(माझे वडील मी लहान असताना मला गोष्टी सांगायचे त्यातली एक मी आता तुम्हाला सांगणार आहे. मला माहीत नाही, ही गोष्ट पूर्वापार - अगदी त्यांच्याही बालपणापासून - अस्तित्वात आहे का. मात्र मी पुढे ती माझ्या मुलांना सांगत असे आणि आता माझ्या नातवालाही सांगतो. माझा नातू आता फक्त आठ महिन्यांचा आहे पण केव्हाही ही गोष्ट सांगायला मी सुरुवात केली की रडणं थांबवून, खेळणं थांबवून अगदी लक्ष देऊन ऐकतो. गोष्ट सांगताना मी केलेले काही आविर्भाव, हातवारे बघून रिस्पॉन्सेस देतो. आश्चर्य वाटते. पहा तुम्ही तुमच्या मुलांना आणि नातवंडाना सांगून. माझ्या नातवासारख्याच प्रतिक्रिया मिळाल्या तर मला जरूर कळवा.)
"कुंदबाबा (मी लहान असताना ते मला या नावाने संबोधायचे), आमची गोष्ट ऐका बरं का ! एक उंदीर होता. तो एकदा चाल्ला होता रस्त्यावरून. चालता चालता त्याला सापडला कापडाचा एक 'तुंडका' (मी तुकडा न म्हणता 'तुंडका' म्हणायचो तेव्हा). तर तो तुंडका बघून उंदराला वाटलं अरे व्वा ! आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग त्यानं काय केलं माहीत आहे का? तो गेला शिंप्याकडं. शिंप्याला म्हणाला, "शिंपीदादा, शिंपीदादा, मला या कापडाच्या तुंडक्याची टोपी शिवून द्या". तर शिंपी म्हणाला, "चल हट, मी नाही देत जा". तसा उंदराला आला राग. तो म्हणाला "चार शिपाईको बोलवेंगा, तुमको मारेंगा, आमी तमाशा पाहेंगा". शिंपी घाबरला. म्हणाला, "नको रे बाबा, नको नको नको. आण तो तुंडका, मी टोपी शिवून देतो". म शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला, कुणाकडं? परटाकडं ! परटाला म्हणाला , "परीटदादा, परीटदादा, माझी एवढी टोपी धुवून द्या". परीट खूप कामात होता. तो म्हणाला, "नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता. जा". तसा तो उंदीर म्हणाला, "चार शिपाईको बोलवेंगा, तुमको मारेंगा, आमी तमाशा पाहेंगा". परीट घाबरला. म्हणाला, "नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपी धुवून देतो". मं त्यानं टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगार्याकडं. म्हणला, "रंगारीदादा रंगारीदादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या". रंगारी म्हटला, "जा जा, मी नाही देत जा." तसा उंदीर काय म्हटला? बरोब्बर! "चार शिपाईको बोलवेंगा, तुमको मारेंगा, आमी तमाशा पाहेंगा". रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल लाल रंगवून दिली. हं? मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडं. "गोंडेवाले, गोंडेवाले, माझ्या टोपीला चार गोंडे लावून देता का?" गोंडेवाला बोल्ला, "मी नाही देत. ज्जा" तसा उंदीर त्याला पण म्हणाला, काय?, "चार शिपाईको बोलवेंगा, तुमको मारेंगा, आमी तमाशा पाहेंगा". तसा गोंडेवाला घाबरला. म्हणाला, "नको रे बाबा, नको नको नको. आण मी टोपीला गोंडे लावून देतो". मग त्यानं चारच काय, पाच गोंडे लावून दिले. उंदीर झाला खूष. त्यानं टोपी घातली डोक्यावर आणि चाल्ला मजेत गाणी म्हणत. तिकडून चाल्ला होता राजा. राजाबरोबर होते शिपाई. राजानं पाह्यलं उंदराला. आणि शिपायाना म्हणला, "घ्या रे त्याची टोपी हिस्कावून". तशी शिपायांनी उंदराची टोपी हिस्कावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता पळता म्हणायला लागला, "राजा भिकारी, भिकारी! माझी टोपी घेत्ली, घेत्ली". आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडं भिरकावली. तशी ती टोपी उंदरानं उचलली, झटकली आणि घातली. आणि माहीत आहे काय केलं? लांब गेला आणि म्हणायला लागला , "राजा मला भ्याला, माझी टोपी दीली, राजा मला भ्याला, माझी टोपी दीली, ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम !"
संपली आमची गोष्ट. आमची गोष्ट लांब, उंदराच्या पाठीत खांब! आमची गोष्ट आखूड, उंदराच्या पाठीत लाकूड!!
हं. चला जा झोपायला आता बघू.
वा वा.... . अम्हाला लहानपणी
वा वा.... .
अम्हाला लहानपणी म्हणजे पहिलीत ''बालभारतीत'' होती ही गोष्ट... हिंदीकरण वगळता.....
आपण इथे पोस्टून क्षणभर मला'' बाळ'' बनवलंत.
धन्यवाद.
मलाही लहान पणी ऐकल्यसरखी
मलाही लहान पणी ऐकल्यसरखी वाटते आहे..

ढुमढुम ढुमाक, ढुमढुम ढुमाक, ढुम >>
Signature
एकदा दुरदर्शन वर पाहिल्याचं ही आठवतयं..
धन्स, पुन्हा आठवण करुन दिल्या बद्दल
ही गोष्त १९६०-६१ च्या दरम्यान
ही गोष्त १९६०-६१ च्या दरम्यान पाठ्यपुस्तकात होती. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद . मी जवळ जवळ विसरलोच होतो....
धन्स..! आज्जीच्या सगळ्या
धन्स..!
आज्जीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या, त्यात हीपण!
मनापासून आभार!
माझ्या लेकीची आवडती गोष्ट.
माझ्या लेकीची आवडती गोष्ट.
आम्हालाही होती ही गोष्ट शाळेत
आम्हालाही होती ही गोष्ट शाळेत