पाऊस - आठवणींनी भिजलेला...

Submitted by dreamgirl on 12 July, 2010 - 03:05

पहिला पाऊस पहीली आठवण
पहीलं घरटं पहिलं अंगण...

कॉम्प्युटरवर मिलींद इंगळेचं गारवा लावलंय. बाहेर पावसाची रिपरिप ऐकू येतेय. कुंद गारवा अंगावर चिरपरिचित रोमांच उठवून जातोय. तोच तो मातीचा खरपूस सुगंध ह्रदयाच्या कप्प्यातील सुप्त आठवणींना हलवून हलवून जागं करतोय. काही आठवतंय...?

पहीली माती, पहीला गंध
पहिल्या मनात पहीलाच स्पंद...

आभाळाने गर्दगडद करड्या जांभळ्या गरत्या ढगांना प्रेमाने कवटाळलं आहे. खिडकीच्या धुरकटलेल्या तावदानांवरून पावसाचे चुकार थेंब ओघळताहेत. तारांना लोंबकळलेले काही थेंब रोप वे ने गवताच्या पात्यांवर अल्लद लँडींग करताहेत. तृणपात्यांवरून घरंगळत घसरगुंडी खेळताहेत. तर उरलेले काही पानांना क्षणभर बिलगून टपाटपा चिखलात उड्या मारत आहेत. काही आठवतंय...?

पहीलं आभाळ पहीलं रान
पहिल्या झोळीत पहीलंच पान...

दूर पलिकडे, आयांना चुकवून आलेली, अर्ध्या चड्डीवरची उघडी पोरे डबक्यात उड्या मारत आहेत. रस्त्याच्या कडेने तपकिरी ओघळ वाहू लागलेत. दोनचार गोजिरवाणी गोबरी पिल्ले त्या ओहोळात कागदी नावा सोडण्यात तल्लीन झालेत. होडी पुढेपुढेच चाललेय- काट्याकुट्यांतून मार्ग काढत, भोवर्‍यांना, खड्यांना चुकवत, दगडांना ठेचकाळत, पावसाचा मारा झेलत...

पलिकडे एकाच छत्रीत निम्मंशिम्मं भिजणारं एक तरूण जोडपं एकमेकांच्या डोळ्यांमधील आभाळात हरवलंय. मुलगी हळूच नाजूकसा गुलाबी तळवा पुढे करते- पावसाचे काही थेंब झेलण्यासाठी! तरूणाच्या डोळ्यांतून तिच्याविषयीच्या कौतुकाचा पूर ओसंडून वाहतोय. त्यांच्याकडे पाहत तुम्ही स्वतःच्याही नकळत गालातल्या गालात हसता. हळूच खिडकीबाहेर हात सरकवता. भुरभुरणार्‍या पावसाचे काही थेंब अलगद तळहातांवर झेलता. त्या थंडगार स्पर्शाने स्वतःशीच शहारता - काही आठवतंय?

पहीले तळहात, पहीलं प्रेम
पहिल्या सरीचा पहीलाच थेंब

भिजलेल्या स्वरांतील गाणं चालूच आहे. उत्साहाने तुम्ही कागदाच्या भेंडोळ्या उलगडता. पेन सरसावता__

"पाऊस म्हणजे हळव्या आठवणी, पाऊस म्हणजे रोमँटिक गाणी, पाऊस म्हणजे धमाल मस्ती, पाऊस म्हणजे गुलाबी सुस्ती. पाऊस म्हणजे मित्रांबरोबर निसर्गरम्य ठिकाणी ट्रेकिंगला जाणं, पाऊस म्हणजे आनंदतुषार अंगावर झेलत बिनधास्त नाचणं, झिम्माड पाऊसधारांच्या वर्षावात चिंब भिजत खरपूस भाजलेल्या गरमागरम खमंग मक्याच्या कणसाचा आस्वाद घेणं. खिडकीतून बाहेरचा पाऊस बघत वाफाळत्या कडक कॉफीचा घोट तोंडात घोळवणं...

पाऊस म्हणजे एकाच छत्रीत निम्मं निम्मं भिजणं किंवा मग घरातच गप्पांचा फड रंगवून समोरच्या डिशमधलं उरलेलं एकुलतं एक झणझणीत कुरकुरीत भजं सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच तोंडात टाकणं. पाऊस म्हणजे __

अचानक तुम्ही थबकता - शब्दांचा पाऊस ओसरल्यासारखे! काही आठवतंय का?
काय लिहीणार बरं पावसाबद्दल? एवढे पावसाळे बघूनही पाऊस तुम्हाला कितीसा कळलाय? आणि समजला असेलच तर तो फक्त अनुभवायचा असतो; निशब्दपणे! हे ही समजलं असेलंच एव्हाना.

कागदाची भेंडोळी तुम्ही गुंडाळून ठेवता- काहीसा उमगलेला पाऊस तसाच अर्धवट ठेऊन!
समोरच्या टेबलावरचा वाफाळत्या चहाचा कप अजून तसाच पडून असतो. आल्याच्या घमघमत्या वासाच्या गर्द तपकिरी रंगाच्या चहाची तलफ आता निवून जाते, त्या कपातल्या गारगोट्या, साय पांघरलेल्या चहासारखीच!

तुम्ही सोफ्यावर रेलता- मान मागे टाकून आणि डोळे अलगद मिटून घेता. काही आठवतंय का?

ओझे मनीचे मनाला, आठवून त्या क्षणाला
सांगावे काय माझे मला, उगाच मनात बावरून

तुमच्या मनात विचारांचे काजळी मळभ दाटून येते. कित्येक दिवसांत असं निवांतपण अनुभवलेलं नाही, उपभोगलेलं नाहीय. नोकरीसाठी गावापासून दूर, आईवडीलांपासून - भावंडांपासून दूर, मित्रांपासून दूर आणि _ तिच्यापासूनही!

घड्याळाच्या काट्यांवर बदलणार्‍या ऋतूंची बदलती कूस जाणवलीही नाही. आईच्या हातच्या लसणीच्या झणझणीत फोडणीच्या आमटीची, शेवग्याच्या शेंगा आणि कोकमं टाकून केलेल्या वर साजूक तुपाची धार धरलेल्या गरमागरम पिठलंभाताची चव अजून जीभेवर रेंगाळतेय. बाबांबरोबरच्या, जगभराच्या सर्व विषयांना स्पर्शणार्‍या विविध गप्पा, वादविवाद.. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळ्यांनी एकत्र केलेल्या दिलखुलास गप्पा, ते हास्यविनोद...

मित्रांबरोबरची कट्ट्यावरची धत्तींग, मुद्दाम छत्री विसरून तिच्या छत्रीत हळूच शिरण्यासाठीची धडपड, त्या छत्रीच्याच आडोश्याने मग हळूच चाखलेल्या पहील्या वहील्या चुंबनाची चव, तिच्या घरी हक्कानं सगळ्या कंपूबरोबर केलेली गप्पागोष्टींची धमाल, चहाच्या वाफाळत्या कपांनी केलेले चिअर्स आणि बश्यांमागून बशा रिकाम्या करत कुरकुरीत खमंग भज्यांचा उडवलेला फन्ना-

भुरभुरत्या पावसात बाईकवरून जाताना मागून घट्ट बिलगलेली तिची उबदार मिठी, हातात हात घेऊन तासनतास तिच्याबरोबर शेअर केलेली भविष्याची सप्तरंगी स्वप्ने- पावसाच्याच साक्षीने! इथे येताना तिच्या टपोर्‍या पाणीदार डोळ्यांमध्ये उतरून आलेलं अख्खंच्या अख्खं आभाळ आणि अशाच बेसावध हळव्या क्षणी गदगदून कोसळू लागलेला अश्रूंचा पाऊस- दोघांनाही चिंब भिजवणारा!
रोजच्या रोज फोन करण्याची ती वचने, आणाभाका - पावसाच्याच साक्षीने!

वर्ष सरत आलं..रोजचे संवाद अनियमित होऊ लागले - पावसासारखेच! नकळतपणे शरीराचं अंतर मनांमध्ये कधी उतरलं कळलंच नाही. मिटल्या पापण्यांमधून गालावर एक कोमट थेंब ओघळतो.

पाऊस हा असा झाला वेडा पिसा
पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज खुणा
डोळ्यांत थेंब पुन्हा

मिलींद इंगळेचा आर्त स्वर जुन्या आठवणींनी तुम्हाला पुन्हा भिजवून जातो.
तुम्ही पुन्हा हलकेच खिडकीबाहेर डोकावता. आताशा पावसाची रिपरिप थांबलेली असते; पूर्णपणे. ढगांच्या उबदार दुलईत गुरगुटून झोपलेला सूर्य, पांघरूण अलगद दूर सारून आळोखे पिळोखे देऊ लागलाय. भिजलेल्या उन्हाची पिवळसर कोवळी तिरीप हलकेच रांगत येते. झाडांच्या पानांना बिलगलेल्या थेंबांना, तृणपात्यांना ओठंगून लोंबणार्‍या थेंबांना, तारांवरून ओघळणार्‍या थेंबांच्या रांगांना एक आगळा चंदेरी झळाळीचा साज चढवते.

दूर क्षितीजावर सप्तरंगांची कमान दिमाखात उमटलेली दिसते. तुम्ही अधाशी नजरेनी तो नयनरम्य सोहळा गटागट पिऊन घेता. आकाश स्वच्छ आणि निरभ्र झालेले असते. स्वच्छ उल्हसित हवा तनामनात अनामिक सळसळता उत्साह फुंकते.

तुम्ही बाल्कनीत येऊन उभे राहता. रंगीबेरंगी छत्र्यांची गर्दी हळूहळू ओसरू लागते. रेनकोट सावरणारी गोजिरवाणी बछडी साचलेल्या पाण्यातून उड्या मारत खिदळत घराकडे परतत असतात. कुठेतरी मध्येच कॉलेजकुमारांचा आणि कन्यकांचा रेंगाळणारा थवा एकमेकांची चेष्टा मस्करी करत एकमेकांवर पाणी उडवत उत्फुल्लपणे बागडत चाललेला असतो. एका कॉलेजकन्येच्या डोळ्यांची भिरभिरती चुकार पाखरे तुमच्यावर स्थिर होतात. काहीसे ओशाळून ती नजर जमीनीकडे वळवते. तुम्ही गालातल्या गालात हसता, स्वतःशीच! काही आठवतंय का?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून...

आठवणींचा पाऊस बरसून गेलेला असतो. तुमच्या मनातील विचारांचं मळभ दूर झालेलं असतं. मनाचं आभाळ लख्ख झालेलं असतं. एक नवा उत्साह तनामनात भरून राहीलेला असतो. तुम्ही लगबगीने उठता. मघापासून निर्जीवपणे टेबलावर विसावलेल्या सुस्त मोबाईलची काही बटणे भराभर दाबून त्यात तुमच्या चैतन्याचा प्रवाह सोडता. समोरचा ओळखीचा, आधी अचंबीत आणि नंतर काहीसा आनंदीत झालेला कातर हळवा आवाज ऐकता आणि मनाचं आभाळ भरून गहीवरून येतं. प्रोजेक्ट्सच्या आणि कामाच्या अतिवर्षावाने भिजलेले पंख घट्ट मिटून बसलेली बावरलेली संवादांची हळवी पाखरे या निवांतपणाच्या उबदार कोवळ्या उन्हात, भिजलेले पंख झटकत पुन्हा किलबिलू लागतात. खूपशा गोष्टी करायच्या असतात; याच पावसाळ्यात, पावसाच्याच साक्षीने!

पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र चिंब भिजलेला..
विझवून चांदण्या सार्‍या, विझलेला शांत निजलेला!

सौमित्रच्या गारवाच्या काही निसटत्या ओळी पुन्हा कानात घुमतात. तुम्ही पुन्हा सोफ्यावर लवंडता- आरामात मागे रेलून, मान मागे टाकून स्वप्नांच्या कुप्या पापण्यांच्या झाकणांनी अलगद बंद करून घेता. जाणवेल न जाणवेल असं अस्पष्ट हसू ओठांवर रेंगाळतं...
आता... काही ठरवताय का?

गुलमोहर: 

ड्रीमगर्ल, खूप खूप आवडला लेख... किती सहज पावसाचे स्वतःचे मूड्स, आपल्यात उतरताना दाखवलेस?
सोबत कवितांच्या ओळी..... सानी म्हणतेय तसं ऑडियो का नाही करत? हे ऐकायला खूप आवडेल....

दादची दाद म्हणजे... आहा... स्तुतीवर्षावात चिंब झाले बरं भिजून...
धन्स गं
ऑडियो?? हा हा त्याचं पण कारण सांगितलंय सानीला... नवर्‍याच्या आवाजात करायला हवं... तो आनंदाने तयार होईल Happy

पुन्हा एकदा..आभार Happy

एखादि कविता एकण आणि अनुभवण ह्यात फरक असतो . ह्या लेखातहि तुमच असच झालय. तुम्हि हे गाण अनुभवलत . त्यातुन मिळणारि अनुभुति अवर्णनिय असते.

एक सुरेख माँटाज उभा केलात मनात -सुगंधित ओल्या आठवणी.. मनाच्या कुपीतून जेव्हा बाहेर येतात ना तेंव्हा पाऊस प्रेयसीसारखा एकटाच कोसळतो.... रात्र समजुतदार होते आणि मनाला कोवळे अंकुर फुटतात.... तेंव्हा पाऊस पडतच असतो... आत्तासारखाच्... लेखन आवडले. लिहिते रहा.

क्या बात है... मी 'वाचलेल्या' पावसांपैकी हा एकदम जवळचा वाटला !!! सौमित्रच्या ओळींना पुरेपुर न्याय देतांना मनातलं ओलेतं सुरेख उतरलय कागदावर... मी वाचलेल हे तुमच पहील लिखाण...एकदम भावलं.... अन येस्स... यानंतर आय बेटर नॉट मिस इट !!!! खुप शुभेच्छा !!!

खुपच सही लिहीलयस Happy
अत्ता बाहेर धो धो पाऊस पडतोय आणि मी हातात गरम गरम कॉफी चा कप घेऊन हे वाचल त्यामुळे आणखिनच मनाल भिडल Happy

Pages