वय इथले...

Submitted by ऋयाम on 29 July, 2010 - 00:36

:सुर्य:
* सुर्यापुढे कितीही दिवे काजवेच. त्यामुळे हा सुर्य घेऊन ठेवा. असुदे...

वयाबद्दल मला लहान वयापासुनच खुप कुतूहल वाटत आलंय. कारण सोपं आहे. अजुन ११ वर्षांचा होतो, तरी बसमधे कंडक्टर "हाफ? वय किती? फुल टिकीट लागंल." म्हणायचा. आणि त्याच क्षणी शेजारीच बसलेला मित्र "१३" व्या वर्षी पण चायला "एक हाफ द्या हो." म्हटला, की तोच कंडक्टर अगदी 'प्रसन्नवदने' वगैरे नसलं, 'मख्खवदने' जरी असलं, तरी 'गप्पवदने' तिकीट त्याच्या हाती द्यायचा...
आता 'वयाच्या मानाने मला समज जास्ती' असल्यानं मित्रांचं बिंग फोडलं नाही कधी. असो.
जे रोज बसमधे, तेच मग उन्हाळ्याच्या सुट्टीमधे पोहायला जायचो तिथे! आता माणसानं (मुलानं!) "आयडी कार्ड आणलंय चांगलं... तिथे "तुमच्याच" माणसानं वय लिहीलंय. कागदपत्रं बघुनच लिहिलंय. आणि तरी उगाच न्ह्याहाळुन "हाफ?" चायला. माणसानं उंच नसावं का जरा वयापेक्षा??

पण खरंच, हे 'वय'-'वय' काय नाटक आहे हो? लहानपणी काय वाटायचं ते सांगितलंच. पण त्या 'हम पांच' मधे ती "आंटी मत कहो हा!" वाली 'आंटी' असं का म्हणते तेव्हा कळायचं नाही विशेष.. ओळखीतल्या चाळीशीतल्या बायका एकमेकींना 'मुलगी' वगैरे म्हटल्या की थोडं हसु यायचं/ (कधी कधी अजुनही ) येतं. *:सुर्य: पण आजकाल आपल्याला कोणी 'काका' वगैरे म्हटलं की 'आयला, दादा बरं होतं की' असंही वाटतं. "अहो-जाहो नको, अरे-तुरे कर.." म्हणावसं वाटतं. खरंच काय नाटक आहे???

अशा वेळी मग या "ऑनलाईन ओळखींचा" एक "पॉईण्ट" भारी वाटतो मला. तुमच्या दृष्टीनं तो 'प्लस' का 'मायनस' हे सांगा तुम्हीच, पण पॉईण्ट असा की, "ओळख होताना सहसा 'वय' समजत नाही "! वय न समजता 'कोणाशीही' ओळखी होतात, कुठल्याही विषयावर चर्चा होऊन चांगली मैत्री होऊ शकते... त्या यु के तल्या व वि त मी नव्हतो, पण तिथे सगळ्यांना पहिल्यांदाच भेटलेल्या सोलापुरी देव आनंदला भेटुन सगळ्यांनी म्हटलेलं "अय्या. तुम्ही? तुम्ही '***'? " असं काही वाचलं की भारी वाटतं. Happy तसंच इतरही काही आयडी "मला तुमचा आयडी म्हणजे कोणीतरी वयानं लहान व्यक्ति असेल वाटलं" हे वाचुनही तितकंच भारी वाटलं. *:सुर्य:

तर सक्काळ सक्काळ ही क्याशेट टाकायचं कारण म्हणजे काल रात्री एक मित्र भेटला. म्हणजे तसा प्रत्यक्ष कधी नाही भेटलेला, ऑनलाईनच ओळख. त्याचे ब्लॉग्स वगैरे छान असतात, एकदम 'उत्स्फुर्त!', एकदम 'तरुण'! त्याला एक छोटी मुलगी आहे. १ वर्ष. आता १ वर्षाची मुलगी म्हणजे ह्याचं वय... साधारण २८-२९ वगैरे धरुन चालत होतो. ३३! आय्ला म्हटलं, बोलण्यावरुन माझ्याएवढाच वाटत होता आणि ३३! ('का मी ३३शीतल्या गप्पा मारतो?' याबद्दल चिंतन करणार आहे या विकेंडला...)
पण मग फक्त ''मन आणि अ‍ॅटिट्युड मॅटर्स' का?

मग काहीकाही लोकं का उगाचच वयाचा आव आणतात? मी मोठा झालो... आणि काय काय....
वाढदिवस झाले की एकेक आकडा वाढवायचा... मला सांगा, तुम्हाला तरी वाटतं का हो, तुमचं जे वय आहे, तेवढे मोठे झालात तुम्ही?? की काही अर्थ नाहीये त्यात?? ते मोजण्यात?
असो... सध्या तरी असं वाटतंय, की 'तिथले' वय कितीही वाढो, "वय इथले वाढत नाही!"
* तिथलं/ते म्हणजे आपली पृथ्वी, दुष्ट लोक, त्यांची मनं, बर्थ सर्टिफीकेट, आयडी कार्ड्स
* इथलं म्हणजे आपलं मन.

गुलमोहर: 

:सुर्यः याकरता पण एक स्मायली ठेवायला हवी नाही?? Wink

बाकी लेख सहीच... पण अजुन थोडा मोठा हवा होता.. लहान असल्याने नेहमीसारखा नाही वाटला.. हवा असल्यास :सुर्यः घ्या Happy

छ्या, मला अजून १६ वर्षांची असल्यासारखंच वाटतं, अगदी टिनएजर (मनाने हो, शरीर आता वयाची जाणीव करून द्यायला लागलंय ते सोडा) Proud

आडो म्हणजे तू १६ ची नाहियेस. मोठी आहेस. वाटल नाही हो आपण भेटलेलो तेव्हा? :प्रचंड धक्का बसलेली बाहुली" Wink Proud

छान लिहिलयस Happy अगदी तुझ्या वया येव्हढच तरुण, उत्स्फुर्त आणि मॅच्युअर्ड Wink Proud

'प्रौढत्वी निज शैशवास जपावे' या म्हणीचा अवलंब करण्याचं वय आहे माझं त्यामुळे मी तेच करते... मोजणं बिजणं अपना ट्रॅक नही Happy

:सूर्य:>>>>>> हे भारी आहे ऋयामा ...

>>बोलण्यावरुन माझ्याएवढाच वाटत होता
Lol
>>वय इथले वाढत नाही Happy
छान आहे. मला आधी वाटलं 'इथले' म्हणजे मायबोलीवरचे की काय..

सही रे!
आपलं वय प्रत्येक नात्यात वेगळेच असते, आपण आईपुढे कायम लहानच वागतो आणि बायको लहान असल्यासारखे वागवते Proud
रच्याकने, हा सोलापूरी देवानंद कोण? Wink

आवडलं. १० वर्षापूर्वी मायबोलीवर सगळी पोरं सोरं (पोरी सोरी) वाटायची आता तर नातवंड्पण यायला लागली असं वाटायला लागेल काही दिवसात. Happy

मस्त लेख.
आर्च, अगदी अनूमोदन.
मी इथेच मायबोलीवर, दिनेश, दादा, मामा, असा वाढत गेलो...
आता अजोबा पण झालो.
पण मला नाही वाटत, गेल्या ३०/३५ वर्षात माझे वय एका वर्षानेदेखील वाढले, असे.

<सोलापूरी देव आनंद>
आहे (अहो) एक. तु(म्हा)ला नाही माहीत Happy बाकी तुमची तब्बेत कशी आहे? वयाच्या मानाने.... :सुर्य:

आर्च,
आभार Happy मलाही दिसेल तो पोरंसोरंच वाटतं. पण काहीकाही काकाकाकुही पोरासोरांसारखी लाइव्हली वागतात, आणि मज्जा येते गप्पा मारताना Happy

दिनेश मामा दा आजोबा.. Happy मस्त!!!
<पण मला नाही वाटत, गेल्या ३०/३५ वर्षात माझे वय एका वर्षानेदेखील वाढले, असे.>
हे महत्त्वाचं!!!

@आभार्स!!! Happy

आ.. ह्हा! अगदी कळीचा विषय घेतलायस.
इथे, वयाबद्दल बोलायला लागलं की कशी कळ लागते.... त्या कळीबद्दल म्हणतेय मी... फुलाच्या नाजुक कळी-बिळीचा काही संबंध नाही.
वयानुसार वाढणे (समज, आकार, उकार.. वगैरे) हा सर्वमान्यं नियम आहे. अपवाद असतातच.. प्रत्येक नियमाला असतात तसेच.
समज, आकार, (उकार, नकार, होकार, विकार....) इ. इ. सगळच कसं सम प्रमाणात वाढेल? सगळ्यांच्यात?
हे सगळ्याच नवर्‍यांना कळायलाच हवं.... हाही नियमच... पण सगळ्याच नवर्‍यांना कळेलच असं नाही... हा अपवाद.... प्रत्येक नियमाला असतो ना.... तस्साच.
.......
म्हटलं नव्हतं? अगदी कळीचा विषय घेतलाय.... का विषयाला तोंड फोडलंस म्हणू आता?

छान लिहिलयं..........
आवडलं......

अरे, ते सगळे इथून सुरु होते रे ........

........ म्हणे - हाऊ ओल्ड आर् यू ??............. कशाला ते "ओल्ड" पायजे ???????

शीर्षकापासून ते प्रतिसादांपर्यंत लेख आवडलाय अग्दी .....