दोन मिनिट!

Submitted by येडाकाखुळा on 8 May, 2008 - 07:58

"अमित, मी पंडित काकुंकडे चालली आहे. दोन मिनिटात येत्ये! तेवढ्यात दूध वर आले तर गॅस बंद कर!" असे सांगून आई गप्पा मारायला गेली, तिचा दोन तास झाले तरी पत्ता नाही. आमच्याकडे हे असे नेहमी घडते. आईचे दोन मिनीट कधी संपतच नाहीत. "केवढा वेळ लागला तुला!" ती परत आल्यावर मी नाराजीने म्हणालो. "अरे त्याना लग्नात मिळालेल्या साड्या दाखवत बसल्या त्या. बराच वेळ गेला त्यात". एकूण आपल्या लोकाना वेळेची काही किम्मत नाही. मी व्यथीत झालो. आपला देश कधी सुधारणार? छे! दोन मिनिटे म्हणे! मराठीत "दोन मिनिटे" हे नुसते दोन शब्द नसून तो एक वक्प्रचार आहे. ह्याचा अर्थ "मला कितीही वेळ लागू शकतो" असा समजावा. दोन मिनिट असे म्हणून दोन मिनिटात होणारी एकच गोष्ट मला ठाऊक आहे. ती म्हणजे म्यागी नूडल्स. मी ठरवले की ह्या वाक्प्रचारावर मौलिक संशोधन करावे. म्हणजे ह्याचा पहिला प्रयोग कुठे झाला? त्यानंतर तो कोणी कोणी आणि किती किती वेळा वापरला ई. त्यातून मला अतीशय धक्कादायक माहिती मिळाली. ती १००% खरी आहे.

"दोन मिनिट" ह्याचा सर्वप्रथम उपयोग रामायणात झाल्याचा दाखला आहे. तो प्रसंग असा.
"अहो! तो सुवर्णमृग काय छान आहे ना! मला त्याच्या चामड्याची चोळी पाहिजे बाई! आणा की त्याला पकडून!" सीता.
"तुला काय करायची ही असली चोळी? आपण बरे आणि आपली वल्कले बरी!" राम (तो त्यावेळी अयोध्याटाईम्स वाचत होता.)
"सारखं मेलं ते पेपर वाचत असता". सीता.
"आता अरण्यात अजून काय करणार?" राम.
"हुं! लग्नाच्या आधी मारे शिवधनुष्य तोडलंत. आता मेलं एक हरीण नाही मारता येत!" सीता रागावून म्हणाली.
"काय कटकट आहे!" असे म्हणून राम उठला आणि लक्ष्मणाला म्हणाला "जरा पर्णकुटीचे संरक्षण कर. मी आलोच दोन मिनिटात" अशा पद्धतीने तो सुवर्णमृगाची शिकार करायला बाहेर पडला. त्यापुढील रामायण सर्वाना माहीत आहेच.
ह्याचा लिखित पुरावा आहे आमचाकडे. गरजूनी पडताळून पहावा. (आम्ही मी चे आम्ही झालो हा सूक्ष्म फरक चाणाक्ष वाचकानी ओळखला असेलच. वाङमयीन संशोधक मी नसून आम्ही असा शब्दप्रयोग करतात त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे वजन वाढते असा साहित्यिक समज आहे. हा कितपत खरा आहे ह्यावर आम्ही पुढचे संशोधन करणार आहोत. पण तोपर्यंत आम्ही हा शब्दप्रयोग करण्यास हरकत नसावी).

महाभारतातही लोक "दोन मिनिट" हा वाक्प्रचार वापरत होते ह्याचा दाखला आहे आमच्याकडे. आर्थात त्याचाही पुरावा आहे आमच्याकडे. तो प्रसंग पुढीलप्रमाणे.
"धर्म्या! द्यूत खेळायचा काय?" दुर्योधन.
"नको रे बाबा! खूप टाईमपास होतो. द्रौपदी चिडेल" युधिष्ठीर.
"काय राव! बायकोला किती घाबरतोस? तिला पणावर लावायला नाही सांगितले तुला. दोन तीन डाव खेळू. चल ना दोन मिनिटे खेळू फक्त! ठीक आहे?"
"दोनच मिनिटे. ठीक आहे! भीम, अर्जुन, नकुल, सहदेव....चला दोन मिनिटे द्यूत खेळूया!"
ह्या दोन मिनिटामुळे पुढचे महाभारत घडले.

(स्थळ: कुरुक्षेत्र)
"अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण.
"दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन.
(अर्ध्या तासाने)
"अर्जुना! युद्धाला सुरुवात करायची काय?" कृष्ण.
"दोन मिनिट थांब देवा!" अर्जुन.
"दोन मिनीट, दोन मिनीट म्हणून अजून किती वेळ घालवणार आहेस? युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे. थांब लेका! तुला आता गीतोपदेश केलाच पाहिजे"

"दोन मिनिट" चा शिवकालीन संदर्भ हा असा.
(स्थळ: अग्रा)
"अबे गफूर! सुट्टा है क्य?"
"अभी टाईम नही है।"
"क्या हुआ?"
"वोह शिवाजी है ना! उसको बंदी बनाया हैं| उसके छावणीके आगे पहारा कर रहा हूँ!"
"वोह कहाँ भागे जा रहा हैं?"
"अरे बाबा! ये देखो! ये मिठाई का बॉक्स चेक करना हैं।"
"अरे जाने दो यार! अब तक एक भी बक्सेसे कुछ मिला है क्या? उसकी तबियत खराब हैं। साधू लोगोंको मिठाई भेज रह है बेचारा। कायकू टेंशन लेता हैं? दो मिनिट में सुट्टा मार के आते हैं। चल।"

पेशवेकालीन संदर्भ हा असा.
"हे काय लिहित आहात?" आनंदीबाई.
"नारायणरावास धरावे असा गारद्याना खलिता पाठवत आहे" रघुनाथराव.
"अगं बाई! पैठणीच्या निर्‍या अगदी अत्ताच सुटायला हव्या का? अहो जरा तिकडे पहा ना!" आनंदीबाई.
"तिकडे पहायची काय गरज आहे? आम्ही कोणी परके का आहोत?" रघुनाथराव.
"काय बाई चावटपणा अंगात आहे? पेशव्यांचे काका आहात तुम्ही. शोभत नाहीत ही असली वागणी! जरा बघा ना तिकडे!! फक्त दोन मिनिट!! प्लीज!!"
आणि अशा पद्धतीने "ध" चा 'मा" झाला.

(जेवणाची पाने मांडली असताना)
"काका मला वाचवा!!" नारायणराव.
"दोन मिनिट! जरा धोतर सावरून येतो" रघुनाथराव.
"काका मला वाचवा!" नारायणराव.
"आयला! ही न सुटणारी धोतरं कुठे मिळतात कुणास ठाऊक!"रघुनाथराव.
"काका मला वाचवा" नारायणराव.
"अरे! अलोच! दोन मिनिट थांब!" रघुनाथराव.
"आ आ आ आ ई ई ई ई! मेलो मेलो" नारायणराव.

पुढील संदर्भांचा काळ सांगण्याची गरज नाही. वाचकाना तो समजेलच. (आम्हाला माहीत नाही असे नाही. पण आम्हीच सगळे सांगितले तर वाचकानांमध्ये संशोधनाची आवड कशी निर्माण होणार? म्हणून मुद्दामच काळ सांगितला नाही. असो!).
(प्रसंग पहिला.)
"अरे न्यूटन! त्या सफरचंदाच्या झाडाखाली अजून किती वेळ बसणार आहेस? चल घरी!"
"अलोच! दोन मिनिट! तू हो पुढे!"

(प्रसंग दुसरा.)
"जेम्स! मी जरा शेजारच्या विल्यम्सकाकूंकडे जाऊन येत्ये! आलेच दोन मिनिटात! पाणी गरम करायला ठेवले आहे. ते उकळले की चूल विझव आणि भांड्यावर झाकण टाक"

(प्रसंग तिसरा)
"अरे अल्बर्ट आईनस्टाईन! बायको असली की भांडते आणि नसली की चैन पडत नाही! माझी बायको बघ! दोन मिनिटात शॉपिंग करून येते म्हणाली आणि तीन तास गायब! मला तिच्यावाचून एक एक सेकंद एका युगासारखा भासत आहे."
"तिला हे तीन तास मात्र दोन मिनिटासारखे वाटत असतील! ह्यालाच रिलेटिव्हीटी म्हणतात. अरेच्चा. मी एक महान शोध लावला. रिलेटिव्हीटी!!!" आईनस्टाईन.

(प्रसंग चौथा)
"अर्किमिडीज! किती वेळ परसाकडला बसला आहेस? तुझे अंघोळीचे पाणी काढून ठेवले आहे. आहे. जा लवकर अंघोळ करून घे!"
"अलोच दोन मिनिटात"
"अरे ती तोटी तरी बंद कर. पाणी वहून जाईल!"
"हो! करतो! माझा टॉवेल ठेवला का बाथरूम मध्ये?"
"रहिलेच! थांब दोन मिनिट!"
(बर्‍याच वेळाने)
"च्यायला! टब मध्ये पाणी अगदी काठोकाठ भरले तरी अजून टॉवेलचा पत्ता नाही! ह्यांची दोन मिनिटे कधी संपणार कुणास ठाऊक! जाउदे! मारावी उडी अशीच टबात! च्यायला बरेच पाणी खाली सांडले. किती सांडले असेल बरे? युरेका युरेका"

असे अनेक प्रसंग आम्हाला सांगता येतील. भारताच्या स्वातंत्रलढ्यातही दोन मिनिट हा वाक्यप्रयोग झाल्याचे दाखले आहेत.

"आपण भारत सोडून जावे अशी माझी कळकळीची विनंती आहे" गांधिजी (साल १९२२).
"हां! जातोच! दोन मिनिट!" इंग्रज.
"आपण भारत सोडून जावे अशी माझी कळकळीची विनंती आहे" गांधिजी (साल १९३०).
"हां! जातोच! दोन मिनिट!" इंग्रज.
"आपण भारत सोडून जावे अशी माझी कळकळीची विनंती आहे" गांधिजी (साल १९३५).
"हां! जातोच! दोन मिनिट!" इंग्रज.
"आपण भारत सोडून जावे अशी माझी कळकळीची विनंती आहे" गांधिजी (साल १९४०).
"हां! जातोच! दोन मिनिट!" इंग्रज.
"दोन मिनिट, दोन मिनिट म्हणून किती वेळ रहिले हे! आता फार झाले. चले जाव!" गांधिजी (साल १९४२).

दोन मिनिट चा अगदी सद्यकाळातला दाखला.
"अबे सायमंड्स. चुप होता है के नहीं." भज्जी.
"दोन मिनिटात गप्प होईल तो!" सचिन.
(१५ मिनिटानी)
"अबे सायमंड्स. चुप होता है के नहीं." भज्जी.
"दोन मिनिटात गप्प होईल तो!" सचिन.
(१५ मिनिटानी)
"आयला अजून गप्प बसायला तयार नाही. किती वेळाने गप्प बसेल? दोनकी जास्त?" भज्जी.
"अरे हा डाँकी म्हणाला की मंकी? बहुतेक मंकीच म्हणाला असणार. रेशियल टिप्पणी केली. चला तक्रार करुया" हेडन.

थोडक्यात काय, तर दोन मिनिट ह्या शब्दप्रयोगामुळे अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे शोध लागले. म्हणून आम्ही म्हणतो की अगर तुमचा नवरा दोन मिनिट असे सांगून अर्धा तास परसाकडला गेला, किंवा तुमची मैत्रिण दोन मिनिटात पोहोचते असे सांगून अर्ध्या तासाने सिनेमागृहात आली, किंवा तुमची बायको दोन मिनिट असे सांगून दोन तास शॉपिंगला गायब झाली तरीही तुम्ही तुमची मन:शांती ढळू देऊ नका. काय सांगावे! तुमच्या बाबतीतही एखादी ऐतिहासिक घटना घडेल आणि तुमचे नाव इतिहासात अजरामर होऊन जाईल.
आमचे संशोधनच सांगते तसे!

गुलमोहर: 

मस्त आयडिया Happy सही जमलय!!

येडा का खुळा, मस्तच.
कस सुचल तुला हे सगळ?
पण छान सुचल.
मला आणि माझ्या सगळया दोस्ताना आवडल.
तुझि विनोदबुद्धि अफाट आहे .....
तिला जप आणि आणखि भर टाक
आम्हि वाट बघतोय

...जय!!!

छानच स्टाईल आहे बाई तुमच्या लिखाणाची. सगळीच उदाहरणं सही.
पहिला प्यारा वाचून म्हटलं आता या विषयावर यवढा मोठा लेख म्हणजे पाणी टाकून पकवलं असणार.
पण सॉलिड रंगलाय लेख पुढे.
अयोध्याटाईम्स Happy

सहीच लिहिलंय... आवडलं!! Happy

दोन मिनिटात रामायण, महाभारत, शिवशाही, पेशवाई आणि आयसीसीई! धमाल ! मस्त लिहिलयसं.

ज ब री Lol Rofl Lol Rofl Lol Rofl Lol Rofl Lol Rofl Lol
 
 
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

..प्रज्ञा

वाचलेल्या लिखाणाला प्रतिसाद द्यायचा म्हणूनच मा.बो.ची सभासद झाले..
मस्त!!
धमाल!

येडा का खुळा
मस्तच लिहिल आहे आपण.
ते गांधीजींची दोन मिनिट म्हणजे कळसच म्हणायचा.
वाचता वाचता घडलेला प्रसंग! तुमचे लिखाण वाचत असतानाच लेकीने आंबा कापुन मागितला आणि नकळत मुखातुन शब्द बाहेर पडले "दोन मिनिट ' हं बाळा.आणि माझी मीच वेड्यासारखी हसले. लेक माझ्याकडे बघुन विचारात गढली आपल्या आईला झाले तरी काय?

ये, फारच फर्मास जमला आहे २ मिनिटांचा बेत. हहपुवा.
धर्म्या... हेहेहे... एकदम खतरी. मला ते हांग पळै रे पिशा पार्था ची आठवण झाली.
आणि ते चामड्याची चोळी पाहीजे बाई पण एकदम खास.
कळकळीची विनंती... हाहाहाहा Happy

वरील सर्वांना मोदक Lol

vishay chaan aahe...pan aajun different subject gheun lihu shakla aasta... means.... TV serials....hindi films aani TV ads yacha samvesh karun chaan bhatti jamli aasti.... tari theek aahe...not bad....

जबरी
दोन्+दोन चार मिनीट हसतच होते
लेख दोनदा वाचुन झाला
सही

कसल भन्नाट लिहिलय. सगळेच दाखले एकसे एक Biggrin

अरे थांबला का राजा, तू यडा का खुळा?
आणखी जरा दोन मिनिटं लिहित राहा रे बाळा..!!!

हसून हसून पुरेवाट झाली !! ऑफिस मधे नुसता मॉनिटर कडे बघत वेड्यासारखा हसत होतो. डोळ्यात पाणी वगैरे.
सहीच लिहिले आहे.

२ मिनीट... ही ही ही एकदम मस्त खुसखुशीत लिहीलय Happy

आर वा र मझ्या दोस्ता लय झक्कास लीवलयस बघ !!!!!!!!!

सही आहे Biggrin

    ================
    आज झालो तुझी मी वदंता नवी
    कालची बातमी काल होती खरी

      शेवटी शेवटी खूप आल्या सरी

        -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

        मस्त आहे Happy

        विष्णु.... एक जास्वंद!
        *******************************************
        माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...

        .....

        Rofl Rofl
        Rofl Rofl
        हसताना मात्र दोन मिनिटांपेक्षा जरा जास्तच हसलो आम्ही !!!!!
        Happy
        ---------
        रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

        येडाकाखुळा,

        जबरदस्त लेखनशैली आहे. एकदम आवडला...

        शुभेच्छा!

        Pages