श्री. दत्ता हलसगीकर यांची एक कविता: ये पावसा!

Submitted by गणेश कुलकर्णी on 22 June, 2010 - 09:22

ये पावसा!

जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा
अश्रूंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबाथेंबातये पावसा!

धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतूनी
जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा!

सभोती पहा रूक्ष ओसाड राने, नदीपात्र झाले रिते-कोरडे
निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊन ये पावसा!

दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकूळ झाली गुरे-वासरे
त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा!

अता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके
घरा अंगणा जीवना शांतवाया तू देवतारूप ये पावसा!

तुला आण आहे तॄणांची,फुलांची,सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची
कवितेतूनी माझिया भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा!

कवि: श्री. दत्ता हलसगीकर (सोलापूर) यांच्या "चाहूल वसंताची" ह्या कविता संग्रहातून.

*******************************
पाऊस!किती आनंद देणारा. तसा पावसाळा सर्वांचा आवडता ॠतू. पावसाळ्यात नभातून पडण्यार्‍या जल धारातून निर्माण होतात ती...निर्सग निर्मित विलोभनीय द्रष्य. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ, वार्‍यात गारवा मिसळलेला. उन्हाळ्यात ऊन्हाने त्रस्त झालेल्या धरणीपासून ते प्राणीमात्रां पर्यंत सर्वानां हवाहवासा वाटणारा पाऊस!

बालपणात शाळेला सुट्टी मिळावी म्हणून पावसाला घातलेली भोलानाथाची साद, पाऊस अलगद झेलतो तेव्हा त्या लहानग्यांसाठी...पडणारा पाऊस!.

शेतकरी पेरणी करून, धरणीची ओटी बिजाने भरून घेतो तेव्हा बर्‍याच दिवसांसाठी वाट बघायला लावणारा तो पाऊस!. आणि कधी अचानक हवामान खात्याचे सगळेच अंदाज चुकवून शेतकर्‍यांच्या गाई-वासराच्यां "मेघमल्हाराला" ऐकून धावत येऊन जोरात पडणारा पाऊस! कित्येक वर्षापासून कोरड्या असणार्‍यां नद्यानां आपल्या खळखळत्या पाण्याने भिजवणारा पाऊस!

माणसां-माणसांनां नवी भरारी देणारा, माणसाच्यां हाताला काम देणारा, झाडा,पानां, फुलां आणि निर्सगासाठी येणारा पाऊस!. भूतकाळातल्या गमती-जमतींना उजाळा देणारा...रिमझिम बरसणारा हळवा पाऊस. काळ्या भेगा पडलेल्य धरणीसाठी धो-धो कोसळणारा प्रियस पाऊस. असा धो-धो कोसळणारा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सगळीकडे म्हणजेच अंगणापासून ते रस्त्यापर्यंत कितीही प्रयत्न केले तरी शेवटी चिखल करून फार थोड्या 'बड्या' माणसांनां त्रास देणारा उनाड, अवखळ पाऊस!
कित्येक आई-बहीणींचा पाण्यासाठीचा त्रास हलका, कमी करणारा सावळा दयाघन पाऊस!...किती किती रूपं आहेत ना ह्या पावसाची!!

पण जेव्हा हा असा सर्वाचां आवडता पाऊस दडीमारून बसतो तेव्हा पावशा,शेतकरी ते नोकरदारापर्यंत सर्वांच्या तोंडचे पाणी पळालेले असते. तेव्हा पावसाला प्रत्येकजण साद घालतात, कांहीजण तर अगदी देवाला नवस करतात आणि व्याकूळ होऊन जातात पावसाच्या दर्शनांसाठी!
अगदी भेगा पडलेल्या धरणीसारंखी अवस्था होते त्यांची व पावश्याची. तेव्हा त्या रूसलेल्या पावसाचा रुसवा, राग घालण्यासाठी व्याकूळ पावशागत, तानसेन सारखी साद घालताना कवि. दत्ता हलसगीकर आपल्या "ये पावसा!' ह्या कवितेच्या मेघमल्हारातून शब्दांच्यां साथीने पावसाला आळवतात व साद घालून म्हणतात, "जसा मी माझ्या उरातून भरून येतो ना तसाच तू या पांढर्‍या शुभ्र ढगातून भरुन ये, माझ्या डोळ्यातंल्या दुसर्‍यांसाठी टिपटिपणार्‍या, ओघळणार्‍या अश्रूंमधून जसा अर्थ भरून येतो ना तसा तू ढगाच्या, आभाळाच्या डोळयांतून सर्वांसाठी पडणार्‍या थेंबाथेंबातून तू ये पावसा! अशी आर्त साद घालत ते म्हणतात,"अरे धरणीचे ओठ प्रखर उन्हामुळे भेगा पडून वाळून गेले आहेत आणि जसा प्रेम वेड्या राधासाठी, गोपीकांसाठी सावळा आला तसा तू वंसुधरेला भेटायला ये."
त्यातच कवी पावसाला त्याच्या दडी मारण्याच्या प्रकारामुळे ओसाड पडत चाललेल्या निसर्गाकडे लक्ष वेधून खंत व्यक्त करत पावसाला समजावतो...सगळीकडे एकदा तू बंद करून मिटून घेतलेल्या हजारों, लाखों डोळ्यांनी पहा तेव्हा तुला दिसेल, सगळी कडे रूक्ष ओसाड पडलेली राने, कोरड्या पडलेल्या नद्या, तळे पहा आणि तू जेव्हा ह्याच रानांवनात रिमझिम- रिमझिम बरसायसाच त्यावेळेसचा तो पिसारा फुलवून आंनदावे नाचणारा मोर आता तू नाहीस म्हणून पिसारा मिटवून उदासपणे फिरत आहे तेव्हा सर्वांवर दया करणार्‍या, सर्वांना आनंद वाटणार्‍या दयावंता सारखा तू ये पावसा!. तुझी फार उणीव भासते आहे. तू यायला हवचं त्या मोरांसाठी आणि इथल्या धरणीच्या पोरासाठी सुद्धा! अरे जशा दिशा व्याकुळ झालेल्या आहेत तसेच इथली माणसेपण. इथली गुरे-वासरे. तू जसा सगळ्यांसाठी अन्नाचा घास बनून येतोस ना अगदी तसा तू "घास" बनून तू अन्नपुर्णा आपल्या थेंबाथेंबातून घेऊन ये पावसा! आणि त्या सोबतच आता असला कडक उन्हाळा सोसत नाही. तुझ्या न येण्याने इथं काम करून पोटं भरणार्‍यांची पंचाईत झाली आहे त्याचें संसार विस्कटत आहेत, तेव्हा त्याच्यां घराच्या अंगणाला त्यानां शांत करण्यासाठी शितल छाया देण्यासाठी त्या देवतारूपी तू ये पावसा!

शेवटी कवी. दत्ताजी त्या पावसाला व्याकुळ व भावूक होऊन साद घालतात, सभोवतालची परिस्थिती पाहून म्हणतात," पावसा तुला शपथ आहे इथल्या गवताच्या वाळलेल्या काड्यांची, सुकत चाललेल्या फुलांची आणि तू यायचास तेव्हा झोपडीतंल तिखट-मिठ एक व्हायचे त्यांची आणि झोपडीतल्या रित्या वाडग्यांची! आणि तुला मी जसा शब्दांतून भावूक होऊन, शब्दांचा 'मेघमल्हार' कवितेतून तुझ्यासाठी आळवतोय तसा तू प्राण होऊन इथल्या सगळ्यानां जीवन देण्यासाठी तू ये पावसा! तू ये पावसा!!

एकूणच "ये पावसा!"ह्या कवितेतून कवी. दत्ताजी हलसगीकर यांनी व्याकुळ होऊन पावसाला शब्दांतून मेघमल्हारच आळविला आहे आणि सर्वांसाठी पावसाचे "पसायदानच" मागितले आहे नाही का?

*********************
गणेश कुलकर्णी(समीप)
*********************

गुलमोहर: 

ओहो गणेशा खुप खुप आभार रे.., किती दिवसांनी सरांची कविता वाचायला मिळाली. मला वाटते १९९१ साली सरांच्या घरीच त्यांच्या कविता ऐकण्याचा योग आला होता. आमच्याबरोबर त्यावेळी बहुदा डॉ. यु. म. पठाण आणि डॉ. निर्मलकुमार फडकुलेसारखी मोठी माणसं देखील होती. सरांच्या कविता हा नेहमीच एक बेहोष करणारा अनुभव असतो. धन्स पुन्हा एकदा Happy

धन्यवाद दक्षिणा, सुर्यकिरण, विशालदा.
विशालदा....
हे लेखन मी २००४ साली केलं आहे.
सरांकडून कवितेसाठी मार्गदर्शन घेतलं आहे. खूप छान स्वभाव आहे सरांचा. ते माझे आर्दश आहेत.

धन्यवाद गणेश ,
मी दत्ता हलगीकरांविषयी ऐकुन होतो, पण दुर्दैवाने त्यांच्या कविता वाचण्याचा कधी योग आला नव्हता, तुझ्यामुळे ते पण आज साध्य झालं.आणि तुझं रसग्रहण पण खुप छान झालयं.

धन्यवाद छाया, श्री आणि सांजसंध्या!
दर महिन्याला एक कविता ह्या प्रमाणे मी दत्ता सरांच्या कवितेचे रसग्रहण मायबोलीवर लिहीणार आहे.
आपल्या सुचना जरूर कळवा.

कविता अन रसग्रहण छान ... मी श्री हलसगीकरांच यापुर्वी काहीही वाचलेल नव्हतं त्यामुळे माझ्यासाठी काही अ‍ॅडीशन झाल तिजोरीत Happy . धन्यवाद !!!

https://youtu.be/bxur_fIrsGk

दत्ता हलसगीकरांच्या आकाशवाणीवरच्या वरील मुलाखत ऐकून पावसा ही कविता शोधू गेलो आणि हा अप्रतिम धागा सापडला.