सुज्ञांच्या शोधात......!

Submitted by Sanjay_Pune on 16 June, 2010 - 10:09

आम्हाला लहानपणापासुन वाचनाची भयंकर आवड. ( आणि लेखनाची खाज ). त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही विविध विषयावरिल (शब्दशः) जड जड पुस्तके आणतो आणि वेळ मिळेल तसे ते (शब्दश:) पाहतो. मग कंटाळा आला कि विरंगुळा म्हणुन आम्ही साप्ताहिके आणि व्रुत्तपत्रीय लिखाण चघळत बसतो. हे करत असताना काहि ठिकाणी आम्हास निम्नलिखित वाक्ये प्रचंड प्रमाणात आणि नेमके कंसात आढळून आली.
उदाहरणार्थ : १. सुज्ञांनी हे ध्यानी घ्यावे
२. सुज्ञांच्या हे लक्षात आले असेलचं.
३. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे.
४. सुज्ञ याकडे लक्ष देतिल का?
इत्यादि इत्यादि....!
हे वाचून वाचून आम्हाला देखिल सुज्ञ या जमातीविषयी प्रचंड उत्सुकता वाटु लागली, कुतुहल वाटु लागले.
आम्ही आमच्या कल्पनेतच सुज्ञ कसे दिसत असतील ?, काय खात पित असतील असे कल्पनाचित्र तयार करु लागलो.
पण खरा सुज्ञ काहि केल्या डोळ्यासमोर उभा करता येईना!
मागे आम्ही अतिरिक्त मद्यप्राशन करत होतो, त्या समयी आम्हास अनेकानी "सुज्ञा" सारखा वागत जा असा सल्ला दिला होता. म्हणजे नक्की काय करायचे असे विचारल्यावर एका समुपदेशकाने सांगीतले कि "कुठे थांबायचे हे सुज्ञांना कळते". बहुदा त्यांचा रोख आमच्या मद्यप्राशनाकडेच होता. त्यावर आम्ही सेल्फ अ‍ॅनॅलिसिस करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या लक्षात आले कि आमच्या शरीरातील मद्यार्काची पातळी कमी व्हावयास लागली कि नजरेच्या टप्प्यात येणार्‍या दारुच्या पहिल्या अड्डयावर थांबत असु. अधेमधे कितीहि चांगली चहाची होटेल्स अथवा अमॄततुल्य लागली तरी थांबत नसु. आता सुज्ञांनीच सांगावे की कुठे थांबायचे हे आम्हाला बरोब्बर कळत होते की नाही. पण त्या सुज्ञ समुपदेशकांना हे पटेना व त्यांचे सल्ले देखिल थांबेनात. (पण आमच्या मद्यप्राशनाच्या संदर्भातिल एक गंभीर कविता आम्ही कविता विभागात बा कृष्णा.. या शीर्षकाखाली टाकत आहोत. वाचकांनी ती वाचावी अशी विनंती)
रोजरोज असे सल्ले ऐकून आम्ही पुरते वैतागलो होतो. म्हणून या सततच्या कटकटीवर उपाय म्हणून आम्ही असा सल्ला देणार्‍या एका महाभागास विनवले कि सुज्ञासारखे म्हणजे कुणासारखे वागायचे? यावर त्या महाभागांनी आम्हाला आमच्याच आळीतील एक नरोत्तमासारखे वागून पहा असा आदेशवजा सल्ला दिला. आम्ही तंतोतंत त्यासारखे वागण्याचा किंवा वर्तन ( हो, हो, अल्बर्ट एलीसच्या विचार, भावना, वर्तन सिक्वेन्स मधलेच ते फेमस वर्तन) करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण पहील्याच दिवशी आम्हाला माणसातून उठावे लागले.
झाले असे कि
१.आम्ही त्या दिवशी मदिरेबरोबर विनामुल्य मिळणारा चकणा नामक अल्पोपहार पैसे देउन घेतला.
२. मदिरेचे पाण्याशी प्रमाण व्यस्त ठेवले
३. हद्द म्हणजे वेटरला टीप देखिल दिली.
( हे बघुन निदान त्या दिवशी तरी आमच्या पितरांना शांती नक्की मिळाली असेल)
पण मितपानाने आमची मनःशांतीच नाहीशी झाली. म्हणुन मग आम्ही तो नाद सोडला.
पण परत एकदा उत्सुकता आणि कुतुहल एकदमच जागृत झाल्यामुळे आम्ही परत खर्‍याखुर्‍या सुज्ञाचा आणि त्यांच्या जमातीचा पाठपुरावा करायचे ठरवले.
त्यासाठी आम्ही पाश्चिमात्य विचारवंत सॉक्रेटिस पासुन गटे च्या सुज्ञांच्या व्याख्येचा, परिभाषेचा अभ्यास केला. सोबत भारतीय परंपरेतील अगदी तामिळ तिरुवल्लीवर पासुन शोभा डे पर्यंत मुलुखगिरी केली. पण यातुन एकच निष्कर्ष निघाला की सुज्ञ ही जमात आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
नामशेष होणार्‍या वन्य जमातींना किंवा जीवांना सरकार अभय देते तसे सुज्ञांना द्यावे ही विनंती आम्ही सरकार दरबारी केली होती पण सरकार्ने त्यांचा व जनतेचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट करुन हातच झटकले.
मग तो नाद सोडुन आम्ही आपल्या भागात सुज्ञ कोठुन आले असावेत यासाठी कागदपत्रे, बखरी चाळल्या. ( संदर्भ : भांडारकर इंस्टीट्युट ). अनेक विचारवंत आणि स्वयंघोषित विद्वानांच्या मुलाखती घेतल्या. त्यातुन एकच निष्कर्ष निघाला की ......." भारतवर्षात आर्य जसे खैबरखिंडितुन आले, तसे महाराष्ट्रात सुज्ञ हे सदाशिव पेठेतुन आले असावेत.
इथुन पुढे आमचे कुतुहल एकाच बाबतीत वाढले ते अशाकरता की, हे सुज्ञ शाब्दिक हिंसादेखिल करत नाहीत इतके अहिंसक असतात अशी मौल्यवान माहीती एका गोपनीय दस्तऐवजात मिळाली. मग त्यानुसार आम्हास प्रश्न पडला की मग हे सुज्ञ लोक दैनंदिन व्यवहार कसे पार पाडत असतील?
तर त्यावर देखिल अकस्मातपणे उत्तर मिळाले ते असे की बर्‍याच लिखाणात फुल्या फुल्या आढळतात. उदा. "मग मी त्या XXXX ला असा झाडला...." वगैरे.
अशा दोन / तीन / चार ( क्वचित जास्तदेखिल) ते नित्या शोधत असतात आणि प्रकट किंवा उघड बोलायचे नसल्याने ( कारण ते सुज्ञ आहेत ना ) ते मनातल्या मनात त्या फुल्यांचा अन्वयार्थ लावत असतात. त्यातुन ते स्वतःचे मनोरंजन करतातच पण मराठी साहित्यात ( मनातल्या मनात) मोलची भर घालतात.
हाच संदर्भ घेउन कुणी आम्हास भेटायला आले व आमचा निरोप घेउन गेले. नंतर कळले की ते एका वृत्तपत्राचे मानद संपादक होते. त्यांच्या वहित त्यानंतर एकदा आमच्या व त्यांच्या भेटीचा संदर्भ पहाण्याचा योग आला. नीट निरखुन पाहिले तर एखादाच शब्द आणि बाकि सगळ्या फुल्याच फुल्या आढ्ळल्या.
तेव्हा सुज्ञ या जमाती विषयी आणखी बरीच माहीती मिळवायची आहे.
साहजिकच आपण या संदर्भात मदत कराल हि खात्री आहे.
(सुज्ञास सांगणे न लगे)
आपला ज्ञानाभिलाषी.......(!)

गुलमोहर: 

सुज्ञ ही जमात आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे>>>>> तो पुण्याला आला नव्हता म्हणुन असेल म्हणाला असेल Happy

Happy