एलियन्सच्या ग्रहावर - मॅजिका

Submitted by एस अजित on 8 June, 2010 - 11:07

नमस्कार बालमित्रांनो,

मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. यात नेहेमीचे राजा राणी नाहीत तर चक्क एलियन्स आहेत. मग तयार आहात ना एलियन्सची गोष्ट ऐकायला? चला तर मग.

अनु आणि मनु ही दोघं भावंडं शाळेला सुटी लागली की आपल्या मामाच्या गावाला जात असतं. मनु होती मोठी आणि अनु होता लहान. दोघांना मामाचा गावं फार आवडायचा. मामाच्या गावाबाहेर एक मोठी टेकडी होती. तिथे भरपुर झाडं होती. दररोज सकाळी मामा आपल्या भाच्यांना घेऊन त्या टेकडीवर जायचा. दोघांनाही त्या झाडांच्या सावलीत खेळायला खुप आवडायचे.

एके दिवशी असेच दोघेजणं धावत पळत टेकडीवर जाऊन पोहोचले. मामा पाठीमागे होताच. अचानक दोघांना अगदी बारिक आवाजात काहीतरी कुजबुज ऐकु आली. मनुने धाडसाने पुढे जाऊन पाहिले तर काय? तिला कोण दिसलं माहितीये ? नाही ना ओळखता येत ? जा~~दू. हो चक्क जादू. तोच, कोई मिल गया मधला. धम्माल ना?

'ए जादू ! तु इथे काय करतोय ?' - मनु ने जादू ला विचारले.
'मी जादू नाहीये. मी त्याची लहान बहिण आहे, माझं नाव आहे मॅजिका'
'हो~~~! खरचं?' - अनु आणि मनु दोघांच्या तोंडुन एकच प्रश्न बाहेर पडला.

मुलांना गंमत वाटली. खुप आश्चर्य आणि आनंद ही वाटला. त्यानी मामाला हाका मारायला सुरुवात केली.

'मामा, जादू, मा~~मा जादू' - अनु
'अरे जादू नाही.. मॅजिका' मनु ने दुरुस्ती केली.

मामा धावत धावत आला. त्यालाही एलियन बघुन आश्चर्याचा धक्का बसला. त्याला मुलांची काळजी वाटली. त्याने दोघांना आपल्या मागे लपविण्याचा प्रयत्न केला. ते बघुन मॅजिका म्हटली 'घाबरु नका, मी त्यांना त्रास द्यायला आलेली नाहीये'.
मामाने विचारले 'तुला मराठी कसे बोलता येतेय?'

'आमच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर येऊन गेल्यानंतर तुमच्या ग्रहाचा अभ्यास सुरु केला. त्यात तुमची भाषा देखिल होती. मी जीवशास्त्रांची विद्यार्थीनी आहे. पृथ्वीवरील वृक्षांचा मी अभ्यास करते आहे. मला या टेकडीवर अनेक दुर्मिळ वृक्ष मिळाले ते घ्यायला मी इथे आले आहे. मला तुमच्या ग्रहावरच्या महत्त्वाच्या सगळ्या भाषा अवगत आहेत.' - मॅजिका

मामाची भिती थोडी कमी झाली. त्याने आजुबाजुला बघितले. त्याला एलियन्सचे यान कुठेच दिसले नाही. त्याने मॅजिकास विचारले 'तुम्ही किती जणं आला आहात? आणि तुमचे यान कुठे आहे ?'

'मागच्या वेळी आमचे बरेच शास्त्रज्ञ पृथ्वीवर आले होते त्यामुळे त्यांचे यान मोठे होते, आणि मोठे यान तुमच्या लोकांना दिसले तर ते आम्हाला त्रास देण्याची शक्यता असते त्यामुळे मी अगदी छोट्या यानातुन आले आहे. आम्ही दोघेच आहोत. मी आणि माझे पायलट. ते तिकडे यानात माझी वाट बघत असतील.' असे म्हणून तिने एका मोठ्या झाडाच्या मागे असलेले एक छोटेसे यान दाखविले.

'अगं पण तु आमच्या झाडांचा अभ्यास कशाला करते आहेस ?' - मनु ने विचारले.
मॅजिकाने आपले डोळे क्षणभर मिटुन घेतले. मनुला आपल्या डोक्यावर कुणीतरी गुदगुल्या करतयं असं वाटलं. त्याचवेळी तिला जाणवलं की मॅजिका आपलं नाव विचारते आहे. तिने मनातल्या मनात मॅजिकाला सांगितले 'माझं नाव आहे मानसी, पण सगळे जण मला मनु म्हणतात. तु पण मला मनुच म्हण.'

'त्याचं काय आहे मनु' - मॅजिकाने बोलायला सुरुवात केली.
'एक मिनीट, एक मिनीट. तुला माझं नांव कसं कळलं ?' - मनु ने मॅजिकाला आश्चर्याने विचारले.
'अगं सोप्पय, मी तुझ्या मेंदुला शोधले, त्याला तुझे नाव सांगण्याची विनंती केली, आणि त्याने मला तुझे नांव सांगितले.' - मॅजिका
'अरे व्वा. म्हणजे आम्ही ब्लु टुथ ने मोबाईल शोधतो तसे ?' - मामाने विचारले.
'हो अगदी तस्सेच. मनु तुला थोड्या वेळापुर्वी काही जाणवले का ? - मॅजिका
'हो, अगदी गुदगुल्या झाल्यासारखे वाटले, नंतर वाटले तु माझं नांव विचारते आहेस' - मनु
'बरोबर, तु परवानगी दिलीस म्हणून मला तुझे नांव कळले.' - मॅजिका

'तर मी काय सांगत होते, हा, आम्ही शक्य तेवढ्या ग्रहांचा अभ्यास करत असतो. प्रत्येक ग्रहावर जीवन आहे की नाही. जीवनासाठी काय काय आवश्यक आहे याचा आम्ही अभ्यास करतो, मला तुमचा ग्रह मिळाला, म्हणून मी पृथ्वीवरील वृक्षांचा अभ्यास करायला इथे आले आहे.' - मॅजिका

'हो~~~! तु कुठल्या कुठल्या वृक्षांचा अभ्यास केलास मगं ?' - अनु ने विचारले
मॅजिकाने आपले डोळे परत क्षणभर मिटुन घेतले. आता अनुच्या डोक्याजवळ गुदगुल्या झाल्या. त्याला हसुं आलं.
'हां ! तु अनुज नं, मानसीचा भाऊ' - मॅजिका

'हो~~~!' अनुला आनंद झाला.

'अरे तुमच्या ग्रहावर कितीतरी प्रकारची झाडे आहेत. अगणित संपत्तीच आहे ती जणू, पण बरिचशी आता नाहीशी होत चालली आहेत. तुम्ही लोकांनी किती भयंकर वृक्षतोड केली आहे याची तुम्हाला जाणीव नाही. तुम्ही तुमच्या ग्रहाचा समतोल बिघडवताय. तुम्हाला माहित आहे नं हे?' - मॅजिकाने निराश होत म्हटले

'हो, आम्हाला माहित आहे, पण काय करणार, सगळीकडेच झाडं तोडली जाताहेत. आम्हाला खुप वाईट वाटते कुणी झाड तोडलं की.' - मनु

'हं, बर्‍याच वर्षांपुर्वी आमच्याकडची झाडं पण अशीच सगळी तोडुन टाकली होती. त्याचे भयंकर परिणाम आम्ही भोगले. आमच्या ग्रहावरील जीवन अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर होते, शेवटी अतोनात प्रयत्न करुन आम्ही आमचा ग्रह वाचवला. तुमच्या बाबतीत हे घडू नये म्हणून आम्ही तुमच्या ग्रहावरील छोटी छोटी रोपं सोबत घेऊन जातो, आणि त्यांची आमच्या ग्रहावर निगा राखतो.' - मॅजिका

'ए हे काय नेहेमी? तुम्ही लोकंच आमच्या कडे येता, आम्ही कधी यायचं तुमच्या ग्रहावर?' - अनुज चा नाराजीचा स्वर
त्याचा प्रश्न ऐकून सगळ्यांनाच हसु आले.

'अरे त्यात काय एवढं. तुम्ही पण या आमच्याकडे, आमचा ग्रह बघा' - मॅजिका
'अगं पण त्यासाठी अ‍ॅस्ट्रोनट व्हावे लागेल ना, आणि त्यासाठी खूप खर्च येतो' - मामा
'मी तुम्हाला माझ्या यानातुन नेऊ शकेन' - मॅजिका
'क्काय ?' - तिघेही आश्चर्याने ओरडलेच.
'हे शक्य आहे? आम्ही तुमच्या ग्रहावर राहू शकतो? तुमच्या ग्रहावर पण ऑक्सिजन आहे?' - मामाने विचारले
'नाही, आमच्या ग्रहावर ऑक्सिजन नाही, पण आम्ही आमच्याकडे प्रत्येक ग्रहासारखे वातावरणं निर्माण केले आहे. तिथे तुम्ही अगदी सुखरुप राहू शकता' - मॅजिकाने माहिती पुरवली.
'काय सांगतेस काय? पण आम्ही खाणार काय तिथे? तुमच्यासारखे आम्ही सुर्यप्रकाशावर आमचे पोट भरु शकत नाही.' - मानसी
'त्याची तुम्ही काळजी करु नका, तुमच्या पृथ्वीवरील सर्व फळं आमच्याकडे उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला फळांवरच रहावे लागेल.' - मॅजिका

मुलांना अत्यानंद झाला, त्यांनी मामाकडे हट्ट धरला. मामालाही उत्सुकता होतीच पण घरी काय कळवायचे हा प्रश्न होता.

'आपण किती दिवसात तिकडे पोहोचु, आणि तु आम्हाला परत कधी आणून सोडणार?' - मामा
'तुमच्या पृथ्वीच्या वेळेनुसार संध्याकाळ पर्यंत मी तुम्हाला परत पृथ्वीवर पोहोचवू शकेन.' - मॅजिका

आता सगळ्यांनाच धक्का बसला.

'संध्याकाळ्पर्यंत, पण कसं शक्य आहे हे?' - अनुज
'अरे तुम्हाला शक्य नाही, पण आमच्या यानातुन प्रवास केलात तर शक्य आहे. काय करताय मग? येताय माझ्यासोबत? मला फक्त माझ्या पायलटची परवानगी घ्यावी लागेल.' - मॅजिका

'हो~~! आम्ही तयार आहोत' असे म्हणून मामाने घरी फोन करण्यासाठी मोबाईल शोधला. घरी कळवले आम्ही संध्याकाळीच घरी येऊ. आमची वाट बघू नका.

तेवढ्या वेळात मॅजिकाने आपल्या पायलटकडुन परवानगी घेतली आणि आपले बालमित्र अंतराळप्रवासासाठी सिद्ध झाले.

......क्रमशः

[पुढील भाग - एलियन्सच्या ग्रहावर - अंतराळ प्रवास]

गुलमोहर: 

अजित
छान कथा आहे. पण ती कुठे लिस्टींग मधे दिसतच नाहिये.
मी आता बालसाहित्य लिंक वर क्लिक केल तेव्हा दिसलि मला.
पुढचा भाग लवकर टाक

सावली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

बरेच दिवस कुणीच वाचली नाही गोष्ट, म्हणून लिंक दिसत नसेल.