पत्त्यांची डायरी

Submitted by रेव्यु on 24 September, 2010 - 08:11

पत्त्यांची डायरी
काल रात्री सहज समोर पडलेल्या पत्त्यांच्या डायरीत कुठला तरी टेलिफोन नम्बर "वाचत" होतो.खरे तर त्याला काही अर्थ नव्हता कारण मला मनोमन माह्ईत होते की हा नम्बर नक्की बदलला असणार्.पण मी नंबर शोधत नव्हतो,मी ती डायरी अन त्यातील नंबर अन त्यांच्याशी निगडित आठ्वणी जागवण्याचे प्रयत्न त्या "वाचण्यातून" करीत होतो.
नंबर शोधायचा प्रसंग हल्ली क्वचितच येतो.याचा अर्थ स्मृती फार तल्लख ज्ञाली असा मुळीच नाही..हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक युगामुळे म्हणा किंवा वयोमानाप्रमाणे अथवा सवय गेल्याने असेल्,हव्या असलेल्या नम्बरचा उगम तो स्क्रोल करून केला जातो-नावानुसार.त्यामुळे नंबर लक्षात ठेवण्याच्या सर्व ट्रिक्स अडगळीत गेल्यात्.म्हणजे कुणाचा नंबर ४२० ३८ २६ असला की लगेचच मेंदूच्या मेमरीत ४२० कलमाखाली अन ३८ २६ वेगळ्या प्रकारे आठवणीत रहायचा,(हा ३८ २६ ३६ पैकी ३६ हे विश्वसुंदरीचे माप वगळून लक्षात रहायचा-हे सूज्ञांस सान्गणे न लगे).असो
थोडे विषयांतर झाले.तर त्या जुन्या पत्त्यांच्या डायरीत पत्ते ,नंबर अन नावे वाचता वाचता मी दशकानुदशके केंव्हा मागे गेलो कळलेच नाही,
त्या डायरीतील कित्येक नंबर अस्तित्वात नव्हते,बदलले म्हणून किंवा ती व्यक्ति काळाच्या पडद्यामागे विलिन झाली म्हणून्.त्यात कित्येक नंबर केअर ऑफ होते."कालाय तस्मै नमः" -अन्तर्धान पावले होते.खूप कमी लोकांच्या घरी फोन "नसलेला" तो जमाना होता.लब्ध प्रतिष्ठितांचे "असणे" हे लक्षण होते.
काही नावे वाचताच त्यांच्या मायाळू सान्निध्यात घालवले क्षण पापण्यांच्या कडा ओलावून गेले.काही नंबर समोर येताच त्यासमोर लावलेला "इन्कमिंग कॉल ला दर मिनिटाला पन्नास पैसे -तीन मिनिटाहून अधिक बोलू नये-ही सोय फक्त बुधवरीच सायंकाळी ८ ते १०" हा बोर्ड -लेकीचे हॉस्टेल अन त्या अनुक्रमाने लेकीचा अन तिच्या मैत्रिणींचे निरागस "मेरा नंबर कब आयेगा" असे चेहेरे डोळ्यासमोर तरळून गेले.
मीही परदेशात असताना हिला अश्याच केअर ऑफ नं वर फोन करायचो अन त्यापूर्वी त्या केअर ऑफ च्या मालकाने केलेली लोभसवाणी अन मिश्किल चेष्टा आठवली.काही नंबर अन पत्ते वाचता क्षणीच घराबाहेरील झोपाळा,सुंदर बाग्,अन पाठमोरे बागकाम करित असलेले दिवंगत अजोबा अन त्यांच्या हातातील फुलांनी भरलेली प्रसन्न परडी,त्यात आकाशवणीवरील भजने वाजवणारा चिमुकला ट्रांजिस्टर हे सर्व डोळ्या पुढे आले.
मुन्बई च्या काही टेलिफोन नं बरोबर दरियात अस्तंगत होणारा भास्कर आला.मामा कडे असलेली टूथपेस्ट च्या आकाराची बिनाका कंपनीची गाडी आली.या डायरीच्या बहुतेक नं मागे वर्षानुवर्षांचा इतिहास होता.टेलिफोन नंबर डिजिट तीन चे चार चे पाच चे ---आठ न आता बारा पर्यंत वाढले पण व्यक्ति संकुचित झाल्या नाहीत त्यांची मने संकुचित झाली.
याच डायरीत काही आयत्या वेळेला केलेल्या नोंदी होत्या,काही निरोप होते,काही मुलांचे( आता अमेरिकेत असलेल्या) परिक्षेचे मार्क्स होते,कुठल्यातरी तारखेस कुठून तरी येणार्‍या वयस्क मावशीच्या ट्रेनचा नंबर होता,या निरोपाने अख्खे घर मोहोरून जावून दोन टांग्यात तिला भेटायाला भर ग्रीष्मात स्टेशनवर गेले होते.अशी आमची ही डायरी "आखुड शिंगी,बहुगुणी होती:" अन महत्वाचे असे की त्या हस्ताक्षरामागे एक चेहेरा होता -त्या अक्षराप्रमाणेच मायाळू,तिरसट्,विसरभोळा,त्रासलेला,आनंदलेला.
मधल्याच कुठल्या तरी पानांवर थोड्याशा उरलेल्या जागेत "टी या अक्षराच्या पानावर(टी नावाच्या फारशा नोंदी नसल्याने)" मुलींनी केलेली कलाकुसर होती.जुन्या क्यासेट प्लेयरच्या जमान्यात ,आवडणारी गाणी त्या टी डी के अथवा सोनी च्या क्यासेट वर "भरली" जात्.मग उरलेल्या जागी मुलांनी गायलेले श्लोक्,बालगीते ,"वक्रतुंड्,शुभंकरोति इत्यादी रेकॉर्ड केली जात्,त्याची आठवण या उर्वरीत भरलेल्या पानांनी आली.

अन हो,ही डायरी ज्या उद्योजकाकडून वार्षिक भेट म्हणून आली त्याचा व्यवसाय ही केंव्हाच बंद झाला याची ही आठवण त्या क्षणी झाली. नव्वद टक्के फोन अन पत्ते कालबाह्य होते,पण त्यामागील व्यक्ति,पत्त्यामागील भूमिका करणारे नट्,अन भावना माझ्या मनातून गेल्या नव्हत्या.
खरच या डायरीत काय नव्हते?चाळिस वर्षांचा व्यक्ति संचय होता अक्षररूपात्.

हल्ली नंबर पटकन सापडतो ही सोय सोडली तर अशा स्मृती तो जागवत नाही.मोबाईल मध्ये हे नंबर तिर्‍हाइतासारखे बसले असतात अन हुकुम देताच बाहेर येतात्,हुकुमाची परफेक्ट तामिली करतात.
त्यामुळे ही संस्थाही जुन्या खंडावशेषांसारखी अस्तंगत झाली आहे.
जेवढा लौकर ज्याचा नंबर मिळतो तेवढ्याच लौकर त्याचा मालक सान्निध्यातून अन मनःपटलातून दूर जातो -हे ही खरे.
यात चांगले वाईट कोण ठरवणार??
"कालाय तस्मै नमः" हेच खरे.
वुईथ नो रिग्रेट्स.

माझ्या "माझे वजनी आंदोलन"च्या भावी वाचकांसाठी.
"हा झब्बू नाही"
"आंदोलन येवू घातले आहे"
Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आता सगळेच का रे नॉष्टॅल्जिक व्हायला लागलात ?
मग आम्ही म्हातार्‍यांनी काय करावे बरं ?

आमच्या घरी खुप पुर्वीपासून होता. बावन्न सोळा एकुणसाठ का ? असा समोरचा माणुस विचारायचा.
आजूबाजूच्या ५० बिर्‍हाडांना आई, निरोप नव्हे तर फोन आल्याचे पण सांगायची. त्यावेळी ३ मिनिटांचे बंधन नव्हते. तेवढा वेळ फोन होल्ड वर असायचा !

दिनेशदा
मी तुमच्याहून नक्कीच मोठा आहे.
सदोssssssदित nostalgic असणे हा आता माझा छंद आहे.
तुम्हाला अजून खूप वर्षे आहेत वय व्हायला.
Happy

जुन्या डायरीतले (चाळण लावलेले?) नंबर नव्या डायरीत उतरवले तरी जुनी डायरी काही फेकून दिली जात नाही. कधी कधी ती चाळताना , तो नंबर लिहून घेतानाचा क्षणही डोळ्यासमोर उभा राहतो.
या निमित्ताने डायरीबद्दल थोडेसे. बहुतेक पुलंनीच म्हटलेलं, की डायरी ही भेट मिळालेलीच असायला हवी. विकतची डायरी फक्त जमाखर्च (हे काय असतं, प्लास्टिक मनीच्या जमान्यात) लिहायला!
तसंच फोन डायरीबद्दल.
माझ्याकडे पहिल्यांदा फोन लागला, तेव्हा माझ्या कार्यालयीन सहकारी मैत्रिणीने मला सुंदर कव्हराची मस्त ऐसपैस डायरी भेट दिली. म्हणजे तेव्हा फोन लागणे हे पण सेलिब्रेशनचे कारण व्हायचे. ही गोष्ट फार जुनी नाही. १९९५ची.
त्यानंतर जेव्हा जेव्हा मी नवीन फोन (लाइन/भ्रमणध्वनी) घेतला आहे तेव्हा तेव्हा तो क्रमांक प्रथम तिला कळवला आहे.

रेव्यु, छान लिहीलय! परवाच मला माझी खुप जुनी फोनची डायरी सापडली. तेव्हा हा सगळा प्रवास असाच घडला. अजुन काही नोंदी होत्या त्या म्हणजे त्या वेळी माझ्यासाठी पहाण्यात आलेली स्थळे! मुलाचे नाव, उंची, शिक्षण या माहीसह फोन नंबर /पत्ता. नवर्याला दाखवले तर तो म्हणाला, 'नशिबवान आहेत बेटे'. Biggrin आणि मला वाटतं की नॉस्टालजिक व्हायला वयाच बंधन नसतं!

खरोखरी परमेश्वराने बनवलेला मेंदु नावाचा अवयव फारच छान आहे. लग्नापुर्वीचा बायकोच्या घरचा लॅड्लाईन अद्याप लक्षात रहातो कारण त्या वेळेला ती गरज असायची. आता मोबाईल नंबर रहात नाही कारण लक्षात ठेवायची गरजच नाही.

अनेक गोष्टींबरोबरच फोन डायरी पाहुन गतस्मृतीमग्न व्हायला होत हे बाकी खरच. यातली अनेक माणसे काळाच्या पडद्याआड किंवा आपल्या दैनंदिन परिघाच्या बाहेर गेलेली असतात. त्यांचे नविन नंबर आपल्याला माहित असतातच असे नाही. अचानक भेटणारी सर्वच माणसे प्रेमाने बोलतातच असे नाही. काहींनी आपला सहवास नाईलाजास्तव पत्करलेला असतो अशी माणसे आपल्याला टाळतात. पण आपण हे सर्व सोडु नये त्यांच्यासाठी ज्यांना अनेक वर्षांच्या भेटीनंतर आनंद होतो.

रेव्यु, सकाळपासून दोनदा माझा प्रतिसाद द्रुपलने गिळून टाकला, त्यामुळे आताही साशंक मनाने टंकत आहे.

छान लिहिलंय. प्रत्येक फोन डायरीशी अशा आठवणी निगडित असतात. आताच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आणि मेमरी स्क्रोलमध्ये ती मजा येत नाही हेच खरं! पण पानं चाळण्यातला आणि आपलेच अगम्य अक्षर लावण्यातला वेळही वाचतो.... Wink

मझ्या कडे अजुनही माझी कॉलेज मधली पॉकेट टेलिफोन डायरी आहे...जुनी डायरी (८ - १० वर्ष ) जुने न॑बर्...आठ्वणी मात्र नेहमीच ताज्या टवटवीत....

शमा १५,अरुंधती जी,नितिन,वत्सला,भरत दा,दिनेश दा
सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद!!

रेव्यूजी, छान उतरलंय मनातलं !
<<आता सगळेच का रे नॉष्टॅल्जिक व्हायला लागलात ?>>अधुनमधून नोस्टॅल्जिक होणं मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासारखंच असावं.
जुन्या डायरीतील नंबरांच्या गिचमिडीचा आणखी एक अनपेक्षित फायदा - खूप दिवसानी कामाच्या निमित्ताने "अ"ला फोन लावायला जावं तर दुसर्‍याच कुणाचातरी नंबर फिरवला जातो. "सॉरी" म्हणून फोन ठेवायला जावं तर पलीकडून आवाज यतो " कोण, भावड्या ना रे ? साल्या, रामू बोलतोय ". जुनी डायरी मग एका रेशमी धाग्यावरची धूळ आपण कशी झटकली हे सुरुकतलेल्या पानातून मिष्कीलपणे हंसत पहात रहाते.

मस्त लिहिलय.. आमच्याकडे फोन तसा खूपच उशीरा आला.. २००० साली, ते सुद्धा माझ्या १० च्या रिझल्ट दिवशी शेजार्‍यांना खूप त्रास झाला फोनचा म्हणुन Happy त्यावेळेस मला माझ्या मैत्रिणींचे नंबर अगदी तोंडपाठ असायचे पण आमचा नंबर माझ्या लक्षातच राहत नव्हता, त्यामुळे कोणाला फोन नंबर द्यायचा असला की बर्‍याचदा मी चुकुन एखादया मैत्रिणीचाच नंबर सांगायचे.. ते बरोबर असली तर मात्र ती लगेच चुक दुरुस्त करुन माझा नंबर सांगायची.. अजुनही तेव्हाचे सगळे नंबर लक्षात आहेत.. आज घरात सगळ्यांकडे सेल फोन असुनही लॅन्ड्लाईन चालुच आहे.. भरपुर गप्पा मारायच्या असल्यावर हमखास लॅन्डलाइनचा फोनच वापरला जातो, कारन तिथे मिनिटा मिनिटाचा हिशोब नसतो.. मोबाइलवर बोलताना सारखाच बॅलन्सचा विचार केला जातो त्यामुळे बोलण्यात लक्षच राहत नाही... प्रतिसाद खूपच भरकटलाय.. असो
टेलिफोन नंबरच्या डायरीतही खूप काही वाचायला असतं हे आज परत जाणवलं Happy

मी पण एक डायरी जपून ठेवली आहे. त्यातली ABC,DEF वगैरे पाहिलं की मजा वाटते. आता मोबाईलच्या जमान्यात तुम्ही म्हणता तसं "हे नंबर तिर्‍हाइतासारखे बसले असतात अन हुकुम देताच बाहेर येतात्" Sad छान आहे लेख.

हल्ली मोबाईलच्या जमान्यातही कधितरी अ‍ॅड्रेस बुक क्लिन करायला घेतल्यावर काही नंबर का स्टोर केले होते तेच लक्षात येत नाही, तर कित्येक जवळच्या मित्रमंडळींशी बोलुन जमाना होउन गेल्याचे लक्षात येत.

हल्ली मोबाईलच्या जमान्यातही कधितरी अ‍ॅड्रेस बुक क्लिन करायला घेतल्यावर काही नंबर का स्टोर केले होते तेच लक्षात येत नाही, तर कित्येक जवळच्या मित्रमंडळींशी बोलुन जमाना होउन गेल्याचे लक्षात येत.

Submitted by पाटील on 9 June, 2011 - 12:15
>>>>>>>>१००