ठेवा

Submitted by कविन on 18 May, 2010 - 01:58

आSSSई, कित्ती मोठ्ठ विमाSSन खिडक्या पण दिसतायत..." म्हणताना लेकीची मान घरावरुन उडणार्‍या विमानाबरोबर वळत होती नी आश्चर्य तोंडभर पसरुन... वासलेला आ बघुन, मला फाSSर मजा वाटत होती..

"मSSनू इकडे ये.." मी तिचा हात धरुन तिला पुढच्या दारातुन घरात घेऊन जवळजवळ धावत मागच्या दारातुन बाहेर घेऊन आले...

"हे बघ, तेच विमान..." तिला ते विमान दाखवताना मला आमचं लहानपणीचं, विमान बघताना ह्या दारातुन त्या दारातल पळणं आठवल.

"अगं…! कुठे निघालात…? कणेरी प्या मग जा…." म्हणत आजी वळली

"आजी ग, आम्ही आलोच्...मनूला प्राजक्ताच झाड नी रामाच देऊळ दाखवुन आलेच मी...."

गणपतीत भल्या पहाटे म्हणजे इतर वाडीला जाग यायच्या आधी आमच्या आठ जणांची धांदल उडायची. प्राजक्ताचा सडा वेचुन आम्ही अण्णांबरोबर बाकिच्या झाडांची फुलं वेचायला जायचो...झाडावर चढुन फुलं काढायची हौस पुर्ण करुन मग गाठायचो गांधी मैदान....तिथे दुर्वा वेचायच्या नी घरी येऊन प्रत्येकाने त्या निवडायच्या...आठ जणांचे आठ हार गणपतीला घातले की काहीतरी अ‍ॅचिव्ह केल्या सारखं वाटायचं....

आज तेच सारं मनूला दाखवायच होतं....

मधेच अण्णा...."अरे उन्हाच नका धावडवू रे त्यांना..." म्हणत मागच्या दारी कुंड्यांना पाणी घालायला निघून गेले.

नेहमी सारखा टोपली भर प्राजक्त गोळा करायला गेले तेव्ह्ढ्यात विमानाच्या आवाजाने तंद्री मोडली. टोपली रिकामीच राहिली... Sad

विमान कसलं... गजराचं घड्याळ काळाची जाणिव करुन देत होतं......स्वप्न होतं तर हे सारं..... Sad

परत एकदा रुटिन गाडं सुरु...मनूची शाळा....आमचं ऑफिस....घर.........मित्र मैत्रिणी ........नातेवाईक...कार्यक्रम. नी परत एकदा आमचं आजोळचं घर झालं - कुलुप बंद..

कॉलेजमधे असेपर्यंत वेळ मिळेल तेव्हा आजोळी म्हणजे चेंबूरच्या घरी जाणं व्हायचं. आजकाल मात्र स्वप्नातच फक्त तिथे जाणं होतं Sad

अण्णा जाऊन १० वर्ष झाली, आता आजीही गेली.........ती गेली तेव्हा दाटून आलेले हे सगळे विचार....
लिहू का नको लिहू च्या उंबरठ्यावर असलेले....बर्‍याच वेळा मनातल्या मनात पुर्ण केलेले नी पुन्हा पुन्हा त्यावर खोडरबर चालवुन पुसुन टाकलेले....

ह्या १४ तारखेला पुन्हा एकदा त्या विचाराने उचल खाल्ली. १४ ला आजीचा वाढदिवस्....त्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर तिच्या-आमच्या घरात फिरुन आले.....मनानेच.

वेगवेगळे विचार तिच्या आठवणींचं बोट धरुन फिरायला लागले....अगदी १ वर्षा पुर्वी मी "आपण तिला चेंबूरला त्याच त्या "तिच्या-आपल्या" घरी घेऊन जाउयात तिची इच्छा आहे तर..." असं सगळ्या भावंडांना सांगत होते...तेव्हा भावाचं म्हणणं पडल्... "नको ताई, नको नेऊयात तिला.....आता काय राहिलय तिथे?....तिच्या मनात जपलेली जूनी वास्तूच बरोबर राहुदे शेवटपर्यंत तिच्या पाशी..."

कधी मोठा झाला माझा लहान भाऊ? पटलं मला त्याच नी जाणं राहितच झालं.

ती गेली त्याच्या दोन दिवस आधी आई नी मामी तिला भेटून आलेल्या...मला कळल्यापासुन मन सारखं फिरुन तिच्या पाशीच जात होत शेवटी काहीही झाल तरी तिला भेटून यायचच असं ठरवुन रविवारी सकाळीच निघाले घरुन, नेहमीचीच ऑफिसला जाताना पकडते ती ट्रेन पकडुन गेले भेटायला.....क्षण दोन क्षण ओळख पटली असावी तिला....बराच वेळ बसले.

खरंतर तिचा हात हातात घेतला तेव्हा आलेले विचार होते "नको अडकूस आता आमच्यात्...तू हवीच असणारेस... नेहमी करताच, पण... Sad , नको आता....हे अस नाही बघवत तुला...." "देवा, जे काही होईल ते शांतपणे होऊदे, निदान नेताना फुलासारखी अलगद ने रे"

नंतर आश्चर्य वाटलेल माझं मलाच, आपल्या आवडत्या व्यक्ती विषयी असे म्हणजे निरोपाचे विचार कसे येऊ शकतात मनात...

दुसर्‍या दिवशी परत त्याच ट्रेनने ऑफिसला जाताना फोन वाजला...."मावशी कॉलिंग..." असं वाचुनच कळलं कशासाठी फोन आहे ते.एक क्षण आईची काळजी वाटली, कशी येईल ती गर्दीतून.....अशा मन:स्थितीत? पण माझा भाऊ नी नवरा दोघेही होते तिच्या बरोबर म्हणुन थोडी काळजी कमी झाली.

पुन्हा सगळं रविवारच्या क्रमानेच झाल.रविवारी ज्यावेळी कांदिवलीला उतरले होते त्याच वेळेला सोमवारी उतरले....त्याच वेळेची बस पकडली.....त्याच खोलीत परत जायचं होतं ...पण आत जायचं बळच नव्हतं पायांमधे.

आदल्या दिवशी भले तिने एकच क्षण ओळखलं असेल. पण... ती होती तेव्हा आणि आज नाही.....हा केव्हढा मोठा फरक होता एका रात्रीत झालेला...आदल्या दिवशी मीच प्रार्थना करत होते...देवा नको हाल करुस तिचे आणि तरीही.......... प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा हातपाय गळून गेलेले माझे.

माझ्या पेक्षा आई बरी म्हणायची.तिची प्रतिमा हळवी नी माझी खंबीर तरिही हा क्षण तिने जसा निभावून नेला तसा मला नाही जमला.

वाडीतली आमची ममता मावशी नेहमी म्हणत असते, "येऊन जा ग एकदा, बघ तरी कस झालय घर आता..."

नकोच वाटतं मला. एकदा बघितलं तर स्वप्नातुन पण उडून जाईल पुर्वीच चित्र, असं वाटत. म्हणुन तिला फक्त हो बघुयात कसं जमतय म्हणत फोन ठेवते मी....

घरातली माणसं गेली, घराचीही पडझड झाली. काय दाखवू लेकीला तिथे? मुळात आता आहे त्या परीस्थितीतलं घर ओळखीचं वाटेल का मला? लेकीने बघितलच नाहीये काही, पण मी जे अनुभवलय, बघितलय ते दिसेल का तिथे मला परत..?

का त्यापेक्षा हे असं स्वप्नांमधे दिसतं तेच तेव्हढं जपून ठेवू मी? तिथला प्राजक्ताचा सडा आजकाल फक्तं स्वप्नातच दिसतो. वाळवी लागलेल्या भिंतीही तिथेच पहिल्यासारख्या होतात, भयाण शांतता भरुन राहिलेलं घर हे स्वप्नातच लेकुरवाळं होतं नी स्वप्नातच फक्त किलबिलतं. Sad

काळाबरोबर सगळं बदलणार हे जरी कळलं तरी मनाला नको वाटतं. काळ तर बदलता येत नाही मग त्या काळाला झब्बू द्यायला स्वप्ना शिवाय पर्याय तरी आहे कुठे दुसरा?

माणसांबरोबर वास्तूही इतिहास जमा होतात
काळाच्या पडद्याआड पाऊलवाटाही पुसटतात
आठवणीत जमा झालेल सारं
फक्त स्वप्नातच दिसू शकतं
सत्य नाकारत नाही मी,
तरी मन वेडं त्या स्वप्नातच रमतं

गुलमोहर: 

कवे, अप्रतिम लिहीलयस.
डोळ्यांच्या कडा नकळत पाणावल्या.....

फार सुरेख... लहानपणीसारखं निवांत आजीच्या घरी रहाणं आता कुठे मिळायला... आता नुसती ४/५ तासांची भेट घोड्यावर बसुन या आणि घोड्यावर बसुन जा Sad

आठवणीत जमा झालेल सारं
फक्त स्वप्नातच दिसू शकतं
सत्य नाकारत नाही मी,
तरी मन वेडं त्या स्वप्नातच रमतं .....

कवे, खुप छान लिहीलयस.

फार सुरेख कविता. कालच मी आणि आई बेळगावला आजोळचं घर जिथे होतं तिथे जायचा विचार करत होतो. खूप वाटतं तिथे जावंसं पण काय बघायला लागेल माहित नाही. त्या घराचे फोटो पण नाहित जवळ. आठवणीतलं घर पुसून जाईल अशी भीती वाटते. मनाच्या डोळ्यांसमोर जे दिसतं त्याचा स्नॅपशॉट घ्यायची सोय का नाहिये कोणास ठाऊक Sad

खरय गं कविता.. मी जवळ जवळ ३० वर्षांनी माझ्या आजोळच्या गावाला भेट दिली तेंव्हा तिथे इतके बदल झाले होते कि मला जुनं काही सापडलंच नाही.. आजीचा बंगला सुद्धा नाहिसा झाला होता..त्या जागी उंच अपार्टमेंट बिल्डिंग दिमाखाने उभी होती.मी मागच्या बाजूला जाऊन जुनी विहिर शोधत फिरत होते वेड्यासारखी अर्धा तास Sad
पण माझ्या मनात मात्र लहानपणीचे सर्व क्षण नीट जपून ठेवलेले आहेतच.. ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही Happy

लेख मस्तय. अगदी मनातले विचार पुन्हा वाचायला मिळाले. बालपणीचा रम्य काळ Happy आणि वर्तमानकाळ यांचे नेहेमीच द्वंद्व सुरु असते. आपला रम्य काळ पुढच्या पिढीने देखिल अनुभवावा असा स्वाभाविक हट्ट असतो.

>>>>घरातली माणसं गेली, घराचीही पडझड झाली. काय दाखवू लेकीला तिथे? मुळात आता आहे त्या परीस्थितीतलं घर ओळखीचं वाटेल का मला? लेकीने बघितलच नाहीये काही, पण मी जे अनुभवलय, बघितलय ते दिसेल का तिथे मला परत.>>>>

खरयं घरातले एक माणूस जरी कमी झाले तरी ती रिकामी जागा कुणामुळेच भरुन निघु शकत नाही.

मस्त लिहलयस भाच्चे,

प्रत्येकाच्या मनामध्ये एकतरी घर असतं.
बरचस स्वप्नात, पण थोड खरं असतं.

घरात असतात माणसं आपल्यासाठी आपली
जवळ असतात जरी कितीही दूर दिसली.

सुंदर!
पण एक सांगू? तुझ्या मनात असतं भरपूर, वाचताना ते जाणवतं. पण त्या मानानं तू आवरतं घेतेस, खूपच त्रोटक लिहितेस. ('फिरुनी नवी जन्मेन मी...' वाचतानाही मला ते अगदी प्रकर्षानं जाणवलं होतं.)
तेवढा वेळ तुला मिळत नसेल हे अगदी मान्य आहे, तरीही पोस्टायची घाई न करता मनातलं पहिलं कागदावर (किंवा एडिटरमधे, स्क्रीनवर) उतरवलं की काही दिवस ते डोक्यात तसंच घोळवत रहा, प्रवासात, ट्रेनमधे येता-जाता... त्यावर एलॅबोरेशन्स तुला आपोआप सुचतील आणि मग ते लेखन अजून सुंदर होईल.
(काहीही अभ्यास न करता ८०-८५ टक्के मार्क्स मिळवणर्‍याला जसं आपण सांगू की थोडी मेहनत घेतलीस तर कुठल्या कुठे पोचशील, तसंच आहे हे थोडंसं. :))

हम्म! खरय लले. अग दरवेळी मला वाटत रहातं लांबण लागेल म्हणुन कात्री घेऊनच बसते मी Proud

आणि ते वेळ मिळत नाही वगैरे बिलकुल नाही, उलट येताना जातानाचा १ तास माझा असतो (उभ राहुन आले तरी) इतर व्यवधान कमी असतात तेव्हा Proud

उशीरा वाचले. मस्त लिहीलस .. मागे एकदा मामाला म्हणाले होते.. जुन्याघरी जाउयात.. पहायला फक्त. माझे तर ३-४ वर्ष शिक्षणपण मामाकडे झाले. पण मामा म्हणाला नको.. खुप बदललय सगळ. वाइट वाटेल ते पाहुन Sad

Pages