तुका म्हणे ...

Submitted by भूत on 27 September, 2010 - 07:58

कालपरवा 'प्रभातचा' संत तुकाराम चित्रपट पाहिला ...अगदी १००% पेस्टन काका म्हणाले ते आठवले ... १००% तुकाराम ...sitting next to god ... खरा तुकाराम बी असा नसेल !!!!

असो ...विनोदाचा भाग बाजुला ....तुकारामांचे अभंग तिथल्यातिथेच मनात घर करुन गेले .... त्यांचा छोटासा संग्रह असावा ही ईछा मनात आली म्हणुन .......

आपणही ऐकलेत का हो तुकारामांचे अभंग ??? ... मनाला भिडले असतील नाई ??? ...त्यांचाच हा संग्रह ...

गुलमोहर: 

मुखी नाम, हाती मोक्ष, ऐशी साक्ष ,बहुतांची || अवघेचि लाभ होती या किर्तने , नामसंकीर्तने गोविंदाच्या |||

आहाहाहा

पैल आले हरी शंख चक्र शोभे करी ।
गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे ।।
मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती ।
मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।।
चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती ।
पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।।
तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ ।|.

काय अनुभव असेल हा !!! आहाहाहा !!! पांडुरंग ! पांडुरंग !!!
:रोमांचित :

" आरे श्रीहरि, तुला असें का वाटतें. कीं माझे अवगुण माझे ध्यानीं येत नाहिंत ? हें मन अतिशय अनावर आहे ! आतां तूंच आपलें दयासिंधु हें ब्रीद खरें करायासाठीं या मनाच्या साहाय्यासाठीं धांवून ये !
" आरे मी वाणीनें नाना प्रौढीभरल्या गोष्टी बोलतों खरा, पण त्या आचरणें किती कठीण आहे ! मी अगदीं माझ्या इंद्रियांच्या अधीन होऊन गेलों आहें !
" मी कसा का असेना ! शेवटीं तुझा दास तर म्हणवतों आहें ना ? तर मग आतां ही उदासी टाकून दे पाहूं !

माझे मज कळों येती अवगुण |
काय करूं मन अनावर ||
आतां आड उभा राहे नारायण |
दयासिंधुपणा साच करीं ||
वाचा वदे परी करणें कठीण |
इंद्रियांअधीन झालों देवा |
तुका म्हणे जैसा तैसा तुझा दास |
न करीं उदास मायबापा |

(लेखक - गो. नी. दांडेकर
पुस्तक - 'तुका आकाशाएवढा')

-- आरे श्रीहरी, आतां खंत करूं तरी किती ? दु:खानें दु:ख वाढतें आहे. करीनास का काय हवें तें ! माझ्या या अनुतापाला कोण पुसतें ? मीं निदैवी हेंच खरें. जर कांहीं पुण्य माझ्या गांठीं असतें, तर हा प्रसंग उभा कां ठाकला असता ? माझे बळ माझ्या तळमळींतच काय तें शिल्लक उरलें आहें !
किती करूं शोक | पुढें वाढे दु:खें दु:ख ||
आतां जाणसी तें करीं | माझे कोण मनीं धरी ||
पुण्य होतें गांठीं | तरि कां लागली हे आटी ||
तुका म्हणे बळ | माझी राहिली तळमळ ||

(लेखक - गो. नी. दांडेकर
पुस्तक - 'तुका आकाशाएवढा')

--- अगा मायबापा ! माझा तुला विसर पडला आहे काय ? मग मजवरील कृपेचें छायाछत्र त्वां काय म्हणून दूर केलेंस ?
आतां मी जगूं तरी कसा ? माझ्या मनास धीर मी देऊं कसा ? तुजकडून मजला संकेताची खूणही मिळत नाहीं.
केवळ चिंता करीत राहाणें माझे हाती शिल्लक उरलें आहे. तुजकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाहीं ! माझें समाधान व्हावें, अशी इवलीदेखील खूण माझ्या प्रत्ययास आली नाहीं !

कां माझा विसर पडिला मायबापा |
सांडियेली कृपा कवण्या गुणें ||
कैसा कंठूनिया राहूं संवसार |
काय एक धीर देऊं मना ||
नाहीं निरोपाची पावली वारता |
करावी ते चिंता ऐसी कांहीं ||
तुका म्हणे एक वेंचुनी वचन |
नाहीं समाधान केलें माझें ||

-- तुझ्या सामर्थ्याविषयीं वाद नाहीं, आम्ही मात्र तुझ्या पोटीं अगदीं करंटीं जन्मलों आहोंत !
-- बरी रे तुझ्या चिंतनाची फजिती चहूं दिशांस पसरत्ये आहे !
-- कोणी मजला मूळ येत नाहीं. माहेरचा कशालाच सांगावा नाहीं. एखादी खूण देखील नाहीं.
आतां हें जगणें आगदीं वृथा झालें आहे !

समर्थाचे पोटीं | आम्ही जन्मलों करंटीं ||
ऐसी झाली जगीं कीर्ती | तुझ्या नामाची फजिती ||
तुका म्हणे जिणें | आतां खोटें जीवपणें ||

संत तुकाराम मधले सगळेच अभंग तुकारामाचे होते का हे पाहायला पाहिजे.
कारण "आधी बीज एकले" हाही शांताराम आठवले यांनी लिहिलेला अभंग आहे.
का कुणास ठाऊक, "पैल आले हरी" हा अभंगही त्यांचाच वाटतो.
असो, पण तुकाराम विष्णुपंत पागनीसांबद्दल असे ऐकले होते, की ते नंतर नंतर खरोखरीच स्वतःला तुकाराम समजू लागले होते, आणि अशा वेडातच (ह्याला वेड म्हणावे की नाही हा मोठा प्रश्न आहे)शेवटी त्यांचे देहावसान झाले.

असो, पण तुकाराम विष्णुपंत पागनीसांबद्दल असे ऐकले होते, की ते नंतर नंतर खरोखरीच स्वतःला तुकाराम समजू लागले होते, आणि अशा वेडातच (ह्याला वेड म्हणावे की नाही हा मोठा प्रश्न आहे)शेवटी त्यांचे देहावसान झाले.

हो हे खरे आहे ! माझ्या घरचेही हेच सांगतात .!

असो

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती
येणे सुखे होय एकांताचा वास नाही गुण दोष आंगा येई
आकाश मंडप पृतीवी आसन रमे जेथे मन क्रीडा करी
कथा कंमंडलु देह उपचारा जाणवितो वारा अवसरु
तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी !!

पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग

तुकाराम महाराज स्वतः मोठे सद्पुरुष होतेच पण एका अभंगात त्यांनी संत ज्ञानेश्वरांची थोरवी सांगीतली आहे.

ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे

मज पामरासी काय थोरपण
पायीची वहाण पायी बरी

ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळखणे
इतर कुळवे काय तुजे

तुका म्हणे येणे वृत्तीचीये ??
म्हणुनी ठेवीलीपायी डोई

अरे प्रसाद,
कथा कमंडलू नाही रे,
कंथा कमंडलू-
तो एक संस्कृत श्लोक आठवतो का?
शनै: कंथा: शनै: पंथा: - त्यातला कंथा आहे, म्हणजे संन्यास!