"काय अम्या! काय चालू आहे?" फोन उचलल्या बरोबर एक अनोळखी अवाज, अगदी साता जन्माची ओळख असल्यासारखा चालू झाला.
"माफ करा, पण मी आपल्याला ओळखले नाही" वैतागलेल्या आवस्थेतही आवाजात जेवढा मऊपणा आणता येईल, तेवढया मऊ आवाजात मी बोललो.
"बरोबर आहे! तुम्ही मोठी माणसं! कशाला आमची ओळख ठेवाल?" अजून नावाचा पत्ता नाही.
"ट्राय कर पाहू. तुला तीन चान्स!"
"सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली" मी आता अगदी चिडीला आलो.
"हा! हा! हा! शाळेत होतास तसाच चिडका राहिला आहेस अजून. अरे मी पंप्या!"
आता माझी ट्यूब पेटली. हा पंप्या! चित्रपटात दाखावतात तसे माझे मन एकदम पंधरा/वीस वर्ष मागे गेले.
पंप्या आणि मी दुसरी ते पाचवी एकाच वर्गात होतो. त्यावेळेत आमच्यात अगदी घनिष्ठ मैत्री जमली. त्यानंतर त्याने पाचवीत बसूनच गणिताचा पाया पक्का करण्याचे ठरवले आणि आमची ताटातूट झाली. पण आमची मैत्री एवढ्याशा कारणाने तुटण्याएवढी लेचिपेची नव्हती. आचरट बोलण्याची तुफान शक्ती, नको त्या ठिकाणी वार्यासारखी धावणारी अचाट कल्पनाशक्ती, आणि शरीराला कष्ट होतील अशी कुठलीही कृती करण्याचा विलक्षण कंटाळा अशा भक्कम पायावर ती उभी होती. पंप्याचे झोपडी वजा घर माझ्या घराजवळच होते. चालत १५ मिनिटांचे अंतर. शाळा सुटल्यावर आम्ही जवळच्या माळरानावर जाऊन मनसोक्त गप्पा मारण्याचा एकसूत्री कर्यक्रम पार पाडत असू. मग त्या गप्पांचा विषय काहिही असे. मारकुट्या रानाडे सरांच्या धोतरात बाँब लावण्याचे कारस्थान असो किंवा शिष्ट सद्या बेंद्रेच्या अंगावर पाल सोडण्याची योजना असो, सगळ्या युक्त्यांचे उगमस्थान पंप्याचे सुपीक डोके असायचे. आर्थात शासनाच्या योजनांप्रामाणे ह्यातली एकही योजना कृतीमध्ये उतरली नाही हे ही तितकेच खरे. अशाच एका संभाषणाच्या दरम्यान पंप्याला एक सक्षात्कार झाला.
"आपल्याला गणितात काही राम वाटत नाही गड्या. आपल्याला असे वाटते की आपण मोठा रहस्यकथा लेखक होणार." मी त्याला नुकत्याचा वाचायला दिलेल्या शेरलॉक होम्स च्या पुस्तकाचा हा परिणाम होता. पंप्याला असे झटके अधून मधून येत असत. मध्ये एकदा त्याला अशोक सराफ व्हायचे होते. त्याच्या बापाने पोराची ही इच्छा ऐकून निळू फुले चा आवतार धारण केला आणि त्याला यथेच्छ झोडपून काढले. "अशोक सराफ होनार म्हने! तिच्यायला! चड्डीची नाडी भी बांधाया येत न्हाई अजून, अन पोराचे नखरे बघा तिच्यामारी." आता चड्डीची नाडी आणि अशोक सराफ ह्यांचा काय संबंध? पण वडीलधार्या माणसाना उलट बोलू नये म्हणून पंप्याने ही शंका विचारली नाही. त्याचे वडील त्यावेली दारू प्यालेले होते हे खरे असले तरिही पंप्या त्याना घाबरला वगैरे नव्हता. आर्थात त्याच्या वडिलांची काही चूक नव्हती. ते मूळचे घाटावरचे. कामधंद्याच्या निमित्ताने गुरे ढोरे घेऊन कोकणात आलेले. रामप्रहरी धार कढून घरोघरी रतीब घालत चार पैसे कमवायचे. त्याची आई सुद्धा चार घरची धुणी भांडी करून संसाराला हातभार लावायची. त्या दोघाना असे वाटायचे की पंप्या ४ बुके पटापट शिकेल आणि कुठेतरी चांगली नोकरी मिळवून घरची गरिबी घालवेल. आता त्यांचा हा सुपुत्र रहस्यकथा लेखक बनायला चालला होता. मला पहिल्यांदा वाटले की पंप्याचे हे ही खूळ ५/१० दिवसात उतरेल. त्यानंतर तोही लेखक बनण्याविषयी बरेच दिवस काही बोलला नही आणि मला माझा समज खरा ठरला अशी खात्री पटली.
एके दिवशी पंप्या हळूच माझ्या घरी आला आणि त्याने वहीचे एक बाड माझ्या हातात दिले. मी हे काय आहे असे विचारायच्या आत तो तोंडावर बोट ठेवत चूप रहाण्याची खूण करत चालता झाला. मी ते बाड उचलून निमूटपणे वाचायला चालू केले. पंप्याने लिहिलेली ती पहिली रहस्यकथा होती. कथा अगदी सुमारच होती पण त्याचा डिटेक्टिव्ह एकदम इंटरेस्टिंग होता. त्याचे नाव होते "हैबतराव". नाव वाचूनच मी अर्धा खल्लास झालो. ह्या हैबतरावाला त्याने कमालिची उपकरणे दिली होती. अगदी एखाद्या अतिरेक्यालाही लाज वाटेल अश्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा ताफा त्याचाकडे असे. दोन्ही बजूनी चालणारी आणि कधिही गोळ्या न संपणारी बंदूक, काचेच्या गोटी एवढे पण अणुबाँब पेक्षा जास्त संहारक आपटबार, पाठिमागचे आणि भिंतीच्या पलिकडचे दाखवणारा चष्मा, लोहचुंबकाचा पट्टा, जगातल्या कुठल्याही टेलीफोन वर बोलू शकणारे घड्याळ, बूमरँग टोपी; हैबतराव ही टोपी पाठलाग करत असताना चोराला फेकून मारायचा, मग ती टोपी अशी उडत्या तबकडी सारखी फिरत जाउन चोराला डोक्यावर प्रहार करून बेशुद्ध करायची आणि परत येउन हैबतरावाच्य डोक्यावर अलगद बसायची. ह्या हैबतरावाकडे तिखटाच्या पाण्याची पिचकारी उडवणारे बूट होते. तो ह्या बुटाच्या सहय्याने चोराच्या डोळ्यात तिखटाच्या पाण्याची पिचकारी उडवायचा. अश्या सर्व अत्याधुनिक साधनासहित हा हैबतराव चिखलात पावलांचे ठसे शोधत आणि चोराच्या विडीच्या राखेचा माग काढत गावभर फिरायचा. हैबतरावाच्या करियरची सुरुवात कोंबडीचे हरवलेले पिल्लू यशस्विरितीने शोधून काढण्याने झाली. त्यानंतर मात्र त्याने खुनी शोधून वगैरे काढला होता. ह्या हैबतरावाच्या जोडीला सखू नावाची एक देखणी सेक्रेटरी सुद्धा होती. कोंबडीचे पिल्लू शोधल्यावर सखूने हैबतरावाला एक झक्कास चुंबन दिले. एकूण हैबतराव भलताच रंगेलही होता तर. मी अगदीच न रहवून त्याचा कथा संग्रह वर्गात प्रसिद्ध केला आणि त्यानंनर पंप्या काही दिवस तोंड लपवत वर्गात फिरत होता. हैबतरावावर न भूतो न भविष्यति अशी टिका झाली. "जल्ला तुझा डिटेक्टिव्ह मेल्या! कुत्रो असतलो काय रे? हुंगीत काय तां फिरतो गावभर?". "त्याच्या बुटात तिखटामिठाचो पानी काय त्याची आईस भरते काय रे रोज रात्री?". "तुझ्या हैबतरावास कोंबडीचो पिल्लू शोधल्यावर आमलेट मिलाला काय रे बक्षीशी म्हनून?". "सखू मोकल्या वेलेत म्हशीचो शेन काढतां काय रें?". अशा अनेक अडचणीत आणणार्या प्रश्नाना त्याला सामोरे जावे लागले. पण पंप्या डरला नाही. साहित्य सेवेचे कार्य त्याने अव्यहत चालू ठेवले. ह्याचा परिपाक एवढाच झाला की हैबतरावाची कीर्ती पंप्याच्या बापाच्या कानी पोहोचली. आम्हाला वाटले तो आता रुद्रावतार धारण करणार, पण असे काही घडले नाही. हैबतरावाच्या लीला ऐकून पंप्याच्या बापाने राक्षसी हास्य केले आणि पंप्याचा पाणऊतारा करणार्या लोकात अजून एका व्यक्तीची भर पडली. "पंप्या! आंघोळीच्या आगुदर माझी चड्डी नी बनियान शोधून द्येल काय रे हैबतराव? माझ्या इडीची राख पसरलेली हाये जिकडे तिकडे! पावलचं ठसं भी गावतील समदीकडे!" अशी खुद्द बापाने सुद्धा त्याची टवाळी चालू केली. "ही सखू कोन रं? पोरीच्या फंदात पडलास तर याद राख!! टक्कुरं तोडून ठेवंन! आता माझं थोबाड बघत हुबा र्हावू नगंस मुडद्या. जा चारान्याच्या मिरच्या आन." असे आईने सुनावले. "मिरच्या कशापाई आनतोस? त्या हैबतरावाला बोलीव, बूटातून मिरचीच्या पान्याची पिचकरी मारलं त्यो!" त्याचा बाप पुन्यांदा कडाडला. परंतु घरच्या ह्या टिकेने व्यथीत झाला तर तो पंप्या कसला? हैबतराव सराईत डिटेक्टिव्ह झाल्यावर त्याने अनेक मोठ्या केसेस घ्यायला सुरुवात केली. कर्नाटकात जाउन त्याने वीरचप्पन नावाच्या खतरनाक चंदन तस्कराला जेरबंद केले. मग वृंदावन बागेत जाउन सखू बरोबर मफक प्रणयनृत्यही केले. त्यावेळी एका कारंजातून ऐनवेळी प्रकट झालेल्या शार्क माशाला त्याच्या टोपीचा प्रसाद खावा लागला आणि फुकट फाट त्याने आपले शिंग मोडून घेतले. हैबतरावाशी पंगा घेणे म्हणजे काय साधी गोष्ट आहे? ह्यानंतर हैबतरावावर भारताच्या पंतप्रधानानी विशेष कामगिरी सोपवली. "तुम अपने देश के सच्चे सुपुत्र हो। दुबई में जाव ओर दावत नाम के पावरफूल अतिरेकी को पकड के लाव। हम तुम्हारा उपकार जिंदगी भर नहीं भूलेंगा।" असे साकडे घातले त्याला. "इसमें उपकार की क्या बात हय? ये तो मेरा देश कू वास्ते करतव्य हय।" असे सांगून हा बहाद्दर दुबई मध्ये दाखल झाला. तिखटाच्या पिचकार्या उडवत त्याने दावतच्या सगळ्या सहकार्याना जायबंदी केले आणि दावतच्या खानपटीला बंदूक लावून त्याला भारतात सादर केले. "हमारे देश में बाँब फोडता हय? हम तुम को नही छोडेगा।" असे म्हणून तो दावातला खतमच करणार होता, पण सखूने त्याला त्याच्या कर्तव्याची जणीव करून दिली म्हणून दावत जिवंत रहिला. हैबतरावाच्या ह्या करामतीनंतर त्याला एकदम जॉर्ज बुश ह्यानी पाचारण केले आणि ओसामा इन लंडन नावाच्या भयानक अतिरेक्याला पकडण्याची कामगिरी सोपवली. पण अतिरेक्याना घाबरेल तर तो हैबतराव कसला? अफ़गाणिस्तानात जाउन त्याने ओसामाला त्याचा गुहेसमोर जाउन द्वंद्व खेळण्याचे अव्हान दिले. ओसामा त्याला इतका घाबरला की तो दाती तृण धरून शरण आला, त्याने हैबतरावाच्या पायावर लोटांगण घातले आणि दयेची याचना केली. हैबतरावानेही मग त्याच्या मुसक्या बांधून त्याला बुश सहेबांसमोर ओढत आणले. त्याच्या ह्या कामगिरी वर खूष होऊन बुश सहेबानी त्याला नोबेल पारितोषिक बहाल केले. एवढेच नव्हे तर त्याला खास मेजवानीला आमंत्रित केले. तिथे सन्माननीय पाहुणे बिल क्लिंटन सखुवर लट्टू झाल्यावर हैबतरावाने सगळ्यांसमोर बिल साहेबाना "यू इफ़ माय सखू ऑन आय कीपिंग, देन आय युवर आईज ब्रेकून थ्रोइंग" असे सुनावले. बिल महशयांची तिथेच पिवळी झाली. सखूवर नजर ठेवतो म्हणजे काय? नसत्या गमज्या नाय पायजेत. आता ह्यानंतर हैबतराव काय नवीन कामगिरी करतात ह्यावर अम्हा सर्वांचे लक्ष लगून रहिले होते.
पंप्याच्या घराजवळच एक तिरळ्या बाब्या रहायचा. त्याचे खरे नाव काय हे कधीही कोणला कळले नाही. त्याचा एक डोळा तिरळा होता आणि सगळे त्याला तिरळ्या किंवा तिरळ्या बाब्या म्हणायचे. त्याला सुरेखा नावाची एक काळीसावळी पोर आहे हे दोन चार टारगट पोरांच्या लक्षात आले. त्यापैकी एकाने आचरटपणे तिरळ्याचे कान भरले. तिरळ्याला असे वाटले की पंप्या त्याच्या पोरीला "सखू" असे म्हणतो आणि त्याच्या कथांमध्ये तिच्याबद्दल कहीबाही लिहितो. मग काय विचारता महाराजा, तो काठी घेउनच पंप्याच्या घरी येउन उभा रहिला. पंप्याच्या आईने बाबापुता करून कशीबशी त्याची समजूत कढली. पण ह्या प्रकारानंतर हैबतरावाला अकाली निवृत्ती घ्यावी लागली आणि महराष्ट्र एका महान कथानायकाला मुकला. ह्या प्रकारानंतर काही दिवसानी माझ्या बाबांची बदली दुसरीकडे झाली आणि आमची गँग पांगली. पुढील शिक्षणाच्या निमित्तने मीही सांगलीला गेलो. पंप्याचा संपर्क त्यानंतर जो तुटला तो आजतागायत.
आणि आज अचानक हा गडी मला फोन करत होता. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.
"पंप्या लेका कुठे असतोस आजकाल?"
"रत्नागिरीतच! मी कुठे जाणार?"
"काय करतोस रे?" मी उत्सुकतेने विचरले.
"छोटेसे हॉटेल टाकले आहे. काका भेटले होते परवा. ते परत रत्नांग्रीत अलेले मला माहितच नव्हते. त्यांच्याकडूनच मिळाला तुझा नंबर. तू रत्नांग्रीत आलास की येऊन जा. किती दिवस भेटलो नाही रे! बरेच बोलायचे आहे".
मलाही बरेच बोलायचे होते पण ऐनवेळी शब्द दगा देत होते. मनाच्या कप्प्यातून कसेबसे आठवलेले चार शब्द गळ्यात अडकून बसले होते अणि अवरायचा प्रयत्न करूनही अश्रू ऐकायला तयार नव्हते!
पंप्याचा डिटेक्टिव्ह
Submitted by येडाकाखुळा on 16 April, 2008 - 05:36
गुलमोहर:
शेअर करा
मस्त वाटली
मस्त वाटली कथा ......
एकदम झक्कास !!!!!!!!!!!!!!!!!!!!
----यतेन्द्र
मस्त ~~~~ Enjoy
मस्त
Enjoy
~~~~~~
~~~~
तुमचं
तुमचं सगळं लिखाण वाचायला हवं आता शोधून.
हे मी
हे मी आत्ताच वाचते आहे ... सहीच आहे तुमचा पम्प्या आणि त्याचा झकासराव!! पुढे काय काय केलं झकासरावाने?
- गौरी
मस्त अजुन
मस्त
अजुन येउद्या हैबतरावान्च्या कथा
. हैबतराव-
अहो
अहो झकासराव नाही , हैबतराव ,
लई भारी .
येडा का खुळा , का नुसताच खुळ खुळा !!!
येकाखु
येकाखु

नेहमीप्रमाणेच हसुन हसुन पुरेवाट.
स्वातीला अनुमोदन. तुमच लेखन शोधून वाचायला हव..
पुढील लेखनाकरता शुभेच्छा.
कसलं सही
कसलं सही लिहिलय! मस्तच! हसवता, हसवता शेवट एकदम मनाला स्पर्शून जाणारा.
ह. ह. पु.
ह. ह. पु. वा.
अहो भलतेच. 'कार्यालयीन वेळेत वाचू नये' अशी तळटीप किंवा वैधानिक का कसला म्हणतात तो इशारा लिहून ठेवत जा हो. इथे हसून हसून हैराण आणि तिकडे ऑफिसमधील लोक हा 'येडा का खुळा' अशा संशयाने बघू लागलेत.
>>"यू इफ़ माय सखू ऑन आय कीपिंग, देन आय युवर आईज ब्रेकून थ्रोइंग"
हैबतरावाला आता सोडू नका. त्याचे प्रताप असेच चालू द्या.
कल्ला
कल्ला !!!
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
एकदम
एकदम मस्तं, फ्रेश !!
<<आता
<<आता चड्डीची नाडी आणि अशोक सराफ ह्यांचा काय संबंध? >>

<<यू इफ़ माय सखू ऑन आय कीपिंग, देन आय युवर आईज ब्रेकून थ्रोइंग">>
हैबतराव अफलातुन.. खरच हे कसं राहिलं वाचायच? छान आहे लेखन.
जबरदस्त कथा...हैबतराव झकासच
जबरदस्त कथा...हैबतराव झकासच
येकाखु.... लय खास लिव्लिया
येकाखु.... लय खास लिव्लिया ग्वाश्ट. आता फुडला भाग बी टाका झटक्यात....
>>ट्राय कर पाहू. तुला तीन
>>ट्राय कर पाहू. तुला तीन चान्स!"


"सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली" मी आता अगदी चिडीला आलो. >>
>>त्याला अशोक सराफ व्हायचे होते. त्याच्या बापाने पोराची ही इच्छा ऐकून निळू फुले चा आवतार धारण केला आणि त्याला यथेच्छ झोडपून काढले >>
येकिखु, छानच लिहीलंय तुम्ही... शेवटी पंप्याचे डिटेक्टीव स्टोरी लिहीण्याचं स्वप्न अधुरं राहून त्याला हॉटेल चालवावं लागलं हे कळताच कथेच्या सुरवातीला जसं हसु आलं होतं तसंच पटकन डोळ्यात पाणी तरळून गेलं. आसू आणि हसू चा संगम छान जमवलाय...
पुलेशु.
Pages