कसलं बायकी नाव वाटतंय ना. लेख मात्र बायकी नाही. पुर्षी आहे. पुर्षाने लिहिला आहे म्हणूनही आणि पुर्षावर लिहिला आहे म्हणूनही....... चला आजचा पांचटपणाचा कोटा संपला. (जास्त जोरात हुश्शकारू नये. तुमच्या हुश्श्कार्यांच्या (सुस्कार्यांच्या चालीवर) आवाजाने आम्हाला अजून पांचट लिहिण्याचा मोह झाल्यास त्याला समस्त पुर्षी मंडळी (म्हणजे सदरहु लेखातली) जवाबदार नाहीत).... जाऊदेत. ऑन अ सेकंड थॉट, सव्वा (कंस धरून सव्वा) वाक्यांपूर्वी सोडलेला संकल्प आम्ही मागे घेत आहोत. कारण लिहीत असताना वेळोवेळी पाउल सांभाळणे (घाबरू नका.. पांचटपणा या अर्थी म्हणतोय मी) अंमळ कठीणच जाईल असे आजवरच्या एकूण अनुभावरून दिसते आहे. (जास्त जोरात अरेरू नये. आधीचे हुश्श्कारे आणि आताचे 'अरेरे' हे एकाच व्यक्तीचे आहेत हे आम्ही आवाजावरून ओळखू शकतो. तेव्हा सांभाळून.) असो. पुणेरी पाट्या संपल्या.. आता मूळ मुद्द्याकडे वळू.
आटपाट नगरातल्या 'सुंदर माझ्या घरात' सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होतं.
१. बायकोने डायनिंग टेबलच्या खालून पातेलं उचललं, हॉलच्या एका कोपर्यातून डाव उचलला.
२. लपवून ठेवलेली सुरी हळूच बाहेर काढून पटकन भाजी चिरली आणि पुन्हा पटकन सुरी लपवून ठेवली.
३. हॉलमधून हिंगाची आणि मिठाची डबी आणली आणि भाजीत हिंग, मीठ घालून पुन्हा जाग्यावर (म्हणजे हॉलमध्येच) ठेवून दिली.
४. मी बेडरूम मधून टूथपेस्ट घेतली आणि ब्रशवर लावून पुन्हा जाग्यावर (म्हणजे बेडरूममधेच) ठेवून दिली.
५. दात घासून बाहेर आल्यावर मी मगाशी आत जाताना शिताफीने चुकवलेल्या टॉयलेटपेपरच्या गुंडाळीत पाय अडकून धडपडलो.
६. हॉलमध्ये येऊन सोफ्याखालून मोबाईल उचलून २-३ फोन केले. फोन झाल्यावर मोबाईल पुन्हा सोफ्याच्या खाली ठेवून दिला.
नाही.. यातलं एकही वाक्य आणि त्यांच्या (आणि वस्तूंच्याही) जागा चुकलेल्या नाहीत. सगळं अगदी जागच्या जागी आहे व्यवस्थित. आणि सुरुवातीला थोडं अवघड गेलं असलं तरी आता आम्हालाही त्याची एकदम छान सवय झालेली आहे. कोण म्हणतं सवयी बदलणं कठीण आहे? सव्वा वर्षाचा युवराज मॅनेज करत असलेल्या कुठल्याही घराच्या आणि घरच्यांच्या सवयी या अश्शा चुटकीसारख्या बदलू शकतात. बदलाव्याच लागतात. नाहीतर इतकी वर्षं करतोय तसं बाथरूममधल्या छोट्या ब्रशहोल्डर मधून ब्रश आणि पेस्ट घेऊन दात घासून झाल्यावर तिथेच ठेवायला आणि रोज सकाळी तिथूनच परत घ्यायला कोणाला आवडणार नाही? हिंग मिठाच्या डब्या त्यांच्या स्वयंपाकघराच्या नेहमीच्या जागी सापडल्या तर कुठल्या गृहिणीला आवडणार नाहीत? स्वयंपाकाचं पातेलं, डाव, झारा, चमचा अशा वस्तू चमचाळ्यातून घ्यायला आणि तिथेच ठेवायला कोणाला आवडणार नाहीत? मोबाईल टेबलवर किंवा टीपॉय वर सापडला तर कित्ती मज्जा येईल. टॉयलेटपेपरची लांबच्या लांब गुंडाळी बेडरूम, किचनपर्यंत न येता बाथरुमात तो त्याच्या योग्य स्थळी अर्थात टॉयलेटपेपरहोल्डर वरच विसावला तर काय बहार येईल.
उगाच किती त्या अपेक्षा ठेवतो आपण आणि त्या अपेक्षांच्या गुंत्यात (मी जसा टॉयलेटपेपरच्या गुंडाळीत अडकतो तसे) उगाच अडकून बसतो. कारण खरं पाहता या सगळ्या वस्तू आपापल्या जागी असल्याच पाहिजेत असा नियम का? आणि 'आपापली जागा' च्या आपल्या व्याख्येत आणि युवराजांच्या व्याखेत जमीन आस्मानाचं नाही तरी निदान बाथरूम ते बेडरूम एवढं अंतर तरी नक्कीच असतं.
आता आमच्याकडेच बघा ना. सकाळी युवराज उठले की बेडरुमीतून थेट हॉलच्या दिशेने धावत सुटतात, आवरलेला हॉल (दिवसभर पोराने केलेला सगळा पसारा आम्ही आवरून ठेवतो आणि मगच झोपतो हे सांगण्याचा सुप्त उद्देश या वाक्यात आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते १०१% खरं आहे.) बघून क्षणभर आम्हाला (आई किंवा बाप जो त्याच्या नजरेच्या तावडीत सापडेल त्याला) खुन्नस देतात, दुसरा तुच्छ कटाक्ष कोपर्यात विसावलेल्या खेळण्यांच्या बास्केटकडे टाकतात, त्यात विसावलेल्या कुत्रे, मांजरी, ससे, अस्वलं, गायी, बैल, बॉल, बॅट, गेम्स, विमानं, छोटी पुस्तकं, गाड्या, खुळखुळे, जोकर्स, रिंगा, ठोकळे, हेलीकॉप्टर यांना त्या बास्केटमधून दणादणा बाहेर काढतात आणि... आणि.. आणि त्याक्षणी काय होतं काही माहित पण निवडणुका संपताक्षणी जनतेकडे दुर्लक्ष करणार्या नेत्यांच्या थाटात आमच्या बाळासाहेबांचा (राजकारणाच्या उपमेला थोडं शोभेसं नाव नको का) ती खेळणी बास्केटमधून बाहेर भिरकावून लावून घरभर पसारा करून झाल्या झाल्या त्या खेळण्यांच्या राशीमधला इंटरेस्ट संपतो. (नक्की नेता होणार मोठेपणी.) आणि त्यानंतर त्या तुच्छ जीवांना, बाहुल्यांना, गाड्यांना तुडवत, लाथाडत '३००' मधल्या शूर योद्ध्यांप्रमाणे युवराज (मगासचं उदाहरण संपलं. म्हणून पुन्हा मूळ नाव) दणादण पावलं टाकत किचनच्या दिशेने प्रस्थान करतात. त्यांच्यामागे आम्ही हळू हळू सांभाळून पावलं टाकत कुठलंही खेळणं (आणि तंगडंही.. हे मुख्य) न मोडता चालण्याचा प्रयत्न करतो.
अ. तुम्ही 'मि. नटवरलाल' बघितलाय का? त्यात शेवटच्या प्रसंगात विक्रम (पक्षि अमजद) नटवर (पक्षि अमिताभ) ला, त्याच्या हिरविणिला (रेखा. पक्ष्याचं नाव आठवत नाही) आणि काही गाववाल्यांना एका गुहेत कोंडून ठेवतो. गुहेच्या बाहेर जमिनीच्या खाली बॉम्ब्स पेरून ठेवतो आणि स्वतः लाल चष्मा लावून जमिनीखालचे बॉम्ब्स शिताफीने चुकवून निघून जातो. त्यानंतर अमिताभ दाराचं कुलूप फोडून ('मी आणि माझा शत्रुपक्ष' मधल्या घोड्यासारखं तेही मरतुकडंच तर असतं खरं तर.. तरीही), त्या कैदेतून बाहेर पडतो. "पण त्याच्याकडे लाल चष्मा नसल्याने जमिनीखालचे बॉम्ब्स (अर्थात न दिसणारे) त्याला कसे दिसणार बरं आता?" छापाचे प्रश्न आपल्याला पडतात न पडतात तोच नटवर आयडियेची कल्पना लढवतो आणि विक्रमच्या बुटांच्या ठशांवर पाय ठेवून अगदी सावधपणे आणि शिताफीने बॉम्ब्स चुकवत गुहेच्या बाहेर पडतो.
(एवढं करण्यापेक्षा विक्रम त्यांना तिथेच मारून का टाकत नाही, एवढं मरतुकडं कुलूप का लावतो, लाल चष्म्याने जमिनीखालचे बॉम्ब्स दिसू शकतात का वगैरे वगैरे प्रश्न विचारू नयेत.)
आ. तुम्ही तुफ्फान पाऊस पडून गेल्यावर कधी डोंबिवलीच्या रस्त्यातून हिंडला आहात का? किंवा जनरलच पावसाळ्यात डोंबिवलीत फिरला आहात का? प्रत्येकजण एका हातात छत्री आणि दुसर्या हाताने जीन्स/पँट्स/साड्या/सलवारी पावलापासून वर करून, नजर जमिनीला खिळवून ठेवून, हलकेच एकेक पाऊल टाकत, रस्त्यावरचा चिखल, पाणी, डबकी, घाण शिताफीने चुकवत चुकवत जाताना दिसतो.
(डोंबिवलीत अजूनही पाणी साठतं का, अजूनही चिखल होतो का, मग महापालिका रस्ते दुरुस्त का करत नाही वगैरे वगैरे प्रश्न विचारू नयेत.)
युवराज ताडताड निघून गेल्यावर आम्ही त्यांच्या मागे जाताना कशी सावरत, सांभाळत, सावकाश पावलं टाकत जातो याचं अगदी चित्रमय वर्णन करण्यासाठी अ आणि आ चं प्रयोजन होतं. (बाकी मीही डोंबिवलीचाच आहे. आणि त्या चिखलाचा मला अभिमानही आहे कारण त्या सवयीमुळेच मी आज (माझ्याच) घरात कितीही पसार्यात निर्भयपणे चालू शकतोय. तेवढंच एक वाईटात चांगलं.) विषयांतराबद्दल (नेहमीप्रमाणेच) क्षमस्व. तर असे तीन 'सा' लावत आम्ही किचनात पोचेपर्यंत तिथल्या ट्रॉल्या, ड्रॉवर्स उघडले गेलेले असतात. त्यातून हिंग, मीठ, मसाल्याच्या डब्या (आठवतंय?) बाहेर येतात. पातेली, चिमटे, चमचे, डाव, कालथे, गाळणी आपापल्या जागा सोडतात. अशा रीतीने समस्त वस्तू अस्ताव्यस्त करून झाल्या की विक्रमची स्वारी बेडरूमीच्या दिशेने वळते. चार्जिंगला लावलेला मोबाईल खेचला जातो, धुतलेले कपडे धुण्याच्या कपड्यात आणि व्हाईसव्हर्सा ("याला मराठीत समर्पक प्रतिशब्द काय?".. हा मला आत्ता लिहिताना पडलेला प्रश्न आहे. विक्रमला तो प्रश्न पडण्याची आवश्यकता भासत नाही.) केले जातात. त्यानंतर बेडरुम, किचन, हॉल अशा अनेक फेर्या घडतात, अनेक वस्तूंचं (अर्थात जबरदस्तीने) स्थलांतर केलं जातं, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात रहात नाही (पायपुसणं धुतलेल्या कपड्यांच्या ढिगात बघितलं की हा वाक्प्रचार अक्षरशः जिवंत झाल्यासारखा वाटतो मला.). अचानक काहीतरी राहून गेल्याचं आठवून सिकंदराची स्वारी बाथरूममध्ये धडक देते. टॉयलेटपेपरच्या रोलवर घाव घातला जातो. तो एका हातात धरून खेचत खेचत मधल्या पॅसेजमधून बाहेर येऊन त्याची बेडरूमपर्यंत वरात काढली जाते. त्या कागदाच्या ढिगावर वर्चस्व प्रस्थापित करून झालं की कंटाळा येतो. मग पुन्हा किचन, हॉल, बेडरुम अशा फेर्या घडणं सुरु होतं.
तर हे असं चालू आहे अनेक दिवस. (आणि बाहेरच्या जगाला त्याचा पत्ताही नाही. जरा कोषातून बाहेर निघा आपापल्या
) पहिल्या दिवशी आवरलं, दुसर्या दिवशी (स्वतःला) सावरलं आणि पुन्हा आवरलं. आणि असं करता करता हे रोजच व्हायला लागलं हो. आणि त्यामुळे बाकीची कामं (म्हणजे नवीन पोस्ट्स लिहिणे, इतरांच्या पोस्ट्स वाचणे, मेलामेली करणे, बझ-बझ खेळणे वगैरे वगैरे) सोडून सारखं घरच आवरत बसायला लागायला लागलं. आधीच आम्ही 'कं'ग्रस्त आणि त्यात ही सततची आवराआवरी करून अजूनच कं यायला लागला आणि आम्ही निर्णय घेऊन टाकला. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' अर्थात युवराजांनी वस्तूंना जसं आणि जिथे ठेवलं आहे तसंच आणि तिथेच राहू द्यावं आणि अगदी खरं सांगतो 'चित्ती असो द्यावे समाधान' वालं समाधान आम्ही अगदी स्वानुभवाने उपभोगायला लागलो. त्यामुळे वर दिलेलं १ ते ६ (अजूनही बरेच आहेत. आत्ता एवढेच आठवले) ची आता आम्हाला सवय झाली. सुरुवातीला जड गेलं पण आता काही वाटत नाही. मसाल्याच्या डब्या हॉलमधेच असणार, स्वच्छ कपडे धुवायला टाकलेल्या कपड्यांमध्येच मिळणार, मोबाईल सोफ्याखालीच सापडणार वगैरे वगैरेची आम्हाला एवढी सवय झाली की काहीच वेगळं वाटेनासं झालं.. अगदी अंगवळणी पडलं. आणि आता अगदी आपल्यात म्हणून सांगतो.. पातेलं, डाव, चमचे हॉलमध्ये असलं, किंवा टूथपेस्ट बेडरुममध्ये असली किंवा मोबाईल सोफ्याखाली असला की कसं बरं पडतं. म्हणजे चमचा शोधताना उगाच भांड्यांचा अख्खा ढीग शोधायला नको किंवा चमचाळ्यातली गर्दी हटवायला नको.. सोफ्यावर बसल्या बसल्या सोफ्याखाली हात घातला की मिळाला मोबाईल उगाच त्यासाठी टेबल/ड्रॉवरपर्यंत जायला नको. थोडक्यात फायदे अनेक आहेत फक्त आपल्या (वाईट) सवयी थोड्या बदलाव्या लागतील. आहात तयार?
तळटीप : वर्णन अधिक वास्तवदर्शी वाटावं (कारण ते वास्तवच आहे) म्हणून पुराव्यादाखल घरातल्या पसार्याचे फोटो टाकणार होतो परंतु बायकोच्या धाकाने ते आवरतं घेतलं आहे.
मी माझ्या ऑर्कुटवर माझा लेक
मी माझ्या ऑर्कुटवर माझा लेक व्हायच्या आधी आणि नंतर असे बैठकीच्या खोलीचे फोटो टाकलेत. ही तिच खोली का असा मलाच प्रश्न पडतो
सुंदर माझं घर बायकी का बुवा ?
हा हा हा.. खरं आहे. असेच
हा हा हा.. खरं आहे. असेच प्रश्न पडत असतात आम्हालाही.
>> सुंदर माझं घर बायकी का बुवा ?
कारण आपल्या लाडक्या दूरदर्शनवर फार्फार वर्षांपूर्वी याच नावाचा एक बायकांचा म्हणजे महिलावर्गासाठीचा एक कार्यक्रम असायचा (आता 'मन मानसी' वगैरे असतो तसा.)
हा हा हा..... एन्जॉय!!!
हा हा हा..... एन्जॉय!!!
धन्स अरुंधती
धन्स अरुंधती
लय भारी... फोटो नाही टाकले
लय भारी... फोटो नाही टाकले तरी तुमचं सुंदर घर अगदी डोळ्यासमोर उभं राहिलयं...
मस्त! बाळराजेंनी त्यांच्या
मस्त! बाळराजेंनी त्यांच्या राज्यात नवीन घडी बसवलीय
हटके...........!!!!!!!!!!!!!
हटके...........!!!!!!!!!!!!!
मस्त लिहीलं आहे. सध्या मी
सध्या मी सुपात आहे....अजून दोन्तीन महीन्यात जात्यात जाणार ! (लेक सध्या रांगते आहे)
तुमचे उपाय फार वास्तवदर्शी वाटतात.
सही बाकी भारतीय क्रिकेट
सही
बाकी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण सुधारायला हवे असेल तर प्रत्येकाच्या घरी एक लहान युवराज नेऊन ठेवावे— काचेची भांडी, मोबाईल (ही वस्तू खिडकीतून बाहेर टाकणे हा आवडता छंद असतो बरं) व तत्सम वस्तू झेलून झेलून चांगला सराव होईल.
एका ओळखीच्या गृहस्थांच्या
एका ओळखीच्या गृहस्थांच्या सौंचा मोबाईल त्यांच्या छोट्या पोरीने डिटरजंट ने धुतला - शी शी झाला होता म्हणून!!
अजुन तुमच्या टीव्ही रिमोटला
अजुन तुमच्या टीव्ही रिमोटला साबण लावून शंभो घातली नाही वाटते युवराजांनी. बाबाच्या धुतलेल्या शुभ्र रुमालाने मगात पाणी घेउन फरशी पुसल्यावर पेकाट मोड्लेल्या बाबाकडे बघुन्,"बाबा कसा पल्ला? डुबुक" असे रिमार्क मिळाले कि कसं सार्थक वाटत नाही आई-बाप झाल्याच!
मस्त!
मस्त!
मस्त, झकास, पण अशा
मस्त, झकास, पण अशा युवराजांमुळेच घराला घरपण येते. डोंबिवलीचे वर्णन अगदी तंतोतंत.
मस्त. मजा आली.
मस्त.
मजा आली.
सही लिहीलस रे.. आवडल
सही लिहीलस रे.. आवडल
हो हो. आमी बी रोज ह्येच करतो
हो हो. आमी बी रोज ह्येच करतो - आवरतो.
पोरांना सर्व खेळणी सोडुन रिकाम्या डब्यात, स्वैपाकघरातील वस्तुंमध्ये अतोनात रस का असतो?
रैना, काल बायकोला बराच वेळ
रैना, काल बायकोला बराच वेळ घरातलं लाटणंच सापडेना. आमच्या पिल्लुने "मी तुला पोलि कलुन देते" म्हणून जे खेळायला घेतलं ते कुठे टाकलं बराच वेळ सापडेना. शेवटी तिच्या खेळण्यांच्या पिशवीत सापडलं
.. सगळ्यांना धन्स !!
मस्त लेख आमच्या घरी पण अशीच
मस्त लेख

आमच्या घरी पण अशीच परिस्थिती. रीमोट, मोबाईल हे गादीखाली/पलंगाखाली/उशीच्या अभ्र्याखाली/किचन ड्रॉवर/खेळण्याची पिशवी/चपलांचा स्टँड/पडद्याच्या मागे (लीस्ट कंटीन्युज...) कुठेही सापडु शकतात ...
मस्त खुपच मस्त. आमच्या घरी
मस्त खुपच मस्त. आमच्या घरी हीच स्थिती आहे. खेळण्यची पाटी उलटवली कि त्यामधिल रस सम्पतो. आनि मग मोबाइल, पोळ्यान्चा डबा, पाण्याचे भान्डे याची फेकाफेकी सुरु. आम्ही आमच्या घरी हॉलमधे चक्क गाद्या घालुन ठेवतो, चिरन्जीवान्ना खेळायला हवे म्हणुन.
ही:ही: अगदी अगदी!!! आम्ही
ही:ही: अगदी अगदी!!!
आम्ही शेवटी तिलाच विचारतो "बाबाची चावी कुठे?" किंवा "आईचे आयकार्ड कुठे?".. तिला शरण गेले की सगळे सापडते.
केवळ मस्तं.
केवळ मस्तं.
शँकी, मुग्धानन्द, जाईजुई,
शँकी, मुग्धानन्द, जाईजुई, दाद, खूप आभार !! थोडक्यात घर गहर की कहानी है ये !!
(No subject)
वा खरंच झक्कासच! फोटोंची गरज
वा खरंच झक्कासच! फोटोंची गरज वाटली नाही कारण हुबेहुब चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलय!
खरच आहे... माझी सानिया- वय
खरच आहे... माझी सानिया- वय वर्ष ४... परवा तिला आणलेला वॉटरगेम तिने दहा मिनिटात ४थ्या मजल्यावरून खाली टाकला.. कारण काय तर तो खराब झाला होता... कसा टाकला विचारले तर म्हणाली पुढचे मला माहीत नाही... आणि म्हणे नाहीतरी तो तुटल्यावर तू बघून काय करणार होतीस? पाणी सांडलं असतं तर मलाच ओरडली असतीस... म्हणून मी तो खाली सोडून दिला... तिच्या या वाक्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मला अजुनही कळलेलं नाही... तेव्हा कळलं... माझी मुलगी आगाऊच नाही तर प्रॅक्टिकलही आहे...
माझं घड्याळ, घराचं कुलूप, मोबाइल अशा वस्तू तिच्या सायकलच्या डिकीत सापडतात... पण तिच्या शाळेत तिला खेळून झाल्यावर क्लीन अप टाइम शिकवलेलं आहे... त्यामुळे खेळ संपल्यावर वस्तू आपसूक त्यांच्या जागेवर जातात... पण पायाखाली एखादं काहीतरी येतंच... सायकलला टॉवेल बांधून त्यात बाळाला झोपवणं, (कुत्रा, टकली- रडकी बाहुली इ. इ.), शाळेत सोड्णं हे आवडते खेळ...
नानबा, मेघाराजन, कोमल के,
नानबा, मेघाराजन, कोमल के, धन्स
आमच्याही बाहेरच्या खोलीची हिच
आमच्याही बाहेरच्या खोलीची हिच अवस्था थोड्याफार फरकाने (पातेली, हिंग वगैरे वजा करुन-ते किचनमध्येच) पण अस्ताव्यस्त खेळणी पसरलेली. कार्स आवरुन ठेवल्या की पुन्हा पाच मिनिटांत खोका जमिनीवर रिकामा. कधी कधी सोफ्याच्या मागे कव्हरमध्ये २,३ कार्स अडकलेल्या दिसतात तर कधी माझा फोनही तिथेच सापडतो. शेवटी काय 'घरोघरी....'
sho shweet!!! नंतर हळूच चोरून
sho shweet!!! नंतर हळूच चोरून फोटो ही टाक... आम्हाला दुसर्यांच्या घरातले पसारे पाहून तेव्हढचं हायसं वाटेल
>>>>> सही बाकी भारतीय
>>>>> सही
बाकी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण सुधारायला हवे असेल तर प्रत्येकाच्या घरी एक लहान युवराज नेऊन ठेवावे— काचेची भांडी, मोबाईल (ही वस्तू खिडकीतून बाहेर टाकणे हा आवडता छंद असतो बरं) व तत्सम वस्तू झेलून झेलून चांगला सराव होईल.
<<<<
आहे तो युवराज झेपत नाही आपlya indian team la.......
Pages