लायसेंसचे राज (भाग २)

Submitted by अरुण मनोहर on 24 August, 2010 - 20:30

लायसेंसचे राज-भाग १

भाग दोन.
दु्सऱ्या दिवशी बाबा संगीताला घेऊन ट्रॅफ़ीक पोलीस कचेरीत गेले. तर बाहेर गेटवर "Private cars not allowed" असा प्रथमग्रासे मक्षिकापात घडला. चडफ़डत बाबांनी शेजारच्या इमारतीत कार पार्क केली. दोघेही गेटवर आले. देवळात जाण्याआधी नंदी शिंग रोखून आडवा! दारावरचा संत्री आत सोडेना. "Driving license, Go Agent Company" त्याने लोकल तडका मारला. "अरे (मठ्ठा) तिथे काम झाले नाही, म्हणूनच इथे तक्रार करायला आलो आहे." बाबांनी शांतपणे समजावले. "Why? What happened?" हा संत्री दिसणारा महाभाग एखाद्या शापीत गंधर्वासारखा, गेटवर रखवाली करायची शिक्षा भोगणारा, पुर्वजन्मीचा पोलीस खात्यातला अधिकारी तर नाहीना असे बाबांना वाटून गेले. त्या सहानुभूतीने त्यांनी त्याला थोडक्यात आपली कर्मकहाणी सांगीतली. तेव्हा त्याने आत जाण्यास अनुमती दिली. आतमधे नंबर घेणे वगैरे सोपस्कार होऊन जनतेसाठी असलेल्या एका वातानुकूलीत दालनात दोघेही आपला नंबर येण्याची प्रतिक्षा करू लागले.

नंबर आल्यावर बाबा समोरच्या काउंटरवर गेले. अर्थातच सगळी कथा पुन्हा सांगावी लागली. मुंबईला कार्ड लायसेंस नुकतच सुरू झालं आहे. संगीताचे बूक फ़ॉर्म लायसेंस तर पाच वर्षापुर्वी काढलेले आहे. अजूनही ते व्हॅलीड लायसेंस म्हणून भारतात देखील चालते. मग तुम्ही त्यावरून इथले का देत नाही? त्यावर तो म्हणतो “एजंटने तुमची केस रिजेक्ट केली, म्हणजे काहीतरी सबळ कारण असलेच पाहीजे. बरं, तुम्ही म्हणता मुंबईला कार्ड लायसेंस नुकतच सुरू झालं. कशावरून असं म्हणता?"

संगीता तयारीनेच आली होती. इंटरनेटवर वाचलेला लेख तिने प्रिंट करून आणला होता. त्यात लिहीलेच होते, मुंबईत नुकतेच स्मार्ट कार्ड लायसेंस सुरू झाले आहे. जुने बुक लायसेंस असेल तर ते देखील काही फ़ी भरून कार्ड लायसेंसमधे बदलता येईल. त्या लेखात, स्मार्ट कार्ड लायसेंसमधे बदलणे अनिवार्य नाही. जुने बुक लायसेंस अजूनही चालेल हे देखील नमूद केले होते.

संगीताने येवढ्या हुशारीने जमवलेल्या पुराव्यावरून त्याने भराभरा नजर फ़िरवल्या सारखे केले. तो थोडा देखील इंप्रेस झालेला दिसला नाही.

"हे ईन्टरनेट्वरचे आहे." तो मख्खपणे म्हणाला. (Read- This is not an official document)

"हो."
"हे तुम्ही एजंट कंपनीला दाखवले?"
"त्यावेळी मी इन्टरनेटवर पाहीले नव्हते. त्यांनी बुक लायसेंस चालणार नाही ह्या कारणाने रिजेक्ट केले, म्हणून मी नंतर हे शोधले."
ह्या लोकांना फ़ुटवण्याचा मार्ग दिसला तसा तो विजयी मुद्रेने म्हणाला. "मग आता पुन्हा त्यांच्याकडे जाउन त्यांना हे दाखवा!"
"तस केलें आणि त्यांनी पुन्हा रिजेक्ट केलं तर?" संगीताला पुन्हा एजंटच्या लाईनीत दोन तास जांभया देते उभे रहाणे जिवावर आले.
"मग नंतर तुम्ही इथे या."
आता बाबांनी जरा दटावूनच त्याला म्हटले- "हे पहा, आम्ही इथे already आलेलोच आहोत. एजंट कंपनी फ़क्त मिडलमन आहेत. शेवटी हे ट्रॅफ़ीक पोलीसांचेच काम आहे. तुम्ही आम्हाला सांगा, मुंबईचे बुक फ़ॉर्म लायसेंस चालते का नाही? नसेल चालत तर का चालत नाही? मग त्या प्रमाणे आम्ही एजंटकडे जाऊ. उगाच आम्हाला इकडून तिकडे फ़िरवू नका."

त्याने बाबांना एकवार नखशिखांत न्याहाळून घेतले. "ट्रॅफ़ीक पोलीसांचे हे काम आहे." हे बाबांचे वाक्य त्याला एकदम पटले होते. कारण त्या वाक्याचा दुसरा अर्थ त्याच्या ध्यानात आला! "हे काम त्याचे स्वत:चे नाही. आतमधे बसलेल्या दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याचे आहे!" त्याचा चेहरा उजळला. "तुम्ही असे करा, एक ऍप्लीकेशन लिहा. त्यात सगळी केस लिहा. एजंटने काय म्हटले, इन्टरनेटवर काय आहे, वगैरे. मग तुमची सगळी सगळी डॉक्युमेंट जोडा."

बाबांना धोक्याची घंटा ऐकू आली. "सगळी सगळी डॉक्युमेंट म्हणजे नक्की कोणती ते सांगा."

"सगळी. Everything must attach" त्याने निर्विकारपणे उत्तर दिले.

आता बाबा गरम झाले. "Please don't say everything must be attached! Please tell me exactly what documents must be attached, so that there is no rejection for this reason later." इतके ऐकूनही त्याचा चेहरा मख्खच होता, म्हणून, बाबांनी काउंटरवर सगळी सगळी डॉक्युमेंट म्हणजे, भारतीय लायसेंसची कॉपी, पासपोर्टची कॉपी, लेखी परिक्षेचा रिझल्ट, हे तीन कागद सुटे सुटे करून त्याच्यापुढे मांडले. "फ़क्त हीच तीन डॉक्युमेंट आम्ही ऍप्लीकेशनला जोडायचे, आणखी काही नाही नां?" हलवून खुंटा बळकट करावा असे बाबांची आजी जात्यावर दळतांना म्हणायची!

"Attach everything!" कागदांवर नजर देखील न टाकता त्याने म्हटले!

"नंतर काय होईल?" बाबांनी "और एक तो बात रही गयी" चा मौका त्याला मिळू नये म्हणून विचारून घेतले.

"मग ते तुम्हाला इन्टरव्ह्यू साठी बोलावतील."

"आता आणखी इन्टरव्ह्यू कशासाठी? भारतातील लायसेंस व्हॅलीड असेल तर नियमाप्रमाणे इथले मिळायलाच हवे. व्हॅलीड नसेल तर तसे सांगा!" बाबांना पुढच्या खेळाचा धोका दिसायला लागला होता.

"इन्टरव्ह्यूचीच प्रोसेस आहे ट्रॅफ़ीक पोलीसांची."

"एजंट कंपनी तर नुसते भारतातले लायसेंस पाहूनच इथले देतात" बाबा आता त्याच्या ट्रॅपमधे नकळत अडकले होते. पण वाक्य निघून गेल्यावर हे त्यांच्या लक्षात आले.

कौन्टरवाला गंभीरपणे- "एजंटनी रिजेक्ट केले आहे नां? काहीतरी कारण असेलच रिजेक्शनचे. ते आम्ही इन्टरव्ह्यू मधे शोधू."

"असे काय विचारतात इन्टरव्ह्यू मधे?" त्यांनी भितभीतच विचारले.

"हेच की तुम्ही भारतात केव्हा गाडी शिकलात? कुठे शिकलात? कोणती गाडी चालवण्याचा अनुभव आहे, तिचे मेक, मॉडेल काय? तिथे किती काळ गाडी चालवली इत्यादी."

अरे कर्मा! म्हणजे इन्टरव्ह्यू मधे हे काहीतरी खेकटे काढून लायसेंस देणार नाहीत. त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणखी अडचणी निर्माण करायला समर्थ होती. शिवाय सगळ्या उत्तरांचे लेखी पुरावे मागणार ते वेगळेच लचांड मागे लागेल! म्हणून ह्याने सारखा Everything must attachचा घोषा लावला होता होय! अरे लबाडा. आम्हीच मिळालो कां तुला?

"मग ऍप्लीकेशन दिल्यावर किती दिवसांनी तुम्ही आम्हाला बोलावणार?" बाबांनी इथे तरी काही चांगले ऐकायला मिळावे ह्या आशेने विचारले.

"लागतील चार पाच आठवडे" तो स्थितप्रज्ञाच्या मुद्रेत म्हणाला.

मांजर उंदराला जसे खेळवून मारते, तसलाच प्रकार! पाच आठवडे तडफ़डवणार. मग इन्टरव्ह्यू मधे डच्चू देणार!

"ओक्के. थॅन्क यू व्हेरी मच. आम्ही बघतो काय करायचे ते" बाबांनी काढता पाय घेतला.
संध्याकाळी समिर आल्यावर त्याला व्यवस्थीत सगळे सांगू असा विचार बाबांनी केला होता. पण बायकांना एखादी बातमी लवकरात लवकर नवऱ्याला सांगितल्या खेरीज चैन पडत नसावी! संगीताने समिरला तो ऑफ़ीसात असतांनाच फ़ोन करून सगळी रामकहाणी सांगून टाकली होती. त्यामुळे संध्याकाळी ऑफ़ीसमधून आल्यावर गरमागरम हाच विषय होता.

"तरी मी सांगत होतो." समिर म्हणाला. मी येऊन व्यवस्थीत आर्ग्यू केले असते."

"बाबांनी आतमधे जाउन ऑफ़ीसरला भेटायला पाहीजे होते. त्या कौंटरवरच्या माणसाला काही माहीत नव्हते. त्याने उगाच बाबांना भटकावले." संगीताची खात्री होती, आपण चुकीच्या माणसाकडे गेलो.

"अग इथली हीच पद्धत आहे. उगाच सगळी गर्दी आतल्या ऑफ़ीसमधे सोडत नाहीत. कौंन्टर स्टाफ़च पब्लीकशी डील करतो." बाबांनी "इथली पद्धत" सांगीतली.

आईने आपले ज्ञान दाखवले. "काही नाही हं. तुम्ही ऑफ़ीसरला भेटायची रिक्वेस्ट केली असती तर त्याने भेटू दिले असते."

बाबा आता वैतागले. "अग, ऑफ़ीसरने असे काय वेगळे सांगीतले असते? त्यांची प्रोसेस ठरलेली असते. भारतातल्या सारखे उगाच रखडवत बसत नाहीत लोकांना!"

समिर गर्जायला लागला- "आता तर रखडवतच आहेत ना ते? ते काही नाही संगीता. तू माझे ऐक. ह्या शनिवारी मी येतो तुझ्याबरोबर. आपण एजंट कंपनीकडेच जाऊ. मी विचारतो त्या बाईला खडसावून. तू हे लायसेंस व्हॅलीड असूनही रिजेक्ट का करते आहे त्याचे कारण मला लेखी दे. मग बघून घेतो तिला."

बाबा- " त्या ऐवजी आपण ट्रॅफ़ीक पोलीसला ऍप्लीकेशन दिला, तर ते मंजूरही करतील. कारण संगीताचे बुक लायसेंस व्हॅलीड आहे हे ते ओळखतील. इंटरव्ह्यू काही होणारच नाही. तो फ़क्त त्यांना लायसेंस विषयी शंका आली तरच घेत असतील. आणि आपले लायसेंस तर अगदी खरेखुरेच आहे."

ट्रॅफ़ीक पोलीसला ऍप्लीकेशन द्यायला संगीता काही तयार नव्हती. कारण आपले लायसेंस व्हॅलीड जरी असले, तरी त्यांचा काय भरोसा? हजार प्रकारची खेकटी काढतील आणि कायमचाच हा मार्ग बंद होईल. भडक डोक्याच्या समिरला एजंटकडे नेण्यातही काही अर्थ नव्ह्ता. रिजेक्शनचे कारण असे कसे ते लोक लेखी देतील? हा येऊन तिथे भांडणार, की लायसेंसला रामरामच ठोकावा लागेल! चाललेल्या गदारोळात जास्त तेल न ओतता, संगीताने मनाशीच काही स्टॅटेजी योजून ठेवली.

"हे बघा. मी एकटीच उद्या परत एकदा एजंट कंपनीकडे जाते. कारण खरे तर, भारतातले व्हॅलीड लायसेंस असेल तर ते दाखवून इथले मिळते, असाच नियम आहे. त्या एजंट बाईने उगाचच तिला नीट माहिती नव्हती म्हणून भटकावले. आता प्रॉब्लेम असा झालाय, की नियमाप्रमाणे हे भारतातले लायसेंस वापरून इथले मिळवायला फ़क्त एक महिना उरला आहे. तेवढ्या अवधीत तिक्डून दुसरे करून आणण्याचे कठीणच आहे. शिवाय त्याची तारीख आत्ताची असल्यामुळे नविनच भानगडी उद्भवतील. तेव्हा ह्यावरच कनव्हर्शन मिळवणे आवश्यक आहे. एक प्रयत्न करून पहाते. जर यश आले नाही, तर शनिवारी समिरला घेऊन पुन्हा एजंटकडेच शेवटचा प्रयत्न म्हणून जाऊ. मग त्यावेळी बघू समिरचे कर्तृत्व. भांड म्हणा किती भांडायचे ते तिथे!" संगीताने निश्चयाने सांगीतले. काहीतरी निश्कर्ष निघाला तेव्हाच हा लांबलेला काथ्याकूट संपला.

क्रमशः
*********************************

गुलमोहर: