राजकुमारांचे धाडस

Submitted by येडाकाखुळा on 28 April, 2008 - 01:50

"रानीसहेब येत आहेत हो!!!!!!!" द्वारपालाने राणीसाहेबांच्या आगमाची वर्दी दिली. महाराज नुकतेच जेवण करून सिंहासनावर अडवे झाले होते.
"आली तिच्यायला!" असे म्हणत ते सावरून बसले.
अवाढव्य आकाराच्या राणीसाहेब तरातरा महालात प्रवेश करत्या झाल्या. येताना मुजरा करून जाणार्‍या दासीकडे रागाने पहात महाराजांना बोलल्या "कोन ही टवळी?. नवीन हाये जनू? काय शेंटचा फवारा मारलाय? चटकचांदनी सारकी चालत गेली भवानी."
"आमी काय करनार? आमी निवड केली व्हय? हायकमांडणे धाडली" महाराज थोडेसे शरमून म्हणाले.
"काय लबाड बोलू नगासा! हायकमांडला कोन पयसे धाडतं, कोन लग्गा लावतं; समदं ठाव हाय आम्हास्नी! राणीसाहेब ठसक्यात म्हणाल्या. "पोराचं लगीन होयाचे दिवस आले, अन हेंचे रागरंग बगा!"
"राजकुमारांच्या लग्णाबद्दल बोलाया आलात नव्हं तुमी?" महाराजानी शिताफीने विषय बदलला.
"व्हय! त्येंचा काय करायचा ठरिवला तुमी?"
"परधाणजीना सांगिटलो. ते बगतो म्हनले व्हते!"
"मग काय बगिटलं त्येंनी का न्हायी? निसतेच दिवसभर फुक्या मारत फिरत्यात त्ये."
"इचार की त्यास्नी! कोन हाये रे तिकडे?" महाराजानी दोन टाळ्या वाजवल्या.
"व्हय म्हाराज" एक हुजऱ्या धावत आला.
"जा परधाण्जीना बोलीव!" महाराजी हुकूम सोडला.
"जी म्हाराज" एक फक्कड सलाम ठोकून तो परत पळाला.
प्रधानजी वाईच आराम करावा म्हणून एका खांबापलीकडे टेकले होते. तंबाखूची चंची सोडून त्यानी नुकतीच एक चिमूट दाताखाली धरली होती. महाराजांचे बोलावणे आल्यावर ते अंमळ वैतागले. "आयला ह्या म्हाराजाना काम न्हायी. फुकट प्रश्न इचारत असत्यात दिसभर." असे मनातल्यामनात म्हणत ते महालात आले.
"परधाण्जी! राजकुमाराच्या लग्णाबद्दल काय अपडेट हाये?" महाराजानी करड्या आवाजात प्रश्न विचारला.
"आमी चौकशी केली. शेधारच्या राज्याटली राजकण्या हाये लग्णाची. तिची पत्रिका राजगुरुना दावली व्हती. २९ गुन जुळत्यात म्हनाले त्ये. दिसायला बी एकदम झ्याक हाये."
"तुमी तिचा चेरा निर्खुण फायलेला दिसतो" राणीसाहेबानी कुत्सितपणे शंका काढली.
"फोटू बगिटलो. ते बी सौंण्दर्यसमीक्षाट्मक दृष्टीणे" प्राधानजीने नम्रपणे उत्तर दिले.
"अर्रतिच्यामारी! ही काय भालगड हाये?" महाराजांचा जबडा विस्फारला गेला.
"तुम्हाला काई न्हाई" राणीसाहेबानी महाराजाना फटकारले. "परधाण्जी. तुमी जावू शकता!"
प्रधानजी लवून मुजरा करून महालातून बाहेर पडले.
"उद्या बोलू राजाकुमारांशी" असे बोलून महाराजानी एक मोठी जांभई दिली. मग बाजूला ठेवलेल्या रिमोटने त्यानी टिव्ही चालू केला आणि "नच बलिये" हा नाचाचा कार्यक्रम बघण्यात ते दोघे मग्न झाले.

राजकुमार कहीवेळापूर्वी झोपेतून जागे झाले होते. चहापाणी झाल्यावर खुर्चीत बूड टेकून ते पेपर वाचत बसले होते. राजकुमार दिसायला राजबिंडे होते. त्यांचे लांब केस मानेवर रुळत होते. चेहेरा थोडासा उभट होता आणि पाणीदार डोळे त्यांच्या चेहेर्‍याचे सौंदर्य अजून खुलवत होते. प्रतापराव हे त्यांचे नाव पिळदार शरीर, रुंद छाती आणि उंच बांध्याला अगदी साजेसे होते. म्हाराज आनी म्हारानी येत अहेत. अशी वर्दी मिळाल्यावर त्यानी पेपर बाजूला ठेवला आणि आपल्या पालकांच्या प्रतीक्षेत ते सावरून बसले. महाराज आणि महाराणी आल्यावर प्रतापरावानी त्याना वाकून नमस्कार केला आणि जवळच्या आसनावर बसायची त्याना विनंती केली.
"काय राजे? कुठं व्हता कालच्याला? मी तुमच्या मोबाईलवर फोन केला व्हता. पन औट ओफ कवरेज व्हता तुमी!" महाराजानी चौकशी केली.
"मृगयेसाठी वनात गेलो होतो आम्ही!" राजे उद्गारले.
"आयला फुकट हरीन बिरीन मारलं न्हायी नवं? मागच्या टायमाला तुमी एक हरीन मारलं आनि फारेष्ट डिपारमेंटनं लई वारूळ केलं त्याचं. निस्तरता निस्तरता आमच्या नाकी नौ आलं." महाराजानी चिंताक्रांत मुद्रेने विचारले.
"नाही! केवळ एक उंदीर मारून परतलो." राजे खजील होऊन म्हणाले.
"मंग हरकत न्हायी." महाराजानी सुटकेचा नि:श्वास टाकला.
"अवो! बोलताय नव्हं" राणीसाहेबानी रागाने महारांना विचारले.
"काय मांसाहेब! काय मनसुबा घेऊन आलात इथे?" राजकुमारानी साशंक मुद्रेने विचारले.
"काय न्हाई इशेश! तुमच्या लग्णाबाबट बोलाया आलो व्हतो."
"आमचे लग्न? महाराज! आम्हाला एवढ्यात लग्नाच्या बेडीत नाही अडकायचे"
"हे असलं कसलं? ह्येच वय हाय लग्णाचं. अवो आमचं लगीण जालं, त्याटायमाला म्हाराज तुमच्यापेक्षा ल्हाण व्हते." महाराणी.
"ह्या! कायतरीच! म्या राजकुमारांपेक्षा ल्हाण कसा असेन? मोठा व्हतो. त्येंचा जणम बी जाल न्हवता त्या टायमाला" महाराज.
"तुम्हस्नी काय बी कळत नाई" असे म्हणून राणीसाहेबानी राजकुमाराना समजावायचा प्रयत्न केला. राजेसाहेबानी सुद्धा त्यांच्या बोलण्याला दुजोरा द्यायला सुरुवात केली. त्यातून राजकुमाराना अतीशय उद्बोधक महिती मिळाली. राजकुमारानी लग्न केलेच पाहिजे. ते त्यांचे एक महत्वाचे काम आहे. किंबहुना लग्न करणे हेच त्यांचे काम आहे. त्यामुळे टाईमपास होतो. पूर्वी राजेलोक अनेक लग्ने करीत. त्यांच्या बायका एकमेकात लई भांडत. आवडती आणि नावडती असे क्लासिफिकेशन असे. त्यामुळे आवडतीचा हेवा करण्यात नावडतीचा बराच वेळ जात असे. त्या एकमेकीच्या उखळ्या पाखाळ्या काढत. एकमेकिंच्या झिंज्या उपटत मारामारी करत. राजेसाहेबांची ह्यामुळे चांगली करमणूक होत असे. त्यांची भांडणे सोडवण्यात त्यांचा वेळही चांगला जात असे. त्यातूनही वेळ गेला नाहीच तर हे राजे एकमेकाच्या बायका किंवा पोरी पळवीत. राजकीय भेट द्यायला जावे आणि एकदी बायको हळूच पळवून आणावी. मग पहिला आणि दुसरा राजा ह्यांच्या लढाई चालू होई. सीमेवर चकमक नेहमी चाले. तेवढ्यात दुसरा राजा तिसर्‍या राजाची बायको पळवे. मग त्यांच्यात भांडण लागे. मग दुसरा राजा पहिल्या राजाशी तह वगैरे करे. ह्यामुळे राजा लोकाना राजनीतीचे शिक्षण मिळे. सीमेवर युद्ध चालू झाले म्हणजे सैनिक चपळ रहात. सुतार, लोहार लोकाना तलवारी, तोफा, ढाली, धनुष्य, बाण ई. बनवायचे काम मिळे. रसद पुरवणार्‍याना धंदा मिळे. सैन्यात भरती चालू होई. एकूण नोकर्‍या उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळे. टि. व्ही. वाहिन्या सुद्धा ह्या युद्धाचे थेट प्रक्षेपण करत. पळवण्यासाठी सगळ्यात योग्य बायको कोण आहे ह्यावर चर्चासत्रे आयोजीत करत. कोणी कोणाला पळवले वगैरे ब्रेकिंग न्यूज दाखवत. वर्तमान पत्रातही पेज थ्री वर ह्या पळवापळवीची खमंग चर्चा चाले. कोण राणी सध्या हॉट आहे ह्यावर गरम गरम अग्रलेख येत. एकूणच उत्साही वातावरण असे. पण द्वीभार्या प्रतिबंधक कायद्याने सगळा बट्याबोळ केला. आपल्या राजेसाहेबानी तर "दुसर्‍या बायकोला बंदी आहे ना? मग पहिल्या लग्ननंतर डायरेक्ट तिसरे लग्न केले तर चालेल काय?" असा प्रश्न सुद्धा विचारला होता. (बावळट आहेत महाराज! असो.) महाराणी अजून काही सुरस व चमत्कारीक माहिती देणार तेवढ्यात राजकुमारानी त्याना रोकले. "मां साहेब! आम्हाला विचार करायला थोडा समय हवा".
"तुमी लागंल तेवडा टायम घ्या. इचार करून मंग बोला! घाई न्हाई आपल्याला!" असे बोलून महाराज आणि महाराणी आंत:पुराकडे रवाना झाले.
राजकुमार चार बुके शिकलेले होते. त्याना सहित्यात जबरदस्त रस होता. त्यांच्या ह्या छंदामुळे ते थोडेसे स्वप्नाळू बनले होते. त्यांनी उराशी जपून ठेवलेले एक स्वप्न होते. त्याना नेहमी असे वाटे की आपण एक जबरदस्त धाडस करावे. कोण्यातरी दूरदेशची राजकन्या संकटात असावी. मग आपण अबलख घोड्यावर स्वार होऊन दौडत जावे. वीस पंचवीस दांडग्या दरोडेखोराना आपल्या तलवारीने पाणी पाजावे. मग त्या अबला नारीला दाणगटांच्या ताब्यातून सोडवून अलगद आपल्या घोड्यावर बसवावे. तिने कृतज्ञापूर्वक आपल्याकडे पहावे. नजरानजर होऊन अपले तिच्यावर आणि तिचे आपल्यावर प्रेम बसावे. मग तिला घोड्यावर स्वार करून आपण वार्‍याच्या वेगानी दौडत रहावे. अगदी क्षितिजापर्यंत. तिच्या सागरासारख्या गहिर्‍या डोळ्यात बघत बघत नदी, नाले, डोंगर, दर्‍या, पठारं ओलांडत दूर जात रहावे. हा प्रवास कधीही संपू नये. त्याला थांबण्याची इच्छा नव्हती. त्या प्रवासातच एक थरार होता. त्या प्रवासात वारा त्याचा स्पर्धक होता आणि तिचा धुंद रेशमी सहवास त्याचा मित्र होता. त्यानी फक्त दौडत रहावे. जगाच्या अंतापर्यंत किंबहुना त्याहूनही पुढे. जिथे कोणी कधीही गेले नव्हते.
पण त्याचे हे स्वप्न समजावून कोण घेणार? त्याचे अरसिक माता आणि पिता त्याला हे असले काही कधीही करू देणार नव्हते. त्याचे मन विषण्ण झाले.

दोन दिवसानी त्याला महालातून बोलावणे आले. अपेक्षेप्रमाणे प्रतापरावांच्या लग्नाचा विषय चालू होता.
"राजे! आम्ही पल्ल्याडच्या राजाचा पाहुणचार घेऊन आलो काल." महाराजानी सुरुवात केली.
"प्रवास कसा झाला? कही कष्ट तर झाले नाहीत ना आपणास?" प्रतापरावानी चौकशी केली.
"काई न्हाई! एकदम झ्याक दौरा झाला"
"व्हय! तिथल्या दाशींकडे कसे टकामका बगट व्हतात!" राणीसाहेब.
"हं हं हं!" राजेसाहेबानी गळा साफ करून घेतला. "तर मी काय म्हनत व्हतो! त्येंच्या राजकण्येची आमी भेट घेटली. फार चांगले स्थळ हाये!"
"पिताश्री! आम्हाला कुण्या शेंबड्या राजकन्येशी विवाह नाही करायचा."
"अरं, तिचं नाक येकदम सोच्छ व्हतं. आनी नंतर व्ह्यायलंच तर एक दाशी थेवू तिच्यासंगट. तिचं व्हातं नाक पुसाया. आपल्याला काय कमी हाय?"
"तो मुद्दा नाही पिताश्री!" राजे कळवळून बोलले.
"तुज्या वडिलांना पोच जरा कमीच हाय!" राणीसाहेबानी तोंड उघडले. "तुमाला दुसरी कोन पसंद हाये का? तसं सांगा की"
"नाही!" प्रतापरावानी लाजत मुरकत आपले धाडसाचे स्वप्न राजा आणि राणीला सांगितले.
राजेसाहेबाना दोन मिनीट काय बोलावे हेच कळेना. "असले कसले स्वप्न म्हंतो मी? अन एकाच घोड्यावरून डब्बलशीट का जावं? दोन घोडं घीवून जा की. कोन नाय म्हनलं तुम्हास्नी?" राजेसाहेब बराच वेळ विचार करून बोलले. त्यांच्या डोळ्यासमोर आपण आणि महाराणी एका घोड्यावर डबलसीट बसलो आहे आणि ते घोडे पक्ककन खाली बसले आहे असे चित्र आले आणि त्याला एकदम हसू फुटले.
राजेसाहेबांच्या ह्या उद्गारानी प्रतापराव एकदम हतोत्साहीत झाले. "आम्हाला वाटलेच होते आपण माझ्या स्वप्नाची अशी खिल्ली उडवणार ते! माझ्या हळुवार कोमल भावना तुम्हाला कशा समजणार?"
"अरं! राजघरानं आपलं! आपन असलं काय बी करत न्हाई. असलं धाडस बिडस कराया मानसं हायेत आपल्याकडं." राणीसाहेबानी प्रतापरावांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. "चार मानसं धाडु अन त्या राजकण्येला सोडवून आनू." आपली आई तरी आपले विचार समजून घेईल असे प्रतापरावाला वाटले होते. तिनेही असे उद्गार काढल्यावर मात्र प्रतापराव एकदम उद्विग्न झाला. असेच इथे राहिलो तर आपले काही खरे नाही. विचारानी सैरभैर होऊन त्याने घोड्यावर मांड ठोकली आणि दूर अरण्याच्या दिशेने कूच केली.

बराच वेळ दौडता दौडता तो खूप दूरवर निघुन आला. अरण्य दाट होऊ लागले होते. राज्याची सीमा जवळ येत चालली होती. आता परतायला हवे. राजा आणि राणी त्याची काळजी करत असतील. अंधारही होऊ लागला आहे. घोडे परत वळवणार एवढ्यात त्याला दूरवरून एक स्त्रीच्या ओरडण्याचा आणि घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू आला. हा काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी त्याने घोडे त्या बाजूला भरधाव सोडले.
दूरवर दिसणार्‍या अकृत्या आता स्पष्ट होऊ लागल्या. एक काळीसावळी तरुणी पाच काळ्याकभिन्न माणसांच्या वेढ्यात अडकली होती. ती मदतीसाठी ओरडत होती पुन्हा पुन्हा त्या राक्षसानी सोडून द्यावे म्हणून विनवत होती. त्या निर्दयी हैवानांवर तिच्या विनंतीचा काही परिणाम होत नव्हता. उलट तिच्या त्या तशा अवस्थेची त्याना मजा वाटत असावी. ते तिची छेड काढत आणि ती किंचाळली म्हणजे मोठ्मोठ्याने हसत. प्रतापरावाला तिची दया आली. आपल्याला मर्दुमकी दाखवण्याची हीच संधी आहे हे त्याने ओळखले. क्षणाचाही विलंब न लावता त्याने तलवार उपसली आणि "अबला नारील छेडता. तुम्हा नराधमाना लाज कशी वाटत नाही" अशी आरोळी ठोकली. "तू काळजी करू नकोस सुंदरी. मी आलो आहे तुझे रक्षण करण्याकरता"
"कोन हैस रं तू? हितं कशाला कडमडलास? गप आपल्या वाटेनं जा" एक सैतान त्याला उद्देशून म्हणाला.
"मी ह्या देशाचा राजकुमार प्रताप" त्याने छाती ताणून उत्तर दिले.
"खोटं बोलतोस व्हय रं. ह्या देशाला राजकुमार न्हायी. राजकण्या हाये. जा पळ आपल्या वाटेनं. फुकट मरशील"
"मी परत फिरण्यातला नाही. तुमचा नायनाट करायला जणू विधात्यानेच मला इथे पाठवले आहे."
"च्या बायली! कोंची भाषा ही? आपल्या राज्यातला नक्कीच नव्हं. हाणा कोंबडीच्याला! हाड नी हाड मोकळं करा"
मग काय विचारता. त्यांमध्ये तुंबळ युद्ध जुंपले. ते पाच लोक मात्र चांगलेच हट्टेकट्टे होते. थोड्याच वेळात ते राजकुमाराला भारी पडू लागले. त्यापैकी एकाने प्रतापला एका गुच्चीत घोड्यावरून खाली पाडले. दुसर्‍याने त्याच्या छाताडावर जोरदार बुक्का मारला. तिसर्‍याने त्याला उचलून उशीच केले आणि धबेलकरून खाली आपटले. प्रतापची हाडे खिळखीळी झाली. तशाही अवस्थेत त्याने उठून बसण्याचा पयत्न केला. पण चवथ्याने त्याला पाठीवर दांडक्याचा जबरदस्त प्रसाद दिला. प्रताप एकदम पालथा पडला. पाचव्याने राजकुमारांच्या ढुंगणावर जबरदस्त रट्टा हाणला. प्रतापराव गुरासारखे ओरडले. "सोडा हो! सोडा मला. परत तुमच्या वाटे जाणार नाही मी." "आता न्हायी तुला सोडत भ**. अंगात लई माज तुज्या." झक मारली नी हे साहस करण्याचे भूत आपल्या डोक्यावर सवार झाले. आता काही खैर नाही आपली. प्रतापरावानी आता जगण्याची आशा सोडून दिली होती एवढ्यात एक चमत्कार घडला. एक घोडेस्वार वार्‍याच्या वेगाने दौडत आला. त्याने विजेच्या वेगाने तलवार चालवीत पहिल्या हैवानाचा शिरच्छेद केला. दुसर्‍याच्या छाताडातून तलवार आरपार घुसवली. तो प्रकार पाहून बाकीचे तिघे धूम पळत सुटले. काही क्षणातच ते अरण्यात दिसेनासे झाले. त्या घोडेस्वाराने प्रतापरावाला कसेबसे घोड्यावर उचलून घेतले आणि आपले शिरस्त्राण काढले. अजून एक चमत्कार झाला. त्यातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली. तिने प्रतापच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि घोडा चौखूर उधळला. वार्‍यावर स्वार होऊन ते दोघे अनोळखी वाटेवर दौडू लागले.
"कोण आपण?" प्रतापरावांच्या तोंडातून शब्द सांडले.
"मी ह्या राज्याची राजकन्या! माझी खूप इच्छा होती की मी साहस करुन एका सुंदर पुरुषाला गुंडांच्या तावडीतून सोडवावे आणि त्याच्याशी लग्न करावे. पण आई आणि बाबा माझे लग्न प्रतापराव नावाच्या एका बावळट राजकुमाराशी करून द्यायला निघाले होते. मी वैतागले आणि घाराबाहेर पडले. घरी परतणारच इतक्यात तुमच्या ओरडण्याचा आवाज कानी आला. मग मी ओळखले हीच शेवटची संधी आहे." ती भराभर बोलत होती. प्रतापरावाच्या तोंडातून शब्द फुटेना. "तुम्हाला फार लागले तर नाही ना?" तिने प्रेमभराने विचारले. "नाही!" प्रतापरावाची वाचाच बसली होती. मग तिनेच थोडेसे लाजत विचारले "नवीन दिसता ह्या राज्यात. नाव काय आपले?"

गुलमोहर: 

मस्त रे!!
छान जमल आहे.

Lol फर्मास...

*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***

तूफान! Rofl
द्विभार्या प्रतिबंधक कायद्याच्या आधीच्या परिस्थितीचे वर्णन एकदम खास!! Lol

तुझी लिहिण्याची शैली मस्त आहे. लिहीत रहा असाच. आणि हैबतराव मालिका लिहायला घे.

sahi hai Happy

धमाल रे भाऊ Happy
लई फरमास Happy

Lol Lol Lol

सही लिहिलय,
असेच लिहित रहा आणि माय्बोलिकरांचे आयुष्य वाढवत रहा.

मस्तच लिहलय..... !!!!

Rofl Rofl
भन्नाट लिहिलं आहेस!!

मस्त लिहिलं आहेस सग्ळच. छान.

:):):):)
कसलं लिहिलय! भन्नाट.
येडे का खुळे जे काय असाल ते... आमाला येड लावणार तुमी हे मातर नक्की Happy
लिवा हो लिवा... झ्याक लिवताय.... वाचून आमाला खूळ लागलं तरी बेहत्तर Happy

जबरी रे... आता प्रतापराव मालिका लिहिली तरी हरकत नाही! Happy

सही रे.. Happy
किंबहुना लग्न करणे हेच त्यांचे काम आहे. त्यामुळे टाईमपास होतो. >>>> Happy

हा परिच्छेद वाचून मिरासदारांची आठवण आली.

मस्त फार्स. एकदम सही लिहितोस.

>>>त्यातून राजकुमाराना अतीशय उद्बोधक महिती मिळाली.

अगदी द मा स्टाईल रे...
त्यांच्या प्रत्येक गोष्टीत असा एक परिच्छेद असतोच. तो फार हसवतो.
तू पण सही कथा लिहिली आहेस. आवडली.
ते प्रतापरावाला मारण्याचा प्रसंग दमांच्या चोराला बुकलून काढल्याच्या एका कथेची आठवण करून देतो.

एकदम फर्मास.....

बावळत प्रताप ...हा हा हा ......

नच बलिये ............हा हा हा....... आमची मम्मी पण बघत असायची...... :-))

----यतेन्द्र

Pages