अंकूर.....

Submitted by kalpana_053 on 30 April, 2008 - 18:19

.....तशीच तिची पावलं चटचटा पुढं पडत होती. गुळ्गुळीत असणारी डांबरी सडक देखील जणू तिला पायाखाली जड तसेच रुतणार्‍या कढत वाळूसारखी भासत होती. हा रस्ता केंव्हा संपतोय असं तिला झालं होतं. सभोवार अत्यंत गर्दी असूनही तिला विस्तीर्ण वाळवंट जाणवत होतं. डोळ्यात घुसणार्‍या तप्त सूर्य उन्हाच्या काचा.... डोळ्याला अंधारी आणत होत्या. पाय भराभर पडत असल्याने भेलकांडती चाललेली पायपीट...... स्वतःच्याच पाठीवर स्वतःच्याच मनांतील विचारांचे आसूड मुक्तपणे फटकारत होते आणि मनांतल्या मनांत ती मूक रुदन करत होती....... आपण करतोय ते बरोबर की चूक कोणास ठाऊक? पण व्यवहार्य दृष्ट्या तरी ते बरोबरच असावं...... या विचारांच्या व्याकूळतेमुळे तहानेनं कंठशोष लागलेला..... डॉक्टर हा एकमेव पर्याय असल्यानं डॉक्टरकडं जाणं म्हणजे समोर क्षितीजावर आपोआप उमलणार्‍या फुलासारखा एक मोठा आशाकिरण...... जिवाचा आकांत करून तो वेळीच गाठायला हवा...... उशीर झाला तर ही आशा देखील मालवून जाईल...... आणि मग पोटातील गर्भाचा नको वाटत असूनही मनापासून प्रेमाने संभाळ करावाच लागेल.......
कडेवरच्या मुलाला संभाळत...... संभाळत..... तिची पावलं आशेने डॉक्टरांच्या दिशेकडे चालली होती. कडेवरचा बाळ जेमतेम दीड वर्षाचा होता. त्याच्या पालनपोषणामध्ये आपण आर्थिक आणि शारीरिकदॄष्ट्या किती कमी पडत आहोत.... ही अपराधीपणाची जाणीव मनांत असतानाच आपल्या गर्भात दुसरा अंकूर उभारी धरतोय या जाणिवेनं तिला कासावीस झालं होतं...... "एकाच मुलाला जीवापलीकडं संभाळायाचं...... दुसर्‍याचा विचारही कधी करायचा नाही" हा तिचा ध्यास होता..... परंतु नियतीच्या मनांत काही वेगळंच होतं..... अचानक नियतिनं आपला डाव तिच्यासमोर टाकून तिला गोंधळात टाकलं होतं. तिच्या पोटात दुसरा अंकूर उभारी धरतोय हे तिला कोणतेही डोहाळे होत नव्हते त्यामुळे जरा उशीराच जाणवलं...... डॉक्टरांनी जेव्हा याचं निदान केलं तेव्हा मनापासून तिला अपराधी वाटू लागलं.... असं कसं झालं? आपण काळजी घ्यायची ठरवली होती..... पण तेव्हडा नियतीनं आपल्याला वेळही दिला नाही..... पहिल्या मुलानंतर मासिक पाळी न येताच दुसर्‍या बाळाचा गर्भ राहिला होता..... काही झालं तरी या जीवाला जन्माला घालून त्याचे व आपले हाल करायचे नाहीत हे तिच्या मनानं पक्क ठरवलं होतं. पहिल्या मुलालाच आपण किती बाजूनं कमी पडतोय...... आणि तोच हे दुसरं मूल..... आपल्यात आणि झोपडपट्टीतील बायकात मग काय फरक राहिला? याजाणिवेनं तिच्या जीवाची घालमेल होत होती..... भ्रूणहत्येचं पातक लागलं तरी एका जीवाचा आयुष्यभर दु:खी खेळ करण्यापेक्षा हे पातक बरं या विचाराप्रत ती शेवटी आली होती...... डॉक्टरांनी जेव्हा हे निदान पक्क केलं तेव्हा नवर्‍याचे यामध्ये सहकार्य घेण्यावाचून तिला पर्याय नव्हता.
रात्री ती त्याची वाट पहात होती. दररोज रात्री बाळाच्या बाळलीला उत्साहाने सांगणारी आपली बायको आज गंभीर कशी? या विचारानं त्यानं झोपता झोपता किलकिल्या डोळ्यानं तिच्याकडं पाहिलं...... तिच्या मनांतील एव्हढ्या मोठ्या वादळाची नोंद त्याच्या गावीही नव्हती...... तो बेडवर जवळ येताच ती अपसुख कलल्यासारखी त्याच्याजवळ सरकली..... त्याच्या चेहर्‍याचा अंदाज घेऊ लागली. माझा विचार याला पटेल नं....? या विचाराने क्षणभर अस्वस्थ झाली..... मग तहान लगल्याचे निमित्त करून उगाचच खोलीभर कानोसा घेतला....... आपल्या प्रेमळ बायकोचा "एखादी श्वापदाची क्रूर चाहूल हुंगावी" असा गंभीर चेहरा पाहून त्याला आश्चर्य वाटलं...... अन् क्षणातच भरल्या डोळ्यांनी ती त्याला एखाद्या वेलीप्रमाणे बिलगली...... तिचा घपापता श्वास त्याच्या संथ श्वासात मिसळत होता...... त्याने तिच्या डोळ्यांकडे पहिलं....... रडण्यामुळं तिच्या डोळ्यातील काजळ पसरलं होतं...... केसही गालभर ओघळले होते...... आणि चेहर्‍यावर प्रश्नचिन्हांची वलयेच वलये...... नजर रोखून ती आशेच्या नजरेनं त्याच्याकडे पहात होती..... एवढ्या थंडीतही तिला चक्क घाम फुटला होता..... नाईटलँपच्या मंद प्रकाशात तिनं स्वतःचे डोळे मिटून घेतले खरे....... पण डोळ्यातल्या अंधारापुढं "डोक्टरांकडून ऍबॉर्शन करून घेण्याशिवाय पर्याय नाही" एवढेच आशेचे चमत्कारिक ठिपके चमकत होते..... तिने साश्रू नयनांनी स्वत:ची बाजू केविलवाणी पध्दतीने सांगण्याचा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला..... पण त्याच्या चेहर्‍यावर फारसे गंभीर भाव उमटले नाहीत. "बघू..... नंतर विचार करू....." असं म्हणून तो तिला उत्तर द्यायचे टाळू लागला...... तिला नीटशी झोपही येइना..... ती त्याला समजावून सांगत होती...... "जास्त उशीर करून उपयोग नाही. लवकरच डॉक्टरांकडे जायला हवं..... तू एक दिवस बाळाला संभाळ..... मी डॉक्टरांकडे जाऊन ऍबॉर्शन कारून घेते. घरात कुणाला कळता कामा नये. कुणाला हे पटणार नाही.... उगाच पटवण्याचा प्रयत्नही करायला नको...... नंतर मात्र मी चांगली काळजी घेइन. अशी वेळ कधीच येऊ देणार नाही....." ती पोटतिडकीनं त्याच्याशी बोलत होती. तिला समजावण्याचा त्याने खूप प्रयत्न केला..... "भावंडाचे महत्व.... एकात एक लहान असताना दोन भावंडं वाढाली तर तुलाही नंतर सोपे........." अशा पध्द्तीनं तिचं मन वळवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्याने खूप केला. पण ती तिच्या विचारावर ठाम होती...... काहीही झालं तरी या बाळास मी जन्माला घालून स्वतःचे व बाळाचे हाल नक्कीच करणार नाही हे त्याला वारंवार बजावत होती....... अखेर शेवटी "तू माझ्याबरोबर आला नाहीस तर मी माहेरी जावून ऍबॉर्शन करीन...." असे तिने त्याला बजावून सांगितले.
तेव्हा मात्र त्याला आपल्या विरोधाला काहीही अर्थ नाही हे लक्षात आले...... आणि तो तिला "तू म्हणतेस तसेच करू...." असे म्हणून दिलासा देऊ लागला. फक्त उद्याच्या दिवस मला कामाची घाई आहे..... परवा मात्र डॉक्टरांकडे आपण नक्कीच जाऊ असे सांगून त्याने तिला मानसिक आधार दिला. आपल्या निर्णयाबरोबर आपला नवरा आहे त्यामुळं आता काळजीचं कारणच नाही या विचारानं तिला निर्धास्त वाटलं...... अलगद पापण्या मिटून तिनं पोटावरनं हात फिरवला....... "मऊशार कातडीचा छोटासा घुमट...." खरंतर अजून आकाराला आला नव्हता...... तरी उगाचच तो तिला चांगलाच जाणवला. डोहाळे नसल्यामुळं आपल्या लक्षातच कसं आलं नाही याची सारखी 'टोचणीच' जणू देत होता...... कळल्यापासून सारखं पपईसारखे उष्ण पदार्थ खा..... डोक्यावरून सारखी गरम पाण्याने अघोळ कर..... शेजारच्या आज्जींना विश्वासात घेऊन कसल्यातरी बियाही तिने खाल्ल्या होत्या....... पण काहीही उपयोग झाला नव्हाता...... बिजाने अंकुरायचेच ठरवले होते...... त्याला हवा....... पाणी...... अन्न मिळाले नाही तरी....... त्या कोंबाने उभारी धरायची ठरवलीच होती..... साश्रू नयनांनी तिने मनोमन "अंकुराची" माफी मागितली.......
सकाळ होताच उठताना परत तिने त्याला रात्रीच्या बोलण्याची आठवण केली. त्यानेही 'हो....ला.. हो...' केले. अंड्याचं आम्लेट त्याने मुद्दामून नाष्ट्यासाठी तिला करायला सांगितले. तिने फ्रिजमधून दोन अंडी काढली. तेव्हड्यात तिला सारखं पोटामधून अंकूर "मला वाचव..... मला वाचव...." असे ओरडतोय असे तिला वाटू लागले...... कां कुणास ठाऊक तिच्याच्याने अंड फोडलं गेलं नाही..... तिनं ते तसंच फ्रिजमध्ये ठेऊन दिलं...... उलट पोटावरील निर्‍या सारख्या केल्या...... अंडं खराब असल्याची सबब सांगून त्याला फक्त दूधच दिलं..... घरात नेहमीप्रमाणे खूप गड्बड चलू होती...... तिच्या मनांतल्या गोंधळाशी मात्र कुणालाच सोयरसुतक नव्हते....... तो दिवस तिने कसाबसा ढकलला.... दुसरा दिवस उजाडताच 'माहेरी जाते' असं सांगून त्याला डॉक्टरांकडे यायला सांगून ती निघाली......
केव्हा एकदा डॉक्टरांना भेटतोय..... आणि आपल्या पोटातील भार हलका करतोय असं तिला झालं होतं. डॉक्टरांना भेटल्यावर "मी काळजी घेणारच होते.... पण असं झालंच कसं?....." हे सर्व सांगताना ती डॉक्टरांकडे आशेने 'फासे टाकल्यासारखी पाहून ऍबॉर्शनचे दान' मिळवण्यासाठी तिची केविलवाणी धड्पड चालली होती...... डॉक्टरांनी तिला तपासल्यावर तिला व तिच्या नवर्‍याकडे पाहून "आता खूप उशीर झाला आहे...... ऍबॉर्शन होणे शक्य नाही. नाहीतर बाळाला अन् तुम्हालाही त्रास होऊ शकतो......." सांगितले....... ती हतबल झाली. तिने डॉक्टरांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. अन् डॉक्टरांनीही तिला असे शक्य नाही म्हणून बजावून सांगितले...... तिच्या देखत त्यानेही डॉक्टरांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टरांनी ठामपणे नकार दिल्याने शेवटी ती दोघे निराशेने घरी परतली.... मनांतल्या मनांत अनेक देवांना बोललेल्या नवसांचा तिला राग आला. 'शेवटी नियतीच्या मनांत वेगळेच आहे..... देव आपल्या मदतीला आला नाहीच' या विचाराने तिला हुंदका फुटला...... त्याने तिला जवळ घेऊन सांत्वन केले.
"आता काही उपयोग नाही..... आता हा विचार सोडून दे..... तुझ्या तब्येतीची काळजी घे..... या बाळाच्या जन्मानंतर लगेचच फॅमिली प्लॅनिंगचे तू किंवा मी ऑपरेशन करून घेऊ...." असं वारंवार तिला तो समजाऊन सांगत होता....
दिवस गेले... महिने गेले..... दिवसामासागणिक गर्भ वाढू लागला. हळूहळू मनांतील विरोध गळून पडला...... अन् पोटातील गर्भ वाढू लागला. आता पोटातल्या गर्भाविषयी तिला खूप प्रेम वाटू लागले. बाळाला 'तू आता दादा होणार...' असं ती वारंवार सांगू लागली. पोटातल्या बाळासाठी स्वतःची काळजी घेऊ लागली. आधी गर्भ नको म्हणून घेतलेल्या ऑषधांविषयी तिला आता काळजी वाटू लागली. त्याचा गर्भाला काही त्रास होणार नाही ना? याची चिंता तिला सतावू लागली. गर्भाविषयी वाटणार्‍या प्रेमाने अखेर तिला डॉक्टरांनीच आपल्या पोटातील बाळाला वाचवले म्हणून डॉक्टरांविषयी खूप आदर वाटू लागला. नंतरच्या तपासणीत तिने तसे डॉक्टरांना बोलूनही दाखवले...... डोक्टरांनी 'वेडी कुठली....!' असं हसत म्हणून तिला धीर दिला.....
अखेर नऊ मास झाले..... एका अपरात्री तिला पोटात खूप दुखू लागले. अन् तिने तिच्या सासूबाईंना उठवले.... तो कामानिमित्त परगावी गेला होता. मुलाच्या अंगावरील पांघरूण सारखे करत तिने त्याच्याकडे प्रेमाने दृष्टिक्षेप टाकला. थोड्याच वेळात बाळाला आयुष्यभरासाठी सोबत करायला एक भावंड असणार होतं..... बाळ आता छोटा दादा होणार होता. तयारी करून त्या दोघी हॉस्पिटलमध्ये जावू लागल्या. रस्त्यावरच्या सळ्सळीत अंधारात गडप होत जाणारी दिव्यांची ओळ तिला खूप आधाराची वाटली. अंधाराचा गच्च पडदा लांब क्षितिजापर्यन्त दिसत होता..... कडा चढणार्‍याच्या पाठीला कसून दोर बांधलेला असावा तशी बरोबर असणार्‍या सासूबाईंची तिला सोबत वाटली...... मलमपट्टी केल्यासारख्या टॉर्चच्या प्रकाशात ती व तिच्या सासूबाई हॉस्पिटलच्या दिशेनं चालत राहिल्या..... सासूबाई तिला खूप धीर देत होत्या. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे बेडकांचा कोरस शिगेला पोचला होता...... अन् तशीच तिची उत्सुकताही....... हॉस्पिटलमध्ये येताच नुकतेच एक बाळंतपण केलेल्या नर्सने तिला तपासले..... अन् 'अजून पाच-सहा तास तरी डिलिव्हरी होत नाही..... दोघीही झोपी जा....' असे सांगून तीपण झोपायला निघून गेली.....
सासूबाईंचा हात हातात घट्ट धरून तिने त्यांना 'मला एकटे टाकून तुम्ही कुठेही जावू नका' अशी आर्त विनवणी केली...... अन् अर्ध्या तासाच्या अवधीतच तिने एका मुलाला..... बाळाला जन्म दिला. त्या गोजिरवाण्या बाळाकडे पाहिल्यावर तिला अत्यानंद झाला....... अन् तिला आपण केलेल्या अविचाराची परत आठवण होऊन अपराघी वाटू लागले...... बाळाकडे पाहून ती म्हणाली..... "राजा, मला माफ कर...... तुला जन्माला येण्यासाठी मी या दुनियेचे दरवाजे बंद करायला निघाले होते..... पण उपकार त्या डॉक्टरांचे..... त्यांनी तसे करण्यापासून मला वाचवले...... अन् ती परमेश्वरासारख्या सृष्टीनिर्मात्याशी आपण केलेली अपयशी स्पर्घेचा विचार करू लागली....... अन् त्या हरण्यातूनही मिळालेला जिंकल्यासारखा आनंद उपभोगू लागली........
सकाळ होताच डॉक्टर अन् तो ........तिला अन् बाळाला भेटायला तिच्या घरातील मुलाला बरोबर घेऊन आले...... बाळाकडे पाहून समाधानाने तृप्त असलेल्या तिच्या समाधानी चेहर्‍याकडे पाहून डॉक्टर म्हणाले, "कसं वाटतंय आता...?" तिने ओशाळत परत डॉक्टरांची माफी मागितली.....
"मला आपण तब्येतीच्या कारणाने का होईना..... अविचारापासून रोखले...... एका भ्रूणहत्येपासून वाचवले....... आपले उपकार मी कधीच विसरणार नाही.... या जीवाला जन्माला यायला तुम्हीच कारणीभूत आहात हे मी कधीच विसरणार नाही....." असे वारंवार ती डॉक्टरांकडे व त्याच्याकडे पाहून म्हणू लागली. डॉक्टर अन् तो तिचे बोलणे ऍकून मनापासून जोराने हसू लागले...... तेव्हड्यात तो तिला म्हणाला..... "रागावणार नसशील तर एक सांगू? तू ऍबॉर्शन करणार म्हटल्यावर मी तुला एक दिवस काम आहे म्हणून मागून घेतला..... त्यावेळी मी डॉक्टरांना भेटून गेलो..... तुझ्या स्वभावाची मला कल्पना होती. भ्रूणहत्या तू आयुष्यभर कधीच विसरू शकली नसतीस...... व स्वतःला माफ करू शकली नसतीस........ याची मला खात्री होती...... एका नव्या जीवाला संभाळण्यापेक्षा भ्रूणहत्येचा त्रास तुला आयुष्यभर जास्त झाला असता..... तुझ्या तब्येतीचे कारण पुढे करून.... मी तुझे ऍबॉर्शन टाळले......"
तिने फक्त हसून त्याच्याकडे पाहून बाळाला अधिकच जवळ घेतले...... आपल्याला फसवले होते याची पुसटशी जाणीवही तिच्या मनांत नव्हती...... ती फसवणूक तिला आवडली होती...... माय्-लेकाच्या नात्यापुढे सर्व गोष्टी नकळत क्षम्य झाल्या होत्या..... आपला स्वभाव आपल्यापेक्षाही आपल्या नवर्‍याला निश्चितच जास्त माहित आहे याचा प्रत्यय येऊन त्याच्याविषयी तिला अभिमान व प्रेम दाटून आले.....
.......आणि हरण्यातून मिळालेल्या आनंदाकडे.... बाळाकडे ती जग जिंकल्याच्या अविर्भावात आनंदाश्रूं नयनांनी पाहू लागली...... "पाठीमागून चिमुकल्या हातांनी मिठी घातलेला मोठा मुलगा व नुकत्याच जन्मलेल्या बाळाला वात्सल्याने ऑथंबून दूध पाजणार्‍या तिला पाहून त्याला श्रावणातील जिवतीसारखी ती भासू लागली...... हा अपूर्व सोहळा तो आपल्या डोळ्यात सामावून घेण्याचा वेडा प्रयत्न करत होता......
सो. कल्पना रमेश धर्माधिकारी........

गुलमोहर: 

खूप छान लिहिलयस कल्पना, अगदि मनाला भिडलं.

कल्पना, अगदी अगदी सुंदर. किती विचारपूर्वक एका आईचे, स्त्रीचे विचार मांडलेयस. शेवटी तर ही छोटी कथा एका स्त्रीची, मातेची न रहाता तिच्यावर नितांत प्रेम करणार्‍या, तिला संभाळणार्‍या आणि त्याहूनही तिला "ओळखणार्‍या" तिच्या नवर्‍याची, तिची..... एका कुटुंबाची झालीये!
हॅट्स ऑफ्फ टू यू! इतक्या छोट्या कथेत इतकं सगळं सांगू शकणं....
खूप खूप लिही... छान लिहिते आहेस Happy

कल्पना, चांगली जमलीय. डोक्यावरून गरम पाण्याची अंघोळ, हा उल्लेख नको होता.
तसेच नर्सने पाचसहा तास सांगितल्यावर केवळ अर्ध्या तासात बाळ होणे, पण जरा कठीण वाटतेय. त्या काळात थोडी धावपळ झाली असेल. सासुबाईना डॉक्टराना बोलवावे लागले असेल. बाळ कसे जन्माला येईल, अशी काळजी वाटायला हवी होती, ( घेतलेल्या औषधाचा वाईट परिणाम तर झाला नसेल, असा विचार मनात यायला हवा होता. ) आणि एवढे होउनही बाळ सुदृढ जन्माला आल्याचा आनंद जास्त झाला असता.

कथेची सुरवात वाचल्यावर असे वाटले होते की आर्थिक आणि शारीरिकदॄष्ट्या कमी पडत असणार्‍या स्त्रीने आपल्या पहिल्या अपत्याच्या योग्य सन्गोपनसाठी अत्यन्त शान्त डोक्याने विचार करुन घेतलेला निर्णय आणि त्यासाठी केलेला पाठपुरावा ,लोकान्चा न जुमानलेला विरोध असे काहीतरी वाचायला मिळेल. especially"आपल्यात आणि झोपडपट्टीतील बायकात मग काय फरक राहिला?" हे वाक्य तर फारच परिणाम करुन गेले .
पण शेवट मात्र अगदीच typical झालाय. अर्थात फक्त एक मराठी कथा म्हणुन वाचायला गेले तर छानच आहे.पण कथेतल्या cocept (मातृत्वाची महती इ.इ.) चा विचार करता (वाचक म्हणुन)फारसे नाविन्य जाणवत नाही.
कथेचा flow , तिच्या मनात चाललेली खळबळ हे सगळे छानच जमले आहे.
मला तर ह्याच्या एक दशान्श सुध्दा बरे लिहिता येत नाही.फक्त वाचक म्हनुन जे वाटले ते नमुद केले.

कल्पना, छान लिहिली आहेस कथा.... अजून थोssडं डिटेलिंग चाललं असतं. 'तिच्या' मनातली खळबळ, विचारांचे वादळ आणि नवर्‍याचा समंजसपणा खुप छान उतरला आहे.

सगळेच आडाखे फोल ठरवणारा हा एक 'पण' असतो, त्यामुळे नर्सने पाच सहा तास सांगुनही अर्ध्या तासात बाळ होणं हे काही नवल नाही.

आधी गर्भ नको म्हणून घेतलेल्या ऑषधांविषयी तिला आता काळजी वाटू लागली. त्याचा गर्भाला काही त्रास होणार नाही ना? याची चिंता तिला सतावू लागली.>>>
दिनेशदा ! तसा उल्लेख आलाय कथेत...

नर्सने पाच सहा तास सांगुनही अर्ध्या तासात बाळ होणं हे काही नवल नाही.>> अगदी बरोबर, शिवाय रात्री झोपायला मिळाव म्हणुन फारस लक्ष न देणारी नर्स मी माझ्या बहिणीच्या बाळंतपणात पाहिली आहे. त्यामुळे नर्स ने ५,६ तास सांगुन १ तासाच बाळ होण अगदी शक्य आहे. Happy

बाकी कथा आवडली. सरळ्,सुंदर भाषेत अगदी छान मांडली आहे.

चांगली कथा आहे!!!!कथा वाचताना शेवटी काहीतरी दु:खी होणार नाही ना असे वाटत होते.पण बर झाल तुम्ही आनंदी शेवट केला!!

कडेवरचा बाळ जेमतेम दीड वर्षाचा होता.
मुलानंतर मासिक पाळी न येताच दुसर्‍या बाळाचा गर्भ राहिला होता>>>>>>>>>>>>>
 
कथा छानच आहे. पण वरच्या सारख्या चुकांमुळे तुमचीबी कथा झाल्यासारखी वाटते Lol

 
 
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा

मुलानंतर मासिक पाळी न येताच दुसर्‍या बाळाचा गर्भ राहिला >>
असं होउ शकत ? जरा डाउट्फुल वाटतय .
आम्हाला डॉक्टरांनी जे सांगितल ते एकदम वेगळ आहे म्हणुन ...
पण कथा छानच जमलीये ..

असं अगदी होऊ शकतं. अजीबात चुकीचं नाही.
कथा छान लिहिलिय.

उत्तम. केवळ अप्रतीम !!