माझे रिकामपणाचे उद्योग - पेपर क्वीलिंग!!!!

Submitted by मस्त कलंदर on 3 September, 2010 - 06:44

आमचे आधीचे रिकामपणाचे उद्योगः
१. ग्लासपेंटिग
२. बुकमार्क्स

सुबक ठेंगणी जपानहून आली. यायच्या आधीच तिने माझ्यासाठी विणलेला एक छानसा रूमाल घेतलाय म्हणून सांगितले होते. पण भेटली, तेव्हा तिने नुसता एकच रूमाल न देता एक आख्खी पेपर बॅगच दिली. आणि मी आतल्या भेटवस्तू पाहायचं सोडून बॅगकडेच पाहात राहिले. कागदाच्या पातळ पट्ट्या नीट्सपणे कापलेल्या. आणि त्या पट्ट्यांची सुंदरशी पिवळी-तांबडी, पिवळी-निळसर फुले, हिरवीगार पाने अशी मस्त नक्षी. प्रत्येक फूल दिमाखात... आपलाच तोरा सांगणारं!!!

लगेच डोक्यात किडा वळवळला. पुढचे रिकामपणाचे उद्योग म्हणून जमण्यासारखे आहे. अगदीच किचकट नाहीए, पण पूर्वतयारीला वेळ चांगलाच लागेलसं काम दिसत होतं खरं. करायचे म्हटलं तरी त्याचा तेव्हा श्रीगणेशा झाला नाही तो नाहीच.

माझं घर तळमजल्यावरचं. खेळता खेळता तहान लागली म्हणून पाणी प्यायला येणार्‍या बाळगोपाळांचं हक्काचं. मग पाणी पिता पिता चॉकलेटस खायला, टॉम-ऍंड-जेरी पाहायलाही ही मंडळी रेंगाळू लागली. त्यातलीच एक आनंदिता. आहे आता पहिलीतच, पण जाम गोडुलं आणि पक्कं डॅंबीस ध्यान आहे. आली की हटूनच बसते. बिचारे आई-बाबा तिला विनवून थकतात, आणि ही त्या कारवारी कोंकणीत काय बोलते, त्यातले मला अर्धं कळतं, राहिलेलं डोक्यावरून जातं, पण हिला आणखी थोडावेळ सवलत मिळते. एकदा मी तिला आणि तिच्या आईला माझ्याकडचे बुकमार्क्स दिले. माझी परिक्षा जवळ आल्यावर मी तिला अभ्यास आहे असे सांगून घरी पिटाळले तर पठ्ठी परत आईला घेऊन हजर. दोघींनी मिळून माझ्यासाठी छानसे परीक्षेच्या शुभेच्छा देणारे ग्रीटिंग आणले होते. आत नांव आनंदिताचे असले तरी बनवलं आईनंच होतं.

एकदा मी कॉलेजमधून येतायेताच ती भेटली. सोबत येणार हे तसे ठरलेलंच. आल्या-आल्या तिची नजर पुस्तकाच्या कपाटावर भिरभिरली. “ये मेरी मम्मीको आता है.” हे तिचे वाक्य आणि पाठोपाठ “ताई आताच आलीय तिला त्रास देऊ नको” असे म्हणायला तिची आई. व्वा!!!! कावळा बसायला... आपलं बोलाफुलाला गाठ पडली. त्या म्हणाल्या,” अगं हे तर क्वीलिंग. गुगल कर ढीगभर नमुने सापडतील. क्वीलिंगचे किट मिळते. या पातळ पट्ट्या अशा कापाव्या लागत नाहीत, कापलेल्या आयत्या मिळतात”. म्हटलं ,चला, आळशी माणसाची सोय झाली”. लागलीच बाजारात जाऊन एकदम मोठाले हॅंडमेड कागद(माझीच पुस्तके बुकमार्क्सशिवाय तशीच पडलीयेत.. एखादा कुठेतरी सापडतोय आणि मग त्यालाच या पुस्तकातून त्या पुस्तकात नाचवतेय), रेशमी धागे, क्वीलिंग पेन, क्वीलिंगचे पॅड, दोन-तीन प्रकारच्या वेगवेगळ्या कापलेल्या पट्ट्या असे चांगले साताअठशे रूपये कागदावर उडवून आले. माझ्या त्या नेहमीच्या दुकानाचा मालक म्हणजे एक शितू सरमळकर आहे. येणारी निवडुंग-गुलाबे काही खरेदी न करता सगळं दुकान उचकटतात आणि हा त्याच तन्मयतेने सगळ्या आघाड्यांवर तोंड देत असतो. साहजिकच मला दहा रूपयांचे धागे घ्यायला कमीतकमी पंधरा मिनिटांचा वेळ द्यावा लागतो. म्हणून जे काही असेल ते एकाच वेळी घेतले की परत परत तिथे जायला नको. मग आल्यावर उत्साहात त्याच दिवशी दोनचार पट्ट्यांवर प्रयोग करूनही झाले. आधी त्या सुईला आरपार भेग आहे हेच नाही कळलं. त्या गुंडाळ्या जमेचनात. ते कधीतरी दुसर्‍या दिवशी लक्षात आले. पण कामाला मुहुर्त असा काही लागला नव्हता. काल मात्र झोपतानाच आज क्वीलिंगचा फडशा पाडायचा असे ठरवूनच झोपले.

हे असं असतं क्विलींगचे पेनः

त्यातल्या फटीत कागदाचे एक टोक अडकवायचे आणि मग हवे तसे हलके किंवा घट्ट हाताने गुंडाळ्या बनवायच्या. पट्ट्या या अशा मिळतातः

भल्या सकाळी(?) उठून मी सगळा पसारा पसरून त्या गराड्यात बसले. सुरूवात कुठून करावी हेच समजत नव्हते. कशावर करायचे, तेही नक्की होत नव्हते. बुकमार्क बनवू की ग्रीटिंग??? पुस्तकातली चित्रे बघून करू, की मी काही चित्रे डाऊनलोड केली आहेत ती बघू, की नव्याने चित्रे शोधू? त्यात त्या पट्ट्यांची जाडी, पोत, दर्जाही वेगवेगळा. त्यातल्या नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या चित्रासाठी योग्य ठरतील? हे सगळं कमी की काय म्हणून मधून मधून मिपा, फोन, चॅटिंग चालूच होतं. मग शेवटी एक पांढरा हॅंडमेड कागद घेतला. त्याची दोन ग्रीटिंग्ज करायची ठरवली. हातात कात्री आली की आधी चालवायची आणि नंतर “आई गं, हे काय झालं?” हे नेहमीचंच. (नशीब संपादक नाहीए मी). एका कागदात दोन भेटकार्डे जरा जास्तच मोठी वाटली म्हणून मी त्याची तीन केली होती. आता ती रूंदीला जास्तच कमी वाटू लागली. आता जो घोळ घालायचा तो यावरच घालू असा विचार करून बरीच चित्रे शोधून शोधून त्यातही थोड्या सुधारणा करून सोप्यात सोप्या प्रकरणाच्या वाटेला जायचे ठरवलं. मग चित्राबरहुकूम आकार बनवायला घेतले. आधी सोपे आणि पटकन होईलसे वाटणारं काम आता रंग दाखवत होते चांगलंच.

मग जरा वॉर्म-अप. आधी साध्या गुंडाळ्या. मग पुस्तकातली चित्रे पाहून पाहून त्यांना आकार दिले. घट्ट गुंडाळी केली की फूल, पाकळी, कळी जे काही असेल ते छोटे होत होते. म्हणून मग कधी घट्ट तर कधी हलक्या हाताने गुंडाळ्या करून , टोकं चिकटवून करून पाहिल्या. ते क्वीलिंग पॅड काही आवडलं नाही.. मग दिलं ठेवून सरळ बाजूला. बरं, हे सगळं करण्यात नीट लक्ष असावं की नाही? कुठले काय, जोडीला मिपा-फोन-चॅटिंग चालूच. मग काही लाक्षणिक प्रगती दिसेना. नुसत्याच गुंडाळ्या, कागद, कपटे, कात्र्या, आणि मध्ये मी आणि लॅपटॉप!!!!


फोटो खूपच छोटा आहे. काही विशेष केलेले नाहीए त्यात. एक गुंडाळी बनवायची आणि काही ठिकाणी हवा तितका दाब देऊन पान, बाण, पाकळी, डोळा असे आकार बनवायचे.

मग परत कंटाळा आला नुसत्याच भेंडोळ्यांचा. मग म्हटलं वेगळा आकार करून नुसतीच गुलाबाची फुले करावीत. पण हाय रे दुर्दैवा.. त्यासाठी कागद गोल कापायला हवा. वर्तुळ काढायला तर काहीच नव्हते माझ्याकडे. चालायचंच. आपल्याला अक्कल पाजळायला संधीच लागते ना!! पट्टीने मापे घेऊन सहा खुणा केल्या आणि काढलं वर्तुळ. हैच काय त्यात. मग आधी साध्या कागदावर प्रयोग केला. सारखे सारखे शितू सरमळकडे उगीच जायला लागायला नको म्हणून. करायचे काय होतं, तर दिलेल्या प्रमाणानुसार एक सहा इंच व्यासाचं वर्तुळ आखायचं, त्यात टोकापासून अर्धा इंचाचं स्पायरल वर्तुळ मध्यापर्यंत जाईल असे काढायचे आणि त्या स्पायरल रेषेवर कापायचे. आणि टोकापासून आतपर्यंत उलट्या बाजूने गुंडाळत यायचे. मग ते एखादी डिश सजवायला करतात तसे टोमॅटोच्या फुलासारखे दिसते. हे असे:

सराव तर झाला.. पण ते सहा इंचाचे फूल मोठे वाटत होते, अर्ध्या इंचाच्या पाकळ्या पण.. म्हणून मग आणखी लहान मापे घेतली आणि यावेळी थेट रंगीत कागदावर आकार कापला. आता आला का घोळ?? सरावाचा कागद साधा होता. हा एका बाजूने रंगीत आणि दुसर्‍या बाजूने पांढरा. आकार कापला पांढर्‍या बाजूने. पण टोकाकडून फुलाचा रंग दिसण्यासाठी नक्की गुंडाळायचा कसा?? त्यात सगळं लक्ष अदितीसोबत फोनवर खिदळण्यात. एक फुल आधी या बाजूने गुंडाळले, मग त्या बाजूने.. तरी पुढच्या फुलाच्या वेळी घोळ आहेच. शेवटी अदितीलाच सांगितले, “पुढच्या वेळी मी विचारले की सांग, पांढर्‍या बाजूने गुंडाळायचे म्हणून” आणि मग फोनवर बोलता बोलताच माझ्याकडे दोन पेपर बॅग्ज आहेत, त्यातली एक तुझ्यासाठी आणि दुसरी माझ्यासाठी म्हणून ठरवूनही झाले.

हुश्श!!! आता मांडामांड ठरवू लागले.. मनाजोगती जमेना. मग पुन्हा एकदा ब्रेक घेतला. मिपा रिफ्रेश केलं.. दोन वाजून गेले होते. पटापट सॅंड्विचेस बनवून खाऊन घेतली. आणि पटकन जशी सुचेल तशी फुले ठेवून बॅग बनवली!


(अदिती, आणखी एक फूल वाढवलं गं)

मग काही ग्रीटिंग कार्डस. तीही अशी तशीच नेटावरचे फोटो तसेच्या तसे वापरले असते पण गुंडाळ्या बनवायचा आळस केला आणि मग तयार कच्च्या मालातूनच सगळं साकार(!) केलं!

हे केशरी फूल आनंदिताच्या आईने बनवलेल्या कार्डवरती होते अगदी तस्संच आहे.

मग नुसतीच काही फुलं शिल्लक होती म्हणून माझी छोटुशी बचतबँक पण सजवून टाकली.

ही तर नुसती सुरूवात आहे. पहिलाच प्रयत्न. अवघड असे काहीच नाही. क्वीलिंगसाठी तयार पट्ट्या मिळतायत. आता कुणी तयार गुंडाळ्या देतं आहे का हे शोधेन!!!

टीपः घरातल्या कॅमेर्‍याने नुकताच राम म्हटलाय आणि मोबाईलच्या कॅमेरा लेन्समध्ये खंडीभर धूळ गेलीय. त्यामुळे गरजेपुरते फोटोज जालावरून घेतलेले आहेत. मी काढलेले फोटोज तितकेसे चांगले आले नाही आहेत. त्याबद्दल आधीच क्षमस्व!!!

गुलमोहर: 

मस्त कलंदर, तुझ्या त्या सुबक ठेंगणीला आम्हां उभयतांकडून २-४ शिव्या घालण्याचं काम करशील कां? माझ्या प्रोफाईलवर जाऊन माझं नाव मिळेलच तुला. Happy

बाकी क्विलिंग मलाही बघून शिकायची इच्छा आहे. नवर्‍याची एक मैत्रिण खूप सुरेख क्विलिंग करते. तुमचे प्रयत्न चांगलेच आहेत. कीप इट अप.

स्वाती मी क्वीलिंग पेन आणि स्ट्रिप्स हॉबी अ॓ण्ड आयडियाज मधून घेतल्या. तिथे करुन ठेवलेले काही नमुने ईतके मस्त होते ते बघून घेतले. पण अजून केले नाही. तिथे यावरची पुस्तकेही छान आहेत.
कलाकुसरीचे साहित्य मला लागतेच. तू घाटकोपरला प्रामाणिक दुकान म्हणतेयस नक्की कुठे आहे कधी तरी तिथेही भेट देईन Happy

@आऊटडोअर्स मला काहीच अर्थबोध झाला नाही. तु ओळखतेस का तिला???

@नीलू, घाटकोपर स्टेशनच्या अलिकडे साधारण शंभर मीटर अंतरावर पूर्वेतून पश्चिमेला जायला वाहनांसाठी जो पूल आहे, त्याच चौकात हे दुकान आहे. मुख्य चौकातून आत जाणार्‍या रस्त्यावर दहा-एक पावलांवरच आहे. या रस्त्यावर भाजी बाजार असतो. आणि हे दुकान छोटे असले तरी चांगलेच प्रसिद्ध आहे, कुणालाही विचारले तरी पटकन सापडेल.
जर फक्त कागद वगैरेच घ्यायचे असतील (मणी/धागे नको असतील) तर त्याच स्टेशनरोडवर थोडेसे अलिकडे म्हणजे चेंबूरसाईडला सुरानीच्या पाठीमागे एक प्रभात स्टेशनरीज नावाचे दुकान आहे. तिथे वेगवेगळ्या कात्र, कागद, फाईनलाईनर्स ही मिळतात.

Pages