सौ. वनिता रानडे

Submitted by बेफ़िकीर on 8 July, 2010 - 23:25

उदयच्या पहिल्या एसेमेसवरच शांत राहायला हवे होते हे वनिताला लक्षात आलेले होते. पण आता जरासे प्रकरण पुढच्या टप्प्यावर गेलेले होते. मॅनेज करणे भाग पडणार होते. आणि हळूहळू ते प्रकरण निर्जीवही करणे अत्यावश्यक होते. त्यासाठी आवश्यक ती देहबोली, आवश्यक तिकडे संवाद फिरवण्याचे कौशल्य हे स्त्रीमधे उपजत असतेच, पण आणखीन विचारपुर्वक वागावे लागणार असे दिसत होते.

सध्याची अवस्था फार विचित्र होती. चार वर्षांपुर्वी साहिलशी लग्न झाले तेव्हाची गोष्टच वेगळी होती. साहिल रानडे! ब्राह्मण कुळातील या मुलाशी वनिताचे लग्न झाले तेच मुळी एका वादग्रस्त अधिष्ठानवर! कारण वनिता होती मराठा! साहिलकडच्यांना विवाह अर्थातच मान्य नव्हता. पण साहिल प्रत्येक श्वासाबरोबर वनिताची स्मृती काढत आहे हे पाहून त्याच्या घरी जरा गांभीर्याने विचार झाला. घरी म्हणजे काय? तर त्याची आई आणि त्याची मोठी बहीण संगीता जी विधवा होती व माहेरीच पुढचे आयुष्य काढणार होती व ते साहिल व त्याच्या आईला अर्थातच मान्य होते. संगीता आणि आईने कडाडून विरोध करूनही साहिलने वनितालाच या घरची सून करणार ही भीष्मप्रतिज्ञा केली आणि मग मात्र त्या दोघी हादरल्या. एकमेव मुलगा! एकमेव भाऊ! तोही घरातून निघून वगैरे गेला तर दोघींचा उदरनिर्वाह कसा होणार? संगीताला अर्थातच नोकरी होती. आईकडे अन तिच्याकडे आपापले पैसे अन सोनेही होते. पण तरी साहिलचा आधार आयुष्यभर मिळेल या प्रेमाच्या हक्काची भावनाही होतीच!

बरीच चर्चा झाली. वनिताच्या घरच्यांना माहीत नसले तरीही फरक पडण्याचा प्रश्नच नाही असे साहिलने ठासून सांगीतले. त्याच्यामते तो वनिताला पळवून नेऊन विवाह करणार होता.

साहिल रानडे व त्याचे कुटुंबीय पुण्याचेच! वनिता पवार ही अहमदनगरची होती. ज्या सी.ए.कडे साहिल सराव-कम-नोकरीला होता तिथे ही नुकतीच जॉईन झाली होती आणि दोघांचे केवळ सहा महिन्यात जुळलेही होते. तिचे आईवडील नगरला होते आणि ती इथे तिच्या सख्ख्या भावाकडे बिबवेवाडीला राहात होती. रानड्यांचे घर पाषाण विभागात होते. वनिता दोन वर्षांनी लहान होती व बी.कॉम झालेली होती. साहिलचा पाषाणला चार खोल्यांचा चांगल्यापैकी फ्लॅट होता आणि वनिताचा भाऊ मात्र भाड्याने एका फ्लॅटवर राहात होता.

वनिता दिसायला चांगली आहे या व्यतिरिक्त साहिलच्या घरच्यांना दोघांमधील एकही बाब जुळण्यासारखी वाटत नव्हती. ना जात, ना आर्थिक परिस्थिती, ना राहणीमान!

पण साहिलने जवळपास महिनाभर घरात धड वागणेच सोडून दिले. शेवटी संगीताने आईला समजावून सांगीतले अन मग आई तयार झाली.

पवारांकडे तर जास्तच प्रखर विरोध झाला. तो विरोध पाहून खरे तर साहिलच्या बहिणीला अन आईला बरेच वाटले. पवारांच्या मनात आपल्याच ९६ कुळातील स्थळ बघायचे होते.

पण शेवटी आपापल्या घरात वनिता अन साहिलने जोरदार आग्रही हट्ट केल्यामुळे, फारशा नातेवाईकांना वगैरे न बोलवता दोन्हीकडचे केवळ पन्नास, पन्नास पान असे रजिस्टर्ड लग्न व रिसेप्शन उरकून घेण्यात आले.

या गोष्टीला आता चार वर्षे झाली.

त्या दोघांशिवाय कुणालाच हा विवाह मान्य नसल्याने सुरुवातीला अनेक कुरबुरींमधून दोघे आपापला संसार उभा करायची स्वप्ने पाहात होते. पवारांनी तर लग्नानंतर जवळपास संबंध नसल्यासारखेच दाखवायला सुरुवात केलेली होती. वनिताला 'आपल्या वागण्यामुळे आपले माहेर तुटले' याचे तीव्र दु:ख असतानाच आपण निवडलेल्या जीवनसाथीबरोबर आपल्याला राहता येत आहे याचे अद्भुत सुख वाटत होते. त्यातच सहाच महिन्यांमधे साहिलला बड्या पगाराची नोकरी लागली आणि त्याने आणलेल्या भेटवस्तूंपैकी सर्वात महागड्या अन जास्त संख्येने भेटी वनितासाठी आणल्यावर संगीतामधील स्त्रीसुलभ हेवा जागृत झाला आणि तिने मोठे भांडण उभे केले.

या भांडणामुळेच पुढच्या सर्व विचित्र प्रसंगाची मुहुर्तमेढ रोवली गेली.

आज वनिता दुपारी आपल्या पलंगावर पडून रिमोटने उगाचच टी.व्ही.चे चॅनेल्स बदलत हे सगळे आठवत होती.

काय चुकले, कुठे चुकले अन कुणाचे चुकले हे तिला समजेना! मैत्रिणी सगळ्याच नगर जिल्ह्यातील, सासर तुटलेले आणि माहेरच्यांनी जवळपास संबध सोडलेला अन चार वर्षात मूलबाळही न झालेले अशा परिस्थितीत नाही मन रमवायला कोणी ना आधार द्यायला. बाकी पैशाचा प्रश्नच नव्हता.

तिने टी.व्ही. बंद केला आणि ती शांतपणे एका खुर्चीवर बसली. नेमका व मुद्देसूद विचार केल्याशिवाय नेमके काय चुकते आहे हे आपल्याला समजणार नाही हे कळल्यामुळे आज तिने पहिल्या दिवसापासून जे जे आठवेल त्याचा अर्थ, त्याची कारणमीमांसा आपापल्या कुवतीनुसार लावायचे ठरवले.

संगीताताईने केलेल्या पराकोटीच्या भांडणामुळे झाले एवढेच की साहिलने सरळ वेगळे राहण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यावर वनिताने त्याला 'असे करू नकोस' असे सांगीतलेले पाहून संगीता अन तिच्या आईने वनितावर साळसूद व मानभावी असल्याचा व सर्व भांडणांच्या मुळाशी वनिताच असल्याचा आरोप केला. त्यावर वनिताने चिडून काहीतरी उद्गार काढल्यावर संगीताने हातातील तांब्या तिच्या दिशेने फेकला व साहिलने केवळ दोन दिवसात सामान कोथरुडमधे नवा फ्लॅट भाड्याने घेऊन हलवले.

आपल्यामुळे आपल्या नवर्‍याचेही घर तुटले व त्यालाही एकटे पडावे लागले या पश्चात्तापाने वनिता होरपळत होती. साहिल तुटक वागत होता. पण तिच्याशी वाइट वागत होता असे नाही. जवळपास चार महिने वनिताने स्वतः दु:खात राहूनही त्याला मात्र संसारात खूप रस उत्पन्न होईल याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

लग्नाला जवळपास वर्ष होत आले होते. वनिताने नवर्‍याला संसारात आपल्यामुळे काहीही कमतरता भासू नये यासाठी कधीच नोकरी न करण्याचा निर्णय घेतलेला होता. ती सकाळपासून रात्रभर फक्त साहिलला खुष ठेवायचा प्रयत्न करत होती. आणि हळूहळू साहिलचे मन बदलले, आनंदी होऊ लागले.

हा साहिल वेगळाच होता. तो पुर्वीसारखाच, केवळ आणि केवळ वनितासाठी जगणारा साहिल होता.

त्या दिवशीची रात्र वनिताला आठवली... जशीच्या तशी!

साहिल - आईला... महिनाभरात भेटलोच नाहीत नाही आपण??
वनिता - हं! खूप ... खूप लांब लांब गेलोयत सगळे.. फोन करतोस का त्यांना?? मी पण बोलते?
साहिल - जाऊन यायचं?
वनिता - हो?? पण.. आत्ता? साडे दहा वाजलेत..
साहिल - तुला.. खूप त्रास झाला ना आपल्या लग्नानंतर??
वनिता - मला कसला आलाय त्रास?? तुला त्रास झाला माझ्यामुळे..
साहिल - छे.. मला कसला त्रास!
वनिता - परत परत विषय नको म्हणून मी बोलत नाही साहिल.. पण..
साहिल - काय??
वनिता - माझ्यामुळे.. तुझी सगळी माणसे सुटली नं रे??

साहिलने वनिताला जवळ बसवले. तिच्या चेहर्‍यावरून हात फिरवत तो म्हणाला..

साहिल - तुझ्यामुळे माझे, माझ्यामुळे तुझे.. असे काही आहे का आपल्यात? आपण .. एकच आहोत ना?

'आपण एकच आहोत ना'!

काय वाक्य होते ते! तीनच वर्षांपुर्वी त्या घरात बोललेले ते वाक्य! पुन्हा कधी ऐकायलाच मिळाले नव्हते वनिताला..

साहिल - बाय द वे.. लग्नानंतर काही बायका नवर्‍यांना गोड वगैरे बातमी देतात..
वनिता - गप्प बस...
साहिल - अजिबात बसणार नाही... कारण आपल्या लग्नानंतर मी.. म्हणजे नवराच गोड बातमी देणार आहे...

यातील नकळत झालेल्या विनोदावर वनिता बराच वेळ हसतच बसली. तिचे ते निखळ, कुणालाही दुखावण्यासाठी नसलेले हास्य पाहून साहिलला ती आणखीनच आवडली..

वनिता - कितवा लागला म्हणे??

आता साहिललाही विनोद जाणवला. पण आता तोही त्या विनोदात सहभागी झाला..

साहिल - खराखुरा, लीगल म्हणतीयस की एकंदरीत??

वनिता डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहात हसू लागली.

वनिता - इल्लीगल पण आहेत?
साहिल - होते की?? चांगले दोन..
वनिता - कुठेयत मग ते आता??
साहिल - ते आता आपल्या संसारात लुडबुडत नाहीत..
वनिता - मग आता कोण लुडबुडणार आहे?
साहिल - हा किंवा आईचा फ्लॅट आता लुडबुडणार नाही, आता लुडबुडणार डहाणुकर कॉलनीतील चंद्रमा सोसायटीतील थ्री बेडरूम्स, हॉल, किचन फ्लॅट विथ टेरेस..

साहिल त्या दिवशी सरळ वनिताला न विचारताच, सरप्राईझ' म्हणून एक भला मोठा फ्लॅट बूक करून आला होता.

कित्येक रात्रींनंतर ती रात्र वनिताला अन साहिलला खर्‍याखुर्‍या मधुचंद्राची रात्र असल्यासारखी वाटली.

पुढचे दोन दिवस महाशयांनी केवळ आपल्यासाठी रजा काढली आहे म्हम्टल्यावर तर वनिताने पहाटे अडीच वाजताच साहिलला भूक लागली म्हणून त्याला आवडणारा नाश्ता केला.

संसारात जान आली होती दोघांच्या! खरीखुरी जान आज आली होती.

आपले घर! स्वतःचे! ज्या घराचे भाडे द्यावे लागत नाही. जेथे केवळ आपणच मालक असतो. जेथे राजा राणीसारखे राहता येते. आपले घर! कोणत्याही माणसाला व जोडप्याला तर अधिकच खुळावणारी, सुखावणारी कल्पना!

वनिता - ताई आणि.. आई
साहिल - छोड यार... मी काय त्यांना म्हणणार नाही या म्हणून राहायला?? त्या कसल्या येतायत??
वनिता - पण आपण म्हणाय..
साहिल - पाहिजेच.. अर्थात.. आपण म्हणायचेच..
वनिता - ऐक नं! आणि त्या आल्या नं! तर सगळ्यात चांगली खोली..
साहिल - इथे मी एक फ्लॅट बूक करून आलोय ते गेलं कुठेच.. तू पार पलंगाच्या त्या तिकडे...

ते दोन दिवस! त्या दोन दिवसात आजवर केली नसेल इतकी धमाल केली दोघांनी! वाट्टेल तेव्हा झोपायचं, वाट्टेल तेव्हा उठायचं! केव्हाही खायचं! कुठेही जायचं! फक्त आईकडे आणि वनिताच्या दादाकडे मात्र जाऊन आले. पेढे देऊन आले. अर्थात, यांच्या संसारात आता आई आणि ताई येणारच नव्हत्या.

आणि लग्नाला वर्ष झालं त्याच दिवशी गृहप्रवेश झाला. पुजेला मात्र वीस एक नातेवाईक अन आठ दहा कंपनीतले मित्र वगैरे आलेले होते.

आहाहाहाहा! काय फ्लॅट होता तो! व्वा! तीन प्रशस्त बेडरूम्स! दोघांना कशाला हवीय म्हणा इतकी जागा? पण एक आपलं प्रेस्टिज! मोठ्ठं किचन अन जोडून डायनिंग हॉल! लिव्हिंग रूम भरपूर मोठी! आणि मागच्या बाजूला एक टेरेस! चवथ्या मजल्यावरील या फ्लॅटचे आत्ताचे स्वरूप महालापेक्षा कमी नव्हते. नातेवाईक अन मित्र तर बघतच बसले होते. वनिता आज खरोखर राणीसारखी दिसत होती. तिचे लाघवी वागणे अन आदरातिथ्य पाहून सगळेच स्तिमित झालेले होते. नाव काढायलाही या मुलीत एक जागा नसताना यांच्या लग्नाला इतका विरोध का झाला असेल हेच नव्या लोकांना समजत नव्हते. आलेल्या बायकांपैकी बहुतेकांच्या मनात वनिता आणि फ्लॅट या गोष्टींबाबत असूया निर्माण झाली होती. भरपूर हवेशीर, प्रकाशमान फ्लॅट होता तो.

सगळे निघून गेल्यानंतर दोघे अक्षरश: रात्रभर नुसते फ्लॅट बघत अन तो कसा सजवायचा याचा विचार करतच बसले होते.

वनिता - सत्तर हजार होईल साहिल बजेट..
साहिल - बजेट की वो सोचते है..
वनिता - गप्प बस... आपण पेशवे नाही आहोत..
साहिल - पेशवोंकी वो सोचते है...
वनिता - ए तू मराठी बोल रे..
साहिल - मराठी की वो सो..

पुढचे त्याला बोलताच आले नाही. वनिताने तोवर आपले ओठ त्याच्या ओठात स्वतःहून गुंफवलेले होते.

चंद्रमा सोसायटीमधील त्या क्षणाचे सर्वात सुखी व हेवा करण्यासारखे जोडपे होते ते! श्री. साहिल व सौ. वनिता रानडे!

दरवाज्यावर पाटी लागली! साहिल... वनिता!

केवळ पंधराच दिवसात ते सरावले त्या घराला! सरावण्यासारखेच घर होते! साहिल निघून गेल्यावर करायचे काय हा एक मोठाच प्रश्न होता वनितासमोर! टी.व्ही. किती वेळ बघणार? मोबाईलवर कुठल्या तर जुन्या मैत्रिणीला फोन करायचा हे ठीक आहे.. पण किती वेळा? त्यातही दोनच मैत्रिणी होत्या. एक मुंबईला अन एक नगरला! किती बोलणार त्यांच्याशी! सकाळी दहाला एक कामवाली यायची ती दुपारी दिडला सगळेच आवरून निघून जायची. ती फारशी बोलघेवडी नव्हतीच! ती आपली मान खाली घालून काम करत बसायची. सकाळी सहाला दूध अन पेपर यायचे. सोसायटीचा वॉचमन संध्याकाळी सातला सगळ्या मजल्यांवरचे दिवे लावून जायचा. संध्याकाळी पाच, साडे पाचला एकदा भाजी अन काही जिन्नस आणले की झाले! साहिलला यायलाच जवळपास आठ वाजायचे! नऊ वाजता जेवणे! सकाळी त्याला नऊ वाजता निघावे लागायचे! एक सेकंड हँड कारही होती मारुती!

एकंदरीत दिवसातून घराची बेल वाजणार चार वेळा! दूध, पेपर, कामवाली आणि रात्री साहिल यायचा तेव्हा!

साहिलची कमाई भरपूर होती. घरात हळूहळू जवळपास सगळ्याच वस्तू आल्या. केवळ दोन, तीन महिन्यांमधेच घराचा नक्शा बदलला. आता तो एक उच्चभ्रू कुटुंबाचा फ्लॅट आहे हे कुणीही सांगीतले असते.

उदय जैन! एक सत्तावीस वर्षांचा अत्यंत रुबाबदार जैन तरुण शेजारच्या फ्लॅटमधे एकटाच राहायचा! साहिलपेक्षा एखाद्या वर्षाने लहान असेल! साधारण वनिताच्याच वयाचा! जैन असल्यामुळे तो कांदा अन लसूणही खायचा नाही. सायंकाळी सहालाच सुर्यास्तापुर्वी जेवून मोकळाही व्हायचा. स्वतःच बनवायचा! तो काय करायचा घरात ते काही कळायचे नाही. पण खाली स्वतंत्र पार्किंग होते आणि त्यात नवी कोरी ११८ एन्.ई. पण होती.

खरे तर त्याचा विचार करण्याची गरजच नव्हती वनिताला! पण व्हायचे असे की दारासमोर दार! त्याचे दार कायम बंद तसे वनिताच्याही घराचे दार कायम बंदच! पण दोघांचे हॉल, किचन आणि एक बेडरूम यांच्या खिडक्या आणि टेरेसेस हे बरोब्बर समोरासमोर! त्यामुळे तो तिला सारखा दिसत मात्र राहायचा.

कधीकधी तो मोबाईलवर काहीतरी बोलत असायचा. रोज सायंकाळी पावणे सहाला पश्चिमेकडे आकाशात बघून हातातील ताट दाखवायचा आणि काहीतरी पुटपुटत आत जायचा! हाही प्रकार बघून वनिता आता सरावली होती. कारण हा प्रकारच तिने जवळपास आठ दहा वेळा पाहिलेला होता. तिच्या मते हा तरुण बर्‍यापैकी भाविक वगैरे असावा!

तो मात्र हिच्याकडे फारसा पाहायचा नाही. पाहिले तरी हसायचाही नाही. वनितालाही काही घेणे देणे नव्हतेच. ती आपली कधीकधी कुतुहलाने त्याच्याबाबत विचार करायची की हा एकटाच का राहात असेल, काय करत असेल? तो दिवसातून फक्त संध्याकाळी सात ते साडे आठ बाहेर जायचा आणि येताना काय काय घेऊन वगैरे यायचा! भाजी, फळे, इतर सामान वगैरे! त्याच्याकडे सोसायटीचा वॉचमनच झाडू वगैरे करायचा!

खरे तर साहिलशीही त्याची ओळख नव्हती. एकदा असेच झाले. साहिल आपला किचनमधे पाणी प्यायला गेला तर त्याच्या किचनमधे तो चक्क आपले ताट विसळत होता. दोघांची नजरानजर झाली. क्षणभर साहिलला वाटले की हसावे. पण तो हसलाच नाही. त्याने ताट ठेवले व बेडरूममधे निघून गेला.

साहिल - हे येडं कोणेगं शेजारचं?

वनिता हसायला लागली.

वनिता - का?
साहिल - एकटंच राहतं!
वनिता - हो क्का! मग तू तर म्हणतोस की लग्नाआधी बरं होतं! खुशालचेंडू होतो..
साहिल - नाही.. ते होतोच... पण हा साधा हसतही नाही..
वनिता - कशाला हसायचंय? त्याचं घर आहे ते! हसेल नाही तर नाही..
साहिल - तुला देतो का ओळख?
वनिता - छे बाई! पण फार देव देव करतो तो..
साहिल - कशावरून??
वनिता - संध्याकाळी आकाशाला नैवेद्य वगैरे दाखवतो.. एक दोनदा मी बघितलंय..
साहिल - झेंगटंच दिसतय या वयात..
वनिता - या वयात म्हणजे?? मग या वयात काय करायला पाहिजे??
साहिल - या वयात.. तुझ्यासारख्या एखाद्या सुंदर मुलीशी लग्न करू..
वनिता - बास बास! सुंदर मुलीला घरात दिवसभर एकटं ठेवायचं अन स्वतः फिरत बसायचं..
साहिल - फिरत?? मी उदरनिर्वाहासाठी राबत असतो आपल्या..
वनिता - अन मी संसार करण्यासाठी..
साहिल - तुला काय राबावं लागतं गं??
वनिता - काय लागतं?? तुला काय वाटतं मी नुसती बसते??
साहिल - ती अरुणाबाई येते की कामाला.. आहे काय काम??
वनिता - हो का?? मग आता उद्यापासून मी कामच करत नाही.. त्या अरुणाबाईलाच करुदेत सगळं!

आणखीन चार महिने गेले! लग्नाला आता दिड वर्ष झालं होतं! आणि एका रविवारी सकाळी नऊ वाजताच दारावरची बेल वाजली. कुणी यायचंच नाही त्यामुळे दोघेही आळसावून नुसते टी.व्ही, बघत बसले होते. वनिता उठली अन दार उघडले तर.... उदय जैन!

उदय - नमस्ते भाभीजी.. नमस्ते रानडेसाहब..

एकदम हा आल्यामुळे दोघेही गडबडलेच! सगळा पसारा तसाच होता. वनिता घाईघाईत सगळे आवरायला लागली. तोपर्यंत तो उदय जैन बोलायला लागला होता. तिकडे तिने चहा टाकला.

उदय - जी.. ये.. इन्व्हिटेशन है..
साहिल - किस चीज का?
उदय - मैने उपरका फ्लॅट भी खरीद लिया है..

या वाक्यावर दोघे उडलेच. हा श्रीमंत आहे हे त्यांना माहित होते, पण एकट्याला इतकी जागा कशाला

साहिल - अच्छा? कॉन्ग्रॅट्स?? अरे वा? उसी रेटमे या..
उदय - नही.. अब तो पाचसौसे रेट बढ गया है भाईसाहब..
वनिता - कॉंग्रॅट्स..
उदय - बहोत बहोत शुक्रिया भाभीजी.. सारे सोसायटी को बुलाया है..आज रात मेन टेरेसपर..
साहिल - अरे बापरे..
उदय - आप दोनोने आना ही है! कॉकटेल डिनर पार्टी है..

वनिताने साहिलकडे पाहिले. त्या पाहण्यात बरेच काही होते. एक म्हणजे आजवर विशेष ओळख नसताना आपण एकदम जेवायला जायचे का? दुसरे म्हणजे खरच सोसायटीतले सगळे येतील की फक्त एक दोन फ्लॅटमधलेच लोक? हा एवढा भाविक वगैरे असूनही कॉकटेल पार्टी कशी काय? आणि असलीच तर साहिल घेणार आहे का!

साहिलने निर्णय देऊन टाकला.

साहिल - राईट.. हम आयेंगे.. आठ बजे ना??
उदय - जी हां! भाभीजी.. आपको भी आना है..

वनिता कसनुसं हसत हो म्हणाली. मग त्याने चहाची तारीफ सुरू केली.

उदय - ऐसी चाय मेरी भाभी बनाती थी.. बहुत मिस करता हू ऐसी चाय..
वनिता - आप कभीभी आया कीजिये.. हम बनादेंगे चाय..
साहिल - आप कहांसे है??
उदय - जी.. वैसे तो राजस्थान.. लेकिन बेस्ड अ‍ॅट बॉम्बे है आजकल..
साहिल - फॅमिली?
उदय - मा और पिताजी राजस्थानमे है.. भैय्या है बॉम्बेमे.. लेकिन मुझे बॉम्बे छोडके यहा आकर भी दो साल होगये..
साहिल - आप क्या.. कुछ ... बिझनेस??
उदय - जीं हां! सारी का होलसेल ट्रेडिंग.. भाभीजी.. आप आईये ना एक बार देखनेको.. काफी सॅम्पल्स है सारीजके अपने घर पे..
साहिल - तो अभी.. ये .. उपरके फ्लॅटमे कोई....
उदय - नही नही.. किराये पे दे दुंगा... इन्व्हेस्टमेंटके लिये लिया है..

गुंतवणूक म्हणून आणखीन एक फ्लॅट घेणारा हा माणूस अजबच वाटत होता या दोघांना! वनिताला या माणसाच्या आत्ताच्या घरात साड्यांची अनेक सॅम्पल्स आहेत ही माहिती फारच कुतुहलजनक वाटत होती. पण याच्याकडे कसे काय जायचे??

रात्रीच्या पार्टीत साहिलने एकच ड्रिंक घेतले. ड्रिंकचा जरी उदयने आग्रह केला नसला तरी खाण्याचा मात्र भरपूर आग्रह केला. त्या निमित्ताने सोसायटीतील जवळपास पंधरा माणसांच्या ओळखी झाल्या. उदयने केलेल्या आग्रहामुळे काहींनी मात्र उल्टी होईल इतकी दारू प्यायली. एकेक नाटकेच चालली होती. मेन्यु मात्र अफलातून होता. कुठून केटरर्स आणले होते त्याने माहीत नाही. खरे तर फ्लॅट घेतल्याची इथल्याच लोकांना कशाला पार्टी द्यायची हेच कुणाला समजत नव्हते. पण तेही समजले. पार्टी संपता संपता पिऊन टाईट झालेल्या कमिटीच्या मेंबरांना उदय जैनने सांगीतले. कदाचित काही वेळा जास्त स्टॉक आला तर इथे ठेवणार आहोत. नाही म्हणण्याची कुणाची नैतिक कुवतच राहिलेली नव्हती. आणि त्याच वेळेस वनिता...

उदयच्या आत्मविश्वासयुक्त वावराकडे आणि अत्यंत सभ्य वागणुकीकडे नाही म्हंटले तरी जराशी आकर्षित होऊनच पाहात होती जे...

तिच्या डोळ्यात उदय जैनने केव्हाच वाचलेले होते...

त्या रात्री घरी आल्यावर साहिलची 'दारुडा' म्हणून केलेली थट्टा, मग साहिलने लटकेच रागावणे आणि मग मध्यरात्रीपर्यंत हसत बसणे यातच वेळ गेला. पण दुसर्‍या दिवशी दुपारी मात्र घाईघाईत घरी आलेल्या साहिलने 'चेन्नई, आठ दिवस' हे तीन शब्द उच्चारले अन वनिताच्या डोळ्यात पाणीच आले.

आठ दिवस? काय करायचं मी इथे?? तिला काही समजेनाच! त्यात पुन्हा ऑफिशियल टूरमधे आपण कसे जाणार? आणखीन पण दोघे जाणार होते. गिरीश आणि कुसूम! आपण गेलो तर ते म्हणतील मग आमच्याही घरच्यांना आम्ही नसते का आणले??

दर दोन तासांनी फोन करेन, येताना तुला तिकडून काहीतरी खास आणेन आणि आल्या आल्या तीन दिवस तरी सुट्टी घेईन या हवाल्यावर आणि दहा मिनिटांच्या न सुटणार्‍या मिठीनंतर दोन बॅगा हातात घेऊन साहिल दारातून बाहेर आला तर उदय लिफ्टमधून वर येत होता.

उदय - अरे?? आप लोग जा रहे है कहीं क्या?
साहिल - मै जा रहा हूं! चेन्नई! एक आठ दिन के लिये.. थोडासा.. ध्यान रखिये..
उदय - जी जी.. बिलकुल फिकर मत करीये आप..

वनिताला साहिलचा रागच आला. या ठोंब्याला कशाला सांगायचं मी एकटीच आहे ते अन म्हणे लक्ष ठेवा!

साहिल गेल्यानंतर मात्र तिने मन रमवायचे विविध उपाय शोधून काढले. घर आवरण्यात एक दिवस, नवीन काहीतरी वस्तू आणण्यात एक दिवस, लायब्ररी लावून पुस्तके आणण्यात वेळ घालवणे वगैरे! टेरेसमधे ती फिरकलीच नाही. हा येडा आकाशाकडे ताट दाखवून काहीतरी पुटपुटत असायचा उगीचच! खिडकीतून तिला अधून मधून उदयचे अस्तित्व दिसत हिते तेवढेच! पण तो तर तिच्याकडे बघतही नव्हता.

अगदी दोन, दोन तासांनी वगैरे नाही.. पण दिवसातून तीन वेळा तरी साहिलचे फोन तिला येतच होते. रात्री तीच एक फोन करायची नऊ, सव्वा नऊला! गिरीश आणि तो एका रूममधे होते अन त्या कुसूमला एका वेगळ्या रूममधे ठेवले होते. तिघांची जेवणे साडे आठच्या सुमारास होतात हे वनिताला माहीत होते.

चवथ्या दिवशी मात्र काहीतरी वेगळे घडले. म्हणजे... साहिलचे दिवसातले तीन फोन आले.. पण रात्री वनिताने त्याला केलेला फोन त्याने उचललाच नाही. एकदा, दोनदा, तीनदा.. किमान आठ कॉल्स केले तिने! हरवला की काय मोबाईल? की सायलेंटवर आहे?? की मीटिंग अजून चालूच आहे?? काहीच समजेना! नेमका त्या गिरीश अन कुसूमचा नंबरच नव्हता तिच्याकडे! पुण्यातले ऑफीस तर आत्ता बदच असणार होते. काय करायचे??

रात्रीचे साडे दहा वाजले तसे तिने आणखीन चार वेळा कॉल्स केले. तरीही उचलले जाईनात! काही झालं तर नाही ना याला? समजायचं कसं! अर्थात, मनात वेगवेगळे विचार येतात म्हणा.. जे सगळ्यात वाईट त्याचा विचार मन आधी करतं म्हणून! बाकी काही नाही..

जागीच राहिली ती! आणि ... रात्री चक्क एक वाजता साहिलचा कॉल आला.. पण तरीही...

त्या कॉलवर साहिल बोललाच नाही.. गिरीश बोलला..

गिरीश - हां वहिनी.. गिरीश बोलतोय मी.. साहिलला तुम्ही फोन करत होतात ना..
वनिता - साहिल कुठंय??
गिरीश - इथेच आहे.. अहो विशेष काही नाही.. जरा गम्मत चाललीवती.. आज त्याने खूप ड्रिंक घेतलं.. आणि त्याचा फोन त्याच्या रूममधे अन तो माझ्या रूममधे! आत्ता त्याला मी त्याच्या रूममधे आणलं तेव्हा तुमचे मिस्ड कॉल्स बघितले.. आता बराय तो.. झोपलाय.. सकाळि तुमच्याशी बोलेलच..
वनिता - अहो.. पण.. इतकी कशी घेतली त्याने??
गिरीश - अहो वेडाय.. मजा म्हणून पैज लावली क्लाएंटबरोबर.. बाकी काही नाही..
वनिता - पण.. तुम्ही दोघे.. एकाच रूममधे आहात ना??
गिरीश - नाही नाही.. रूम्स लहान लहान होत्या.. आम्ही सेपरेट रूम्समधे आहोत..
वनिता - अहो... तुम्ही आजच्या दिवस झोपाना त्याच्या रूममधे ..
गिरीश - बर बर! तुम्ही कालजी करू नका... तो व्यवस्थित आहे..
वनिता - बेशुद्ध झालेत का ते?

गिरीश हसायला लागला. त्याने बराच वेळ समजावून सांगीतल्यावर मग वनिता जरा शांत झाली. पण त्या रात्री काही तिला झोप आली नाही. पहाटे पाचला तिने पुन्हा फोन लावला तर साहिलनेच घेतला.

साहिल - काय गं? काय झालं?
वनिता - साहिल काय झालं काय? तू कसा आहेस आता??
साहिल - मी कसाय म्हणजे?? झोपलोवतो मी.. आत्ता काय फोन केलास..
वनिता - अरे? तुला काल किती त्रास झाला.. काहीच वाटत नाही?? इथे मी जागीय रात्रभर..
साहिल - का?
वनिता - अरे फोन बघ की तुझा? वीस फोन केलेत मी रात्रभरात..
साहिल - अग पार्टी चालली होती.. आणि माझा फोन चुकून गिरीशच्या रूमवर राहिला होता..
वनिता - साहिल.. गिरीश तुझ्याबरोबर नाहीये त्या रूममधे?
साहिल - छे? क्का? तो इथे कसा असेल?
वनिता - मग आत्ता फोन तुझ्याकडे कसा आला??
साहिल - अगं त्याने दोन वाजता मला उठवलं अन आणून दिला म्हणे चुकून राहिला होता.. मला असला राग आला.. सकाळी नाही का देता येत??
वनिता - तू काल खूप घेतलंस ना ड्रिंक??
साहिल - खूप वगैरे नाही.. कुणी सांगीतलं? च्यायला त्या गिर्‍याच्या.. उगाच पेटवत असतो..
वनिता - खरं सांग..
साहिल - अगं.. मी घेतली हे बरोबर आहे.. पण इतकी नाही काही..

एकंदरीत काल रात्रीचे टेन्शन पूर्णपणे गेले होते वनिताच्या मनावरून..पण... पण.. आज पहिल्यांदाच एक गोष्ट झाली होती... जी.. आजवर झालेलीच नव्हती... ती म्हणजे..

वनिताला तिच्या मनाने असा कौल दिला होता की साहिलच्या बोलण्यात आत्मविश्वास नाही... कुठेतरी काहीतरी घोळ आहे.. आणि या भावनेने आता तिचे मन पोखरायला सुरुवात केली..

त्या दिवसभरात तिने साहिलची मीटिंग असेल, काम असेल वगैरे कसलाही विचार न करता सरळ त्याला आठ फोन केले. तरीही तो शांतच होता. ती मात्र त्याला 'आज रात्री घेऊ नकोस' असे प्रत्येक फोनवर सांगत होती.

आणि रात्री साडे आठला तिने केलेल्या नवव्या फोनवर तिने तेच वाक्य उच्चारल्यावर तिला आजवर बघायला मिळालेला नव्हता तो साहिलचा अवतार बघायला मिळाला..

साहिल - व्हॉट द हेल इज गोईंग ऑन?? आं?? काय चाललंय काय तुझं? काळ नाही, वेळ नाही केव्हाही आपला तुझा हाच फोन की घेऊ नको घेऊ नको.. मी काय वेडाबिडाय?? वेडाय का मी?? पुन्हा हे मला सांगीतलस तर बघ..

'खट्ट'!

फोन बंद! भयंकर घुसमट झालेल्या वनिताने हळूच एक एसेमेस पाठवला.

'आय अ‍ॅम सॉरी.. तुझ्याच काळजीमुळे मी असे केले.. रागवू नकोस.. उत्तर पाठव"

त्याला उत्तर आले.

"मी आता झोपणार आहे, दमलो आहे.. डिस्टर्ब करू नकोस"

तीही रात्र वनिताने जागूनच काढली. पण यावेळेस ती काळजीत नव्हती. यावेळेस ती मुसमुसत होती.

उरलेले तीन दिवस कसेबसे गेले अन साहिल उगवला! रात्री दहा वाजता तो घरी आला. वनिता सहा वाजल्यापासून त्याला फोन करत होती पण आऊट ऑफ रीच होता. विमानात मोबाईल बंद ठेवावा लागतो हे तिला माहीत होते. पण फ्लाइट तर साडे सहालाच लॅन्ड होणार होती. याचा फोन साडे नऊ वाजले तरी कसा काय लागत नाही हे तिला समजत नव्हते. शेवटी साडे नऊला लागला. साहिलचा आवाज किचित जड येत होता. वनिता फोनवर जवळजवळ ओरडलीच.

वनिता - अरे काय हे साहिल?? फोन का लागत नाहीये तुझा??
साहिल - येतोय, येतोय, येतोय.... कटकट करू नकोस.. फोन ऑन करण्याचे लक्षात नव्हते..
वनिता - आहेस कुठे तू??
साहिल - इथेच.. जंजीरा..
वनिता - जंजीरा म्हणजे??
साहिल - तुला आता काय सगळे डिटेल्स द्यायचे का मी?? अर्ध्या तासात येतोय..
वनिता - साहिल तू... तू.. पितोयस?? पितोयस ना??
साहिल - येस्स माय डिअर.. येस्स.. आय अ‍ॅम अ‍ॅट द टॉप ऑफ द वर्ल्ड राईट नाऊ..

यावेळेस वनिताने खाडकन फोन आपटला. मात्र तो अपमान साहिलला सहनच झाला नाही. त्याने जंजीरामधूनच तिला बारा कॉल्स केले. तिने एकही उचलला नाही. मग मात्र तो सामान घेऊन रिक्षेने घरी आला. दार उघडून आत आल्या आल्याच अत्यंत तीक्ष्ण आवाजात ओरडला..

साहिल - कॉल्स का घेत नाहीयेस तू?? आं?? कॉल्स का घेत नाहीयेस??

वनिताने सरळ त्याच्याकडे पाठ फिरवली अन म्हणाली..

वनिता - जेवण ठेवलंय टेबलवर... जेव अन झोप..
साहिल - जेव अन झोप म्हणजे?? हू आर यू टू टेल मी जेव अन झोप??
वनिता - साहिल.. आत्ता इथे तमाशा होईल.. तू जेव आणि पड जरा.. आपण उद्या बोलू..

दार उघडेच होते.

साहिल - नो उद्या बिझिनेस.. माझं घर आहे.. इथे काय झालंय ते मला समजायलाच पाहिजे..

वनिता ही कितीही सालस अन लाघवी स्वभावाची असली तरीही तिला दोन गोष्टी समजतच नव्हत्या. एक म्हणजे याला केवळ आठ दिवसात असं व्यसन कसं लागलं? आणि दुसरं म्हणजे याच्याशी आत्ता डील कसं करायचं? ओरडाआरडा केला तर तमाशाच होईल! करायचं काय??

तेवढ्यात विचित्र प्रकार घडला. समोरच्या उदयने त्याच्या फ्लॅटचे दार उघडले अन तो सरळ यांच्याकडे बघू लागला. आता त्याच्या तोंडावर दार बंद करणेही योग्य ठरले नसते. वनिताने साहिलला आतल्या खोलीत नेण्यासाठी त्याचा हात धरला तर साहिल ओरडला..

साहिल - डोन्ट टच मी यू.. हाऊ कॅन यू टच मी.. काय झालंय काय? फोन का घेत नाहीस?? नवराय तुझा नवरा मी.. माझे फोन घेत नाहीस??

उदय हा प्रकार पाहात आहे हे पाहून वनिता शरमेनी काळी ठिक्कर पडली. तिने आता भीडभाड न बाळगता सरळ उदयच्या समोरच दार लावून टाकले. आणि ती तसे करत असताना नेमके साहिलने उदयला पाहिले. तिने दार लावल्यावर साहिल आणखीनच ओरडला..

साहिल - तो कसा काय आत्ता दारात उभा होता.. ????

आता मात्र वनिताचा संयम सुटला.. तीही ओरडलीच...

वनिता - यू.. युवर व्हॉइस ब्रॉट हिम देअर.. तुझं किंचाळणं ऐकून तो दारात आला.. आणखीन किंचाळलास तर बाकीच्या घरांमधलेही येतील.. तेच तुला सांगतीय.. आत्ता तमाशा होईल.. उद्या बोलू.. तू जेव अन झोप..

हे मात्र साहिलला पटलं असावं! दुसर्‍या दिवशी उठलेल्या साहिलचे डोके प्रचंड दुखत होते. त्याला भयानक पश्चात्ताप झालेला होता.

तो सरळ स्वयंपाक घरात उभ्या असलेल्या वनिताच्या पाठमोराच गळ्यात पडला अन म्हणाला..

साहिल - आय हर्ट यू... ऑफुली सॉरी...

आणि मग दुपारी समजलं! कुसूम अन गिरीश दोघेही पिण्यात तरबेज होते. त्यांच्याबरोबर साहिल दुपारीही लंचटाईमला बाहेर जाऊन ड्रिंक घेत होता चेन्नईला! एक दिवस ते तिघेही दुपारीच घेऊन आल्याचे कळल्यावर क्लाएंटकडचे लोक चिडले होते व पुण्याला त्यांनी तक्रार पाठवली होती. त्यावरून प्रचंड वादावादी होऊन तिघांनाही बॉसने भयानक झापलेले होते. त्यानंतर ते फक्त रात्रीच प्यायचे. चवथ्या दिवशी मात्र साहिलला इतकी झाली की तो चुकून गिरीशच्याच रूमवर झोपला. वनिताचे अनेक कॉल्स झालेले बघून पहाटे तीनला गिरीशने त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवून त्याच्या खोलीत पाठवले.

हे सगळे साहिलने स्वतःच्या तोंडाने अत्यंत पश्चात्तापाने सांगीतल्यामुळे वनिता भयंकर चिडलेली असूनही निदान एवढेच समाधान मानू लागली की तो खरे बोलत होता.

साहिलने आता त्या दोघांशी संबंधच ठेवणार नाही आणि दारूलाही स्पर्श करणार नाही असे वचन दिल्यावर वनिता आणखीन शांत झाली. पण ती इतकी दुखावलेली होती की नेहमीसारखे व्हायला अजून वेळ लागणार होताच.

त्यानंतर तिने न सांगताही साहिलने स्वतःच उदयकडे जाऊन कालच्या आरड्याओरड्याबद्दल माफी मागीतली. उदयने हसण्यावारी नेले. साहिल परत घरी आला.

साहिलची तीन दिवसांची रजा संपली अन तो ऑफीसला निघाला तेव्हा वनिताला पुन्हा काळजी वाटू लागली. तिने त्याला अप्रत्यक्षपणे ऑफीसमधून रात्री घरी थेट यायला सांगीतले.

आणि आणखीन दोन दिवस गेल्यानंतर मात्र... पुन्हा तोच प्रकार घडला. यावेळेस भांडणे कोणतीच झाली नाहीत. पण.. साहिल पूर्ण तर्र होऊन घरी आला तेव्हा अकरा वाजलेले होते आणि वनिता पांढर्‍या फटक चेहर्‍याने त्याच्याकडे पाहात समोरच बसली होती.

साहिल - जेवण झालंय माझं! तू झोप.. कशाला जाग राहिलीस?? बॉसचीच पार्टी होती.. मग... नाही नाही म्हणता आले.. है की नै?? झोप झोप.. मी काय पेताड नाहीये.. आता एवढ्या हाय लेव्हलच्या लोकांबरोबर बसायचं म्हणजे ड्रिन्क्स वगैरे होणारच जरा...

ही दुसरी पातळी होती! तीन चार दिवसांपुर्वी त्याला वाटत असलेला पश्चात्ताप आज कुठेच त्याच्या बोलण्या-वागण्यात दिसत नव्हता.

दुसर्‍या दिवसापासून वनिताने पुन्हा बोलणे बंद केले. पुन्हा चार दिवस तसेच गेले. किंचित ओरडाआरडी, कुरबुरी, अबोले आणि शारिरीक गरजेच्या वेळेस मात्र साहिलने सगळ्या आणा भाका पुन्हा घेणे!

आणि नंतर... वनिताला सवय झाली.

आज मित्राचे प्रमोशन झाले, उद्या माझे झाले, आज याचा वाढदिवस म्हणून.. नाहीतरी मी कुठे एवढी घेतो.. वगैरे वगैरे!

आज तर काय सांगू तुला वनिता.. आमचे एकदम मेन बॉस आले.. ते म्हणाले मि. रानडे.. तुमचा परफॉर्मन्स खरोखरच अ‍ॅप्रिशियेट करण्यासारखा आहे.. तो अभ्यंकर नुसता जळून पाहात होता.. मग काय सांगायचे? सगळ्यांनीच पार्टी मागीतली..

आज तर काय सांगू तुला वनिता.. मिस्त्री नोकरी सोडून चाललाय गं! आज सेन्ड ऑफ होता.. इतकी वर्ष एकत्र राहिल्यावर इतकी घट्ट मैत्री.. एका दिवसात संपणार.. सेलेब्रेट तर करायलाच पाहिजे त्याची प्रगती.. पण.. रडले गं सगळे..

आज तर काय सांगू तुला वनिता.. आमची उलाढाल वीस कोटींच्या घरात पोचलीय.. कंपनीचीच पार्टीय.. ते काय मी घेतो म्हणून नाही आहे काही पार्टी.. सगळेच आहेत....

आणि मग शेवटी.. कुणाच्या तरी वाढदिवसाच्या पार्टीला तर म्हणे कुटुंबियांसकट सगळ्यांना बोलवलंय! येशील ना तू??

खरे तर वर्षभरात वनिताने आपले वैवाहिक आयुष्य नासलेले आहे हेच गृहीत धरून टाकलेले होते. आता काही राहिलेच नव्हते. आठवड्यातून तीन तीन चार चार वेळा काही ना काही कारणे काढून साहिल तर्र होऊन वाट्टेल तेव्हा घरी येत होता. आता तो लॅचने दार उघडूनच यायचा. नियमीतपणे त्याच्यासाठी तिने जेवण करून ताट टेबलवर ठेवलेले असायचे. तो ते काहीतरि चिवडल्यासारखे खाऊन तसेच बेसीनमधे ठेवून द्यायचा.

आता बडबडणे, झोकांड्या जाणे हे थांबलेले होते. कारण साहिल आता सरावला होता दारूला! आणि दारू साहिलला!

मात्र यावेळेस साहिल जे म्हणत होता त्यात काहीतरी वेगळे होते. कॉकटेल डिनर पार्टी तर आहे, पण विथ फॅमिली? कुणाकडे? पटवर्धन??

वनिताने मनाशी विचार केला. खरच सगळे किती पितात अन हा किती पितो ते बघावे. सगळे इतक्या फ्रिक्वेन्सीने पितात का? बायकाही घेतात का? या सगळ्यांचीही साहिलसारखीच कारणे असतात का?

वनिताने चक्क जायचे ठरवले. पटवर्धन स्वतः चाळीशीचे होते. त्यांचे घर प्रभात रोडला होते. त्यांच्या लग्नाचा पंधराव्वा वाढदिवस म्हणून पार्टी होती. पंधराव्या वाढदिवसात काय आहे सेलिब्रेट करण्यासारखे ते वनिताला लक्षात येत नव्हते. पण बघू तरी विथ फॅमिली कॉकटेल पार्टी कशी असते अन याच्या वर्तुळातील इतर लोक कसे आहेत ते! म्हणून ती येते म्हणाली. आणि साहिलने अतिशय उत्साहात पटवर्धनांना फोन लावला. 'वनिता येतीय बर का साहेब? हां! '

साडे सात वाजता दोघे पटवर्धनांकडे पोचले तेव्हा मिसेस पटवर्धनांनी हसून वनिताचे स्वागत केले अन तिला घेऊन स्वयंपाक घरात घेऊन गेल्या. म्हणजे तिला कामाला वगैरे नाही लावले, पण नुसते आपले बसवून ठेवले. तिघे जेन्ट्स आधीच आलेले होते अन त्यांची पहिली फेरी सुरूही झालेली होती. पहिलीच फेरी असल्यामुळे 'माय वाईफ, वनिता' या साहिलने त्यांना करून दिलेल्या ओळखीवर वनिताने वरवर हात जोडत मान तुकवून ओळख दाखवली होती व त्याही लोकांनी चक्क हात बित जोडून 'नमस्कार' असे म्हंटले होते. मिसेस पटवर्धनांचे नाव शमीका होते. त्यांनी वनिताला 'मला शमीकाच म्हण' अशी प्रेमळ आज्ञा दिल्यामुळे तीही हसून त्यांना 'अगं तुगं' करू लागली होती. दोघींमधे बर्‍याच घरगुती गप्पा झाल्या तोवर बाहेर आणखीन एक जण व कुसूम आले. कुसूम शमीका पटवर्धन आणि वनिताला 'हाय' वगैरे करून सरळ पुरुषांमधेच बसली.

आता आधीच्यांची दुसरी आणि आत्ताच आलेल्यांची पहिली फेरी असल्यामुळे आवाज वाढू लागला होता. सहा पुरुष आणि एक बाई एकत्र पीत आहेत बघून वनिता म्हणाली..

वनिता - बाकीच्यांची.. फॅमिली नाही आली का?
शमीका - काय माहिती?? बायकाही फार असतात गं! बोलवलं की येत नाहीत अन मग म्हणतात पार्टी कधी?

वनिता हसली. बाहेर साहिल, पटवर्धन, गिरीश, अभ्यंकर, थिटे आणि लामखेडे होते अन त्यांच्यात एकटीच बाई असल्यामुळे कुसूम फारच भाव खात होती. गप्पांचा आवाज वाढल्यावर ते संवाद वनिता ऐकू लागली अन मग.. हळूहळू तिला अंतरंग कळू लागले.

पटवर्धन - सो.. चीअर्स.. फॉर अव फिफ्टीन्थ अ‍ॅनिव्हर्सरी गाईज..
कोरस - चीअर्स..
अभ्यंकर - हे काय? अ‍ॅनिव्हर्सरीच्या पार्टीला वहिनी आतच?? ओ वहिनी.. बसा की येऊन इथे..
लामखेडे - तुझं पिण बघून घाबरतात लेका बायका..
अभ्यंकर - का? या मॅडम स्वतःच किती पितात..
कुसूम - कित्ती वगैरे नाही बर का? आणि माझ्या पिण्याबद्दल बोलायचं नाही.. मी कंट्रोलमधे असते..
गिरीश - काय सांगताय??
थिटे - काय रे गिर्‍या?? तो माधव तर नाइन्टीमधेच घ्यायचा नाही.. सिक्स्टी वगैरे नाहीच प्रकार..
साहिल - ह्या! एवढी पिण्यात काही अर्थ नाही.. एक आपलं थोडसं मजा म्हणून ठीक आहे..
गिरीश - तुझी लेका मद्रासला काय मजा झाली..

येथे कुसूम फस्सकन हसली.

पटवर्धन - काय झालं रे?
गिरीश - ओकतोय, पितोय, ओकतोय, पितोय..
कुसूम - श्शी.. तो वेटरसुद्धा हसायला लागला..

हळूहळू एकेक किस्से ऐकवले जायला लागले. या किश्श्यांमधे बहुतांशी 'कोण त्यावेळेस कसा भयंकर प्यायला अन काय काय गोंधळ केले' याचे उल्लेख होते. त्यानंतरच्या गप्पांच्या दुसर्‍या फेरीत ऑफिसमधील लफडी आणि सगळ्या बॉसेसच्या नावांनी शिमगा करण्यात आला. आत्तापर्यंत वनिता आतून साहिलला 'बास' अशा अर्थाच्या खुणा करण्याचा प्रयत्न करू लागली होती पण त्याचे लक्षच नव्हते आतमध्ये! तिला कुसूमचे पिणे पाहून धक्काच बसला होता. पुरुषांना मागे टाकत होती कुसूम पिताना!

गप्पांच्या तिसर्‍या फेरीमधे 'तू आणि मी यासारखी मैत्रीच जगात कुणाची नाही' हे प्रत्येकाने प्रत्येकाला पटवून दिले. मग त्यासाठी तेच तेच मदतीचे किस्से सगळ्यांनी सगळ्यांना पुन्हा ऐकवले.

नंतर विषय राजकारण अन मग क्रिकेटवर घसरला.

तोपर्यंत जेवण तयार असल्याची वर्दी शमीकाने बाहेर येऊन दिली. तिच्याबरोबर वनिता आली अन सगळ्यांसमोर 'लटकेच रागावले आहे' अशा आविर्भावात साहिलला हसत हसत 'बास की आता' म्हणाली अन अपेक्षेने त्याच्याकडे बघत आत गेली.

थिटे - अरे रानडे? वहिनी आल्यात?
साहिल - मग? माहीत नाही?
थिटे - ओळख नाय का करून देणार लेका??

पुन्हा वनिताची सगळ्यांशी ओळखबिळख करून देण्यात आली.

वनिता आत गेल्यावर आता कुसूमच्या 'नसलेल्या' सौंदर्याची खोटी तारीफ सुरू झाली. हे गळ्यातलं नवीन का? हा कलर फार भारी दिसतो तुम्हाला वगैरे! तीही मुरके बिरके मारून कंपनीतल्या इतर बायका कशा तिच्या रुपाचा हेवादावा करतात ते रंगवून सांगू लागली.

मग एकेका बाईचा विषय निघू लागला. मग हळूहळू व्हेज आणि नॉनव्हेज जोक्स सुरू झाले.

आता मात्र वनिताला असह्य झाले. याला काय अर्थ आहे? हे बसणार पीत आणि मी या बोअरिंग बाईबरोबर इथे बसून काहीतरी फालतू गप्पा मारायच्या. तिने आपले दोन घास खाऊन घेतले.

तेवढ्यातच बाहेर काहीतरी वाद झाला. कुसूमबरोबर तुझं लफडं आहे असं थिटे सरळ सरळ गिरीशला म्हणाला अन पुढे हेही म्हणाला की मद्रासला तुमची काय काय लफडी झाली ते कस्टमरने मला फोनवर सगळं सांगीतलं!

अचानक लग्नाच्या वाढदिवसाचे वातावरण पूर्ण बदलले. गिरीशने बायका वगैरे काहीही न बघता थिटेला सरळ एक शिवी हासडली. साहिलला आत्तापर्यंत जास्त झालेलीच होती. तोही थिटेला काहीतरी बोलला. गिरीश जुना माणूस होता. थिटे त्याला काही बोलला नसला तरी साहिलने बोलणे हा त्याला अपमान वाटला. साहिल मधे पडलेला आहे हे पाहून बाहेर आलेल्या वनिताकडे थिटेचे दुर्लक्षच होते. एकीकडून बदनामीकारक आरोप झाल्यामुळे चवताळलेली कुसूम उभी राहून हातवारे करून अद्वातद्वा बोलू लागली होती. तेवढ्यात भडकलेला थिटे साहिलला म्हणाला..

थिटे - तू तर मधे बोलायचंच नाहीस.. लेका त्या दिवशी या बाईच्या रूममधे तू घुसला होतास.. तुझी बायको पन्नास फोन करत होती तेव्हा तुम्ही दोघं धुडगुस घालत होतात हिच्या रूममधे.. मला गिर्‍याने सगळं सांगीतलंय.. तू काय बोलतोस वर तोंड करून!

आत्तापर्यंत साहिलच्याही हे लक्षात राहिले नव्हते की आपण आपल्या बायकोला घेऊन इथे आलोय. तो सरळ उठला अन त्याने थिटेची गचंडी पकडली. पटवर्धन अन लामखेडेंनी आवरले.

बाजूला झालेला थिटे डोळे वटारून कर्कश्श आवाजात ओरडला..

थिटे - अरे कंपनीची कीप आहे ही कुसूम.. तू काय सांगतोस मला.. बायकोपुढे शेपुट घालणारायस तू.. लेका 'फॅमिली गेट टूगेदर आहे असं माझ्या बायकोला सांगा' असं आम्हाला म्हणालास तू.. का?? तर तुझ्या बायकोलाही बरं वाटावं की तिलाही बोलवतात फंक्शनला.. लेका तुला प्यायचीय म्हणून तिचे असले फालतू लाड होय खोटं बोलून?? आं??

वनिताला त्या क्षणी धरणीकंप व्हावा अन आपल्याला जमीनीच्या पोटात घेतले जावे असे वाटू लागले. ती साहिलला त्याही परिस्थितीत 'चल, चल जाऊयात' म्हणत ओढू लागली. साहिलने पुरुषार्थ आणि नवरेशाही दाखवण्यासाठी सगळ्यांसमोर तिचा अपमान केला.

साहिल - हात लावायचा नाही.. बाईने बाईच्या जागी बसायचं.. चुलीपाशी अक्कल ठेवायची.. काय?? हात लावायचा नाही...

आता वनिताला काहीच समजेना की आधार कुणाचा मागायचा? ती रडवेले तोंड करून शमीकाकडे आली तर शमीकाने सांगीतले की 'या पिणार्‍यांच्या पार्ट्या म्हणजे सगळ्या अशाच. उद्या बघ सगळे माफी बिफी मागून पुन्हा रात्री एकत्र प्यायला बसतात की नाही, मी काय आज पाहात नाहीये, नेहमीप्रमाणे स्वयंपाक वाया गेलाच'!

वनिताला आता एकटीनेच तिथून निघायची इच्छा होत होती. तिने सरळ साहिलला सांगीतले. मी रिक्षेने घरी चाललीय. तू तुझे झाले की ये! तर गिरीश मधेच उठला अन म्हणाला..

गिरीश - वहिनी... आय विल ड्रॉप यू.. आत्ता या वेळेला तुमच्यासारख्या चिकण्या बाईने एकटीने..

खाड! पहिल्यांदा कुणाला काही समजलेच नाही काय झाले. शमीका सुद्धा बाहेर येऊन अविश्वासाने पाहू लागली. जमलेल्यांपैकी तीन नंबरचा सिनियर आणि साहिलचा इमिजिएट बॉस असलेल्या गिरीशच्या मुस्काडात भडकावली या पोरीने??

गिरीश नुसताच डोळे फाडून वनिताकडे बघत होता. पटवर्धन आणि सगळेच स्तब्ध झालेले होते. तो आवाजच इतका मोठा झालेला होता की त्या आवाजानेच सगळे हादरले होते. गिरीशचा तर स्वतःवर अन कशावरच विश्वास बसत नव्हता. कुसूमची या मुलीपुढे बोलण्याची खरे तर हिम्मत होत नव्हती. पण तरी तिने तोंड उघडले.. कसे तरी बरळत म्हणाली..

कुसूम - आजपर्यंत पाहिलं पटवर्धन.. पण.. आपल्या पार्टीतेना.. मारामारी झालेली नाही.. या बाईने तेही केलं!

तिच्या या बोलण्याचाही तोच परिणाम झाला. सगळ्यांदेखत वनिताने आपल्या दोन्ही हातांनी तिच्या गालावर किमान तीन, तीन थपडा लगावल्या. तिची दारूच उतरली. ओक्साबोक्शी रडत ती बेसीनकडे धावली.

आणि त्याचवेळेस गर्रकन मागे वळुन वनिता अत्यंत खर्जातल्या आवाजात साहिलला म्हणाली..

वनिता - चल्ल... आत्ताच्या आत्ता चल्ल..

आणि आता तिचा विश्वास बसणार नाही असा प्रकार झाला. सगळ्यांदेखत साहिलने वनिताला थप्पड मारली.

दारूचे भूत सवार झालेले होते सगळ्यांवर! सगळ्यांची उतरलेली असली तरीही!

वनिता एक क्षणही तिथे न थांबता दारातून बाहेर पडली ती तिने सरळ रिक्षाच गाठली. घरी जाऊन वरून रिक्षेवाल्याला पैसे आणून दिले तेव्हा रात्रीचे पावणेबारा वाजलेले होते. तिने त्याही अवस्थेत पटवर्धनांकडे फोन लावून सांगीतले की साहिलला म्हणाव आत्ता गाडी चालवत घरी येऊ नकोस, तिथेच झोप, पण जर थिटेही तिथे झोपणार असतील तर रिक्षेने परत ये!

शमीकाने तिला अद्भुतच गोष्ट सांगीतली. सगळे पुन्हा प्यायला बसले आहेत. थिटे, गिरीश आणि साहिल एकमेकांना मिठ्या मारून सॉरी म्हणत आहेत आणि माझे मिस्टर आणि लामखेडे जेवत आहेत.

पहाटेचे दोन! पहाटे दोन वाजता उघड्याच असलेल्या दारातून मोठमोठ्याने बरळत कसेबसे आत आलेल्या साहिलला पाहून वनिता एवढेच म्हणाली....

वनिता - बायको म्हणून माझ्यावरचा तुझा हक्क संपलेला आहे. मी जॉब बघणार आहे. यापुढे स्वतःचे सगळे स्वतः बघत जा आणि.. इथे... याच सोफ्यावर किंवा त्या रूममधे झोपत जा.. आतल्या खोलीत तुला प्रवेश नाही..

ती रडत आत निघून गेली तरी दार उघडेच ठेवून पाच एक मिनीटे बरळत बसलेल्या साहिलने शेवटी रागारागाने कोणतेतरी काचेचे भांडे आपटून फोडले.

त्या आवाजाने उदय जैन आत आला. अजून कुणाचातरी आवाज येतोय हे ऐकून वनिता धावत बाहेर आली तर उदयने साहिलला धरून उभे केले होते आणि स्वतः काचा उचलत होता.

वनिताने पटकन त्याला बाजूला करून स्वतः त्या काचा गोळा केल्या. तो पर्यंत उदयने साहिलला त्याच्या नेहमीच्याच खोलीत नेले. 'यांना इकडे झोपवू नका' असे सांगून नवा तमाशा परक्या माणसासमोर करणे वनिताला योग्य वाटले नाही. उदय बाहेर आल्यावर रडवेल्या चेहर्‍याच्या वनिताला म्हणाला..

उदय - शराब की नशेमे मेरे पिताजीने भी हमारा घर बरबाद किया था भाभीजी.. आपका घर आपही को संभालना है.. इनकी शराब बंद करवादीजिये.. मै आपकी सब मदद करुंगा... आपका... आपका मोबाईल नंबर क्या है?? मै एक मिस्ड कॉल देके रखता हूं.. कल आपको फोन करके एक इन्स्टिट्यूट है वहांका पता देदुंगा..

वनिता - नही.. ठीक है... सॉरी.. आपको फिर तकलीफ हुवी..
उदय - जी बिलकुल नही.. हम तो पडौसी है.. हो सकता है मुझे भी आपकी कल मदद जरुरी पडे..
वनिता - ये बातही नही सुनते है.. बहुत पीने लगे है
उदय - आप अपना नंबर बताईये.. मै कॉल करता हूं.. कल.. इनको मत बताना मुझे नंबर दिया....

आणि इथेच चूक झाली. दुसर्‍या दिवशी त्याने फोनवर सांगीतलेल्या संस्थेचा विषय काढण्याहीही वनिताची मानसिकता नव्हती. साहिल सकाळी उठून सातलाच बाहेर पडला होता. तो आज किती वाजता परत येईल हेही सांगता येत नव्हते. आणि वनिता दिवसभर रडून रात्री आठला नेहमीप्रमाणे त्याची वाट पाहू लागली होती. आजही तो रात्री दिडला पिऊनच आला. फक्त! आज एकच छोटासा फरक पडलेला होता. रात्री दहाला सरळ उदय जैनने हातात एक बर्फीचा पुडा घेऊन वनिताचे दार ठोठवले होते.

उदय - आगये वे?
वनिता - नही! क्या हुवा?
उदय - नही.. दरस्सल मै यही देखने आया था की आये है या.. लेकिन दिखावेके लिये ये मिठाई लाया था
वनिता - नही आये अभीतक

तिच्या चेहर्‍यावरून ती दिवसभर रडलेली आहे हे स्पष्ट समजत होते.

उदय - आप .. आप फिकर मत कीजियेगा... रोईये मत आप.. कुछ जरुरत पडे तो बतादीजिये..

मान डोलावून वनिताने दार लावले. इतकाच फरक पडला होता आज! जो उदय राहायला आल्यापासून त्याने दिलेल्या पार्टी व्यतिरिक्त एरवी बघतही नव्हता ... त्याने आज स्वतःहून या विषयात नाक खुपसले होते... आणि ते वनिताने चालवून घेण्याचे कारण इतकेच होते की ऐनवेळेला तो मदतीला अन आधाराला आलेला होता.

आणि दिड वाजता आलेला साहिल सोफ्यात तसाच कोसळला आणि वनिताने जेवणाचे सगळे आवरून मग झोपायला गेली. ती सहालाच उठली अन बघते तर साहिल आंघोळ वगैरे करून तयार आणि निघालेला. याच्याशी बोलायचे कधी? काय बोलायचे?

वनिताकडे एक दृष्टीक्षेपही न टाकता तो सरळ घराच्या बाहेर पडला. कसे ते माहीत नाही.. पण बरोब्बर पाचच मिनिटांत उदयचा आयुष्यातील पहिलावहिला एसेमेस आला..

'गुडमॉर्निंग.... होप एव्हरीथिंग इज फाईन?'

पुढच्या प्रश्नचिन्हावरून त्याला एसेमेसवर उत्तर अपेक्षित असावे हे स्पष्ट दिसत होते. वनिताला आता ही जराशी कटकट वाटायला लागली. एक दोनदा साहिलला धरायला वगैरे आला म्हणून लगेच काय मी याला एसेमेस पाठवेन का? असे कसे समजतो हा? तिने तो मेसेज पटकन डिलीट करून टाकला. तिने उदयचा नंबरही सीमा या नावाने सेव्ह केलेला होता. उगाच नको ते संशय नकोत.

अत्यंत स्फोटक मनस्थिती झालेली होती तिची! मद्रासला साहिल आपला फोन घेत नव्हता याचे कारण तो आणि कुसूम दोघेही कुसूमच्या रूममधे होते? साहिल?? साहिल असा वागला?? की तो गिरीश काहीतरी बरळतोय? कुणावर विश्वास ठेवायचा गिरीश इतकी दारू पिऊन खोटे कसा बोलेल? आणि खोटे बोलला तर साहिलने त्याला झापायला नको का? बॉस असला म्हणून काय झालं? आपला साहिल असा आहे? की असा झाला आता? कशामुळे झाला? आपण काय कमी केलं त्याचं? की दारूमुळे त्या रात्री त्याला संयम किंवा भान राहिले नसेल?

इतर कोणतीही स्त्री करेल ते उपाय मात्र वनिताने केले नाहीत. उगाच माहेरच्यांना किंवा इतरांना सांगा! मैत्रिणींना सांगा! दारू सोडण्यासाठी असलेल्या संस्थांमधे जा! धार्मिक विधी करा! वनिताने यातील काहीही केले नाही.

आणि तिने यातील काहीही न करण्याचे एक अत्यंत महत्वाचे कारण होते.

वनिता नुसतीच सुशिक्षित व सुसंकृत नव्हती तर तिचा स्वतःवर विश्वासही होता. ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. बाहेरचे लोक फार तर सहानुभुती दाखवतील किंवा उपाय करण्यात मदत करतील. पण आपल्यासारखे ते चोवीस तास या दु:खात नसल्यामुळे कधी ना कधी ते या परिस्थितीत आपल्याला एकटी सोडून पळ काढतीलच! याचाच अर्थ असा आहे की आपण एकट्या आहोत. आणि एकट्यानेच आपण स्वतःला सुखी करायचे असेल तर जे काय करायचे ते फार धीराने आणि विचारपुर्वक केले पाहिजे. त्याला पर्याय नाही.

केवळ वर्षभरात दारूचे इतके भयानक व्यसन लागू शकते हेच मुळी वनिताला नवीन होते. बर तो काही देशी दारू पीत नव्हता. अजून कर्ज काढून पिण्याइतकी वाईट परिस्थिती येणे तर शक्यच नव्हते. बॅन्क बॅलन्स भरपूर, पगार भरपूर! पैशांचा मुळी प्रश्नच नव्हता.

पण! हा पण फार महत्वाचा होता! साहिल गेल्या वर्षभरात एक तर वनिताला पत्नीप्रमाणे वागवतच नव्हता. त्याचे संपूर्ण लक्ष केवळ दारू पिण्याचे कारणे शोधणे व कंपनीतील काम इतपत करणे की ज्यामुळे नोकरी जाणार नाही यावर केंद्रीत झालेले होते.

वनिताने आरशात पाहिले! आपण आकर्षक राहिलेलो नाहीत? लग्नानंतर केवळ दोन, अडीच वर्षात आपल्यातील दिलचस्पी कमी झाली असेल साहिलची? की दारू त्याला आपल्याहीपेक्षा महत्वाची वाटत असेल? या प्रश्नाचे उत्तर एक स्त्री असूनही वनिताच्या मनात हेच येत होते की अजूनही ती, किंबहूना आता तर ती जास्तच आकर्षक दिसत होती. कोणत्याही पुरुषानेच काय पण स्त्रीनेही मुद्दाम दखल घ्यावी इतपत सुंदर!

मग? दारू? दारूच असणार या सगळ्याच्या मागे! त्या कुसूमसारख्या घाणेरड्या बाईबरोबर साहिल एक रात्र राहिला ते तरी त्याच्या लक्षात आहे की नाही हाच प्रश्न आहे. कदाचित आपण आहोत असे समजून तो तिच्याबरोबर गेला असेल!

वनिताला उपाय सापडत नव्हता. कोणतीही संस्था, कोणतेही नातेवाईक, मैत्रिणी या कामी उपयोगी पडणार नाहीत इतकेच तिला समजले होते.

काही दिवस घरात अबोलाच होता! तब्बल दोन आठवडे! या दोन आठवड्यात केवळ दोनच दिवस साहिल न पीता घरी आला होता. हेही कसे काय झाले याचा अंदाज वनिताला येत नव्हता म्हणून ती रात्रीच उठून हळूच बेडरूमच्या दारात आली व तिने हॉलमधे पाहिले तर तो सोफ्यावर कसाही लवंडलेला होता अन शेजारी एक रिकामी दारूची बाटली होती.

म्हणजेच! प्रकरण आता घरात पिण्यापर्यंत व दारूशिवाय संध्याकाळ न जाण्यापर्यंत आलं होतं!

आणि आज शनिवारी सकाळी मात्र नवलच वाटले वनिताला! इतके दिवसांचा अबोला! आणि आज मात्र सकाळि उठल्यापासून साहिल घरात नुसता वनिताच्या मागे मागेच होता. काय करतीयस? कशाला कामं करतीयस? आपण बाहेरून जेवण आणू! आज आपण दोघेच घरात आहोत. आज मी तुझ्यासाठी एक छान महागडी साडीही आणायच्या विचारात आहे वगैरे!

कुसूम अणि साहिलचा प्रसंग आणल्यानंतर आणि गिरीशच्या तोंडात वाजवल्यानंतर दोन आठवडे घरात अबोला असताना अचानक साहिल असा वागतो याबाबत वनिताने कोणतीच प्रतिक्रिया देणे शक्यच नव्हते. ती एक अक्षर बोलत नव्हती त्याच्याशी! आणि तो मात्र सतत पिंगा घालत होता तिच्या भोवती.

शेवटी त्याने तिचे खांदे धरून गदगदून हलवत विचारले "बोलत का नाहीयेस???"

वनिताला पुन्हा जाणवले. आपण विचारले नाही तर कुणीच विचारणार नाही आणि तो विषय तसाच मागे पडेल.

वनिता - तू आणि कुसूम.. एका रूममधे ... होतात त्या दिवशी??

साहिल क्षणभर हादरला. हा मुद्दा गेल्या काही दिवसात ती विसरली असेल असे त्याला मुळीच वाटत नव्हते. पण ज्याअर्थी दोन आठवड्यात तिने उल्लेख केला नाही त्या अर्थी ती हा मुद्दा खोटा समजत असेल असा त्याने स्वतःचाच ग्रह करून घेतला होता.

साहिल - तुला कळले नाही? ते सगळे खोटे आहे. गिरीशला प्रकरणे पेटवायची सवय आहे.
वनिता - खोटे आहे?
साहिल - अर्थात!
वनिता - मी काही तिथे नव्हते. मी काही गिरीश अन कुसूमला विचारणारही नाही आहे. त्यामुळे तू म्हणतोयस त्यावर विश्वास ठेवणे मला भाग आहे.
साहिल - म्हणजे.. विश्वास ठेवावासा वाटत नाही आहे असेच ना?
वनिता - खरं सांगू साहिल? मुळीच ठेवावासा वाटत नाही आहे. पण ठेवतीय!
साहिल - आय अ‍ॅम सॉरी! माझ्यामुळे तुला.. फार
वनिता - यापुढे नाही होणार त्रास? सुधारलो असे म्हणायचंय तुला?
साहिल - सुट्टीच्या दिवशी.. इतका चांगला मूड असतानाही तू पुन्हा असलेच..
वनिता - कसली सुट्टी? आज वर्षानी सुट्टी आलीय का? कित्येक शनिवार रविवार गेलेत पिण्यामधे!
साहिल - झाले ते झाले.. प्लीज सोडून दे.. आज आणि उद्या फक्त आपण दोघेच..

पुन्हा एकदा मोह पडला बिचारीला! खरच हा असे म्हणत असेल का? खरच! जर दोन दिवस घेणार नसेल तरीही आपण जीव कुर्बान करू त्याच्यावर! तरीही इतक्यातच साहिलचा गोड समज होऊ नये म्हणून वनिताने जरा वेळ फुरंगटल्याचा अभिनय केला. मात्र मनातून तिने कुसूम अन तो एकाच रूममधे राहिले असतील ही शक्यता मुळीच डावललेली नव्हती. फक्त कदाचित ते नशेत झाले असेल किंवा गिरीशने उद्युक्त केले असेल असे गृहीत धरले. मात्र काही वेळाने तिच्या चेहर्‍यावर एक हलकेसे स्मित आले.

ते पाहून मात्र साहिलने तिला आवळले. आज कित्येक महिन्यांनंतर पुन्हा त्या फ्लॅटमधे एक बहार आली होती. नाही म्हंटले तरी वनिताने तास दोन तासांसाठी सगळे सोडून दिलेले होते. सुखाच्या एका अत्युच्च शिखरावर ती विराजमान झालेली होती.

संध्याकाळी दोघेही बाहेर गेले. जाताना उदय दारात भेटला तेव्हा वनिता त्याच्याकडे पाहून समाधानी विवाहितेप्रमाणे हासली. तोही हासला. साहिल दोन मिनिटे त्याच्याशी व्यवस्थित बोलला वगैरे! उदयला हा एक चमत्कारच वाटत होता. त्याने साहिलची पाठ वळल्यावर हसून वनिताकडे बघून अंगठा उचलवून 'व्हिक्टरी' अशी खुण केली. तीही हासली.

बाहेरच जेवले दोघे! रात्री उशीरा आले. पुन्हा एकदा वनिताला पुर्वीचे दिवस आल्यासारखे वाटले.

उद्या तर रविवारच! एकमेकांशी थट्टा विनोद करत दोघे तीन साडे तीन पर्यंत जागले.

सकाळी निवांत नऊ वाजता उठले तर साडे नऊ वाजता उदय जैन दारात हजर!

उदय - मॉर्निंग जी.. ये पॅटीस है.. नाश्तेके लिये..
साहिल - अरे? आपने किसलिये तकलीफ...
उदय - नही नही! मै अपने लिये लाने गया था.. सोचा आपके लिये भी लाऊं...
वनिता - बैठिये ना! चाय बनाती हूं!
उदय - अं! जी मै अभी बाहर जा रहा हूं! .. वैसे भी.. आज सनडे है.. मैने डिस्टर्ब नही करना चाहिये आपको..
साहिल - अगं एक काम कर! मस्त रस्सा वगैरे बनव! यांना दुपारी जेवायलाच बोलवू!
वनिता - हां! आज आप दोपहेर खानेपर आईये..
उदय - नही नही.. मै फिर कभी आउंगा..
साहिल - आओ यार.. क्या शरमाते हो??
उदय - अरे नही नही! शरमाना क्या! चलिये आता हूं खाने पर.. लेकिन एक शर्त है..
साहिल - क्या?
उदय - स्वीट मै लाउंगा..
साहिल - हसत हसत चलो ठीक है.. क्या लाओगे?
उदय - आप क्या पसंद करते है?
साहिल - हम तो भाई बासुंदी..
उदय - और आप भाभीजी?
वनिता - नही नही! आप मत लाना.. मै बनाती हूं कुछ ना कुछ!
उदय - बताईये तो सही.. शर्त तो मंजूर होही गयी है..
वनिता - ऐसा कुछ नही.. बासुंदी भी चलेगी..
उदय - वैसे.. आपको पसंद क्या है..
वनिता - रसमलई..
उदय - तो ठीक है.. दोनो लाता हूं! बारा बजे आउंगा..

तो एवढे म्हणून झटकन बाहेर पडला तसे दोघे बघतच बसले.

वनिता - कशाला रे त्याला बोलवलंस? चांगले दोघे मजा करतोय तर??
साहिल - अगं असुदेत.. तो आपल्या मदतीला आला होता ना..
वनिता - मदतीला काय? तू येणार पिऊन.. मग शेजारधर्म म्हणून आला..
साहिल - मी काय म्हणतो?? ऐकणार का??
वनिता - हं!
साहिल - मी आता ठरवलंय.. जी काय घेईन ती फक्त तुझ्यासमोर..
वनिता - म्हणजे??
साहिल - आठवडाभर काही घेणार नाही.. फक्त शनिवार, रविवार! घरी! तुझ्यासमोर!
वनिता - काही नको! घ्यायचीच नाही आता!
साहिल - ऐक ना? तुझ्यासमोर घेतली की आपोआप कंट्रोल पण होईल आणि इतर वारी मी घेत नाही आहे की घेतोय हे तुला सहज समजेलच!
वनिता - साहिल, हा विषय बंद कर! घरी घ्यायची तर गरजच नाही आहे.. आणि बाहेरही आता नाहीच घ्यायची!
साहिल - डॉ. मिराशींकडे गेलो होतो परवा! तेच सांगायचे ठरवले होते तुला! पण तू ऐकूनच घेत नव्हतीस.
वनिता - कोण डॉ. मिराशी?
साहिल - अ‍ॅडिक्शन्समधे हेल्प करतात. त्यांनीच सागीतले आहे की तुमची पत्नी ही तुमची सगळ्यात चांगली वेल विशर आहे. सुरुवातील ड्रिन्क्स सोडायला खूप त्रास होतो. त्या कालावधीत फक्त तिच्यासमोरच घ्या! ती आपोआप कंट्रोल ठेवेल. बाहेर पिणे बंदच करा! त्यानंतर हळूहळ तिच्यासमोरही घेणे कमी करत जा! दारू अशीच सुटेल!
वनिता - तू माझे ऐकशील?
साहिल - काय?
वनिता - मनात ठरवलेस तर तुला डॉक्टरचीही गरज नाही लागणार साहिल! फक्त स्वतः ठरव! बघ ना? आज आपण किती आनंदात आहोत. हा आनंद आपण गेल्या वर्षभरात मिळवला का एकदा तरी? किती खुष दिसतोयस तू? किती छान फिरायला गेलो काल आपण? मी तुझे अन कुसूमचे जे ऐकले तेही सोडून द्यायला तयार आहे. फक्त तू मनातून ठरव! दारूमुळे आपण किती भांडलो बघ! कसे होते आपले पहिले दिवस! कसे आहोत आज आपण! घरात कित्येक कामे करायची आहेत. कित्येक वस्तू आणायच्या आहेत. आपल्याला आता मुलाचा विचार करायला हवा. काही चर्चाच होत नाही. मी एकटी घरात बसते. रोज रात्री तू वेळेवर घरी येशील, न पिता येशील अशी प्रार्थना करत बसते. पण तसे होत नाही. ऐक साहिल, या विळख्यातून बाहेर ये!
साहिल - आय अ‍ॅग्री विथ यू! मला यातून वेळिच बाहेर पडायला हवे. नाहीतरी काह्ही होईल! तूही ऐक माझे! मिराशी डॉक्टरांचा खूप जणांना अनुभव आहे. इव्हन मिस्त्री कंपनी सोडून जाण्यापुर्वी खूप प्यायचा, आता त्यांच्याकडे गेल्यापासून पिणं जवळजवळ निल झालंय त्याचं! विश्वास ठेव! मी वर्किंग डेजला घेणार नाही.
वनिता - अ‍ॅज यू विश! दारू नष्ट होणार असेल आपल्या संसारातून तर काहीही ऐकेन मी! ठीक आहे. उद्यापासून घेणार नाहीस ना सहा दिवस? मीही लक्ष ठेवेन! पण.. खरच नाही न घेणार?
साहिल - अजिबात नाही.
वनिता - ग्रेट!
साहिल - फक्त... वीकएंड्जनाच.. अन तीही घरातच!
वनिता - हो पण म्हणून आज नाही घ्यायची हां!
साहिल - नाऊ धिस इज अल्सो नॉट फेअर वनिता.. मी आता पाच, सहा दिवस घेणार नाही आहे म्हंटल्यावर मग आज घ्यायला, तेही अ‍ॅज पर डॉक्टर्स अ‍ॅडव्हाईस.. काय हरकत आहे??

बर्‍याच चर्चेनंतर 'साहिल आठवडाभर दारूला शिवणारही नाही' या आनंदात बिचारीने त्याला आज घ्यायची मुभा दिली. धावले साहेब लगेच वाईन शॉपमधे! एक फुल बाटली अन चार बीअरच्या बाटल्या घेऊनच आला. 'इतकी कशाला' या प्रश्नावर 'जस्ट स्टॉक, नथिंग एल्स' असे म्हणून त्याने अधीरपणे एक बीअरची बाटली तोंडाला लावली. अजूनही वनिता जराशी नाराज असली तरीही त्याच्यासाठी काही खायचे पदार्थ देणे, टी.व्ही. बघणे, मधून मधून त्याला सांगणे की आता बास वगैरे गोष्टी करतच होती.

आणि बारा वाजता उदय आला अन समोरचे दृष्य पाहून चक्रावलाच! साहिलने ऑलरेडी बीअरच्या दोन बाटल्या संपवलेल्या होत्या अन व्हिस्कीचा पेग नवीन भरलेला होता. 'हे काय' अशा दृष्टीने तो वनिताकडे पाहणार हे वनिताला आधीच लक्षात आल्यामुळे ती किचनमधे निघून गेली.

उदय - अरे? जश्न हो रहा है?
साहिल - बिलकुल! आपके आनेके खुषीमे सेलेब्रेशन्स है आज..
उदय - हा हा हा! लेकिन मै तो लेताही नही..
साहिल - आज आपभी लेनेवाले है.. वनिता... एक ग्लास आण गं..
उदय - अरे सर? नही नही!

हळुहळु साहिलची जीभ लडखडायला लागली होती. उदयवर जन्मोजन्मीचे प्रेम असल्याप्रमाणे तो उदयशी बोलायला लागला होता. वनिता उदयसमोर शक्यतो जातच नव्हती. त्याला आपल्या नवर्‍याबद्दल काय वाटत असेल याची तिलाच लाज वाटत होती. आता तर साहिलला 'आता बास, आता घेऊ नकोस' हे सांगणेही शक्य नव्हते. कारण उदयसमोर त्याने काही तमाशा केला तर काय? त्याच्या कलाकलानेच घेणे बरे पडणार होते. ती आता बेडरूममधे अन किचनमधे अशी आलटून पालटून बसत होती. साहिलने हाक मारली अन काही मागीतले तरच बाहेर जात होती. उदय अन साहिल एकंदर ट्रॅफिक, राजकारण वगैरे विषयांवर काहीतरी फालतू बोलत होते. उदय जेवणार केव्हा होता तेच समजत नव्हते. साहिलने जेवायला वाढ असे सांगीतल्याशिवाय कदाचित तोही जेवला नसता. मधेच जाऊन एकदा जेवणाची आठवण कर्न द्यावी असेही वनिताला वाटत होते. पण उदयसमोर जायचीच तिला आता शरम वाटू लागली होती. एक वाजला होता. हा प्रसंग कधी आटोपतो असे तिला झाले होते.

काय चाललेले आहे ते पहावे म्हणून वनिता बाहेर आली. परिस्थिती पाहून ती किचनमधे वळली. बीअरच्या दोनच बाटल्या संपलेल्या होत्या. पण व्हिस्कीचे बहुधा तीन पेग झालेले असावेत. आता सरळ पानेच वाढून समोर ठेवावीत असा ती विचार करत होती. उदयने आणलेली स्वीट्स तिने काढून दोन्ही पानात वाढली. रस्सा वाढला अन तिला वाटले एकदा विचारावे की पाने आणू का?

वनिता - वाढू का साहिल?
उदय - अरे भाभीजी? आपभी आईये ना यहां! बाते करेंगे..

अगदीच तिथे न बसणे अयोग्य दिसले असते. वनिता पाच मिनिटे बसण्याच्या उद्देशाने कसनुसं हसत साहिलच्या शेजारी बसली. हसत हसत म्हणते आहे असे दाखवत म्हणाली.

वनिता - साहिल आता पुष्कळ झालं! चला आता जेवायला.. त्यांनाही उशीर होतोय!
उदय - नही नही! मुझे कुछ काम नही है.. वैसे भाईसाहब.. लगता है आपको ड्रिन्क्स काफी पसंद है..
साहिल - शराब चीजही ऐसी है न छोडी जाये, ये मेरे यारके जैसी है न छोडी जाये..

'मेरे यारके' म्हणताना साहिलने वनिताच्या गालावरून बिनदिक्कत हात फिरवला. वनिताला खुष करण्याचा त्याचा तो प्रयत्न होता. वनिताला त्यात काहीच वाटले नाही. मात्र उदयने वनिताकडे पाहून 'ये तो बिलकुल सही कहदिया आपने भाईसाहब' अशी कॉमेंट पास केली. वनिताच्या सौंदर्याला साहिलने शराबची उपमा देणे अतिशय योग्य आहे हे उदयही बिनदिक्कत म्हणून गेला. त्याचा अर्थ कळण्याच्या मनस्थितीत साहिल नसला तरीही वनिता स्वतः होतीच! ती ताडकन उठली आणि बेडरूममधे जायला निघाली. बेडरूमच्या दारात पोचायला लागलेल्या दोन क्षणात मात्र तिच्या मनात जे विचार आले त्या विचारांमुळे तिने केलेले कृत्यच नेमके चुकीचे ठरणारे होते. त्या दोन तीन क्षणात तिच्या मनात आले की उदय किती चांगल्या वळनाचा व सभ्य आहे! तो कधीही व्यसन करत नाही. उलट आपल्याला जमेल तितकी मदतच करतो. आणि आपण आपल्या घराच्या खिडक्यांमधून अनंतवेळा दिसत असूनही आजवर त्याने कधी आपल्याकडे मान वर करूनही पाहिलेले नाही. आणि आज तर त्याने खुशाल आपल्या सौंदर्याची स्तुती केली. काय बिघडले थोडे दिलखुलासपणे वागले तर? असा विचार करून ती बेडरूमच्या दारात क्षणभर थबकून मागे वळून उदयकडे पाहात असताना तिच्या चेहर्‍यावर एक नैसर्गीक लाजरे हास्य आले. तिच्या ताडकन उठून जाण्यामुळे अचानक गंभीर झालेला व घाबरलेला उदय ते हास्य पाहून मात्र एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारखा विरघळला. टक लावून त्याने वनिताच्या डोळ्यात त्या एका क्षणापुरतेच डोळे मिसळले अन त्याला जास्ती बघू न देता वनिता हसतच पटकन आपल्या खोलीत गेली.

ही मात्र वनिताची अनवधानाने व नैसर्गीकरीत्या झालेली चूक होती.

आणि जेवणे म्हणजे अर्थहीनच होती. उदय नुसताच तिने केलेल्या स्वयंपाकाची स्तुती करत होता. साहिल ती स्तुती ऐकून 'मेरी बीवी हैही बहोत अच्छी' म्हणून अन्न चिवडत होता आणि वनिताला दोन घासही घशाखाली उतरत नव्हते.

आणि तिसर्‍याच दिवशी सर्व स्वप्ने भंगली. बुधवारीच रात्री साहिलचा संयम संपला आणि तो प्रचंड दारू पिऊन रात्री साडे बाराला घरी आला. या दोन दिवसात उदय खिडक्यांमधून वनिताकडे बघू लागला होता आणि त्याने दोन दिवसात एकंदर तीन एसेमेस पाठवले होते ज्यातील एकाचेही वनिताने उत्तर दिले नव्हते. आजही उदयने स्वतःच्या दाराच्या काचेच्या भोकातून साहिल उशीरा आल्याचा प्रकार पाहिलेला असणार हे वनिताला त्याच्या दारातील त्या काचेत चाललेल्या अस्पष्ट हालचालींवरून समजलेले होते.

सगळ्या संसाराला दिशाच वेगळी मिळत होती. पुन्हा अबोले सुरू झाले. पुन्हा पिणे सुरू झाले! आणि पुन्हा 'यापुढे मी फार कमी घेणार, ऑकेजनली घेणार' असे खोटे संकल्प सोडणे अन ते मोडणे सुरू झाले.

वनिताला दोन महिन्यात अथक प्रयत्न करूनही जॉब मिळाला नाही, या दोन महिन्यात ती आणि साहिल एकमेकांपासून फारच दूर गेले. साहिल आता दुसर्‍याच रूममधे झोपायचा. आठवड्यातून किमान दोन वेळा त्यांचे तीव्र वाद व्हायचे. काही वेळा दोघेही व्हायोलेंट व्हायला लागले. वनिता आता सिरियसली वेगळे राहायचा विचार करू लागली होती.

यातच नकळतपणे आनखीन एक गोष्ट होऊ लागली होती. कधीही मान वर करून न बघणारा उदय आता त्याच्या घरातून बर्‍याचदा वनिता तिच्या घरात दिसते का याचा शोध घेऊ लागला होता. ती दिसली अन नजरानजर झाली तर सरळ हसू लागला होता. एक दोनदा वनिता हसली होती. नंतर मात्र तिने खिडक्यांचे पडदे ओढून घ्यायला सुरुवात केली होती. कारण जवळपास तीन खोल्या अन टेरेस एकमेकांच्या अगदी समोर येत होते. सारखेच एकमेकांच्या समोर वावरणे होणार होते. आता घरात बसून वनिता अखंड टी.व्ही. बघणे किंवा वाचन करणे इतकेच करत होती. एक जबाबदारी म्हणून साहिलचा स्वयंपाक करणे आवश्यक होते. मुख्य म्हणजे साहिल सकाळी साडे सातलाच घराबाहेर पडू लागला होता. नाश्ता नाही काही नाही. कुठे जायचा हे विचारायची तसदीही वनिता घेत नव्हती. दारूपेक्षा आता एकमेकांचे अस्तित्व हाच मोठा प्रॉब्लेम बनू पाहात होता. समोर आले की घृणा उत्पन्न होत होती. साहिलच्या प्रकृतीवर परिणाम जाणवू लागला होता. डोळे कायम सुजलेले! सतत तोंडाला दारूचा वास! रात्री घरी आला की वनिताच्या नावाने एक दोन शिव्या हासडल्या की आहे तिथेच लवंडणे! त्यातच दोन तीन वेळा त्याला व्हॉमिटिंग झाले होते. तो उठायच्या आतच वनिताने स्वच्छता केल्याचाही त्याच्या चेहर्‍यावर पश्चात्ताप दिसत नव्हता. एकंदर परिस्थितीच किळसवाणी झालेली होती. वनिता आता वेगळे होण्याचा विचार साहिलला बोलून दाखवण्याच्या मनस्थितीतही नव्हती.

त्यातच ते दोन प्रकार झाले. एक दिवस साहिल सातलाच घरी आला आणि अर्ध्याच तासात कपडे वगैरे बदलून पुन्हा बाहेर निघालाही. आधीही त्याच्या तोंडाला दारूचा वास येतच होता. पुन्हा तो बाहेर जात आहे हे पाहूनही वनिताने काहीही चौकशी केली नाही. तिने आपला टी.व्ही. बघायचा कार्यक्रम चालूच ठेवला. मात्र आठ वाजता तिने वॉशिंग मशीनमधे साहिलचे कपडे टाकायच्या आधी त्याचे खिसे तपासले तेव्हा त्याचा मोबाईल तिला पँटमधेच राहिलेला दिसला.

साहिलला बहुतेक नशेत लक्षातच राहिले नसावे की आपण आपला सेल फोन घरीच ठेवून बाहेर गेलो. कारण एक तास झाला तरी तो शोधत पुन्हा घरी आला नव्हता. वनिताने साहिलचा फोन सहज तपासला अन तिला धक्काच बसला. हे काय हे? हे कधी झाले? आपला काहीच संबंध नाही साहिलशी??

साहिलने त्याच्या एका कंपनीबाह्य मित्राला पाठवलेल्या तीन दिवसांपुर्वीच्या एसेमेसमधे त्याने लिहिले होते की 'मी नोकरी सोडली आहे आणि माझ्यासाठी जॉब बघ'!

याने नोकरी का सोडली? कधी सोडली? रोज तर जातो की कामाला? राजीनामा दिला की काही प्रॉब्लेम झाला. तिने शमीका पटवर्धनला लावलेल्या फोनवरून तिला समजले की सतत अपेयपान करून कामावर येण्याचा आरोप ठेवून त्याला काढून टाकण्यात आले होते. आणि ही तक्रार म्हणे कुसूमनेच केली होती.

पुढचा एक एसेमेस आणि जवळपास तेरा मिस्ड प्लस रिसीव्ह्ड कॉल्स पाहून तर वनिता उडालीच! कुणा 'कोमल' नावाच्या बाईचे किंवा मुलीचे ते कॉल्स होते. साहिलनेही तिला अनेक कॉल्स केलेले होते. त्या दोघांच्या मेसेजेसवरून तर सरळ लक्षात येत होते. प्रकरण भलतेच पुढे गेलेले आहे. पण रोज रात्री घरी झोपायला येणारा साहिल हिच्याशी संबंध कधी ठेवत असेल हेही वनिताला समजत नव्हते. 'आय मिस यू, आय लव्ह यू, आज आठ वाजता फाउंटन, ती डार्क निळी साडीच नेस, त्यात सेक्सी दिसतेस, परवाची ड्रीमलॅनमधील रूम खास नव्हती' वगैरे वगैरे!

हे काय?? वनिताला अक्षरशः साहिलचा खून करावासा वाटत होता त्या वेळी!
हे झाले कसे? कधी? आपण एकमेकांशी बोलत नाही हे ठीक आहे. पण तो नशेतही कधी या मुलीचा उल्लेख घरात कसा काय करत नाही? घरातून एकही फोनचा आवाज रात्री कसा येत नाही? आणि 'आठ वाजता फाउंटन'??? म्हणजे आता साहिल तिला भेटायला गेलाय?

वनिता डोळ्यांमधे अंगार घेऊन त्या मोबाईलकडे जाळण्याच्या इच्छेने बघत असतानाच अचानक...

'कोमल'...

मोबाईलवर कोमलचा कॉल आला. जवळजवळ तीन रिंग वाजेस्तोवर वनिताला हेच समजेना की आपण आता हा फोन घ्यायचा की नाही? शेवटी तिच्यातील पवित्र स्त्रीत्व जागृत झालेच. तिन मनातच ठरवले. हा फोन घ्यायचा अन त्या नालायक बाईला चांगले झापायचे.

वनिता - हॅलो..
कोमल - साहिल तू आहेस कु.... हॅलो??? कोण बोलतंय??
वनिता - तू कोणेस?
कोमल - एक्स्क्युज मी?? हा साहिल रानडेंचा फोन आहे ना?
वनिता - होय ... माझ्या नवर्‍याचा...

खाडकन फोन बंद झाला. पाणी बरेच मुरत असावे.

अर्धा तास! अर्धा तास वनिता तो फोन हातात धरून निश्चल अन आगीसारखी पेटून बसलेली होती. त्या फोनवर येणारा प्रत्येक कॉल ती कट करत होती. त्या कोमलचा मात्र एकही कॉल आलेला नव्हता. बहुतेक वेगवेगळ्या लोकल नबर्सवरून साहिल तिला फोन करण्याचा प्रयत्न करत असावा हे तिला समजले होते. थोड्याच वेळात तिच्या स्वतःच्याच मोबाईलवर कॉल आला. तो तिने घेतला. निर्जीव, थंड पण घातक आवाजात वनिता बोलत होती.

वनिता - हॅलो
साहिल - मी बोलतोय
वनिता - काय?
साहिल - माझा सेल घरी राहिलाय..
वनिता - मग?
साहिल - त्याच्यावर मी कॉल करत होतो
वनिता - का?
साहिल - तू कोमलला काय म्हणलीस??
वनिता - कोण कोमल?
साहिल - माझी कलीग आहे..
वनिता - तुला काढून टाकलंय कंपनीतून.. ऑफीसमधे प्यायलास म्हणून.. कलीग कसली आलीय?
साहिल - दॅट आय विल एक्स्प्लेन लॅटर.. तू सेल फोन बंद करून ठेव माझा..
वनिता - आय नीड नो एक्स्प्लनेशन... आय अ‍ॅम लीव्हींग धिस हाऊस टुमोरो..

वनिताने फोन बंद केल्याच्या केवळ पंचविसाव्या मिनिटाला धापा टाकत साहिल घरात प्रवेशला.

साहिल - काय म्हणलीस?? कुठे जाणारेस तू?? तुझा प्रॉब्लेम काय आहे? एका पैशाची चौकशी करतो मी? काय हवं ते खर्च करायला मिळतंय, काय हवी ती खरेदी करू शकतीयस?? व्हाय?? व्हाय आर यू स्पॉइलिंग माय लाईफ?? व्हाय??

वनिताने आत्ताच बॅग भरायला सुरुवात केली तसा साहिलचा आवाज वाढला. रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते. साहिलचा आवाज वाढला तसा वनिताचा आवाज वाढला. साहिलने व्हायोलंट बनत तिच्या कानसुलात मारल्यावर वनिताने त्याच्या डोक्यावर फ्लॉवरपॉट मारला. तो निसटताच लागला. आता साहिलने तिला बरेच फटके मारले. वनिता मार खाऊनही मारायच्याच मूडमधे होती. साहिलने तिची बॅग बेडरूममधे उपडी करत तिला सांगीतले की ती त्याच्या अधिकारातील व्यक्ती आहे. तिने त्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय टाकायचा नाही. त्यावर वनितानेही त्याला सुनावले व पुन्हा बॅग भरू लागली. आता साहिल घरातील काही वस्तू फोडू लागल्या. अजूनही आजूबाजूच्या लोकांना फारसा सुगावा लागलेला नव्हता. साहिलला आत्ताच दारू आधीच चढलेली होतीच. तेवढ्यात त्याच्या डोक्यात काय आले कुणास ठाऊक! त्याने वनिताजवळची घराची किल्ली घेऊन स्वतःच्या खिशात टाकली अन तिला अन तिची बॅग धरत घराबाहेर काढले.

साहिल - जायचंय ना?? जा.. ज्जा मर! मर कुठेतरी.. माणसाला स्वतःच्या घरात हवी असते शांतता! आमच्या घरात पाय टाकला की नरकयातना सुरू होतात. जा जा! चालती हो. आता तुझ्याकडची किल्लीही माझ्याकडेच आहे. चल फूट! जा तुझ्या त्या दळभद्री भावाकडे! आई अन ताई म्हणत होत्या तेच खरंय! तुझ्याशी लग्नच नको होतं करायला..

आणि हे म्हणत म्हणत तो स्वतःच लिफ्ट बोलावून खाली निघून गेला होता. फ्लॅट सिस्टिम असल्यामुळे खालच्या मजल्यावरच्या लोकांना सुगावाच लागला नव्हता. आणि उदय तर घरीच नव्हता. आता रात्रीचे पावणे अकरा झालेले होते.

सर्व बिल्डिंगमधे साहिल दारुडा म्हणून कुख्यात! अंगावर सत्तर हजाराच्या आसपास सोने! हातात केवळ एक बॅग ज्याच्यात फक्त कपडे! पैसा एकही नाही. भावाचे घर अन सासर लांबवर! रात्र सुनसान झालेली.

करायचे काय? जायचे कुठे? सुटला... तो प्रश्न सुटला.

दहाच मिनिटात आलेल्या उदयने तिची परिस्थिती पाहून एक अक्षरही न विचारता तिला सरळ हाताला धरून घरात घेतले. मनात चलबिचल व निर्धार दोन्ही होते न ऐनवेळेस निर्धाराने चलबिचलीवर मात केली. या परक्या मानसाच्या घरात आत्ता कसे जायचे या प्रश्नावर 'इथे नाही गेलो तर कुणीच घरात घेणार नाही' या विचाराने मात केली. खालच्या मजल्यावरील बायकांशी ओळख होती खरी. पण तिथे प्रकरण फुटण्याचीच शक्यता जास्त होती. त्या बायकांनी अन त्यांच्या घरातल्यांनी प्रश्न विचारून तिला हैराण केले आते. सगळ्या बिल्डिंगला समजले असते की साहिलने वनिताला हाकलून दिले. त्यांनी सगळ्या बिल्डिंगला जागे ठेवले असते साहिल येऊन त्याच्याशी भांडण करेस्तोवर! हा माणूस निदान कुणाला बोलणार तरी नाही.

मात्र अत्यंत शरमलेली व हादरलेली होती वनिता! त्या माणसाचे घर लख्ख होते. नाव ठेवायला जागाच नव्हती. गर्भश्रीमंतीचा प्रत्यय येत होता प्रत्येक ठिकाणी! ए ग्रेडची स्वच्छता होती. जणू घरात कोणी टापटीपीची आत्यंतिक आवड असणारी बाई राहात असावी. पहिल्यांदा उदयने आपल्या घराच्या सगळ्या खिडक्यांचे पडदे लावून घेतले. त्यामुळे साहिलला वनिता त्याच्याकडे आहे हे दिसायची शक्यता मावळलेली होती. त्यानंतर त्याने वनिताला पाणी दिले अन दहा मिनिटांनी गरम गरम कॉफी!

कॉफी अर्धी झाल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली.

उदय - इक दिन होना ही था ये सब.. मै जानता था.. आप मेरे ऑफीसमे कलसे जॉब कीजिये.. कमसे कम इस माहौलसे कुछ तो छुटकारा..

तो काय काय बोलत होता. वनिताला ते सगळे ऐकू येत असले तरी तिच्या मनात भलतेच विचार होते. ते म्हणजे एक म्हणजे साहिलला कळले आपण इथे आहोत तर तो आपल्याला काय करेल? दुसरे म्हणजे हा माणूस नेमका कसा आहे ते तरी कुठे माहीत आहे? तिसरे म्हणजे आता साहिल येईल तेव्हा त्याला आठवेल तरी का की त्याने आज आपल्याला हाकलले आहे? आठवले तर तो पहिल्यांदा त्याच्या अन आपल्या भावाच्या घरी फोन करेल किंवा उदयलाच उठवेल. बिल्डिंगमधल्या कुणालाही उठवेल. त्याच्या गाडीचा खाली आवाज आला की आपण गुपचुप बॅग घेऊन बाहेर जाऊन बसायचे आपल्या दाराशी!

आणि तब्बल अर्धा तास उदय काही ना काही बोलत होता आणि तब्बल अर्ध्या तासाने साहिलच्या गाडीचा आवाज आला. ताडकन उठून वनिताने हळूच उदयच्या खिडकीतून खाली पाहिले तर...

साहिलबरोबर एक मुलगी आलेली होती. अत्यंत आधुनिक वेशभुषा, खरे तर जरा डोळ्यांवर यावी अशीच, मुद्दाम केलेली! आणि ती साहिलशी लगट करून लिफ्टकडे येत होती. साहिल काहीतरी गुणगुणत असावा. स्पष्ट आवाज येत नसले तरी जाणवत होते. नशीब सोसायटीतील त्यावेळेस कुणी ते दृष्य पाहात नव्हते.

पण उदय मात्र ते दृष्य पाहात होता. वनिता बॅग घेऊन दाराकडे निघाली तसे त्याने तिच्या हातातील बॅग घेतली अन बाजूला ठेवली. स्वतःचे बोट स्वतःच्या ओठांवर ठेवून 'आवाज करू नका' अशी खूण केली व हळूच म्हणाला की 'उनके साथ कोई औरत है, अभी आप सामने जायेंगी तो झगडा हो जायेगा. मै देखलेता हूं' ! का कुणास ठाऊक, याक्षणी वनिताला उदयचा आधार वाटला. साहिल आपल्याला आज खूप मारेल असे तिला वाटत होते.

आणि क्षणभरातच... लिफ्ट चवथ्या मजल्यावर येऊन थडकल्याचा आवाज आला. वनिताच्या पायातील बळच गेले. उदय पोलीस आयमधून बाहेर पाहात होता आणि वनिता उदयच्या पाठीकडे!

साहिल - इथेच होती स्साली.. गेली असेल भावाकडे

कोमल खिदळल्याचा आवाज आला. साहिल बहुधा किल्ली लावताना चुकत असावा.

कोमल - चढलीय तुला.. सरक..
साहिल - गेली कुठे पण ही?
कोमल - समोर कोण राहतं?
साहिल - तो एक यडाय.. पूजा वगैरे करतो.. एकटाच आहे.. त्याच्याकडे नाय जाणार ती..
कोमल - चल आत, उघडल दार!

तेवढ्यात पटकन वनिताला दारामागे ढकलून उदय दार उघडून बाहेर आला.

उदय - भाईसाहब, भाभीजी यहां खडी थी जब मै आया.. आपहीकी राह देख रहा था.. उनको मैने ऑटोमे बिठादिया.. कहरही थी की भैय्याके पास जा रही है..
साहिल - हां हां! ठीक है.. थॅन्क्यू .. थॅन्क्यू व्हेरी मह डिअर..
उदय - भाईसाहब.. बुरा न माने .. तो एक बात कहूं...
साहिल - बोलो यार, बोलो, और रह कौन गया है बोलनेके लिये...
उदय - ऐसा मत कहिये.. लेकिन.. ये सब.. ये सब ठीक नही कररहे है आप..
साहिल - अब तू सिखायेगा मुझे??

साहिलचा आविर्भाव बघूनच उदयने आत येऊन दार लावले आणि तमाशा नको म्हणून कोमलने साहिलला घरात ओढून घेतले जसे काही तो तिचाच नवरा होता.

पण पोलीस आयमधून वनिता कोमलला निरखत होती. मुलगी कसली? जवळपास चाळिशीची बाई असावी. नखरेल नुसती! नक्कीच साहिलला लुबाडण्यासाठी त्याच्या जवळ आलेली असणार! पण आपण? आपण अशा का बघतोय? आणि हा उदय त्याला वाट्टेल ते सांगतोय आणि आपण ऐकत बसायचे? माझे घर! त्यात घुसणारी ही कोण बया?

स्वतःच्या अधिकारांची जाणिव झाली तशी उदयला ढकलून वनिताने दार उघडलेही. पण उदयने चपळाई करून ते पुन्हा लावून घेतले व तिला आत ओढले.

वनिता धसका खाऊन उदयकडे बघू लागली.

वनिता - क्या कर रहे हो?
उदय - आप अभी अंदर जायेगी तो बहोत बडा तमाशा होजायेगा..
वनिता - मेरा घर है वो.. मै यहां नही रुकुंगी!
उदय - सिर्फ दस मिनिट!
वनिता - क्युं?

काही असले तरी उदयच्या डोळ्यात गैरभाव नाहीत हे त्याहीवेळेला वनिताला समजू शकत होते. ती आढेवेढे घेऊन 'निदान हा म्हणतो तरी काय' ते बघायला म्हणून दहा मिनिटांसाठी बसली.

उदय - साहिलजी नशेमे है! उन्हे याद है उन्होने आपको मारके हकालदिया था! जिस औरतके साथ वो आये है वो ठीक चलनकी औरत तो हैही नही. अगर आप अभी बेल बजायेंगी तो मारामारी होजायेगी! फिर आपके घरका मामला होनेकी वजहसे मैभी बीचमे पड नही सकुंगा! सोसायटीके तो किसीमे इतना दम नही है के ऐसे हालात जिनके घरमे है उनके घर की औरतको अपने घर मे वे ले जाये! सब अपनी अपनी देखेंगे! आपको सिर्फ सलाह देंगे! यहां जाओ, वहं जाओ, पैसे देंगे! ऑटो बुलायेंगे! अगर मै कहुंगा के मै छोडदेता हूं तो समझेंगे के आपका और मेरा कुछ गैर रिश्ता है.. ऐसेमे आपने बेल नही बजानी चाहिये! इतना सब करके भी अगर आप और साहिलजी दोनोही घरके अंदर रातभर रहे और वो औरत चली भी गयी तो पता नही साहिलजी आपको क्या करेंगे! इसलिये, आप सुबह चार बजेतक यहीं बैठिये! अंदर के कमरेमे! मै यहां बैठता हूं! मै ध्यान रखता हूं क्या क्या हो रहा इसका! चार बजे आपको बुलाउंगा! तब आप बेल बजाके ये कहिये के आप तो नीचे गॅरेजके पास सोगयीथी! अभी उपर आयी है! उस वक्त उनकी नशाभी उतरगयी होगी! हो सकता है भली सुबह कोई जादा झगडा ना हो! फिर आठ बजेके आसपास आप उनसे कहदीजिये के आप जॉब करनेवाली है और अलग रहना चाहती है...

उदयचे हे बोलणे ऐकून आपण अत्यंत निराधार आहोत ही भावना निर्माण झाल्यामुळे दु:खातिरेकाने वनिता हातांच्या ओंजळीत चेहरा धरून रडू लागली.

उदय - रोइये मत! ये लीजिए पानी...
वनिता - आप.. हमारे लिये ये सब..
उदय - आप दोनोंके लिये नही.. सिर्फ आपके लिये..

हे फारच सूचक वाक्य होतं.

वनिता - मतलब?
उदय - उनके लिये तो मैनि अभी कुछ किया ही नही है... अगर मै ठानलेता तो अभीतक उनकी शराब छूटजाती थी!

म्हणजे मामला काही इतर नव्हता तर याच्या मनात!

वनिता - कैसे?
उदय - बिल्डिंगमे हगामा करनेके लिये अगर मै एक कंप्लेंट लिखवादू तो ये दो दिन अंदर जायेंगे! आपकी तरफ देखकर मैने ये सब किया नही है!
वनिता - आपको बहुत तकलीफ होती होगी ना हमारे झगडोंसे?
उदय - नही.. मुझे तकलीफ इस बात की है के आप जैसी वाईफ होकर भी वो इस तरह क्यू पेश आते है..

वनिताने खाली पाहिले. खरे तर हा तिच्याच मनातील प्रश्न होता. पण तो उदयने विचारणे ही शरमण्याची बाब होती.

उदय - प्लीज डोन्ट माइंड, लेकिन.. आप दोनोंका सारा सेव्हिंग क्या उन्हीके नाममे है?
वनिता - क्युं?
उदय - खतम हो सकता है सब.. इसलिये पूछ रहा हूं..

उदय फार म्हणजे फारच जास्त बोलत असूनही अत्यंत खरे बोलत आहे हे वनिताच्या सहज लक्षात येत होते. हेच, अगदी हेच मुद्दे तिच्या मनात यायचे. उद्या रस्त्यावर यावे लागेल या व्यसनामुळे? मग काय करायचे? आधीच नोकरी गेलेली आहे.

वनिता - नौकरी भी गयी..
उदय - नौकरी गयी?? कब??
वनिता - बताते नही है मुझे.. एसेमेसमे पढा मैने.. किसीको लिखा था..
उदय - ये औरत कौन है..
वनिता - पता नही..
उदय - आपका सेकंड नेम नही अकांउंट्सपर?
वनिता - है..
उदय - तो आप कलके कल सारे बँन्कोंमे जाकर .. पुरा पैसा निकाललीजिये..
वनिता - (चक्रावून जात) क्या???
उदय - नही तो साल, दो सालमेही सब उडा देंगे..
वनिता - दारू छूट भी तो सकती है..

उदय उपरोधिक हसला पण त्या हसण्याकडे लक्षच गेले नाही. कारण तेवढ्यात पलीकडच्या फ्लॅटमधून खिदळण्याचे आवाज यायला लागले. बहुधा त्या दोघांच्या प्रणयचेष्टा रंगात आल्या असाव्यात.

वनिताच्या डोळ्यात पाणी आले. उदय 'यावेळेस आपण इथे बसणे योग्य ठरणार नाही' असा विचार करून स्वैपाकघरात गेला.

पंधरा मिनिटांनी तो आला तेव्हा त्याच्या हातात किल्ली होती.

वनिता - क्या है?
उदय - उस कमरेकी चावी! आप अंदरसे लॉक करके सो जाईये.. मै चार बजे जगादुंगा!

सव्वा बारा वाजलेलेच होते. या माणसासमोर रात्रभर बसून तरी काय करणार हा विचार करून वनिता उठली. त्या खोलीत गेली. त्या खोलीला तिने नुसतेच लॅच लावले. कितीही झाले तरी माणुस सभ्य होता. त्याच्यावरच आपण इतका अविश्वास दाखवणे, तेही त्याच्याच घरात हे चांगले दिसणार नव्हते. या विचाराने नुसतेच लॅच लावून ती पलंगावर बसली. ही त्याची खोली असावी. दोन्ही फ्लॅट्स मिरर इमेज असल्यामुळे तिला ते सहज लक्षात येत होते. आता पलीकडच्या फ्लॅटमधील आवाज येईनासे झाले होते. वनिता आता पलंगावर बसून विचार करू लागली. हा माणूस म्हणतो त्यातही तथ्य आहे. किमान पन्नास टक्के रक्कम तरी आपण सगळ्या खात्यांमधून काढून एक नवे खाते उघडून फक्त आपल्या नावावर ठेवायला हवी. प्रश्न पैशाच्या मोहाचा नाही आहे. प्रश्न आहे सुरक्षिततेचा! पण या उदयने तरी इतके का करावे? आपला सख्खा भाऊही इतके करत नाही. पण हेही खरे की हा काही अगदीच भावासारखा वागत नाही. त्या दिवशी कॉमेंट करताना आपल्याकडेच बघत बसला होता. माणूस वाईट नाहीये! हळूहळू डोळे मिटू लागले. तिने एकदा बाहेरच्या खोलीतील अंदाज घेतला. उदयच्या हालचालींचा काहीच आवाज येत नव्हता. तो काय करतोय हे बघायला बाहेर जाणे योग्य दिसले नसते. मग ती लाईट तसाच ठेवून डोळे मिटून पडली. दहा मिनिटांनी पुन्हा तिच्या फ्लॅटमधून साहिल अन त्या बाईचे आवाज आल्यासारखे वाटल्यामुळे ती दचकून उठली अन बाहेर आली.

ज्या खोलीत साहिल हल्ली रोज झोपत होता त्या खोलीतून आवाज येत होते. आणि उदयच्या नेमक्या त्याच्या समोरच्या खोलीत वनिता गेली तेव्हा पाठमोरा उघडा उदय खिडकीतून साहिल अन कोमलकडेच बघत होता. खिडकीच्या किंचित सरकलेल्या पडद्यामुळे साहिल अन कोमलच्या हालचाली अस्पष्टपणे दिसत होत्या. उदयच्या खोलीत ठार अंधार होता. त्यामुळे त्या नशेतल्या दोघांना इकडून कुणी बघत असेल असे वाटण्याची शक्यताच नव्हती. उदयच्या मागून वनिता ते अस्पष्टपणे दिसणारे दृष्य पाहून खिळलेली होती. तिच्या मनात एकाचवेळेस अनेक विचारांचे थैमान चाललेले होते. उदयच्या घरात्न आपले घर इतके स्पष्ट दिसते?? मग.. मग?? मग आपण आणि साहिल कित्येकदा.... याने असेच पाहिले असेल इकडून?? दुसरा विचार म्हणजे साहिलची आत्यंतिक किळस अन कोमलचा भयानक राग! अन तिसरा विचार म्हणजे आपल्याला झोपायला सांगून इतक्या रात्री उदय त्या दोघांवर आपल्यासाठी लक्ष ठेवतोय याला चांगुलपणा म्हणायचे की विकृती???

तिला एकदम रडूच कोसळले. उदय दचकला. त्याने दचकून मागे पाहिले. ही कधी आली इथे?? तिचा आवाज अजिबात येऊ नये म्हणून त्याने पटकन येऊन डाव्या हाताने तिच्या पाठीवर व उजव्या हाताने तिच्या तोंडावर जोर दिला. 'अंदर चलिये, अंदर चलिये' असे म्हणत त्याने धरूनच तिला पुन्हा तिच्या खोलीत नेले.

अनेक प्रकार झाले त्या काही क्षणांमध्ये! आपण एका भलत्याच पुरुषाच्या घरात आपल्या नवर्‍याने हाकलून दिल्यामुळे आलो आहोत. हा पुरुष इथे एकटाच राहतो. आपण अगतिक होऊन रडत आहोत आणि तो आपल्याला धरून सांत्वन करत पुन्हा आपल्याला दिलेल्या एका वेगळ्या खोलीत सभ्यपणे आपल्याला सोडण्यासाठी नेत आहे आणि तो उघडा आहे.

त्याचवेळेस उदयच्या मनात वेगळीच वादळे निर्माण होत होती. आपल्याच घरात एक स्त्री बिनदिक्कतपणे आलेली आहे. किमान पुढचे काही तास ती इथेच असणार आहे आणि तिला आपल्या मदतीची गरज आहे आणि आत्ता तिच्या तरूण शरीराचा स्पर्श आपण अनुभवत आहोत.

उदय - रोओ मत वनिता.. मै तुम्हे इससे बाहर निकालुंगा..

भाभीजी वरून वनिता आणि आप वरून तुम हा प्रवास क्षणार्धात कशामुळे झालेला आहे हे समजायची मनस्थिती वनिताची नव्हतीच! तिला त्या आश्वासनामुळे मिळाला होता एक शाब्दिक आधार! उदय आपल्याला यातून कसा बाहेर काढणार यावर सारासार विचार करण्याची तिची मनस्थितीच नव्हती. ती त्याच्याच आधाराने खोलीत पोचलेलीही होती. आणि आता तिच्या रडण्याच्या आवाज पलीकडे पोचण्याची शक्यता उरलेली नव्हती. एवढेच कळल्यामुळे ती आता ओक्साबोक्शी रडू लागली व रडता रडता तिने आपले तोंड उदयच्या छातीवर टेकवले.

उदयने आपल्या हातांनी तिच्या पाठीवर थोपटतानाच हळूहळू उदयचा हात तिच्या अंगावरून हक्काने फिरल्यासारखा फिरू लागला. काही क्षणातच वनिताला भान आले खरे, पण तोवर उदयने तिला आपल्या मिठीत घेऊन तिचे चुंबनही घेतलेले होते.

हे सगळे अत्यंत चुकीचे व आपल्या दृष्टीने हीन दर्जाचे आहे याची व्यवस्थित जाणीव वनिताला होत असूनही कित्येक दिवसांनी मिळालेला एकमेव मानसिक आधार आणि कित्येक दिवसांनी लाभलेला आक्रमक पुरुषी स्पर्श यांच्या जाळ्यात तिची नैतिक मुल्ये अडकली.

जे साहिलचे अन कोमलचे चाललेले होते ते अगदी उघडपणे व निर्लज्जपणे चाललेले होते. पण त्याचवेळेस जे उदयचे अन वनिताचे चाललेले होते त्यातही बेभानता होती, नीतीबद्दलची बेफिकीरी होती, 'माझेच काय चुकले' असा कडवट प्रश्न होता आणि एक जबरदस्त आकर्षण होते.. मीलनाचे!

हे होते आहे, आपण त्यात सहभागी झालो आहोत, तेही स्वेच्छेने अन आपण रसही घेत आहोत याचे भान वनिताला जेव्हा ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले तेव्हाच खर्‍या अर्थाने आले. आता एखाद्या बलात्कारितेची भूमिका घेऊन उदयशी वाकडे घेण्यात काहीही अर्थ उरलेला नव्हता. हे झाले कसे हेच वनिताला समजत नव्हते. उलट ती उदयच्याच कुशीत विसावलेली होती.

त्या पहाटे साडे चारलाच तिने बेल वाजवली स्वतःच्या घराची! त्यानंतर तुंबळ होईल असे तिला वाटले होते. पण बहुधा कोमल अन साहिलचे काहीतरी वाजलेले असावे. कारण कोमल तरातरा निघून गेली. मागच्या बंद दारातून उदय पाहात असणार हे वनिताला माहीत होते. साहिल एक शब्दही न बोलता दारातून बाजूला झाला. बॅगेसकट वनिता आत प्रवेशली.

साहिल - कुठे होतीस?
वनिता - रस्त्यावर उभी होते, कुणी किडनॅप करतंय का बघायला.

आत्यंतिक शरमेने साहिलने मान खाली घातली.

साहिल - आय डिड नॉट टेल यू. आय हॅव्ह लॉस्ट माय जॉब
वनिता - कालच कळले मला.. ते मीच तुला सांगीतले.
साहिल - त्या दु:खात..
वनिता - त्या दु:खात या बाईला घरी आणलेस..
साहिल - मला काय बोलावे हेच समजत नाही. तुझ्यासमोर उभे राहायची लायकी नाही माझी.
वनिता - नको राहूस उभा! आवर.... आणि निघ.. नोकरी शोध नाहीतर दुसर्‍या बायका शोध..
साहिल - एकदा... फक्त एकदा माफ करशील??
वनिता - करेन.. कालची रात्र पुन्हा आणून ती वेगळ्या पद्धतीने जगून दाखवलीस तर करेन माफ तुला!

आठ दिवस!

कथेच्या सुरुवातीला वनिता जो विचार करत बसली होती तो त्यानंतर आठ दिवसांनी!

उदयने या आठ दिवसात कितीदातरी तिला एसेमेस पाठवून घरी यायची विनंती केली होती. तिने काही ना काही कारण सांगून अर्थातच ते टाळले होते. सगळ्या खिडक्यांवरचे पडदेही तिने कायमचे बंद करून टाकलेले होते. उदय जैन या माणसाला आपण आयुष्यात येऊच द्यायला नको होते हे तिला उमगले होते. गेल्या आठ दिवसात साहिल रोज पिऊन आलेला होता. पण त्याच्या सेव्हिंग खात्यावर वनिताने आता फक्त दिड हजार ठेवलेले होते. जवळपास सत्तर हजार तिने 'आम्ही ट्रान्स्फर होत आहोत' असे सांगून नवीन खाते उघडून त्यात ठेवले होते. फक्त स्वतःच्या नावावर! हे साहिलला माहीतच नव्हते. इतर एफ्.डी.च्या खात्यांवरील रकमा तिने मोडून सरळ नव्या खात्यात गुंतवल्या होत्या. त्यासाठी वाट्टेल त्या थापा मारल्या होत्या. आजवरचे रेकॉर्ड बघून बॅन्कांनी आपले प्रश्न, शंका सगळे थांबवले होते. आता वनिताच्या एकटीच्या नावावर दोन खात्यात मिळून जवळपास चार लाख ऐंशी हजार इतकी रक्कम जमा झालेली होती. मात्र उदयकडून होणारा मनस्ताप थांबत नव्हता. त्याचवेळेस कुठेतरी असेही वाटत होते की खरच एकदा त्याच्याकडे जावे. कारण तिला आता स्वतंत्र जगण्याचा निर्णय घ्यावा लागणारच होता. पण हे तिला निश्चीत माहीत होते की हा जैन माणूस आपल्याशी लग्न वगैरे मुळीच करणार नाही. तो फक्त ओळा ठेवेल आपल्या शरीरावर! त्यामुळे तिने तो मोह आवरलेला होता. आणि उदयचे मेसेजच्या पाठोपाठ मेसेज यायला लागले होते. दोन, तीनदा तर त्याने फोनही केला होता. उघड्या जगात पोरके होण्याची वेळ वनितावर आलेली होती. आणि याचा उपाय काय यावर ती अतिशय गंभीरपणे विचार करत होती.

त्याचवेळेस साहिल घरी आला.

साहिल - तू काही पैसे वगैरे विथड्रॉ केले आहेस का? माझा सात हजाराचा चेक बाउन्स झाला.
वनिता - कुणाला दिला होतास चेक?
साहिल - सन अ‍ॅन्ड सॅन्ड हॉटेल..
वनिता - का?
साहिल - विचारणारी तू कोण..???

साहिलने हिंस्त्र होत तिचे खांदे धरले. आणि क्षणार्धात वनिताला उपाय सुचला.

वनिता - मारू नकोस. केस होईल. परस्त्रीवर हात उगारल्याबद्दल!
साहिल - थोबाड फोडीन! कसली परस्त्री? बायकोयस माझी..
वनिता - वहिनी म्हण! मिसेस जैन आहे मी! मिसेस उदय जैन! हे बघ त्याचे मेसेजेस, हे त्याचे कॉल्स.. बघ.. बघ! माझ्याशी लग्न करणार म्हणतोय! मी हवीय त्याला मी! का हवीय माहितीय?? कारण माझ्या नवर्‍यात आपल्या बायकोला सांभाळायची धमक नाही. सगळ्या जगाला हवीय मी! सन अ‍ॅन्ड सॅन्डला पैसे द्यायला पगार मिळतोय तुला? आहे नोकरी चालू तुझी? कसा पोसणार आहेस मला? चार दिवसात त्याच्याकडे राहायला जाणार आहे मी! आपले पेपर्स झाले की आम्ही रजिस्टर्ड लग्न करणार आहोत. आणि त्याच्याकडे इतके पैसे आहेत की वकील अन जज्ज फिरवायला त्याला काहीही लागणार नाही. मी का चाललीय माहितीय? कारण निर्व्यसनी आहे तो! भलत्या बायका घरी आणत नाही. खिशात दमडा नसताना महागड्या हॉटेलमधे जाऊन दारू पीत बसत नाही. का नोकरी गेली माहितीय ना तुझी? फक्त दारूमुळे! तुला हे माहितीय का? कसे माहिती असणार म्हणा? आपल्या रूममधे झोपायला येण्याइतकी शुद्ध कुठे असते तुला? तुला हे माहितीय की मीही रोज पीते? रोज दारू पिते मी! मी आता दारूशिवाय राहू शकत नाही.

घराचे दार उघडेच होते. उदय आवाज ऐकून दारापाशी आलेला होता. बराचसा भाग त्याने ऐकलेला होता. आज जर साहिलने वनितावर हात उचलला तर तो मधे पडणार होता. असे त्याने ठरवलेले होते.

वनिता - मी दारू शिवाय राहू शकत नाही. त्यामुळे मी सेव्हिंगमधले उरलेले बारा हजार मी माझ्या वेगळ्या खात्यात टाकले आहेत.

साहिल हिंस्त्र अन हादरलेल्या नजरेने एकाचवेळेस तिच्याकडे बघत होता.

साहिल - बारा? सत्तर हजार होते सत्तर..
वनिता - उडवले मी ते! माझ्या अन उदयच्या टूरसाठी चाळिस हजार दिले ट्रॅव्हल्स कंपनीला मी! उरलेल्या पैशांची गेले दोन महिने दारू पितीय मी!
साहिल - नालायक...

किंचाळून साहिलने वनितावर झेप घेतली खरी. पण मागच्यामागेच अडवला गेला. उदयने त्याला धरून ढकलले. साहिल खाली पडला. काही झाले तरी उदयपुढे हालचाली करणे आपल्याला झेपणार नाही हे त्याला समजले. उदयने बिनदिक्कत वनिताला आपल्याकडे खेचले अन म्हणाला..

उदय - खबरदार अगर इसको हाथ भी लगाया.. बीवी है मेरी.. समझे?? चल वनिता..

खरे तर वनिताला साहिल बिचकावा अन हादरावा यासाठी उदयचा प्रवेश चांगलाच वाटला होता. नाटक खरे वाटावे म्हणून ती बिनदिक्कत उदयबरोबर साहिलसमोर उदयच्या घरात गेली आणि उदयने दार लावले.

दार आतून लावून घेताच उदयने वनिताला करकचून आवळले अन म्हणाला..

उदय - कितना तरसाओगी मेरी जान..

खाडकन एका हाताने उदयच्या गालावर पाच बोटे उमटवली वनिताने. ज्या स्त्रीची परवानगी नसते तिला हात लावायचे पुरुषाचे धाडस होत नाही.

हादरलेला उदय वनिताकडे पाहात होता.

वनिता - क्या समझते हो तुम? उस दिन मेरी मदद की तो मै तुम्हारी होगयी? उस दिन मुझसे वो बात हुई इसका आजतक मुझे पछतावा है! मेसेज पे मेसेज? क्या लगता है तुम्हे? कुछ हक है तुम्हारा मुझपर? आओ ना, आ रही हो ना? अरे?

वनिताने त्याला त्याच्याच घरात आणखीन एक लगावल्यावर तो ऑफ व्हायच्या ऐवजी उलट पश्चात्तापदग्धच झाला. अविवाहीत होता, श्रीमंत होता, पण होता चांगल्या घरचा! वाटले असते तर त्याने साहिलला सरळ सांगीतले असते की ही त्या रात्री माझ्याकडे होती. वनिताच्याही अतिशय नीट लक्षात होते की तिने जर आतून कुलूप लावले असते, जी त्याचीच कल्पना होती, तर त्या रात्री काही घडलेच नसते.

पण गेल्या काही वर्षांमधे त्यांच्यात एक चांगुलपणाने भारलेले नातेही निर्माण झालेलेच होते. अत्यंत हर्ट नजरेने, खालमानेने व अपमानयुक्त आवाजात उदय म्हणाला..

उदय - गलती मेरी है! चाहे तो आप और मारिये! आप आपके घर लौटिये! मै अपने मनमे कुछ नही रख रहा हूं! आपभी मत रखना! आजसे सिर्फ दोस्त! अगर जरूरत पडे तो जरूर बताईये!

आज वनिताने उदयला मारलेली मिठी व व्यक्त केलेले अश्रू हे खरच चांगल्या मित्रमैत्रिणींसारखे होते.

आणि तिने दार उघडून पाहिले तर!

साहिल सुरी घेऊन स्वतःच्या नाडीवरून फिरवायचे अतोनात धाडस करत होता.

किंचाळत वनिताने त्याला आवरले.

तिला आलेली पाहून हमसाहमशी रडत साहिल म्हणाला..

साहिल - नाही जगण्याच्या लायकीचा मी.. नाही आहे त्या लायकीचा.. काय काय नाही केले मी दारूसाठी! नोकरी घालवली, बदनामी करून घेतली, तुझी बदनामी होऊ दिली, गलिच्छ मित्रांमधे वावरलो, पैसे वाट्टेल तसे उधळले, तू कशी जगत होतीस तेही पाहिले नाही... काय काय नाही केले मी? त्या नालायक कॉलगर्लच्या नादी लागलो.. तिच्यावर पैसे उधळले... पुढे कधीच कुठे नोकरी लागेना..

मधेच उदय म्हणाला..

उदय - आप रो क्युं रहे है?? हम दोनो तो सिर्फ दोस्त है.. आपकी नींद खुले इसलिये ये नाटक किया था मेरे कहनेपर भाभीजीने...

साहिलने अविश्वासाने वनिताकडे पाहिले. तिने डोळ्यात अश्रू आणि ओठांवर हसू आणून होकारार्थी मान डोलावली. अक्षरशः तिच्या कुशीत तोंड खूपसून रडला साहिल. वनिताने उदयला जायची खूण केली. त्याने एकदाच तिच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेत अजूनही काही आहे की हाय असे वनिताला वाटले. तिने उदास होऊन दोन्ही हात उदयला जोडले. उदयने 'क्या कर रही हो यार?' अशा स्वरुपाचे भाव चेहर्‍यावर आणून मिश्कीलपणे डोळे मिचकावले व तो बाहेर पडला.

वनिता - सगळे पैसे तसेच आहेत. दुसर्‍या खात्यावर..

साहिल अजूनही हमसून रडत होता.

वनिता - रडतोस कसला? मुलीसारखा!

रडत रडतच साहिल म्हणाला..

साहिल - एकाचवेळेस... किती विविध रुपात वावरता तुम्ही बायका.. कधी बायको.. कधी मैत्रीण.. कधी मुलगी.. कधी घर सावरणारी कर्तबगार बाई... आणि...

वनिता - आणि???

साहिल - आणि ... आणि आईसुद्धा होता...

गुलमोहर: 

एका भागाचीच आहे ना..
म्हणजे संपली का..
.
काय लिहावे कळत नाहीये , थोडे कन्फ्युजन आहे..
परत एकदा वाचावी लागणार...

एवढ्या टइपिकॅल कादंबरी साठी ....... बाप कादंबरी राखादावालीत .....?
मजा नाही आली ... एकदम साधारण कादंबरी .......
२/१० मार्क्स

व्वा..मलातरी खुप आवडली बेफिकीरजी...मस्त झालीये कथा..आणि शेवट गोड तर सगळंच गोड Happy

कादंबरीचे नाव वाचून आत्तापर्यंत वाचायचे टाळत होतो, पण थोड वेळ मिळाला म्हणून वाचली आणि फार आवडली. उत्तम लिहीले आहे. Happy

हो समाप्त अस तरी लिहयचे होते.
पण खरच वाचायला घेतल्यावर पुर्ण वाचल्या शिवाय कामाला हाथ नाही लावला आज.
सहीच.

बेफिकीर, सुंदर कादंबरी!!! Happy
आणि आम्हा वाचकांना ती समर्पित केलीत त्यामुळे गहिवरुन आले... तुमची खुप खुप आभारी आहे.
सुमेधाला अनुमोदन!!!! <<< शेवट गोड तर सगळंच गोड Happy

काय भयानक अवस्थेत सापडली होती वनिता. किती घरांची राखरांगोळी होत असते दारु पायी... Sad कल्पना होतीच, पण ह्या कथेतून खुप बारकाईने हा भयंकर प्रवास अनुभवता आला. असे जीवन जगणार्‍या सगळ्या वनितांच्या जीवनात आशेची पहाट लवकर होवो, त्यांच्या नवर्‍यांना अशीच उपरती पाणी डोक्यावरुन जायच्या आत होवो हीच माझी मनापासून प्रार्थना!

नाही आवडली ..
सौ. वनिता यांचे चारित्र्य आपण रेखाटले आहे.. पण ती असहाय्य का आहे हे कळत नाही ..
तिच्या नवर्यावर असलेल्या प्रेमामुळे? की तिला माहेर आणी सासरचा आधार नाही म्हणून..

कथेतील बरेच धागे जरा विस्कळीत वाटले.. आपली कादंबरी नेहमी मुद्देसुद असते .. त्यामुळे ही अपेक्षा नव्हती.. बाकी प्रयत्न छान आहे.. आणी यशस्वीच झाला असे म्हणेल.. आज बराच वेळ ह्या कथानकाच्या शेवट आजुन कसा करता येईल असा विचार करत होतो Happy , कारण सगळ्यांना शेवट हा गोडच असावा असे वाटते ( शेवट ह्या कथानकामधे संभ्रमीत असल्यासारखा वाटतोय) ..

पु.ले.शु.

मलापण नाही आवडली ..
ती असहाय्य का आहे हे कळत नाही >> अगदी अगदी
ती असहाय वगैरे वाटली नाही, अशा कित्येक बायका आहेत ज्या अशिक्षित आहेत, ज्यांना नवर्‍याला का पितोस हे ही विचारायचं असतं ठाऊक नसतं त्यांनी ते accept केलेलं असतं नवर्‍याच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपला जन्म आहे, एवढंच त्याना माहीत असतं, माहेरचा आधारही नसतो, यात तसं काहीच नाहीय. व्निता सुशिक्षित आहे, छोटी मोठी नोकरी करून स्वतःचा उदर्निर्वाह करू शकते. भावाचं घर आहे. अर्थात तिथे फार काळ जागा नाही पण मॉरल सपोर्ट तर मिळू शकतो.

शेवटची तडजोड अज्जिबात पटली नाही...
शेवट विस्कळीत!

'असहाय्य' ऐवजी 'अगतिक' हा शब्द कसा वाटेल?
अशा परिस्थितीत सापडलेल्या बहुतांश स्त्रिया अगतिक असतात. त्यांच्यासमोर सुटकेचे बरेच मार्ग असतात, पण लग्न टिकावे ह्या भावनेने त्या अगतिक झालेल्या असतात.

वनिताची मानसिक अवस्था त्याहून वेगळी दिसत नाही.
परित्यक्ता, विधवा, घटस्फोटीत स्त्रियांना आपल्या समाजात कुणीच आश्रय देत नाही. दिला तरी पराकोटीची मानहानी सोसत जगावे लागते.
स्वावलंबी स्त्रिया नोकरी करुन एकटे राहू शकतात, पण त्या एकट्या सगळं मॅनेज करत राहातायत, म्हणून त्यांचे कौतुक किंवा आदर वाटणे तर दूरच, त्यांच्या चारित्र्याविषयी आजही शंका घेतली जाते. आपला देश अजून अशा मानसिकतेतून बाहेर कुठे पडलाय? कदाचित मुंबई सारख्या शहरात जरा वेगळी परिस्थिती असेल, पण बाकी शहरांचे, गावांचे काय?

वनितासारख्या स्त्रियांना मग अगतिकतेतून 'आहे त्या आणि तशा नवर्‍यासोबत मुकाट्याने संसार करणे' शहाणपणाचे वाटले तर आश्चर्य वाटायला नको!!!

ही कादंबरी आभार म्हणून प्रकाशित केल्याबद्दल क्षमस्व! विस्कळीत असणे व अयोग्य असणे या दोन्ही प्रतिक्रियांचा आदरपुर्वक स्वीकार करत आहे. पुन्हा दिलगीरी!

-'बेफिकीर'!

उदय चे पात्र नीट उलगडले नाही. तो दिवसभर घरात बसुन फक्त संध्याकाळी सात ते साडे आठ बाहेर जाउन एव्हढा बीजीनेस कसा काय संभाळत असेल ते कळले नाही. त्याच्या मनात वनिता विशयी सुरवातीपासुनच काय भावना होत्या हे नीटसे स्पष्ट झालेल नाही असे वाटते.

उदय चे पात्र नीट उलगडले नाही. तो दिवसभर घरात बसुन फक्त संध्याकाळी सात ते साडे आठ बाहेर जाउन एव्हढा बीजीनेस कसा काय संभाळत असेल ते कळले नाही. त्याच्या मनात वनिता विशयी सुरवातीपासुनच काय भावना होत्या हे कळत नाहि.
शुभ

ही कादंबरी आभार म्हणून प्रकाशित केल्याबद्दल क्षमस्व! >>>> का बुवा क्षमा???? कादंबरीत काही त्रुटी राहण्याशी याचा काय संबंध?
उदय चे पात्र नीट उलगडले नाही.>>>> अनुमोदन!
ही एका भागाची कादंबरी असली तरी प्रतिसादकांनी सुचवलेल्या सगळ्या त्रुटींचा विचार करुन ही कथा थोडी वाढवता येईल का? जेणेकरुन कथा व्यवस्थित संपवता येईल आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील....

बेफिकीर , या कथेपेक्षा तुमच्या नेहमीच्या कथा नक्कीच जास्त छान असतात . बाप कादंबरी मात्र खूप छान सुरु आहे.

सर्वांचे पुन्हा धन्यवाद व सूचनांची नोंद घेतली.

मी स्वतःही या कादंबरीबाबत तितका समाधानी नाही.

-'बेफिकीर'!

छान ! आवड्ली. शेवट सुखांतच केला पाहिजे हा मराठी साहित्याचा बाणा असावा. असो. कारण दरवेळेस शोकांत आवड्तोच असेही नाही.
तरीपण कथा आवड्ली. साहिलची व्यक्तिरेखा काळीकुट्ट आणि उदयची धवल तर वनिता अगतिक - अशी बाळबोध मांडणी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक कंगोरे असते तर आणखी मजा येते. तरीपण कथानकावर विलक्षण पकड ठेवण्याचे लेखनाचे कसब आपल्याला आहे हे निच्शितच. उदयचे व्यक्तिमत्व मांड्तांना मनाचा कुठेतरी गोंधळ झाला असे वाटते. ते पात्र अजून बांधेसूद रंगवता आले असते. तो थोडा खलनायक,थोडा सह्रदय मित्र असा सर्वच थोडा थोडा आहे असे वाटते.
तरीपण कथा आवड्ली हे निच्शित..

ही कादंबरी वाचायची राहूनच गेली होती...आज वाचली. चांगली वाटली...मुख्य म्हणजे शेवट गोड आहे...साहील चे दोलायमान पात्र छान रंगवले आहे...फक्त उदय चे वागणे काही कळले नाही...

"बाप" च्या तुलनेत कुथेच नाहि.<<<एवढ्या टइपिकॅल कादंबरी साठी ....... बाप कादंबरी राखादावालीत .....?
मजा नाही आली ... एकदम साधारण कादंबरी .......>>>> अनुमोदन.

Pages