माझी पत्रिका, माझे ग्रह आणि लग्न- एक हसरी नजर

Submitted by येडाकाखुळा on 16 April, 2008 - 08:25

"गोडीला बरोबर झालेत ना रे?" आईने पृच्छा केली.
"मस्तच झालेत!" नुकत्याच केलेल्या बेसनच्या लाडवावर ताव मारत मी पावती दिली.
"ज्यास्त हदडू नकोस रे. जाड होशील. मग लग्नाला मुली मिळणार नाहीत." भगिनी.
"तू अभ्यास कर ग!" मी.
"अरे हो! आज आपल्याला जांभेकर शास्त्रींकडे जायचे आहे. तुझी पत्रिका दाखवायची आहे." आई.
"जांभेकर शास्त्री कोण हे?" मी.
"पावरफूल ज्योतिषी आहेत. तुझी पत्रिका बघून सांगतील तुझे लग्न कधी होणार ते" बहीण.
"आई, ही भानगड आज कशाला? मी आजच तर आलो आहे."
"आणि उद्या जाशील परत. जाउन तर येउ. बघू काय म्हणतात ते" आई.
"पुढच्या आठवड्यात येईन की परत. त्यावेळी पाहू."
"प्रत्येक वेळी असेच म्हणतोस. मुलगी बघून ठेवलीस की काय एखादी?" ह्या सुमीचे आमच्या बोलण्याकडेच सगळे लक्ष.
"सुमे! तू अभ्यास कर पाहू. आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. नहीतर नापास होशील." मी.
"आईSSS बघ ना. सारखा नापास नापास म्हणतो मला." सुमीने भांडण हायकोर्टात नेले.
"अम्या! असे सारखे म्हणू नये!" आईने सुमीची बाजू घेतल्यावर तिने मझ्याकडे बघून विकेट घेतल्यावर बॉलर करतो तसे हातवारे केले.
"आज जाणे गरजेचे आहे काय?" मी शेवटचा प्रयत्न केला.
"मी तुझी पत्रिका घेउन आज चालले आहे. तुला यायचे असेल तर ये. पण तू यावेस असे मला वाटते" शाब्दिक अर्थाने मला पर्याय दिला असला तरीही माझ्या आईच्या भाषेत ही आज्ञा असते.
"बाबाSSSSSS" मी बाबांकडे धाव घेतली.
बाबा इतका वेळ पेपरमध्ये डोके खुपसून बसले होते. पेपरमधून डोकेही बाहेर न काढता ते उद्गारले "तू आणि तुझी आई काय ते बघून घ्या". एकूण जग माझ्या विरोधी होते आणि मला जाणे भाग होते.
"असे दाखवतो आहे की जायची इच्छा नाही आहे. पण मनातल्या मनात खुष होतोय एक मुलगा" बहिणीने शेवटचा प्रहार करून घेतला.

शास्त्रीबुबा वजनाला जबरदस्त होते. खुर्चीमध्ये त्यानी आपला देह कसाबसा कोंबला होता. तंबोर्‍यासारख्या पोटावर जानव्याच्या तारा लोंबत होत्या. मातकट रंगाच्या धोतरावर ठिकठिकाणी गंधाचे डाग पडले होते. एकूण ते धोतर त्यांच्या मूळच्या मातकट रंगावर खुलून दिसत होते. डोक्यावर गांधीटोपी होकायंत्रासारखी चेहेर्‍याला दक्षिणोत्तर नव्वद अंशाचा कोन करून विराजमान झाली होती. कपाळावर गंधाचे फराटे घामात मिसळून एक नवचित्र बनले होते. मी वधस्तंभाकडे जाणार्‍या चारुदत्तासारखा चेहेरा करून त्यांच्यासमोर बसलो. आईच्या चेहेर्‍यावर एक अगम्य उत्सुकता होती.
"हे तुमचे सुपुत्र वाटते? वाटलेच मला. हॅ हॅ हॅ" आता खरे तर ह्यात हसण्यासारखे काहिही नव्हते. पण शास्त्रीबुबानी कपाळाच्या आठ्या सरळ केल्या. आई सुद्धा "हो. ही ही ही ही" असं म्हणून हसली. मीही मफक प्रमाणात बत्तिशी दखवली.
"पत्रिका पाहू तुमची." असे म्हणून त्यांनी माझ्या पत्रिकेचे अध्ययन चालू केले. त्यानंतर अतीशय जुनाट असे एक बाड त्यांनी जादूगारासारखे मांडीखालून वरती काढले आणि ते माझी पत्रिका वाचण्यात परत गुंग झाले. मधुनच त्यांच्या कपळावर आठ्या पडत आणि मग त्या सैल होत. आई त्यांच्याकडे अगदी लक्षपूर्वक पहात होती. त्यांच्या चेहेर्‍यावर हावभाव बदलले की आईच्या चेहेर्‍यावरही तसेच हावभाव येत. ५/१० मिनिटे अशीच थोडीशी अस्वस्थ वातावरणात पार पडली. मग त्यानी चेहेरा वर केला आणि माझ्याकडे निरखून पाहिले. मी भलताच अस्वस्थ झालो.
"लग्नाचा योग आहे." त्यानी डिक्लीयर केले. आईने नि:श्वास टाकला. वाचलो बाबा एकदाचे असा भाव होता तिच्या चेहेर्‍यावर. जसे काही हे बोलले नसते तर माझे लग्नच झाले नसते.
"मंगळ आहे तुम्हाला! स्ट्राँग! काय?" भुवया उडवत ते बोलते झाले. आता मला काय असे विचारून काय फायदा होता? जसे काही मला मंगळ आहे ही माझीच चूक होती.
"मंगळाचीच मुलगी लागेल." असे संगून बराच वेळ ते राहू, केतू, गुरु, शनी, वक्री, चरण, नक्षत्र, कुठला तरी ग्रह कुठल्या अंशाचा कोन करून माझ्या पत्रिकेच्या कोणत्यातरी स्थानी कसा बसला आहे अशा अगम्य भाषेत बोलत होते. धनस्थान, तनुस्थान असे काहिसे बोलत होते. वास्तविक मला त्यातला एकही शब्द धड कळत नव्हता. तनु हे मुलीचे नाव असते एवढेच मला माहित. आई मात्र एखादा भोळा भक्त अधिकारी पुरुषाकडे त्याच्या सांगण्याले काहिही कळत नसताना भक्तियुक्त आदरभावाने पहतो त्या नजरेने पहात होती.
त्यांचे भाषण संपले आणि त्यानी कागदावर कहितरी लिहिले आणि तो कगद माझ्या हवाली केला.
"हे स्तोत्र रोज १०८ वेळा म्हणा." अतीशय गिचमिड, म्हणजे डॉक्टर लोक प्रिस्क्रिप्शन लिहितात तशा अक्षरात त्यानी ते लिहिले होते. "म्हणजे तुमचे लग्न ठरेल."
"हे वाचून?" मी तीन ताड उडलो. हे म्हणजे सचिन तेंडुलकरने एड्स निर्मूलनाची जाहिरात केल्यामुळे मॅच जिंकल्यासारखे होते.
""होय!" शास्त्री ठामपणे बोलले. "आजकालची पोरे. देवाधर्मावर विश्वास नसायचाच!" शास्त्रीबुवानी दिले आपले एक मत ठोकून.
खरं सांगायचे तर माझा देवावर अगदी पूर्ण विश्वास आहे. देव असलाच पाहिजे हो! नाहितर कोणीही काम न करता आमची कंपनी चालते कशी? पण कर्मकांडावर बिलकुल विश्वास नाही! आणि स्त्रोत्र, मंत्रपठण वगैरेवर आजिबात नाही. काहितरी भाकड कल्पना सगळ्या. आज जग कुठे चालले आहे पहा! नवीन युगात विज्ञानाची कास धरायची सोडून हा काय चावटपणा लावलाय? सांगायचा मुद्दा असा की स्त्रोत्र वगैरे वाचणे मला बापजन्मात शक्य नव्हते. ते माझ्या उच्च व उदात्त जीवनतत्त्वांना पटणारे नव्हते.
"म्हणेल तो! काय रे? म्हणशील ना?" आई माझ्याकडे रागाने पहात होती.
मला तिथे "माता न तू वैरिणी!" हे गाणे जोरात ओरडून म्हणायची खूप इच्छा झाली. ती माझ्या जीवनविषयक नीतिमूल्याना समजूनच घेत नव्हती! पण तिने नुकतेच केलेले बेसनाचे लाडू आणि भडंग माझ्या डोळ्यासमोर आले आणि मी गाणे म्हणण्याचा कार्यक्रम स्थगित केला. आम्ही मुकाटपणे तिथून निघालो.

घरी आल्यावर मात्र माझ्यात आणि आईमध्ये खडाजंगी जुंपली.
"जास्त शहाणपणा करू नकोस! १० मिनिटेसुद्धा लागत नहीत ते स्त्रोत्र १०८ वेळा म्हणायला." माता.
"ते वाचता आले तर! काय गिचमिड लिहिले आहे!!" अस्मादिक.
"मला माहित आहे ते स्तोत्र. मी देते तुला परत लिहून." आईला मराठी भाषेत अत्तापर्यंत लिहिलेली सगळी स्तोत्रे, आरत्या, श्लोक इ. तोंडपाठ आहेत. दिवसभर ती सारखी कहितरी म्हणत असते.
"अगं पण हे असले काहितरी करून माझे लग्न कसे होइल?" मी मुद्दा सोडला नाही.
"रामाने सुद्धा विश्वामित्र ऋषिंच्या आश्रमात तप केले म्हणून त्याना सीतेसारखी पत्नी मिळाली." आई.
"चहा झाला का गं?" इतक्या वर्षांच्या संसारानंतर बाबा स्थितःप्रज्ञ बनले आहेत.
"पण शेवटी वनवासच पदरी आला ना? सुखात एकत्र कितिसे राहिले ते?" मी.
"पालकांच्या आज्ञेखातर गेले ते वनवासात. नाहितर तुम्ही! १० मिनिटे वेळ नाही काढता येत आमच्या इच्छेखातर!" आईने खरे तर वकीले व्हायला पाहिजे होते. कुणालाही हार गेली नसती. सुमीला तर आनंदाचे भरते आले होते. दर दोन मिनिटानी ती दात काढून ख्या ख्या करून हसत होती.
"सुमे! तू म्हणतेस का गं प्रज्ञावर्धिनि स्तोत्र रोज? ख्या ख्या खू खू करत बसली आहे नुसती. जा बाबाना चहा नेऊन दे!" आईने सुमीला क्लीन बोल्ड केले होते. मला जबरदस्त आनंद झाला होता. पॉंन्टिंगला आउट केल्यावर भज्जी जसा नाचला होता तसे नाचण्याची मला अनिवार इच्छा होत होती, पण मी चिडलो असल्याने असे वागणे प्रसंगानुरूप नव्हते म्हणून सर्व मोहान् परित्यज्य गंभीर चेहेरा करून तिथेच बसून राहिलो.
"सारखे ह्यात काय आहे? त्यात काय आहे? सगळा मूर्खपणा आहे. भाकडकथा आहे असे म्हणू नये! लोकाना अनुभव आलेत म्हणून लोक करतात हे सगळे. तुझे वय ते काय आहे? मोठे ज्यावेळी चार गोष्टी सांगतात त्या ऐकाव्या!.........................." आईची बडबड चालू होती. सुमी बाबांशेजारी बसून माझी टिंगल करत होती हे नक्की. मला बाहेरून खुदु खुदु हसण्याचा आवाज येत होता. मधुनच ते टाळ्याही वाजवत असावेत. एकूण ह्या द्वंद्वात माझा दारूण पराजय झाला होता.
"बघू, वेळ मिळाला तर म्हणीन!" मी पराजयाचे सूतोवाच केले.
"हं. म्हणून तर बघ! मिळालीच एखदी सुंदर बायको तर तुझाच फायदा आहे!" आई मिष्किलपणे बोलली.

रात्री बसमध्ये बसल्यावर माझ्या डोक्यात विचारांचे कहूर माजले होते. "ही जुनी लोकं कधी सुधारणार? आपण ह्या भाकड कल्पनांपासून कधी दूर जाणार? जग झपाट्याने पुढे चालले असताना जुनाट रूढीना किती दिवस चिटकून रहाणार? मी हे स्त्रोत्र कधी म्हणणार? माझे मित्र माझी किती टिंगल करतील? माझे लग्न कधी होणार? मुलगी कशी असेल?" त्या विचारांच्या गुरफट्यात मला झोप कधी लागली कळलेच नाही. आणि मला एक स्वप्नच पडले. त्यात एक सुंदर मुलगी माझ्यासमोर उभी होती. ती अतीशय नाजूक आणि गोरी गोरी पान होती. एफ टिव्हीवरच्या मॉडेलला लाजवेल असा सुकुमार बांधा, सोनेरी कांती, गोल देखणा चेहेरा, कोरीव आणि प्रमाणबद्ध भुवया, कुणाच्याही काळजाचा ठाव घेतील असे काळेशार डोळे, गोबरे गोबरे गाल, सरळ नाक, लालचुट्टुक्क ओठ, आणि हे सगळे कमीच की काय म्हणून तिला हनुवटी आणि डाव्या गालाच्या बरोब्बर मध्ये एक सुंदर तीळ होता. तिने पिवळ्याशार रंगाचा ड्रेस घातला होता, लाल पिवळ्या बांगड्या तिच्या नजूक मनगटावर किणकिण आवाज करत होत्या. तिचे लांब रेशमी केस वार्‍यावर हलकेच उडत होते. माझ्याकडे पाहून ती मान दहा अंशाच्या कोनाता झुकवून फार गोड हसली. तिच्या गालावर पडलेल्या खळ्यानी माझा कलीजा खल्लास केला. "तुम्हाला मंगळ आहे?" तिच्या आवाजात बासरीचे माधुर्य होते. मी कशीबशी होकारार्थी मान हलवली. "मला सुद्धा" बांगडिशी नाजूक चाळा करत ती म्हणाली. मग लटक्या रागाने ओठाचे धनुष्यबाण ताणत तिने तीर सोडला "जांभेकर शास्त्रीनी दिलेले स्तोत्र म्हणणार ना तुम्ही?" तो तीर मला अगदी हृदयात टोचला, इतका जोरात टोचला की मला खडबडून जाग आली.

मी आजही पाठ पठण अशा भाकड कल्पनांवर विश्वास ठेवत नाही. स्वप्नाचा अर्थ लावत बसण्याएवढा मी मूर्ख नक्किच नाही. ते स्तोत्र मात्र मी रोज १०८ वेळा म्हणतो. आईचे मन मोडू नये म्हणून. बस्स!!!

गुलमोहर: 

येडाकाखुळा...

खुपच छान लिहिले आहेस रे. एकदम प्रसंग डोळ्यांन समोर उभा राहातो. अन् सगळ्यात छान म्हणजे ते स्वप्नातल्या मुलीचे. काय सुंदर वर्णन केलेस तु. अरे लेकांनो कुठुन सुचते तुम्हाला कुणास ठाऊक. पण खुपच छान आहे. Simply GRE8 @};-

आपला मंदार @};-

लवकरच तुम्हाला पण तुमची स्वप्न सुंदरी मिळो....

छान लिहिलेय! आवडली कथा Happy

मस्तच जमलयं!! अजुन येउ द्या!! Happy

जबरदस्त लिहिलंय. Happy

वाचून मजा आली.

आईला मराठी भाषेत अत्तापर्यंत लिहिलेली सगळी स्तोत्रे, आरत्या, श्लोक इ. तोंडपाठ आहेत. दिवसभर ती सारखी कहितरी म्हणत असते.

"लग्नाचा योग आहे." त्यानी डिक्लीयर केले. आईने नि:श्वास टाकला. वाचलो बाबा एकदाचे असा भाव होता तिच्या चेहेर्‍यावर. जसे काही हे बोलले नसते तर माझे लग्नच झाले नसते.

<<<<<

हे हे मस्त जमलय आवडलं. आई अगदी परफेक्ट. Happy

तुम्ही छानच लिहिलं आहे.. पण "वधस्तंभाकडे जाणार्‍या चारुदत्तासारखा चेहेरा करून", "कोणीही काम न करता आमची कंपनी चालते कशी" हि वाक्यं पु. लं. ची आहेत आणी त्या पुस्तकांची पारायणं करून झालीयत. इतर कोणाच्या लिखाणात original म्हणून ती आली असली तरी खटकतातच !!
-- शकुन

शकुन,
पहिल्या वाक्यात मी "वसंतसेनाघातकी" हा शब्द शिताफीने गाळला आहे Happy . एखादा नवशिका संगीतकार ज्याप्रमाणे आपल्या गुरुच्या रचनांमधून एखादी रचना हळूच चोरतो आणि "ध" चा "म" करतो त्यातलाच हा प्रकार आहे. एक चोरी माफ असावी. दुसरे वाक्य मात्र आमच्या कंपनीलाही तंतोतंत लागू पडते. आर्थात तीही चोरीच. एक माफ केलीच आहे, मग दुसरीही Happy

सही लिहिलंय!! मग स्तोत्र पाठ झालं की नाही अजूनपर्यंत??? Lol

हे पण आवडल....
- अनिलभाई

आवडले. शेवटचे वाक्य फर्मास आहे Happy

मजा आली:)
मस्त लिहीलय : )

अरे, मुलांनी येड्याखुळ्याचा आव आणला ना तरी आई येडी नसते. या बाबतीत मुल आईच मन मोडत नाहीत हे आईला माहीत असत.
बाकी आईचे कॅरॅक्टर मस्त जमलय. आणि मुलगी पण अगदी कुणालाही पसंत पडेल अशीच आहे हं.

धमाल लिहिले आहे Happy काही विनोद फार मस्त आहेत, "चहा झाला का गं", "तंबोर्‍याच्या तारा" तसेच शेवटही. आणि हे ही आवडले की जे बाकीच्यांना जमले नाही ते त्या मुलीच्या एका हसर्‍या नजरेने केले, अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया!

आणखी बरीच वाक्ये पुलंच्या पुस्तकांची आठवण करून देतात "होकायंत्राप्रमाणे", "माझी ही बत्तिशी दाखवली" वगैरे. पण दोन वेळा माफी आधीच मागितली असल्याने आणखी गरज नाही Happy शिवाय खूप वेळा पुलं वाचलेले किंवा ऐकलेले असतील तर तशा वेळेस तीच वाक्ये आठवण्याची शक्यता आहे.

एफ टीव्ही माहीत नाही, पण फॅशन संबंधी असेल असे गृहीत धरून - ती बाकी वर्णने असतील तर तेथे येऊ देणार नाहीत ना? कारण थोडासुद्धा pleasing appearance असेल तर तेथे चालणार नाही. आणि त्यांना लाजवेल असा... म्हणजे हाडांचा सापळाच पाहिजे Happy

अरे व्वा, २ दिवसात २ षटकार मारलेत की.. Happy

हा! हा! मस्त..

छानच लिहिलंय....... मस्तच. एकदम आवडलं!!

मस्त लिहीलंय .. Happy

हे पण मस्त लिहीलय.

रामाने सुद्धा विश्वामित्र ऋषिंच्या आश्रमात तप केले म्हणून त्याना सीतेसारखी पत्नी मिळाली.

LOL

अरे धम्म्माल रे.....!
तंबोर्‍याच्या तारा......... सही !! एकूण मस्तच !!

मस्त! त्या मुलीचे वर्णन काय केलेय. लग्नाळू मुलांची नजर अगदी का रे ही अशी असते? Happy

छान लिहिलय, आता पत्रिका जुळवणे, कांदेपोहे, बोलणी वगैरे भाग येतीलच ना ?

झक्कासच जमलीये. सुरूवातीपासून शेवटपर्यंत.. अखंड आवडली...
येडाकाखुळा (आयडी पण असा घेतलाय ना, 'अहो येडाकाखुळा' म्हटलं तर लोक मलाच दगड मारतिल...), प्रसंग, पात्रं, फ्लो, संवाद... फक्कड जमलेला वांगी-बटाटा रस्सा Happy

अतीशय सुरेख निखळ करमणुक करणारी कथा... मस्त वाटले वाचुन, शास्रीबुवांची वरणन आइचे बोलणे, सचिन तेंडुलकर.. आणि अनेक वाक्ये खल्लास..

माझा प्रतीसाद दिसत नाहिये खालचा ??
असो परत देते..
अतीशय सुरेख विनोदी कथा.. फार फार आवडली. लिहित रहा..
सचिन तेंडुलकर, आणि इतर अनेक वाक्ये म्हणजे ... ग्रेट आहेस..

सुरेख लिहिलय. खुमासदार शैली आणि दर्जेदार विनोद यानी वाचनाची लज्जत वाढते आहे.

छानच लिहिलंय....... मस्तच आवडेश ..

Pages