एक हुकलेला खून - एका गडावर....

Submitted by बेफ़िकीर on 18 August, 2010 - 05:58

कथेचे मूळ शीर्षक परेश यांच्या विनंतीमुळे बदलले आहे. मात्र इतर संदर्भ तसेच राहिल्याबद्दल क्षमस्व!

-'बेफिकीर'!

======================

पद्मावती टाक्यात हात पाय धुवून शीण गेल्यावर महिपत वर आला अन शंकर मंदिराच्या समोरील तटबंदीवर बसून त्याने एक बिडी पेटवली. दुपारचे बारा वाजले होते. शिंदा किल्लेदार खाली जायला अजून दोन तास होते. प्लॅन तर मनात व्यवस्थित झालेला होता. आता फक्त इंतजार होता शिंदा किल्लेदार खाली उतरण्याचा! हा एक दैवानेच दिलेला आधार म्हणायचा! खरे तर शिंदा काही ना काही कारणाने खाली गुंजवणीत जावा असे त्याला आधीपासूनच वाटत होते. पण आपली ही इच्छा पूर्ण होण्याचे काहीही कारण नाही आणि शिंदा आपल्याला धड ओळखतही नसेल अन पाच वर्षापुर्वी आपण इथे आलो होतो हे त्याला आठवणारही नाही याची महिपतला कल्पना होती. पण... शिंदा स्वतःच म्हणाला होता..

"आत्ता भजी आन ताक घ्या.. खाली चाललुया म्या.. रातचा यील गडावं... तवर फिरा.. पर सांजंचं द्येवळात बसा.. किडं जनावरं लय हिथं.. बिबटंबी आलवतं मागं"

याला म्हणता सोन्याहून पिवळं!

लांबवर दिसणार्‍या तोरणा अन सिंहगड किल्ल्यांकडे हरवलेल्या नजरेने पाहात महिपत झुरके मारत होता. राजगडची खडानखडा माहिती नसली तर चार, पाच वेळा इथे आलेला असल्याने बालेकिल्ला, सुवेळा माची अन संजीवनी माचीच्या वाटा माहीत होत्या. मात्र या सर्वांपैकी 'मागच्या बाजूने उतरल्यास थेट भुतोंडे, कुंभेळे मार्गे शिवथरघळीला जाता येते' ही माहिती आज उपयोगी पडणार होती.

मगाशीच पोटात ढकलेली दहा बारा भजी अन दोन ग्लास ताक आता आतून धीर देत होतं! त्यावर तोरण्याच्या अंगठ्याला धडकून सुसाट सुटणारा वारा थेट राजगडावर थडकत होता. त्या वार्‍याने मन स्वप्नाचे पंख घेऊन वर वर जाऊ लागले होते. खाली मार्गासनी, साखर , ज्या बाजूने ते दोघे वर आले होते त्या बाजूची खोली, ठिपक्यांप्रमाणे दिसणारी घरं अन बाकी सगळी झाडी महिपतच्या मनातील स्वप्ने सत्यात उतरवणे किती अवघड आहे याची जाणीव करून देत होती.

'अंतूने ट्रक महाडपर्यंत पोचवला असेलच! खाली गाडीय! बसला असेल नरड्यात देशी टाकत! रातचंच निघू रायपूरला! छत्तीसगड गाठायला दोन दिवस पुरेत.'

महिपतचे विचार महाराजांचे स्वराज्य पोचले नसेल इतक्या प्रदेशांमधून एकाचवेळेस फिरून येत होते.

"काय गार वारंय बाई.. जाकीट आणू?"

खरे तर विचारात असताना ताराचा अचानक आवाज आल्यामुळे महिपत जागच्याजागीच दचकला होता. पण तसे न दाखवता अन तिच्याकडे बघणेही जरूरीचे न समजता तोंडातून केवळ 'अंहं..' एवढाच उच्चार काढून तो पुन्हा तोरण्याकडे बघत बसला.

'जाकीट आणू का.. हरामी स्साली.. लाडात आलीय... चार तास उरलेत जगात.. गड चढायला लागले दोन तास... उतरायला दहा सेकंद पुरेत.. शिंदा जाणार नसता तर आत्ताच ढकलली असती'

महिपतच्या मनातील विचार ताराला समजले असते तर धावत सुटली असती ती! किंवा शिंद्याच्या खोलीत जाऊन त्याला मदतीला घेऊन लपून बसली असती.

तारा - मस्स वाटत ना? उडावं वाटतं..
महिपत - उडावं वाटतं ना?
तारा - हं.. कोन नस्तं होय किल्यावर?
महिपत - तू अन मी.. कोन पायजेल?
तारा - चला.. बायकोची याद आहे म्हनायची.. दिड वरीस झालं भारत भटकताय..
महिपत - चांगलीच यादाय..

महिपतच्या स्वरातला उपरोध तिला जाणवत नव्हता.

तारा - ह्यावेळपास्नं मी येणारे गाडीवं..
महिपत - आन?..
तारा - आन काय? देश बघणार तुमच्याबरूबर..
महिपत - ट्रकवाल्याची जिंदगी ब्येकार असती..
तारा - म्हून जाता होय सारकं? सोडून?
महिपत - मनात तूच असतीस..
तारा - बिड्या किती ओढता.. टाका ती.. ..मन रमतं फिरताना तुमचं?
महिपत - कसलं रमतं..
तारा - भेटतच आसंल की कोन कोन..
महिपत - म्हंजे?
तारा - र्‍होणी म्हनते ड्रायव्हरवर लयी भाळतात बाया..
महिपत - का?
तारा - माल काय माहीत?
महिपत - तू नाय भाळंत?
तारा - भाळायला किती दिस असता घरात?
महिपत - मंग कुनावर भाळतीस?
तारा - काय बोलताय...
महिपत - कोन तरी आसलंच की..
तारा - हाड नाई वाटतं जिभेला..
महिपत - तू नाय तर तुझ्यावर कोन तरी भाळंत आसंल..
तारा - तेवढी हिम्मत नाय वस्तीत कुनाची..
महिपत - आता महिन्या महिन्याचा उपास म्हनल्यावर...
तारा - चला.. फारच काळजी बायकोची.. मंग यावं की घरी हप्त्याचं हप्त्याला..
महिपत - कुनासाठी राबतोय?
तारा - हितंच बघा लोकल कायतरी.. अंतू चालवंल गाडी..
महिपत - हा.. अन्तू चालवंल.. अजून किन्नरगिरी जमत न्हाय...
तारा - जमंल...चला.. आतमधे बसू.. लय वारंय..
महिपत - आता काय बसायचंय.. आता गड पाहायचा..
तारा - पाय दुखतायत.. म्हनत होते असल्या ठिकाणी नकं..
महिपत - खरी मजा निसर्गाते.. ते लोनावला अन माळशेला काये?
तारा - रात्री असं एकटं र्‍हायचं? त्या किल्लेदाराची भीतीच वाटते..

महिपतच्या मनात विचार आला.

'रात्री कुठे इथे राहायचंय? रात्री तू गुंजवणेवाडीमागच्या दरीत मोडून पडलेली असशील.. अन मी घळीच्या रस्त्याला लागलेलो असेन'

तब्बल दिड तास विश्रांती घेतली दोघांनी! शंकर मंदिराच्या भिंती दगडाच्या होत्या. चार भिंती शाबूत असूनही दगडांमुळे थंडच वाटत होतं! कितीतरी दिवसांनी खरे तर एकांत लाभलेला होता. पण दार व्यवस्थित नव्हतं मंदिराचं! त्यामुळे अचानक शिंदा आला तर काय या भीतीने हवं तसं वागताही येत नव्हतं!

पण या सगळ्या वातावरणाची एक नशा चढली होती ताराच्या डोळ्यांवर! आणि त्याच नशेत तिला सुस्ती आली होती. मुटकुळं करून झोपलेल्या ताराकडे पाहताना जागा असलेल्या महिपतच्या डोळ्यांमधे खून उतरला होता.

'छिनाल साली.. नजरेआड असते तेव्हा गिरनवाला हवा तवा येतुय घरात.. आप्पा सांगतो म्हून खरं मानावं लागतंय.. न्हायतर बोलनार्‍याचं मुंडकं छाटलं नसतं का? आप्पाला रातभर पाजली तरी शंभरदा तेच म्हनतोय म्हन्जी सच असनारच.. ह्यांच जमलं कसं? आपलीच चूक.. बायको चांगल्या चालीची समजून र्‍हायलो फिरत.. हिनं दाखवलं गुन.. गिरनवाल्याचीबी चूक.. त्यालाबी खल्लास करायचाच.. पर हा खून पचल्यावं.. मी घरात न्हाय म्हन्जी रस्त्यावर पडल्याली बाई हाये व्हंय?.. आक्कीबी धड खरं नाय सांगत धड खोट नाय.. म्हनं दिसतुय खरा अधीमधी तारीकडं गिरनवाला.. अधीमधी दिसतुय म्हन्जी? असा कसा दिसतुय? आन तुमी मला नगं सांगायला?.. आपलीच चूक... आता चूक करायची न्हाय...'

"म्या जाऊन येतुय.. दोन भाकरी हायत यात.. त्या खा लागलंन तर.. रातचं जेवान करायला येईलच मी..उगा नगं थितं फिरू नगा.. पाच वाजता देवळात या आपले.. क्काय?"

शिंदा खड्या आवाजात सूचना देऊन निघाला तसा महिपत पुन्हा मगाच्याच जागी आला. शिंदा पार शेवटच्या उतरणीला लागायला चक्क फक्त दहा मिनीटे लागली. त्याचा उतरण्याचा अचाट वेग पाहून महिपत अवाक झाला होता. पण शिंदा उतरला तसा देवळात आला अन त्याने ताराला उठवलं. दोन वाजले होते.

आधीच दमलेल्या ताराला पार सुवेळा माची, संजीवनी माची, नेढं अन बालेकिल्ला यांच्यामधली अंतरे पाहूनच दडपायला झालं! पण कधीनव्वद आलेल्या नवर्‍याला नाराज करायचे नाही म्हणून ती पाय उचलायला लागली. बालेकिल्याला तिला धरून वर ओढून घेताना एकदम हिंदी पिक्चरसारखं वाटलं महिपतला! बरेच दिवसांनी होणार्‍या स्पर्शांमुळे तोही जरासा उत्सुक होताच, पण पुढचा प्लॅन इतका भयंकर होता की आत्ता त्याला त्यात काहीच रस वाटत नव्हता.

जिजाऊचा महाल पाहताना ताराला जाणवलं! बालेकिल्ला गृहीत धरला तर राजगड तोरण्यापेक्षाही ऊंच आहे. मात्र त्याचवेळेस महिपतच्या मनात एक भलतीच भीती मूळ धरत होती.

गुंजवणेवाडीकडून असलेल्या वाटेवर खूप खूप खाली त्याला काहीतरी दिसलं होतं! ते नेमकं काय होतं ते त्याला समजत नव्हतं. काहीतरी गुलाबी रंगाचं होतं! तो स्थिर नजरेने झपाटल्यासारखा जवळपास दहा मिनीटे तिकडे बघत बसला होता. काहीच दिसेना तसा मग तो ताळ्यावर आला.

नजरेला दिसेल तिथपर्यंतच्या प्रदेशात कुणीच नसल्याने अन भरपूर उजेड असल्यामुळे आता तारा महिपतशी किंचित सलगीने वागू लागली. महिपतनेही विचार केला. एकदा पोटभर भोग घेऊन मग हिला न्यावी दरीकडे!

बालेकिल्ला उतरून दोघेही खाली आले अन आडोश्याला गेले.

ताराच्या दृष्टीने इतक्या रम्य वातावरणात असे सुख मिळणे हे स्वप्नवत होते. पुन्हा अशी वेळ कधी येणार हेच तिला समजत नव्हते. महिपत मात्र 'काही तासातच हा देह निष्प्राण होणार आहे' या आठवणीने हवा तसा वागू शकत नव्हता. भयानक सावट होते त्याच्या मनावर! भीतीचे अन ताणाचे! खरे तर प्रेम म्हणण्यापेक्षा सूड घ्यावा तसाच तो वागत होता. आणि ते तिला धसमुसळेपण वाटत होते.

पुन्हा रस्त्याला लागून दोघे चालायला लागले. महिपतची दिशा होती दरीची! आत्ताच कार्य आटोपलं तर चांगलं उजेडाचं घळीच्या रस्त्याला लागता येईल हा एक महत्वाचा फायदा त्याला जाणवत होता. आकाशाच्या मध्याकडून बर्‍यापैकी पश्चिमेला सरकलेल्या सूर्याकडे कसेबसे पाहात त्याने ताराचा हात हात घेतला तो तिला विशिष्ट दिशा देता यावी याच उद्देशाने!

महिपत - तारे..
तारा - ...
महिपत - आप्पा अन आक्की सांगत हुते..
तारा - ... काय?

भलतीच चपापली होती तारा! आप्पा हा सख्खा शेजारी होता! अन आक्की ही बरोब्बर समोरच्या घरात राहणारी प्रौढ स्त्री! जी अत्यंत भांडकुदळ म्हणून वस्तीत कुप्रसिद्ध होती. या दोघांनी काय सांगीतलेलं असेल आपल्या नवर्‍याला? 'ते' तर नसेल सांगीतलं?

महिपत - की.. लय वेळा गिरनवाला दिसला आपल्या घरात म्हून..

या क्षणी जगात सर्वात असहाय्य जर कुणी असेल तर ते आपण आहोत याची ताराला जाणीव झाली. सूर्यास्त व्हायला थोडा वेळ राहिलेला! संपूर्ण गडावर दोघांशिवाय कुणीही नाही. नवर्‍याला आपला रास्त संशय आलेला! अगदी नावानिशी सांगतोय सगळं! आवाजही जरासा वेगळाच, आतून आल्यासारखा, खर्जातला! राजगडावर, असल्या एकांतात, यायची कल्पनाही त्याचीच! ...

.... यात काही... दगाफटका तर...

हा एकच क्षण होता ज्यात अत्यंत काळजीपुर्वक वागायला हवे होते. आपल्या चेहर्‍यावर जरा जरी घाबरलेपण दिसलं तर आपण संपलो! अनावश्यक आक्रमकपणे उसळून तारा म्हणाली..

तारा - गिरनवाले घरात येतात? .. काय बोलता समजतंय? .. आक्केच्या अन आप्पाच्या टाळक्यात दगुड नाय घालावासा वाटला??.. गपचिप ऐकून घेताय?? मीच चेचते दोघांची टाळकी गेल्यावर... चला.. मला हितं थांबायची इच्छा नाय.. चला..

हात हिसडून घेऊन तारा उलटीकडे चालायला लागली.

एकच क्षण महिपतलाही वाटले.

'हीखरे बोलत असणार! त्याशिवाय का इतकी चिडेल? बाईच्या चारित्र्यावर चिखल टाकलाकीच बाई अशी वागती. या आप्पाला आपन उगाच दारू पाजली. आक्काबी काय धड सपष्ट बोललेली न्हाय! '

हे एवढाल्ले डोळे करून तरातरा उलटीकडे निघालेल्या ताराला पाहून आता महिपतलाच क्षणभर पश्चात्ताप झाल्यासारखे झाले.

पण लगेचच त्याला ते आठवले. आप्पा म्हणत होता.

'कांबळे डाक्टरकडे ग्येलेली.. म्हून मी मुद्दाम त्याला गाठला.. तर लय ब्येनं ते.. ताकास तूर लागू देईना.. पर त्याच्याकडच्या वामन्यानं सांगीतलंच.. दोन ग्लास पाजल्यावर मंग.. ही मूल पाडायला गेलती.. कागूद बी दाखवलंन.. आता तू न्हाय आलेला मागच्या नवरात्राहून.. अन हिला दोन म्हन्यांचा गर्भ कसा रं??'

पाताळयंत्री आहे ही!

महिपतला ताराचा कावा लक्षात आला. तसा आता त्याने स्वतःच कावा केला. आत्तापर्यंत त्याचा विचार होता तिला धाकात घेऊन घाबरवायचं अन घाबरवत घाबरवत दरीत ढकलून द्यायचं! पण ही जर अशी तरातरा उलटी निघाली तर आपण किती ओढत आणणार! त्यात पुन्हा सुटली, सावध वगैरे झाली तर तिसरंच काहीतरी व्हायचं! बाईमाणूस असलं तरीही जीवाची भीती असली की काहीही करेल! हिला गोड बोलूनच दरीजवळ न्यायला हवं!

महिपत - तारे... अगं राख काय घालतीस डोक्यात? याड लागलं का? मी आन ऐकून घीन व्हय? हे लावल्या चार त्या आप्याच्या मुस्काडात.. आक्की बाईमानुस.. तिला मारलं न्हाय.. पर तिच्याच घरात जाऊन लय श्या दिल्या.. उगा वस्तीत बोंब नगं म्हून.. तू काल बाजारला गेलतीस तवा रामायन झालं ह्यं! माझी सोन्यासारखी बायको कशीय मला म्हाईत न्हाई व्हय? कोनाचं का घ्याचं ऐकून मी? गप झालीत आता दोगं! पुन्न्हा तोंड उघाडलं तर माझ्याशी गाठ हाये सांगून आलोय.. तू कस्काय इस्वास ठिवतेस माझ्या रागवन्यावर? आ? थट्टाबी नाय व्हय करायची बायकुची? तू नाय का म्हनत ड्रायव्हवर लय बाया भाळतात म्हून.. तवा असा चिडलो का मी?

तारा विचारपुर्वक ऐकत होती. चेहर्‍यावर चिडल्याचा अभिनय तसाच चालू ठेवला होता तिने! पण हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागले होते. नवर्‍याचा विश्वास आहे. तो थट्टा करत होता. पण लगेच राग सोडल्याचे दाखवणे योग्य नव्हते. ती डोळ्यात हुकुमी पाणी आणून खाली बसून डोकं गुडघ्यात खुपसून म्हणू लागली.

तारा - काय नाय.. तुमचाच इस्वास नाय माझ्यावर.. लय मवाली शिट्या मारतायत.. लय बघतात येता जाता.. नवरा लांब म्हून कावळे जमतात.. पर मी मान बी वर उचलली नाय.. आन तुम्ही येऊन आसं म्हन्ताय.. मी जीव देनारे.. सोडा मला..

महिपत - अगं याडी का खुळी? आ?

तारा - काल रामायन झालं तवाच का नाही बोललात? त्या आक्कीची जीभ नस्ती व्हय हासडली थितंच?

महिपत - अगं मला खरं वाटलं तर बोलनार ना? माझा तुझ्यावर इस्वास हाये म्हनल्यावर कशाला बोलायचंय.. मी आत्ता थट्टा म्हून म्हनलो तर चाललीस जीव द्यायला.. अन मी कुनासाठी जगायचं मंग.. चल दोघंबी मरू..

आता तारा खुदकन हसायला लागली.

तारा - आन असली थट्टा नगा करत जाऊ.. सांगून ठिवतीया..
महिपत - हसताना ग्वाड लई दिसतीस..
तारा - व्हय.. म्हून रडवताय.. आ?
महिपत - तू उगा रडलीस.. थट्टा समजेल ती बाई कसली..सगळ्या येड्या डोक्याच्या..
तारा - आस व्हय?...

बसल्या बसल्याच महिपतने ताराला मिठीत घेतलं! तिच्या खांद्यावरून मागे बघताना महिपतच्या चेहर्‍यावर तीव्र हिंसक अन रागीट भाव आले होते.....

... पण आपल्या खांद्यावरून मागे पाहताना तारीच्या डोळ्यात कोणते भाव आहेत हे त्याला समजलेलंच नव्हतं !

दोघे उठून पुन्हा चालू लागले. आता ताराचा डावा हात महिपतच्या उजव्या हातात घट्ट धरलेला होता. वरवर वाटायला वाटावे फारच लाडात चालले आहेत. पण हा तसा धरण्यामधे 'ती पुन्हा पळून जाऊ नये' हा हेतू होता.

सूर्य आता क्षितीजाची विचारपूस करत होता. लवकरच क्षितीज त्याला गुंडाळून मागे टाकायच्या विचारात होते.

गुंजवणेवाडीकडच्या दरीच्या वाटेला दोघ लागले. महिपत भानावर होता. आपण कुठे चाललेलो आहोत हे त्याला माहीत होते. तारा नकळतपणे त्या वाटेला लागलेली होती. नुकताच झालेल्या प्रसंगाचा कडवटपणा नाहीसा व्हावा म्हणून महिपत तिच्याशी काही ना काही आनंदी बोलत होता. आणि महिपतच्या मनात शंका नाही हे पाहून मनातून आनंदलेली तारा वरवर 'अगदी हळूहळू खुलत आहे' असे दाखवत होती.

...आणि...

... मगाशी ते गुलाबी काय दिसलं होतं ते महिपतला समजलं..

लालसर लुगडं नेसून एक बाई डोक्यावर मातीची कळशी घेऊन विचारत होती...

"ताक.. दही...."

दचकलेल्या महिपतने त्या बाईला निरखून पाहिले.

तारा नसताना एरवी ही बाई दिसली असती तर आपणही हिला पटवण्याचा विचार केला असता हे त्याला मनोमन पटले. या विचारासरशीच त्याच्या मनात आणखीन एक विचार आला.

कोणत्या अपराधासाठी आपण ताराला मारतोय? जो आपण गेली दहा वर्षे स्वतःच करत आलो आहोत तो? अन्तू किन्नर किती वेळा आपल्याला सांगतो! या मार्गाला लागू नका! पण आपण ऐकत नाही. आणि बायकोला मात्र मारतोय..

महिपतला अन्तूची आठवण झाली. दारूच्या नशेत आपण बोलून गेलो.. बायकोला खलास करणार, बायकोला खलास करणार.. अन प्लॅन ठरवून टाकला..

पण अन्तू किती इमानी... महाडला गाडी खाली करून घळीपाशी येणार...

क्षणभर झालेली पश्चात्तापाची भावना नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला महिपतने! कारण आज हिला मारले नसते तर पुन्हा अशी संधी आली असतीच की नाही ते महिपतला माहीत नव्हते. त्यात पुन्हा गिरणीवाला अन तारा सावध झाले असते अन सावधपणे भेटत राहिले असतेच.

हिला माहेरचे कुणी नाही ही सर्वात जमेची बाजू आहे. चार, दोन भाऊ असते तर पोलिसांआधी त्यांनीच आपल्याला खलास केले असते. आपल्याच जीवावर जगणारी ही चवचाल बाई मारलीच पाहिजे. नाहीतर आपल्याला काही मान राहणार नाही.

महिपत - नगं! ... कुठल्या तुम्ही...

त्या बाईला महिपतची नजर क्षणार्धात समजली होती. पण त्याची स्वतःची बायको बरोबर आहे म्हंटल्यावर ती निर्धास्त होती.

"गुंजवणं"

महिपत - काय नांव तुमचं?

हे विचारण्याचा महिपतचा हेतू तिसराच होता. बायको दरीत पडली अन मी दुसर्‍या रस्त्याने खाली उतरून तिला शोधायला पळत सुटलो होतो हे सांगायची वेळ आली तर ही दहीवाली बाई साक्षीदार ठरू शकेल असे त्याला वाटत होते.

"नकुशाताई शिंदे"

महिपत - केवढ्यालाय? .. दही?
नकुशाताई - पाच रुपये..
तारा - अहो.. काही नको दही..
महिपत - शिंदा किल्लेदारांपैकीच का तुम्ही?
नकुशा - न्हाय... ते मराठा हायत.. आम्ही येगळे..

तिच्याकडे दुर्लक्ष करून दोघे पुढे चालायला लागले. खरे तर नकुशाताईचा एक पैशाचा व्यवसाय झालेला नव्हता. पण ही बिचारी माणसे मनाने अत्यंत चांगली अन अगत्य असलेली असतात. ती ओरडून म्हणाली.

नकुशा - त्यकडं दरी हाय.. हिकून जा.. खुटं चाललाय??

बोंबललं! क्षणभर महिपतने तिच्याकडे हिंस्त्र नजरेने पाहून लगेच चेहर्यावरचे भाव बदलले व तिच्याकडे दुर्लक्ष असल्यासारखे पुढे चालू लागला.

तारा - अहो.. दरीय तिकडं.. चला.. जाऊ आता द्येवळात..
महिपत - अगं ती यडीय.. दही विकायचंय म्हून काही पन सांगतीय..

तेवढ्यात नकुशा पुन्हा ओरडली.

नकुशा - घसिरडं हाय तिकडं.. वाघरं बी येत्यात.. हिकून जावा गडावं.. ती न्हाय वाट गडाची..
महिपत - ओ.. आमी बघतो कुटं जायचं.. चला तुम्ही...

आता ताराच्याही मनात किंचितच शंका निर्माण झाली. हा माणूस आपल्याला दरीकडे का घेऊन चाललाय?

चालता चालताच तिनी डोळ्यांच्या कोपर्‍यातून महिपतच्या डोळ्यांमधले भाव तपासले. चक्क हिंस्त्र भाव दिसले तिला! आता सगळंच लक्षात यायला लागलं होतं! प्रकरण काही व्यवस्थित नव्हतं हे! महिपत तीरासारखा, एखाद्या विशिष्ट हेतूने प्रेरित झाल्यासारखा चालत होता. ताराला किंचित जाणवेल अशा पद्धतीने ओढत होता. पण त्याला एरवी कुणी 'ओढणे' समजले नसते. फिरायला निघाल्यासारखे भाव महिपतच्या चेहर्‍यावर नव्हते. त्याच्या चालण्याला एक विशिष्ट दिशा होती. केवळ क्षणभरातच हे सगळे ताराला समजून चुकले.

कोणत्याही क्षणी आपल्या हाताला हिसडा मारून सुटायचे अन धावत मागे जायचे याचा निर्णय तिने मनातच घेऊन टाकलेला होता. तरीही एक प्रयत्न व भोळी आशा म्हणून तिने विचारले..

तारा - हिकडं कुठं जायचंय.. अंधारबी होतुय..
महिपत - ... चल..

या 'चल'मधे 'मुकाट चल' अशा प्रकारचा एक हुकूम होता हे ताराला जाणवले. महिपतची गती किंचित वाढलेली होती चालण्याची! तारा मागून किंचित ओढल्यासारखी चालत होती.

नक्कीच! नक्कीच काहीतरी भयंकर होणार आहे आपल्याला! ताराला ते जाणवले. आता ती गळाठून स्वतःचे मनगट वळवत वळवत गळ्यातल्या गळ्यात उद्गारली..

तारा - हात सोडा की.. किती दाबून धरताय..

पकड अधिकच घट्ट झाली. ही खरे तर बोंब मारण्याची वेळ होती...

पण तारा भीतीने दातखीळ बसल्यासारखी झालेली होती. शक्य असूनही हात एका झटक्यात सोडवायला हवा हे भीतीने तिला सुचत नव्हते. आपल्याला दरीत ढकलणार याची तिला अस्पष्ट कल्पना यायला लागली होती.

पण अजून दरीच दिसत नव्हती. मग? मग काय करणार असेल हा माणूस? आपण कसे काय इतके बिनदिक्क याच्याबरोबर इथे आलो? कसे काय बिनदिक्कतपणे गिरणीवाल्याशी संबंध ठेवले? वस्तीला समजेल हे आपल्याला कसे कळले नाही? कधीतरी नवरा येऊन आपला घात करेल याची जाणीव कशी झाली नाही? मगाशी हा थट्टा करत नव्हता. याच्या मनात तेच आहे. हा आपल्याला...

... हा आपल्याला मारणार आहे मारणार! ... खून करंणार आहे हा आपला..

आता पायाखालची वाट खरे तर संपलेली होती. ढोरवाटा होत्या. ढोरवाटा म्हणजे ज्यावरून गुरे जातात त्या! खरे तर बर्‍याचदा अशा वाटांवरून गुरेच जाऊ शकतात. माणसांना अशा वाटांवरून चालणे, विशेषतः त्या जर एका बाजूला डोंगर अन एका बाजूला दरी अशा वाटा असतील तर, अशक्य कोटीतलेच असते. पण ही वाट डोंगर, दरीमधली नव्हती. ही थेट दरीकडे जाणारी वाट असल्यामुळे इतर ढोरवाटांपेक्षा जरा बरी होती.

पण तरीही चालताना अवघडच जात होते. मात्र! .. आता आपण काहीही केले नाही तर आपण संपलो हे ताराच्या लक्षात आले. आणि तिने जीव वाचवण्याचा पहिलावहिला प्रयत्न केला.

.. एकच जोराचा झटका देऊन तिने आपला हात सोडवून घेतला अन ... क्षणभर.. क्षणभरच...

दोघांची नजरानजर झाली..

खून! प्रत्यक्ष खून दिसत होता महिपतच्या डोळ्यांमधे! आणि कापल्या जाणर्‍या बकरीचे भाव ताराच्या!

'दुसर्‍याच्या मनात काय आहे' हे तर दोघांपैकी प्रत्येकाला समजले होतेच... पण 'ते आपल्याला समजल्याचे दुसर्‍याला समजले आहे' हेही समजले होते आता!

ती नजरानजर इतकी भीषण होती... की ताराच्या पायातील बळच गेले.. आणि मग..

आपण आता मरणार या भावनेने पुन्हा इतकी शक्ती दिली की दुसर्‍याच क्षणी तारा मागे वळली अन बेभान होऊन पळत सुटली. पळता पळताच 'ओ बाई.. ओ दहीवाल्या बाई.. ह्यं मारतुय मला हो.. वाचवा' असे ओरडत ती ठेचकाळत धावत होती. त्यातच तिला दिसले. मगाशी बालेकिल्याच्या खाली ज्या ठिकाणी या दोघांचे भांडण झालेले होते ... तिथे ती दहीवाली बाई आता पोचली होती अन तिच्यापर्यंत ताराचा आवाज पोचणे अशक्य होते.

उरली सुरली आशा मावळल्यावर तिने क्षणभर थांबून मागे पाहिले तर...

तिच्यापेक्षा भयानक आवेगात महिपत धावत येत होता.. अजून सात, आठ क्षणात तो पोचलाही असता.. ..

आपल्या दिशेने धावत येणारा मृत्यू पाहून तारा पुन्हा गळाठली. मटकन खाली बसली. आपण पळालो असतो, थांबलो नसतो, तर कदाचित पुढे गेलो असतो अन वाचलो असतो हेही तिला समजू शकत नव्हते इतकी ती घाबरली होती.

आणि काही कळायच्या आतच महिपत तिथे पोचला. त्याने खाली बसलेल्या ताराच्या पोटात खच्चून लाथ मारली. ओरडूही शकली नाही ती! जवळच पडलेला एक मोठा दगड महिपतने हातात उचलला. खाली पडून कळवळत असलेली तारा सतत हलत असल्यामुळे तिच्या डोक्याचा नेम त्याला नीट धरता येत नव्हता. तरी एकदा त्याने तो जोरात तिच्या डोक्याच्या दिशेने आपटला. पण नेम चुकला. नेमकी तारा हलली. दगड तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला अगदी जवळच पडला.

या गेलेल्या क्षणीच आपला अंत झाला असता हे ताराला त्याही परिस्थितीत समजले. हा दगड आपल्या डोक्यात मारण्यासाठी फेकला गेलेला होता याची तिला जाणीव झाली. तेवढ्यात त्या दगडावर तिला दोन हात दिसले. ते महिपतचे आहेत हे कळताच ती ताडकन उठून बसली. महिपतने दगड उचलेपर्यंत ती उभीही राहिलेली होती. पोटातील वेदनेचा विसरच पडावा अशी ती परिस्थिती होती. महिपतने पुन्हा दगड उचलून आपल्या डोक्याच्या नेम धरलेला आहे हे समजताच ती हेलपाटून बाजूला झाली. नेम पुन्हा चुकला. आता महिपतने शिव्या द्यायला सुरुवात केली. आपल्याला गर्भ राहिल्याचे त्याला माहीत होते हे पाहून ती अवाकच झाली. पण मगाचपेक्षा आत्ता ती अधिक सावध होती. महिपतने पुन्हा दगड उचलायच्या वेळेला ती पुन्हा उलट्या दिशेला धावत सुटली. आता दगड उचलण्याचे कारणच उरले नव्हते महिपतला! आता तोही धावू लागला.

पण हे धावणे चित्ता व हरणाचे धावणे होते. शिकार करणार्‍याचे 'एक भक्ष्य सुटणे' या व्यतिरिक्त काहीच नुकसान नसणे व ज्याची शिकार होणार आहे त्याचा जीव जाणार असणे अशी ती अवस्था होती! त्यामुळे महिपतचे धावणे हे अधिक सावध, लक्षपुर्वक आणि योग्य दिशेने जाणारे होते. त्या उलट ताराचे धावणे हे दिशाहीन, ठेचकाळणारे, जीव वाचवायची धडपड असलेले अन त्यामुळे कमी वेगाचे धावणे होते.

याचा व्हायचा तोच परिणाम झाला. काहीच क्षणात पुन्हा महिपत एका हाताच्या अंतरावर पोचला तिच्यापासून! आणि यावेळेस हे तिला माहीतच नव्हते. ती वाट्टेल तशी धावत सुटलेली होती. मात्र अचानक खांद्यावर पडलेल्या मजबूत हाताच्या धक्यामुळे ती पुन्हा हेलपाटली अन खाली पडली.

महिपतने आता लाथा बुक्यांचा वर्षाव सुरू केला. कितीही मोठा गुन्हा असला तरी महिपतची ही वागणून अमानवी होती. तडफडत त्याचा मार सहन करणार्‍या ताराच्या मनात त्या क्षणी विचार आला. मदत करायला एक माणूसही नाही. ज करायचे ते आपणच! हा फार ऐनवेळी सुचलेला विचार तिला पुन्हा शक्ती देऊन गेला. तिने त्याही परिस्थितीत मार खाता खाताच जवळ पडलेला एक मुठीएवढा दगड घेऊन तोंडावर झुकलेल्या महिपतच्या डोक्यात मागून मारला. ताराकडून हल्ला होईल याची अजिबात कल्पना नसलेला महिपत त्या दगडाच्या माराने अक्षरशः कळवळला.

'आपण वाचू शकतो'!

हा एकच विचार त्या क्षणी ताराच्या मनात आला. व्यवस्थित प्रतिकार केला तर हा माणूस आपल्याला काहीही करू शकत नाही हे तिला जाणवले. पण एक तर तो अंगावर बसलेला होता. त्याचे वजन बाजूला झिडकारून उठणे हे तिच्या ताकदीबाहेरचे होते. त्यातच तिला जबर मार बसलेला होता. म्हणून तिने आणखीन सलग तीन वेळा तोच दगड नेमका तिथेच बसेल अशा अंदाजाने त्याच्या डोक्यात मारला. तो मारताना तिची स्वतःचीच बोटे ठेचली जात होती. पण आता तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिसर्‍या दगडाला मात्र महिपत बाजूला कलंडला अन तारा उठू लागली. पण त्या आधी त्याने दिलेला मार इतका भीषण होता की तिच्या सर्वांगातून कळा आल्या. तिला उठताही येईना!

आता ती खुरडत खुरडत त्याच्यापासून दूर होऊ लागली. ओरडून मदत मागण्यासाठी आवाजही फुटत नव्हता अन ओरडण्याचा फायदाही नव्हता. कुणी नव्हतेच आसपास! उलट ओरडून उरलीसुरली ताकद मात्र संपली असती.

भळभळणार्‍या डोक्याचा विचार क्षणभर बाजूला सारून आपल्याकडे पाहणारा महिपत अत्यंत भीषण वाटला ताराला! चेहर्‍यावर रक्ताचे ओघळ, डोळ्यांत खून!

अजून उजेड होता. पूर्ण अंधार व्हायला किमान तास तरी लागणार होता. इतक्यात हिला संपवले तर सोपे आहे हे महिपतला माहीत होते. कारण नंतर ती दिसलीच नाही तर काय करणार? त्यात आपण जखमी! आता हिला संपवल्याशिवाय आपण परत जाणे हा मूर्खपणा होईल.

पेटून उठलेल्या महिपतने खुरडणार्‍या ताराचे दोन्ही पाय हातात धरले. आता तिला मारत बसण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता. तो तिला ओढत ओढत मगाचच्या दरीच्या वाटेला लागला. तारा पाय झाडून झाडून सुटण्याचा प्रयत्न करत होती. हातात येईल तो दगट, काटकी फेकून महिपतच्या दिशेला उडवत होती. काही त्याला लागत होते तर काही नाही. पण महिपतला आता शुद्धच उरलेली नव्हती.

कित्ती तरी वेळ! किती तरी वेळ तशीच फरफटत गेली तारा! मगाशी जेवढे अंतर धावून कव्हर झालेले होते ते आता फरफटून कव्हर होत होते. ढोर वाट लागली तसे मात्र तिला सहन होईना! एक तर आधीच जखमी शरीर, त्यात वाट्टेल तसे फरफटले जाणे! पण असहाय्यता हा एकमेव साथीदार होता तिचा!

महिपतने वेग वाढवला. कारण आत्ता ते अशा स्पॉटला होते जिथून मगाशी ताराने त्या दहीवाल्या बाईला पहिली हाक मारली होती. लांबून कुणालाही दिसतील अशा स्पॉटला ते होते. क्षणभर थबकून महिपतने चहूकडे पाहिले. कुठेतरी लांबवर पुन्हा गुलाबी रंगाचे काहीतरी दिसले. चला! ती दहीवाली नकुशाताई बरीच लांब पोचली म्हणायची! महिपत निश्चींत झाला. आता त्याने ताराकडे पाहिले. ती अजून सुटण्याची धडपड करत होती. तिच्याकडे पाहात थुंकून महिपतने एक शिवी उच्चारली अन 'तुला आता खलासच करतो' म्हणत तो पुन्हा तिला ओढू लागला. तोही खरे तर थकलेला होता. जखमी होता. पण डोक्यात खून चढलेला होता.

गार वारे आता जखमांची नव्याने आठवण करून देत होते. सर्वत्र भीषण शांतता अन सन्नाटा होता.

तारा आता बेशुद्ध व्हायच्या मार्गावर होती. आपल्याला खूप लागलंय आणि आता आपण मरणार आहोत ही दोन्ही वास्तवे जसजसा तिचा मेंदू स्वीकारू लागला होता, तिची शुद्ध हळूहळू हरपत चालली होती. दृष्य अस्पष्ट होऊ लागले होते. डोळ्यांना आता फक्त 'आपल्याला ओढणारा महिपत' आणि लांबवर कुठेतरी बालेकिल्याचा भीषण तट दिसत होता. त्यातही ती स्वतःला बजावत होती. जागी राहा! मरू नकोस! हा तुला मारणार आहे. तूच प्रतिकार करायला हवास!

पण आता ते शक्य नव्हते. ताकदीबाहेरचे काम होते आता ते! त्यातच ती कशाततरी अडकल्यामुळे झतका बसलेल्या महिपतला तिला ओढायला जोर लागल्यामुळे तो आनखीनच वैतागला. रक्ताळलेल्या चेहर्‍याने त्याने तिच्याकडे पाहात तिला आणखीन तुडवले. यावेळेस मात्र कशी कुणास ठाऊक पण ती बेंबीच्या देठापासून ओरडली. नेमके तिच्या त्या ओरडण्याचे लांबून, बालेकिल्याकडून एको आले तसा मात्र महिपत नखशिखांत हादरला. हिला पुन्हा ओरडू देणे ही मोठी चूक ठरेल हे कळल्यावर त्याने आधी तिच्याच पदराचा बोळा तिच्या तोंडात कोंबायचा प्रयत्न सुरू केला. पण त्यात फारच वेळ जात आहे हे पाहिल्यावर तो परत तिला ओढू लागला.

दरी!

खाली खोल खोल पाहिले की गुंजवण्यातल्या साताठ खोपटांमधल्या चुलींचे धूर निघताना दिसत होते. पण तिकडे पाहताना आपल्यालाच भोवळ येईल की काय असे वाटावे इतकी ती खोल दरी! फक्त एक कठडा! खाली फरफटत असलेल्या ताराला हेही माहीत नाही की महिपत मधेच का थांबलेला असावा. आधीच भोवळ आल्यासारखी तिची अवस्था, त्यात वेदना! आणि त्यातच.. महिपतची वळलेली नजर अन त्याने उच्चारलेले शब्द मात्र तिला ऐकू आले.. जे ऐकून तिला समजले... आपला मृत्यू आलेला आहे...

'आता मुकाट या दरीतून खाली जा... अन नरकात काढ धंदा... ******'

महान शौर्य गाजवल्यासारखे भाव होते महिपतच्या चेहर्‍यावर! त्याला त्या दरीतून तारा खाली जाणार हे पाहून स्वतःलाच धडकी भरली होती. कारण ती दरी इतकी काळ्याकभिन्न कड्यांची अन इतकी खोल होती की तिथून नुसते खाली पाहणे हेच घाबरवणारे होते.

पण आता खरा प्रॉब्लेम होता. तारासारख्या बाईला उभी करून कठड्यावरून ढकलणे हे काही इतके सोपे काम नव्हते. त्यात ती प्रतिकार करणारच! त्यात आपल्या डोक्यातून तर इतकं रक्त वाहातंय की आपल्यालाच शक्तीपात झाल्यासारखं वाटतंय!

तरीही महिपतने प्रयत्न सुरू केले. प्रथम ताराचे पाय कठड्यावर धरले. ते काही जमेना म्हणून त्याने तिला बसवली अन उचलायला लागला. ताराला जाणवले. ही शेवटची संधी! ती त्याच्या उजव्या हाताला कडकडून चावली. तो बोंबलून बाजूला झाला अन पुन्हा तिला मारू लागला. ताराला स्वतःला उठून उभे राहणे शक्य नव्हतेच! पण मृत्यूच्या भीतीने ती कशीबशी कठड्याला धरूनच उभी राहिली. हीच तिची चूक होती. आता तर तिला ढकलून देणे अगदीच सोपे जाणार होते महिपतला! महिपत सावधपणे पुढे सरकला तशी ती तितक्याच सावधपणे अन फाटलेल्या चेहर्‍याने बाजूला सरकली. हिला उभीच ठेवणे आपल्या फायद्याचे आहे हे समजण्याइतका महिपत हुषार होता. त्याने वेदना होत असल्याचे नाटक केले, ज्यामुळे ती आणखीन मारायला जवळ येईल अन मग तिला धरता येईल असे त्याला वाटले. पण त्याचे ते ओरडणे पाहून तारा उलट चार पावले मागेच सरकली. आता मात्र महिपत चवताळला. त्याने सरळ तिच्यावर झेप घेतली अन तिला घट्ट धरून ढकलत ढकलत त्याने कठड्यापाशी आणले.

उरलेली सर्व ताकद 'कठड्यापासून लांब जाणे' व 'ओरडणे' या दोनपैकी एकाच गोष्टीसाठी तारा वापरू शकत होती. ती एकदा खच्चून ओरडली अन मग ती कठड्याला पाय टेकवून मागे मागे व्हायचा प्रयत्न करू लागली.

मात्र आता अंत जवळ आलेला होता. ताराचे दैव फिरलेले होते. या सुंदर जगाचा आता निरोप घ्यायचा होता.

तो क्षण! त्या क्षणात तिला काय वाटले त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. पण तो क्षण तिला जाणवला. काहीतरी चुकीची हालचाल झाल्यामुळे ती कलली होती अन परिस्थिती अशी आलेली होती की तिचा कंबरेपर्यंतचा भाग कठड्यावरून दरीत तरंगत होता तर जमीनीवर घट्ट रोवलेल्या दोन्ही पायांवर महिपतची पकड हळूहळू घट्ट होऊ लागली होती. वर आभाळ, खालून दरीतून येणारा व दरीची खोली जाणवून देणारा भयाण वारा आणि पायांची जमीनीवरली सैल होत असलेली पकड या परिस्थितीत अत्यंत असहाय्य झालेल्या ताराने स्वतःच्या जीविताच्या सर्व आशा सोडायच्या आधी एक शेवटची आशा ठेवली. ती म्हणजे आपला उजवा पाय महिपतच्या एका पायातच अडकवला. आता तो सोडवून घेण्याच्या प्रयत्नात महिपतला दोन्ही हात वापरावे लागणार होते अन त्या अवधीत अर्धा, दरीवर तरंगणारा देह पुन्हा आत घेणे ताराला जमू शकणार होते. हा तिढा महिपतच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या पायाने तिच्या पायावर आघात करायला सुरुवात केली. हे असह्य आघात सहन करताना....

एक विचित्र गोष्ट घडली...

.... ती म्हणजे अशी की... ताराचे दोन्ही हात आपल्या दोन्ही हातांनी पकडणारा अन एका पायावर उभा राहून दुसर्‍या पायाने तिच्या एका पायावर आघात करणारा महिपत... अचानक स्वतःच कलंडून ताराप्रमाणेच दरीवर तरंगू लागला...

आणि त्याचवेळेस...

ताराला समजले की आपण कोणताही प्रयत्न न करताही महिपत अचानक जमीनीवरून सुटलेला आहे... आणि.. क्षणार्धात ओरडत खाली खाली जात... अदृष्य होत आहे...

आणि... महिपतला समजले होते की... एवढे सगळे प्रयत्न करून शेवटी आपण त्यात फसलो ते आपली ताकद कमी पडली म्हणून नव्हे... तर...

... एका गुलाबी शर्ट घातलेल्या माणसाने सरळ आपल्याला उचलून खाली फेकून दिलेले आहे... व...

तो माणूस म्हणजे आपलाच किन्नर ....

.. अन्तू आहे...

गुलमोहर: 

बेफिकिर,
खुप छान, तुम्हि प्रसग उभे करतात, त्याला तोड नाहि. अगदि दोळ्यासमोर घड्ल.

pan pramanik pane sangato, Rajgad ha shab nako ch hota, kahup manje khup aadar aahe majhya manat hya sarwa gosti sathi(Raje, Swarajya, Gad, Kille, Swarajya che sewak, aau sahibanchi shikwan ani khup kahi, lihaya la jaga purnar nahi), please.. he majhe personal openion aahe. konta hi dongar ki tekadi chalali asti. Please dont take this otherwise.

बकि कथा खुप मन्जे खुप छान, अनि as usual शेवटचि ओळ ........

हिम्सकूल, मंदार, चिंगी, स्वप्नसुंदरी, परेश व राजेश्वर,

सर्वांचे मनःपुर्वक आभार!

परेश,

खरे तर राजगडाच्या इतिहासाचा अपमान होईल असे कथेत काही नाही. त्याहूनही खरे म्हणजे मला स्वतःला राजगड अत्यंत आदरणीय आहे.

पण आपल्या म्हणण्यानुसार नाव बदलत आहे. कृपया गैरसमज नसावा.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

पुर्ण झाल्यासारखी वाटत नाहिये...शेवटी पश्न उभा राहतो हे असं का? शेवट जर महिपतच खाली स्वता:च घसरुन पडला असता तर ठिक होतं पण अंतुने त्याला का ढ्कललं ? काही क्लिअर नाही होत बाकी लेखन शैली अप्रतिम

वैभव,

आपल्याला कथा संदिग्ध वाटली याबद्दल दिलगीर आहे. अधिक चांगले लिहिण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

नुसता शीर्षक बदलून काय व्हनार. आत तर समद्या ठिकाणी तेच नाव हाय ना.. असो त्याने काय भी फरक पडत नाय.. अपमान वगैरे अजाबात व्हत नाय... Happy

आपले राजे आन त्यांचा गड एकदम थोर.. इस्टोरी एकदम झ्याक!!! लयं आवडली बघा.. Happy

पक्का ला अनुमोदन. कशाला बदलायचं नाव? मग तर अशा प्रकारच्या गोष्टीत नुसत
"अ" किल्ला
"ब" शहर
"क" इमारत

अशी नावं ठेवावी लागतील.

हो, यात काय आहे अपमान होण्यासारखं.. नाव बदलायची काही गरज नव्हती.

आता तानाजी नावाचा माणूस चोर्‍या करायला लागला तर त्यात नरवीर तानाजींचा अपमान होईल असे म्हणण्यासारखे झाले हे. Uhoh
(हे फक्त उदाहरण म्हणुन लिहीले आहे, यात तानाजींच्या जागी राम, बुद्ध वा पैगंबर काहीही लिहीले तरी अर्थ तोच.)

bhaaree!

> apurn watli..
nahi watli.. sagalyach prashnancha khulasa hotoch asa nahi kadhee kadhee. mag wachanaryaala tark karayalahi maja yete. ha bonus point ahe (majhya mate)

हो अगदी. हा बोनस पॉईंट असणार्‍या कथा आणी चित्रपट माझे अतिशय आवडते Happy म्हणुन ही कथाही खुप आवडली.

असीमित, पक्का भटक्या, मंदार जोशी, चिंगी, पनू, स्वप्नसुंदरी, सावली, ऋयाम, मल्लीनाथ, रोहित,

सर्वांचे मनःपुर्वक आभार, प्रतिसादाबद्दल तसेच प्रोत्साहनाबद्दल !

ऋणी!

-'बेफिकीर'!

खुपच छान कथा..या आणि बाकीच्या तुमच्या कथांवरून तुम्हाला बऱ्याच ठिकाणच्या बोली भाषांची जाण आहे हे समजते...छान...लिखाण चालू ठेवा.

शेवटपर्यंत श्वास रोखून वाचली!!!!!!!!!!!खरंच भन्नाट जमलेय शेवट अगदी वेगळा वाटला
लिखाण चालू ठेवा.

Pages