चिरकूट

Submitted by विजय देशमुख on 8 October, 2010 - 08:08

जीवनात वेगवेगळ्या तऱ्हेचे नमुने बघायला मिळतात. काही अती उधळे, काही हिशोबी तर काही चिरकुट असतात. पैसे असूनही खर्च करण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते, असेच काही नमुने प्रत्यक्ष बघायला मिळाले तर काही ऐकीव.

आपण पैसे कमावतो ते कशासाठी ? पहिलं उत्तर बहुदा खाण्यासाठी, असच येईल. पण खाण्यावरच खर्च न करणारी मंडळी बघितलीय ? मी कोरियात आलो, तेव्हा एका महाभागाने मला सांगितले, की इथे फक्त डाळ, भात आणि पोळी खा, भाज्या चुकूनही खाऊ नका. मला आश्चर्यच वाटले. सहसा भाज्या भरपूर खा, असे सांगितले जाते, पण हे तर उलटच ! जेव्हा मी त्यांना अधिक छेडले, ते म्हणाले, "इथे प्रत्येक भाजी २-३ $ला मिळते. ती एक दिवस पुरेल. समजा तुम्ही डाळ, छोले, असे पदार्थ खाल्ले तर ते एका किलोला ३ $ पडेल. म्हणजे एक किलो डाळ आणि पावभर भाजी यांची किंमत सारखी आहे, काय समजलात ? " मी हो म्हटले आणि बायकोला सांगितले, "जेव्हा पुन्हा कधी यांना जेवायला बोलवशील, तेव्हा फक्त खिचडीच कर"

एका वर्षातच मी घर बदलवले. महिना ६०$ची बचत पण घर दूर होते म्हणून सायकल घेतली. त्यावर काही लोकांची मल्लीनाथी. अरे सायकल कशाला घेतली, हिवाळ्यात बर्फ राहील तर कशी चालवशील ? इथे सायकल घेणारा बहुदा मी पहिला किंवा दुसरा भारतीय असावा. चार वर्ष राहायचेच हे माहिती असतानाही ६० $ खर्च करून आणि नंतर ३०$ ला त्याच सायकलवाल्याला विकता येईल, हे माहिती असूनही सायकलसारखी आवश्यक गोष्ट न घेणारे भरपूर आहेत. मी जेव्हा विद्यापीठात किंवा घरी जाताना दिसलो की असूयेने बघतात. (कारण भूक लागलेली असते ना ) पण सायकल नाही घेणार.

जाऊ द्या. सायकल फार मोठी गोष्ट होईल. इथे काही बॅचलर्स राहतात तर काही फॅमिली. असच एकदा एकाला म्हणालो, " चल तुझ्या रूमवर जाऊ" तर म्हणाला, " थांब मी xxxx कडून किल्ली घेऊन येतो". मला वाटले याची किल्ली हरवली की काय. पण नाही. हे दोन पठठे ३ वर्ष सोबत राहत होते पण डुप्लिकेट किल्ली बनवली नाही. किंमत किती फक्त २ $. (एका वेळच्या भाजीपेक्षाही कमी. . तीन वर्ष हा त्याच्याकडून अन तो ह्याच्याकडून किल्ली घेऊन घरी जात होता. विशेष म्हणजे दोघांच्या लॅबमध्ये ५-७ मिनिटांचे अंतर ... आता बोला.

याहिपेक्षा महान व्यक्तीबद्दल. हे सेवानिवृत्त प्राध्यापक होते. भारतात कोण्या एका कॉलेजात नोकरीस होते अन मग त्यांना इथिओपियाला २-३ वर्षाचा काँट्रॅक्ट मिळाला. तिथे पगार डॉलरमध्ये मिळायचा आणि तोही रोख. हा पैसा भारतात पाठवण्याची घाई बघून आम्हाला दर महिन्याला हसू यायचे. १ तारखेला त्यांचं सकाळचं लेक्चर असेल, तर ते दुसऱ्याला देऊन स्वतः हे बँकेच्या बाहेर ८:३० लाच हजर असायचे. ९ ला बँक उघडली की पगाराच्या रांगेत धावत जायचे. पगार मिळाला की मोजण्यापूर्वीच ड्राफ्टच्या रांगेत महाशय हजर. तिथे एक दिवस आधीच धनादेशासाठी अर्ज करावा लागायचा. तो एक दिवस व्याज बुडेल, म्हणून या प्राध्यापकांचा बँकेवर रोष होता. मात्र दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी युक्ती केली. पगाराच्या एक दिवस आधीच धनादेशासाठी अर्ज. स्वतःसाठी जेवणापुरते पैसे ठेवून आणि नोकरांसाठी असलेल्या घरांमध्ये राहून (कारण प्राध्यापकांच्या घराचे भाडे २०० $ आणि नोकरांसाठी असलेले घरे १२० $ होते), पैसे वाचवायचे.

असेच ४-५ व्या महिन्यातील पगाराचा दिवस असावा. आम्ही सगळे १० च्या दरम्यान बँकेत पोहचलो. बघतो तर काय, प्राध्यापक महोदय बँक कर्मचाऱ्याशी भांडत होते. झाले असे, की त्या महिन्यात पगार १ तारखेला झालाच नाही. त्यामुळे प्राध्यापक महोदयांनी धनादेशासाठी दिलेला अर्ज वाया गेला. आता धनादेश तर बनला होता, तो रद्द करण्याचे ५० $ द्यावे लागणार होते. ते द्यायला प्राध्यापक महोदय तयार नव्हते. त्यात प्राध्यापकांचा तोल गेला, अन ते काहीतरी बरळले. तिथल्या महिला कर्मचाऱ्यावर धावून गेले. झालं. सरळ त्या बँक कर्मचाऱ्याने पोलिस बोलावले. मग काय, धावपळ, आमचं पोलिसांना समजावणं, वगैरे वगैरे... मग कायदेशीररीत्या ३०० $ भुर्दंड आणि केस न करण्यासाठी २०० $ पोलिसांना आणि धनादेश बनवायचे ५० $ आणि रद्द करण्याचे ५० $ प्राध्यापकांनी कसेबसे (इतरांना मागून, कारण त्यांच्याजवळ होतेच कुठे ? ) दिले. . पुढच्या महिन्यात ते १ तारखेला बँकेत दिसणार नाही, अशी अपेक्षा होती.

पण कुत्र्याचे शेपूट म्हणतात तसंच झालं. आम्ही १० वाजता पोहचलो, तेव्हा ते घेतलेला धनादेश भारतात पाठवण्यासाठी पोस्टात जात होते.

(अवांतर :- आकडे समजावेत म्हणुन डॉलरमध्ये लिहिले आहेत. द. कोरियाचे चलन वोन असुन १ $ ~ १२०० वोन होतात. पण इथे सगळे १००० वोन ला एक डॉलर म्हणतात.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असतात हो असे नमुने. मला तर दया यायची, कि ऐन तारुण्यात मन मारुन जगताहेत, म्हणुन. पण मग लक्षात आले कि कधी कधी घरच्या जबाबदार्‍या असायच्या त्यांच्या. पैसा वाचह्वणे, तो घरी पाठवणे याचि खुप गरज असायची त्यांना.

दिनेशदा, तुम्ही म्हणता तसही असु शकेल. पण म्हणुन अगदी "खाण्यावरचा" खर्च कमी करायचा ? परदेशात असताना तब्येत बिघडली तर कोण देणार पैसा ? खाउन पिउन सुखी असावं असं मला वाटते.

भाजी न खाण्याचा सल्ला देणार्‍या मित्राचा "राजधानीत" फ्लॅट आहे, पण भाज्या खात नाही, आता बोला Happy

आणि वाचवुन तरी किती वाचणार ? त्याने काही बंगला बांधता येणार नाही, उलट माणसे दुरावतात, हेच खरं.

विजय देशमुख, तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार चांगल लिहिलय...

ईकड पण असे महाभाग असतात, एका जणाने तर बायकोला अमेरिकेतुन घरी जाताना जेमतेम १०० रुपये ($ नाही भारतीय रुपये) दिले, ती बिचारी ६ महिन्याचे पोर सांभाळत कशीबशी मुंबईला पोचली. सहप्रवासी ओळखीचे होते त्यांनी मदत केली. अजुन १ उदा. लोक खर्च जास्त होतो म्हणुन टॉयलेट पेपर आणत नाहीत आणि दाढीच सामानसुध्दा भारतातुन मागवतात कारण ईकड ब्लेड महाग मिळतात्...या सर्वाला काटकसर नाही तर चिंधीगिरी , चिरकुटगिरीम्हणतात.

पण प्रतेकजण आपापल्या स्वभावानुसार काटकसर करतोच, मिही करतो. पण त्याचा अतिरेक न होऊ देणे, विशेषकरुन मुलभुत गरजांच्या बाबतीत तरी अस मला वाटत.

प्रत्येकाच्या गरजा, अडचणी, आवडी, निवडी, बचतीच्या आणि उधळेपणाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात....असो...पुलेशु...

१०० रुपये ? बापरे... कठीणच आहे...

असे लोक कधीच सुख उपभोगु शकत नाही.

>>>पण प्रतेकजण आपापल्या स्वभावानुसार काटकसर करतोच, मिही करतो. पण त्याचा अतिरेक न होऊ देणे, विशेषकरुन मुलभुत गरजांच्या बाबतीत तरी अस मला वाटत.

अगदी हेच म्हणतो मी ही.

बापरे!!
असे लोक मीही पाहिलेत्..भर उन्हाळ्यातही पंख्याची स्पीड १ वरच ठेवणारे..काय तर म्हणे वीज बिल वाचते.. अशी वीज वाचवून महिनाभर घरादाराला उकाड्यात हैराण करून हे वाचवणार किती तर ७० -१०० रु.!! बरे पगार किती तर ४०हजार रु. महिना नक्कीच Sad

प्रतेकजण आपापल्या स्वभावानुसार काटकसर करतोच.
अन ति करवि लागतेच
बाकि लेख चांगला आहे
पु ले शु

हा लेख मनोगतावर वाचला होता Happy चांगलं लिहिलंय.... माझ्या बघण्यात रात्री फ्रीज बंद करून त्याला कुलूप लावून झोपणारे, रात्रीही कायम सर्व घरात गुडुप्प अंधार करून टीव्ही बघायला बसणारे, आर्मी कँटिनमधून स्वस्तात वस्तू विकत घेऊन त्या इतरांना चढ्या/ बाजारातील भावाने विकणारे, कोणाकडे काही समारंभाला बोलावले तर आपल्या घरून एक रिकामा डबा (आपल्या पार्टनरसाठी/ मुलासाठी) खाण्याचे पदार्थ भरून घेण्यासाठी जाणारे, कवडी-कवडी वाचवून त्यातून सोने - प्लॉट इ. खरेदी करणारे आहेत. आणि हे सर्व संपन्न स्थितीतील लोक आहेत. मला कधी कधी त्यांच्या काटकसरीकडे बघून उगाचच कॉम्प्लेक्स यायचा! Wink व आपण खूप उधळेगिरी करतो की काय असे वाटू लागायचे Proud

माझ्या एका सुस्थितीतल्या मैत्रिणीच्य घरी कलिंगडाच्या आत असलेला पांढरा भाग, जो फेकला जातो, त्याची भाजी करुन खात. ती भाजी असेलही खुप पौष्टीक, मला कल्पना नाही. पण पहिल्यांदा जेव्हा ऐकले तेव्हा अशीही काटकसर करता येते हे बघुन धक्का बसला.

हा हा हा
लै भारी..
ईकडे पण बरेच नग होते..
वॉलमार्ट ला एका गाडीतुन ४ रुममेट्स जात होते..
गाडीच्या पेट्रोल चा खर्च त्या ट्रीप चा डीव्हईड व्ह्यायचा .. वॉलमार्ट डिस्टंस आहे ५ माईल्स.. Happy
असो हे पण ठीक आहे.. पण हे नग जेंव्हा अंडे अनायचे तेंव्हा प्रत्येक अंड्यावर आपले आपले नाव लिहुन ठेवायचे..
कूनी दुसर्यानी कमी जास्त खाऊ नये म्हणुन..

आमच्या एका प्रोजेक्ट मॅनेजर नी .. ईकडे झंडू बाम विकण्यासाठी अ‍ॅड टाकली होति..
आणी ह्यात विषेश म्हणजे तो झंडु बाम अर्धा वापरुन झाला होता Rofl
त्यावरुन हाईट म्हणजे ईकडे भारतीय लोकांनी तो विकत घेतला Happy

असे बरेच किस्से आहेत.. असो जो तो त्याच्या स्वभावानी वागतो त्याला कोणीही काही करु शकत नाही..
ह्या जगात जर स्वभावाला औषध निघाले तर ९९% हॉस्पीटल्स बंद पडतील Happy

किशोर,
पण हे नग जेंव्हा अंडे अनायचे तेंव्हा प्रत्येक अंड्यावर आपले आपले नाव लिहुन ठेवायचे..>>>>
हे वाचून मी आणि नवरा अक्षरशः डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसलो Lol Rofl Rofl

धन्यवाद अरुंधती. खरं तर मी खाली तसं लिहायला हवं होतं. हाच लेख माझ्या ब्लॉगवरही आहे. यापुढे तसं लिहायची खबरदारी घेईन. इथे माबोवर मिळणार्‍या प्रतिक्रिया स्पष्ट आणि सरळ असतात, "पटलं तर घ्या, आम्ही लिहिणारच" त्यामुळे लेखनासाठी चांगले असते, चुका कळतात म्हणुन इथे लेख टाकला.

साधना, कलींगडाच्या हिरव्या भागाची चटणी मी एका कोब्राकडे खाल्ली होती, तेंव्हापासुन त्याला आम्ही कोब्रा चटणी म्हणतो. पण पुढे ते नारळाच्या करवंटीची चटणी करतात, हे ऐकुन त्यांच्याकडे जाणे बंद केले. Happy

किशोर, एकदम भारी हा ... बाय द वे, समजा एकाने दुसर्‍याच्या नावाचे अंडे खाल्ले तर .... ?

एक फुल :- हे बघितलय मी. पंख्यासमोर डोके हालवत नाही, हे नशिब Happy

भाजी न खाण्याचा सल्ला देणार्‍या मित्राचा "राजधानीत" फ्लॅट आहे, पण भाज्या खात नाही, आता बोला स्मित

आणि वाचवुन तरी किती वाचणार ? त्याने काही बंगला बांधता येणार नाही, उलट माणसे दुरावतात, हेच खरं.>>>> अहो, पण तुमच्या दोन वाक्यात विरोधाभास आहे! बंगला नाही पण राजधानीत फ्लॅट तर घेतला ना त्या महाशयांनी? Biggrin असो.

बाकी लेख चांगला. पण प्रत्येकाच्या काटकसरीच्या पद्धती निरनिराळ्या असतात आणि त्या त्या व्यक्तिच्या दृष्टीने बरोबरच असतात! आपल्याला कितीही वाटले तरी त्यात ते बदल करत नाहीत!

काही जण परिस्थीतीनुसार पण वागत असतात. माझ्या आईचेच एक उदाहरण आहे. ती गृहिणी आहे. तिने आमची शिक्षणं होईपर्यंत धुणंभांडी करायला मोलकरीण ठेवली नाही. आम्ही मध्यमवर्गीय होतो. मोलकरीण ठेवणे शक्य होते. बर्‍याच नातेवाईकांना तिचे असे वागणे काटकसरीचे वाटायचे. पण तिच्या दृष्टीने तिचे बरोबरच होते. 'मी नोकरी करत नाही त्यामुळे थोडे कष्ट करुन पैसे वाचवु शकते' हा तिचा विचार योग्यच होता!

कलींगडाच्या हिरव्या भागाची चटणी मी एका कोब्राकडे खाल्ली होती, तेंव्हापासुन त्याला आम्ही कोब्रा चटणी म्हणतो. पण पुढे ते नारळाच्या करवंटीची चटणी करतात, हे ऐकुन त्यांच्याकडे जाणे बंद केले.>>>>>>>>

तुम्हाला अनुभव आले असतील पण तुम्ही असं जातीवाचक खोचक विधान करणं टाळलंत तर बरं होईल मि. देशमुख. Happy

@ मंजिरी :- मी त्यांच्याकडे जाणे सोडले. पण माझ्या एका बहिणिचे मिस्टर कोब्रा आहेत, पण ते तसे नाहीत, आणि मी नेहमी त्यांच्याकडे जातो.

असो, तुम्हाला वाईट वाटले असेल तर क्षमस्व.

@ वत्सला :- या चर्चेवरुन मला वाटु लागले आहे की "आपली ती काटकसर, दुसर्‍याचा तो चिक्कुपणा" असे तर नाही ना ? म्हणजे माझा काटकसरी स्वभाव दुसर्‍याच्या दृष्टीने चिरकूट्पणा असेल का ? पुन्हा एकदा विचार करावा लागेल की काय ? Wink
बंगला नाही पण राजधानीत फ्लॅट तर घेतला ना त्या महाशयांनी?
हे खरय ... विचार करावा लागेल Wink

Lol लेख वाचून चांगलीच करमणूक झाली.
पण असे महाभाग असतात हे नक्की..
आमच्या ओळखिचे एक कुटुंब होते, त्यांच्या त्यांच्या पुरते चांगले दूध घ्यायचे, पण पाहुण्या रावळ्यांसाठी गवळ्याचे कमी पैशात मिळणारे, पातळ दूध घ्यायचे. पाहुणे आले की पातळ दुधाचा चहा.. कसं जमतं कोण जाणे असं करायला. बरं असं तर नव्हतं की परिस्थिती खराब होती... चांगली वेल टू डू होती फॅमिली.. Sad

करवंटीच्या चटणीविषयी माहिती नाही, पण कलिंगडाच्या सालीचा पांढरा भाग (लाल फोडी खाऊन झाल्या की उरतो तो काकडीसारखा दिसणारा) वापरून त्याची भाजी करतात हे माहीत आहे. याचा चिक्कूपणाशी काही संबंध नाही खरा तर.
निसर्गाने दिलेल्या कितीतरी संपत्तीचा आपण वापर न करता सरळ सरळ वाया घालवतो. उदा. कोथिंबीरीचे देठ, पालकाचे देठ, बटाटा/दूधी/काकडी यांची सालं, इ.इ. त्यांचा कुठे ना कुठे तरी वापर होऊन निसर्गाची ती देण सत्कारणी लागावी म्हणून असे करायचे असते.

उदा. पोह्यांवरती बारीक चिरून कोथिंबीर पेरतो तेव्हा देठ तिथे वापरता येत नाहीत. परंतु कोवळे देठ चटणीत वापरता येतात. पालकाच्या भाजीत देठ वापरता येत नाहीत, तरी त्या देठांचा सूप मध्ये वापर करता येतो. बटाटा/दूधी/काकडी यांची सालं फेकून द देता परतून मस्त तीळ घालून चटणी होते. (माबोवरच पाकृ सेक्शन मध्ये चटण्यांच्या रेसिप्या पहा). बहुतेक सर्वच घरातील गृहिणी असं काही ना काहीतरी करतातच. अन्न हे परब्रह्म आहे असं आपण म्हणतो आणि तरी त्यातला सत्त्वांश असणारा भाग फेकून देतो. ते टाळण्यासाठी अशा काही क्लृप्त्या अवलंबाव्या लागतात. आता याला चिरकूटपणा म्हणणे बरोबर आहे का?

वत्सलाने वर दिलेले तिच्या आईचेही उदाहरण पटले. आपल्याकडून घराला असा हातभार लावायचा या उद्देशाने आणि आर्थिक परिस्थिती आहे पण कष्ट करण्याची शारीरिक स्थितीही आहे आणि इच्छाही आहे असे असताना एखाद्या कुटुंबाने मोलकरीण नाही ठेवली तर त्यांना चिक्कू ठरवणे बरोबर नाही.

बाकी लेखात दिलेली काही उदाहरणे अति वाटली. उदा. भाजीच न खाणे, डुप्लिकेट किल्ली न बनवून घेणे इ. असो. त्यामागची त्यांची मानसिकता तेच जाणोत!

आणि एक, ते नारळाच्या करवंटीचं जे म्हणालात त्याबद्दल मला तरी असं वाटतंय की नारळ खरवडून झाला की जी खरवड उरते ती चमच्याने खरवडून काढतात. ही काळी काळी असल्याने पोह्यांवर किंवा उपम्यावर etc गार्निशिंगला वगैरे वापरलेली बरी दिसत नाही, म्हणून चटणीत घालतात. विजयजी, तुम्ही नीट कंफर्म करा. की करवंटीची चटणी करतात की मी वर सांगितलीये तशी करतात. माझी आई सुद्धा अशा प्रकारे कण न कण वेस्ट न होऊ देण्याच्या तत्त्वाचा पुरस्कार करते. ती अशा काळ्या खरवडीचा चटणीत वापर करते. आता याला चिरकूटपणा म्हणणे समर्थनीय आहे का तुम्हीच सांगा. 'शेतकरी एक एक दाणा पिकवायला इतकी मेहेनत घेतो आणि आपण एका सेकंदात अन्न पदार्थांची नासाडी करतो, फेकून देतो' या बद्दल तिला जाम कळकळ वाटते.

असो, पोस्ट थोडी वाहवत गेली असल्यास sorry!

निंबुडास अनुमोदन आमच्या आई (सासुबाई) जिवनात खुप त्रास सहन केला आहे अगदि लोकांच्या घरि धुनि भांडि केलि आहेत आनि HN hospital madhe ३५ वर्शे नोकरि केलि त्यानि जेवधि काटकसर केलि ति कॉस्तोका स्पद आहे
१)कोथिंबिरिच्या देठचि चटनि सुधा छान करतात , अगदि प्लावर च्या देठचि भाजि करतात.
२)होस्पिटल मधे मिलनार्या मिटाई पासुन पुरणपोलि सुधा बनवतात (खास करुन बुन्दिच्या लाडुन पासुन) , सुन्दर लागतात
३) स्वस्तात मिळ्नार्या भाज्या (वाट्या वर मिलनार्या निवदुन )त्या शिजवुन टेवात असत .
४) कारलि विकनारा भाजि वाल्या कदुन त्या नंतर जो कार्लयाचा चुरा उरत त्या मागुन घेतात , आनि त्याचि सुन्दर भाजि करतात

सांगायचा मुद्दा असा कि गरिबि मधे दिवस घालवताना त्याना काटकसरचि सवय लागलि ति आज तागायत आहे आनि मला त्याचा अभिमान आहे त्यान्च्या कडुन बरेच काहि शिकत आहे , आज आम्हि दोघे नवारा बायको कमवत असताना जि बचत होते ति त्यान्चा मुळेच होत आहे
सो इ लव माय सासुबाई ................... ज्या फणसा सारख्या आहेत वरुन कड्क आनि आतुन

हा लेख विनोदी लेखन या सदरात आहे की वादविवाद सदरात?

लेख वाचला, समजला, चेहर्यवर हसू आल की लेखकाचा उद्देश साध्य होइल अस वाटत.

उगीच लेखकाला लिहील्याचा पश्चाताप का वाटू द्यावा आपन?

साधस मत!

लेख आवडला.
पु. ले. शु.

आकाश,
मला वाटतं की या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया स्वतःचे अनुभव किंवा चर्चा या स्वरुपाच्या आहेत. त्यात वादविवाद कुठे आहेत? Happy

@ निंबुडा :- अहो नारळाच्या करवंटीचा विनोद होता. ह. घ्या.
या लेखातुन कोणालाही दुखवण्याचा अजिबात नाही. काही माणसे "अति" करतात, त्यातुन निर्माण होणारे विनोद होतात. सामान्यांवर विनोद करणे हा मानव स्वभावच आहे. विप्रोचे मालक विमानतळावरुन ऑफिसला जायला स्वतःची गाडी न बोलवता टॅक्सीने जातात, ते कौतुकास्पद असते, पण एखादा साधारण ऑफिसरने तसे केले असते तर त्याला "चिक्कु" म्हणुन मोकळे होवु. नाही का ?

तसेच शक्य नसताना वा गरज नसताना "मोलकरिण" न ठेवणे हाही कौतुकाचाच भाग. पण केवळ थोडेसे पैसे वाचावे म्हणुन आणि होत नसताना आणी मुबलक पैसे असताना "मोलकरिण न ठेवणे आणि मग डॉक्टरची बीले भरणे" मला तरी पटत नाही.

असो. आकाश म्हणतात तसे "या लेखाला गंमतीने घ्या" आणि आणखी काही गमतीजमती शेअर करुया. तेव्हडेच आपले मनोरंजन. Wink कशाला उगाच कीस पाडायचा ? मी पाडला ते सोडुन द्या हवं तर Wink

विजय,
लेख आवडला :-), जातीवाचक विधान नाही :-(. माझी स्वतः ची बायको कोब्रा आहे (मी कोब्रा नाहिये) पण ती माझ्यापेक्षाही सढळ हाताने खर्च करते.
बादवे, माझ्या मागच्या कंपनीत एक प्राणी होता. ह्या प्राण्याचे नोइडा मध्ये २ फ्लॅट्स आहेत.
ह्या प्राण्याने US मध्ये कोथिंबीर घेतल्यावर, त्यातल्या राहिलेल्या ४-५ काड्या विकल्याचे माहिती आहे.
हा प्राणी कानपुर मध्ये मॅगी नूडल्स नोईङा पेक्षा २५ पैशांनी स्वस्त मिळते म्हणुन त्याचा ज्युनिअर जो कानपुर चा आहे त्याला आणायला सांगतो.