मे महिन्याच्या शेवटी सगळ्यांचा जीव उन्हाळ्यानी हैराण होत असे. उन्हाळ्याचा कोप कमी करण्यासाठी सगळं घर-दार झटत असे. आमची त्यात कटकट नको म्हणून दुपारभर आम्हाला हौदात डुंबण्याची मुभा मिळत असे. ताजी नेहमी असल्या बाबतीत आमची बाजू घ्यायची. "एकदा मोठ्या झाल्या मुली की मग अशी मजा त्यांना करता येणार नाही", या वाक्याचं वाइट नक्कीच वाटायचं पण मोठं व्हायला अजून खूप अवकाश आहे याचा आनंद सुद्धा व्हायचा.
दुपारी झोपाळ्याच्या चौकात अज्जी-अजोबा चक्क पाणी ओतायचे. मग स्वयंपाकघराचं दार उघडं ठेवून अज्जी दारातच चटई टाकून पडायची. झोपाळ्याच्या दिशेने येणारं वारं पाण्यावर गार होऊन यायचं. कधी कधी मी व स्नेहा अज्जीच्या दोन्ही बाजूंना झोपायचो! पण आम्ही पाणी ओतल्यावर मात्र धपाटे मिळायचे!
त्यामुळे लहानपणी, मोठं झाल्यावर झोपाळ्याच्या चौकात पाणी ओतायचा निर्णय घेता येईल याचा आम्हाला खूप आनंद होत असे!
उन्हाळ्याची बाधा कमी करण्यासाठी अजूनही खूप मार्ग होते. अंबील हा त्यातला एक. नाचणीचे सत्त्व रात्रभर भिजवून ताकात मिसळून प्यायचे. हा जीवघेणा प्रकार मला कधीच आवडला नाही. आणि बरेच दिवस हे भयानक पेय प्यायल्यानंतर उन्हाळा बाधत नाही ही मला मोठ्या माणसांनी कारस्थान रचून मारलेली थाप वाटायची. मग सगळे मुडशिंगीकर (स्नेहासकट) सकाळी अंबील प्यायचे. मी मात्र केसकरांच्या घरातली, "कुठलाही ऋतू असो आम्ही चहा सोडणार नाही" ही रीत पुढे न्यायचे. कधी कधी अज्जी मात्र मला अंबील प्यायला लावायचा चंग बांधायची. अज्जी कधीही बळजबरी करत नाही. पण एखादी गोष्ट आपण खावी किंवा प्यावी असं तिला वाटत असेल तर ती त्याचं अखंड वर्णन करते. म्हणजे सकाळी उठल्यापासून "अंबील कसं शरीरातली उष्णता कमी करतं" यावर तिची रेकॉर्ड अडकायची.
"हे बघ तुमच्या पुण्यात मिळत नाही अंबील. म्हणून पी"
"अगं ताक जास्त घालते. फक्त अर्धा ग्लास पी!"
"नाचणी फार चांगली. पुण्यात अशी नाचणी सुद्धा मिळत नाही."
" आम्ही सगळे पितो! स्नेहा सुद्धा पिते. शहाणी आहे ती. तुला पण आवडायला लागेल नंतर."
मी या सगळ्या वाक्यांकडे दुर्लक्ष करायचे. आजोबांसमोर वाद घालायला गेलं की ते लगेच त्यांची गीताई वगैरे सुरू करायचे. रडून थोडावेळ सुटका व्हायची. पण पुन्हा तासाभरानी पेल्यात अंबील घेऊन अज्जी हजर व्हायची. कधी कधी मी पळून टाकीवर जाऊन बसायचे. मग कौलांतून, "सई खाली ये. मी नाही आग्रह करणार तुला" अशी आर्जवं व्हायची. पण खाली येताच परत पेला घेऊन अज्जी हजर. मग शेवटी दिवसभर तिची कटकट नको म्हणून मी नाक धरून एका घोटात पेला संपवायचे. त्यानंतर तिच्या चेह-यावर जी काही विजयी मुद्रा असायची ती बघून दुस-या दिवशी माझा सत्याग्रह अजून तीव्र होत असे. अज्जीचा आग्रह सुद्धा विलक्षण केविलवाणा असायचा. आपण अंबील पिऊन तिच्या म्हाता-या मनाला खूप शांती देणार आहोत असं वलय ती निर्माण करायची. पण अंती तिची विजयी मुद्रा बघताच हा सगळा प्रकार एक डावपेच होता असं वाटायला लागायचं. त्यामुळे मी अज्जीला "केविलवाणा हिटलर" हे नाव बहाल केलं होतं.
मे महिन्याच्या अंती आंबा सुद्धा वर्ज्य व्हायचा. मग दुपारी पेटीतले आंबे चोरून आम्ही टाकीवर बसून खायचो. आंबे खाऊन माझे व स्नेहाचे गाल वर यायचे. मग अज्जी आईला पत्र लिहून "सई छान गुट्टी झाली आहे" असं कळवायची. बालपणीची ती काही सुखाची वर्ष सोडता "गाल वर येणे" ही जन्मजात साडेसातीच म्हणायची!
दुपारी मात्र कैरीचं पन्हं असायचं. त्यात मीना मामी कधी कधी केशर पण घालायची. पन्हं पिण्यासाठी मी आनंदाने चहा सोडायचे. कधी दुपारचे पाहुणे आले की लिंबू सरबत असायचे. मग पाहुण्यांना देऊन आपल्यासाठी उरेल का, या विचाराने मी व स्नेहा मामी भोवती घुटमळायचो. मिळालेलं लिंबू सरबत हळू हळू पुरवून प्यायचो. मला माझं सरबत आधी संपलेलं बिलकुल आवडायचं नाही. पण स्नेहा नेहमी मला या खेळात हरवायची. एखादी गोष्ट खूप वेळ ठेवणे यात तिचा हातखंडा होता. साडी सुद्धा ती कधी कधी रात्रभर नेसून झोपायची! आपण स्नेहाइतकी सुगृहिणी होऊ शकणार नाही हे मी लहानपणीच मान्य केले होते!
पण उन्हाळ्याचा सगळ्यात मोठा उ:शाप म्हणजे वळवाचा पाऊस. एखादा दिवस असा यायचा की सकाळपासून वारं सुटायचं. मध्येच ढग दाटून यायचे. तो पूर्ण दिवस वळवाच्या पावसाची तयारी करण्यात जायचा. जणू कुणीतरी पाहुणाच घरी येणार असं वाटायचं. शेजारणी आपापल्या मिरच्या, पापड,कपडे भराभरा गोळा करायच्या. नरू मामा सुद्धा पावसात अडकायला नको म्हणून लवकर यायचा. आजोबा त्यांची आरामखुर्ची घरात आणायचे. झोपाळा खाली यायचा. माऊ सुद्धा घाबरून अज्जीच्या खोलीत मुटकुळं करून बसायची. सगळे एखाद्या बाळंतिणीसाठी थांबावं तसे थांबायचे. चार वाजायच्या आसपास काळोख व्हायचा. बाहेरच्या गुलमोहराची रंगीत पानं हवेत केशरी वावटळ बनवायची. ती वावटळ बघत आम्ही अज्जीबरोबर गॅलरीत बसायचो. पावसाचा वास यायचा आधी. लहान असताना मला तो वास म्हणजे झाडांना आलेला घाम आहे असं वाटायचं. मग एक मोठ्ठा थेंब टपकन माझ्या नाकावर पडायचा. लगेच स्नेहाच्याही गालावर यायचा. आमची पाऊस यात्रा सुरू व्हायची. मागच्या दारानी लगेच गच्चीवर धाव घ्यायचो! मग पुढचा अर्धा तास गारा वेचण्यात जायचा. गारांचा पाऊस माझ्या सुट्टीचा मुगुट असायचा. तासभर पावसांत चिंब भिजून घरात आलो की मामी गरम भजी करायची. मग मी, नरूमामा, स्नेहा त्याच्या पलंगावर बसून खूप भजी खायचो.
दुस-या दिवशी सकाळी मात्र सगळे चहा प्यायचे. बाहेर गुलमोहराच्या पायघड्या असायच्या. पावसाने धुतलेल्या काळ्या कुळकुळीत रस्त्यावर तो गुलमोहर अजुनच सुंदर दिसायचा. माऊताई सुद्धा पावसानंतरचं ऊन खायला बाहेर यायची. वळवाच्या पावसानंतर मात्र शाळा जवळ आली आहे हे लक्षात यायचं. मग थोडेच दिवसात माझी स्वारी परत पुण्याला रवाना व्हायची. पण तो वळवाचा पाऊस शाळासुद्धा सुंदर बनवायचा! शाळेतले पहिले काही दिवस खिडकीतून पाऊस बघण्यात जायचे!
----
मूळ लेख : http://unhalyachisutti.blogspot.com/2009/07/blog-post_31.html
वळवाचा पाऊस
Submitted by सई केसकर on 7 July, 2010 - 01:09
गुलमोहर:
शेअर करा
बाहेर गुलमोहराच्या पायघड्या
बाहेर गुलमोहराच्या पायघड्या असायच्या. पावसाने धुतलेल्या काळ्या कुळकुळीत रस्त्यावर तो गुलमोहर अजुनच सुंदर दिसायचा. <<< अगदी खरं आहे.. सई पुन्हा एकदा.. बालपणाच्या आठवणींना मस्त गोंजारलंस ! ग्रेट..
खूप छान..
खूप छान..
किती सुरेख लिहितेस तु
किती सुरेख लिहितेस तु सई...डोळ्यासमोर जशीच्या तशी एक लहान मुलगी अन तिचं हे सारं भावविश्व उभं राहीलं..!
मस्त आहे हे देखील
मस्त आहे हे देखील
सुरेख! << पावसाचा वास यायचा
सुरेख!
<< पावसाचा वास यायचा आधी. लहान असताना मला तो वास म्हणजे झाडांना आलेला घाम आहे असं वाटायचं. >> खूप मजा वाटली हे वाक्य वाचून! तुझे लेख पुन्हा पुन्हा वाचायला जाम मजा येते सई! अशीच सुंदर, भरभरून लिहित रहा.
नेहमीप्रमाणेच!
नेहमीप्रमाणेच!
कित्ती गोड. ओळ अन ओळ वाचताना
कित्ती गोड. ओळ अन ओळ वाचताना मला लहानपणीचे दिवस आठवले. मस्त लिहीतेस तु. आणि काय गोड बाळ असशील ग लहानपणी तु.
कित्ती गोड. ओळ अन ओळ वाचताना
कित्ती गोड. ओळ अन ओळ वाचताना मला लहानपणीचे दिवस आठवले. मस्त लिहीतेस :-). लहानपणी काय गोड बाळ असशील ग तु
सगळ्यांचे
सगळ्यांचे आभार!!
@अरुंधती,
तुझ्या सारखे वाचक असले की लिखाण सोपं होतच!!
@ कुसुमिता,
तुझं नाव मला खूप आवडलं!!
@स्वाती,
हा हा, मी भयंकर खोड्या करायचे. त्यामुळे फक्त आठवणीच गोड आहेत!!
सई , मस्त गं . वळवाच्या
सई , मस्त गं . वळवाच्या पावसाचा वास शिरला नाकात. किती छान लिहीतेस तु,
मी नं तुझ्या लेखाची वाट बघत असते.
सई.. मस्तय..
सई.. मस्तय..
सई गतस्मृतीमग्न झालो
सई गतस्मृतीमग्न झालो पावसाच्या वासाच्या आठवणींनी.
नेहमीप्रमाणेच मस्त!!!!!
नेहमीप्रमाणेच मस्त!!!!!
मस्त लिहिलयं! वळवाच्या
मस्त लिहिलयं! वळवाच्या पावसाची आठवण तीव्र झाली!
वळवाच्या पावसाचा रंग काही न्याराच, धसमुसळा हा पाऊस येतो सुसाटत तसा जातोही!
मला मात्र त्याचा एकदा खुप राग आला होता, मी आणि आईने मेहनतीने दोन अडीच किलोच्या कुर्डया केलेल्या आणि हे साहेब आले की धडपडत गोंगाट करीत, जी काही त्रेधातिरपीट झाली म्हणतेस!त्या कुर्ड्याही ओल्या गच्च झाल्या होत्या!त्यावेळेला जर सापडला असता ना हातात(!) तर माझे जाम फटके खाल्ले असते त्याने!!वाचला बिचारा!
बाकी आठवणी खुपच आहेत,पण त्या छान आहेत!(केवढं लिहिलं ना मी?)
तु भाग पाडलसं!खूप छान!!
सई, तुझा उन्हाळ्याची सुट्टी
सई, तुझा उन्हाळ्याची सुट्टी वाचुन संपवला! मस्तच आहेत सगळे लेख! (तिकडे प्र्टिक्रिया कशी द्यायची?)
मला तुझा हा लेख प्रचंडच आवडतो
मला तुझा हा लेख प्रचंडच आवडतो !!!
मस्त.
मस्त.
@ वत्सला, तिथे कॉमेंट बॉक्स
@ वत्सला,
तिथे कॉमेंट बॉक्स आहे. पण तुझं गुगल किंवा वर्डप्रेस खातं असेल तर करता येईल.
धन्यवाद!!
<कधी दुपारचे पाहुणे आले की
<कधी दुपारचे पाहुणे आले की लिंबू सरबत असायचे. मग पाहुण्यांना देऊन आपल्यासाठी उरेल का, या विचाराने मी व स्नेहा मामी भोवती घुटमळायचो. >
अगदी, अगदी
सई मस्तच गं. खूप जवळचं वाटतं तुझं लिखाण !
सई, खूप मस्त लिहिता तुम्ही.
सई, खूप मस्त लिहिता तुम्ही. हे सगळे लेख एकत्र कुठे वाचायला मिळतील का?
धन्यवाद सई! गुगल्/व्र्ड प्रेस
धन्यवाद सई! गुगल्/व्र्ड प्रेस अकाऊंट उघडते!
मस्त गं सई
मस्त गं सई
सईबाई .........व्वा!
सईबाई .........व्वा! नेहेमीप्रमाणेच मस्त.
@
@ स्वप्ना,
http://unhalyachisutti.blogspot.com/
इथे वाचायला मिळतील.
मस्त
मस्त
मस्तच सई...
मस्तच सई...
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
खुप छान
खुप छान
खुप मस्त सई ! छान च लिहिलयं !
खुप मस्त सई ! छान च लिहिलयं !
मलाही हा लेख फार
मलाही हा लेख फार आवडतो..माझ्या बर्याचशा अगदी अशाच आठवणी आहेत वळवाच्या पावसाच्या..आजकाल वळवाचा पाऊस येतंच नाही की काय
Pages