सर्दी

Submitted by chinmaysk on 4 September, 2010 - 11:59

सर्दी.... ईश्वरा्ने माणसाला बहाल केलेली एक...... नाही..व्याधी, रो्ग वगैरे म्हणवून घ्यायचीही सर्दीची लायकी नाही. देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तुला काही ना काही काम दिलंय असं म्हणतात. पण काही काही बाबतीत ते पटत नाही.. उदा. डास ! हे प्रकरण का तयार केलं असेल, हे मला आजपर्यंत न सुटलेलं कोडं आहे !! लोकाना नको त्या वेळी, नको तिथे चावणे, लोड शेडिंग चालु असता्ना रात्रीच्या वेळी आपल्या सुमधुर गुणगुणण्याने लो्कांच्या झोपेचा कचरा करणे,मलेरियाच्या microbes ना आपल्या पाठी घालुन गावची सैर करुन मग ईष्टस्थळी (म्हणजे एखाद्याच्या रक्तात) पोहचवणे, असली कामं डासांना फ़ार चांगली जमतात ! तसंच सर्दीचं आहे. म्हणजे माणसाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैताग देण्यासाठी डास, सर्दी, माश्या असल्या गोष्टी ideal आहेत !

सर्दीचा उल्लेख अगदी पुरातन साहित्यातही आढळून येतो. आद्य इजिप्शियन कवी सलील जिब्राल्टर (ख्रिस्तपूर्व ७८६-७००) देवाला म्हणतो – ’नाक नको पण सर्दी आवर !! ’.. अगदी आपल्या भारतातील आद्यवैद्य सरक (ख्रिस्ताब्द ३३३-३७८) यांच्या एका ग्रंथात त्यांनी – ’मा सर्दय मा सर्दय मा सर्दय भगवंत !’ अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आढळते

एखाद्याला सर्दी कधी होते आणि का होते, याचा अजुन तरी शो्ध लागलेला नाही. सर्दीचा उगम कुठे आहे (अर्थातच नाकात ?) याचा शोध चालु आहे. एक कयास असा आहे की सर्दी हा एक संस्कॄत शब्द असुन त्याची फ़ोड स: रद्दयति (म्हणजे सर्दीने बेजार झालेला तो त्याचे सगळे कार्यक्रम रद्द करतो ) आहे. दुसय्रा एका विद्वानाच्या मते स: रद्दी अशी या शब्दाची फ़ोड असुन याचा अर्थ सर्दी झालेल्या त्या माणसाला आपण अगदीच रद्दीच्या लायकीचे झालो आहोत असे वाटते, असा आहे
.
एखाद्यापुढे हात टेकणे ( सर्दीच्या बाबतीत नाक टेकणे म्हणायला पाहिजे ) म्हणजे काय, याचा एखाद्याला सर्दी झाली की शब्दश: प्रत्यय येतो. कारण सर्दी वेगवेगळ्या पद्धतीने छळते. रात्री उशीवर डोकं टेकलं की तिच्या लीला सुरु होतात. नाक पूर्ण बंद पडलं की नाकाचं काम तोंडाला करायची वेळ येते, आणि मग घशातून चित्रविचित्र आवाज काढत आपण झोपेची आराधना करु पाहतो. मध्येच कधीतरी नाकाचं रुपांतर शुष्क वाळवंटातून एका झय्रात होतं आणि त्या झय्रात आजुबाजुच्यांना अंघोळीचा प्रसंगही कधी कधी येतो ! रात्री झोपताना विक्स, अमॄतांजन,सर्दीसाठी निघालेल्या (आणि fail झालेल्या) अनंत प्रकारच्या गोळ्या या सर्वांचा भडिमार चालु असतो, पण नाही.. सर्दी काही जात नाही. उलट येताना ती एक के साथ २ फ़्री या न्यायाने खोकला, ताप वगैरे आपल्या जातभाईंना पण घेऊन येते.

बरं, सर्दी हा काही दुर्धर वगैरे type चा ही रोग नाही, की ज्यामुळे लोकांना तुमची कीव यावी. मला तर वाटतं, मलेरिया, कावीळ वगैरे बरे, सरळ attack तरी करतात, आणि रोग्याला खरंच काहीतरी झालंय हे जगाला कळतं.सर्दी मात्र गनिमी काव्याने आपलं काम करत असते. सर्दीनी हैराण झालेल्या माणसाबद्दल कोणालाही sympathy, empathy असलं काहीही वाटत नाही. उलट “मला बरं वाटत नाही” असं सांगितल्यावर “ ह्या.. नुसती सर्दीच तर झालीये.. किती नाटकं करशील” असंही बोलायला ते कमी करत नाहीत. इतर सर्दाळू (म्हणजे सर्दीचे होऊ घातलेले नवीन भक्ष्य – जर्दाळू प्रमाणे सर्दाळू हा शब्दही मराठीत प्रचलित व्हायला हरकत नाही ) लोकं त्याच्यापासून दूर दूर राहू पाहतात, आणि मग तो अजुनच वैतागतो. त्याला ’हे जग असार आहे’, ’सगळ्या वस्तु नश्वर आहेत’ वगैरे वाक्यांची सत्यता पटायला लागते.

मात्र सर्दी येते जितकी गुपचुप, तितकीच जातेही गुपचुप. फ़क्त मधला काळ ती माणसाचा पूर्ण ताबा घेते ! आणि दुसरं म्हणजे आत्तापर्यंत सर्दी न झालेला मनुष्य माझ्या तरी पाहण्यात नाही ( ’ज्याला आयुष्यात सर्दी झाली नाही तो माणुसच नाही असा एक (वादग्रस्त) सिद्धांतही वाचण्यात आला आहे ).

सर्दीनी फ़क्त माणसाला पिडलंय असं आजिबात नाहीये.. परवा आमच्या गल्लीतील श्वापद जमातीतील श्रीयुत टॉमी यांना शिंकताना पाहून आम्हास साश्चर्य भीती वाटली,आणि समस्त प्राणीमात्रांस छळणाय्रा या क्रूर सर्दीस ’माणसाचा (आणि इतर प्राण्यांचा) सर्वात मोठा शत्रू घोषीत केले जावे अशी शिफ़ारसही शासनाकडे करण्यात आली.

असो. सर्दीबद्दल शोध लावण्याचे अनेक प्रयत्न झालेत, आणि पुढेही चालु राहतील. तेवढं सर्दीच्या (नाक सोडून दुसय्रा) उगमाबद्दल काही कळल्यास जरुर कळवावे....

- चिन्मय

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सर्दी होण्याचे प्रमुख कारण घरकाम हेच असावे (निदान पुरुषांच्यात तरी) असे मला वाटते. गंमत म्हणजे काम केल्यामुळे सर्दी होत नाही, पण काम करायचे आहे ह्या विचाराने सर्दी होते.

दुर्दैवाने “ ह्या.. नुसती सर्दीच तर झालीये.. किती नाटकं करशील” असे म्हंटल्याने (हे वाक्य सौ कडून हमखास ऐकायला येते) सर्दी बरोबर स्ट्रेसपण वाढतो, काम करावे लागेल या भीतीने.

अमेरिकेत आल्याचा एक फायदा म्हणजे 'सर्दी' असे खेडवळ नाव न देता मी त्याला 'अ‍ॅलर्जी ' असे भारदस्त नाव देतो. विशेषतः धुळीची अ‍ॅलर्जी म्हंटले म्हणजे जरा तरी काम कमी होईल अशी आशा असते. पण त्या ऐवजी कसली तरी गोळी नि पाणी समोर येते, नि वर 'आता औषध घेतले आहे तर दोन तीन दिवस बीअर, ड्रिंक्स घेऊ नका' अशी समज मिळते.

त्यामुळे सध्या मी 'अ‍ॅलर्जी झाली असे म्हणणे' नि 'काम करणे' या दोन्हीचा cost\benefit अभ्यास करत आहे.

मलाही हल्ली सर्दी झालीये अन त्याबरोबर घश्याचीही वाट लागलीये...नीट बसतही नाही उभाही नाही अन नुसताच दुखतोय. Sad

’ज्याला आयुष्यात सर्दी झाली नाही तो माणुसच नाही असा एक (वादग्रस्त) सिद्धांतही वाचण्यात आला आहे >> Happy

सर्दीनी हैराण झालेल्या माणसाबद्दल कोणालाही sympathy, empathy असलं काहीही वाटत नाही. उलट “मला बरं वाटत नाही” असं सांगितल्यावर “ ह्या.. नुसती सर्दीच तर झालीये.. किती नाटकं करशील” असंही बोलायला ते कमी करत नाहीत>>>
हे तर अगदीच खरंय ... सर्दीने जीव हैराण होतो, काम सुचत नाही..पण बॉस म्हणते, "सर्दीच आहे ना? मग सुट्टी कशाला?" Sad

अगदी जिव्हाळ्याचा विषय. Uhoh
पूर्वी तर मला हमखास महिन्या २ महिन्यातून एकदा सर्दी ठरलेली असे. नाक चोंदणे, नीट श्वास न घेता येणे हे कॉमन आहे. लहानपणी तरे ड्रॉप्स घालून घालून त्याची नाकाला इतकी सवय झाली होती की नंतर माझे नाक त्या ड्रॉप्सनाही प्रतिसाद देईनासे झाले होते. Sad
दादरला पुसाळकर म्हणून एक नाक-कान-घसा तज्ज्ञ आहेत. त्यांनी ड्रॉप्स न वापरण्याचा सल्ला दिला. मग हळू हळू जाणून बुजुन सवय केली.
आता सर्दी प्रकरण बरेच कमी आहे. तरी सीझन बदलला की एकदा सर्दी हमखास आहेच.

सर्दीने बेजार झालेला तो त्याचे सगळे कार्यक्रम रद्द करतो >>>
सर्दी झालेल्या त्या माणसाला आपण अगदीच रद्दीच्या लायकीचे झालो आहोत असे वाटते >>>
सर्दाळू लोकं >>>
Rofl

सर्दी काही जात नाही. उलट येताना ती एक के साथ २ फ़्री या न्यायाने खोकला, ताप वगैरे आपल्या जातभाईंना पण घेऊन येते. >>> अगदी अगदी Angry