पूर्वनियोजीत...

Submitted by विशाल कुलकर्णी on 14 June, 2010 - 03:10

स्थळ : कुंतलानगरी

काळ : अज्ञात... कदाचित काही हजार वर्षांपुर्वी....

"महावीर, महाज्ञानी, महादानी, अतुल पराक्रमी, क्षत्रीय शिरोमणी, राजराजेश्वर कुंतलाधिपती श्री श्री श्री मुकुलसेन महाराजांचा विजय असो"

भालदार - चोपदारांनी भुदेवांच्या आगमनाची वार्ता दिली तसे सगळा दरबार स्तब्ध होवून उभा राहता झाला. आपल्या लाडक्या महाराजांचे अभिवादन करण्यासाठी दरबारात उपस्थित असलेले सर्व प्रजाजनही आदराने उभे राहून मुख्यद्वाराकडे उत्सुकतेने पाहू लागले. साधारण एक मासापुर्वी मृगयेला म्हणून कंधारकाननी गेलेले मुकुलसेन महाराज आज पुन्हा दरबारात परतत होते. आपल्या राजाचे स्वागत करायला सारी जनता उत्सुक होती.

कुंतलानगरी तशी अतिशय शांत आणि समृद्ध आणि कृषीप्रधान नगरी. कुंतलानगरीचे नागरिकही सज्जन, शांत मेहनत करुन जगणारे. कधीही कुणाच्या अध्यातमध्यात नसणारे. आसपासच्या राज्यात देखील कुंतलानगरी ही सज्जनांची, म्हणुन अलिप्त नगरी म्हणून ओळखली जात असे. त्यामुळे कुठल्याही राज्यांमध्ये काही छोटे मोठे वाद उदभवले की त्या राज्यांचे कारभारी महाराज मुकुलसेनांना साकडे घालीत. महाराजही आपल्या चांगुलपणाच्या, बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांच्यातील वाद सोडवून पुन्हा सलोखा निर्माण करत. त्यामुळे एकंदरीत कुंतलानगरीचे प्रजाजन सुखा समाधानात नांदत होते. चोर, गुन्हेगार, अपराधी यांची कुंतलानगरीत वानवाच होती म्हणा ना. पण असे असले तरी कुंतलानगरी दुर्बळ मुळीच नव्हती. कृषीप्रधान राज्य असले तरी महाराज मुकुलसेनांची सेनाही तेवढीच सामर्थ्यशाली होती. आपल्या नगरीचे रक्षण करण्यास समर्थ होती. स्वतः महाराज मुकुलसेन अतिशय प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. आपल्या प्रजेवर पोटच्या अपत्यासारखे प्रेम करणार्‍या मुकुलसेन महाराजांचे दरवाजे आपल्या राज्यातील सामान्याहून सामान्य व्यक्तीसाठी देखील सदैव उघडे असत. त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेला कुठलाही व्यक्ती रिक्त हस्ताने परत जात नसे. आणि असा हा न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष राजा विश्रांतीसाठी म्हणुन कंधारकाननी मृगया करुन एक मासानंतर आपल्या राज्यात परत आला होता. महाराणी सौदामिनी आणि राजकुमार सुर्यसेनही त्यांच्या स्वागतासाठी दरबारात हजर होते. महाराजांनी आपल्या कुटूंबासह दरबारात प्रवेश करताच प्रजेने पुन्हा एकदा आपल्या राजाचा आनंदाने जयजयकार केला. महाराजांनी प्रसन्नपणे आपले दोन्ही हात वर करून प्रजेचे अभिवादन स्विकारले आणि ते स्वतः पुढे होवून राजगुरू कपिलानंदांसमोर नतमस्तक झाले. राजगुरुंनी मोठ्या आनंदाने राजाला उचलून छातीशी धरले....

"महाराज, आपण कुंतलाधीपती आहात, भुदेव आहात. आपण असे दुसर्‍यापुढे मान वाकवू नये. ते आपल्या पदाला शोभा देत नाही."

"आचार्य, सदगुरुंचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही उच्च असते. त्यात आपण आमच्या तातांपासुन राज्याचे हितचिंतक आहात. आपण आहात म्हणून आम्ही आहोत, आपल्या आशीर्वादानेच तर हे राज्य सुखी समाधानी आहे."

तसे राजगुरु प्रसन्नपणे हंसले , आशीर्वादाच्या मुद्रेत आपले दोन्ही हात वर करुन कृतार्थ मुद्रेने राजाला आणि प्रजाजनांना उद्देशुन म्हणाले...

"राजा तु जेवढा महाज्ञानी, महावीर आहेस तेवढाच विनम्रदेखील आहेस. तुझ्या विनयाने तुझ्या पराक्रमाला, तुझ्या बुद्धीमत्तेला एक वेगळेच तेज प्राप्त झालेले आहे. तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे सदैव कल्याण असो. तुझ्या राज्यातील प्रजानन सदैव सुखी, समाधानी आणि आरोग्यवान असोत. माझा तुला पुर्ण आशीर्वाद आहे."

महाराज मुकुलसेन त्यांचे आशिर्वाद घेवून उठून उभे राहीले आणि सिंहासनाकडे वळले तेवढ्यात...

महाराजांच्या पाठीमागेच असलेल्या युवराज सुर्यसेनांनी आपल्या कमरेचे खड्ग उपसले आणि कुणालाही कळायच्या आत पुर्ण ताकदीने राजगुरु कपिलानंदाच्या शरीरावर वार केला. रक्ताच्या धारा महाराज मुकुलसेनांच्या पाठमोर्‍या अंगावर उडाल्या. रक्ताचा तो उष्ण स्पर्ष मानेला होताच दचकुन महाराज तसेच विद्युतगतीने मागे वळले आणि युवराजांनी राजगुरुंवर दुसरा वार करायच्या आतच त्यांनी युवराज सुर्यसेनावर ताबा मिळवला. या सर्व घटना इतक्या लवकर घडल्या की दरबारीजनांना सावरायला देखील वेळ मिळाला नाही.

"सेनापती, युवराजांना कैद करा, त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाईल. त्यांनी असे का केले याचा पुर्ण न्यायनिवाडा केला जाईल. युवराज म्हणुन त्यांना कसलीही सवलत मिळता कामा नये. परंतु सर्वात आधी राजवैद्यांना पाचारण करण्यात यावे. आचार्यांचे आयुष्य कुंतलानगरीसाठी खुप अनमोल आहे."

युवराजांच्या वाराने जखमी झालेले राजगुरु आपल्या आसनावर कोसळले होते. महाराजांनी साश्रु नयनांनी त्यांचे पाय धरले.

"क्षमस्व आचार्य, युवराज असे का वागले देवच जाणे. पण त्यांच्या कृत्याची त्यांना पुरेपूर शिक्षा मिळेल."

"राजन, वेडेपणा करु नका. युवराजांना आपण सगळेच व्यवस्थित ओळखतो. अतिशय शांत आणि सालस म्हणुन लोकप्रिय आहेत युवराज. ते असा आततायीपणा अकारण करणार नाहीत. पुर्ण गोष्टीचा व्यवस्थित शोध घेतल्याशिवाय निर्णयाप्रत येवु नका. आम्ही ठिक आहोत. थोडीशी जखम आहे, येइल भरुन. सद्ध्या युवराजांना तुमची जास्त गरज आहे. त्यांच्याकडे लक्ष द्या आधी. एकच सांगतो राजन, काहीतरी अकल्पित, विचित्र असं घडतं आहे खरं. कदाचित........."

राजगुरुंनी आपले वाक्य अर्धवटच सोडले. राजगुरुंची आज्ञा प्रमाण मानुन महाराज मुकुलसेन आपल्या पुत्राकडे पोहोचले, इथे एक वेगळाच प्रसंग त्यांची वाट पाहात होता. त्यांना प्रचंड धक्का बसला होता. कारण युवराजांचे आपल्या मातापित्यापेक्षाही आचार्यांशी जास्त सख्य होते. खरेतर आचार्यांच्याच सहवासात युवराज लहानाचे मोठे झाले होते. माता-पित्यापेक्षाही जास्त आदर युवराजांच्या मनात आचार्यांबद्दल होता. असे असताना त्यांनी आचार्यांवर असा प्राणघातक हल्ला करावा? महाराजांची बुद्धी काम देइनाशी झाली होती. त्या संभ्रमावस्थेतच महाराज मुकुलसेन युवराजांपाशी पोहोचले...

त्यांना पाहताच युवराजांनी पुढे येवुन त्यांचे चरण स्पर्श केले.

"आपण मृगयेवरुन कधी परत आलात तात आणि अशा या आनंदाच्या समयी हे रक्षक असे काय वागत आहेत? रक्षकांनी आम्हास का धरुन ठेवले आहे? ते म्हणताहेत की आम्ही आचार्यांवर घातक हल्ला केला....आचार्यांवर? हे कसे शक्य आहे हे तात? आपणास तर विदीतच आहे की आपण आणि माताश्री यांच्यापेक्षाही आचार्यांशी आमची जास्त जवळीक आहे. आम्ही त्यांच्यावर हल्ला कसा काय करु शकु? काहीतरी गल्लत होतेय या रक्षकांची? तुम्ही सांगा ना त्यांना समजावून. की तुम्हालाही तसेच वाटतेय?"

युवराज सुर्यसेनांचे नेत्र अश्रुंनी भरुन वाहत होते. महाराज मुकुलसेन आश्चर्यचकीत होत्साते आपल्या एकुलत्या एक पुत्राकडे पाहातच राहीले.

तेवढ्यात मागुन कुणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, महाराजांनी चमकुन मागे पाहीले, तर सेवकांच्या आधाराने उभे असलेले आचार्य कपिलानंद त्यांस दिसले.

"आचार्य, आपण इथे? आपणास विश्राम करण्याची आवश्यकता आहे."

"मी ठिक आहे राजन, युवराज कसे आहेत?"

"तेच तर गुढ उकलण्याचा प्रयत्न करतोय आचार्य. युवराजांना त्यांनी तुमच्यावर हल्ला केलाय हेच आठवत नाहीये. किंवा कदाचित ते शिक्षेपासुन वाचण्यासाठी खोटी बतावणी करताहेत."

"नाही आचार्य, आम्ही सत्य बोलतो आहोत. आपल्यावर शस्त्र उचलण्याचे साहस कसे करु आम्ही? पण जर तातही तसेच म्हणताहेत म्हणजे आम्ही खरोखरच तर......., हे कसे शक्य आहे आचार्य? आमच्या तर काहीच लक्षात येत नाही."

युवराज विलक्षण गोंधळून गेले होते.

"काहीतरी विलक्षण घडतय नक्कीच. राजन, गेल्या मासातली ही तिसरी घटना आहे. या आधी याच मासात आपल्या प्रजाजनांमध्ये पुत्राने साक्षात जन्मदात्या माता-पित्यावर, तर पतिव्रता म्हणुन प्रसिद्ध असलेल्या स्त्रीने आपल्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नंतर त्या दोघांनाही हे आठवत नाहीये. काळजी करु नका राजन. मी काही दिवसांपुर्वीच कनकश्रुंगीचे आचार्य चैतन्यानंदांना निरोप पाठविला आहे. ते एक दोन दिवसात येतीलच. ते या संकटातून आपली निश्चितपणे सुटका करतील राजन." आचार्य मंदस्मित करत शांतपणे उद्गारले.

"पण आचार्य, हे नक्की कशामुळे होतय? काय आहे हे? कोण उठलय माझ्या प्रजेच्या हितावर?" महाराज चिंतीत झाले.

"थोडा धीर धरा राजन, आचार्य चैतन्यानंद आले की सगळा उलगडा होइलच. मी देखील आपल्याइतकाच अंधारात आहे."

महाराज मुकुलसेन चिंतीत मुद्रेने आपल्या शयनगृहाकडे निघाले. आचार्य चैतन्यानंद येइपर्यंत काहीच कळणार नव्हते, काही करता येण्यासारखेही नव्हते.....

**********************************************************************************************************

"हर हर महादेव.... यळकोट यळकोट जय मल्हार......

बोला सुभेदार सुभानरावराजे जाधवांचा विजय असो................"

सुभेदार सुभानराव राजे जाधवांनी सदरेवर प्रवेश केला आणि हुजर्‍यानं सवयीनं ललकारी दिली, पण त्यानं सुखावून जायच्या ऐवजी सुभानराव त्याच्यावरच भडकले..

"ए फोकलीच्या..., लाज न्हाय वाटत, थोरल्या म्हाराजास्नी इसरलासा जनु. आदी नाव थोरल्या म्हाराजांचं.... बोला छत्रपती शिवाजी म्हाराज की जय..., आईसायेब जिजाऊबाईसाहेबांचा जैजैकार असो, महाराणी ताराऊसाहेबांचा जैजैकार असो.....

आदी ही देवाची नावं घ्याची, आन मग राहीलं ध्येनात तर या चाकराचं नाव, तसंबी त्ये न्हायी घेटलं तरी चालतया. म्हाराजाच्या जयजयकारातच चाकराचाबी मान हाय की लेका."

तसं कारभारी आनंदराव कौतुकाने म्हणाले.

"अगदी खरं बोललात सुभेदार ! तुमच्यासारखी इमानी माणसं आहेत म्हणून थोरल्या महाराजांनी उभं केलेलं हे राज्य टिकून आहे अजुन. नाहीतर या अशा वाईट दिवसात जवा धाकल्या राजांना औरंगजेबानं कपटानं मारल्यालं..., राजारामराजे आजारपणामुळे अकाली देवाकडे गेलेले, मराठी सरदार आपापल्या वतनापुरतं बघताहेत. अशा संकट काळी तुमच्यासारखी इमानी माणसं ताराराणीसाहेबांच्या पाठीशी आपलं इमान, आपली ताकद घिवुन उभी आहेत म्हणुन हे हिंदवी स्वराज्य टिकून आहे. नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक?"

बोलता बोलता आनंदरावांनी डोळे पुसले.

"पंत, आवो आमी थोरल्या म्हाराजांचं चाकर ! म्हाराजांनी हुकुम कराचा आन आमी घोडा गनिमाच्या तंबूत घुसवाचा. बाकी इच्च्यारच कंदी केला नाय. लै पुण्याई होती थोरल्या म्हाराजांची म्हुन न्हेमी हाताला यशच आलं, अपयश कंदी फायलं न्हाय या डोळ्यांनी. पन म्हाराज देवाघरी ग्येलं आन परवडीला सुरवात झाली. आमी तर धीरच सोडला व्हता, म्हनलं संपलं आता सौराज्य ! पर न्हाय, धाकल्या पातीनं जोर लावला. ताराऊराणी, जनु दुर्गामाईच. तुमास्नी म्हायीत नाय पंत पर धाकली रानी जवा दोन हातात दोन तरवारी घिवुन गनिमावर तुटून पडती ना तवा येकदम थोरल्या म्हाराजांचीच याद येती बगा. आक्षी कालिमाताच हाय जनु! आमचं काय? आमचं इमान म्हाराजांच्या वहाणांशी, जो कुणी त्या वाहील त्यों आमचा धनी. जावु द्या, जरा आत जावुन येतो. वैनीसायेब वाट बघत असतील तुमच्या. आन माणिकरावबी वाट बगत असत्याल आमची. जातानाच बोललं हुतं...'आज्या, येताना दोन तीन दुस्मान पकडुन आन आमाला खेळायला म्हुन. "

"खरे आहे सुभेदार, जनकोजीराजे मागल्या लढाईत देवास पावले,सुनबाई सती गेल्या. तेव्हापासनं माणिकरावांना तुमचा खुपच ध्यास असतो. आई-बापा विना वाढतोय जिव. त्यांच्याकडे तुम्हालाच लक्ष द्यायला हवें."

सुभेदार सदरेवरनं उठले आणि माजघराकडे जायला निघाले... तशी आतुन एक कुणबीण धावत आली. प्रचंड भेदरलेली होती. मैलभर पळुन आल्यासारखी तिला धाप लागली होती.

"सुभेदार्..सुभेदार..., धाकलं राजं... धाकलं राजं बिथरल्याती.....

"ए गंगे कायबी बोलु नको. गर्दन उडविन न्हाय तर." सुभानराव भडकले...

"गर्दनच उडवलीया धाकल्या राजांनी ... वैनीसायबांची.....! त्येंच्यासाठी खायाला खिर करत व्हत्या वैनीसायेब, अचानक माणिकरावराजांनी कोपर्‍यातली इळी उचलली आन वैनीसायबांच्या मानंवरच घाव घातला की..........! वैनीसायेब जागच्या जागेवर ..............!"

सुभेदार वेगाने आतल्या खोलीत धावले.

त्यांच्या पत्नी, वाड्याच्या वैनीसाहेब रक्तबंबाळ अवस्थेत स्वयंपाकघरात पडल्या होत्या, त्यांची अर्धवट तुटलेली मान एका बाजुला लोंबत होती. आणि अकरा-बारा वर्षाचे माणिकराव त्यांच्या मृत कलेवराला मिठी मारुन टाहो फोडीत होते................

.......................

..................................

औरंगजेबानं सुद्धा ज्याच्यासमोर हात टेकले तो महापराक्रमी योद्धा, शिवप्रभुंचा निष्ठावंत पाईक, आपल्यासमोर नशिबाने वाढून ठेवलेला प्रसंग पाहून हतप्रभ झाला होता. सुभेदार सुन्न होवून आपल्या पत्नीकडे आणि नातवाकडे पाहात राहीले. माणिकरावांनी असं काही केलं असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

***********************************************************************************************************

"वार्ता ऑनलाईन वृत्त: मुंबई....

दोन जिवलग मित्रांची अनोखी कहाणी. एकाने दुसर्‍यावर खंजीर चालवला....!

दैनिक वार्ताच्या पहिल्या पानावरची ती ठळक अक्षरातली बातमी निश्चितपणे संबंधिताच्या काळजाचा ठोका चुकवणारीच होती.

नवी मुंबई स्थित विशाल कुळकर्णी आणि विरार येथील कौतुक शिरोडकर गेली दोन वर्षे एकमेकांना ओळखणारे हे दोन जिवलग मित्र. पण काल अचानक विशालने कौतुक यांना फोन करुन काही फार महत्त्वाचे काम आहे असे सांगुन त्वरीत अंधेरी स्टेशनवर भेटण्यास बोलावले. जेव्हा कौतुक शिरोडकर तिथे पोहोचले तेव्हा विशाल कुळकर्णी त्यांची वाटच पाहात होता. कौतुकला पाहताच भर स्टेशनवरच मागचा पुढचा कसलाही विचार न करता विशाल कुळकर्णी याने आपल्या बॅगेतुन एक दुधारी खंजीर बाहेर काढला आणि कौतुक शिरोडकरांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने कौतुक शिरोडकर अतिशय घाबरुन गेले. आजुबाजुला असलेल्या लोकांनी कसेबसे अनावर झालेल्या विशाल कुळकर्णीला पकडुन रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिले. तरीही कौतुक शिरोडकरांच्या खांद्यावर निसटती जखम झालीच. विशेष म्हणजे थोड्याच वेळानंतर आटोक्यात की शुद्धीवर आलेला विशाल कुळकर्णी कौतुक शिरोडकरांना तिथे पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्याने कौतुकला विचारले...

"कौत्या, तु इथे काय करतो बे? आणि खांद्यावर ही जखम कसली झालेय?"

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपणच कौतुकला इथे बोलवून, त्याच्यावर हल्ला केलाय ही गोष्ट त्याला अजिबात आठवत नाहीये. पोलीस सतत त्याला प्रश्न विचारताहेत पण त्याचे एकच उत्तर आहे...

"कौतुक माझा जिवलग मित्र आहे. मी त्याच्यावर हल्ला करीनच कसा?"

या विचीत्र घटनेने भयभीत झालेले कौतुक शिरोडकर तरीही आपल्या मित्राला पोलीसांच्या तावडीतुन सोडवण्याचा प्रयत्न करताहेत. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले की यामागील कारण त्यांनाही माहीत नाही. पण विशाल कुठल्यातरी संकटात अडकला आहे हे निश्चित! कारण विशाल अशाप्रकारे त्यांच्यावर विनाकारण हल्ला करणार नाही याची त्यांना खात्री आहे. श्री. कौतुक शिरोडकर यांनी विशाल कुळकर्णी हा कसल्यातरी अनामिक संमोहनाखाली असण्याची शक्यता वर्तवत त्याच्या सुटकेचे प्रयत्न चालु ठेवले आहेत.

हा काही काळ्या जादुचा तर प्रकार नाही ना?

आमच्या प्रतिनिधीकडून .

*********************************************************************************************************

चाफ्याने संगणकावरील वार्ताची ई-आवृत्ती बंद केली आणि क्षणभर सुन्नपणे समोरच बघत राहीला....

"साहेब, आजची डाक !" चपराशाने हातातली पत्रे त्याच्या टेबलावर टाकली आणि पुढे निघाला तरी चाफ्याची नजर तशीच कुठेतरी शुन्यात रोखलेली होती.

"साहेब, काय झालं? आवो, तुमची पत्रं टाकलीत न्हवं का तुमच्या टेबलावर!" चपराशाने चाफ्याला जागे करण्याचा प्रयत्न केला तसा चाफा भानावर आला.

"खुप मोठी चुक झालीय? काहीतरी विपरीत घडणार आहे? विशल्या असे काही कसे काय करेल? काही तरी लोचा आहे....!" चाफा स्वतःशीच बडबडत होता.

"ओ सायेब, भानावर या जरा. बरं न्हायी का तुमास्नी. कायतरी चा-पानी दिवु का आनुन." चपराशाने विचारले तसे चाफा पुर्णपणे शुद्धीवर आला.

"नाही तु जा. मी काहीतरी विचार करत होतो. तु जा... मी.... ठिक आहे. थँक्स!.....

"आणि हे बघ, मोठे साहेब आलेत का? असतील तर जरा त्यांचा मुड कसा आहे ते बघून सांग. मला रजेचा अर्ज टाकायचा आहे."

अतिशय व्यग्र मुद्रेने चाफा उठला आणि कँटीनकडे जायला निघाला. नक्की काय झालय ते कौतुकच सांगु शकणार होता. आणि या विषयावर बोलण्यासाठी एकांत गाठणे आवश्यक होते.

" जुदा होके भी..तूं मुझमें कही बाकी है....!" .......तेवढ्यात चाफ्याचा मोबाईल फोन जो बोंबलायला लागला... तो थांबेचना......

"अरे बाबा थांब जरा.... नेमका आत्ताच कोण पेटलाय कुणास ठाऊक?"

चाफ्याने वैतागून फोन उचलला.....

"चाफ्या, कौतूक बोलतोय"

पलिकडून आवाज आला तसा चाफ्याने निश्वास सोडला...

"थँक गॉड, मी तुलाच फोन करणार होतो कौतुक.... आज वार्तामध्ये वाचलं ते........."

"अगदी खरं आहे चाफ्या. म्हणून तर तुला एवढा तातडीने फोन केला. कसातरी हजार लफडी करुन विशल्याला जामीनावर सोडवलाय मी. पण प्रकरण गंभीर आहे रे मित्रा !"

कौतुकच्या आवाजात कमालीचे गांभीर्य होते, त्याचा आवाज ऐकूनच चाफा चरकला......

"कौतूक... अरे पण विशल्या बरा आहे ना? एकदम तुझ्यावर हल्ला केला म्हणजे..... यार मागच्या वेळी फक्त तुला अडकवलं होतं त्याने त्या खुनाच्या केसमध्ये. अर्थात त्यावेळी तुला बाहेर काढायची पण सगळी व्यवस्था पण त्यानेच करून ठेवली होती. मग मी त्याचं पितळ उघडं पाडलं म्हटल्यावर आता इतका बिथरला? खरंच वाटत नाहीये यार..., विशल्या.....! की हे काहीतरी वेगळंच आहे? "

चाफ्याला कशावरच विश्वास बसेना झाला होता.

"काहीतरी बोलू नको चाफ्या . विशल्या कसाही असला तरी या पातळीवर उतरणार नाही याची खात्री आहे मला. चाफ्या, तुला परवाची ती घटना आठवते का? तु तो पराक्रम केलेला? त्यानंतर शेवटी विशल्या काय म्हणाला होता आठवतय....

"चाफ्या, यापुढे असले उपद्व्याप करणार असशील तर तो मोबाईल बदल आधी." असच काहीसं बोलला होता विशल्या तेव्हा...

चाफा उदगारला...

"अरे.. कौत्या.. म्हणजे... मला जे वाटतय तेच तुलाही.....

"अगदी बरोबर सायबा.... अगदी बरोबर........ त्यावेळी आपण गृहित धरुन चाललो की विशल्या त्या संमोहनातुन बाहेर आलाय, पण जे काही घडलेय त्यावरुन तसं काही घडलेलं दिसत ना.........."

चाफ्या...., एक मिनीट ! आज तक ला एक ब्रेकिंग न्युज हायलाईट होतेय मघापासुन....

"ग्रेटर नोएडा ची न्युज आहे. एका मुलीनं आपल्या आईवर जिवघेणा हल्ला केलाय स्वयंपाकघरातली फळे कापायची सुरी वापरुन. अरे तो वार्ताहर सांगतोय.... दोघी किचन मध्ये होत्या. आई रोटल्या करत होती तर मुलगी भाजी कापत होती. दोघी छानपैकी गप्पा मारत होत्या. अचानक मुलगी हातातला चाकु उगारत आईवर धावली. आई गंभीररीत्या जखमी आहे."

चाफ़्या, काहीतरी भयानक घडतेय. या घटनेचा विशल्याच्या घटनेशी तर काही संबंध नसेल?

चल बे, कौत्या ! उगाच काहीतरी बादरायण संबंध जोडू नकोस. कुठे मुंबई कुठे नोएडा... काहीतरी लिंक आहे का? एनी वेज मी रजा टाकतोय आजच, रात्रीच्या गाडीने मुंबईत येतोय. शांतपणे बसुन निवांत बोलू या विषयावर. विशल्यालाही फ़ोन करतोय. भेटू या उद्या सकाळी.

चाफ़्याने लगेच मोबाईलवरुन विशाललाही फ़ोन करून आपण मुंबईत येत असल्याची बातमी दिली. विशल्या सॉलीड हादरलेला होता.

"चाफ्या, अरे काय चाललय काहीच कळत नाही? अरे, मान्य आहे... मागच्या वेळी मी थोडासा नालायकपणा केला होता. पण कौतूकवर असा प्राणघातक हल्ला करण्याइतका मी नीच नाहीये रे! काहीतरी विचित्र, चाकोरीबाहेरचं असं घडतय चाफ्या."

विशल्या, शांतपणे बस. गेल्या काही दिवसात काय काय घडलं? कुणा कुणाला भेटलास, बोललास.. ते आठवण्याचा नीट प्रयत्न कर. अगदी छोट्या छोट्या तुला क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टीदेखील सोडु नकोस. आपण भेटल्यावर सविस्तर बोलूच."

आणि चाफ्याने फोन ठेवला.

काहीतरी निश्चितच बिघडलं होतं. ही येणार्‍या वादळाची नांदी तर नव्हे?

**************************************************************************************************************

"कौत्या, काहीतरी भयानक घडतय निश्चितच!" चाफा पुर्णपणे हादरलेला होता.

हो रे..., कालपर्यंत मी ही थोडा स्थीर होतो. पण कालच्या रात्रीत ज्या घटना घडल्या आहेत.... त्या पाहता काहीतरी भयानक, आपल्या आकलन शक्ती बाहेरचं घडतय एवढं नक्की. तुला माहीतीये... काल रात्री माझ्या मुलाने मला हातातला तांब्या फेकुन मारला. थोडक्यात वाचलो नाहीतर कपाळमोक्ष ठरलेला होता. अरे एरवी काळजी वाटावी एवढा शांत आहे माझा पोरगा. "

कौतूक... मी कालपासुन सारखा टि.व्ही. वर नजर ठेवून आहे. देशभरात अशा आणि अशाच प्रकारच्या जवळजवळ अठरा घटना घडल्या आहेत. या सगळ्यातून आत्ता पर्यंत तीन माणसांचा मृत्युही झालाय. हे प्रकरण आता साधे राहीलेले नाहीय कौतूक."

विशालने पहिल्यांदाच त्यांच्या संभाषणात भाग घेतला.

"नाहीतर काय रे. मलातर राहून राहून स्वतःचाच राग यायला लागलाय आता. मी पुर्ण माहिती नसताना तो नसता उपद्व्याप करायला नको होता. अज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान धोकादायक असते म्हणतात ना... ते पटतेय आता." चाफा खरोखरच निराश झाला होता.

"पण नक्की काय झाले असेल रे!" इति विशाल.

"ते माहीत असते तर आत्तापर्यंत त्यावरचा इलाज शोधायच्या मागे नसतो का लागलो यार." कौतूक निराशेने उदगारला.

"नाही, कौत्या हे आपल्या कुवतीबाहेरचं आहे. हे काहीतरी वेगळ्या कक्षेतलं आहे, वेगळ्या पातळीवरचं आहे. माझ्या त्या पोस्ट संमोहनाच्या प्रयोगादरम्यान काहीतरी महाशक्तिशाली पण अभद्र, विकृत असे या जगात आलेय एवढे मात्र नक्की." इति चाफा.

"चल बे, या गोष्टी कथा, कहाण्यापुरत्या ठिक आहेत. प्रत्यक्षात असं काही नसतं. भूत, पिशाच, काळ्या शक्ती वगैरे गोष्टी फक्त कथा - कादंबर्‍यातच शोभतात. प्रत्यक्षात असं काही नसतं. माझा नाही विश्वास असल्या भाकडकथांवर! " विशल्याने सरळ सरळ ती शक्यता उडवून लावली.

"पण मग तसं असेल तर एकाच वेळी देशाच्या कानाकोपर्‍यात या एक सारख्या गोष्टी कशा काय घडताहेत? विशल्या आता वेड लागायची पाळी माझी आहे यार."

चाफा डोके धरूनच बसला होता.

कालच्या फोननंतर तिघेही मित्र अंधेरीतल्याच एका हॉटेलमध्ये एकत्र जमले होते. कालपर्यंत तीन मित्रांपुरतीच मर्यादीत असलेली ही घटना आता फार वेगळ्या पातळीवर जावून पोहोचली होती. चाफ्याचं स्पष्ट मत होतं की हे सगळं त्याच्या त्या संमोहनाच्या अयशस्वी उपद्व्यापातूनच निष्पन्न झालेय.

"तुम्ही लोक काहीही म्हणा यार, मला खात्री आहे... हे सगळं माझ्या त्या उपद्व्यापातुनच निर्माण झालेय." चाफा उदगारला

तिघेही काहीही न बोलता एकमेकाकडे पाहातच राहीले.

"नमस्कार, कॅन आय जॉईन यु?"

एक अतिशय मृदू, कोमल पण आश्वासक आवाज कानी आला आणि तिघांच्याही नजरा एकदमच आवाजाच्या रोखाने वळल्या.

समोर एक चाळीशीतला तरूण उभा होता. राखाडी रंगाची कॉटन जीन्स टाईप पँट, वर स्वच्छ पांढर्‍या रंगाचा कुर्ता. कपाळावर रक्तचंदनाचा छोटासा गंधाचा टिपका, पायात साध्याच चपला आणि चेहर्‍यावर प्रसन्न हास्य. त्याचे नीळे डोळे मात्र कमालीचे तेजस्वी होते. त्याच्या नजरेत अडकलेली आपली नजर काढणे तिघांनाही जमेना आणि त्याच्या डोळ्यातले तेजही सहन होइना.

त्याच्या लक्षात बहुदा त्यांची अवस्था आली असावी... त्याने लगेच क्षणभरासाठी आपले डोळे मिटून उघडले आता त्या डोळ्यात एक शांत, स्निग्ध असा भाव होता.

"सॉरी, माझ्या लक्षातच आले नाही. " ती व्यक्ती हसुन उदगारली...

तिघेही अजुनही काहीही न बोलता कधी त्याच्याकडे तर कधी एकमेकाकडे पाहातच होते.

"कौतुक, विशाल.... गेले दोन दिवस, म्हणजे ती घटना घडली त्यानंतर साधारण तीन तासानंतरपासुन मी तुमच्या मागेच आहे. माफ करा... पण दुसरा पर्यायच नव्हता. आता सुद्धा मी इतक्यातच मध्ये पडायचे नाही असेच ठरवले होते. पण तुमच्या बोलण्यातून जाणवले की तुम्ही हळू हळू मुळ समस्येकडे येताय. पटत नसलं तरी तुम्हाला ती शक्यता वाटायला लागली आहे. तेव्हा मी स्टेप इन करायचे ठरवले."

"कोण आहात तुम्ही? काय हवेय तुम्हाला? आमच्या मागे का लागला आहात?"

त्या अनाहूत माणसावर ओरडतानाच कौतूकच्या लक्षात आले की मनात इच्छा असूनही आपल्याला त्याच्यावर रागवणे, ओरडणे शक्य होत नाहीये. तसा तो माणुस प्रसन्न हसला.

"मी कोण आहे, हे खरोखरच तितके महत्त्वाचे आहे का? या क्षणी त्याहीपेक्षा तुम्ही किंवा आपण सारेच कुठल्या संकटात सापडले आहोत आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे ते अधिक महत्त्वाचे नाही का? आणि श्रीयुत चाफा तुम्ही आधी स्वतःच्या मनातला तो गिल्ट काँप्लेक्स काढून टाका बरे.

एवढेच सांगतो की हे सारं काही पूर्वनियोजीत आहे. केवळ तुमचाच नाही तर अगदी या विशालने केलेला पराक्रम देखील. तुम्हा दोघांनाही वाटतेय की तुम्ही फार हुशारीने हे सगळे काही घडवून आणलेय. माय डिअर फ्रेंडस्..., हा तुमचा भ्रम आहे. अहो, कर्ता - करविता तो प्रभु राम वर बसलाय, आपण सगळेच केवळ निमित्तमात्र असतो. तो नाचवेल तसे नाचतो. इथुन पुढे जे काही होणार आहे त्यात तुमचा सहभाग असणार आहे, म्हणुन त्याने तुम्हा तिघांनाही यात गोवलय... बस्स इतकंच !"

त्या व्यक्तीने प्रसन्नपणे हसून विचारले. त्याच्या चेहर्‍यावरचं प्रसन्न, आता थोडं गुढ वाटायला लागलेलं हास्य तसंच कायम होतं.

तसे तिघेही ताडकन उभे राहीले.

"कोण आहात तुम्ही? काय काय माहीत आहे तुम्हाला?" तिघांच्याही तोंडून एकच प्रश्न बाहेर पडला.

"मला काय माहीत...?

........ खरेतर मला काय माहीत नसतं.....?

ह्म्म्म ! जे माझा राम सांगतो ते फक्त मी जाणतो. असो... या क्षुद्र देहाला "सन्मित्र भार्गव" म्हणतात. माझे जवळचे स्नेही मला आण्णाच म्हणतात. तुम्ही काहीही हाक मारु शकता..... 'सन्मित्र' म्हणा, 'भार्गव' म्हणा नाहीतर 'आण्णा' म्हणा किंवा नुसतेच 'मित्र' म्हणा.

************************************************************************************************************

क्रमशः

मागे एकदा मायबोलीकरांनी आमचा वात्रटपणा मोठ्या मनाने खपवून घेतला होता. Proud
एक प्लान ..... खुनाचा,
या चाफ्याचं काय करु?
आणि
खरच हे शक्य आहे ?

त्याचवेळी मी कौतुकला प्रॉमीस केलं होतं की या त्रिधारेचा पुढचा भागदेखील लिहीन. पण काही कारणास्तव तेव्हा नाही जमले. आता पुन्हा बर्‍यापैकी वेळ मिळाल्यावर पुन्हा एकदा लिहायला सुरूवात केली आहे.
आपल्या अमुल्य अभिप्रायांच्या आणि सुचनांच्या प्रतिक्षेत.....

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

नको रे इतका अंत पाहूस वाचकांचा............. लवकर लवकर पोस्टना....... बाकी लेखन भारीच... 'सौमित्र' रिएंटरर्ड......

हम्म्म..कथा चांगलीच आहे आणि चांगलीच होणार नेहमीसारखी..म्हणून नक्कीच खपवून घेतली जाईल...पण क्रमश: भागांचा 'बिलंदर'पणा ह्या वेळेस खपवून घेतला जाणार नाही याची कृपया लेखकाने नोंद घ्यावी
-हुकुमावारून
समस्त मा.बो.वाचक Proud

जरुर Happy

वा