शाळेचा पहिला दिवस

Submitted by भुंगा on 2 September, 2010 - 03:37

आणि अखेर तो दिवस उजाडला.....!

आमची चिमुरडी आजपासून शाळेत जाणार. रात्रीच तिने फर्मान सोडलेले, "बाबा आपन शालेत गालीने जाउया, तू व्हीलल नको पिज". त्यामुळे सकाळी उठून तिच्या जोडीला आम्ही पण तयार. त्यात तिच्या आयात्यावेळेच्या डिमांड्स "आज बाबा आंघोळ घालू देत". पण तो दिवसच इतका छान होता की आपण सगळ्या कामाला तयार. आई, बायकोसकट सगळे प्रचंड खुष कारण त्यांच्यामते घरात इकडची काडी तिकडे न करणारा मी, कसा निमुटपणे सगळे करतोय.......:स्मित:
आता ह्यांना कोण सांगणार की मुलीच्या शब्दाखातर प्रत्येक बाप असाच जीव ओवाळून टाकायला सज्ज असतो ते....
पण आज माझेच मला आश्चर्य वाटत होते. मध्यंतरी परदेशात एका मैत्रिणीकडे काही दिवस राहायचा योग आला होता तेव्हा तिच्या नवर्‍याला मुलाचे सगळे करताना बघून वाटले होते कि हे आपल्याला नाही बुवा जमणार कधी..... अगदी उघडपणे तिकडे मान्य करून मोकळ झालो होतो.... आणि आज चक्क मी हे सगळे त्याच उत्साहात करत होतो..कमाल आहे.
तात्पर्य काय तर सकाळी सकाळी सगळेच वेगवेगळ्या कारणांसाठी खुशीत होते.... सौ आणि आई, कसे लाईनीवर आणले पोरीने ह्याला अश्या आविर्भावात. मी, त्या दिवसाच्या वेगळ्याच आनंदात आणि आमची प्रणया ती आपल्याच विश्वात.
सगळ्या नातेवाईकांचे फोन खणखणून झाले होते........... जणू काही प्रणया चंद्रावरच चाललीये......... पण असते कौतुक एकेकाला आणी त्याला मोल नाही हेच खरे. अजूनही मोबाईल खणखण चालूच होती..... सगळे सोपस्कार होऊन आमची "पिया" (प्रणया) शाळेत जायला तयार होती............ काल परवापर्यंत घरभर बागडणारे आमचे ध्यान युनिफॉर्म घालुन भारीच गोड दिसत होते....

"शालेत ना भल्पूल मित्ल मैत्लिनी असतात आणि एक तीचल पण असते" ..... पियाचा गृहपाठ पक्का होता........ (त्या बाबतीत आईवर नाही गेली ते बरे आहे) Rofl
आजी आजोबांच्या कौतुकमिश्रित नजरा, त्यांना कोण आनंद झालेला..........!
त्यात आमची पिया बोबडे बोलणारी. तिची बोबडी टेप सकाळपासुन चालूच. आईच्या मते, आम्ही दोघे भावंडे कधी बोबडे बोललोच नाही. त्यामुळे बोलू दे तिला बोबडे अशी सुटच मिळालेली तिला.

ठरल्याप्रमाणे अगदी वेगवेगळ्या अ‍ॅंगलने पियाचे फोटो काढून झाले.... कारण मगाशी आलेल्या फोनवर ह्या डिमांड आल्या होत्या सासुबाईंकडुन..."आधी फोटो काढा आणि लगेच मेल करा".....
हे बरे असते..... शाळेत उशिरा पोचली तरी चालेल पण फोटो इस मस्ट.
पियाला तर विचारायलाच नको. अवघी दीड तासाची असल्यापासून फोटो काढून घेतेय..... आता तर इतकी सरावालीये कि फोटो काढल्यावर आधी येऊन बघणार की कसा आलाय.... आणि मग त्यावर विथ एक्सप्रेशन कमेंट.... Happy
खरी कपुरांच्याच घरी जन्मायची बहुतेक.... चुकून पाध्येंकडे आलीये...... आबा,आजी,आत्या, आई-बाबा असे सगळ्यांचे लाईनीत पापे घेऊन झाल्यावर स्वारी निघाली.......... पुन्हा एकदा पिया "बाबा आपन गालीने जातोये ना..... तू व्हीलल नको ना पिज.....". हल्लीची पोरे जरा जास्तच तल्लख........!!

तर आम्ही गाडीत बसलो, सरावानुसार पिया पुढच्या सीटवर विराजमान आणि आईची गच्छंती मागच्या सीटवर झालेली.... पुन्हा पियाचा आदेश "बाबा बेल्ट लावा पोलीस पकलतील "........... ह्या एवढ्याश्या डोक्यात काय काय साठवतात ही लहान मुले...... आणि संदर्भ कधीच चुकत नाहीत... योग्य वेळी योग्य वाक्य. गाडी चालू होताच पुन्हा पिया आईकडे मागच्या सीटवर......... तिला त्या युनिफॉर्मचे फारच कौतुक वाटत होते... शाळा जशी जवळ आली तसे सगळी चिल्लीपिल्ली युनिफॉर्म घालुन दिसायला लागली... शाळेचा रस्ता, दोन्ही बाजुनी पार्क केलेल्या गाड्या आणि मधून जाणारे पालक आणि युनिफॉर्मधारी लहान मुले असे सारे चित्र डोळ्यासमोर होते. एका चिंचोळ्या जागेत शिताफीने गाडी पार्क करून आम्ही शाळेत शिरलो. इथे सकाळी पार्किंग मिळणे म्हणजे मारामारी.
पहिले दोन दिवस शाळेत दोन्ही पालकांना आत यायला परवानगी होती...... त्यामुळे खास पियासाठी मी पण आलो होतो..... बरेच ओळखीचे चेहरे भेटत होते. ओळखीची मुले एकाच बॅचला आहेत म्हटल्यावर काय आनंद होतो पालकांना. जणू काही आता पुन्हा आपणच बाजुबाजुच्या बाकावर बसणार आहोत शाळेत.

शाळेचा जिना चढताना नकळत मन भुतकाळात रमले. मुळात आमच्यावेळी "नर्सरी","प्री-स्कुल" हा प्रकारच नव्हता. पोरे डायरेक्ट जायची ती ज्युनियर केजीतच. पण "कालाय तस्मै नमः ".
मला अगदी माझी शाळा डोळ्यासमोर आली. आजही आहे तशीच आहे. पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आलेली आई. ग्राऊंड फ्लोअरवरचा घसरगुंडी असलेला हॉल. त्यात जमलेली सगळी चिल्लिपिल्ली. मी पसरलेले भोकाड. माझे बाहेर आईकडे धावत जाणे, मग नव्वारीतल्या "सुमनताईंनी" येऊन मला उचलुन परत नेणे. मग आतुन खिडकीतल्या गजाला तोंड लावुन तिथेच रडणे, मला बघुन आईच्या डोळ्यात आलेले पाणी आणि त्याही अवस्थेत आईने सांगणे "गजाला तोंड नको लावु, घाण जाईल तोंडात". काही लोक इतके शिस्तप्रिय कसे असतात देव जाणे..... Happy
आणि मग घरी आल्यावर मी बाबांना सांगणे, "मी रडलो नाही काय, थोडे पाणी आले डोळ्यातुन. बाकीची मुले रडत होती ना म्हणुन. मी रडलो नाही." Lol
ते सोनेरी दिवस. माझ्या धूसर आणि आई-बाबांच्या पक्के लक्षात राहिलेले.

आज मी पालकाच्या भुमिकेत होतो. पण नर्सरी कन्सेप्ट मुळे मुले या वातावरणाला आधीच सरावलेली असतात. त्यामुळे एखाद्-दुसरा अपवाद वगळता फारशी मुले रडताना दिसली नाहीत. वेगवेगळ्या वर्गांची लिस्ट आधीच लावली होती त्याप्रमाणे प्रणया "क्लाऊन फिश" गटात होती. आमचे ध्यान "क्लाऊन" आहे हे बरे कळले होते यांना आधीच. Lol एकच पालक वर्गात जाऊ शकत असल्याने मी मधल्या चौकोनी पॅसेजमध्ये उभा होतो. वेगवेगळे ४ वर्ग बाजुला होते त्यामुळे सर्व वर्गात डोकावता येत होते. काही काही मुले फारच गोंडस दिसत होती. त्यांनी आपापले रंग दाखवायला एव्हाना सुरुवात झाली होती. काही मुलांनी वर्गातल्या खेळण्यांचा ताबा घेतला होता. प्रणया सरळ उठुन खिडकीत जाऊन बसली आणि रस्त्यावरचे सगळे बघत होती. बापाची सगळी लक्षणे ठळकपणे दिसत होती तिच्यात. Happy

मग थोड्या वेळाने एक्-एक करुन वर्गात हजेरीला सुरुवात झाली. मी कॉमन पॅसेजमध्ये होतो म्हणुन सगळ्या वर्गातली नावे स्पष्ट ऐकु येत होती आणि आता अवाक होण्याची माझी वेळ होती.
मयांक, आहान्,विहान्,योहान्,रेहान्,अर्थ्,ध्रुव्,उद्युक्त्,उद्यम्,प्रद्युम्न्,वेद, अनन्या,श्रिया,अन्वया,काव्या, सिओना,रिओना,ईवांका,रिया, टिया, केया, सृष्टी, प्रकृती, सज्जला, योगसी अशी एक से एक नावे ऐकुन मी अवाक झालो होतो. नावांमध्ये किती फरक पडला होता. नॉर्मल नावांची मुलेच नाहीत. नाही म्हणायला प्रत्येक वर्गात एक "अथर्व" होताच........ Lol हे नाव असल्याशिवाय हजेरी पुर्ण होणे अशक्य.
आता आमच्या शेजारच्या बंगाल्यांच्या पोपटाचे नाव "टिया" होते आणि ते बाहेर गेले की तो आमच्याकडे असायचा. प्रणयाचा फेव्हरेट. तिला अगदी लहान असल्यापासुन टिया चे एवढे वेड की शेवटी सगळे तिलाच टिया म्हणायचे. आणि आम्ही घरात तिला म्हणतो "पिया".
टिया हा पोपट आहे हे तिला माहिती होते आणि आता चक्क तिच्या वर्गातल्या मैत्रिणीचे नावच "टिया" होते. काही दिवसानी हा थेट प्रश्न तिने शेवटी आम्हाला विचारलाच, "तिया काय मुलगी असते, पोपत असतो ना....????" असो.

बर्‍याच दिवसांनी शाळेच्या वेगळ्या वातावरणात खुप प्रसन्न वाटत होते. अगदी क्षणाक्षणाला नॉस्टॅल्जिक होत होतो. आपल्यात आणि बाहेर झालेले कित्येक बदल टिपत होतो. नाही म्हणायला या गोंडस मुलांचे काही "प्रेक्षणिय" पालकही होतेच पण आज फक्त मुलांचा दिवस होता, त्यामुळे डोळ्यांवर झापडे लावुन मुलांकडे बघत आणि ऐकत होतो. Proud

अखेर खाऊ खाऊन सगळ्यांशी ओळखी करुन शाळा सुटली. अर्थात यानंतर शाळेबाहेर ओळखीच्या पालकांची वेगळी शाळा भरणार होतीच आणि तशी ती भरलीही. मग कुठला बस नंबर, कुठला रुट, मोबाईल नंबर यांची देवाणघेवाण झाली. काहे जुने शाळतले मित्र भेटले आणि आपली मुले पण एकाच वर्गात म्हटल्यावर काय तो आनंद वर्णावा. पुन्हा जुने दिवस, जुन्या खोड्या, तेव्हाचे केलेले उद्योग यांना ऊत आला. आपली पोरे आपले नाव या बाबतीत रोशनच करणार याबाबत आम्हाला तिळमात्र शंका नव्हती. आणि निघाली बिचारी शांत स्वभावाची तर आम्ही क्रॅश कोर्स लावुन करु त्यांना गुंड अशी वल्गनाही आम्ही केलीच आमच्या बायकांसमोर.
(ता.क. प्रणयाचे नाव गेल्या २ महिन्यात "बडबड्या कासवांच्या" यादीत पोचलेय आणि ती अशीच उत्तरोत्तर प्रगती करेल यात मला शंका नाही. :स्मित:)

पुन्हा गाडीत बसुन घरी निघालो पण मी एव्हाना पार माझ्या शाळेच्या दिवसात बुडालो होतो. पियाचे बोबडे बोल कानावर पडत होते पण माझे मन मात्र अगदी ज्युनियर पासुन ते दहावीपर्यंतच्या शाळेतल्या दिवसात रुंजी घालत होते. थोडे हुशार, बरेच हरहुन्नरी आणि म्हणुनच थोडेसे आगाऊ कॅटॅगरीतच बसायचो मी. आणि जोडीला एक से एक मित्र्-मैत्रिणी. काय ते दिवस. अभ्यास्,कला,मैदान सगळीकडे घुसायचे. कमी तिथे आम्ही हा नाराच होता जणु. सगळे क्षण झरझर डोळ्यासमोरुन जात होते, तेवढ्यात पिया जोरात कानात ओरडली "अले, बाबा जला हलु चालव थोकशील गाली". आणि मी भानावर आलो.
मी भुतकाळात गेलो असलो तरी माझ्यावर पियाची नजर होतीच. पक्की आजीबाई.

थोड्याच वेळात घरी पोचलो. आजी आजोबा वाट पहात होतेच. मग बोबड्या बोलांचा पट्टा चालु झाला आणि आम्ही सगळेच त्यात पार हरवुन गेलो.

गुलमोहर: 

गोड Happy

भुंग्या,
कित्ती कित्ती गोड लिहितोस रे भुंग्या .....!!!
(दुसरं काही सुचलं नाही ...)
शाळेचा जिना चढताना नकळत मन भुतकाळात रमले. मुळात आमच्यावेळी "नर्सरी","प्री-स्कुल" हा प्रकारच नव्हता. पोरे डायरेक्ट जायची ती ज्युनियर केजीतच.
नशीबवान आहेस, गावाकडे पहिलीच्या अगोदर काही असतं हे मला माहीत नव्हतं ना!
Happy

भुंग्या,
"बाबा आपन गालीने जातोये ना..... तू व्हीलल नको ना पिज.....". >>>
"बाबा बेल्ट लावा पोलीस पकलतील" >>>
"अले, बाबा जला हलु चालव थोकशील गाली">>>
तुझा भुणभुणछाप स्वभाव प्रणयातही उतरला म्हणायचा,. Happy

काही लोक इतके शिस्तप्रिय कसे असतात देव जाणे..... >>> Biggrin

छान लिहिलायसं रे! पिल्लु तर कित्ती गोडयं तुझं!
मुलांच्या नावाबद्दलचे निरिक्षण पार पटले. माझ्या मुलीच्या वर्गात बर्‍याच ryming जोड्या आहेत.
आन्या-तान्या, ईशा-टिशा-प्रिशा, लारा-तारा, यशोवर्धन-देववर्धन अशा.

अरे मामींच्या नंतर माझा नंबर.

माबोवर पण मामी - अश्विनीमामी Happy

मस्त लेख रे गोड छोकरी. खूप मनापासून आशीर्वाद. ती एम एस सी/ एम बीए ला जाइल तेव्हा आपण हा दिवस आठवुया.

मस्त लिहिलय.
काय गोड दिसतात मूलं युनिफॉर्ममधे !

आमच्या काळात राजेश च प्रस्थ होतं, मग अमित, मग अक्षय ...

वा भुंग्या..... छान लिहिलंयस.... वेली वेली च्वीट..

गोड बबडी.............मसतय....

सावरी

भारी गोड पोरगी आहे...
आणि हे बडबडे कासव, क्लाउन फिश वगैरे प्रकार आमच्यावेळी नव्हते...छान वाटते ...लहान मुलांना शाळेत जावे वाटेल असे वातावरण असले कि..

(आमची माऊ अजून प्रीस्कुलातच आहे अजून...अशीच बोबडी...आता बघू kindergarten मध्ये काय होतंय ते..)

Pages