सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं :२: धना...

Submitted by ह.बा. on 17 August, 2010 - 01:54

जगण्याच्या अविश्रांत प्रवाहाला जगण्याचे अगणित प्रवाह भेटतात.... काही अंतर आपल्यासोबत वाहत राहतात आणि एखाद्या वळणावर आपल्याही नकळत आपल्याला एकटं सोडून निघून जातात. जातात ना? भेटलेल्या प्रत्येकाचं स्मरण भुत होऊन आपल्याशी खेळत राहतं... कधी गालावर टपोरी खळी पाडतं तर कधी काळजावरच्या खपल्या काढून खदखदून हसू लागतं. पण त्या वेदनाही आपल्याला नाकारता येत नाहीत. आपण त्या नाकारत नाही... की आपल्याला त्या नाकाराव्याश्या वाटतच नाहीत?.... कधी कधी लिहीताना आनंदाच्या उकळ्या फुटतात... कधी समाधानाची परिसीमा होते.... तर कधी शब्दा शब्दाला ओलावलेल्या पापण्या आड लपणार्‍या शब्दांना जड अंतकरणानं शोधत रहावं लागतं.... या कथेत कल्पनेच्या भरार्‍या नाहीत दिसणार पण माझ्या मनातल्या त्याच्या अस्ताव्यस्त आठवणींचा हा ओबडधोबड हार त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय मला चैन पडणार नाही....

डॉ. दिपा देशपांडेंचा सांगावा आला
"हणमंत शिंदे कोण आहे? प्राचार्य म्याडमनी बोलावलय"
काल शिक्षक दिनाच्या भाषणात शिक्षकांच्याच वर्तनावर नको इतकी परखड मते मांडली होती आज खरडपट्टी होणार हे नक्की होतं.
"म्याडम आत येऊ"
"ये हणमंता ये..... काल अचानक मोठं उड्डाण घेतलसं बाबा?"
"जे वाटलं ते बोल्लो म्याडम"
"म्हणूनच मला आवडलं... हे वाच"
त्यांचं असं बोलणं मला अनपेक्षीत होतं. त्यानी हातात दिलेला कागद वाचला शिराळ्याजवळच्या चिखलीच्या कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेचं पत्रक होतं. विषय वाचले... राजकारण.... शिक्षण.... आणि शेवटचा बहिणाबाईंच्या ओळी होत्या... अरे माणसा माणसा कधी होशीलं माणूसं....
"कोणता विषय बोलशील?"
"म्याडम शेवटचा... कधी होशील माणूस..."
"जा तयारीला लाग... स्क्रिप्ट तयार झाली की मला येऊन ऐकवं"
चार दिवसांचा वेळ होता. मी हायस्कूलपासून वक्तृत्व स्पर्धा करत असल्याने स्क्रिप्ट तयार करायला वेळ लागला नाही. तयारी झाली... स्पर्धेला जाण्याचा दिवस आला. म्याडमनी पर्समधून शंभराची नोट काढून हातावर ठेवली. बहुतांश प्राध्यापक कॉलेजचा खर्च वाढवू नका या मताचे होते. त्यामुळे सुरूवातीला देशपांडे म्याडम स्वतःच पैसे द्यायच्या.

स्पर्धा सुरू झाली. एकापेक्षा एक पट्टीचे बोलणारे विध्यार्थी होते. आजवर छोट्या मोठ्या स्पर्धा केलेल्या आज खर्‍या स्पर्धेची जाणीव झाली. पण, पाण्यात पडल्यावर बुडण्याचा विचार करायचाच नसतो हे मला खूप आधी शिकावं लागलं असल्यानं भिती वाटली नाही. माझ्या तयारीने मी बोललो. निकाल लागला संताजी पाटील बरोबर विभागून पहिला बसलो. त्यादिवशी स्पर्धेतल्या मातब्बरांशी ओळख झाली. हक्काच्या बक्षीसात हा नवा वाटेकरी कोण म्हणून सगळ्या हुकमी वक्त्यांनी माझी ओळख करून घेतली.. कौतुक केलं.

बक्षीस समारंभानंतर माझ्या हातात हजार रुपयांचं पाकिट होतं... आज्जीला कामाला जायला जमत नाही...घरचा खर्च? कॉलेजची फी? शिक्षणाची नाटकं बंद करा म्हणणारा चुलत मामा...? सगळ्या प्रश्नांची ऊत्तरं त्या पाकिटात हो्ती. या नंतर वक्तृत्व, वाद विवाद, काव्यवाचन या स्पर्धांचं व्यसन माझ्या तना मनात खोल खोल रुजत गेलं... स्पर्धांचा सिझन सुरू झाला की तोडवाले जसे उसाच्या हंगामाला गबाळ घेऊन बाहेर पडतात तसे आम्ही कपडे आणि लिहीलेल्या स्क्रिप्ट्स घेऊन बाहेर पडायचो. दर वर्षी आम्हालाच बक्षीसं देऊन कंटाळलेले संयोजक आणि आमच्यामुळे ज्यांना नेहमी उत्तेजनार्थ बक्षीसावर समाधान मानावं लागलं असे स्पर्धक आम्हाला पैशाळू वक्ते किंवा प्रोफेशनल स्पर्धक म्हणायचे. पण कॉलेजच्या फी पासून ते मेस, रूम भाडं हे सगळच स्पर्धांवर अवलंबून असल्यामुळ माझ्यासारख्याला तरी 'अरे जिंकता येत नाही तर स्पर्धा कशाला करता?' या वाक्याचा आधार घेत स्पर्धा करत राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

महाराष्ट्रातल्या बहुतांश स्पर्धा केल्या. जिंकल्या. अशाच एका स्पर्धेला धना भेटला... धनंजय मोहनराव पाटील, कोल्हापूरच्या लॉ कॉलेजचा विध्यार्थी. सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचा राहणारा... सहा फूट उंच, डोक्यावरचे केस तुरळक झालेले, जाड भुवया, स्वतःच्या ज्ञानावरचा आणि वाणीवरचा विश्वास स्पष्टपणे समोरच्याला जाणवून देणारे डोळे, निमगोरा रंग, देहानं धिप्पाड, थोडसं पोट सुटलेलं... अस्सल सांगलीकर वाटणारा धना.

प्रत्येक स्पर्धेला जिंकणारा ग्रूप ठरलेला असायचा... धना त्यापैकी एक असायचा. लातूर, उस्मानाबाद, नळेगाव, पंढरपूर, इ. दूरच्या स्पर्धा असल्या की आम्ही सगळे एकत्र निघायचो. स्ट्यांडवर झोपायला लागायचं. कुणाकडं पैसे नसायचे अशा वेळी एकमेकाची काळजी घ्यायचो. त्यामुळं आम्ही वेगवेगळ्या कॉलेजचे असलो तरी आमच्यात एक निकोप नातं तयार झालेलं. सगळेजण एकमेकाच्या घरी जायचो. सुट्टीला हक्काच्या पाहुण्यांसारखे आणि घरच्या कार्यक्रमांना घरच्या माणसांसारखे हजर असायचो. प्रेम होतं त्यामुळं मतभेदही होतेच. धन्याला काही वाईट खोडी होत्या. स्पर्धेला येताना कधीही स्वतःची पेस्ट आणायची नाही. दुसर्‍यांना मागून घ्यायची नाहितर हिसकाऊन घ्यायची. रात्री एखादा सुखाने झोपला असला आणि धन्याला अंगावर घ्यायला काही नसलं की शेजापाजर्‍यांना तो ऊघडं पाडायचा... आणि वर एखादा गयावया करू लागला की आसुरी आनंडानं खदखदून हसायचा. डोक्याला लावायचं तेल, कंगवा अशा गोष्टी तर त्याच्यासमोर दाखवायची सोय नसायची. आणि यावर कडी म्हणजे नाष्टा पाणी. त्याने उभ्या आयुष्यात मला चहाचा कपही दिला नाही. त्याच्यासोबत जायचं म्हणजे आपल्या खिशाला चाट लागणार हे ठरलेलं.
धन्या आणि माझ्यात कडाक्याचं भांडण कधीच नाही झालं पण तक्रारी नेहमीच चालायच्या....

"हाणम्या तू विषय बदल"
"का?"
"एकाच विषयावर दोघं बोललो तर दोघांना नंबर मिळायचा नाय."
"त्याचा काय संबंध? तू तुझी स्क्रीप्ट बोल मी माझी बोलतो"
"तुला सांगायच मजी ल्यका सांगणारा मुर्ख"
"बरोबर..... चल आता स्क्रीप्ट ऐकव"

सांगलीच एसटी स्ट्यांड, रात्रीचे दीड वाजलेले आणि आम्ही दोघं 'संस्कृतीचा कापून गळा, केबल वाहिन्यांचा फुललाय मळा' या विषयाच्या स्क्रिप्ट्स मोठमोठ्यानं म्हणत होतो. मी आणि धना. भाषणाच्या सुरूवातीला त्याला चांगलं उदाहरण मिळत नव्हतं आणि मी तो विषय बर्‍याच वेळा बोललो असल्यानं मला तयारीची काळजी नव्हती.

"नमस्कार सन्मानणिय व्यासपीठ... रसिक श्रोते, वक्ते आणि ज्ञातेहो... मी धनंजय मोहनराव पाटील... विधी महाविद्यालय कोल्हापूरचा विध्यार्थी आपल्यासमोर विषय मंडतोय....."
एवढं म्हणेपर्यंत बाकड्यावर झोपलेल्या एका म्हातार्‍याने उत्स्फुर्त दाद दिली...
"कामातनं गेलय का काय रांगडं भर जवानीत..."
धन्याची लिंक तुटली. एकतर तयारी होत नव्हती आणि त्यात झोपलेल्या माणसांची कुरकूर. याबाबतीत पंढरपूरचं स्ट्यांड सगळ्यात भारी आहे. कोणत्याही विषयाची कितीही मोठ्यानं तयारी करा "वा वा चालुद्या म्हाराज... भारी बोलताय..." अशीच प्रतिक्रीया येणार. कारण झोपलेले सगळे वारकरीच त्यामुळं जो बोलेल तो बुवा हे ठरलेलच होतं.

विषयाच्या सुरूवातीला धन्याला एक भन्नाट उदाहरण मिळालं आणि धन्या निश्चिंत झाला. दुसर्‍या दिवशीची स्पर्धा झाली.... धन्या रात्रभर भाषण घोकून तिसरा बसला मी दुसरा. माझं गाव हायवेपासून आत असल्यानं रात्री चालतं जावं लागायचं त्यामुळं मी धन्याच्या घरीच थांबलो. गडी सधन कुटूंबातला होता. वडीलांनी बरच कमवून ठेवलं होतं.

रात्री धन्याच्या घरच्या मऊ गादीवर मला लवकर झोप आली नाही. पण वेळेला केळे.... म्हणतात त्याप्रमाने लोळत राहिलो. लोळता लोळता गादीवरून खाली गेलो... पटकन झोप लागली. सकाळी साडेआठला जाग आली तर उशाला एक कुट्ट काळ्या रंगाचं पोरगं येऊन बसलेलं.
"काय भैय्या सा वाजल्यापासनं बसलुया हितं"
मी आजुबाजूला बघितलं धन्या दिसत नव्हता.
"कोण तू?"
"सत्ताप्पा मोरे.... धनु भैय्याचा शिष्य हाय... मीबी स्पर्धा करणार हाय"
त्याचा अवतार बघून 'खास ह्याच्यासाठी संयोजकांना विनोदी विषय ठेवावे लागणार' असा विचार मनात आला आणि मी स्वतःशीच हसलो.
"वा वा धन्याचा शिष्या मजी तू मोठ्ठा माणूस होणार"
"काय भैय्या चेष्टा करताय का?... बर चला उटा लवकर आंगुळ करून घ्या माज्या रूमवर जावया"
एवढ्यात धन्या बाहेर आला.
"हाणम्या ह्यो सत्त्या... तु आलायस म्हणून कळल्यावर सकाळी सातला आलाय भेटायला"
अशा बर्‍याच जणांना आम्ही भेटलो होतो. पण स्वतःला हरवून पुढं जाणारा भेटल्याशिवाय मी कुणालाच जवळ केलं नाही. सत्त्यालाही परत कधीतरी रूमवर यायचं वचन देऊन मी तिथून निघालो.
पुढं धन्यानं स्पर्धा कमी केल्या. मीही पीजीला गेल्यावर स्पर्धा कमीच केल्या. मग ज्युनियर स्पर्धकांकडून निकाल कळायचे... त्यात सत्ताप्पाचं नावं बर्‍याच वेळा असायचं. तिनचार महिन्यांच्या ग्यापनंतर मनात आलं एखादी स्पर्धा करावी. पंढरपूर जवळ शेटफळ मधे स्पर्धा होती. मी कराडहून निघणार होतो. सत्ताप्पाचा फोन आला
"भैय्या शेटफळला यणार काय?"
"हो. तू?"
"यनाराय, इस्लामपुरातनं बसणार. तुमी?"
"कराड"
"मग मी यतो की तिकडनं"
"चालेलं"
आदल्या दिवशी निघून रात्री पंढरपूरच्या स्ट्यांडवर थांबायचं आणि सकाळी उठून शेटफळला जायचं असं ठरलं. सत्तापा कराडात आला. गाडीत दोघांना वेगवेगळ्या सीटवर बसाव लागल्यामुळं बोलता आलं नाही. पंढरपुरात उतरल्यावर मात्र सत्ताप्पानं जो तोंडाचा पट्टा सोडला तो पेलायला मी असमर्थ होतो. या स्पर्धेत हे बोल्लो.. त्या स्पर्धेत ते बोल्लो... तो परिक्षक चांगला होता..... त्या परिक्षकानं घोटाळा केला... शेकडो विषय.... एकाच वेळी... एकाच दमात.

रात्रीचं जेवण झालं... आम्ही स्ट्यांडवर आलो. बसायला पेपर अंथरले... सत्ताप्पा चालूच होता.
त्याला मधेच थांबवत मी विचारलं
"सत्त्या घरी कोण कोण असतं? वडील काय करतात?"
प्रश्न विचारल्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं... सत्ताप्पा अचानक गप्प झाला. मान खाली घालून ओलावलेल्या पापण्या पुसू लागला. ठसठसणार्‍या जखमेवर मीठ चोळणार्‍याकडं पहाव तस माझ्याकडे पाहत तो उभा राहिला....
"भैय्या मी पाणी पिऊन यतो"
मला स्वतःचाच राग आला. उगाच त्याला दुखावलं. चांगला मूडमधे होता. मला राहवेना....
परत येणार्‍या सत्तापाकडे पाहत मी त्याचा अंदाज घेतला. चेहर्‍यावरची निराशा कमी झाली होती.
"सत्ता सॉरी मित्रा.... बर ते जाऊदे शि़क्षणाचं कोण बघतं?"
"धना भैय्या मदत करतो"
माझ्यासाठी ही नवलाची गोष्ट होती. स्पर्धेला आल्यावर दुसर्‍याच्या पेस्टपासून ते पांघरुणापर्यंत ओरबाडणारा धना चक्क देत होता.... सत्ताप्पा सांगत होता....
"धना भैय्याच्या घराजवळ र्‍हातो मी.... मेसवालीचं पैसं द्याचं राहिलेलं दोन महिने. तिनं मेससमोरच शिव्या दिल्या... कानपाड मारली... मी रडत होतो. धना भैय्या मदी पडला. तिजं पैसं दिलं... मला घरी घिऊन गेला... तवापसनं रोज भैय्याच्याच घरी जेवतो. कॉलेजची फी पण भैय्याच देतो."
सत्ताप्पा सांगत होता आणि मी धन्याच्या एकेका गुणावरून त्याला दिलेल्या शिव्या आठवत होतो. साला मनाचा सच्चा निघाला. पण मलाच त्याला ओळखता आला नाही. त्याच्याविषयीचा आदर वाढला पण त्याचा त्याच्यावर काही फरक पडला नाही. तो पेस्ट हिसकाऊनच घ्यायचा. चादरी गोळा करून लोकांना उघडं करायचा... नाष्ट्याला सोबत येणार्‍याच्या खिशाला कात्री लावायचा... पण त्याचं खरं रूप मला कळालेलं त्यामुळं नंतर मला तो पहिल्यासारखा वाईट कधीच वाटला नाही.

कॉलेज संपलं... स्पर्धा थांबल्या... मी संसारात रमलो... तो लॉ पास होण्यासाठी धडपडत राहिला...
त्याची आठवणही फार कमी वेळा निघायची. पण गेल्या तीन वर्षात त्याला न भेटूनही त्याची प्रतिमा मनावर ठळक होती. आणि आता तर ती आणखी गडद झाली...

महिन्याभरापुर्विचीच गोष्ट.... घरी पोराला खेळवत बसलेलो. मोबाईल वाजला... पंढरपूरचा स्पर्धक मित्र उमेश खेडकरचा फोन होता...
"हणमंत अरे उमेश बोलतोय... धनुचं काही कळालं का?"
"नाही रे बरेच दिवस झाले त्याच्याशी बोलून... काय लॉ पास झाला की काय?"
"अरे काल धनू वारला"
मी फोन बंद केला. क्षणभर वाटलं हा चेष्टा करतोय. पण तो खरं बोलत होता.... मी दोघा तिघांना फोन करून विचारलं....
"हो भैय्या... धनु भैय्या गेला"
आमच्या कुटूंबातला एक सदस्य गेला. सगळ्यांचे एकमेकाला फोन झाले. काहीजण घरी जाऊन आले....
बरेच दिवस नवं काही लिहायला घेतलंच नाही लिहावसं वाटलही नाही. आज लिहायला घेतलं तर धन्याचा चेहरा समोर आला.... लिहायचं बंदच करणार होतो पण रहावेना म्हटलं चला जमतील तश्या आठवणीच लिहून काढू.... नाहितर साला... कित्येक दिवसांपर्यंत मला बचैन करेल आणि खदखदून हसत राहील...

गुलमोहर: 

गौतम७स्टार, हिम्सकूल, रचु, स्वाती२, Yo.Rocks, नीशी, Fortyniner, रूनी पॉटर, राज, ऋयाम, उर्मी, फुलपाखरू,

प्रोत्साहन आणि शाब्बासकीबद्दल सर्वांचा खूप आभारी आहे.

मित्रा, आपल्या त्या तथाकथीत भांडणाची तड नाही लागु शकली, पण या लेखासाठी मात्र त्रिवार मुजरा रे. तुझ्या लेखनात जो सरळसोट साधेपणा आहे ना, कसलाही अभिनिवेश नसलेला त्यात खरी मज्जा आहे यार. त्यासाठी तरी वाकुन मुजरा मित्रा Happy

गेलेला धना तुझ्या लेखन कौशल्याने तू आमच्या पर्यंत पोहचवण्यात यशस्वी झालास... सुंदर

काय बोलावं तेच कळतं नाहीये ........ छान !!!!!!!! हे लिखाना साठी.'
घटना नि एकंदर तुमची त्या काळाची हालाखीची आर्थिक परिस्थिती....... हे खूपच वाईट.

ह. बा. अरे, तुला हा उम्या खेडकर कुठे भेटला? मला फोन कर लवकर... बाकी कथा मस्तच... आपण एकाच गटाचे- डिबेटवाले...

विशाल, धनुडी, सावली, इंद्रा, मायबोलीकर, संदीप, कोमल के, शैलजा

प्रतिसादाबद्दल व प्रोत्साहनाबद्दल सर्वांचा आभारी आहे.!!!

कोमल के,

मला विश्वास होता की आपल्या स्पर्धेच्या ग्रूपमधलं कुणीतरी मला भेटेलच. एवढ्या दिवसानंतर आज तुम्ही भेटलात. बोललात. आजचा दिवस खरच चांगला आहे.
मिलते रहेंगे....
-हबा

खूप मनापासून लिहिलं आहे, उत्स्फूर्त आणि घायाळ करणारं.... असे मित्र लाभायलाही भाग्य लागतं! तुम्ही भाग्यवंत आहात तुम्हाला अशी माणसं भेटली.

घटना नि एकंदर तुमची त्या काळाची हालाखीची आर्थिक परिस्थिती....... हे खूपच वाईट.>>>>

संदीप, माफ़ करा पण मुळात हलाखीची आर्थिक परिस्थिती असणे याला मी वाईट मानत नाही, ती खरी संधी असते स्वत:ला सिद्ध करायची. ह बा सारखी माणसे अशा अडचणींना एक सुवर्णसंधी समजुन सामोरी जातात. Happy

त्या काळाची हालाखीची आर्थिक परिस्थिती....... हे खूपच वाईट>>>

नो यार. मी त्या दिवसांवर प्रेम करतो. तेवढे समृध्द दिवस नंतर कधीच भेटले नाहीत म्हणून तर जीव त्या दिवसात अडकलाय अजून.

संदीप, माफ़ करा पण मुळात हलाखीची आर्थिक परिस्थिती असणे याला मी वाईट मानत नाही, ती खरी संधी असते स्वत:ला सिद्ध करायची. ह बा सारखी माणसे अशा अडचणींना एक सुवर्णसंधी समजुन सामोरी जातात. >>>>>>
अनुमोदन. विशाल आणि ह बा ... सरळ मनात आलं ते लिहिलं .......... बाकी माझाही तोच फंडा आहे कि परिस्थिती जेवढी बिकट होत जाते तेवढंच लढायचं बळ वाढत जातं........ कधी थकतो ही ..... पण काही दिवसांपुरताच......... पुन्हा भरारी घेण्याची जबरदस्त इच्छाशक्ती होतेच.......

अनपेक्षित धक्का बसला... माहीतीतला माणूस जावा तसा... तुम्ही त्याची ओळखच एवढ्या प्रत्ययतेने करून दिलेली...

निशब्द केलंत..

तुमचा वासू बामण ही वाचलेला... फार छान, ओघवतं, पारदर्शी लिहीता...

वाट बघतेय सुपाएवढ्या काळजाची... साधी-भोळी माणसं भाग ३ ची लवकर लिहा...

ह.बा....
खुप छान्.....खुप नितळ लिहीलय.....
आन्तर मनाला स्पर्शुन गेल्या तुमच्या स्पर्धेच्या आठवणी,ते दिवस ज्याच मोल आपण कधी ही ठरवु शकत नाही असे क्षण.....
धना गेला...खुप झर झर झाल काळजात्.....वाईट वाट्ल खुप....निशब्द केलंत..

वाट पाहतेय नवीन लिखानाची......

सावरी

आजच वाचलं हे! सुन्न झाले मन! हबा, तुमची लेखनशैली आवडतेच्....खुप मनापासुन लिहिता तुम्ही, शब्दबंबाळ न करता! अजुन येउ देत....!

आतून भडभडून आलेलं हे असं - <<या कथेत कल्पनेच्या भरार्‍या नाहीत दिसणार पण माझ्या मनातल्या त्याच्या अस्ताव्यस्त आठवणींचा हा ओबडधोबड हार त्याच्या गळ्यात घातल्याशिवाय मला चैन पडणार नाही...<<>>
सुरेख!

आर्या, दाद, भगवान, प्रगो

प्रतिसादाबद्दल सर्वांचा खूप आभारी आहे!!!

Pages