शेवईचा दिवस

Submitted by सई केसकर on 8 June, 2010 - 21:56

"शेवई" बिचारी आजकालच्या आधुनिक स्वयंपाकघरात माझ्या आईच्या आज्जेसासूच्या नथीसारखी झाली आहे. येतही असेल कदाचित अधूनमधून; पण ती सुद्धा चापाच्या नथीसारखी, ग्राहक पेठेतून! मला मात्र आईनी आजारपणात बनवलेली साजूक तुपातली खीर अजूनही लक्षात आहे. शेवईची खीरच बरी वाटते. तसे शेवईच्या पुनर्वसनाचे खूप प्रयत्न मराठी गृहिणींनी केले आहेत - जसा "शेवईचा उपमा". पुस्तक लिहिणा-या काकू नेहमी शेवईचा उपमा जास्त कल्पकतेनी लिहितात.
"हवे असल्यास भाजलेले शेंगदाणे घालावेत (ऐपत असेल तर काजूही घालावेत). एका काचेच्या बशीत उपमा वाढावा. त्यावर लिंबू पिळून, खोबरं-कोथिंबीर भुरभुरावी. गरम गरम उपमा खायला द्यावा".
यातला शेवटचा भाग मला जाम खटकतो. खायला का म्हणून द्यावा! कुणाला द्यावा? तिथे काकूंनी थोडी कल्पकता वापरली असती तर चाललं असतं. एवढा कष्टानी केलेला शेवईचा उपमा गरम गरम असताना आधी स्वत: खावा. मग दुस-यांना द्यायच्या भानगडीत पडावे.
माझ्या मते प्रत्येक पदार्थ कसा खावा हे सुद्धा लिहायला हवं.
जशी कांदा भजी नेहमी पाऊस बघत खावी, किंवा साबुदाण्याची खिचडी वरून साखर भुरभुरून गच्चीत बसून खावी. पुरणाच्या पोळीत किती तूप घातलंय हे बघू नये. जर तळलेला पदार्थ खायची हिम्मत होत नसेल तर तो करूच नये. उगीच त्याला भाजून त्याचा दारुण पराभव करू नये.
पुढे नव्वदाव्या दशकातल्या नवोदित विवाहितांनी शेवईचं लग्न उत्तर भारतीय पदार्थांशी लावलं. शेवई-पनीर अपेटायझर वगैरे. मग शेवईनी सीमोल्लंघन केलं. आणि सीमेपलीकडच्या थोड्या आडव्या बांध्याच्या चिनी बहिणीची जागा घेतली. अल्फा गृहिणी ’शेवई मांचुरीयन’ करू लागल्या. पण खिरीपलीकडे मला शेवईचं कुठलही वेषांतर आवडत नाही.
कोल्हापुरात शेवई करायचा दिवस असायचा. "हल्लीच्या धकाधकीच्या जगात" हा प्रकार लोकांना अशक्य वाटेल पण साधारण सोळाच वर्षांपूर्वी हे अगदी मजेत घडायचं. सगळ्या शेजारणी मिळून शेवईचा दिवस ठरवायच्या. त्या दिवशी यच्चयावत कारटी गोळा केली जायची. कुणाचा पुतण्या, कुणाची नात, नातीची मैत्रीण सगळ्या मुलांना मदतीला घेतलं जायचं. आणि अनुभवी अज्ज्या पुढाकार घ्यायच्या. आमची ताजी अर्थातच शेवई-मंडळाच्या कार्यकारी समितीत असायची. कुणाची बेळगावहून आलेली सासू असायची. तिला ताजी लगेच, "वैनी तुमच्याकडं कशी पद्धत असते?" असं विचारून सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू करायची.
शेवई करायला एक लांब पाट लागतो. त्यावर बारीक रेषा असतात. त्या रेषांच्या मापाची शेवई होते. पाट मोठ्या पत्र्याच्या डब्यावर जमिनीला साधारण पंचेचाळीस अंशांच्या कोनात टेकवला जातो. डब्यावर अनुभवी सासू नाहीतर आज्जी बसून शेवई वळते तर डब्याखाली नवीन सून नाहीतर उपद्रवी कारटी (दोघी एकाच वर्गात मोडतात) बसून ताटात शेवई गोळा करते. ताटावर शेवईच्या रांगोळ्या भरल्या की ताट उन्हात वळवायला ठेवतात. मग एखादी मोठ्या डोळ्याची मावशी सगळ्या पोरांना त्या शेवईपसून डोळे वटारून लांब ठेवते (तिच्या मते).
यातही, "पोरं खानार ओ. ज्यास्त कराया पायजे. तुमी किती बी भीती घाला त्यास्नी पन खात्यातच किनी बगा." हा अर्थशास्त्राचा नियम गृहीत धरला जायचा.
"तरी बगा, दोन पोरांत मिळून तरी येक ताट हुनार की".
मग आमच्यासाठी आधीच ताटं करून ठेवलियेत हे कळल्यामुळे आम्ही लगेच "साथी हाथ बटाना" सुरू करायचो.
जशी ओल्या साबुदाण्याच्या पापड्या खायला मजा यायची, तशी शेवई खायला काही यायची नाही. त्यामुळे दोन पोरांमागे एक ताट हे गणित अचूक होतं. साबुदाण्याच्या पापड्यांना कुठलंही गणित लावता यायचं नाही. त्यांचं कावळ्यांपासून आणि पोरांपासून प्राणपणाने रक्षण करणे हे एकंच उत्तर होतं.
पण का करत असाव्यात शेवया? त्या काही पैसे वाचावेत किंवा घरच्या शेवया श्रेष्ठ म्हणून नाही करायच्या. शेवई करताना किती मैत्रिणी एकत्र यायच्या! त्यात सासवांना "सगळ्याच सुना नाठाळ असतात" हे सत्य उमगायचं तर सुनांना "सगळ्याच सासवा खाष्ट असतात" याचा साक्षात्कार व्हायचा. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी दुसरीच्या कानात हळूच काहीतरी सांगायची. आणि दोघी ओठावर पदर ठेवून खिदळायच्या. असंख्य कानडी आणि मराठी पाककृतींची अदलाबदल व्हायची. आणि आमच्याकडं याला हा शब्द वापरतात या वाक्याखाली कर्नाटकातून उडी मारून बरेच शब्द कोल्हापुरात दाखल व्हायचे. त्यात वर फोडणीसुद्धा असायची. कुठल्यातरी शूर सुनेची यशोगाथा. त्यावर सगळ्या सासवांची मुरडलेली नाकं आणि सुनांचे विजयी चेहरे. मग ताट वाळत ठेवायच्या मिषानी काही सुना बाहेर जायचा आणि "बरं झालं वैनी ईषय काढला तुम्ही. आमच्या मामींना कुनीतरी ऐकवायाच पायजे." अशा सून संघटनांच्या मूक आरोळ्या यायच्या.
आपापल्या नव-यांची सामुदायिक थट्टादेखील व्हायची।
शेवई-दिवसाची संध्याकाळ नेहमी पुन्हा भेटायच्या वचनानी व्हायची. आजकालच्या भिश्या, पार्ट्या तेव्हा नव्हत्या. पण घरातली कंटाळवाणी कामं करायला मैत्रिणी नेहमी एकत्र जमायच्या, आणि ही प्रथा जगभरातल्या सगळ्या महिला पाळत आल्यात. माझी आई कधीच या गटात बसली नसती. पण ती जेव्हा कामवाल्या मावशींना भाजी निवडू लागते तेव्हा मला तिच्यातली ही सुप्त शेवई करणारी मामी दिसते आणि मग ती मला दाखवल्याबद्दल माझी आई मला अजून जास्त आवडते!
----------------

संपादन आणि तपासणीसाठी गायत्री नातू हीचे खूप खूप आभार.
आणि मायबोलीकरांच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

मूळ लेख : http://unhalyachisutti.blogspot.com/2010/04/blog-post_14.html

गुलमोहर: 

मलही आठवतात टांगून ठेवलेल्या लांब लांब शेवया आणि त्याखाली पसरून ठेवलेले कागद. शेवया करतानाचे गॉसिप नाही आठवत मात्र(कदाचित सगळ्याच साळकाया म्हालाकाया हजर असल्यामुळे कोणाबद्दल बोलायचा हा यक्ष प्रश्ण असेल LOL). आणखी एक आठवण म्हणजे दुपारच्या वेळी आज्जी आणि माम्म्या शेंगा फोडत बसायच्या. हा उपद्व्याप कशासाठी ते अजूनही कळत नाही. आता गेले की विचारीन मामीला.
, तू खरच स्टार लेखिका आहेस गं.kudos to you. please pardon the mistakes in marathi typing.

सही... आम्ही पण लहानपणी आजीकडे हा सोहळा अनुभवलाय.. पण ती शेजार्यांना नाही बोलवायची, तिच्या ३ मुली आणि ५ नातवंडे हजर असल्याने ४ घरच्या (तिच्या, आमच्या आणि मावशींच्या) शेवया, पापड, कुरडया सर्वं काही मजेत व्हायचं.. शेंगा, चिंचा फोडणे हे प्रकार पण असायचे दुपारी... आता नाही होत असं काही (एव्हडे दिवस जायला मिळतच नाही ना) Sad

लेख खूप आवडला. कालच माझ्या सासूबाई घरी शेवया करायच्या त्याबद्दल सांगत होत्या. आता त्यांना हा लेख वाचायला देईन!

आमच्या इथे व्हायच्या अश्याच सामुहिक शेवया! Happy
लेख मस्तच जमलाय.

एवढा कष्टानी केलेला शेवईचा उपमा गरम गरम असताना आधी स्वत: खावा. मग दुस-यांना द्यायच्या भानगडीत पडावे.>>>> Proud हे भारी !

छान लिहिलं आहेस सई. साबुदाण्याच्या खिचडीवर साखर हे काही आवडले नाही. दही-साखर छान लागेल पण फक्त साखर नाही. आमच्याकडे अजूनही काही भागात घरीच शेवया करतात. लहानपणी दोरीच्या पलंगाला म्हणजे बाजीला साचा लावून आम्ही शेवया करायचो. ते फिरवायचे काम आमचेचं असायचे.

बी,
हा हा. माझ्या आईलापण खिचडीवर साखर घातली की राग येतो. म्हणूनच गच्चीचा आसरा!! Happy
पण एकदा तुम्ही खाऊनच बघा तशी खिचडी. =)

छान लिहिलय सई,
मी बघितलाय हा सोहळा. ताटातल्या आणि दांडिवरच्या अश्या दोन प्रकारच्या असायच्या शेवया.
दांडिवरच्या सरळ व्हायच्या, पण त्या वाळताना ढग आले कि त्या खाली पडायच्या.
काहि सुगरणी तर अगदी सुतासारख्या बारिक शेवया वळायच्या.

सई किती गोड लिहितेस.. Happy
आमच्याकडे वाळवणात वाफेच्या पापड्या, वेफर्स, कुर्डया,सांडगे,पापड केले जायचे.. जुन्या आठवणी सरसरून वर आल्या की

काय आठवण काढलीस! आमच्याकडे पाटावर करत नसत. एक एक लाटी बोटांनी लांबवत जायची. पूर्ण शेवई सारख्या जाडीची वळली की सगळ्याजणी कौतूक करायच्या. काय मस्त वाटायचं. मग चार पाच एकदम हातांवर घेवुन रींग बनवायची, लोकरीचा गुंडा बनवण्यासाठी करतात तशी. या रींग्स झोक्यासारख्या काठीवर वाळत ठेवायच्या. आम्हालापण चहा मिळायचा. Happy
मस्त लिहीलय. आवडलं.

माझ्या मावशीच्या लग्नात वगैरे असे घरीच शेवया केल्या होत्या. तेव्हा अर्थात आम्ही लहान होतो त्यामुळे "मधे मधे करू नकोस" या धमकीसकट आम्हाला अंगणात खेळायला पाठवायचे सर्वजण Sad

आता तर बाम्बिनोचे पाकिट आणायचे आणि शेवया खायच्या Happy

वा... मी कधी हे शेवई प्रकरण पाह्यलं नाहीये. पण पापड, कुरडया, चिकोड्या, बटाट्याचा खीस सगळं बघितलंय. आईला जमायचं तोवर ती बरंच काय काय करत असायची. त्या काळात मला उत्साह असायचा आईला मदत करायचा आणि ते वय असं होतं की अर्धमुर्ध, कसंही काम केलं मदत म्हणून तरी कौतुक व्हायचं... वर पापडाच्या लाट्या पण हादडायला मिळायच्या... Happy

छान लिहीलंय!
माझी आजी करायची त्या शेवया दोन प्रकारात मोडायच्या. सोवळ्याच्या शेवया( हा प्रकार मला कधी आवडला नाही कारण मला हात लावायला मिळायचं नाही) आणि ओवळ्याच्या शेवया, त्यात माझा भरपूर सहभाग असायचा. सगळ्या शेवया वळुन होइस्तोवर मला दिलेल्या बोटीचा पांढरा रंग पार बदलून जात असे. Proud

श्रुती म्हणते तसं हातावर त्या शेवयांना थोडं ताणुन दांडीवर टाकायला मज्जा यायची.

छान लिहिलं आहेस Happy आमच्याकडे पाटावर नाही पण हातावर शेवाया करत असत. त्याला खरोखरच खुप कौशल्य लागते. आई, सासुबाई सर्वांनाच जमते. मी पण करुन पाहिल्या आहेत. तितक्याशा नाही पण बर्‍यापैकी जमल्या. शेवई वळताना अगदी सुतासारखी, शुभ्र तार पडू लागली की बघत रहावेसे वाटते. आजी जेव्हा शेवाया करते तेव्हा तिच्या स्पीडला कोणीच चॅलेंज करू शकत नाही. मशिनवर केलेल्या शेवईला, हातावरच्या शेवईची चव येणे कदापी शक्य नाही.
पापड, कुरुड्या, खारोड्या, सांडगे, बटाट्याचे चिप्स, खीस... किती तरी प्रकार. उन्हाळ्यात रोज काही ना काही असायचेच. पापड देखिल तांदळाचे,ज्वारीचे,कोंड्याचे,पोह्याचे,बाजरीचे,साबुदाण्याचे,बटाट्याचे इतके प्रकार. कुरुड्या गव्हाच्या चिकाच्या किंवा रव्याच्या. शेवई नाही पण पापड मात्र अजुन करतो आम्ही.

मी लहान असतांना गावी गेले की पहायचे हा शेवई बनवण्याचा प्रकार. मलाहि आश्चर्य वाटायचे पाटावर वळुन ताटात दोर्‍यासारख्या बारीक शेवया बनतानाचा.
<<शेवईची खीरच बरी वाटते >> हो अगदि.. ते उपमा वगैरे प्रकार मलाहि नाहि आवडत.
छान लिहिला आहे लेख Happy

मस्त लिहिलं आहेस सई.... उन्हाळ्यातल्या वाळवणाच्या आणि लोणच्यांच्या आठवणी जाग्या केल्यास! आता असे एकत्रित उपक्रम फारच क्वचित होतात. नात्यात कोणाचे लग्न ठरले की मग हळद फोडायला, सुपारी, मेतकूट, गव्हले, पापड्या - कुरडया करायला एकत्र जमणे होते. पण तेव्हाही जाम मजा येते! Happy

काय मस्त लिहीलय गं! मलापण लहानपणीचे वाळवण करण्याचे दिवस आठवले. विवीध पापड, कुरडया,चकल्या, वेफर्स अन काय काय! शेवया करताना मात्र आजोळीच बघायला मिळायच्या. आजी, तिच्या मैत्रीणी, बहीणी अशा सगळ्याजणी हसत खेळत ते काम करायच्या. दुपारी एक मावस आज्जी चहाचे गाणे म्हणायची. ' चहा घ्यावा, चहा द्यावा, चहा जीवाचा विसावा' असे काहीसे ते गाणे होते!

एवढा कष्टानी केलेला शेवईचा उपमा गरम गरम असताना आधी स्वत: खावा. मग दुस-यांना द्यायच्या भानगडीत पडावे.>>> हाहाहा..खरंय Happy
माझ्या आईच्या आज्जेसासूच्या नथीसारखी >>
नवीन सून नाहीतर उपद्रवी कारटी (दोघी एकाच वर्गात मोडतात) >>> मस्त Happy

>>>यातला शेवटचा भाग मला जाम खटकतो. खायला का म्हणून द्यावा! कुणाला द्यावा?

अगदी अगदी Happy ओगलेआजींच्या पुस्तकात तर हे हमखास असतंच!

हे राहिलच होतं वाचायचं. छानच लिहितेस तेव्हा आता प्रत्येक लेखाला छान-छान सांगणार नाही Happy

आमच्याकडे पण हातावरच्या शेवया व्हायच्या. कॉलनीतली सगळीच वाळवणं आया, आज्या आणि कार्टी मिळून करायची. त्यातल्या त्यात उडदाचे पापड, खिच्चे, शेवया म्हणजे बैठकीची कामं. आम्ही एका खोलीत नाहीतर बागेत झाडाखाली पत्ते खेळणार आणि आया सगळ्या आत ही कामं करणार. मग लागेल तशी आम्हाला मदतीसाठी बोलावणार. जो गडी आत जाइल त्याने येनकेनप्रकारे बाहेरच्या सगळ्यांसाठी लाट्या आणायच्या. खूप धमाल यायची. धन्यवाद सई. खूप छान आठवणी जागवल्यास.

Pages