सुरांची कोडी घालणारा संगीतकार

Submitted by स्मितागद्रे on 31 August, 2010 - 10:37

सलिलदां च्या 'गाण्याशी' पहिली ओळख झाली,कॉलेज जीवनात. त्यांच्या आनंद चित्रपटातल्या गाण्यांनी अक्षरश: वेड लागल होत, अगदी कॉलेजच्या गॅदरींग मधे म्हणायला सुद्धा ' ना जिया लागे ना' गाण्या ची निवड केली होती. त्या गाण्याच्या सुरावटींनी, चालीने अगदी भुरळ घातली होती. गाण तयार करताना त्यांच्या 'हटके' संगीत शैलीची साधारण कल्पना आली .

तशी त्यांच्या संगीताची माझी ओळख, आनंद, छोटीसी बात,काबुलीवाला,मधुमती इ. चित्रपटातल्या गाण्यांपुरतीच आणि एखाद्या कार्यक्रमा साठी गाणी तयार करण्यापुरतीच मर्यादित होती, किंवा कदाचित तेव्हढ्या पुरतीच मर्यादितही राहिली असती.

पण बर्‍याच वर्षा नंतर, त्यांना वाहिलेली http://www.salilda.com ही साईट मिळाली आणि त्यांच्या विविध शैलीतल्या गाण्यांचा जणू खजिनाच अचानक हाती लागला. पुन्हा एकदा नव्याने सलीलदां च्या गाण्याशी, त्यांच्या शैलीशी ओळख झाली. त्या साईट मुळे आणि त्यात सापडलेल्या अप्रतिम गाण्यांमुळे. त्यांनी संगीत दिलेल प्रत्येक गाण ऐकताना अगदी अलीबाबाच्या गुहेत शिरल्या सारख वाटल.

salilda_interview04.jpg

१९ नोव्हेंबर १९२२ साली पश्चिम बंगाल मधल्या, गंजीपूर मधे त्यांचा जन्म झाला. त्यांच बरचस बालपण आसाम मधे गेल.तिथेच संगीताची पाळमुळं खोलवर त्यांच्या मनात रुजली गेली, त्यांच्या डॉक्टर वडीलांमुळे. त्यांचे वडीलही वेस्टर्न क्लासिकल संगीताचे भोक्ते होते. लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या वेस्टर्न क्लासीकल संगीताचा आसामी,बंगाली लोकगीतांचा प्रभाव त्यांच्या बर्‍याच गाण्यातून दिसून येतो. हिंदी चित्रपट संगीतात वेस्टर्न क्लासिकलचा इतक्या लवचिकतने वापर करणारे ते बहुधा पहिलेच संगीतकार होते.

त्याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोझार्टच्या ४० व्या सींफनी वर बेतलेल छाया चित्रपटातल "इतना ना मुझसे तु प्यार बढा" हे लताजीं आणि तलतच्या आवाजातल अफलातून गाण. मला वाटत सलिलदांच्या संगीता मुळे ह्या गाण्यातून व्यक्त होणारे भाव शब्दां इतकेच, कदाचित जास्त प्रभावी ठरतात. खाली दिलेल्या लिंक मधे मूळ धुन ऐकु शकता.
http://www.youtube.com/watch?v=aZD9nt_wsY0

त्यांच्या एकेका गाण्यातून त्यांची अनोखी शैली उलगडत गेली, दरवेळेस नविन अनूभूती देणारी, आता आपल्याला समजली अस वाटेपर्यंत परत कोड्यात टाकणारी,अचंबीत करणारी,कुठलाही साचेबद्धपणा नसलेली, एखाद्या अवखळ झर्‍या सारखी प्रवाही.

त्यांनी कुठल्या ही प्रकारच शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल नव्हत,पण ते एक उत्तम गायक , बासरी वादक होते. वयाच्या आठव्या वर्षा पासून ते बासरी वाजवायला लागले. त्यांच्या ऑर्केस्ट्रॉ मधे काम करणार्‍या भावा मुळे त्यांचे तबला,सतार,व्हायोलिन अशा काही वाद्यांशी सुर जुळले होते एवढच, पण परख चित्रपटातल लताजींच्या स्वर्गीय आवाजातल अजरामर गाण "ओ सजना बरखा बहार आई" (हे लताजींच्या सुद्धा आवडत्या दहातल एक गाण) छाया चित्रपटातल बसंत बहार रागात रचलेल "छम छम नाचत आई बहार" , जागते रहो मधल "ठंडी ठंडी सावन की " किंवा चांद और सुरज मधल " झनन झनन बाजे" ही शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी ऐकल्या नंतर, त्यांनी शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल नव्हत ह्या गोष्टी वर विश्वास बसत नाही, पण "दैवी देणगी" ह्या संकल्पने वर मात्र विश्वास बसतो
"छम छम नाचत आइ बहार " या गाण्यात त्यात वापरलेली निरनिराळी वाद्य आणि त्याचा अत्यंत संयमित वापर अचूक परिणाम साधतात.
झनन झनन बाजे, मधल कळत नकळत जाणवणार फ्युजन अफलातून आहे. गाण्यात मुखडा पूर्ण हिंदुस्तानी क्लासीकल आणि अंतर्‍याची चाल, किंचीत पाश्चिमात्य ढंगा कडे झुकणारी, त्यातल्या मुखड्याच्या वेगवेगळ्या जागा ...हे असल जबरदस्त काँबीनेशन केवळ त्यांनाच सुचु शकत.

त्यांनी "कोरस" चे वेगवेगळे प्रयोग आपल्या गाण्यात यशस्वी पणे केले. त्यांची अनेक गाणी याची साक्ष देतात, जशी परख मधल "मेरे मन के दिये", किंवा छोटीसी बात मधल "न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ" किंवा अन्नदाता मधल "रातों के साये घने" मधला उत्तरार्धातला भाग . त्यात वापरलेल्या कोरस मुळे नायिकेच्या मनातली आंदोलन जास्त प्रभावी पणे व्यक्त होतात.

ते स्वतः उत्कृष्ट कवी,लेखक नाटककार होते , त्यामुळेच कदाचित त्यांच्या प्रत्येक गाण्यातुन, त्यातले भाव नेमक्या स्वरातून उमटतात आणि थेट हृदया पर्यंत पोचतात. "ए मेरे प्यारे वतन " हे एकच गाण सलिल म्हणजे काय ते जाणून घ्यायला पुरेस आहे. घराच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या पठाणाची तडफड इतक्या प्रभावी पणे कुठल्या गाण्यातून व्यक्त होऊ शकेल ?

गाण्यातल्या शब्दांना जिवंत करणार्‍या लांबच लांब पल्लेदार चाली ही त्यांची खासीयत होती. लताजींच्या आवाजातल हनिमून चित्रपटातल "अहा रे मगन मेरा चंचल मन" ,परख चित्रपटातल "ये बन्सी क्युं गाये" किंवा झुला मधल "सजना मेरा दिल तेरा दिल गया मिल" सारखी गाणी ही त्याचीच उत्कृष्ट उदाहरणं.

लहान पणापासून आपण वेगवेगळ्या प्रकाराच संगीत ऐकतो. त्याचा कळत नकळत एक विशिष्ट परिणाम आपल्या कानावर झालेला असतो ,त्यामुळे गाण्याची सुरवात ऐकली की पुढच्या विस्ताराची साधारण कल्पना आपण करू शकतो. बहुतेक संगीतकारांच्या चाली ह्या कल्पनेशी फारकत घेणार्‍या नसतात .सलीलदांची चाल मात्र प्रत्येक वळणावर थक्क करून जाते. आपल्याला ही सुरावट कळल्याच पुरेस समाधान मिळत न मिळत तो पर्यंत पुढची सुरावट आपल्याला गुंतवून टाकते.

त्यांच 'जीना यहाँ 'चित्रपटातल्या "ओ शाम आई रंगो मे रंगी हुई " हे त्याच एक उत्कृष्ट उदाहरण लताजीं च्या आवाजातल्या ह्या गाण्याची सुरावट अक्षरशः वेड लावणारी आहे . खास सलिलदांची सिग्नेचर असणार गाण, त्या गाण्यातून व्यक्त होणारी नायिकेचीह हुरहुर, तिच आशादायी स्वप्न थेट भिडतं, ते केवळ त्यांनी दिलेल्या अनवट अशा चाली मुळे.

प्रयोगशीलता आणि नाविन्य हा त्यांचा स्थायी भाव असावा,जो त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक गाण्यातून जाणवतो. अनेकप्रकारच्या वाद्यांचा, लोकसंगीताचा प्रभावी वापर हे त्यांच्या गाण्यात ठळक पणे जाणवणार वैशिष्टय . त्यामुळेच बहुतेक आजही त्यांच प्रत्येक गाण चिरतरुण वाटत.
आवाज चित्रपटातल "दिल धितांग धितांग बोले" गाण ऐकून पहा. या गाण्यात सुरवातीची ढोलकी नंतरच्या गाण्याच्या चालीशी थोडी विसंगत वाटते, पण नंतरची संपूर्ण गाण्याची चाल गोव्यातल्या लोकगीताची आठवण करुन देते.

चांद और सुरज चित्रपटातल्या " उनकी मेरी प्रीत पूरानी " ह्या गाण्याला दिलेल्या संगीतात त्यांनी लावणीचे बारकावे इतके अचूक टिपलेत, की बंगाली संगीतकाराची रचना आहे ह्यावर विश्वास बसण कठीण जाव . आशा बाईं च्या धारदार आवाजात ही लावणी हिंदी असून ही मराठी लावणी इतकीच खणखणीत वाटते.

त्यांना स्वतःची अशी पठडी बाहेरची स्वतंत्र शैली निर्माण करायची होती. एकाच वेळी गीतकार,संगीतकार ,संयोजक म्हणून काम करणार्‍या ह्या संगीतकाराचे सुर, निरनिराळ्या सुरावटी,त्यातल नाविन्य ह्या बद्दल चे विचार , संशोधन , व्याप्ती अक्षरश: थक्क करणारी होती, जी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जाणवते, व्यक्त होते. त्याचा पूरेपूर प्रत्यय देणारी ही त्यांची काही अप्रतिम गाणी -

१)चांद रात तुम हो साथ - हाफ टिकीट
२)वो एक निगाह क्या मिली - हाफ टिकीट
३)आंखो मे तुम दिल में तुम - हाफ टिकीट
४)जा तोसे नही बोलु कन्हैय्या - परिवार
५)ओ हाय कोई देख लेगा - एक गांव की कहानी
६) अकेला तुझे जाने ना दूंगी - चार दिवारी
७)बाग में कली खिली - चांद और सुरज
८)जागो मोहन प्यारे - जागते रहो
९)घडी घडी मोरा दिल धडके - मधुमती
१०)चढ गयो पापी बिछुआ - मधुमती
११)न जाने क्यूं होता है ये जिंदगी के - छोटीसी बात
१२)जिंदगी कैसी ये पहेली हाए- आनंद

सलिलदांनी काही चित्रपटांना आणि माहिती पटांना फक्त पार्श्वसंगीत दिलय,केवळ त्या पार्श्वसंगीता वरून चित्रपटाच्या कथानका ची कल्पना यावी इतक प्रभावी त्यासाठी ही ते फार प्रसिद्ध होते , त्यामुळेच कदाचित बिमल रॉय नी त्यांच्या कडून देवदास साठी फ़क्त पार्श्व संगीत करून घेतल असाव. अस संगीत देणारे ते पहिलेच संगीतकार होते.

मुकेश च्या आवाजाचा उपयोग सलीलदां एवढा उत्कृष्ट पणे, कदाचित कुठल्याही संगीतकाराने करून घेतला नसेल. त्यांनी संगीत दिलेली गाणी मुकेश च्या आवाजात ऐकताना ती केवळ त्याच्या आवाजासाठीच त्यांनी बनवली असावित अस वाटत . अतिशय गोड आणि मधुर अशा चालींची भावपूर्ण, प्रसन्न गाणी त्यांनी मुकेशच्या आवाजात गाउन घेतली. तरल ,भावपूर्ण पण तरी ही विशेष लोकप्रिय नसलेल मुकेश आणि लताजींच्या आवाजातल पूनम की रात चित्रपटातल द्वंद्व गीत " तुम कहां ले चले हो " , अतिशय प्रसन्न सुरावटींच छोटीसी बात चित्रपटातल मधल "ये दिन क्या आये" , हनीमून मधल "मेरे ख्वाबो मे खयालो में", तर छाया मधल "दिलसे दिल की डोर बांधे", ही गाणी ऐकल्या नंतर, मुकेश म्हणजे 'दर्दभरी' गाणी हे समिकरण पूर्ण पणे विसरायला होत.

संगीतात ,प्रतिभेला भाषेचा अडसर नसतो , त्यांनी तेलगू ,मल्याळम , कन्नड़ ,गुजराती ,उडीया, मराठी अशा अनिकविध भाषेतील गाण्याना संगीत दिल. मल्याळम चित्रपट "चेमिने " मधल्या एका गाण्यासाठी ह्या बंगाली संगीतकाराला केरळ सरकारने श्रेष्ठ संगीतकार पुरस्काराने गौरवल होत.

५ सप्टेंबर ला ह्या अष्टपैलू संगीतकाराला काळाच्या पडद्या आड जाऊन पंधरा वर्ष होतील, तरी
आजही त्यांच संगीत चिरतरुण वाटत, त्यांनी संगीतबध्द केलेली गाणी कितीदा ऐकली तरी प्रत्येक वेळेला नाविन्याची अनुभूती देतात. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून उलगडत गेलेल्या त्यांच्या प्रवाही शैलीच आकर्षण कधी ही न संपणार आहे, म्हणूनच त्याचा शोध ही कधी न लागणारा न संपणारा ,आपणही त्या प्रवाहात फक्त सामावून जायच बस्स तेवढच फक्त आपल्या हातात आहे.

टीपः वर दिलेली सगळी गाणी तुम्हाला www.salilda.com ह्या साईट वर ऐकायला मिळतील
चिमण च्या मदती मुळे हा लेख तुमच्या पर्यंत पोहोचवण शक्य झाल, तेव्हा चिमणला अनेक धन्यवाद.

गुलमोहर: 

स्मि, मार्क जाऊन ग्रेडेशन पद्धत आल्या मुळे शिक्षकांचा पगार बंद होऊन नुसत्या धन्यवादांवर भागवतात की काय? Wink

बाकी, माझ्या पोस्टीमुळे चिमणलाच आत कुठेतरी हे पटलं की वयापरत्वे पुन्हा एकदा नीट लेख तपासावा Proud

'ओ सजना बरखा बहार आयी' आणि 'ना जिया लागे ना' म्हणजे कहर!!!!

स्मिता जी, काही बंगाली गाण्यांचा(corresponding Hindi/Marathi गाण्यासकट) उल्लेख कराल तर मजा येईल....जसे,
ए दिन तो जाबो ना (मेंदीच्या पानावर)
दुरंतो घुर्नीर ए लेगेछेपाक(दिल से दिल की डोर बांधी) इ.इ.

- विजय

लले गुरुजींन पाऊंडात पगार द्यायला परवडत नाही, म्हणून फक्त धन्यवाद Proud

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !

आगाऊ, हाफ-टिकट मधल्या 'आके सीधी लगी दिलपे तेरी नजरिया' या गाण्यात दोन्ही आवाज काढण्याची कल्पना किशोरची होती. या व्हिडिओत खुद्द सलील चौधरीने त्याबद्दल सांगीतलंय.. http://www.youtube.com/watch?v=m66IHyeUXXk

विजय पाटील, salilda.com या साईटवर सलीलने दिलेल्या बहुतेक सर्व गाण्यांचा उल्लेख तर आहेच शिवाय जिथे जमेल तिथे गाण्यांचा क्रॉस रेफरन्स दिला आहे.. म्हणजे तेच गाण बंगालीत/मल्याळीत असेल तर ते कुठलं इ.इ.

महाराज, छानच आहे हो लेख. मी बर्‍याच दिवसापासुन तलत वर लिहायचे म्हणतोय, पण हिंमतच होत नाहीये. Happy

छान लेख.

"ये दिन क्या आये" माझ्यामते छोटीसी बात मधले आहे (रजनीगंधातले नाही). रजनीगंधातले मुकेशच्या आवाजातले आहे ते "कई बार यूंही देखा हे" ते सुधा केवळ अप्रतिम आहे..

स्मिताई, फारच सुंदर लेख Happy

सलिलदा माझेही आवडते संगितकार. प्रत्येक रचना वेगळी. सुरीली. मुग्ध करुन टाकणारी. सलिलदांना सलाम!

आणि तुला धन्यवाद आमच्यासाठी हा लेख इथे घेऊन आलिस म्हणुन Happy

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !!
चिमण तु इथे दिलेल्या गाण्यांच्या लिंक साठी आणि व्हिडीओ साठी तुला पुन्हा एकदा धन्यवाद !
'

स्मिता
सगळ्यात प्रथम इतक्या उशिरा प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व. लिहीन लिहीन म्हणून नुसता पुढे ढकलत होतो..
लेख झकासच आहे.. पण आता थोडा पुणेरीपणा (पण म्हटल्यावर पुणेरीपणा येणारच नाही का?)
मुकेश-सलील बद्दल छान बोललीस... "अन्नदाता"च्या गाण्याचा उल्लेख पाहिजे होता असे वाटले Happy मुकेश चे त्यातले "नैन हमारे ..." केवळ खास आहे.

त्यातली बाकीची गाणी सुद्धा अप्रतीम आहेत - गुजर जाये दिन दिन.. (किशोर), ओ मेरी प्राण सजनी चंपावती आजा.. (किशोर) - हे गाणे कुणावर फिल्मवले आहे ते पहा Happy
कधीतरी सलीलदा मेहफिल करावी असा विचार यायला लागला आहे Happy

'नैन हमारे' छानच आहे. पूर्वी ऐकलेलं होतं पण अन्नदातातल्या इतर गाण्यांमुळे विस्मरणात गेलं बहुतेक. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. 'ओ मेरी प्राण' हे कोणावर चित्रीत केलंय ते कळलं नाही.. बिंदू आहे का ती?

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद प्रशांत, "नैन हमारे" गाण मला पण आवडत, पण चिमण म्हणतो तस बाकी गाण्यांमुळे विस्मरणात गेल खर.
दुसर तु दिलेल गाण गोपीकृष्ण वर चित्रीत आहे का ? संगीत हटके आहेच एकदम त्याच. लिंकसाठी धन्यवाद !

खूप छान आणि उपयूक्त असा लेख.
<< मल्याळम चित्रपट "चेमिने " मधल्या एका गाण्यासाठी ह्या बंगाली संगीतकाराला केरळ सरकारने श्रेष्ठ संगीतकार पुरस्काराने गौरवल होत. >> हे पहिल्यादांच कळाले.

मलाही प्रथमच समजले. अस प्र्थमच घडत आहे की असे अनेक वेळा घडलय ?

Pages