कहाणी निसर्गाची

Submitted by कविन on 26 September, 2010 - 05:39

(मुलांसाठी केलेला लिखाणाचा एक प्रयत्न. आत्तापर्यंत ज्या छोट्या दोस्तांनी एकतरी ट्रेक केलाय त्यांना ह्यातले गुंफा, पाण्याची टाकं हे शब्द ठावूक असतील. ज्यांना माहित नाहीत त्यांनी एकदा हया गोष्टी खालचे फोटे बघितले तरी त्यांना ते पटकन कळतील.)

कोणत्या तरी आडगावात सुरु होतो हा सारा प्रवास, अगदी पायथ्यापासून. आणि वळणं घेत घेत वर, डोंगर माथ्यापर्यंतं जाऊन थबकतो. पावसाळ्यात पावसाशी सलगी करत वाटही हिरवी होते तर बोचर्‍या थंडीत ती वार्‍याचीच शाल पांघरते.

म्हणूनच ह्या नागमोडी वाटेच्या सोबतीला असतो घोंगावणारा वारा आणि असते सोबतीला कधी गर्द हिरवाई तर कधी उन्हाची फुले. नागमोडी वाट एखाद्या वळणावर विश्रांती घेत थांबते, तेव्हा फुलपाखरांशी हितगुज करणार्‍या फांदीशी घटकाभर ती ही मन मोकळं करते.

एखादं पाखरु, एखादं लेकुरवाळं माकड पोटाला चिकटलेल्या पिल्लासोबत करतं कधी तिची सोबत ह्या दमायला लावणार्‍या चढावावर. तर कधी आधीच वर जाऊन पहातं तिच्या तिथे पोहोचण्याची वाट.

अशी ती "वाट" आपल्याच चालीत चालत वर गुंफांपाशी विश्रांती घेते तेव्हा गुंफेच्या बाजुची पाण्याची टाकं भागवतात तिची तहान आणि गुंफेतली शांतता करते तिलाही शांत.

हे असं चालूच असतं दिवसेंदिवस, महिनोंमहिने, वर्षानूवर्ष अन् युगानू-युगे. तसा गावातला "माणुस" प्राणीही करतो तिला सोबत. तिच्यासारखाच तो देखील एक भाग वाटतो तिला ह्या निसर्गप्रवासाचा.

पण गेली काही वर्ष ह्या माणसाच्या कोणत्या तरी शहरी रुपाने तिच्या सोबत यायला सुरुवात केल्यापासून तिला नव्याने दर्शन घडलं ह्या प्राण्याचं. आधीचा तिला माहित असलेला, तिला सोबत करणारा माणूस आणि हा आताचा नविन माणूस दोघेही एकच प्राणी आहेत ह्याची खात्रीच पटत नव्हती तिची बरेच दिवस.

"बरेच दिवस झाले, अजून किती दिवस ह्या माणसाचं मनमानी वागणं सहन करायचं आपण? वारा घोंगावत म्हणाला तशी त्याला दुजोरा देत वाट म्हणाली "हो ना! हा माणूस इथे यायला लागल्या पासून माझी तर बाई फार वाट लागलेय. खाल्ल चॉकलेट, टाकलं रॅपर. खाल्ला चिवडा, टाकली पिशवी. प्याण्याची बाटली रिकामी झाली, दिली फेकुन इथेच. झाडांची पानं पडली खाली तरी जातात ती मिसळून ह्या मातीत. पण ह्या माणसाने टाकलेल्या प्लॅस्टीकच्या वस्तू माणसासारख्याच वातावरणापासून कायम फटकून. किती दंगा करतात ही लोकं आणि घाण तरी किती करतात. इथे येईपर्यंत श्वास गुदमरतो माझा. अगदी कंटाळा आणला बॉ माणसाने ह्या आता. ह्याला खरच कोणीतरी धडा शिकवायलाच हवा एकदा."

गुंफेनेही उसासे टाकत आपलं गार्‍हाणं मांडत म्हंटलं "नाहीतर काय, दमून भागून येतात, पाय दुखत असतील म्हणून घटका दोन घटका ह्यांना आश्रय देते. तर बसावं ना शांतं, ते नाही. येतात आणि वर पराक्रम केल्याच्या थाटात स्वतःचं नाव माझ्या अंगा खांद्यावर कोरतात."

इतका वेळ शांत बसून सगळं ऐकत असलेली पाण्याची टाकं पण संभाषणात भाग घेत म्हणाली "पावसाचं पाणी साठवून सगळ्या पांथस्तांची तहान भागवणं हे आमचं काम. पण ही माणसं यायला लागल्या पासून माझं पाणी देखील गढूळलं"

"इतकी वर्ष इथले गावकरी आपली सोबत करत आहेत पण त्यांनीहि कधी आपल्याला त्रास नाही दिलेला. पण आता येतात ती माणसं ह्या गावकर्‍याच्याच जमातीतली आहेत हे सांगूनही खरं वाटत नाही इतकी ह्यांची वागण्याची तर्‍हा निराळी आहे." झाडा झुडपांनीही आपल्या मनातल्या व्यथेला पानं सळसळवून वाट देत म्हंटलं.

"पुर्वी किती शांतता होती इथे, स्वच्छता होती इथे" झाडं झुडपं एका सुरात म्हणाली.

"खरच पुर्वी सारखा आपला प्रवास कधी होणार पुन्हा एकदा शांत सुखद? पुर्वी कधी तरी दिसायचे का वळणावळणावर प्लॅस्टीकच्या बाटल्या आणि रॅपर? दिसायचा का बाण काढून दिशा कळायला केलेला दगडांचा वापर?

पाऊस म्हणाला "वाटभर चिखल करुन पाहिला"

वारा म्हणाला "घूं घूं करत घाबरवणारा आवाज देखील करुन पाहिला"

तसं माकड खिन्न होत म्हणालं "पण आपण कसे रोखणार त्यांना? त्यांच्याकडे मजबूत दोर आहे. कडेकपारीत अडकून राहतील अशी साधनं आहेत. त्या जोरावर ते इथे येतच रहाणार. पावसालाने कितीही चिखल केला, वार्‍याने वादळी रुप घेऊन घाबरवलं तरिही ती येतच रहाणार, पुन्हा पुन्हा. त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांनी नैसर्गिक जंगलं तोडून तिथे त्यांच्या रहाण्यासाठी सिमेंटची जंगलं उभी केल्येत. ते असेच अतिक्रमण करत रहाणार जिकडे तिकडे"

"ह्यावर काहीच उपाय नाही का?" गुंफेने उदास होत विचारले.

बर्‍याच विचारांती माकडाला एक मार्ग सुचला. माकड म्हणे "आहे, ह्यावर एकच उपाय आहे. त्यांना कडाडून विरोध करायचा. माणसाला माणसाचीच भाषा कळते. माणसांच्या राज्यात मागण्या पुर्ण करण्यासाठी माणूस जातो संपावर. आपणही तेच करायचे?"

"म्हणजे नक्की करायचे काय?" गुंफेने विचारले.

"आपण अजिबात करायचं नाही सहकार्य माणसाला. वार्‍याने त्यांना हवं तेव्हा वहायचच नाही, सुर्याने आग ओकायची ते आले की. दगडाने दाखवायची नाही दिशा आणि वाटेने करायची नाही सोबत. गुंफेने नाकारायचा आसरा आणि पाण्याच्या टाकांनी जायचं सुकुन" माकडाने समजावत सांगितलं.

"पण त्यामुळे पक्षांनाही मिळणार नाही पाणी" टाकं अस्वस्थ होत म्हणाली.

"चालेल, आम्ही शोधू दुसरा मार्ग पण आता माघार घ्यायची नाही" पक्षांनीही आपला सहभाग नोंदवत म्हंटलं.

"आणि सगळेच संपले उपाय, नाहीच आला माणूस वठणीवर तर...? तर कायमचच जायचं आपण संपावर, मग नाही उरलो तरी चालेल पण आता झुकायचं नाही" गुंफा त्वेषाने म्हणाली तसे सगळे एकसुरात म्हणाले "हो.. हो आपण जायचच आता संपावर. आजपासून.... आत्तापासून."

"आलाच कोणी माणूस तर मी त्याच्या सोबर चालणंच नाकारेन" म्हणते वाट.

"वारा म्हणे "मी वहायचंच थांबेन तो आला की"

गुंफा म्हणे "मी अजिबात देणार नाही आसरा त्याला. हवं तर मी मोडून घेईन स्वतःला"

पाण्याचं टाकं म्हणे "आम्ही जाऊ सुकून"

दगड म्हणे "मी झिजवेन स्वतःला आणि पुसून टाकेन सगळ्या खूणा"

माकड म्हणे "मी ही एक काम करेन. जेव्हा जेव्हा माणूस वाटेवर कचरा करेल तेव्हा तेव्हा मी त्याची वाट अडवून उभा राहीन."

एकजुटीने आपण सगळे ह्या माणसाला धडा शिकवू म्हणाले सगळे आणि लागले कामाला.

खालून ट्रेकला सुरुवात करणार्‍या माणसांच्या गटाला माहितच नव्हता हा "निसर्गाचा संपाचा निश्चय". त्याने केली नेहमी प्रमाणे खुणा शोधत चढायला सुरुवात. बराच काळ गेला तरी खूणा काही सापडत नव्हत्या त्याला. वर उन देखील मी मी म्हणत अंगाची काहिली करत होतं. वार्‍याची साधी झुळूक देखील नव्हती सोबतीला. जवळचं पाणी संपत आलेलं. असं पुर्वी कधीच नव्हतं झालं. वारा नव्हता, वाट सापडत नव्हती आणि वर उन्हाने तापत चाललेल्या डोक्याला काही सुचत नव्हतं.

गृपच्या लिडरने काही काळ विश्रांती घेऊन, खाऊन मग पुन्हा मार्ग शोधायचं ठरवलं. डबे उघडले, जेवण झालं. रिकाम्या पिशव्या आणि प्लॅस्टिकचे डब्यांचं ओझं कमी करुन पुढे जायचं ठरलं. डबे झाडीत फेकताच माकडांनी हल्ला बोल केला आणि अर्ध्यावर ट्रेक सोडून माणसांना पळ काढावा लागला.

असं पुर्वी कधीच झालं नव्हतं. प्रत्येक ट्रेक यशस्वी करुन, वरती डोंगर माथ्यावर झेंडा फडकवून परतायचं हाच नेहमीचा शिरस्ता त्यांचा. पण आजचा दिवस वेगळाच होता. जे पुर्वी कधी झालं नव्हतं ते आज झालं होतं. असं का झालं? विचार करुन त्यांचं डोकं दुखायला लागलं होतं.

आणि वरती पुन्हा एकदा दरी खोर्‍या, झाडी पक्षी, डोंगर वाटा आणि गुंफांचं आनंद गीत सुरु झालं होत्म, पुन्हा एकदा निसर्गाचं गाणं सुरु झालं होतं.

------------------------------------------------------------
हे फोटो वर लिहिल्या प्रमाणे काही शब्दांचे अर्थ समजण्यासाठी देत आहे.

caves 1 (Small).jpg (गोरखगडच्या केव्ह्ज/ गुंफा)

vadani kaval gheta (Small).JPG नाणेघाटातली ही गुंफा आतून बघा किती मोठी आहे. ४० एक माणसं तरी सहज झोपू शकतील इथे

caves at peth (Small).JPG पेठ किल्ला/ कोथलीगडाच्या इथली ही केव्ह्ज बघा. ट्रेकर्स जागा घाण करतात म्हणून गावकर्‍यांना शेवटी असा संदेश लिहावा लागलाय तिथे

caves nane 2 (Small).JPG (नाणेघाटातल्या केव्ह्ज/गुंफा) त्या गुंफांच्याच बाजुला जे खड्यासारखे चौकोन दिसतायत ती आहेत पाण्याची टाकं. ह्या खड्यासारख्या चौकोनांमधे पावसाचं पाणी साठून रहातं

taka @nana (Small).JPG (नाणेघाटात असलेल्या टाकांचा हा अजून एक फोटो)

taka @ratan (Small).jpg ही आहेत रतनगडवरची टाकं

गुलमोहर: 

धन्स ग आरती Happy कधी जायचं?

पण असाच कचरा केला जर माणसांनी तर खरच संपावर जायची वेळ येईल निसर्गावर

नवरे आज्जी , इसपनितीतुन बाहेर या आता. आणी कुमारांसाठीची ही भाषा वाटत नाही. शिशु किंवा बालांसाठी ठिक आहे. हे आ मा म . असो.

छान प्रयत्न आणी संदेश.

छान लिहिलयस Happy
आजकाल ट्रेक ला जाउन कचरा ईतस्तत: टाकणं नित्याचंच झालय, मध्ये एकदा कोणत्यातरी ट्रेक ग्रुपने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचं वाचलं होतं.
रायगडावर महाडमधला एक ग्रुप कायम स्वच्छता करत असतो.

धन्स परेश, तोषा आणि सावली Happy

आणी कुमारांसाठीची ही भाषा वाटत नाही. शिशु किंवा बालांसाठी ठिक आहे. हे आ मा म . असो.
>हम्म! बरोबर आहे. सध्या सानुला गोष्ट सांगण्याचा सराव चालू आहे ना म्हणून असेल तसं Happy

कविता

छान गोष्ट लिहिल्ये. अगदी उदाहरणांसहित.

असेच मी रायगडासारख्या पवीत्र ठिकाणी असह्य प्रकार पाहिले.
निसर्ग लवकरच परतफेड नक्कीच करेल यात शंका नाही.

सुधीर