढील लेखनास खूप शुभेच्छा.. Happy Happy

निंबुडा,
खूप छान सुरुवात केलीस कथेची! पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

सहज ओघवती भाषा वाचताना गुंगवते. छानच लिहितेस!

खूप छान सुरुवात आहे कथेची! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
कथेचं शिर्षकही खंरच चटक लावून जातयं मनाला
पुलेशु.

खरच वाटत नाही की हा तुमचा पहिला प्रयत्न आहे.>>> कल्पुला अनुमोदन!!!! भन्नाटच लिहितेस निंबुडा तू!!! वाचते पुढचा भाग आता... वर लिहिलेय सर्वांनी तशी..चटक तर लागलीच्चे!! Happy