अगदिच फुलाफुलांचा नाही पण... होत होता तो घालून निघाले, आपला इंडियन पंजाबी ड्रेस, हो... ओढणीसकट. हात-बीत नीट हलवता येतायत ना ते पाहिलं.
'हे घालून येणारेस?', इती मुलगा.
'मग? माझ्यामते ह्या ड्रेसात लांब उडी, उंच उडी, बेडुक उडी सगळं करता येतं.... फक्तं या वयात नाही... पण आपण ड्रेस विषयी बोलतोय', मी... 'हाच होतोय' हे दोन शब्दं टाळत टाळत जितकं बोलता आलं तितकं बोलले.
’आई, ड्रेसचं ठीकय.... पण ते सगळं उगीच करून बघू नकोस..... ह्यातलं बरचसं इथे अप्लाय होत नाही’, हा माझा लेक ना.... हा आत्ता अजून जमिनीतून पूर्णं उगवला नाही, तर मला सांगतोय. मी गप्पं बसले. म्हटलं... ’तू तुझा वेगळा क्लास कर, माझ्या बॅचला नको’, असं म्हणाला तर तर काय घ्या?
नवरा नॉर्मली गप्पं असतो अशा भांडणात. मागे एकदा विचारलं तर... नरो वा कुंजरो... असलं काहीतरी बोलला... त्याचं आणि लेकाचं नंतरचं खिदळणं झालं त्यात ’बरोबरच आहे.... माणसाचंही आणि हत्तीचंही....’ हे ऐकल्यावर चिडताही आलं नाही जोरात.
ते जाऊदे. सांगत काय होते की, मुलाने बॅडमिंटन शिकायचं जरा मनावर घेतलं... शिकवणारा चायनीज आहे, जाम कडक आहे, त्यामुळे नेहमीचा लेकाचा कोचिंग पार्टनर ड्रॉप झालाय....आणि लेकाला पार्टनर हवा आहे!
ऐकल्यावर म्हटलं... काय हरकतै? आपण करावा प्रयत्नं. नाहीतरी जरा शेप मध्ये यायला काहीतरी करायचं मनावर घेणारच होतो... लवकरच.
कधी नव्हे ते लेक तयार झाला, आम्ही दोघे दोनेक तास बाहेर म्हटल्यावर नवरा एकदम ’फुले न समाये’.
कोर्टवर पोचलो. माझे रबरी सोलचे नवीन शूज, लाकडी फ़्लोअरवर च्युईक च्युईक आवाज करत होते.
’ए, आवाज काय करतेस, पाय उचलून टाक ना’, अशी दटावणी झाली.
तसं जपून चालताना, आपण बदकासारखे चालतोय असं उगीचच वाटून गेलं. मग ’अशी काय चालतेस? सरळ चालना’ हे ही झालं.
कुठल्याही वयात औत्सुक्य असतंच माणसाला...बायकांची नजर जरा जास्तं चौकस इतकच... इकडे तिकडे बघत चालताना सरळ एका कोर्टवर जेव्हा जाळ्यात आपणहून चालत गेले तेव्हा मात्रं लेकाने हात धरला. श्रावण बाळासारखी कावड-बिवड नव्हती इतकच.
दिसायला जेट ली पण वागायला मि. मियागी सारख्या ह्या लेकाच्या गुरूला मी दोन्ही हात जोडले.
’गूड गूड....नमस्टे... लाईट?’ (मी हसून मान हलवली)
’व्हॉट नेम?’
मी तत्परतेने नाव सांगितलं, ’शलाका’
’गूड गूड...., केदार टोल मी, सलाका!....सलाका, मीन्स केदार्स मदर? ऑल इंडियन नेम्स हॅव मीनिंग... लाईट?’, मि. मियागी.
मी एकदा ’व्वा’, एकदा ’नाही’, परत एकदा ’नाही’, मग ’हो’ आणि शेवटी थकून ’नरो वा कुंजरो’ अशी मान हलवली. भलत्या भलत्या वाक्यांचे पाय एकात एक गुंतवून त्यांचा नुडल्स सारखा गोळा, जो ’गूड गूड’ ने सुरू होतो आणि शेवटी ’लाईट?’ चं टोक लोंबतं.... करून काटाचमच्यावर दिल्यावर आपण काय करणार? गप गुमान तोंडात सरकवणार... तसच.
’ओ, यु वीअल इंडियन?’, मी अजून माना हलवण्याच्याच फेजमध्ये जमेल तितकं हसत, ओढणी सावरत ’हो’.
आपले पांढरे स्वच्छ दात जराही न दाखवता तो पुढे म्हणाला, ’गूड, गूड... यु वीअल इंडियन फॉर बॅडमिंटन,’ मग आपल्याभोवती गरारा दाखवत पुढे म्हणाला, ’गाऊन... गाऊन? पाल्टी गाऊन? विल बी डिफ़िकल्ट टू प्ले. बट शॉल्ट्स ऑर पँट आय सजेस्ट टू ऑल... गुड फॉर एवलीथिंग.’
हं! हा दिसतो तितका चपटा नाहीये.... बयापैकी तिरपी धार आहे..... पुढल्यावेळी पँट घालायला हवी.
’यू प्ले एनी गेम्स? नॉट नाऊ... आय सी दॅट....व्हेन लिटल? लिटल?’ त्याचं बोबडं लिटल आम्हाला कळत नसल्यासारखं हाताने इवलं इवलं दाखवत म्हणाला.. तरी बरं मी प्रत्यक्षात तीन-चार इंच उंचच होत्ये त्याच्यापेक्षा. मी सध्या काहीही खेळत नाही ह्याचा साक्षात्कार ह्याच्या पॅनोरॅमिक पापण्यांमागच्या फटींतून झालाच असणारच व्यवस्थित..... लहान असताना काही खेळलेय काय... केस हिस्टरी विचारतोय....
ह्याला माझ्या लेकाला गडबडीने उत्तर द्यायची काही म्हणजे काही गरज नव्हती. त्याला नक्की वाटलं असणार हिला इंग्रजी येत नसणार बहुतेक. नंतर विचारलं तर गधडा म्हणाला की ’तुझं काही खरं नाही... तुझ्या शाळेतलं लंगडी, खोखो सांगत बसशील... नाहीतर ते फुगड्या, टोडच्या उड्या... कायतरी’
मग काय.... परत लेकालाच त्याने विचारलं, ’हाऊ इज हर हँड अँड आय को-ओल्डिनेशन?’
आपली तयारी असेल चौथीची आणि लेकाच्या उत्तरावर उगीच हा आपल्याला बिगरीत नेऊन बसवेल म्हणताना... मीच चटकनी पुढे होऊन सांगितलं, ठणठणीत इंग्रजीत... 'कितीही काळोख असला तरी घास नाकात जात नाही म्हटलं'... काय घाबर्तेय काय?
(कपाळावर हळूच हात मारतानासुद्धा बल्ल्या कित्ती माझ्यासारखं करतो.... ह्यांचं आपलं काहीतरीच)
’गूड गूड.....’ गुडुदेव पुढे म्हणाले, ’सकाला, लुक आट दॅट हँडसम यंग मॅन...’ माझ्या नावाची लागलेली वाट कानाआड करून, मी अभिमानाने माझ्या तगड्या लेकाकडे बघितलं.... कोणत्या चक्कीचा आटा... इंडियन कुकिंग.... व्वा! छानच तब्येत केलीये लेकाची.... वगैरे इंग्लजीत ऐकायला मिळणार असं मनात म्हणून पूर्णं करायच्या आधीच तो म्हणाला, ’फॉलो हिम.... अँड डू द सेम स्ट्लेचेस....’
कपाळाकडे वेगाने जाणार्या हाताने जमेक तितक्या शांतपणे केस मागे सारून बघितलं.... लेक जरा जास्तच जोर लावून स्ट्रेचेस करत होता का काय.... कुणास ठाऊक. स्ट्लेचेस तल स्ट्लेचेस! मी मस्तंपैकी कथ्थक वगैरेला बांधतात तश्शी ओढणी कसली.... आणि केलं बाई कसंतरी.
मग कुठे त्याने हातात बॅट दिली. किती आनंद झाला म्हणून सांगू.... नकळत मी ती तलवारीसारखी पेलली, चालवली असणार....
आपण आपली झाशीच्या राणीच्या देशातली माणसं.... हातात शस्त्रं आलय, पदर कसलाय.... होतं थोडं आजूबाजूच्या परिस्थितीचं भान... नाहिसं!
म्हणून त्याने गडबडीने काढून घ्यायला नको होती....
पण मग लक्षात आलं की, ती बॅट, तलवार, भाला, दांडपट्टा, झाडू किंवा अगदी तळणीचा झारा ह्यापैकी कोणत्याच स्टाईलमध्ये धरायची नाहीये.... कशी धरायची ती दाखवण्यासाठी काढून घेतली त्याने....
पण फुलं काही दिसेनात आजूबाजूला... नुस्त्या झार्याचं काय करायचं बाई?
तर ’नुस्ती पळापळ’! पहिले काही दिवस काही ढांगांतच कोर्टावर वेगवेगळ्या दिशात कोर्टाची हद्द न ओलांडता पळता यायला पाहिजे ह्याचीच प्रॅक्टिस करायला लावतो हा. हे म्हणजे व्हायोलीनच्या क्लासला जाऊन, ’नुस्ती बो फिरवायची प्रॅक्टिस करा ह्याच्यावर’ असं म्हणून तारा काढलेलं व्हायोलीन हातात देण्याइतकं दुष्टपणाचं.
मुलगा त्या बाजूला, मी ह्या बाजूला... पळापळ सुरू... दिसत नसलेला उंदीर मारायला करतो ना... तसलच काहीसं.
(आपल्याला कुठे मार्टिना नवरातिलोवा व्हायचय... आपणहून इतकं कुठे पळणार होतो? लेकाचा (म्हणजे माझाच लेक) अडीच ढांगांत नेटपाशी येतोय.... मला साडेचार आत्ताच लागतायत... मागे कोकणात एकदा आग्या मोहोळाच्या माश्या मागे लागल्या होत्या तेव्हा असेच पळालो होतो घरापर्यंत.... तेव्हा नव्हता इतका दम लागत.... हा ओरडतोय कशाला? चायनीजमध्येही हा बोबडं ओरडत असेल का? जरा जोरात आपटली गेली बॅट तर काय होतं? मग एक काठीच दे म्हणावं हातात.... आणि बघच तू...)
हे सगळं मनात बर का....बाहेर जरा जोरातच हिश्श.... फिश्श... हुस्स... ढिस्स..फुर्र.... फिस्स काय वाट्टेल ते ऐकू येत होतं.
माझा नाकपुड्या आणि तोंड ह्यातही न पुरता ओसंडून वहाणारा श्वास ऐकून आणि त्याहीपेक्षा सैरावैरा पळणं बघून तो म्हणाला, ’शकालाका...’ (मला मोठ्ठ्याने ’बुम’ ओरडावसं वाटलं).... यू जस्ट वॉच टूडे.... ओके?’
जस्ट वॉच? मग आत्तापर्यंत काय ’टांग टिंग टिंगाक’ नाचत होत्ये का काय? आत्तापर्यंत नाकातून येणाया वाफा, आता रागाचा धूर बनून कानातून येणार असं वाटलं....
इतक्यात लेकाने एक मोठ्ठा हारा आणलेला बघितला.... हारा भरून पांढरी शूभ्र फुलं... हरखुनच गेले. पण गुरूदेव म्हणालेत तर थांबूया... आधी हा श्वास ताब्यात येऊदे मग चालवू दोन-चार हात.
कोच, कोर्टच्या एका बाजूला आणि माझ लेक दुसया. मस्तपैकी विंबल्डनमध्ये ते खेळाडू झुलतात ना, हत्तीसारखे?... अगदी तस्सा! हार्यातून एकेक फुल काढून कोच नुस्ता दुसर्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी ती पडतिल अशी उडवत होता. कोच आणि फुलांचा हारा एकाच जागी.... घामाघूम लेक आणि त्याने उडवलेली फुलं सर्वत्रं. जवळ जवळ सगळीच त्याला बर्यापैकी झेलता, उडवता, टोलवता आली. बरा खेळतो की... मी मनात म्हटलं.
लेकाच्याही तोंडातून तसलेच अगम्य श्वासोद्गार येईपर्यंत त्याला दमवून, गुरूदेवांनी ’सगळी फुलं गोळा करून ठेवा आता’, म्हणून सांगितलं....
आज एकही आपल्या नशिबात नाही?... माझा चेहरा वाचून आणि मोहरा बघून घाईघाईने, ’आई, ह्याला जाऊदे... मी तुला प्रॅक्टिस देतो’, असं लेकाने मराठीत समजावलं....
’गूड गूड... ओके.... सी यू नेस्ट संडे... सेम टाईम... अँड.... वेल डन, श्लीलंका, द केदाल्स मदर...’... त्याला सुधारण्याची संधीही न देता 'जेट'लीच्या वेगाने गेलाही.
माझाच अत्त्याग्रह.... मुलगा तरी काय करेल... त्याने आपली आधी जरा खरी प्रॅक्टीस द्यायचा प्रयत्नं केला... मी ह्या बाजूला हातात शस्त्रं घेऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे... थोडक्यात सगळीकडे... स्वैर संचार...
अजून एकाही फुलाच्या गळ्याचा घोट घेता आला नव्हता... खच मात्रं खूप पडला होता... हाराकिरी केलेली फुलं! मग माझ्या लक्षात एकेक गोष्टी जशा जशा यायला लागल्या तशा तशा मी आपलं लेकाला सुचवून पाहिलं....
थांब ही बॅट नको... तुझी दे
अरे जरा चांगली फुलं वेचून मार की रे... तू म्हणजे ना...
अरे, किती जोरात मारतोस...
कुठेही काय फेकतोयस... मी दिसत नाहिये का तुला कुठेय ती?
हे मधलं जाळं काढून ठेऊया का? म्हणजे तुला दिसेल मी नक्की कुठे उभीये...
ह्या आणि असल्या अजून चौतिस तरी सूचना केल्या असतिल... पण आईचं ऐकेल तो मुलगा कसला.... बोला-फुलाची म्हणतात तितकीही फुल-झार्याची गाठ नाही. आजूबाजूला अनेक धारातीर्थी पडली होती, ती फुलं उचलण्याचंसुद्धा त्राण नव्हतं हातात. कोर्टवर आले तेव्हा दोन होते, आता किती उरलेत कुणास ठाऊक असं आपल्याच पायांविषयी वाटून गेलं.
हात न हलवता काय खाता-पिता येतं? वाघ-बिघ कसे मस्त नै? केस विंचरले नाहीत तर चालतिल एकवेळ पण उद्या सकाळी दात कोण घासणारय माझे?.... असलं भलभलतं मनात यायला लागलं होतं.... माझा चेहरा बघून हिला उचलून न्यावं लागणार की काय... ह्या विचाराने मुलगा भेदरला होता....
ह्यातल्या बर्याचशा प्रकारांची आधीच कल्पना असल्याने हे घ्यायलाच आले होते.... हे गाडीत असल्याने मी बोलले नाही नाहीतर केदारला सांगणारच होत्ये....
अरे, तू मला खोखो खेळताना बघायला हवं होतस,
शिवाय मी आमच्या प्राथमिक शाळेच्या लंगडीच्या टीममध्ये होते...
ह्यांचं ना, मग काळ-वेळ न बघता सुरू होतं.... अरे तुझ्या आईच्या शाळेत चमचा-गोटी वगैरेच्या कसल्या जबरदस्तं शर्यती व्हायच्या माहितिये.... वगैरे वगैरे.
****************************************************************************
आपल्याला अमुक इतके स्नायू तमुक अवयवात असतात... ह्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या आत खोलवर होऊन तो आईssss, उईssss, करीत बाहेर पडल्यावर, आणि माझे सगळे हात पाय जागच्याजागी सापडू लागल्यावर.... ह्यांनी चावी फिरवलीच....
’काय अजून जाणार का पुढल्या रवीवारी? का त्या ह्यांच्या कडल्या पार्टीचं आमंत्रण आलय... हो म्हणायच?’
आपल्याला कोणी आवाज दिला की आपण मागे हटत नाय.... अगदी ’प्राण जाय पर वचन न जाय’... वगैरे लेव्हलचं अगदी निकराचं नाही पण... सहजासहजी सोडणार नाय आपण.
’छे छे... एकदा घेतलं हातात की पूर्णं करणारच... तुम्हाला माहितीये माझा स्वभाव कसा आहे तो...’, अवसान हे बहुतेकदा घात करण्यासाठीच येतं... असा माझा अनुभव आहे.
’तुम्ही जरा स्वस्तात ती फुलं कुठे मिळतात ती शोधा बरं... आम्ही कोर्टावर जाऊन वेगळी प्रॅक्टीस करणारोत.... तेव्हढीतरी मदत करा जरा...’, एक चार तरी दिवस जातील ह्यात... असा माझा नवर्याला सांगितलेल्या माझ्यासाठी करण्याच्या कामांचा अनुभव....
पण नवरा आणि मुलगा आपल्याला तोंडघशी पाडायला किती तत्पर असतात ते मी विसरलेच होते....
’अगं, मला माहीतीये ना तुझा स्वभाव?... म्हणून मी आधीच आणून ठेवलीत फुलं.... आपला तो शिध्या... अगं तो त्याच फॅक्टरीत आहे ना... अगदी हसत हसत आणून दिली त्याने हाराभर... वैनींना म्हणावं, कमी पडली तर सांगा असं सांगून गेलाय’. अजून टकलावर गंगा अवतीर्ण झाली नाहीये असा, पान-पराग खाऊन दातांच्या कडा रंगवलेल्या तोंडाचा ह्यांचा शिधये नावाचा मित्रं माझ्या हातच्या न खाल्ल्या मिठाला (शिधयेला हाय ब्लड प्रेशर आहे) नको तिकडे नको तेव्ह्ढा जागला....
हे म्हणजे भलतच झालं. त्या आठवड्यात लेकाची एकही परिक्षा नाही, एकही प्रोजेक्ट, असाईन्मेंट नाही. सगळेच्या सगळे मित्रं कुठे कुठे तोंड घेऊन गेलेत... माझ्या ऑफिसचं नूतनीकरण चालल्यानं सगळेच घरून काम करतायत... मला एकदम 'जाये तो जाये कहा'... झालं.
’कोर्टवर कशाला, आपल्या अंगणात करू प्रॅक्टिस म्हटलं.... फरशी घालून बरं समतल केलय’, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ती अशी.
ह्यांनीही रजा घेतली.... कारण काही नाही म्हणाले...... सकाळपासून ’वेगवेगळी फुले उमलली’ गुणगुणून झालं, मग घन रानी... घनरानी साजणा... च्या जागी मुद्दाम ’फुलराणी फुलराणी’ म्हणून झालं, मग ’कालचे वेड्या फुलांचे गंध तू मागू नको’ गाताना, मुद्दाम चुकून ’हार’ तू मागू नको म्हणून झालं.... मी ही आपल्याला कळतच नाहीये काही असंच दाखवलं... इतरवेळी लग्गेच सुधारला असता नवर्याला.
बॅटी, नेट-बीट घेऊन आम्ही अंगणात गेलो. ह्यांनी इतक्या गडबडीने मदत केली की मला 'दाल मे काला' नव्हे तर एकदम रस्समच दिसायला लागलं... काळंकुट्टं... डाळ कुठे नाहीच.
ह्यांनी हारा आणला आपणहून आतून... मला उगीचच आता हे ’हाराकिरी’वर काहीतरी कोटी करणार असं वाटलं.... दुष्टपणा नाहीतर....
आंघोळ न करता, हातात ई-सकाळचा प्रिंट घेऊन पुण्यातल्या पेंन्शनरांसारखे अंगणात खुर्ची टाकून बसले...
मी आपली हातात बॅट पेलत एकाच जागी स्ट्रेचेस करत होते.... आत्ता बोलतील नंतर बोलतील.... काही कोटी-बिटी केली नाही तर कित्ती बरं नै?....
लग्नानंतर इतक्या वर्षांत... पहिल्यांदाच माझ्या मनातलं ह्यांनी ओळखलं.... कोटी-बिटी काही केली नाही...
मी हुश्श होतेय तोच लेकाला म्हणतात कसे, ’तुझ्या आईचं हे आवडतं गाण हं.... कुठलं? तर ’मी आज फूल झाले....’
अस्सा राग आला होता... म्हटलं आज मुळीच बधायचं नाही. जिरवायचीच ह्यांची. लेकाला म्हटलं... ती फुल-झार्याची प्रॅक्टीस ना, आपण नंतर करू आज मला फक्तं ती पोज घेऊन उभं कसं रहायचं ते दाखव....
आईला शिकवायचं म्हटल्यावर काय... लेकाने विचारलं... ’कोणती पोज?’
’कोणती? आता कोणती काय? इथे काय गरबा नाचायला आलोय आपण?’ मी तडकलेच....
’अगं, सर्व्हिस करताना आणि फ़ेस करताना वेगवेगळे स्टॆंड घ्यायचे असतात....’, ह्यांनी इतकं समजूतीच्या स्वरात ते म्हटलं ना, की मला रागच आला.. म्हणजे अजून राग आला.
म्हटलं, 'आत्ता आधी फ़ेस कसं करायचं ते दाखव'... त्यानं दाखवलं...
तो दाखवतोय आणि मी पोझ घेतेय.... एकदा, दोनदा, तीनदा..... माझ्याच लक्षात येत होतं की एकदा अमेरिकन स्वातंत्र्यदेवीचा पुतळा... हो! त्या टॉर्चसकट, एकदा चक्क स्वर्गीय इंदिरा गांधीं सारखंही, मग झालच तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, संतोषीमाता, लाटण मोर्च्यातली बाई, हे सगळे अवतार दाखवून झाले... प्रत्येक ह्यांनी बर्रोबर ओळखला आणि इथे सिडनीत वाढलेल्या लेकाला व्यवस्थित एक्स्प्लेन करूनही दाखवला...
’आहेस तश्शीच उभी रहा... थांब हलू नकोस... इतकं विचारतोय आपल्या संस्कृतीबद्दल तर जरा कळू दे की...’ हे वर आणखी.
’पूरे’, म्हटलं , ’हे रवीवारी गुलूदेव शिकवतील... तू .... आता सर्व्हिस ची पोज दाखव..’
’पोज नाही... ऍक्शन आहे ती!’ लेकाने अक्कल पाजळली....
’म्हणजे त्यात हलायचं आहे’, इ-सकाळची पहिली दोन पानं हवा घातल्या सारखी हलवत हे म्हणाले.
बघितली ऍक्शन!... सोप्पं नाहीये.
दीड पायावर उभं रहायचं, बॅट आधी कुणाच्यातरी पार्श्वभागावर मारायची असल्यासारखी धरायची आणि फुलाला झटकण्याच्या जस्ट आधीची स्टाईल खिळ्यावर मारायच्या हातोडीसारखी....
रॉकेल गाळायच्या आधी आपण फनेलात बघतो ना... काही झुरळ-बिरळ अडकलेलं नाही भोकात?.... तस्सं त्या रिकाम्या फुलात बघायचं....
मानेचा कोन तिरका.... राजेशखन्ना स्टाईल नाही... जरा अजून जुना... देव आनंद स्टाईल... फक्तं त्याच्यासारखी लकवा भरल्यासारखी हलवत रहायची नाही... फक्तं कोन हवा....
मग ते फूल धरल्या हातालाच फक्त लकवा भरल्यासारखं ते फूल गळून पडलं पाहिजे.... फक्तं मुद्दाम गळवायचं.... फूल गळतय हे नेटच्या पलिकडे उभ्या झाडाला कळता कामा नये.... रुक्मिणी-सत्यभामेच्या कथेतल्या प्राजक्ताच्या फुलासारखच....
हे सगळं करता करता एकूण पायांची संख्या दीडच ठेवायची... पण जो एक होता, तो अर्धा करायचा आणि अर्ध्याचा एक.... आपलं वजन एका पायावरून दुसर्यावर शिफ़्ट करायचं.... मग गलितगात्रं होऊन खाली पडणार्या त्या फुलाला जमिनीवर पडायच्या आधी टोलवायचं....
हे सगळं म्हणजे त्याला ते करताना बघून मी मनातल्या मनात केलेली जोडणी हं....
ते सगळं करून अनेक फुलं गाळण्याचा कार्यक्रम झाला.... केल्या नाहीत कधी, पण खरच सांगत्ये बुंदी गाळणं सोप्पं असणार...
ते पार्श्वभागावर मारण्यासाठी स्टाईल वगैरे जमलं... नीटच.... पण कधी फूल गाळायच्या आधी फनेल तपासायला विसरल्ये, तर कधी मानेचा कोन वीस-तीस वर्षांची उडी घेऊन एकदम शाहरुख-खान स्टाईल आला, फुल गळलं पण प्रत्येक वेळी न चुकता... थेट जमिनीवर.... झारा कधी आधी तर कधी नंतर... पूर्वीच्या वाळ्याच्या पडद्यासारखा हलत होता...
नेटच्या त्याबाजूला कळणं सोडा... ह्याच बाजूला अगदीच गुपचुप कारभार... माझ्याच ह्या हाताचं त्या हाताला कळत नव्हतं....
हे त्या ई-सकाळच्या ढाली आडुन आत्तापर्यंत बघत होत्ये,.... काही सुचना इथे तिथे.... पण आता, सक्रीय आणि त्यांच्यामते पॉझिटीव्ह क्रिटिसिझमच्या मुडात शिरले.....
’अगं असं नाही... सईऽऽऽल धर बॅट... खाटकाच्या सुरी सारखी धरलीयेस.’, ला सुचना सुरू होऊन जेव्हा ’दोन्ही हात, पाय आणि डोळे तुझेच ना?’ इथपर्यंत बात आल्यावर.... तरा तरा समोर जाऊन उभी राहिले.... हातातला ई-सकाळचा पेपुरडा काढून घेतला आणि बॅट दिली हातात... म्हटलं... 'दाखवा... कसं ते... दाखवाच तुम्ही.... हा सूर्यं हा जयंद्रथ... होऊन जाऊदे.... तिथे बसून सूचना करणं ना... सोप्पय.... खेळून दाखवा म्हणते मी... तू बाजूला हो रे.... ते सर्व्ह करतायत तर मी फ़ेस करतेच.... आधी हे नेट ओलांडून ह्या बाजूला फुलं आली तर ना....’
लेकाने मला आवरलं का नाही कळलं नाही पण स्वस्थपणे बाबाच्या रिकाम्या खुर्चीत जाऊन मूव्ही बघायला बसतात तस्सा जाऊन बसला.... मग जे काय झालं ते झालं....
शांतपणे ह्यांनी पायातल्या चपला काढल्या. तो अजूनही भरलेला हारा जवळ घेतला आणि एका मागोमाग एक सर्व्ह्ज करायला सुरूवात केली.... आधी मला जरा मारता येतील अशा.... पण माझं हात आणि डोळे को-ऑल्डिनेशन अगदीच 'कोल्ड' असल्याचं लक्षात आल्यावर... मग मात्र एकदम बॉडीलाईन सर्विस.... अहो, अहो... म्हणत मी कुठेही पळाले तरी फुलं पाठलाग करतातच आहेत...
मला एकदम 'फुलं गेंदवा न मारो...' आठवलं.... फरक इतकाच की फुलांना खरच एकेक रबरी गेंद चिकटवलाय आणि लगत कलेजवा मे चोट नसून खरच लागतायत.....
ह्यांना इतकं चांगलं खेळता येतं हे माहीत असतं तर....
ओरडून आणि हसून हसून लेकाचा घसा बसायला आला.... मी कचर्याच्या डब्याच्या मागे लपल्यावर ह्यांनी हातातली बॅट म्यान केली आणि ऐटीत चालत आपल्या स्थानाशी गेले... परत एकदा विजयी नजरेने आजूबाजूला पडलेल्या सड्याकडे बघत शांतपणे परत त्या खुर्चीत बसले....
एव्हाना माझा अवतार बघून हसू आवरून लेकाने बरीचशी फुलं हार्यात गोळा केली होती. माझ्याकडे एक ’नजर’ टाकून ह्यांनी परत ई-सकाळमध्ये डोकं घातलं. त्या संधीचा फायदा घेऊन मी अख्खा हारा ह्यांच्या डोक्यावर उपडी केला आणि घरात पळ काढला....
ह्यावेळी हसून हसून कोसळलेल्या लेकाच्या पोटात बराच वेळ दुखत होतं...
.............
कालच लेक सांगत आला की....असलाच सीन जरा बदलून जोधा-अकबरमध्ये वापरलाय म्हणून.... सगळी ’हाऊ रोमँटिक’ म्हणत असताना... आमचा लेक पोट धरून जाम हसला म्हणे....
बघायला हवा... एकदा जाऊन...
समाप्त.
(ह्यातली सगळीच पात्रं आणि/किंवा सगळ्याच घटना खर्या नाहीत :). (नरो वा कुंजरो वा!) तेव्हा कुणाचाच समज आणि/किंवा गैरसमज नसावा)
अफाट दाद
अफाट दाद


एकदम अफाट लिहीलय
'नेट्स ऑफ टू यू'
कसलं धमाल
कसलं धमाल लिहितेस गं!!
*** And on the 8th day God
*** And on the 8th day God said: "Ok Murphy, you take over." ***
शलाका
शलाका धमाल. खतरनाक लिहिलयस.....हसून हसून पोट दुखलं अगदी.
चायनीज इन्स्ट्रक्टर चं इंग्रजी पण सही लिहिलयस.
मागे ड्रायव्हिंग शिकताना माझा चायनीज इन्स्ट्रक्टर सारखा "टुंग फु द फा, टुंग फु द फा" असं म्हणत होता.
पुढे गेल्यावर कळलं की तो बिचारा "डोण्ट मूव्ह द कार" म्हणत होता.
असो, मुलीबरोबर टेनीस खेळताना लचकलेली कंबर आठवतेय.
भन्नाट
भन्नाट लिहिल आहे.
** गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो, तिसर्या अवस्थेत पोचल्यावरच तो लक्षात येतो **
मस्त
मस्त
सही लिहिलय
सही लिहिलय एकदम! लई मज्जा आली!!
सही लिहिलय
सही लिहिलय ..... केस विंचरले नाहीत तर चालतिल एकवेळ पण उद्या सकाळी दात कोण घासणारय माझे?....
सॉलिड धमाल
सॉलिड धमाल आली गं. जाम हसवलंस आज
लेखाचं नाव जबरा
एकदम मस्त
एकदम मस्त !!!
तिरपी धार :). चिनी आणि चिनीसदृश्य तत्सम लोकांचे किस्से खतरनाक असतात (माझेही अनुभव आहेतच :)).
अजून पूर्ण वाचले नाही... उत्तम जमलेला पदार्थ कसातरी भराभर खाववला नाही, पण दाद मात्र पहिल्या घासाला द्यावीशी वाटली
एकदम
एकदम झक्कास...

सर्व्हिस करायचे वर्णन तर अफाट आहे...
जाम हसवलस
जाम हसवलस बघ. हे वय आणि हे आकारमान म्हणजे ना, काही करायला जाव तर फार मोठ आणि काही नाही कराव तर फारच लहान.
ए बाई अगं
ए बाई अगं इथे लिही की ऑफिसमधे बसुन वाचू नका म्हणून
काय वेड्यासारखी एकटीच जोराजोरात हसतेय. लोकं विचित्र विचित्र नजरेनी बघतात ना येताजाता. ROFL
अशक्यच लिहीलं आहेस तू.
अफाट...अचाट..
अफाट...अचाट...मस्तच..धमाल....! हहपुवा..
अफलातुन लिहितेस...
मस्तच ...हा
आई शप्पत,
आई शप्पत, काय लिहिलं आहेस दाद! हहपुवा गुणिले १०!!
मस्तच!
खूप भारी!!!
खूप भारी!!! अशक्क्क्य लिहीलय!!
अशक्य .....
अशक्य ..... अफाट..... अप्रतिम......!!!!
अगं हसता हसता पुरेवाट झाली गं.....!! एकदम खतरा लिहिलं आहेस
सकाला..
सकाला.. स्लिलंका..केदार्स मदर. अगदी खमंग आणि खुसखुशीत झालयं. मध्ये रस्समचं काळकुट्टं बोट लावून फूल गेंदवा न.. अहा!
तुमची वर्णनशैली लयी भारी आहे. घरातले आंगण, कचर्याचा डब्बा, ई सकाळची प्लिंट आणि फुल गेंदवा सग्गळ सग्गळ डोळ्यात हुभे र्हायले. हलकेच इवलं इवलं होवून चमचालिंबू पण खेळून आले
लाखोंनी धन्सं!
मस्तच.
मस्तच. धम्माल आली वाचताना. LOL
शाकालाका,
शाकालाका,

जोक ऐसनवा ना मारो रे. हमरी हालत पे तो शुकर करो.
- अनिलभाई
अशक्य....
अशक्य.... अप्रतिम.... वेड आहे वेड... काय लिहिलय ग बाई... तुला साष्टांग दंडवत
-प्रिन्सेस...
(No subject)
फार हसले ग
फार हसले ग बाई. मजा आली.
मस्त
मस्त लिहिलयस शलाका!
मानेचा कोन
मानेचा कोन तिरका.... राजेशखन्ना स्टाईल नाही... जरा अजून जुना... देव आनंद स्टाईल..
तर कधी मानेचा कोन वीस-तीस वर्षांची उडी घेऊन एकदम शाहरुख-खान स्टाईल आला...
अप्रतिम्.....एकदम सही....
झकास!
झकास! मस्तच जमून आलय सर्व..
वेल लिटन,
वेल लिटन, शकलका, द केदाल्स मदर. वेली वेल लिटन.
मस्त आहे
मस्त आहे
अजून टकलावर गंगा अवतीर्ण झाली नाहीये असा, >> हे कळलं नाही
अगदी
अगदी जबरदस्त! प्रत्येक लिखाणात तुझं गाण्यावरचं प्रेम ठायीठायी जाणवतं!
शेवटचा पंच महान!
आता टेनिस खेळण्याचा प्रयत्न होऊन जाऊदे!
Pages