हरवलेला षड्जं - ४ (जुन्या मायबोलीवर प्रकाशित)

Submitted by दाद on 16 August, 2010 - 18:31

कार्यक्रम संपल्यावर तर बरं वाटत नाहीये म्हणून निघूनही आला कुणालाच न भेटता. रंजनालाही काळजी वाटायला लागली होती. नेहमी दाद देऊन, प्रोत्साहन देत, अगदी साध्या साध्या कलाकारांनाही खुलवणारा अश्विन, एकदम गप्प गप्प होता. तिलाच गिल्टी वाटू लागलं, उगाच खेचून नेला त्याला म्हणून.

हे सगळं डोक्यातून काढायला, दुसर्‍या दिवशी अश्विनने रजा घेतली आणि रंजनालाही घ्यायला लावली. त्याचा बॉस, रव्या त्याचाच मित्र. त्याला फोन केला तर, ’टेल समवन व्हू केअर्स. अरे, मी ही आज ऑफिसात नाहिये.’
आणि मग बायकोसह रजा घेऊन करण्यासारखी तेवीस "कामं" त्यानेच सांगायला सुरूवात केली.... आणि अश्विनने हसत हसत फोन ठेवला.
’खूप दिवसात लॉंग ड्राईव्हला गेलो नाही रे’, असं रंजनाने म्हणताच त्यानेही अगदी ’आज्ञा शिरसावंद्य’ म्हणून कुर्निसात केला....

मग रंजना बिट्ट्याला शाळेत सोडून-बिडून येईपर्यंत त्याने मस्त पैकी आलं घालून चहा केला आणि मालिनीबाईंचा नटभैरव ऐकत आंघोळ उरकली. एका छोट्या बास्केटमध्ये थोडी फळं, नॅपकिन, पाण्याची बाटली, चिप्स सारखे स्नॅकी पदार्थ भरले. बघितल्यावर रंजनाला भोवळ येईल अशी तयारी करून होईपर्यंत मालिनीबाईंनी टप्पा सुरू केला होता. रंजना घरात आली तर समोर कॉफ़ी टेबलवर जय्यत तयारीत बास्केट आणि अश्विन दोघेही बसले होते.

’अशू, काय मस्तं तयारी रे! कधी कधी तुला नं, कुठे ठेवू अन कुठे नको असं होतं’,... अश्विनच्या डोळ्यांत बघताच तिला आपली चूक कळली लगेचच अन लाजून पळतच होती ती आत.

इतक्यात फोन वाजला आणि एका हाताने तिचं मनगट धरून ठेवत अश्विनने बघितलं. परत रव्याचाच फोन होता. ’तुझ्या तेवीस पैकी एकही अजून सुरूही केलं नाहीये...’, अश्विनने सुरूवात केली. पण रव्या तिसरंच ताट वाढून तयार होता.

’अश्क्या लोचा झालाय, रे. आत्ता अनुष्का रडतच उठलीये, तिला ताप आलाय आणि रेशमाला सुट्टी घेता येत नाहीये..... अनुष्काला तुझ्याकडे ठेव म्हणत नाहीये मी.....’ अश्विन ऐकतच होता...’अरे, मी सुट्टी घेऊन सावनीबाईंना थोडं आजूबाजूचं दाखवायला घेऊन जाणार होतो... ते जरा तू करू शकशील तर...’
अश्विनची रंजनाच्या हातावरली पकड घट्ट झाली. जोरात मान हलवत त्याने, ’,नो वे!!.... अजिबात नाही. दुसरं काहीही सांग...’ म्हटलं.
त्याचा आक्रसलेला चेहरा बघून रंजनाने फोन त्याच्या हातातून काढून घेतला जवळ जवळ.

सगळं रवीकडून समजून घेतल्यावर तर तिला अश्विनचं वागणं कळेचना. अश्विनच्या वतीने तिने ’हो’ म्हणूनही टाकलं.
’अरे, नेहमी सगळ्यांना धावून मदत करणारा तू... आज झालय काय तुला? आपली आणि रवीची अनेक वर्षांची ओळख... आपल्या सगळ्या अडी-नडीला असतो तो. आज अनुष्काला बरं नाही म्हणून म्हणतोय तर... तुला काय नको ते सुचतय?
आपण जाऊ की नंतर कधीतरी. खरतर मलाही आज रजा घेणं खरच शक्य नव्हतं. तुझा कालचा मूड पाहून वाटलं घ्यावी आज. पण तू ठीक आहेस. शिवाय रवीची अडचण... आपण नको करायला? तुझ्यासारखं शास्त्रीय संगितावर मला जमणार नाही बोलायला तासनतास, नाहीतर तुझ्या पाया पडाव्या लागल्या नसत्या’ रंजन त्राग्याने म्हणाली.
’अरे, मागे त्या शिरोडकरांना नव्हतस का फिरवून आणलं? किती खूष झाले होते ते? तुला सगळे ओळखतात इथे यासाठी. पण आधी सांग, का जायचं नाहीये तुला?’

रंजनाचे नको ते प्रश्न सुरू झाल्यावर अश्विनचा नाईलाज झाला. तो उठला, तशी, ’गुणाचा माझा नवरा तो’, म्हणून तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले.
’घे, ही बास्केट घेऊन जा.’ म्हणून ती वळली. अश्विनने तिला समोर उभी करून नुसतीच घट्ट घट्ट मिठीत घेतली. ’रंजन..., लव्ह यू’.
’हो रे... हे काय आणि नवीन? येस सर, आय नो यू लव्ह मी, लिहून देऊ? आता पळ आणि मलाही जाऊदे ऑफिसला, मी उगीच कशाला रजा फुकट घालवू?.... ए, आणि मी रेनचेक घेतेय हं आजच्या दिवसाचा....’

फडकेंच्या घरी पोचला तेव्हा शकुंतला काकू दारातच उभ्या होत्य. ’थॅन्क्स रे बाबा. आयत्यावेळी देवासारखा धाऊन आलास. तुझ्याइतकं कोण त्यांना एंटरटेन करू शकणार? तुम्ही एका क्षेत्रातली माणसं. अरे, संध्याकाळी कर्णिकांनी जेवायला बोलावलय त्यांना..... तुला आमंत्रणाची गरज नाहीये. तिकडेच परस्पर घेऊन ये.... उगीच फेरफटका पडेल नाहीतर तुला लांबचा..... अरे, बाहेरच काय उभायेस, आत ये. त्यांचं आवरलच आहे.’

नाईलाजाने अश्विन आत गेला.
’काय गायल्यात बाई काल... मारव्या नंतर सरस्वती ही जमलाच. आजकाल घराण्याच्या चिजा गात नाहीत फारसे. मध्यंतरानंतरही रंगलं की नाही रे गाणं?
हो, आणि त्यांना सांगितलय मी तुझ्याबद्दल..... म्हणजे आमचा आपला घरचा ’झाकिर हुसेन’ रे......’ काकून बोलतच होत्या स्वयंपाकघरातून.

समोरच्या बंद टीव्हीच्या काचेत त्याला सावनी मागून येताना दिसली आणि एक दीर्घ श्वास घेऊन अश्विन तिला सामोरा जायला उभा राहिला. तोपर्यंत सावनीने हात जोडले होते आणि म्हणाली, ’नमस्कार......’
तिचं हे परक्यासारखं नमस्कार करणं बघून तो ही म्हणाला, ’नमस्कार, चला. काकू निघतो. ह्यांना कर्णिकांच्यातच सोडेन’

’येते हं. संध्याकाळी भेटू’, बाहेर आलेल्या काकूंना सावनी म्हणाली.

गाडी सुरू करून गाव सोडेपर्यंत दोघेही काहीही बोलले नाहीत. आजूबाजूची हवा जड होते म्हणजे काय ते अश्विनला कळत होतं. नुसता श्वास घेणही जड झालं....
शेवटी गाव संपून तळ्याजवळचा झाडीचा परिसर चालू झाल्यावर तिनेच वळून विचारलं, ’कसा आहेस’?

तिचं हे आधी अपरिचितासारखं सामोरं येणं आणि मग आजूबाजूचं जग विरल्यावर जिव्हाळ्याच्या माणसासारखी विचारपूस...... त्याने काहीच उत्तर दिलं नाही अन कार पुढे जातच राहिली.

’थांब. गाडी थांबव. अशू, गाडी बाजूला घे, आत्ता.’
अश्विनने गाडी स्लो करत बाजूला घेऊन थांबवली. उतरून सावनी समोरच्या डोंगर-दर्‍यांकडे पहात उभी राहिली.
’सावनी, तुला... सॉरी चुकलो, तुम्हाला अजून बरंच काही दाखवायचय. बघण्यासारखी बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत इथे. सगळ्यात आधी आपलं ते..... आणि झालंच तर....’
त्याला मधेच तोडत ती म्हणाली, ’अशू.... मला माहीतेय की, तू.....तू....माझ्यात....’ सावनीने काहीतरी बोलायला सुरूवात करून मध्येच विचारलं, ’अलकाला भेटला होतास का रे त्यानंतर कधी?’
’त्यानंतर म्हणजे कधी? कशाच्यानंतर?’, अश्विन अजूनही अडून होता.

’मला माहितीये, अशू. यू... यू आर हर्ट. आय शुडन्ट हॅव्ह कम ऍक्रॉस लाईक... म्हणजे मगाशी तिर्‍हाइतासारखी. गोंधळले रे, कळेना इतक्या वर्षांनी भेटलास तेव्हा काय बोलावं.... आणि काल कार्यक्रमा नंतर भेटशील वाटलं होतं.... दिसलास पण भेटला नाहीस नंतर......
ऐक... अलकाशी बोलले मी..... खूप नंतर कधीतरी माझे पाय जमिनीला लागले तेव्हा..... अलकानेच सांगितलं हाऊ... हाऊ यू फेल्ट अबाउट.... अबाउट मी.... देन ... तेव्हा’ सावनी खाली मान घालून शब्दं शोधत म्हणाली.

’त्यासाठी अलकाशी बोलावं लागलं तुला? मी... माझ्याकडून काहीच प्रयत्नं... मी तुला विचारलंच नाही असं म्हणायचय का तु....’ अश्विनचा आवाज चढला पण शब्दं सुचेनात. त्याचबरोबर आपण इतके एक्साईट होऊन का बोलतोय तेही कळेना त्याला.

’नाही. ते.... त्याचा अर्थ मला कळेपर्यंत तू खूप पुढे निघून गेला होतास...रे. नव्हे.... आपण वेगवेगळ्या वाटांवर खूप अंतर गेलो असं म्हणुया हवं तर. अशू, मला आयुष्याकडून नक्की काय हवंय ते कळेपर्यंत खूप उशीर झाला होता..... माझ्यासाठी, तरी. एक कलाकार, अतिशय यशस्वी कलाकार म्हणूनच जगायचं ही माझ्या आईची इच्छा माझ्यातून पूर्णं झाली. एक कलाकार म्हणून अगदी भरून पावले..... पण...’ सावनीने आवंढा गिळला आणि थांबलीच.

अश्विनचा तोल सुटल्यासारखा झाला, ’सावनी, बोल. पण... काय? आता काही माझ्यापासून ठेवशील तर ते.... तुला....
तुझं माहीत नाही, पण मला पेलणं शक्य नाही. एकतर बोलतरी सगळं किंवा मगाचशासारखी पूर्ण तिर्‍हाईत हो, मला ते चालेल एकवेळ. तुझ्याबरोबर आजचा दिवस मी मागून घेतलेला नाही.... मला मुळीच आज....’, अश्विन बोलता बोलता तटकन थांबला आणि परत अतिशय शांतपणे म्हणाला, ’हं बोल..., पण काय?’

सावनी त्याचा हा आधीचा आवेश आणि मग परत सावरल्याचा मुखवटा बघून आतून हलली. किती दुखावलाय, हा!

’.... अशू, तुला हेच समजून घ्यायचय ना, की त्या वेळी... मला तुझ्याविषयी थोडं वेगळं.... निव्वळ मैत्री पेक्षा अधिक वाटत होतं का ते?...’
’नक्कीच वाटत होतं.... बट अशु....’, सावनी परत थांबली. यावेळी शांत, अपलक नजरेने अश्विन तिच्याकडे नुसतं बघत राहिला. सावनी बोलत राहिली थेट त्याच्या डोळ्यांत बघत.
’अशू, इट वॉज नॉट इनफ फॉर मी, देन.... आय थिन्क. मी मॅच्युअर नव्हते, यू ऍंड मी, आय मीन आपण.. दॅट.... दॅट वॉज नॉट माय फोकस... तेव्हातरी. शिवाय घरून विरोध.... मी तितकी स्ट्रॉंग नव्हत्ये रे....,
कारणंच शोधायची तर हीच देता येतील.......
आता इतक्या वर्षांनी असंच वाटतंय की कदाचित.... कदाचित आपल्या नशिबात नव्हतं हेच खरं कारण असेल.....’ सावनीने एक निश्वास सोडला.
’एक कलाकार म्हणून सगळं मिळालं.... पण बरंच काही राहिलंही..... लग्नं, घर संसार काहीच.... अरे आपल्याला नक्की काय हवंय ते कळे पर्यंत वेळ निघून गेली होती. शिवाय त्यावेळी मला जे हवं होतं, त्यात तू नुसता...’, सावनीचा स्वर हलला.
’तू नुसता साथीला हवा होतास.... त्यात ’आपण दोघे’ हे उद्दिष्ट्य नव्हतं.... गाणं करायचं, मोठ्ठी कलाकार, यश, नाव-लौकीक हवं होतं.... तुझी नुसतीच फरपट झाली असती... तुझं काय... मी ही गुंतले होतेच रे तुझ्या.....’ सावनी बोलतच होती पण अश्विन तिथेच थबकला, पुढलं ऐकायचा थांबला आणि त्याच एका विचारात गुरफटला.

सावनीलाही काहीतरी वाटलं होतं, तर. आपणच वेड्यासारखे तिच्या मागे नव्हतो. कुठेतरी त्याचं दुखावलेलं ’मी’पण सुखावलं.
त्या एकाच वळणावर त्याची विचारधारा घुटमळली. त्याचा विचार तिथेच थांबल्यासारखा......
पण स्वत: अश्विनला मात्रं सगळ्या साखळ्या तुटून तो मोकळा झाल्यासारखं वाटलं. गचपणाने घुसमटून भरलेलं आभाळसुद्धा बाजूला सारून किरणं डोकावतात, तेव्हा कसा झळाळ होतो,.... तसं झालं त्याला.

अरे? ह्याच प्रश्नाच्या उत्तरासाठीच का इतका जीव अडला होता, तडफडला होता?

काय वेड्यासारखे म्हणत राहिलो.... आयुष्यात कुठे आहोत? आपल्या आयुष्याच्या रागाची बढत झालीच नाही.... असलं काहीतरी, वेड्यासारखं.
नाही कशी? झाली. नक्कीच झाली, बढत. आयुष्याने जो राग गायला दिला, त्याचे सगळे स्वर लावले की आपण! हिंमतीने लावले. तब्येतीत आलापी केली, झटून घेतल्या बोलताना, पेचताना अन वक्रीतानाही. वेळ पडली तेव्हा आड तालांतही गायलो.
आणि जो स्वर लागला नाही, तो का लावला नाही? का लागला नाही आपल्याकडून?
......तर वेड्या, तो वर्ज्य होता..... आपल्या या आयुष्यातल्या रागाचा तो स्वरच नव्हे.
कसं नाही कळलं आपल्याला? आजवर जे ओझं घेऊन फिरलो ते निष्फ़ळ प्रेम नव्हतं तर निव्वळ निरुत्तर प्रश्न होता!!

ज्या प्रश्नाच्या उत्तराने आज आपला अहंकार सुखावला, फक्त.... दुसरं काsssही काही नाही.
सावनीचाच काय पण मुळात मारवा हा आपल्या आयुष्याचा रागच नाही.... षड्ज हरवलेला माणूस कोणताच राग गाऊ शकणार नाही... हे कसं कळलं नाही आपल्याला? की....,
की, हे याच स्थळ-काळाच्या छेदातच आपल्याला उमगावं हा सुद्धा दैवाचाच भाग.... सावनी म्हणतेय तसा?
तिने तिच्या आयुष्याची बंदिश तिला जमली तशी गायलीये असं दिसतय आणि आपणही आपल्या आयुष्याची.....
चुकलाच असेल कुठे एखादा ठेका, घसरली असेल एखादी स्वरांची लड, साधली नसेल एखाद्या आवर्तनाला सम, पण रागाची चौकट नाही सुटली.... अरे.... मिळालेल्या साथीत सजवलीये मैफिल, आपण आपली.

तिला थांबवत अतिशय अतिशय समाधानी, जिव्हाळ्याच्या, आपुलकीच्या स्वरात अश्विनने विचारलं, ’सावनी.... सावनी, थांब. काही नको एक्स्प्लेन करूस. सगळं पटलय, राग कसलाच नाही. प्रश्नही नाहीत कशाही बद्दल.....’
अन सावनी त्याच्याकडे कळून बघत असतानाच त्याने विचारलं, ’ते सगळं जाऊदे.... आता हे सांग, कशी आहेस?’

जवारी काढल्यावर गुणगंभीरा स्वरात झणकारू लागलेल्या तिच्या सुलक्षणी तानपुर्‍या सारखा वाटला तिला अश्विन.... स्वत:च एक षड्ज असल्यासारखा.... झरणारा तरीही अचल, स्वत:तच पूर्ण!

समाप्त

गुलमोहर: 

आजवर जे ओझं घेऊन फिरलो ते निष्फ़ळ प्रेम नव्हतं तर निव्वळ निरुत्तर प्रश्न होता!!
>>>>>>> wow!
दाद्...सुरेख...

चुकलाच असेल कुठे एखादा ठेका, घसरली असेल एखादी स्वरांची लड, साधली नसेल एखाद्या आवर्तनाला सम, पण रागाची चौकट नाही सुटली.... अरे.... मिळालेल्या साथीत सजवलीये मैफिल, आपण आपली.>>>
अप्रतिम

सुरेख! Happy

सुरेख!

कसं नाही कळलं आपल्याला? आजवर जे ओझं घेऊन फिरलो ते निष्फ़ळ प्रेम नव्हतं तर निव्वळ निरुत्तर प्रश्न होता!!
ज्या प्रश्नाच्या उत्तराने आज आपला अहंकार सुखावला, फक्त.... दुसरं काsssही काही नाही.
>>> मस्त!

दाद, अप्रतिम कथा. अगदी कथेच्या सुरुवातीपासूनच मारव्याची व्याकुळता मनात भरून राहिली ती कथेच्या अंती षड्जावर संपली आणि अगदी ''सुकुन'' वाटला. संगीतातले संदर्भ आणि या क्षेत्रातल्या लोकांचे अनुभव यांचा वापर अतिशय कौशल्यानं झाला आहे! खूप लिहावसं वाटतंय..पण पुन्हा कधीतरी. आत्ता फक्त एव्हढच. केवळ सुंदर.

इतक्या वर्षांनंतर हे सांगायची / विचारायची गरज का उरते?
का विसरल्या जात नाहीत ह्या गोष्टी काळाच्या ओघात?
आणि ती गुंतली होती हे कळलं की असं मोकळं का वटतं?

असं वटतं की फक्त आपणच वेडे नव्हतो.. आग दोनो तरफ थी.. ह्याने .. हे कळल्याने इतकं हायसं का वाटतं? आणि माणुस भुत्काळात रमलेला मणुस एकदम वर्तमान काळात कसा येतो लगेच..

खरच.. फरक का पडतो? कळण्या.. न कळण्याने?

सुरेख..

ती मनातली सुटणारी अढी..लख्ख पडलेला प्रकाश ...तो अचानक मोकळा घेता येउ शकलेला श्वास.. अनुभवलेली शांतता.. आणि एकदम सुटलेला गुंता... कसं मस्त टीपल्या गेलं आहे..

खरंच घडल्या सारखं वाटतं आहे हे.. अगदी डोळ्यासमोर..

चुकलाच असेल कुठे एखादा ठेका, घसरली असेल एखादी स्वरांची लड, साधली नसेल एखाद्या आवर्तनाला सम, पण रागाची चौकट नाही सुटली.... अरे.... मिळालेल्या साथीत सजवलीये मैफिल, आपण आपली.>>>

क्या बात है... भिडलं..

अश्विन, सावनी
दोन संगीतप्रेमी जीव......... एकमेकात गुंतलेले...
सावनीला संगीतात करिअर करायची म्हणून ती अश्विनपासून दूर झालेली, साथ तुटलेली..
प्रसंगवशात....संगीत मैफिलीनेच दोघे एकत्र आलेले..
सुरवातीला नाराज असलेला अश्विन......पण नंतर ..
संगीत भाषेत एकमेकांना आता समजून घेणारे...
अशी शब्द - भावना - संगीत मैफिल....दाद, तूच निर्माण करु शकतेस, त्यात विलक्षण रंग भरु शकतेस.....
<< जवारी काढल्यावर गुणगंभीरा स्वरात झणकारू लागलेल्या तिच्या सुलक्षणी तानपुर्‍या सारखा वाटला तिला अश्विन.... स्वत:च एक षड्ज असल्यासारखा.... झरणारा तरीही अचल, स्वत:तच पूर्ण! >>
हे वाक्य तर अगदी खूपच छान.... तान (पेच किंवा वक्री) घेउन अलगद "समेवर" आल्यासारखं......
काय बाबा....काही "खास" (दादा) लोकांनाच मिळतं असं सरस्वती मातेकडून - लेखणीसहित "वीणा" देखील...
आम्हा सामान्य रसिकांना भरभरून आनंद मिळतोय ना - त्यातच खूप समाधान आहे.
इति ||