वानू - सोबती-सवंगडी - भाग २

Submitted by bedekarm on 4 April, 2008 - 10:48

वान्या दुखण्यातून बरा झाला आणि झपाट्याने वाढायला लागलाय. आता आमचा डोळा चुकवून गल्लीतील कुत्र्यांमधे हिंड्ताना त्या सगळ्यांमधे पोटापासून वरचा सगळा वानू दिसतो. बाकीची कुत्री वानूपुढे चिल्लीपिल्ली दिसतात. वानू अल्फा मेल आहे. त्याला टोळीच नेतॄत्व करायला हव असत. सगळी कुत्रावळ अवतीभोवती नाचवत वानू पुढार्‍यासारखा हिंडतो. वानू अंगापिंडान दांडगा आहे पण एकदम फिगरमधे आहे. अगदी सिंहकटी. त्याच्या पळ्ण्यात हिंडण्यात मजबूत जोश आहे. त्याच्या अंगात लहानपणातला अवखळपणा आहे. शंतनू आणि वानू दोधेही एकमेकांशी खेळून अंगातली रग जिरवतात. ते एकमेकांचे जिवलग दोस्त आहेत.
माझ्या नोकरीमुळे मुलांना माझी कंपनी फारशी मिळत नाही. आता शंतनूच्या ११वी १२वीच्या वर्षात तर वानू हा त्याचा एकमेव मित्र आहे. कारण शंतनूला आम्ही सांगितलय की तू ही दोन वर्ष तुला पाहिजे तेवढाच अभ्यास कर. आम्ही तुला अभ्यास कर म्हणून सांगणार नाही. तुला नसेल करायचा तर नको करूस. पण मित्रांमधे हिंडायच नाही. याच कारण म्हणजे शंतनूला एक विचित्र सवय आहे. तो अभ्यास करतो पण शेवटी एक दिवस तो माझा अभ्यास झाला आहे असे जाहीर करुन टाकतो. मग परीक्षेला कितीही दिवस शिल्लक असोत. त्याने मनातून ती परीक्षा देउन टाकलेली असते. मग तो परीक्षा संपल्याप्रमाणे वागतो. पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, पोहायला जातो, मित्रात हिंडतो, डोंगरांवर भटकतो. आमचा जीव थोडा थोडा होत राहतो. त्याला कितीही सांगितले तरीही तो पुन्हा अभ्यास करत नाही. यावर शेवटचा उपाय म्हणून हा तोडगा काढला होता.
मग ही वर्ष शंतनू आणि वानू अशी जोडगोळीची झाली. शंतनू त्याला घरामागच्या माळावर लांब फिरायला नेतो. त्याला पळवून दमवून मस्ती करुन घरी आणतो. दोघ दिवसभर दंगा करतात. खेळात फारच चिडाचिडी झाली तर वानू रागावून भुंकतो. मग शंतनू त्याच्या गळ्यात पडून नाय नाय शाणा मुग्गा म्हणत बसतो.
या महिन्याच्या रीडर्स डायजेस्टमधे कुत्र्यांची बुध्दिमत्ता चाचणी आली आहे. एकूण वीस एम्सीक्यु आहेत. ते कुत्र्यांनी म्हणजेच पर्यायाने त्याच्या मालकाने सोडवायचे आहेत. आणि मग स्कोअर मोजून त्याची प्रत ठरवायची. शंतनूने अमुक अमुक झाले तर तुमचा कुत्रा -अ)अमुक करतो, ब) तमुक करतो क)अमुक तमुक करतो ड)यापैकी काहीही करत नाही वगैरे नीट वाचून खूणा केल्या. स्कोअर मोजला तर वानू 'व्हेरी व्हेरी स्मार्ट' या रांगेत जाऊन बसला.
हा म्हणाला की हा पेपर शंतनूने सोडविला आहे त्यामुळे ही शंतनूची कॅटॅगरी आहे. मग चेष्टेने वानू व शंतनू दोघांचाही उल्लेख व्हेरी स्मार्ट असा करू लागलो.
वानूला चटक मटक खाण्याची फार आवड आहे. शेव, चकल्या, लाडू, चुरमुरे, बिस्किटे, टोस्ट वगैरे वगैरे. मुल डबा घेउन खायला लागली की वानू त्यांच्या गुडघ्यावर किंवा मांडीवर पंजा दाबून ओढून मलापण दे म्हणून भांडतो. ताइ चिडते आणि म्हणते की वानू आम्ही तुझ्यातले काही खायला मागतो का? मग तू आमच्यातले का खायला मागतोस?
ताइ वानूच्या वाटेला फारशी जात नाही. एकदा तिने वानूला फिरायला नेले तर त्याने तिला ओढून खाली रस्त्यात पाडले. मग तिने त्याला फिरायला नेणे सोडून दिले.
वानूच्या बाबतीत याच एक स्वप्न आहे. पांढरा टी शर्ट, हाफ पॅण्ट, स्पोर्ट्स शूज वगैरे थाट करुन हातात एक काठी घेउन याने ऐटीत रस्त्यातून फिरायला जायच आणि वानूने त्याच्यापासून चार पावले अंतरावरुन शिस्तीत त्याच्याबरोबर चालावे. पण वानूचे स्वप्न तसे नाहीये ना. वानू रस्त्याच्या दोन्ही कडांना इतर कुत्र्यांच्या खुणा हुंगत आपल्याला साखळीसकट ओढतो. मग चिडून घातलेल्या शिव्या फटके मुकाट्याने खातो, पुनः दोन पावले जाउन पुनः तेच करतो.
आज चांगलीच थंडी पडली आहे. अंधार पडल्यावर तर अगदी घरात उबदार बसून रहावेसे वाटतय. एवढ्यात व्हरांड्यातून मियँव असा केविलवाणा आवाज आला. बाहेर येऊन बघितल तर एक मांजराच छोटस गोर सोनेरी पिल्लू चपलांच्या स्टँडखाली जाऊन बसलेल. आम्ही सगळेच बाहेर आलो. अर्थातच वान्याला आतमधे कोंडून, कारण मियँव ऐकताच त्याने दंगा करायला सुरुवात केलेली.
मांजरीला दूध घातले. पण तिला भूकेपेक्षाही अधिक थंडी वाजत होती. तर ताइ म्हणाली की आपण हिला पाळूया. वानूच्या दोन्ही मालकांनी या ठरावाचा निषेध केला. पण ताइने हट्टाने तिला पाळण्याचे ठरविले. एकतर या घरात ती राहील नाहीतर मी असा वानूचा आविर्भाव बघून आम्ही त्याला घराबाहेर ठेवून आजच्या दिवस तिला घरात ठेवूया असे ठरले. व्हरांड्यात वानूचे डोके जाम भडकलेले आहे. तिला काहीही खायला दिले तर वानूला आवडत नाहीये. कितीही गुपचुप तिला खायला दिले तरीही वानूला कळतच. तिला काही चुरचुरीत कुरकुरीत खायला दिले तर मग विचारायलाच नको. ताइने तिचे नाव मधुबाला ठेवले.
आता मधुबाला किंवा वानू दोघांपैकी एकावेळी एकालाच घरात ठेवता येणार. तिला खायला घालण्याअगोदर आम्ही वानूला पुढच्या दारी आधी खायला ठेवायचो. मग गुपचुप मागीलदारी तिला खायला द्यायचो. तरीही वानू आपल खाण सोडून तीरासारखा मागीलदारी धावत येइ. मग तिला वाचवताना नाकी नउ येत.
आठ दहा दिवसातच मधुबाला झाडावर चढायला शिकली. वानू व ती दोघेही बाहेर असली की ती झाडावर ऊंच चढून बसते. आणि वरून शिष्ठासारखे त्याच्याकडे बघते. वानूचे डोके जाम सटकते. वानू इकडे तिकडे गेलेला बघून मधुबाला हळूच झाडावरून खाली उतरायला बघते. पण वानू धावत झाडाखाली जाउन तिची तंतरवतो.
शेवटी आठ दहा दिवस वाट बघून या खवट सासर्‍याच्या सासुरवासाला कंटाळून मधुबाला घर सोडून पळून गेली. नंतर वानूला फिरायला घेऊन जात असताना हाफिजभाइंच्या बेकरी बाहेरील झाडावर बसलेली दिसली. उंचावरुन मला व वानूला तिने ओळख आहेही आणि नाहीही असा आविर्भाव केला.
पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. हाफिजभाइ आमदार झाले. तर तो म्हणाला की प्राण्यांना किती कळत नाही. आपल्या मांजरीला तर हाफिजभाइ आमदार होणार आहेत हे सुध्दा समजल होत. म्हणूनच ती त्यांच्याकडे गेली. पण वानू खरा कडवा सैनिक आहे. त्याने असल्या प्रलोभनांना बळी न पडता आमच्याशी कायम निष्ठा ठेवली.
समोरच्या आवटींनी लॅब्रेडॉर जातीच छोट पिल्लू आणल आहे. त्या काळ्या पिल्लाच नाव ब्लॅकी ठेवल आहे. आठवडाभर वान्याने भुंकुन वैताग आणलाय नुसता. आम्ही तर सोडूनच द्या पण त्यांच्याकडच्या पण कुणीही तिचे लाड केले की हा संतापाने उकळत असतो. रविवारची दुपार सुध्दा शांतपणाने बसू देइना. मग हा वानूला फटका मारायला म्हणून व्हरांड्यात गेला. पण वानूचा संताप बघून याला हसूच आल. वानूजवळ बसत, त्याच्या अंगावरून हात फिरवत तो म्हणाला, गप गप वानू, उगा बाया माणसांच्या नादी लागू नाही गड्यामाणसान.
त्यानी केलेल्या या संस्कारांमुळे असेल कदाचित, पण वानूला स्त्रीजातीविषयी जरा सॉफ्टकॉर्नर निर्माण झालेला आहे. घराबाहेर भटक कुत्र आल तर विनाविलंब वानू त्याला भुंकून हुसकावून लावतो. पण कुत्री असेल तर मात्र गेटपाशी ऊभा राहून तिच्याशी चार सुखाच्या दु:खाच्या गोष्टी बोलतो. कदाचित चिठ्या वगैरेही देत असेल. तेवढ्यात आमचे लक्ष आहे अस कळल तर मात्र ऊगीच भुंकून स्वामिनिष्ठा दाखवतो. वाढत्या वयाबरोबर वानूचे स्त्रीदाक्षिण्यही वाढत चालले आहे.
ब्लॅकी जशी मोठी व्हायला लागली तशी वान्याला खूप आवडायला लागली. तिच्याबरोबर खेळायला वानू धडपडायचा नुसता. कधी पळून जायला चान्स मिळाला तर दोघे घरासमोर एकमेकांना कळवंडीत धिंगाणा घालतात. ब्लॅकी फार लाळेरी आहे. तिच्याबरोबर खेळताना वानूचे तोंड गळा मान सगळ लाळेनी आणि त्यावर चिकटलेल्या धुळीने भरते. वान्याचा हा चमत्कारिक अवतार बघून सगळी त्याला हसतात.
(क्रमशः)

गुलमोहर: 

छान चाललीये वान्याची मालिका.

अभ्यास करतो पण शेवटी एक दिवस तो माझा अभ्यास झाला आहे असे जाहीर करुन टाकतो >> टण्या या बाबतीत मी तुझा सोबती.

छान लिहीताय.

मस्तच चाललय!! येऊदेत अजून

वानूबद्दलचे दोन्ही लेख वाचले. छान लिहित आहात.

पुढचे वाचायची उत्सुकता आहे.

मीना, वाचता वाचता मन गुंतून जातं इतका छान वाटला तुझा वानू आणि त्याचे अनेक नखरे.