आमचा पण ववि....

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 July, 2010 - 07:23

काल रात्रीपासुन पावसाने धुमाकुळ घातलेला. खरेतर कालच म्हणजे शनीवारीच कुठेतरी छान कोकणसाईडला बाईक काढायची आणि मनसोक्त भटकायचे असा आमचा बेत होता. पण अस्मादिक नुकतेच मलेरियाच्या भेटीला जावुन आल्याने सौभाग्यवती भर पावसात बाहेर पडायला तयार नव्हत्या. शनिवारची संध्याकाळ त्या वादावादीतच गेली आणि रवीवारी सकाळी ...

"ठिक आहे, चल जावूया कुठेतरी! पण पावसात फार भिजायचे नाही, रेनकोट घालूनच निघायचे!" अशा सशर्त सहमतीनंतर रवीवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान आम्ही घर सोडले. पाऊस जवळ जवळ नव्हताच, त्यामुळे रेनकोट (विंडशिटर) बॅगेतच होते. बाईक काढली आणि पनवेलच्या मार्गाला लागलो. कुठे जायचे ते ठरले नव्हतेच. मग पनवेलला एका पेट्रोलपंपावर टाकी फुल्ल केली (बाईकची : आमची टाकी आम्ही संध्याकाळी ६.०० च्या दरम्यान भरली त्यादिवशी.) आणि तिथेच त्या पंपावरच्या एका माणसाला विचारले...

"भाऊ, खोपोली किती अंतर आहे इथून?"

उत्तर चक्क मराठीतच मिळालं..."आसंल की ४० किलोमीटर!"

आत्तापर्यंत रिमझिम सुरू झाली होती. सौ.चे उत्तर आले, ठिक आहे. निघुया आपण खोपोलीच्या दिशेने. कंटाळा आला की परत फिरू. बाईकवर बसलेला होतो म्हणुन टुणकन वगैरे उडी नाही मारता आली. पण लगेच पडत्या फळाची आज्ञा घेवून निघालो. म्हणलं पुन्हा मॅडमचा विचार बदलायच्या आत निघा. पनवेल ओलांडून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालो. मध्येच एका धाब्यावर गरमा गरम भजी आणि कडक चहा मारला. (फक्त दोन कप प्रत्येकी)

IMG_5667.JPG

पाऊस वाढला होता, पण आजुबाजुला पसरलेली हिरवाई बघुन चित्तवृत्ती बहरून आल्या होत्या. आम्ही दोघेही माझ्या होवून गेलेल्या आजारपणाबद्दल विसरायला लागलो होतो. मी विचारलं तिला, रेनकोट काढू का बाहेर? तर म्हणाली..जावुदे...श्री स्वामी समर्थ म्हणूया आणि निघू. माऊली घेतील काळजी!

तिचा पुढचा प्रश्न होता, खोपोलीपासुन खंडाळा जवळच आहे ना रे? जायचं.....?

मी खुशीतच गाडी चालु केली आणि सुसाट निघालो.... मिशन खंडाळा !

पाऊस, हळू हळू गात्रां-गात्रांतून झिरपायला लागला होता. रंध्रा-रंध्रातून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन द्यायला लागला होता. आजुबाजुला पसरलेले हिरवेकच्च डोंगर आणि पावसाने भिजलेला, नुकतेच केस धुवून वाळवायला बसलेल्या, पण पावसाच्या ओढीने पुन्हा पुन्हा भिजवणार्‍या एखाद्या रमणीच्या लांब केसांसारखा, ओलेता लांबवर पसरलेला रस्ता मोहून टाकत होता. त्यात नेहमी केस मोकळे सोड म्हटले तर 'नको, गुंता होतो' म्हणून डोळे वटारणारी सहधर्मचारिणी मस्त केस मोकळे सोडून मागे बसलेली. तिचे खोडकर केस अधुन मधुन वार्‍याबरोबर माझ्या मानेशी चाळा (चाळे नव्हे!) करत होते. हाय्य जालीम, स्वर्ग्..स्वर्ग म्हणतात तो हाच असावा!

वेड लावणारा रस्ता....

IMG_2475.jpg

साधारण १५ किमीच्या आसपास क्रॉस केल्यानंतर अचानक रस्त्याच्या डाव्या बाजुला एक मोठा धबधबा दिसला. मी बाईक थांबवली, सौं.ना म्हणालो...'उतरा!' तीने धबधब्याकडे बोट दाखवले, "बघ तिथे सगळे जेंटस दिसताहेत, एकही मुलगी दिसत नाही. उगाचच रिस्क घेण्यात अर्थ नाही. काही दिवसांपुर्वीच माळशेजघाटात एका डोंबिवलीकर कुटूंबाच्या बाबतीत घडलेली घटना वाचली होती. धबधब्यावर आलेल्या दारुड्यांनी त्यांना विरोध केला म्हणून एका सदगृहस्थाला खुप मारहाण केली होती. त्यामुळे आमच्या सौ.ने तिथे जायला सरळ सरळ नकार दिला.

ठिकै बाबा, इथुनच फोटो काढू, म्हणत मी कॅमेरा सावरला आणि दोन तीन स्नॅप्स मारले.

IMG_5498.JPGIMG_5499.JPG

मग आम्ही पुन्हा गाडी पुढे काढली आणि तिथून साधारण पाच्-सहा किमीवर डोंगरात आणखी एक छोटासा धबधबा दिसला. हा धबधबा मुख्य रस्त्यापासुन खुप आत होता पण तिथे फारशी गर्दीही दिसत नव्हती. एक दोन जणच होते. इथे मात्र कुलकर्णीबाई लगेच तयार झाल्या आणि आम्ही त्या धबधब्यावर दाखल झालो. छोटे छोटे ओहोळ होते पाण्याचे, पण खळखळत्या पाण्याचा तो आवाज वेड लावत होता. पायातली खेटरं काढून गाडीच्या हँडलला लटकवली आणि तसेच अनवाणी पायांनी धबधब्याच्या पाण्यात उतरलो.

IMG_2549.jpgIMG_2550.jpgIMG_2551.jpgIMG_2555.jpg

पायाला होणारा पाण्याचा स्पर्श खुपच सुखावणारा होता. पण तेवढ्यात वरून पावसाचा वेग वाढला, आत्तापर्यंत संथपणे रिमझिमत येणारा पाऊस धो धो करत कोसळायला लागला. पण आता ठरवलं होतं...., आता माघार नाही. थोडा वेळ तसाच पावसात भिजत त्या धबधब्यावर मस्ती केली आणि पुढच्या टप्प्याकडे निघालो.

खोपोलीच्या थोडं अलिकडे आपलं वविचं ठिकाण "युके'ज रिसोर्ट" दिसलं आणि गाडी थांबवली. बायकोला ते दाखवलं, म्हणलं येताना जेवू इथेच. तेवढ्यात तिथेच थोडं अलिकडे रोडवर अष्टविनायकापैकी महडचे देवस्थान अवघ्या दिड किलोमीटरवर असल्याचा बोर्ड दिसला आणि मग तिकडे वळलो. काल गुरूपोर्णिमा होती, म्हणलं त्या निमीत्ताने श्रींचे दर्शनतरी घेवू. वरद विनायकासारखे दुसरे सदगुरू कोण असू शकेल? गाडी मागे वळवली आणि महडच्या दिशेने आत शिरलो. छोटासा नागमोडी रस्ता होता. दोन्ही बाजुला लांबवर पसरलेली हिरवीगार शेते आणि लांबवर दिसणार्‍या धुकाळलेल्या किं ढगाळलेल्या डोंगररांगा वेड लावत होत्या.

IMG_5519.JPGIMG_5520.JPG

मंदीरात जावून दर्शन घेतले. सुटीचा दिवस असुनही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासात श्रींचे व्यवस्थीत दर्शन झाले. अष्टविनायकांपैकी वरदविनायक हा बहुदा चौथा गणपती. नक्की माहिती नाही, पण तिथेच लिहीलेल्या एका स्तोत्रावरुन मी हा अंदाज बांधला...

"स्वस्ति श्री गणनायको गजमुखं मोरेश्वर सिद्धीदहः l बल्लाळस्तु मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम् l लेण्याद्री गिरीजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरे l ग्रामे रांजण सस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलम ll"

IMG_5511.JPG

श्री वरद विनायकाचे मंदीर...

IMG_5516.JPG

अतिशय प्रसन्न असा मंदीराचा परिसर, मागच्या बाजुला असलेला पाण्याचा तलाव. आता तो तितकासा स्वच्छ उरलेला नाहीये.

IMG_5500.JPG

श्रींच्या मंदीराच्या मागे बांबुच्या बेटावर असलेले दत्तगुरूंचे मंदीर दिसले आणि धन्य झालो. म्हणलं चला गुरूपोर्णिमेच्या दिवशी श्री दत्तात्रेयांचे दर्शन यासारखे भाग्य कुठले. धडपडत तिथे जावून पोहोचलो. तर दार बंद. काय तर म्हणे दुपारी १२.३० ते दोन च्या दरम्यान मंदीर बंद राहील. म्हणलं इतर दिवशी ठिक आहे, पण आज गुरूपोर्णिमेच्या दिवशी तरी असल्या नियमांना अपवाद करायला काय हरकत आहे? शेवटी आपणच निर्माण केलेल्या यकश्चित मानवांच्या नियमांना बळी पडलेल्या श्री. दत्तगुरुंचे बाहेरुन दर्शन घेवून परत फिरलो.

मंडपाच्या शेवटच्या टोकाला श्री दत्तगुरूंचे मंदीर आहे...

IMG_5510.JPG

दर्शन घेतले, प्रसाद घेतला. थोडा वेळ तिथे विसावुन परत पुढे निघालो. खोपोलीमधुन खळखळत जाणार्‍या पाताळगंगेचे लहानखुरे पात्र बघायला मिळाले. पाताळगंगेचे पाणी बघितल्यावर आठवण झाली की आपण खुप भिजलोय आणि आता अंगातली थंडी घालवण्यासाठी आपल्याला गरमागरम चहाची प्रचंड गरज आहे.

IMG_5522.JPG

चहा घेतला, खोपोली ओलांडली आणि पावसाने परत हजेरी लावली. पण आता पावसाकडे बघायला फुरसतच नव्हती. आजुबाजुच्या डोंगरांना इतके पान्हे फुटले होते की कुठे पाहू आणि कुठे नको असे झाले होते.

IMG_5531.JPGIMG_5523.JPGIMG_5526.JPGIMG_5528.JPGIMG_5542.JPG

घाटातला ओलावलेला देखणा, नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता मनाला भुरळ पाडीत होता.

IMG_5544.JPGIMG_5547.JPG

गाडी सुरू केली आणि थेट अमृतांजन पॉईंटच्या रोखाने वाटचाल सुरु केली. आता मध्ये कुठे थांबायचे नाही असे ठरवले होते. तरी अमृतांजन पॉईंट ओलांडल्यावर तिथे थोडा वेळ थांबुन फोटो काढायचा मोह नाही आवरला.

IMG_5546.JPG

यावेळी मात्र मी थोडासा चालुपणा केला होता. नेहमीचा जुना महामार्ग सोडून मध्येच एक्सप्रेस वे ला घुसलो होतो. त्यामुळे राजमाची पॉईंटखालचा तो बोगदा ओलांडला आणि गाडी रोड साईडला घेतली. तोपर्यंत मला भीती वाटत होती, कुणी अडवलं तर काय सांगायचं? कारण एकतर एक्सप्रेस वे वर बाईक अलाऊड नाहीये आणि काल जर कोणी अडवले असते तर माझ्याकडे गाडीचे कागदपत्रदेखील नव्हते. पुन्हा एकदा स्वामी समर्थांवर हवाला टाकून ( Wink ) तसेच घुसलो, तर तिथे आमच्यासारखे बरेचसे बायकर्स गाड्या कडेला लावून उल्हास व्हॅलीच्या त्या रांगड्या पण देखण्या निसर्गपुरुषाचे फोटो काढण्यात मग्न झाले होते.

IMG_5551.JPG

आजुबाजुला बरेच लहन मोठे धबधबे होते. जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी. इतके धबधबे एक साथ बघण्याची ही पहिलीच वेळ होती. आम्ही दोघेही त्यांच्यात सामील झालो. बाईक एका बाजुला लावली आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखे एका मागुन एक फोटो काढत सुटलो. तेवढ्यात सौभाग्यवतींचे लक्ष गेले..

"विशल्या, तिकडे बघ, तो 'संतोष जुवेकरच' आहे ना?"

मी तिकडे बघितलं, तर खरोखरच संतोष जुवेकरच होता तो. आपली सँट्रो बाजुला पार्क करून एकटाच हातातल्या मोबाईलने समोरच्या धबधब्याचे फोटो काढण्यात मग्न झाला होता. माझ्या डोळ्यासमोर क्षणार्धात त्याच्या 'पिकनिक'पासुन 'झेंडा'पर्यंतच्या त्याच्या अतिशय समर्थपणे साकारलेल्या भुमिका तरळून गेल्या. तोपर्यंत कुलकर्णीबाई त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याच्याशी गप्पादेखील मारायला लागल्या होत्या. मीही त्यांना जॉइन झालो. विशेष म्हणजे तोही कुठलाही बडेजाव वा फुकटचा अविर्भाव न बाळगता अगदी मोकळेपणाने बोलत होता. थोडावेळ गप्पा मारून त्याने आपली गाडी पुण्याच्या दिशेने पुढे काढली, अर्थात जायच्या आधी आम्ही त्याच्याबरोबर फोटो काढून घेण्याची संधी दवडली नाही.

vavi1.jpg

धबधब्यांचे फोटो....

IMG_5552.JPGIMG_5553.JPGIMG_5556.JPGIMG_5559.JPGIMG_5560.JPGIMG_5563.JPG

चार वाजुन गेले होते. अजुन जेवण व्हायचे होते. त्यामुळे गाडी काढली आणि पुढे निघालो. लोनावळा बायपासपाशी गाडी पुन्हा जुन्या महामार्गावर घेतली आणि तिथुनच मागे फिरायचे ठरवले. तेवढ्यात तिथेच बाजुला एका गल्लीत काही लोक आत जाताना दिसले म्हणुन विचारपुस केली तर कळाले की तिथे कुठलातरी पॉइंट आहे आणि तिथुन धबधबा अजुन जवळून पाहता येतो. लगेचच आम्ही तिथे पोचलो. दुर्दैव म्हणजे मुख्य धबधबा इथुन अजिबात दिसत नव्हता पण आजुबाजुचे लहानमोठे असंख्य धबधबे आणि खास म्हणजे या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेली हिरवीगार उल्हास व्हॅली पुर्णपणे दिसत होती. साहजिकच मी कॅमेरा पुन्हा एकदा सरसावला...! अस्मादिकांनी आपले वैयक्तिक फोटो सेशनही उरकून घेतले.

IMG_5568.JPGIMG_5611.JPG

उल्हास व्हॅली...

IMG_5604.JPGIMG_5624.JPG

धबधबा

IMG_5635.JPG

तिथुन अगदी जड वगैरे म्हणतात तशा अंतःकरणाने परत फिरताना शेवटचा एक स्नॅप मारलाच.

IMG_5638.JPGकाही फोटो टाकायचे राहीले होते ते इथे टाकतोय

IMG_5585.JPGIMG_5587.JPGIMG_5588.JPGIMG_5589.JPG

हो नाही, हो नाही करत एकदाचे परत निघालो. येताना मात्र गाडी राजमाची पॉईंटवरून घेतली. वरून दिसणारा घाटातील वाहतुकीचा मनोरम नजारा आणि खोपोली.

IMG_5639.JPGIMG_5650.JPG

राजमाची पॉइंटवर आणखी एक दोन स्वतःचे फोटो काढून घेतले.

IMG_5642.JPGIMG_5648.JPG

परतीच्या मार्गावर पुन्हा हिरव्यागार झाडीतून, नागमोडी वळणे घेत आजुबाजुचे धबधबे पाहात परत निघालो. परत फिरायची इच्छा होत नव्हती, पण परतणे भाग होते.

IMG_5661.JPGIMG_5665.JPG

येताना स्व. दादा कोंडकेंच्या 'बागेश्री'ला जेवलो. कुलकर्णीबाई युकेज नको म्हणाल्या. जेवण करून परतीचा रस्ता पकडला....

IMG_5674.JPG

उद्यापासुन पुन्हा आठवडाभर रुटीन चालु. पुढचा शनीवार - रवीवार बहुदा भीमाशंकर......! बघू कसे जमते ते !

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

मस्तच रे विश्ल्या सगळे धबधबे आवडले अरे पण पावसापासुन थोडं सांभाळुन रहा की....आत्ताच मलेरियातुन उठलायस ना? Happy .....आता पुढच ववि कधी.........? कुठे?

विशाल, मस्तच वर्णन... आणि फोटोही. <<आजुबाजुच्या डोंगरांना इतके पान्हे फुटले होते की कुठे पाहू आणि कुठे नको असे झाले होत<<>>
खरच.. फोटोंमधे हे इतकं नेमकं पकडलं आहेस....
आणि ते... चाळा...चाळे नव्हेत हे सांगितलस ते किती बरं नै?

आयला, कस्ली धम्माल केलीत लेको! जळलो रे जळ्ळो, अगदी जळून खाक झालो! Proud

(बायदिवे, जुन्या खण्डाळा घाटातुन जाताना मधल्या एका टप्प्यावर एक्स्प्रेसवे वर यावेच लागते व ते अलाऊड आहे, खण्डाळ्याच्या इथे बाहेर पडावे लागते , तर मुम्बईकडे जाताना खोपोलीकरता बाहेर पडावे लागते)

मला तर सुशीची एक कादंबरी आठवली.>>>>

अगदी अगदी विकु...
मला देखील "जाता येता" मधलं ते बुट्कं आठवलं, माझ्याकडे जवळजवळ ६ वर्षे होती बॉबी !
ते एकमेकावर कुरघोडी करू पाहणारे चार जिवलग मित्र आणि त्यांच्यावर सव्वाशेर ठरणार्‍या त्या अफलातून पोरी ! Wink

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

दुनियादारीत पण बाईकवरुन केलेल्या लोनावळा ट्रिपचा उल्लेख होता आणि त्यातलं सुशिचं ते अफलातून वाक्य....
"गाडी जोरात चालवली तर वेगाची मज्जा अनुभवता येते हे खरं, पण त्यामुळे एकमेकांच्या सहवासातला आनंद लुटण्याचा वेळ कमी होतो त्याचं काय?"

सुशि खरोखर ग्रेट होते. त्यांची आठवण करून दिल्याबद्दल खुप खुप आभार.

एकदम मस्त Happy
वविला कुलकर्णीबाईंना का नाही रे आणलंस?

वविला कुलकर्णीबाईंना का नाही रे आणलंस?>>>>

अगं तिचे सोलापूराहून आईबाबा आले होते तेव्हा म्हणून नाही आली ती. धन्स !

बायदिवे, जुन्या खण्डाळा घाटातुन जाताना मधल्या एका टप्प्यावर एक्स्प्रेसवे वर यावेच लागते व ते अलाऊड आहे, खण्डाळ्याच्या इथे बाहेर पडावे लागते , तर मुम्बईकडे जाताना खोपोलीकरता बाहेर पडावे लागते)>>>>

माहितीसाठी आभार लिंबुदा, मी उगाचच घाबरत होतो, आता पुढच्या वेळी राजरोसपणे येइन. धन्यवाद Happy

दाद Wink

मस्त फोटो आलेत. लेका, परत जातांना पुण्याला यायचे ना! आम्ही पुणेकरी श्टाईलने ' आपण जेवण करून आला असालच' असे नसते विचारले! Wink निदान फोन तरी करायचा.

जायला वेळ मिळाला समजू शकतो पण हे सगळं लिहायला आणि मा बो वर धाडायला जमलं याचं प्रचंड कौतुक करावं लागेल तुझं. Happy मस्त मजा आया. Happy

विश्ल्या, साल्या जळवतोयस ना ? असुदे, बाकी सगळंच झकास आहे. Happy

फक्त स्वामी समर्थांवर सारखा "हवाला" टाकल्यामुळे ते सुद्धा "हवाल-दिल" झाल्याचं कुणी तरी कानात कुजबुजलं. येवढंच ... Proud

उम्या म्हणुनच 'बागेश्री'ला जेवुन घेतलं आधी. आणि एकदा जेवल्यावर मग आता काय जायचं पुण्याला, म्हणून विचार बदलला Wink

रैना, आत्या, अज्ञातजी मनःपूर्वक आभार Happy

टवळ्या, विश्वाचा चालक आहेत ते.. त्यांच्यावर हवाला टाकणार नाहीतर काय आम्ही पुणेकरी श्टाईलने ' आपण जेवण करून आला असालच' असे विचारणार्‍या आमच्या उम्यावर टाकायचा काय? Wink उम्या Light 1 घे

एकदम भन्नाट प्रवास आहे मी बर्‍याचदा बाईकवरून हा प्रवास केलेला आहे.पावसाळ्यात तर पावसाशिवाय अजून कोणाची सोबत लागतच नाही. पिंपरी-लोणावळा-खोपोली-कर्जत एकदम निसर्गरम्य प्रवास करता येतो बाईकवर Happy

मस्तच आहे हे ववि आणि फोटोंत टिपलेला नजारा तर वेड लावणाराच.

भज्यांच्या फोटोबरोबर एखादा कणसाचा फोटोही चालला असता आम्हांला. Wink

मस्तच वर्ण॑न.. नव्या मुंबईत राहायचा हाच तर फायदा आहे, मनात आले की अर्ध्या तासात धबधब्यांच्या गावात हजर.. Happy

तो भरपुर पाण्याने पिवळा झालेला धबधबा उल्हास वॅलीचा आहे काय?? मी नेहमी पाहते पण लहान गाडीतुन सेकंदभरच दिसतो आणि पुण्याला लेकीच्या भेटीला जाताना वाटेत गाडी थांबवुन टाइमपास करण्याची अजिबात इच्छाही नसते.. Happy

भज्यांच्या फोटोबरोबर एखादा कणसाचा फोटोही चालला असता आम्हांला>>>>

बायको फ़ोटो काढेपर्यंतही थांबायला तयार होइना आडो, पाऊस होता त्यामुळे हातातलं कणीस गार होवू द्यायची इच्छा नव्हती तिची. आणि कणीस खातानाचा (हावरटाप्रमाणे) फ़ोटो इथे टाकायची परवानगी नाहीये तिची Wink

काही पण म्हणा राव हा पर्सनल वविचा प्लान लइ म्हणजे लईच झाक हाय....

काही तरी बंदोबस्त करावाच लागेल आता....
आनी विशाल राव .... मस्तच मारलीत हा ट्रीप... फोटो जास्त छान कि वृतांत जास्त छान ह्याच्याच विचारात आहे मी आता.

Pages