सैर अपरिचित किल्ल्यांची...कावनई, मोरधन

Submitted by आशुचँप on 11 July, 2010 - 14:12

मध्यंतरी माझ्या मामेभावाचा फोन आला.. आम्ही कळसूबाई रेंजचा ट्रेक करतोय..येणार का..
मी म्हणलो एका पायावर...
आणि अस्मादिक सगळी तयारी करून निघाले देखील. माझा भाऊ अमेय आणि त्याचा मित्र स्वप्नील हे दोघे ठाण्यावरून येणार होते. ते माझ्याआधी एकदिवस ट्रेक सुरू करणार होते आणि मला मिळालेल्या सुट्टीनुसार मी त्यांना मध्येच इगतपुरीला जॉईन होणार होतो.
सगळी चौकशी करता लक्षात आले की पुण्यावरून इगतपुरीला जायला सोयिस्कर गाडी नाहीये...(माझ्या वेळेत) त्यामुळे मुंबईवरूनच जावे लागणार असे लक्षात आले. त्यामुळे लळालोंबा करत पुणे ते कल्याण. तिथून कसारा लोकलने कसारा मग तिथून खचाखच भरलेल्या सिक्स सीटरने कशीबशी इगतपुरी गाठली. इगतपुरी स्टेशनवर भेटायचे ठरले होते त्याप्रमाणे येऊन ठेपलो तरी या दोघांचा पत्ता नाही. दोन तिन भिकारी आणि कुत्री सोडली तर कोणीच नाही. फोन लावावा तर दोघांचाही फोन आउट. दुपारी पोहोचलेला मी साडेपाच वाजेपर्यंत तसाच बसून राहीलो. काय करावे हेच कळेना. फोन लाऊन लाऊन कंटाळलो. शेवटी धावतपळत दोघे जण उगवले. त्यांना म्हणे वाहन मिळालेच नाही त्यामुळे ते १०-१२ किमी अंतर चालत आले होते. आता एवढे ऐकल्यावर त्यांना शिव्या घालणे शक्य नव्हते. आणि फोनची बॅटरी संपू नये म्हणून त्यांनी बंद करून ठेवली होती आणि पटकन पोहचू अशा हिशेबात असल्याने त्यांनी सुरू केला नव्हता.
आता संध्याकाळ झालीच होती त्यामुळे एक दिवस वाया गेल्यातच जमा होता. पण स्वप्नीलला ते मान्य नव्हते. इथून आता आपण कावनईला जाऊ आणि रात्रीच किल्ला चढू. हाकानाका. असेही इगतपूरीवर थांबून फायदा नव्हताच त्यामुळे आधी घोटीला पोहोचलो. तिथून जीपच्या टपावर बसून (कारण आमच्या अवजड सॅक पाहून तो जीपवाला तयारच होईना. प्रत्येकाची सॅक आणखी एकाची जागा अडवत होती) कावनई गाठले तोवर अंधार पडू लागलाच होता.

From

कावनई किल्ला आणि त्याच्या शेजारचा बुधला (कावनईकडे जाताना)

गावकर्‍यांचा विरोध मोडून काढत तडकाफडकी कावनई किल्ला चढायला सुरूवात केली. अगदी छोटेखानी किल्ला असल्याने फार वेळ लागणार नाही असा अंदाज होता. त्याप्रमाणे थोडे चुकत माकत तासाभरात गडावर पोहोचलो देखील. पटापट एक मोकळी जागा पाहून तंबू ठोकला. अमेयने मॅगी विथ टोमॅटो सूप असा एक खास प्रकार बनविला होता. त्या इवल्याश्या किल्ल्यावर आम्ही तिघेच, बाहेर कमालीचा गारवा आणि आत आम्ही छानपैकी गरमा गरम सूप आणि मॅगी ओरपत होतो. वाहवा, त्याची आठवण झाली तरी तोंडाला पाणी सुटते.
जेवण उरकल्यावर जवळच्या तळ्याकाठी निवांत पहुडलो चांदण्या मोजत आणि थंडी अगदीच वाढल्यावर निवांत येऊन झोपलो.
दिवस दुसरा -
दुसर्‍या दिवशी सकाळी उठून गडाचा फेरफटका मारला.

From

अस्मादिक...झोप नीट झालेली नाहीये

From

From

From

From

From

सूर्योदयाची काही दृश्ये

खरेतर तर किल्ला एवढा छोटा आहे की त्याला किल्ला म्हणण्यापेक्षा पहार्‍याची चौकी म्हणणे जास्त योग्य ठरेल. त्या इटूकल्या माथ्यावर एक छानसे तळे आणि त्याच्या काठी एक पिटूकले मंदिरही होते. त्यावर छानपैकी भगवा फडकत होता. पाहूनच मन प्रसन्न व्हावे असा देखावा.

From

From

पटापट आवरले आणि दुपारच्या सुमारास गड उतरून खाली आलोदेखील.

From

From

From

From

From

चौघीजणी

खाली आल्यावर गावकर्‍याच्या आग्रहाला मान देऊन तिथून जवळच असलेले कपीलधारातिर्थ हे देवस्थान पहायला गेलो आणि गेल्याचे सार्थक झाले. अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे.

थोडी फोटोग्राफी करून पुन्हा एकदा घोटीला दाखल झालो. घोटी या भागाचे सेंटरप्लेस आहे. वर्तुळाच्या मध्यभागी असल्यासारखे. कोणत्याही गावाकडून दुसर्‍या गावाकडे जाताना घोटीला येऊनच पुढे जावे लागते.
दरम्यानच्या काळात आम्हाला अशी माहिती कळाली ही इथे ताकेद म्हणून एक गाव आहे आणि महाशिवरात्रीला तिथे मोठी यात्रा भरते. त्यामागची आख्याईका अशी आहे की, रामायणात सीतेला पळवून नेताना रावणाची जटायूशी लढाई झाली. त्यात कपटाने रावणाने जटायूला मारले. त्यानंतर सितेला शोधत शोधत राम-लक्ष्मण आले तेव्हा जटायूने कहाणी सांगीतली आणि मरण्यापूर्वी पवित्र तिर्थ प्राशन करण्याची इच्छा व्यक्त केली. रामाने जमीनीत बाण मारला आणि त्या जागेवरून बारा तिर्थांचे पाण्याची धार निघाली. आजही दर बारा वर्षांनी तिथे हा चमत्कार घडतो असे मानतात. त्यामुळे आम्ही जिथे जाऊ तिथे प्रत्येक गावकर्‍याने आम्हाला मोठ्या भक्तीभावाने ही कथा सांगून ताकेदला जायचा आग्रह केला. शेवटी शेवटीतर ही कथा आम्हाला इतकी पाठ झाली की झोपेतही मी ही सगळी कथा सांगू शकेन.
आमचा पुढचा किल्ला ठरला होता मोरधन. पण चौकशी करता लक्षात आले की इथे तो मोराचा डोंगर म्हणून प्रचलित आहे.
"अव हाय काय त्या डोंगरावर, निस्ता भणाण वारा. बाकी काय बी नाय. त्यापरीस ताकेदला जावा. सीतामायला नेताना रावणाचा आनी जटायूचा ....."
आता अशा माहीतीवर काय कप्पाळ कळणार. तरीही नेटाने माहीती काढून खचाखच टेंपोत स्वतला कोंबून घेतले आणि खैरगावला पोचलो.
From

गडावर मुक्काम करायला काही नाही त्यामुळे पोलीस पाटलाचे घर शोधून अवजड सॅक तिथेच ठेवल्या आणि गडाकडे सुटलो.
From

खालून पाहिल्यावर हा किल्ला एखाद्या पाणबुडीच्या आकाराचा वाटतो. पहिल्याप्रथम कळतच नाही वाट कुठे आहे. पण सुरुवातीचा घसारा पार करून गेल्यावर छोटी पायवाट दृष्टीस पडते.

From

From

या बेचक्यातून किल्ल्यावर वाट जाते

From

From

From

मोरधन दुसऱया बाजूने

From

त्या गावकऱयाने सांगितल्याप्रमाणे गड म्हणावे असे काहीही बांधकाम शिल्लक नाही. आणि वारा तर इतका सुसाट की थोड्याच वेळात कान दुखायला लागले. शेवटी कान रुमालाने बांधून गड पायाखाली घातला आणि आल्यापावली परतलो.
तत्पूर्वी सूर्यास्ताची मनोहारी दृश्ये कॅमेरात टिपण्याची संधी दवडली नाही. वाहवा आजचा दिवस फारच मस्त झाला. सूर्योदय कावनईवर आणि सूर्यास्त मोरधनवर.

From

From

किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त

From

सॅक ताब्यात घेताना तिथे जमलेले बाळ-गोपाळ पाहून त्यांचे फोटोसेशन करायचा मोह आवरला नाही.

आणि त्याचा भारी परिणाम झाला. आपल्या पोरांचे फोटोसेशन चाललेय म्हणल्यावर घरातून एकदम पोह्याच्या बश्या आणि गरमागरम चहा आला. पाठोपाठ आम्हाला देवळे फाट्याला जाण्यासाठी टेंपोचीही व्यवस्था करण्यात आली.
अर्थात जाण्यापूर्वी इथेही ताकेदला जाण्यासाठी प्रेमळ आग्रह झालाच. अतिरिक्त माहीती अशी कळाली ही यात्रेबरोबर तमाशाचा फडही असतो. बास, मग काय पाहीजे.
मग खरोखरच आमचे मन दोलायमान व्हायला सुरूवात झाली. माझे म्हणणे होते की आत्ता ताकेदला जाऊ, मस्त तमाशा पाहू आणि दुसरे दिवशी कळसूबाईला जाऊ. पण यात असा प्रॉब्लेम होता की कळसूबाईला जायला उशीर झाला तर उन्हाचे चढायला जाम त्रास झाला असता. आणि स्वप्नीलचा असा अंदाज होता की यात्रा म्हणजे मोठा इव्हेंट आहे तिथे फोटोग्राफीचा चांगला चान्स मिळेल. आम्ही देवळे फाट्याला पोहोचलो तरी आमचे एकमत होईना. फाट्यावर गेल्यावर आम्ही दिसेल त्या गाडीला हात दाखवायला सुरूवात केली. बाहेरगावचे पाहुणे म्हणल्यावर एक म्हातारबुवा पुढे आले आणि त्यांनी चौकशी केली. आम्ही ताकेदला किंवा बारीला (कळसूबाईच्या पायथ्याचे गाव) जायचे म्हणल्यावर त्यांनी मताची पिंक टाकलीच.
"म्या काय म्हनतो, तुमी रातच्याला ताकेदला जावा. उद्या महाशिवरात्र हाये, आनी तुम्हासनी गोष्ट सांगतो, ताकेदला रावण आणि जटायूचे युद्ध झालं व्हत. आनी मंग राम-लक्ष्मण.... " चालूच
त्यांना बरं बरं म्हणून थांबवले. पण ते उत्साहाने आमच्यासाठी गाड्यांना हात दाखवत राहीले. ताकेद..ताकेद म्हणत राहीलो पण एकही गाडी थांबायला तयार नाही. तेवढ्यात एक जीप थांबली. म्हातारबुवांनी मोठ्या सलगीने "काय मंग यात्रेला निघाला जनू" असे करत ड्रायव्हरशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. ती जीप निघाली होती भलत्याच गावाला.. त्यानी विचारले तुमाला कंच्या गावाला जायचं. म्हातारबुवा ताकेद असे सांगतायत तोच स्वप्निलला काय वाटले कुणास ठाऊक त्याने एकदम मागून बारी सांगितले. म्हातारबुवा एकदम तोंडघशी पडले. त्यांची बाजू सावरावी म्हणून मी म्हणालो
"नाही ताकेदलाच जायचय पण बारीला सोडलत तरी चालेल, तिकडून जाऊ आम्ही ताकेदला."
पण अमेयने आपले घोडे दामटलेच.
"अरे आपण बारीलाच जाऊया, ताकेदचा प्लॅन उद्या करूया,"
इतक्या गोंधळाने तो जीपवाला काही न बोलता निघूनच गेला. आणि म्हातारबुवा एकदमच कावले.
"तुमाला कुटं जायाच ते ठरवा आगुंदर, नक्की कुटं जानार हाय तुम्ही? उगाच खालीपिली डोसक्याला तरास"
आणि कहर म्हणजे तडातडा चालते झाले. इथे आमची हसून हसून पुरेवाट झाली. या गोंधळात रात्रीचे अकरा वाजले तरी एकही गाडी नाही, जीप नाही. कोणीही आम्हाला न्यायला तयारच नाही. ताकेदला जाण्याऱया अनेक गाड्या भेटल्या पण त्या आधीच इतक्या खचाखच भरलेल्या असायच्या, त्या फॅमिली-मेंबर असले तर कोणी गाडी थांबवण्याची तसदीपण घेत नव्हते. शेवटी नाईलाज म्हणून जवळच्याच एका हनुमान मंदिरात मुक्काम करून दुसऱया दिवशी सकाळी ताकेदला जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे मंदिराच्या आवारात तंबू टाकला आणि च्याऊ म्याऊ पोटात ढकलून झोपलो.
दिवस तिसरा -
पहाटे पहाटे जाग आली ती पोरांच्या आवाजाने. डोळे उघडले तर तंबूच्या खिडकीतून चारपाच चेहरे आत डोकाऊन बघत होते. एकदम दचकून उठलो आणि कनात उघडली तर एकच गिल्ला झाला.
"आर मान्स उठली रं उठली, उघडालेत..."
आणि जादूचे खेळ पहाण्यासाठी बसतात तशी बालगोपाळ मंडळी, त्यांच्या परकर्‍या ताया, कडेला पोराला घटट् बसवून आलेल्या आया आणि काही बापय गडी. फुल्ल कोरम.... आम्ही तंबूमधून बाहेर कसे येतोय हे पहात बसलेली.

From

आपल्या एकूण एक हालचालींकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत हे कळल्यावर जो ऑकवर्डपणा येतो त्याला कशाची तुलना नाही. वातावरणात जरा बदल व्हावा म्हणून मग आम्ही ताकेदच्या गाडीची चौकशी केली. त्यावरून आम्हाला कळले की आता देवळे फाट्यावरून आम्हाला गाडी मिळणार नाही. सगळ्या गाड्या घोटीवरून भरून येणार. त्यामुळे तुम्ही घोटीलाच जाऊन गाडीत बसा. तेवढ्यात ते कालचे म्हातारबुवा आलेच.
"काय मंग ठरलं का कुटं जायाचं ते. का चाल्ले घरला?"
त्यांना काहीच उत्तर न देता आलीया भोगासी म्हणत आवराआवर केली. चहाची जबरदस्त तल्लफ आलेली पण तेवढ्यासाठी परत स्टो पेटवायचा कंटाळा केला. आजूबाजूला चहा मिळेल असे काही हॉटेल किंवा दुकानही दिसेना. एका घराच्या अंगणात काही पोरे महाशिवरात्रीची आंघोळ करत होती. मग कालचीच युक्ती केली. (फोटो काढा चहा मिळवा). कॅमेरा काढला आणि भराभर पोरांचे फोटो काढायला सुरूवात केली. एवढी प्रसिद्धी मिळतीये म्हणल्यावर गर्दी जमलीच.

मग आणखीही पोरांना आंघोळ घालायला आणले. कहर म्हणजे त्यातल्या एकाची झाली होती त्याला फोटोसाठी म्हणून परत धुवायला त्याची माय निघाली होती.
"अग आये झाली की माझी अंघुळ,"
"मेल्या आनी परत चिखलात गेलास," असे म्हणून पाठीत धपाटा बसला.
सत्य हे नेहमी कटू असते असा अनुभव नोंदवत त्या गरीब पोराने पुन्हा एकदा अंग विसळून घेतले.
दरम्यान, घरातून चहा आलाच. तो पिऊन घोटीच्या दिशेने निघालो. वाटेत नदीवर सर्व विधी उरकले आणि चटचटीत उन्हाचे घोटीकडे निघालो.

मी, अमेय आणि स्वप्नील

तिथे आठवडी बाजारात थोडी खरेदी केली आणि नाष्टा करण्यासाठी हॉटेल शोधत निघालो. थोड्या वेळाने लक्षात आले की गावकरी आमच्याकडे वळून वळून पाहतायत. आता आम्हाला काय शिंगे फुटली की काय असे म्हणत मी मागे या दोघांकडे पाहिले तेव्हा मला उलगडा झाला. झाले होते असे की केलेली खरेदी सॅकमध्ये भरण्याचा कंटाळा केला होता. त्यामुळे माझ्या हातात एक स्टेनलेसस्टीलचा पेला, त्यात लिंबे आणि मिरच्या (पोह्यांची तयारी) आणि एक टूथब्रश (येताना आणायचा विसरलो होतो) आणि खांद्यावरून वेटर घेतात तसा टॉवेल टाकलेला, माझ्या मागे अमेय - त्याने नदीवर कपडे धुतल्यानंतर आपली वस्त्रे सॅकवर बांधून वाळत घातले होते (अगदी अंतवस्त्रेही, आवरा) आणि हातात टोप (मोठे तपेले) तर स्वप्नीलने हाताची नखे वाढली म्हणून नेलकटर घेतला होता आणि तो चालत चालत नखे कापत होता आणि त्याच्या सॅकवर दोन मोठ्या कॅरीमॅटस गुंडाळी करून बांधण्यात आल्या होत्या. भरीस भर म्हणून आमच्या प्रचंड अवजड बॅगा. आता या दृश्याकडे गावकरी वळून पाहणार नाहीत तर काय.
असो, तर नाष्टा कम जेवण करून आम्ही ताकेदच्या दिशेने सुटलो.
जीप ताकेदला पोहोचली आणि समोरचे दृश्य पाहून धसकलोच. जिथे जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी आपली वहाने पार्क केली होती आणि अक्षरश लाखोंच्या संख्येने भाविक लोक मंदिराच्या दिशेने चालले होते आणि चालणे सोडा पाऊल ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती होती. आता करायचे तरी काय अशा विचारात असतानाचा मागून आलेल्या लोंढ्याने आम्हाला ढकलायला सुरूवात केली आणि पाहता पाहत आणि तिघे तीन दिशांना विभागले गेलो.
From

क्रमश
पुढचा भाग
http://www.maayboli.com/node/18212
कळसुबाईच्या दर्शनाला या रं या

हाच लेख मी माझे दुर्गभ्रमण या ग्रुपमध्ये दिला होता. पण काही जणांनी सांगितल्यानुसार जर कोणी त्या ग्रुपचे सदस्य नसेल तर त्यांना हा लेख वाचता येत नाही. म्हणून वेगळ्या नावाने (आणि अधिक फोटोंसह) हा लेख ललीतमध्ये टाकत आहे.
काही चुकले असेल तर आडमिनने मार्गदर्शन करावे...

गुलमोहर: 

हं तेच म्हणतेय, वर्णन व फोटोही बरेचसे तेच आहेत आणि दुसर्‍या लेखाचे काय प्रयोजन???
आशुचॅम्प, इथे फोटोंची क्वालिटी चांगली वाटतेय, काय केलंस?

आडो - यो रॉकने दिलेली आयडीया वापरली. पिकासामध्ये फोटो अपलोड करून त्याची एम्बेडेड लिंक दिली आहे. खासगी जागेत फोटो सेव्ह करून त्याची लींक देणे थोडे व्यापाचे आहे. ही आयडीया खरेच भारी आहे आणि भरपूर फोटो देता येतात.
किशोर - काय झाले योगेशचे, मला शिकावे लागणार आहे वॉटरमार्क कसे द्यायचे ते.
मामी, टिल्लू धन्यवाद

सही ...

किती किल्ले राहिले आहेत माझे Sad लग्नाआधीच करून घ्यायला पाहिजे होते...

"माझे दुर्गभ्रमण" हा concept मला जास्ती काही आवडला नाही.. सगळ्या गडांची माहिती एकाच ठिकाणी असेल तर शोधायला बरे पडते असे माझे मत... असो..

आनंद, माझे लग्न होऊन पाच वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुम्हाला काही हरकत नाहीये लग्न झाले तरी ट्रेक करायला.

छान आहे लेख आणि फोटोपण. एव्हढा मोठ्ठा लेख लिहिलात, तुमच्या पेशन्सची दाद द्यायला हवी खरंच. पुढ्चा भाग कधी लिहिताय? लिहिलात की कळवा प्लीज.

स्वप्ना, मला लिहीतानाच जाणवले जरा जास्तच मोठा झालाय लेख. मग लोकांनी कंटाळून वाचणे सोडून देऊ नये म्हणून तो क्रमश केला.
पुढचा भाग लवकरच टाकतो.

ashuchamp -- योगेश चे फोटो.. दुसर्या कुणीतरीच कॉपी केले माबो /मिपा वरून किंवा कुठून तरी
आणी तेच फोटो मेलातुन फिरत त्याच्या एका मित्रा द्वारे ह्याला आले Proud
म्हणजे ह्यानी काढलेले फोटो.. दुसरे कुणीतरी आपण काढले आहेत असे भासवुन आले
हे नको असेल तर वॉटरमार्क टाका
ह्य लिंक मधे माहिती मिळेल सगळी

किशोर - लिंकबद्दल धन्यवाद. पण माझेही मत थोडेसे त्याच्यासारखेच आहे. अजूनतरी मला असे वाटत नाही माझे फोटो फार उत्तम वगैरे आहेत. त्यामुळे त्यावर मास्टरी येईपर्यंत तरी कदाचित मी वॉटरमार्क द्यायचा विचार करणार नाही. ज्याला वापरायचे असतील त्यांनी वापरावेत खुशाल.