अनुभूती रंगांची

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.

हे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.

आवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.

कोकणातुन येताना एका मित्राने माझ्यासाठी अननस आणला आणि योगायोगाने त्याच्या आसपासच वाचण्यात आले होते की अननसाचा शेंडा परत मातीत रोवला तर, छान फुटतो. अजुन एक योगायोग असा की, त्याच दिवशी मी घरी नसताना, घरात असलेल्या २ व्यक्तींपैकी एकाने माझा माठ फोडला.

तोडलेला अननसाचा देठ मी फुटलेल्या माठात कचरा + माती भरुन रोउन दिला. गोल माठात हिरवा देठ 'शो' साठी चांगला दिसेल, इतकीच अपेक्षा. पुढच्या प्रवासात मात्र रोजची सकाळ माझ्यासाठी एक सुंदर रंगीबेरंगी आश्चर्य घेउन येत होती. अत्यंत देखणी अशी ही प्रक्रिया शब्दात सांगणे खरच अवघड आहे.

[फोटो मी माझ्या सेल फोन कॅमेर्‍याने काढले आहेत, त्यामुळे जे दिसले, ते तसेच्या तसे तुमच्या पर्यंत पोहोचेलच असे नाही, पण एक प्रयत्न :)]

छोटासा शेंडा रुजला, आणि मोठ्या-मोठ्या नविन पानांनी छान बहरला.
1.JPG

पण तरीसुध्दा याला एखादे फळ / फुल येईल असे माझ्या ध्यानी-मनी पण आले नाही. अचानक एके दिवशी सकाळच्या टेहळणीच्या वेळी दिसले की एक लाल लुसलुशीत असे फुलासारखे काही झाडाच्या मध्यभागात दिसते आहे. अननसाला फुल येते ?, या आधी कधीच ऐकले नव्हते, अनेकांना विचारले, फळवाल्याला सुध्दा, पण कोणीच निट उत्तर देउ शकले नाही.
2.JPG

दोन दिवसांनी फुल थोडे वर सरकले, आणि खाली एक दांडा दिसु लागला.
3.JPG

फुल थोडसं मोठ झाल्यावर, पाकळ्या एकदम दाट आणि जाड झाल्या. तेंव्हा या फुलाचेच फळ होणार, म्हणजे हे फुल नसुन फळाची पहीली अवस्था आहे हे लक्षात आले.
4.JPG5.JPG

आठच दिवसात छान गोलाकार आला. आणि तो लालचुटुक गोळा अत्यंत देखणा दिसु लागला.
6.JPG

या लाल गोळ्या भोवतीची लांब-लांब पाने पण मस्त लालबुंद, आणि टोकाकडे हिरवी अशी होती.
7.JPG

अजुन ८ दिवसांनी, मधला भाग थोडा हिरवट दिसायला लागला. मधे हिरवा, त्या भोवती लाल, पुन्हा त्या भोवती हिरवा. इतके देखणे दिसत होते ते फुल / फळ.
8.JPG

आणि अचानक या रंगांमधे भर पडली अजुन एका रंगाची. जांभळ्या रंगाचा एक टिपका लाल पाकळ्यांमधे दिसायला लागला.
9.JPG

दुसर्‍या दिवशी अजुन काही टिपके दिसले.
10.JPG

आणि आदल्या दिवसाच्या टिपक्याचे आज फुल उमलले होते.
11.JPG12.JPG13.JPG14.JPG15.JPG

अननसाला जे खवले असतात, निट बघितले तर लक्षात येते की त्या खवल्यांना छोटेसे काटेरी टोक असते. ते टोक म्हणजेच हे जांभळे फुल. प्रत्येक खवल्यात असे एक जांभळे फुल येत होते.
16.JPG

जांभळी फुले सुकुन, खवले स्पष्ट दिसायला लागले.
17.JPG

आणि अननसाने आता मस्त आकार घेतला.
18.JPG

हळुहळु तो मोठा होऊ लागला.
19.JPG20.JPG21.JPG22.JPG

अननसा बरोबरच तुराही मोठा झाला, पण जुनी पाने आणि नविन तुरा, दोघांच्या रंगात खुपच फरक होता.
23.JPG

आणि हा मोठा झालेला अननस.
24.JPG

अनेकांनी म्हंटले आहे की एखादी वेल वाढताना बघणे हे आपल्या लहान मुलाला वाढताना बघण्याइतकेच आनंददायी असते. पण मी म्हणेन की असे एखाद्या अननसाला वाढताना बघणेही तसेच काहीसे मन भरुन आनंद देणारे असते.

विषय: 
प्रकार: 

<<<योगायोगाने त्याच्या आसपासच वाचण्यात आले होते की अननसाचा शेंडा परत मातीत रोवला तर, छान फुटतो<<< आरती, असं असत होय....! मी आताच अननसवाला शोधते आणि त्याच्याकडचे कापुन फेकलेले शेंडे आणते! माझ्याकडे खुप जागा आहे लावायला... Happy
बाकी बाळ अननसाचे लालचुट्टुक फोटु लय भारी!

अहा.......मस्तच !! स्टेप बाय स्टेप फोटो काढल्यामुळे काय काय बदल होत गेले ते इतकं छान दिसतंय ना.......!! ग्रेट यार !! पण आता तो अननस कापल्यावर मग झाडाचं काय होणार ?

खूपच मस्त...........................
आरती फारच सही वाटल फोटो बघून.
धन्स.

आरती, तूझ्या हाताला खरेच गुण आहे. सगळी झाडे तूझ्या हातून छान जगतात.
अननस सहसा नाही लागत घरात.
अननसाचे आणखी काही शोभेचे प्रकार गोव्यात मिळतात. (गोवा, बेळगाव भागात ते जास्त होतात)
आता तूझ्यासाठी खास बियाणे घेऊन यायला पाहिजे.

अफाट! आरती तुझ्या उत्साहाचं कौतूक. बाळ अननस गोजिरवाणं दिस्तंय. Happy यावेळी अननसाच्या झाडाला अननसच लागल्याबद्दल अभिनंदन :)! आता ह्याची टोपी पण रुजवणार का?

सहीच !!
आमच्या घरी सुमारे ८ वर्ष होतं अननसाचं झाड.. त्याला कधी फुल/फळ आलं नाही.. शेवटी वैतागून काढून टाकलं ते..

मी आताच अननसवाला शोधते आणि त्याच्याकडचे कापुन फेकलेले शेंडे आणते! >> मला असे वाटते, अननस गावराण असेल तरच रुजेल. जसे, फुलवाल्याकडुन आणलेल्या हारातला झेंडु रुजत नाही पण घरचे फुल नुसते टाकले तरी पुष्कळ रोपे उतरतात. तु प्रयोग करुन बघ आणि सांग. Happy

आता ह्याची टोपी पण रुजवणार का? >> माठ फुटला तर नक्की Happy

अननसाची चव घेउन बघितली की नाहि? >> नाही अजुन, आता त्याचा लाल रंग जाउन तो हिरवा गार झाला आहे. लवकर्च पिकेल, मग घेइन चव.

मंजूडी, वामा, आर्या, जयवी, उजु, नासा, स्वाती, दिनेश, मृण्मयी, पराग, केदार, सावली,
धन्यवाद Happy

मस्तच टीपलाय प्रवास. चीकाटीचं काम आहे खरं! Happy

शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना>> Lol

Pages